marathi blog vishwa

Thursday, 17 November 2016

विलास चाफेकर - एक अफलातून माणूस...!

समाजात रोज विविध समस्यांवर तावातावाने बोलणारी, सतत सगळ्या जगाच्या चुका दाखवून देणारी माणसे आपण रोजच पहात असतो. मात्र कित्येक मंडळी बहुतेकदा स्वतः फारसे काहीही न करणारी. आपणही बरेचदा काही प्रमाणात त्याच समूहाचा भाग असतो. मात्र अशी काही माणसे असतात की त्यांना कधीच स्वस्थ बसवत नाही. 
समाजातील प्रत्येक समस्येवर काहीच न बोलता ते शांतपणे थेट काम सुरु करतात. त्यांच्या कामाचा झपाटा, त्याची व्याप्ती पाहता आपण थक्क होऊन जातो. अशा काही व्यक्तींपैकीच एक नाव म्हणजे विलास चाफेकर. 

नुकतंच १३ नोव्हेंबर रोजी त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली त्या निमित्ताने त्यांच्याविषयी......

विलासकाका आज पंच्याहत्तरीत आहेत. मात्र या माणसाच्या उत्साहाला वृद्धत्व शिवू शकलेले नाही. कित्येक शारीरिक व मानसिक आघात पचवून हा माणूस आपल्या कार्यासाठी पाय रोवून उभा आहे. प्रसिद्धीपासून दूर राहण्यात पारंगत असलेल्या, स्पष्ट व परखड विचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या विलासकाकांना भेटलं की आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव होते, आपली भव्य क्षितिजे लहानशी भासू लागतात.


कोण हे विलास चाफेकर ? ठाण्यात एका सामान्य गरीब कुटुंबात जन्मलेलं हे व्यक्तिमत्व. गरिबी, अनारोग्य याचा सुरुवातीपासून सामना करणारं. प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीशी सामना करत स्वतःचे मार्ग आखणारं. ज्यांनी दुःखद अनुभव दिले त्यांच्याविषयी कटुता न बाळगता त्यांच्याविषयीची कर्तव्यं निभावणारं. आपल्याला समाजासाठीच जगायचं आहे हे ठामपणे ठरवून वैयक्तिक सुखोपभोगात रमणे शक्य असूनही काट्यांनी भरलेली वाट चालणारं.

जाणीव संघटना, वंचित विकास संस्था, वेश्यांच्या मुलांसाठीचे “नीहार” हे वसतिगृह व पुनर्वसन केंद्र, पुणे, लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी फुलवा, अभिरुची असे उपक्रम, पुण्यातील वेश्यांसाठी आरोग्य केंद्र व एड्स उपचार केंद्र, गोसावी वस्ती प्रकल्प, सबला महिला केंद्र, लातूर, चंडीकादेवी आदिवासी महिला प्रकल्प यवतमाळ जिल्हा इत्यादी १८ विविध प्रकल्पांची निर्मिती करून ते सक्षमपणे चालवणारे व्यक्तिमत्व म्हणजे विलास चाफेकर.

वयाच्या ६१ नंतर सर्व प्रकल्पातील पदांवरून निश्चयपूर्वक पायऊतार होणारे निस्पृह व्यक्तिमत्व म्हणजे विलास चाफेकर. सर्व पदांवरून निवृत्त झाल्यानंतरही आज वयाच्या पंचाहत्तरीत देखील प्रत्यक्ष कामात एक कार्यकर्ता म्हणून सहभागी होत राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे विलास चाफेकर.
अनुताई वाघ, जे पी. नाईक आदि मान्यवरांसोबत बालशिक्षण, आदिवासी विकास, भूकंपादी आपत्ती निवारण कार्य, वेश्यांचे प्रश्न, आरोग्य, फेरीवाले अशा विविध गोष्टींसाठी निरंतर कष्टणारे व्यक्तिमत्व म्हणजे विलास चाफेकर. आपल्याला वाचतानाही दम लागेल इतकी कामं हा माणूस नुसती उभी करत नाही तर निष्ठेने राबून यशस्वी करून दाखवतो. तेही स्वतःच्या मागे अनेक व्याधींचा, आजाराचा ससेमिरा सतत असताना..!

त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर त्यांनी “ रात्रंदिन आम्हा...” असं आत्मचरित्र लिहून जे ‘ युद्धाचे प्रसंग ’ सांगितलेत ते वाचून आपलीच छाती दडपून जाते. हा माणूस मात्र आजदेखील अशा शेकडो समस्यांच्या छाताडावर पाय रोवून वयाच्या पंच्याहत्तरीत देखील लढायला तयार असतो...!
पुणे, मुंबई, मराठवाडा, विदर्भातील यवतमाळचा सर्वाधिक समस्याग्रस्त भाग, मध्यप्रदेशमधील दुर्गम भाग आदि ठिकाणी समस्यांच्या निर्मूलनासाठी धडक काम करणे ही विलासाकाकांची खासियत.

***

कोणतीही लहानमोठी अडचण दिसली की जणू हत्तीचं बळ त्यांच्या अंगी येत असावं. मला गेली १५ वर्षे त्यांचा प्रत्यक्ष व पत्ररूपाने सहवास लाभला. त्यात अनेकदा त्यांचे हे वेगळेपण प्रकर्षानं जाणवलं. एक लहानसा किस्सा सांगतो.

नीहार हा त्यांनी निर्माण केलेला एक महत्वाचा प्रकल्प. वेश्याच्या मुलांचे संगोपन व पुनर्वसन तिथे सर्वात प्रथम सुरु झाले. याकामी पु ल. देशपांडे, विंदा करंदीकर आदि साहित्यिकांपासून अनेकांनी सहकार्य दिलेले. तर या ठिकाणी लहान मुलांना गोष्टी सांगण्यासाठी आम्ही एकदा गेलो होतो. कार्यक्रम संपल्यावर परत येताना वाटेत वाहतुकीची कोंडी झालेली. जवळच एक मंगल कार्यालय होते. तिथे कुणा राजकीय पुढाऱ्याच्या नातलगाचे लग्न होते. खूप जास्त गाड्या आल्या होत्या. काहींनी रस्त्यात वेड्या-वाकड्या गाड्या आणल्या. त्यामुळे सगळं विस्कळीत झालेलं. पाचेक मिनिटे गाडीत बसून राहिल्यावर विलासकाका अस्वस्थ झाले.

