marathi blog vishwa

Wednesday, 5 October 2016

शिवराय व स्वराज्याचे व्यवस्थापन

उत्तर ते दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिम अंगाला विस्तारलेलं व सुमारे १०-१५ जिल्ह्यांच्या इतकं असणारे स्वराज्य शिवरायांनी शून्यातून निर्माण केले. त्याचा उत्तरोत्तर विस्तार होत गेला व एक दिवस मराठी सत्तेचा वचक भारताच्या ७०-८०% भागावर निर्माण झाला. हे सारं अभ्यासलं की थक्क व्हायला होतं. 
या सर्वाच्या मुळाशी स्वराज्याच्या सुरुवातीपासूनचे काटेकोर व्यवस्थापन होतं हे नक्की. याविषयी अनेकांनी लिहिलं आहेच, लष्करी व शेतीविषयक धोरणे या दोन गोष्टींव्यतिरिक्त अन्य गोष्टींविषयी मी माझ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतो...


 “शिवाजी महाराजांचा इतिहास” म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की महाराजांनी मूठभर (व नंतर हजारो) मावळे गोळा केले. सर्वत्र घोडदौड केली. शत्रूला गनिमी काव्याने हरवले आणि स्वराज्य स्थापन केले. पण शिवपूर्वकाळातील परिस्थिती पहिली तर लक्षात येतं हा सर्व खटाटोप किती जीवघेणा व वेळखाऊ होता ते...!
शिवपूर्वकाळात बहुतांश मराठे सरदार हे कुणा ना कुणा सुलतानाच्या पदरी बांधले गेलेले. मोगल, निजामशहा, आदिलशहा, बेरीदशहा, कुतुबशहा अशा सर्वांच्या साठी काम करणारे जहागीरदार, देशमुख आपापल्या मुलुखात सुलतान बनलेले असायचे. काही सन्माननीय अपवाद वगळता कुणालाही रयतेसाठी खूप काही करायची इच्छाही नव्हती. त्यातून काही चांगलं करू पाहणाऱ्या मंडळीना त्रासही दिला जात होता. लहान-सहान निवाडे करायचेही स्वातंत्र्य जिथे नव्हते तिथे राज्य उभारणे म्हणजे अशक्यप्राय गोष्टच होती.
तरीही त्यातून शहाजीराजांनी बरीच खटपट केली त्यामागे मुख्यत्वे जिजाबाईंची तळमळ होती.
राजकारणाची गरज म्हणून शहाजीराजांना सह्याद्रीपासून दूर केले गेले व पुण्याच्या उध्वस्त परिसरात जेंव्हा एकटे राहणे पदरात पडले तेंव्हा त्या संकटाचा संधीसारखा वापर केला तो जिजाबाईंनी..!

“संकटांचा संधी म्हणून उपयोग करून घेणे, निराश मनांना पुन्हा उभारी देणे” हे व्यवस्थापनातील महत्वाचे कौशल्य. सर्वाना ते जमतेच असे नाही. मात्र पुण्यात ते जमले. ज्यांची नावेही इतिहासाला ठाऊक नाहीत अशा हजारो लोकांपासून, ते ज्यांची नावे ठाऊक आहेत अशा शेकडो माणसांपर्यंत अनेकांचे यासाठी महत्वाचे योगदान होते. त्याचवेळी ही लक्षात ठेवले पाहिजे की जेंव्हा जेंव्हा स्वराज्यावर संकटे आली तेंव्हा तेंव्हा राजांनी प्रजेला विश्वासात घेतले आहे. स्वतः आघाडीवर लढत राहून रयतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. योग्य नियोजन करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त यशस्वी कसे होऊ यासाठी कष्ट केले आहेत. एक प्रकारचे ते “ project management” होते. कोणत्याही प्रकल्पाचे यशस्वी होणे हे टीमवर्क, टीमला योग्य दिशा देणारे  नेतृत्व व त्या नेतृत्वाच्या सल्लागारावर अवलंबून असते. स्वराज्यात या तीनही गोष्टीमध्ये उत्तम समन्वय (co- ordination) असल्याचे दिसून येते.

