अभिनयाची उंची, जबरदस्त आवाज, रिएलिटी शो मधील सहज व
आदबशीर वावर, सामाजिक प्रकल्प, कविता व निसर्ग याविषयीची संवेदनशीलता आणि
त्यासोबतच अत्यंत व्यावसायिक वर्तणूक हे सर्व एखाद्या व्यक्तीने वक्तशीरपणे सतत
दाखवत राहणे हे एखाद्या चमत्कारासारखेच.
म्हणूनच गेले ४० वर्षे संपूर्ण भारतीय
मनावर अमिताभचे गारुड कायम आहे.
अमिताभ बच्चन. जन्म ११ ऑक्टोबर १९४२. अरेच्चा, म्हणजे माझ्या बाबांच्या पेक्षा फक्त २ दिवसांनी मोठा असलेल्या या ७३ वर्षाच्या माणसामध्ये अजूनही कार्यरत असण्याची उर्मी व उर्जा कशी येते ?
जेंव्हा कालपरवा प्रसिद्धी मिळालेले नट सेटवर तमाशा करतात,
उशिरा येतात तेंव्हा सिनेजगतातील मोठी मोठी माणसे आजही सांगतात की शुटींगच्या
वेळेपूर्वी अमिताभ बच्चन नियमितपणे हजर असतात. दिग्दर्शक जे म्हणेल त्याचा आदर करत
असतात. अमिताभभोवती नेहमीच लोकप्रियतेचे वलय राहिले. लोकप्रियतेबरोबर वादाचे,
मसालेदार चर्चांचे गहिरे नाते. तरीही राजकारणातील वादग्रस्त काळ, एबीसीएल
कॉर्पोरेशनचं कर्जबाजारी होणं या व्यतिरिक्त इतर वेळी त्याच्याबाबत नकारात्मक
भावना कमीवेळाच पाहायला मिळाली त्याला कारण अर्थातच त्याचं संपूर्ण व्यावसाईक व
वक्तशीर वागणे आणि संवेदनशीलता.
अमिताभ हे नाव “सुमित्रानंदन पंत” या काविमित्राच्या सांगण्यावरून वडील व ज्येष्ठ कवी
हरिवंशराय बच्चन यांनी ठेवलेलं. त्याचा अर्थच मुळी “कधीही न विझणारा प्रकाश”. आज कविवर्य जर हयात असते तर काळाने नाव खरं
ठरवलंय हे पाहून त्यांना अत्यानंद झाला असता..!
१९७० च्या दशकात “सात हिंदुस्तानी” या सिनेमातून लौकिकार्थाने अमिताभची कारकीर्द सुरु
झाली. सुपरस्टार राजेश खन्नाने गाजवलेला
तो काळ. कुठेही अमिताभला ठळक लक्षात येईल असे काम मिळत नव्हते. त्यापूर्वी व
नंतरही अनेक ठिकाणचे अपयश सतत पाठीशी होतेच. अमिताभच्या जादुई आवाजाची निरंतर आठवण
काढणाऱ्या आपल्याला खरंही वाटणार नाही की एकेकाळी त्याचा “आवाज” आकाशवाणीने नाकारला होता.
नोकरीच्या शोधात असलेला अमिताभ निराश मनाने तिथून परतला होता.
१९७१ मध्ये आलेल्या “आनंद” मध्ये अमिताभने उभा केलेला बाबू
मोशाय व “रेश्मा और शेरा” मधला छोटासा रोल सर्वांच्या लक्षात होताच पण म्हणावं
तसं यश मिळत नव्हतं.
अपयशाने थकलेला अमिताभ मुंबईतून परत जायला निघालेला.
अशात त्याला अडवलं विनोदवीर “मेहमूद”नं. दिलदार मैत्रीसाठी प्रसिध्द अशा मेहमूदने
त्याच्या “बॉम्बे टू गोवा” मधील एक मुख्य भूमिकाच अमिताभला दिली. सिनेमा
लोकप्रिय ठरला. मात्र त्याच्या धडपडीला यशाची खरी कमान लाभली ती १९७३ च्या “जंजीर”मुळेच. राजकुमार आदि दिग्गजांनी
नाकारलेला रोल अमिताभच्या वाट्याला आला आणि अमिताभची घोडदौड सुरु झाली. त्यानं
पहिलं फिल्मफेअर अवार्डच मिळवलं त्यासाठी.
स्वराज्याची स्वप्नं पाहिलेली/ साकारलेली पिढी मागे
पडून आता “ कोणत्याही मार्गे लवकर पैसे कमवून
श्रीमंत होऊ पाहणारी” जमात उदयास येत होती. भ्रष्टाचार
ठसठशीत दिसू लागला होता. त्यासोबत आजूबाजूला वाढलेल्या गुंडगिरीने तत्कालीन
समाजाला एक नैराश्य आलेलं. त्यात अमिताभचा तो “थंड पण क्रुद्ध अवतार” जणू मशालीसारखा तेजाळून उठला. लोकांना मानसिक समाधान
देऊ लागला.