“ काय झालंय रे..?” असं ड्रायव्हरला विचारलं. त्याला काही कळेना.
दुसऱ्या मिनिटाला विलासकाका खाली उतरले. “सार्वजनिक रस्त्यावर कोण अशी अडवणूक करतोय बघूया...” असं म्हणत थेट पुढे घुसलेच.
आम्ही अन्य काही तरुण मंडळी “कशाला उगाच त्या पुढाऱ्यांच्या नादाला लागा, होईल २०-२५ मिनिटात सर्व सुरळीत..” असा विचार करत बसलेलो. मात्र काका उतरल्यामुळेच आम्हाला उतरावं लागलं.
शांत पण ठाम आवाजात काकांनी त्या ७-८ जणांना गाड्या बाजूला घेऊन रस्ता मोकळा करायला सांगितलं. त्यांच्या शांत आवाजातही अशी जरब होती की पुढच्या ५-७ मिनिटात रस्ता मोकळा झाला.
हे असं समस्येला थेट भिडणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. तुमच्याकडे प्रचंड धाडस तर आवश्यक आहेच पण आपल्या विचारांवर अव्यभिचारी निष्ठाही आवश्यक आहे. प्रसंगानुरूप विचारांशी तडजोडी करत, कातडीबचाव धोरण अवलंबत आपण जेंव्हा कामं करत असतो तेंव्हा विलासाकाकांना असं पाहणं ही जणू आपण स्वतःला मारलेली चपराक असते.

****



त्यांचे शेकडो कार्यकर्ते हे त्यांना असं पहात उभे राहिलेत. त्यांच्यासाठी  विलासकाका “सर” आहेत. सर्वजण त्यांना आदराने “सर” असेच म्हणतात. अनेकदा असं होतं की सुरुवातीच्या दिवसात एखाद्या कार्यकर्त्याला वाटते की मला सर काही मदत करत नाहीत. मात्र तो कार्यकर्ता त्या कामाच्या ठिकाणी पोचण्यापूर्वी तिथे विलासकाका जाऊन आलेले असतात. तिथल्या अडचणी त्यांना नेमक्या ठाऊक असतात. त्यातील कोणती अडचण त्या कार्यकर्त्यानं स्वतःहून सोडवावी याच्या काही आखीव-रेखीव अपेक्षा असतात. जणू ती त्या कार्यकर्त्याची प्रवेश परीक्षा (entrance exam हो आपल्या मराठीत..!) असते.

तो कार्यकर्ता तिथं पोहोचताच १०-१५ दिवसांनी प्रत्यक्ष विलासकाका तिथे दाखल होतात. त्याने स्वतःची सोय कशी करून घेतलीय हे पाहतात. त्यानंतरही काही मोठी अडचण असेल तर मग मदत करतात. बहुदा एव्हाना तो कार्यकर्ता तिथं शारीरिक-मानसिक दृष्ट्या स्थिर झालेला असतो.
त्यांनीच सांगितलेला एक किस्सा यवतमाळ जवळच्या खेडेगावातला.
तिथं असाच एक कार्यकर्ता गेला. काही दिवसानंतर जेंव्हा विलासकाका तिथं पोचले तेंव्हा त्यानं अक्षरशः यांच्या पायाला मिठी मारली. ढसाढसा रडला तो. यांना पट्कन काही कळेना. काय झालं. कुणी याला धमकावलं की काय. मारहाण वगैरे केली की काय... तो जरा शांत झाल्यावर विचारलं मग...
“काय झालं रे... तुला कुणी त्रास देतोय का...”
“नाही हो...मला नाही कुणी त्रास देत...”
“ मग तू का रड्तोयस?”
“ सर, ही माणसे रस्त्याकडेचा किंवा रानातला कोणताही पाला शिजवून खातात हो... यांना अन्नच मिळत नाही...! हे बघवत नाही मला. मीही गरिबी पाहिलीय, समस्या पाहिल्याहेत पण हे सारं भयंकर आहे.”
त्यांना किमान या परिस्थितीची कल्पना होती. मात्र ज्यांनी शहरापलीकडे, आपल्या घर-गावापलीकडे असणारे हे भेदक वास्तव पाहिलेले नसते, त्यांची अवस्था कशी होईल ?

****

सायनला हॉस्पिटलमध्ये जात असताना तिथली धारावीची झोपडपट्टी हे विलासकाकांचे पहिले कार्यक्षेत्र. नंतर घाटकोपरच्या झोपडपट्टीत. झुनझुनवाला कॉलेजजवळच्या वेश्यावस्तीत तिथल्या मुलांसाठी त्यांनी “अनौपचारिक शिक्षणाचे” अफलातून प्रयोग केले. त्याविषयी साधना सारख्या साप्ताहिकात लेखन केलं. पुढे जेंव्हा त्यांना दडपशाही व मारहाणीचा सामना करावा लागला तरी ते डगमगले नाहीत. मात्र तिथल्या वेश्यांचा उदरनिर्वाह चालणे धोक्यात आल्यावर तिथून ते बाहेर पडले.

पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या गेलेल्या शहरात, शहराबाहेर २५-३० वर्षापूर्वी गरिबांचे, दुर्बल घटकांचे जे प्रश्न पाहिले त्याने विलासकाका कळवळले. त्यातून मग जाणीव संघटना व वंचित विकास या संस्था उभ्या राहिल्या. या संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची निर्मिती झाली. त्यातील “नीहार” हा एक महत्वाचा प्रकल्प.
वेश्यांच्या मुलांच्या प्रश्नाची ओळख झालेलीच होती. ते प्रश्न सोडवण्यासाठी काय करायला हवे तेही ठाऊक होते. घाटकोपरला जरी शारीरिक / भावनिक दडपशाहीने माघार घ्यावी लागली तरी आता पुण्यात ते काम अधिक ताकदीने करायचं असे ठरवून विलासकाका त्याला भिडले.
१९९०-२००० च्या दशकात “नीहार” साठी तर अडचणींचा डोंगर समोर तयार होताच. जागा नाही. मग लोहगावला जागा मिळाली तर तिथे लोक बांधकाम करू देईनात. पाण्याचा प्रश्न होता. आर्थिक अडचणी तर होत्याच.

निधी गोळा करायला सुरुवात केली तेंव्हाचा एक किस्सा कधीतरी विलासकाकानी सांगितलेला.
सर्वत्र ते आपल्या कामासाठी निधी मिळावा म्हणून पोस्टकार्ड / माहितीपत्रक असं विविध जणांच्या घरी स्वतः जाऊन देत. एकदा पु. ल. देशपांडे यांच्या घरी गेले. तर कुणी नव्हतं. मग तसंच तिथे माहितीपत्रक टाकून ते परतले.
काही दिवसानंतर फोन आला की तुम्हाला पुलंच्या घरी बोलावलंय.
घरी पोचल्यावर औपचारिक गप्पा सुरु होण्यापूर्वी सुनीताबाईनी थेट एक लाखाचा चेक हातात ठेवला. आपण स्वतःचे काही बोलणं मांडण्यापूर्वी चेक हातात पडतो हे पाहून काका क्षणभर स्तब्ध झाले. मग ते दोघे म्हणाले, “अहो, तुमचं काम आम्हाला माहिती आहे, ही रक्कम योग्य ठिकाणीच खर्च होईल यावर आमचा विश्वास आहे.”