त्यामुळे १०-२० जणांशी एकटा लढणारा, लढून जिंकणारा “तो” नायक कितीही खोटा असला तरी “त्याला” अमिताभच्या चेहऱ्याने, आवाजाने,
अभिनयाने एक वेगळेच परिमाण दिले हे नक्की.
प्रत्यक्षात हिंसेच्या विरुद्ध असणारा, कविता,
सतारवादन यात रुची असणारा अमिताभ पडद्यावर मात्र उलट प्रतिमा साकारत
होता. तसेच कधीही आयुष्यात दारू न पिणाऱ्या या माणसाने अट्टल दारुड्याचे वठवलेले
सीन त्याची अभिनय क्षमता दाखवतात हेच खरे.
त्रिशूल, दिवार, डॉन, देशप्रेमी, आखरी रास्ता, अमर
अकबर अन्थोनी, रोटी कपडा और मकान, लावारीस अशा अनेक सिनेमातले त्याचे अवतार
गाजलेच. मात्र १९७५ च्या “शोले” ने दैदिप्यमान यश दिले. त्यानंतर तसे यश मिळाले ते “मुकद्दर का सिकंदर” साठी. त्याचा तो “रुद्रावतारी” नायक लोकप्रिय असतानाच
त्याने केलेले अन्य चित्रपटसुद्धा मला तितकेच महत्वाचे वाटतात. ह्रिषीकेश
मुखर्जींचा “चुपके चुपके”, “अभिमान”, संजोग, सौदागर, “कभी कभी”, “सिलसिला”, “कस्मे वादे”, “दोस्ताना” "शराबी" यातला अमिताभ नेहमीच
लक्षात राहणारा.
“कभी कभी मेरे दिल में खयाल आता है” हा त्याचा डायलॉग व “सिलसिला” मधील ते प्रणयरम्य
संवाद विसरणं कसं शक्य आहे? त्याच्यावर चित्रित झालेली शेकडो गाणी विसरणं कसं शक्य
आहे?

सहनायक, नायिका, खलनायक, गायक व संगीतकार अशी सर्व
टीम असली तरी मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा आदि निर्मात्यांची सर्व भिस्त अमिताभवर
असायची. आपल्या परिपूर्ण मेहनतीने अमिताभने त्यांच्या विश्वासाला कधी धक्का लागू
दिला नाही. म्हणूनच १९७३ च्या जंजीर, अभिमान पासून सुरु झालेला यशस्वी प्रवास १९८२
पर्यंत चालू होता. मात्र १९८२ मध्ये याला प्रचंड धक्का बसला.
निमित्त होतं “कुली” सिनेमावेळी झालेला अपघात. बंगलोर मध्ये त्या अपघातात
अमिताभ जबर जखमी झाला. नंतरचे कित्येक महिने मग फक्त हॉस्पिटल एके हॉस्पिटल. ज्याचा
जीव वाचवा म्हणून मुंबईतच नव्हे तर देशभर सर्वधर्मियांनी प्रार्थना म्हटल्या असा
हा माणूस त्यातून तो काही महान नेता वैगैरे नव्हे तर होता फक्त एक अभिनेता..!
असं असलं तरी माध्यमांशी त्याचे संबंध तितकेसे चांगले
नव्हते. त्याच्याशी असलेल्या वादामुळे विविध मासिकांनी, पत्रकारांनी कित्येक वर्षे
त्याच्यावर अघोषित बंदीच घातलेली. तर त्याने पत्रकारांना सेटवर यायला मज्जाव
केलेला.
हे चित्र पालटलं ते “ २००० च्या दशकात “कौन बनेगा करोडपती” हा शो सुरु झाल्यावर. तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी
वाहून गेलं होतं. १९८४ मध्ये इंदिराजींच्या हत्येनंतरच्या कालखंडात अमिताभ जुना
मित्र राजीव गांधी यांच्या मदतीला राजकारणात गेला. मात्र हे राजकारण त्याच्या
भलतंच अंगाशी आले. कसाबसा त्यातून अमिताभ सहीसलामत बाहेर पडतो न पडतो तोच “एबीसीएल कॉर्पोरेशन” कर्जबाजारी परिस्थितीला सामोरे जावे लागले. “शहेनशहा” “जादूगर”, “अजूबा” अशा काही चित्रपटांना याच काळात अपयश
पाहावे लागले. सर्वत्र एकाच हाकाटी सुरु झाली, “अमिताभ संपला”...! आणि अशावेळी नेमकं
अमिताभ समोर प्रपोजल आलं “केबीसी” चं.