तशीच तऱ्हा कविवर्य विंदा करंदीकर यांची. त्यांना मिळालेल्या पुरस्काराची रक्कम त्यांनी ज्या समाजोपयोगी कामांना वाटून दिली त्यात “वंचित विकास” होतेच.
पुण्यातील जावडेकर कुटुंबीय हेही असेच विलासकाकांच्या निरंतर पाठीशी उभे राहिलेले आहेत.
मात्र या आर्थिक मदतीइतकीच मोलाची मदत कुणी केली असेल तर जाणीव संघटना व वंचित विकास या दोन संस्थांसाठी सतत कार्यरत राहणाऱ्या अर्धवेळ, पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी.



एखादी समस्या मग ती वेश्यांसाठी आरोग्य केंद्र असो की किल्लारी भूकंपावेळी गावागावातून केलेले काम असो यवतमाळ येथील आदिवासी महिला केंद्र असो एकदा कार्यकर्ते कामाला भिडले की मागे हटत नाहीत. आज हजारो कार्यकर्त्यांचे जे पाठबळ विलासकाकांच्या मागे आहे तीच त्यांची खरी शक्ती आहे. सध्याच्या मतलबी युगात जेंव्हा सख्खा भाऊ भावासाठी मदतीला उभा राहताना दहा वेळा विचार करतो तेंव्हा हे हजारो कार्यकर्ते विलासकाकांच्या संस्थेत विविध प्रकल्पांवर निरपेक्ष भावनेने कार्यरत असतात. कित्येक जण तुटपुंज्या मानधनावर कामाचा गाडा ओढत असतात. विलासकाकांच्या आत्मचरित्रात काही जणांचे नावानिशी उल्लेख आहेत पण बहुसंख्य मंडळी ही पडद्यामागे कार्यरत आहेत.
कधीकाळी घरदार सोडून समाजासाठी आयुष्य दोन्ही हाताने उधळणाऱ्या या अवलियाचे हे सारे नवे कुटुंबीय गावोगावी आपापल्या परीने काम पुढे नेत आहेत. रोजच नवी लढाई खेळताना विविध समस्यांसोबत झुंज देत आहेत.


हे सारं पाहताना वयाच्या पंच्याहत्तरीत पोचलेल्या विलासकाकांना मात्र नव्या कामांची क्षितिजे खुणावत आहेत. सामाजिक उपक्रम अधिक परिणामकारक पद्धतीने राबवण्यासाठी “कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र” अभिनव पद्धतीने कसं चालवता येईल याची आखणी त्यांच्या डोक्यात सुरु आहे. फिल्डवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणसांना अधिक कार्यक्षम होता यावे यासाठीचे नियोजन सुरु आहे.

वयाच्या चाळीशीत तणावग्रस्त होऊन लवकर निवृत्ती पत्करणारी, स्वतःच्या चार भिंतीत तृप्तपणे राहणारी अनेक कॉर्पोरेट मंडळी आपल्या आसपास वाढत असताना विलासकाकांसारख्यांचा पंचाहत्तरीतील “तारुण्याचा आविष्कार” आपल्याला स्तिमित करतो आणि मग नुसत्याच शुभेच्छा न देता आपण त्यांच्या कामात नकळत कधी सहभागी होऊन जातो ते कळत नाही..!
-    
- सुधांशु नाईक, 9833299791.( nsudha19@gmail.com )

   वंचित विकास व विलास चाफेकर यांच्याशी संपर्कासाठीचा पत्ता
श्री. विलास चाफेकर
वंचित विकास, ४०५/९, मोदी गणपतीमागे, नारायण पेठ, पुणे- ४११०३०.
संपर्क – ०२०-२४४५४६५७, २४४८३०५०, २५४४८०१९. मोबाईल- ९४२२००३७२६
वेबसाईट:- www. vanchitvikas.org 

Wednesday, 5 October 2016

शिवराय व स्वराज्याचे व्यवस्थापन

उत्तर ते दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिम अंगाला विस्तारलेलं व सुमारे १०-१५ जिल्ह्यांच्या इतकं असणारे स्वराज्य शिवरायांनी शून्यातून निर्माण केले. त्याचा उत्तरोत्तर विस्तार होत गेला व एक दिवस मराठी सत्तेचा वचक भारताच्या ७०-८०% भागावर निर्माण झाला. हे सारं अभ्यासलं की थक्क व्हायला होतं. 
या सर्वाच्या मुळाशी स्वराज्याच्या सुरुवातीपासूनचे काटेकोर व्यवस्थापन होतं हे नक्की. याविषयी अनेकांनी लिहिलं आहेच, लष्करी व शेतीविषयक धोरणे या दोन गोष्टींव्यतिरिक्त अन्य गोष्टींविषयी मी माझ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतो...


 “शिवाजी महाराजांचा इतिहास” म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की महाराजांनी मूठभर (व नंतर हजारो) मावळे गोळा केले. सर्वत्र घोडदौड केली. शत्रूला गनिमी काव्याने हरवले आणि स्वराज्य स्थापन केले. पण शिवपूर्वकाळातील परिस्थिती पहिली तर लक्षात येतं हा सर्व खटाटोप किती जीवघेणा व वेळखाऊ होता ते...!
शिवपूर्वकाळात बहुतांश मराठे सरदार हे कुणा ना कुणा सुलतानाच्या पदरी बांधले गेलेले. मोगल, निजामशहा, आदिलशहा, बेरीदशहा, कुतुबशहा अशा सर्वांच्या साठी काम करणारे जहागीरदार, देशमुख आपापल्या मुलुखात सुलतान बनलेले असायचे. काही सन्माननीय अपवाद वगळता कुणालाही रयतेसाठी खूप काही करायची इच्छाही नव्हती. त्यातून काही चांगलं करू पाहणाऱ्या मंडळीना त्रासही दिला जात होता. लहान-सहान निवाडे करायचेही स्वातंत्र्य जिथे नव्हते तिथे राज्य उभारणे म्हणजे अशक्यप्राय गोष्टच होती.
तरीही त्यातून शहाजीराजांनी बरीच खटपट केली त्यामागे मुख्यत्वे जिजाबाईंची तळमळ होती.
राजकारणाची गरज म्हणून शहाजीराजांना सह्याद्रीपासून दूर केले गेले व पुण्याच्या उध्वस्त परिसरात जेंव्हा एकटे राहणे पदरात पडले तेंव्हा त्या संकटाचा संधीसारखा वापर केला तो जिजाबाईंनी..!

“संकटांचा संधी म्हणून उपयोग करून घेणे, निराश मनांना पुन्हा उभारी देणे” हे व्यवस्थापनातील महत्वाचे कौशल्य. सर्वाना ते जमतेच असे नाही. मात्र पुण्यात ते जमले. ज्यांची नावेही इतिहासाला ठाऊक नाहीत अशा हजारो लोकांपासून, ते ज्यांची नावे ठाऊक आहेत अशा शेकडो माणसांपर्यंत अनेकांचे यासाठी महत्वाचे योगदान होते. त्याचवेळी ही लक्षात ठेवले पाहिजे की जेंव्हा जेंव्हा स्वराज्यावर संकटे आली तेंव्हा तेंव्हा राजांनी प्रजेला विश्वासात घेतले आहे. स्वतः आघाडीवर लढत राहून रयतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. योग्य नियोजन करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त यशस्वी कसे होऊ यासाठी कष्ट केले आहेत. एक प्रकारचे ते “ project management” होते. कोणत्याही प्रकल्पाचे यशस्वी होणे हे टीमवर्क, टीमला योग्य दिशा देणारे  नेतृत्व व त्या नेतृत्वाच्या सल्लागारावर अवलंबून असते. स्वराज्यात या तीनही गोष्टीमध्ये उत्तम समन्वय (co- ordination) असल्याचे दिसून येते.

म्हणून “शिवरायांचे व्यवस्थापन” असं न म्हणता मी “स्वराज्याचे व्यवस्थापन” हा शब्द हेडिंगमध्ये वापरलाय. कारण शिवरायांना देवत्व देण्याच्या नादात हल्ली आपण उगाच अतिरेकीपणे काहीही सांगत सुटतो, ज्याची खरेतर काही गरज नसते. शिवरायांचे मोठेपण सांगायला अशा टेकूची गरज नाही.
अनेकदा असं म्हटलं जाते की वयाच्या १०-१२ वर्षीच शिवरायांनी सगळी कामे सुरु केली. ते तितकेसे योग्य नाही. सदरेवरील कारभारी, दादोजी कोंडदेव, माणकोजी दहातोंडे, बाजी पासलकर, सोनोपंत डबीर, कान्होजीराव जेधे इ. मंडळींना जिजाबाईचे म्हणणे व तळमळ पटली होती. जो काही लहानसा भूभाग ताब्यात आहे तिथे सर्व काही कुशल-मंगल असावे या भावनेतून त्यांनी नि:स्वार्थीपणे काम करायला सुरुवात केली होती हे इतिहासात दिसून येते.
गाव-गाव हिंडतानाचे बारीक निरीक्षण, पाहिलेल्या गोष्टीचे अर्थ-संदर्भ या सगळ्याचा सामोपचाराने विचार करून मग या सर्वांनी कामे सुरु केली. गावोगावच्या देशमुख- पाटील आदि मंडळींचे सामान्य जनतेवर तेंव्हा वजन होते. कित्येक ठिकाणी तर दहशत होती. काही ठिकाणी जसे चांगले काम सुरु होते तसेच कित्येक ठिकाणी अत्याचार सुरु होते. बहुतेक मंडळी येनकेनप्रकारेण सुलतानांशी किंवा त्यांच्या सरदारांशी बांधली गेली होती. सत्तेचा पाझर झिरपत झिरपत गावापर्यंत आलेला होता. त्यामुळे प्रत्येक वतनदार लहानसा सुलतान बनला होता. त्यांना वठणीवर आणणे आवश्यक होते. वयाने ज्येष्ठ असणे, पदावर असणे म्हणजेच “आपले ते खरे” असे नसते याची कल्पना त्यांना व जनतेला देणे आवश्यक होते. मग साम-दाम-दंड-भेद आदि उपायांचा वापर सुरु झाला.


पुण्याच्या जहागिरीत न्याय मिळतो हे सामान्य जनतेला कळू लागले. त्यावेळी मावळातील लोकांना व वतनदाराना कशा पद्धतीने वागवले गेले हे शिवबांनी जवळून पहिले. होणारे हे बदल शिवबांनी नक्कीच अभ्यासले असतील. महसूल, संरक्षण, न्यायव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, संपर्क व दळणवळण व्यवस्था, मुलभूत गरजांसाठी विविध सोयींची निर्मिती या सर्वांचे कळत नकळत शिक्षण मिळाले. त्याचवेळी शिवबांच्या व अन्य मुलांच्या शिक्षणासाठी ज्या शिक्षकांची नेमणूक केली गेली त्यांनीही चांगले शिक्षण दिले. म्हणूनच टीमवर्कचे महत्व बहुदा सर्वाना सुरुवातीपासूनच कळून चुकले होते.

स्वराज्याच्या इतिहासातील महत्वाची गोष्ट म्हणजे समूह व्यवस्थापन आणि टीमवर्क. अगदी शिवरायांपासून ते पहिल्या बाजीराव पेशव्यांपर्यंत कुणाचाही काळात हटवादी एकाधिकारशाही नव्हती तर एका कर्तबगार नेत्याने प्रत्यक्ष कार्यात स्वतः सहभागी होतानाच अनेक गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवून चालवलेली लोकशाही होती. साध्या सैनिकापासून गडाच्या हवालदारापर्यंत प्रत्येकाची जबाबदारी नक्की करून दिली गेली. तसेच ठराविक कालावधीनंतर त्यांच्या बदल्या केल्या गेल्या. जनतेच्या प्रत्येक प्रश्नाची उकल व्हावी म्हणून ठिकठिकाणी कार्यालये निर्माण केली गेली. पंतप्रधान पदासह मंत्रिमंडळाची निर्मिती करून त्यांच्या मार्फत जनसंपर्क वाढवला गेला. प्रत्येक माणसाने आपापल्या जबाबदाऱ्या नेटाने निभावल्या म्हणूनच स्वराज्य लोकांच्या हाडीमासी रुजले. 

शिवरायांचे स्वराज्य हे तत्कालीन असे पहिले शासन होते की जेथे नियमित रोजगार किंवा उत्पन्नाची हमी मिळू लागली. गडावरील विविध कारभारी, हवालदार, सैनिकांना पगाराची किंवा वेतनाची सुविधा दिली गेली. याचबरोबर सैनिकांसाठी आचारसंहिता तयार केली गेली. त्यामुळे सैनिक तर जोडला गेला स्वराज्याशी पण सैनिकांकडून होणारी रयतेची लुटालूट कमी झाली. यामुळे “हे राज्य आपले आहे” ही भावना लोकांच्या मनात निर्माण होऊ लागली. याचबरोबर जो मेहनत करेल त्यांना नक्की रोजगार मिळेल अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. असे करण्यात शासनकर्ता जेंव्हा यशस्वी होतो तेंव्हाच ते राज्य जपावे, वृद्धिंगत व्हावे म्हणून सामान्य माणूस योगदान देतो. लढाई, दुष्काळ अशा विशिष्ट वेळी सरकारी कोठीतून शेतकऱ्यांना धान्यापासून बी बियाणे देण्यापर्यंत मदत मिळू लागली. शिवकाळातील कल्याणकारी योजना किंवा शेतकऱ्याला मदत म्हणून केलेले काम हा विषय एका वेगळ्या लेखाचा आहे. तो स्वतंत्रपणे नंतर पाहूच.