या रिअलिटी शोने मात्र भारतात इतिहास घडवला.
अर्थात त्यात स्वतः अमिताभचा देखील कायापालट झालेला.
माध्यमांशी नम्रतेने वागणारा, सर्व सामान्य जनतेला
अत्यंत आदराने, ऋजुतेने वागवणारा, नर्मविनोदाची पखरण करणारा हा बुद्धिवान नवा अमिताभ
पुन्हा “सर्वांचा लाडका” बनला. त्यानंतर आले अमिताभच्या “सुपरस्टार” पदाचे दुसरे पर्व.
आमीर, सलमान व शाहरुख ही खान“त्रयी”, सोबत अनिल कपूरसारखे अन्य तगडे
अभिनेते असूनही अमिताभचे चित्रपट गर्दी खेचत राहिले. “मोहोब्बते”, “कभी ख़ुशी कभी गम”, “बागबान”, “खाकी” असे एकसे बढकर एक चित्रपट लोकांची पसंती मिळवत
राहिले.
“ब्लॅक”, “सरकार”, “पा”, “चीनी कम” “ पीकू” " भूतनाथ" सारखे चित्रपट उतारवयातील अमिताभ ज्या निष्ठेने करतो
ते निश्चितच कौतुकास्पद आहे. असं ऐकलंय की अमिताभचा दिवस भल्या पहाटे ३ वाजता सुरु
होतो. तो सकाळी आजही जिममध्ये व्यायाम करतो. सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळी ७
वाजेपर्यंत आणि कधी रात्री उशिरा १० वाजेपर्यंत तो व्यस्त असतो.
वयाच्या साठीनंतर जेंव्हा लोक स्वतःच्या समस्यांनी
गांजून, थकून जातात, एकतर देवा-धर्माच्या मागे लागतात किंवा दुसऱ्याची उणी-दुणी
काढत समाधान मिळवू पाहतात तेंव्हा हा माणूस दिवसाचे १२-१४ तास काम करतोय याचं खरंच
कौतुक वाटते.
अमिताभचं सगळं आयुष्य लोकप्रियतेने वेढलेलं. आजही
त्याच्या घरासमोर त्याचं किमान एकदा दर्शन मिळावे या हेतूने चाहते गर्दी करतात.
त्याच्या आयुष्यात प्रायव्हसी हा भाग कमीच. कारण तो जिथे जाईल तिथे गर्दी जमतेच.
त्याचं ते पहाटे उठून सिध्दीविनायकापर्यंत चालत जाणे असू दे किंवा एखाद्या सामाजिक
घटनेवर ट्विटरच्या माध्यमातून केलेलं भाष्य असू दे. त्याच्या प्रत्येक वागण्याचा
इवेन्ट होतो, बातमी होते. हे सगळं होत असूनही अजूनही तो जमिनीवर आहे, आपल्या क्षेत्रात
नेहमीच्याच काटेकोर वक्तशीरपणे काम करतोय. त्याचबरोबर सरकारी योजनांसाठी “स्वतःच्या नावाचा, प्रसिद्धी”चा वापर करू देत आहे. जगात अनेक थोर अभिनेते झाले,
भारतात सुद्धा अभिनयाच्या बाबतीत अमिताभला वरचढ ठरू शकतील असे कित्येक अभिनेते
होते व आहेत. तरीही अमिताभला आठवत राहणे, पुनपुन्हा पहावासा वाटणे यातच त्याचं
वेगळेपण आहे.
एखाद्या दिवशी आपण थकून घरी येतो. सगळ्या जगाचा राग
आलेला असतो. टीव्हीवर शेकडो च्यानेलांच्या गर्दीतून सर्फिंग करताना अचानक जंजीर, दोस्ताना,
त्रिशूल, किंवा डॉन लागलेला
दिसला की हात थबकतोच. अनेकदा पाहिलेला तो सिनेमा आपण पुन्हा पाहू लागतो. अनेकदा
ऐकून पाठ झालेले डायलॉग आपणही त्याच्यासोबत म्हणू लागतो..! आपल्याच नकळत
अन्यायाविरोधात उभे राहणाऱ्या अमिताभच्या जागी स्वतःला पाहू लागतो. मनावरचा ताण
हळूहळू निवळत जातो. रोजच्या लढाईसाठी उभे राहण्यास पुन्हा नवी उर्जा मिळू लागते.
सगळं भासमान आहे हे माहीत असूनही आपण त्या खेळात रंगून जातो...! हेच अमिताभचं
वेगळेपण.
म्हणूनच अमिताभ नावाचं गारुड असेच वर्षानुवर्षे कायम राहणार
आहे !
No comments:
Post a Comment