जेंव्हा नेत्याकडून विशिष्ट आज्ञा मिळते तेव्हा त्या सूचनेची काटेकोर अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक असते. बरेचदा काय होते की, मिळालेली सूचना असते वेगळीच व लोक अंमलबजावणी वेगळ्या प्रकारे करतात. कोणत्याही राजाच्या आज्ञेत असणारे कारभारी नेहमीच मोठे कार्य करू शकतात. इथे संभाजी महाराजांच्या काळातील एका भन्नाट युद्धाची कहाणी सांगायला मला नक्कीच आवडेल.
आपल्या मृत्युपूर्वी कधीतरी शिवराय अशा प्रकारे बोलून गेले होते की, “ प्रत्येक गड असा मजबूत व्हायला हवा की तो किमान एक वर्ष लढत राहिला पाहिजे. आलमगीर जेव्हा स्वारीवर येईल तेंव्हा आपल्या ३६० गडानी असा मुकाबला केला पाहिजे की स्वराज्य अबाधित राहायला हवे.”
त्यानंतर संभाजीराजांच्या काळात “रामसेज” सारख्या तुलनेने लहान गडाने याची किती काटेकोर अंमलबजावणी केली ते पाहून ऊर भरून येतो. नाशिकपासून जवळ असलेल्या या रामसेजच्या किल्लेदाराने हा गड चक्क एक दोन नव्हे तर तब्बल पाच वर्षे लढवला. शत्रूच्या प्रत्येक आक्रमणाला प्रखर उत्तर दिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जेंव्हा एखादा माणूस अशी कामगिरी निभावतो तेंव्हा त्याच्यापुढे सारेच नतमस्तक होतात. दुर्दैवाने आजही आपल्याला त्या किल्लेदारांचे नावही नक्की माहिती नाही. (-विश्वास पाटील यांनी ते किल्लेदार सूर्याजी जेधे असल्याचा एकदा उल्लेख केलाय मात्र त्याला अन्य काही सबळ पुरावे मिळू शकलेले नाहीत).

स्वराज्य उभे राहण्यात सर्वात महत्वाचा मुद्दा होता प्रत्येकाने जबाबदारी घेणे. आजच्या भाषेत त्याला accountability असे म्हणतात. बरेचदा काय होते, की कोणत्याही उद्योगात, नोकरीत लोकांना पद मिळते पण त्या पदाचे पूर्ण अधिकार मिळत नाहीत. त्यामुळे काम दुसऱ्यावर ढकलण्याची किंवा विविध कारणें पुढे करण्याची भावना सर्वत्र वाढीस लागते. हे शिवकाळात किंवा नंतरही घडत नव्हते, बहुतेकदा प्रत्येकाने आपापली जबाबदारी पूर्णांशाने निभावायाचा प्रयत्न केलाय. त्यामुळेच स्वराज्य शिवरायांच्या मृत्युनंतर २७ वर्षे औरंगजेबशी लढत राहिले. त्यानंतरही भारतात विस्तारत राहिले.

या accountability चे उत्तम उदाहरण म्हणजे शिवकाळात घडलेली एक घटना.
शिवराज्याभिषेकाचा काळ जवळ आलेला. त्यातच लढाई जिंकल्यावर हाती आलेल्या बहलोलखान याला सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी उदारपणे सोडून दिले. हा बहलोलखान किती कपटी आहे हे ठाऊक असलेले शिवराय त्यामुळे भडकले. त्यांनी प्रतापरांवाना खरमरीत पत्र पाठवले. प्रतापरावना आपली चूक कळली. त्यामुळे पुन्हा आक्रमण करायला आलेल्या बहलोलखानावर ते आततायीपणाने, अविचाराने चालून गेले. मराठ्यांना आपला सरसेनापती गमवावा लागला.
मात्र यानंतर प्रतापरावांचे सहायक आनंदराव जे काही करतात ते म्हणजे जबाबदारी स्वीकारून काम निभावून नेणे. आनंदराव यांनी मग सैन्यासह बहलोलखानसमोर लढाई नाही केली तर गनिमीकाव्याने ते सरळ मार्ग बदलून कर्नाटकात असलेल्या बहलोलखानाच्या जहागिरीवर तुटून पडले. बहलोलखानाला मग आपली चाल बदलून तिकडे यावे लागले. मग तिथे त्याचा पराभव केला. संपगाव लुटले व नंतर हे सारे आनंदरावांनी शिवरायांना येऊन सांगितले. दुसरा कुणी असता तर एकतर शोक करत राहिला असता किंवा आज्ञा मिळायची वाट पाहत राहिला असता.

कोणत्याही राज्यासाठी, उद्योगासाठी सर्वात महत्वाची असते ती आर्थिक व्यवस्थापनाची शिस्त. पै पै चा हिशोब देखील अनेकांनी नीट ठेवलेला नसतो हे आजही आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते.

भावनेच्या आहारी जाऊन व्यवहार करणे, ढिसाळ व अनागोंदी कारभार, आपला व आपल्या नातेवाईक मंडळींचा उत्कर्ष करून घेताना संस्थेकडे दुर्लक्ष करणे, चुकीच्या माणसाच्या हाती व्यवहार सोपवणे, व्यवहार सोपवल्यानंतर त्यावर नियमित बारकाईने लक्ष न ठेवणे, एखाद्या ठिकाणी नुकसान होतेय हे कळल्यावरही त्याच चुका पुन्हा पुन्हा करणे अशा अनेक चुका आजही लोक भरभरून करताहेत. त्याचवेळी शिवकाळ किंवा नंतर पेशव्यांनी सांभाळलेली आर्थिक शिस्त पाहून अचंबित व्हायला होते. (पेशवाईतील उत्तरार्ध हा याबाबत अत्यंत चुकीचा होता. तरीही बरेचदा चुकीच्या मार्गाने केलेल्या खर्चाचे हिशोब मात्र नेमकेपणाने ठेवलेले आढळतात.!).


शिवकाळात आर्थिक शिस्त काटेकोरपणे सांभाळली गेली. शेतकऱ्याकडून केलेल्या सारा वसुलीपासून एखाद्या स्वारीत केलेल्या लुटीपर्यंत सर्वत्र नीट हिशोब ठेवले गेले. प्रत्येक लष्करी स्वारीत असा नियम असे की लुटलेली प्रत्येक गोष्ट सैनिकाने सरकारी तिजोरीतच जमा करावी. अगदीच एखादी गोष्ट हवी असल्यास त्या विशिष्ट वस्तू इतकी रक्कम जमा करायची सवलत कधीतरी मिळत असे. हा नियम राजासह सर्वांना लागू होता. 
तसेच रयतेला तोशीश पडू नये म्हणून शेतसारा तसेच झालेल्या एखाद्या चुकीबद्दलचा दंड वस्तुरूपाने भरण्याची सवलत असे. ठराविक कालावधीनंतर गडावरील कोषाधिकारी, धान्यकोठाराचे प्रमुख यांच्या बदल्या होत असायच्या. यामुळे गैरव्यवहाराला आळा बसत असे. त्यातूनही गैरव्यवहार आढळल्यास कडक सजा होई. पदाचा गैरवापर करून रयतेशी गैरव्यवहार केला म्हणून शिवरायांनी एकदा तर शामराजपंत यांना पेशवेपदावरून काढून टाकण्यात आले होते. अशा उदाहरणांमुळे सर्वांवर वचक रहात असे.

एखाद्या उद्योगसमुहाचे, राष्ट्राचे भवितव्य हे नेता-अनुयायी, राजा-प्रजा, मालक-चाकर यातील नात्यावर अवलंबून असते. जेंव्हा नेता किंवा राजा आपले भले करणार, आपल्याला उज्ज्वल भविष्य प्राप्त करून देणार यावर लोकांची श्रद्धा बसते तेंव्हाच ते राज्यासाठी संपूर्ण शक्ती, तन-मन-धन वापरून काम करतात. आपले संपूर्ण योगदान (Dedication) देतात. आणि जेंव्हा प्रजा आपले असे संपूर्ण योगदान देते तेंव्हा त्या नेत्याच्याही अंगी दहा हत्तीचे बळ येते. आपल्या राष्ट्राला अधिकाधिक महान करण्यासाठी तो जास्तीत जास्त प्रयत्नशील राहतो.
यासाठी पुढील घटना हे उत्तम उदाहरण आहे.

शिवबाराजे त्यांच्या तुकडीसोबत दौडत होते. दुपारची वेळ. कुठेतरी भाकरतुकडा खायचा होता. एक गाव जवळच होते. राजांनी तिथे गावातून काही भाजीपाला मिळतो का पाहायला सांगितले. त्याची किंमत अदा करायला सांगितली. इतक्यात कुणीसं म्हणालं, “ राजे हे तर आपल्या रामजीचे गाव. मागच्या कणेरगडाच्या जुझात त्येनी लई शर्थ केली. दिलेरखानाला त्वांडात बोटं घालाया लावली, मातुर जीव गमावला...हिथ घरी म्हातारा असतुया त्याचा, आनी लेकरू-बाईल हैत..”
“अस्स, मग चला. घरी जाऊन भेट देऊया..” राजे म्हणाले.
ही तुकडी गावाजवळ येताच गलका उडाला. पण प्रत्यक्ष शिवाजीराजे आलेत कळल्यावर गावकरी खूष झाले. स्वागताला सामोरे आलेल्या मंडळींचे मुजरे स्वीकारल्यावर चौकशी केली गेली. राजे त्या घराकडे चालत निघाले.

घरापर्यंत तोपर्यंत वर्दी गेलेली.

राजे दारी पोचण्यापूर्वी एक थरथरता म्हातारा बाहेर आला, राजांच्या पाया पडू लागला. राजांनी त्यांना उठवलं. म्हणाले, “आबा, अहो तुम्ही वयाने मोठे. आम्ही तुमच्या पाया पडायचं. तुम्ही नाही...”
म्हातारा गहिवरला. गदगदून आले त्याला. कुणीसं म्हणालं,” त्याचा पोर लढाईत गेला तेंव्हापासून मन हळव झालंय त्याचं....”
म्हातारा लगेच सावरला. म्हणाला, “ तसं न्हाई ओ. पर्त्येक्ष शिवबा राजा घरी येतुया म्हंजे देव दारी आल्यावानीच की. त्या पांडुरंगाला पाहिल्यावर डोला भरून यायला कुठं कुणाची परवानगी लागती व्हय...”
घरात कांबळे पसरले गेले. राजे व जवळची मंडळी बसली. घरात भाकरी-पिठलं टाकायचं फर्मान केव्हाच गेलेलं. म्हाताऱ्याला काय करावे कळेना झालेलं. पुढे केलेलं गूळ पाणी घेत राजांनी म्हाताऱ्याचं सांत्वन केलं.
राजे म्हणाले, “ तुमचा लेक गेला असं समजू नका. यापुढे तुम्हाला कसलीही तोशीस होणार नाही याची काळजी आमच्या कारभाऱ्याने घेतली आहेच.  त्याउप्पर तुम्हाला अधिक काय हवं तर बोला, आबा...संकोच करू नका..”

म्हातारा जागेवरून उठला, राजांचं हात हातात घेत म्हणाला, “राजा, मरनाचे काय न्हाई रं. ते कसं बी कधी बी येनार की. माझ्या पोराचं तर सोनं झालं...या जिमिनिपाई, आपल्या राज्यापाई जीव दिऊन गेला त्यो...तुझ्यासारका राजा असल्यावर कसला तरास? आपलं घर-दार सोडून तुम्ही सगळे जुझता ते कुणासाठी रं. आमच्यासार्क्याना चार बरं दिस दिसावं म्हनूनच की. ह्ये उमगतंय की आमाला...मला काय बी देऊ नगस...आमच्या जिमिनीतून पिकतंय त्यावर भागतंय बग आमचं. मातुर या गरीबाकडून तुलाच काय तरी द्यायचंय.. ते घेऊन जा..” असं म्हणून त्यानं पलीकडे बसलेल्या, नुकतीच मिसरूड फुटलेल्या एका युवकाला पुढे बोलावलं.
“राजा, ह्यो आमचा रुपाजी. आता वयात येतोय बगा. ह्येला तुझ्या सैन्यात जागा दे. भावाच्या जागी त्यो लढल...त्येच्याबी आयुष्याचं सोनं होईल...”

एका पोराला वीरमरण आलेलं असताना म्हातारा बाप दुसऱ्या पोरालाही सैन्यात घे म्हणून सांगतो हे पाहून जागच्या जागी राजे गहिवरले. “आबा, तुमच्यासारखी माणसे सर्वार्थानं पाठीशी आहेत म्हणून हे राज्य उभं राहतंय. आपलं राज्य इतिहासात नोंदलं जाईल ते तुम्हासारख्या लोकांच्या प्रेमामुळेच..”
रयतेच्या अशा प्रेमामुळेच शिवराय, शंभू छत्रपती, राजाराम महाराज यांच्यानंतर सुद्धा मराठी सैन्य मोगलांशी लढत राहिलं. जणू प्रत्येक सामान्य माणूस तेंव्हा शिवबा बनला होता. जे काही शक्य होतं स्वराज्यासाठी, ते ते करत होता..!

संपूर्ण योगदान याला म्हणतात...! 


आणि जेंव्हा राजासह प्रजा एखाद्या राष्ट्राच्या उभारणीत आपले संपूर्ण योगदान देते तेंव्हाच तिथे रामराज्य ही उत्तम व्यवस्थापनाची संकल्पना काही काळापुरती तरी का का होईना रुजू पाहते. एखाद्या राष्ट्राच्या बलशाली होण्यामध्ये व्यवस्थापन कौशल्यातील वरील सर्व बाबींचा समावेश कसा गरजेचा असतो हे आपण पहिले.
 त्याचबरोबर काळाशी सुसंगत  भक्कम लष्करी धोरणही आवश्यक असते. शिवराय व त्यांची लष्करी धोरणे याविषयी अधिक माहिती करून घेऊ पुढच्या लेखात..!

- सुधांशु नाईक, कोल्हापूर. ( +९१ ९८३३२९९७९१, ईमेल – nsudha19@gmail.com)
( आपल्या परिसरात ऐतिहासिक शिवकालासंबंधी व्याख्याने आयोजित करून याबाबत अधिकाधिक जागृती करावी ही वाचकांना विनंती.)

Saturday, 24 September 2016

एक भन्नाट दिवस- स्वरवेड्या माणसासोबत...!

एकेकाळी शंकर-जयकिशन यांच्यासोबत वावरलेल्या, त्यांच्यासाठी व्हायलीन वादन करणाऱ्या नंदूजीचा मुलगा श्रेया घोषाल वगैरे सुप्रसिध्द कलावंतांसोबत सध्या गिटार वादनासाठी जात असतो. लाखो रुपये कमावतो. अशावेळी घरात आम्हा ४-५ जणांसमोर नंदूजी आपल्या विश्वात आम्हाला मनसोक्त हिंडवून आणत होते..!
मोठ-मोठ्या शो मधून हजारो रुपये मानधन सहज मिळवणारा हा थोर माणूस साध्या कपड्यात बसून आमच्यासमोर स्वरमहाल उभा करत होता..!
 --------*******----------
माझा जुना मित्र संदीप आगवेकर रफीसाहेबांच्या गाण्याचे कार्यक्रम सर्वत्र करत असतो. सध्या जरा नव्या संकल्पना घेऊन वाटचाल सुरु आहे. त्या सांगीतिक कार्यक्रमात निवेदनाची लहानशी जबाबदारी पार पाडायची होती म्हणून नुकतंच पुण्याला गेलो होतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली एका मनस्वी स्वरवेड्या माणसासोबत. त्यांचं नाव नंदू चवाथे. तेही या कार्यक्रमात सोलो व्हायलीन वादन करणार होते.
आज सत्तरी पार केलेले नंदू सर १९६२ पासून शंकर-जयकिशन यांच्या वाद्यवृंदात व्हायोलिन वाजवत. नंतर ओ. पी. नय्यर, पंचमदा बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल इ. अन्य संगीतकारांकडेही त्यांनी व्हायोलिन वादन केलं आहे. मात्र खरी भक्ती शंकर-जयकिशन यांच्यावरच.

अर्थात शंकर-जयकिशन यांनी केलेलं काम तसेच मोठे आहे. बरेचसे चित्रपट रसिक ज्या पंचम उर्फ आर. डी. बर्मन यांना वाद्यवृंदाचा बादशहा मानतात, ते पंचम शंकर-जयकिशन यांना मानत. यातच सारं आले.
 अशा दिग्गज माणसासोबत राहण्याचे, वावरण्याचे व त्यांना जवळून पाहण्याचे प्रसंग सर्वसामान्यांच्या वाट्याला फारसे येत नाहीत. त्यामुळे या दृष्टीने नंदू सरांसारखी माणसे भाग्यवानच ! आणि त्यांचा सलग दोन दिवस संपूर्ण सहवास लाभणे हे आमचे भाग्य.
नंदू सरांना प्रश्न विचारावे लागतच नाहीत. ते अजूनही मनाने तो संगीताचा सुवर्णमयी काळ जगतच असतात. आपणच हळूच त्यात शिरकाव करून घ्यायचा असतो, त्यांच्या माध्यमातून. माझा मित्र संदीपच्या घरी आम्हा सर्वांना नंदूजीचा सहवास लाभला. खूप गप्पा मारता आल्या.


ते सतत सांगत होते आम्हाला दत्ताराम, साबेस्टीयन, मित्रा, इनौक डयनियल, रामलाल इत्यादी मंडळींच्या अनेक कथा. कितीतरी त्यांच्या संगीतनिष्ठेच्या. कितीतरी खाजगी गोष्टी सुद्धा. शंकरजी व जयकिशन यांचं त्यांच्या कामातलं मोठेपण सांगताना भारावून जात होते. त्याचबरोबर त्यांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टीमुळे किती भावनिक त्रास सहन करावे लागले, याचमुळे जयकिशन यांचा कसा अकाली मृत्यू झाला हे सांगताना हळवे होत होते.
प्रत्येक कलावंताचे मान-अपमान, अहंकार, असूया हे सारं टोकदारच असते. त्या टोकदार भावनांमध्ये कधी तो कलाकार होरपळून जातो तर कधी दुसरे होरपळतात. मात्र स्वभावाला औषध नसते हेच खरं..! असे अनेक किस्से ऐकताना आम्ही गुंग होऊन गेलो.

१९६२ पासून नंदू सर शंकर जयकिशन यांच्यासह अन्य लोकांकडे काम करायचे. शंकरजी हे तर त्यांच्यासाठी जणू दैवतासमान. त्यांच्यासाठी अनेक गोष्टी केल्या. त्यामुळे शंकर-जयकिशन यांचा विश्वास संपादन केलेला..
एका चित्रपटाचे संगीत बनत होते तेंव्हाचा एक किस्सा नंदूजी सांगत होते..

“बहुदा तो ‘ दिल तेरा दिवाना’ हा चित्रपट असावा. ६-७ दिवस झाले तरी मनासारखं काम जमेना. मेहमूद व शम्मी कपूर यांच्यावर चित्रित होणारं एक गाणं हा वेगळा प्रयोग होता. “धडकने लगता है मेरा दिल तेरे नाम से..” ही स्वर-रचना जशी हवी तशी बनत नव्हती. त्यामुळे शंकरजी अस्वस्थ होते. त्या दिवशी संध्याकाळी अचानक ते सारं जमून आलं. मग दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग करायचं ठरलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी आली की शंकरजी यांची आई जी तिकडे आंध्रप्रदेश मध्ये रहायची, त्यांचं निधन झालंय. मग जयकिशन यांनी रेकॉर्डिंग रद्द केल्याचं आम्हा सर्व वादकांना कळवलं.
जरा वेळानं शंकरजी स्टुडीओमध्ये आले. कसलीच तयारी नाही हे पाहून अत्यंत रागावले. पुन्हा सगळ्यांना एकत्र केलं गेलं. रेकॉर्डिंग पार पडल्यानंतर मग शंकरजी यांनी माझ्या हातात पैसे दिले व मला गावी पाठवून दिलं. शंकर व जयकिशन यांच्यात सुप्त स्पर्धा असायचीच. पण त्यात कटुता नसे. जे काही चांगलं निर्माण होई ते स्वीकारले जाई.
याच सिनेमाच्या त्या टायटल गाण्याविषयी पण एक गंमत आहे.. “ धडकने लगता है.. हे गाणं शंकरजी यांनी बनवलेलं. तर दिल तेरा दिवाना है सनम... हे जयकिशन यांनी रचलेलं. मात्र तेंव्हा स्टुडीओमध्ये हे “दिल तेरा दिवाना” काही रंगतदार वाटत नव्हतं. त्यात तो जोश दिसेना. अचानक जयकिशन पुढे आले आणि त्यांनी एक सुधारणा सुचवली. त्यानुसार “बिजली गिराके आंप खुद बिजली से डर गये...” हा उंच आवाजातील रफीने गायलेला तुकडा गाण्याच्या सुरुवातीला घेतला गेला. त्यामुळे सारं वातावरणच बदलून गेलं. ते गाणं बाकीच्या गाण्यांच्या तुलनेत कुठल्याकुठे पुढे गेलं..!”


असे किस्से नंदुजींच्या तोंडून ऐकताना आम्हाला अजून एक दुर्मिळ भाग्य लाभलं. ते म्हणजे प्रत्येक किश्श्यानंतर ती ती गाणी ते व्हायलीनवर वाजवून दाखवत होते. स्वतः नंदू जी सुद्धा गरीब परिस्थितीतून पुढे येत मोठे कलावंत म्हणून त्यांच्या क्षेत्रात ओळखले जातात.
एकेकाळी शंकर-जयकिशन सोबत वावरलेल्या, त्यांच्यासाठी व्हायलीन वादन करणाऱ्या नंदूजीचा मुलगा श्रेया घोषाल वगैरे सुप्रसिध्द कलावंतांसोबत सध्या गिटार वादनासाठी जात असतो. लाखो रुपये कमावतो. अशावेळी आम्हा ४-५ जणांसमोर नंदूजी आपल्या विश्वात आम्हाला मनसोक्त हिंडवून आणत होते..! मोठ-मोठ्या शो मधून हजारो रुपये मानधन सहज मिळवणारा हा थोर माणूस घरच्या साध्या कपड्यात बसून आमच्यासमोर स्वरमहाल उभा करत होता..!

 सहज सी. रामचंद्र यांच्या संगीताचा विषय निघाला. मग नंदू सर व्हायलीन घेऊन सरसावले. “ओ चांद जहा वो जाये..”, “ राधा ना बोले ना बोले ना बोले रे...”, “अचलम..चापलम..” “ धीरे से आजा रे अखियन मे...” अशी एक से एक गाणी ऐकवू लागले. सकाळची वेळ. समोर खुर्चीत आम्ही बनियनवर बसलेलो. त्यांना अधूनमधून गाण्याच्या ओळी आमच्या भसाड्या आवाजात ऐकवत...! आज या वयातही त्यांचा हात जराही कापत नाही. गाण्याचे बोल तर जसेच्या तसे वाजतातच, पण इंटरल्यूड म्युझिक सुद्धा जसेच्या तसे स्मरणात आहे, व तसेच वाद्यातून उमटते हे पाहून आम्हीच थक्क होत होतो..!
सकाळी साडेसहा ते नऊ अशी अडीच तास रंगलेली ही घरगुती मैफिल संपूच नये असंच वाटत होतं.
 अखेर त्यांचे पाय धरले..! शेवटी एवढा आनंद त्यांनी दिला त्याची काय भरपाई करणार आपण?? लाखो रुपये देऊनही न मिळणारा आनंद त्यांनी भरभरून वाटला होता..!!

पट्कन उचलून मिठीत घेत ते मात्र साधेपणाने म्हणाले, “व्वा..आज छान रियाझ झाला. तुम्ही सगळे मनापासून ऐकत होतात, मलाही खूप दिवसानंतर मजा आली वाजवायला..!” इतकं सच्चेपण.

 प्रत्येक कलावंताचा एक काळ असतो. तेंव्हा ते शिखरावर असतात. मात्र जेंव्हा तो काळ संपतो, तेंव्हा त्या झगमगाटी विश्वापासून दूर राहणं अनेकांना झेपत नाही. मग सुरु होतो व्यसनांचा सिलसिला. त्याला नंदूजी अपवाद आहेत. चित्रपटासाठी वाजवायचं कमी झाल्यावर त्यांनी अनेक खाजगी मैफिली केल्या. कित्येक वाद्यवृंदातून वाजवलं मात्र कधीही डोक्यात हवा जाऊ दिली नाही. आपल्या कलेवर नितांत प्रेम करताना मोठ्या झालेल्या अन्य कलावंताबाबत असूया बाळगली नाही. आज फार मोठे मानले गेलेल्या अनेक कलावंताना त्यांनी स्वतःहून शंकर-जयकिशन, पंचम, ओ पी., प्यारेलाल इत्यादी मंडळींकडे कामाला लावले. त्यांना ब्रेक मिळवून दिला. त्याबद्दल कोणतेही मोठेपण नंदूजी मिरवत नाहीतच पण त्याचबरोबर जी मंडळी कृतघ्नपणे त्यांचं योगदान विसरली त्यांना नावंही ठेवत नाहीत. आजही नवोदित कलावंताला उत्फूर्तपणे प्रतिसाद देतात आणि त्यांना स्टेज मिळावे म्हणून प्रयत्नही करतात.

आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक माणसे भेटतात. काही वेदना देऊन जातात तर काही धडे शिकवून जातात. नंदूजीसारखी माणसे मात्र आपल्याला आयुष्य कसं जगावं याचा आदर्श देऊन जातात. निरंतर स्मरणात राहणारे असे सुवर्णक्षण देऊन जातात की त्यांना चिरंजीव सुरांचे कोंदण लाभलेलं असतं..!

-सुधांशु नाईक (9833299791, nsudha19@gmail.com)