म्हणून “शिवरायांचे व्यवस्थापन” असं न म्हणता मी “स्वराज्याचे व्यवस्थापन” हा शब्द हेडिंगमध्ये वापरलाय. कारण शिवरायांना देवत्व देण्याच्या नादात हल्ली आपण उगाच अतिरेकीपणे काहीही सांगत सुटतो, ज्याची खरेतर काही गरज नसते. शिवरायांचे मोठेपण सांगायला अशा टेकूची गरज नाही.
अनेकदा असं म्हटलं जाते की वयाच्या १०-१२ वर्षीच शिवरायांनी सगळी कामे सुरु केली. ते तितकेसे योग्य नाही. सदरेवरील कारभारी, दादोजी कोंडदेव, माणकोजी दहातोंडे, बाजी पासलकर, सोनोपंत डबीर, कान्होजीराव जेधे इ. मंडळींना जिजाबाईचे म्हणणे व तळमळ पटली होती. जो काही लहानसा भूभाग ताब्यात आहे तिथे सर्व काही कुशल-मंगल असावे या भावनेतून त्यांनी नि:स्वार्थीपणे काम करायला सुरुवात केली होती हे इतिहासात दिसून येते.
गाव-गाव हिंडतानाचे बारीक निरीक्षण, पाहिलेल्या गोष्टीचे अर्थ-संदर्भ या सगळ्याचा सामोपचाराने विचार करून मग या सर्वांनी कामे सुरु केली. गावोगावच्या देशमुख- पाटील आदि मंडळींचे सामान्य जनतेवर तेंव्हा वजन होते. कित्येक ठिकाणी तर दहशत होती. काही ठिकाणी जसे चांगले काम सुरु होते तसेच कित्येक ठिकाणी अत्याचार सुरु होते. बहुतेक मंडळी येनकेनप्रकारेण सुलतानांशी किंवा त्यांच्या सरदारांशी बांधली गेली होती. सत्तेचा पाझर झिरपत झिरपत गावापर्यंत आलेला होता. त्यामुळे प्रत्येक वतनदार लहानसा सुलतान बनला होता. त्यांना वठणीवर आणणे आवश्यक होते. वयाने ज्येष्ठ असणे, पदावर असणे म्हणजेच “आपले ते खरे” असे नसते याची कल्पना त्यांना व जनतेला देणे आवश्यक होते. मग साम-दाम-दंड-भेद आदि उपायांचा वापर सुरु झाला.


पुण्याच्या जहागिरीत न्याय मिळतो हे सामान्य जनतेला कळू लागले. त्यावेळी मावळातील लोकांना व वतनदाराना कशा पद्धतीने वागवले गेले हे शिवबांनी जवळून पहिले. होणारे हे बदल शिवबांनी नक्कीच अभ्यासले असतील. महसूल, संरक्षण, न्यायव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, संपर्क व दळणवळण व्यवस्था, मुलभूत गरजांसाठी विविध सोयींची निर्मिती या सर्वांचे कळत नकळत शिक्षण मिळाले. त्याचवेळी शिवबांच्या व अन्य मुलांच्या शिक्षणासाठी ज्या शिक्षकांची नेमणूक केली गेली त्यांनीही चांगले शिक्षण दिले. म्हणूनच टीमवर्कचे महत्व बहुदा सर्वाना सुरुवातीपासूनच कळून चुकले होते.

स्वराज्याच्या इतिहासातील महत्वाची गोष्ट म्हणजे समूह व्यवस्थापन आणि टीमवर्क. अगदी शिवरायांपासून ते पहिल्या बाजीराव पेशव्यांपर्यंत कुणाचाही काळात हटवादी एकाधिकारशाही नव्हती तर एका कर्तबगार नेत्याने प्रत्यक्ष कार्यात स्वतः सहभागी होतानाच अनेक गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवून चालवलेली लोकशाही होती. साध्या सैनिकापासून गडाच्या हवालदारापर्यंत प्रत्येकाची जबाबदारी नक्की करून दिली गेली. तसेच ठराविक कालावधीनंतर त्यांच्या बदल्या केल्या गेल्या. जनतेच्या प्रत्येक प्रश्नाची उकल व्हावी म्हणून ठिकठिकाणी कार्यालये निर्माण केली गेली. पंतप्रधान पदासह मंत्रिमंडळाची निर्मिती करून त्यांच्या मार्फत जनसंपर्क वाढवला गेला. प्रत्येक माणसाने आपापल्या जबाबदाऱ्या नेटाने निभावल्या म्हणूनच स्वराज्य लोकांच्या हाडीमासी रुजले. 

शिवरायांचे स्वराज्य हे तत्कालीन असे पहिले शासन होते की जेथे नियमित रोजगार किंवा उत्पन्नाची हमी मिळू लागली. गडावरील विविध कारभारी, हवालदार, सैनिकांना पगाराची किंवा वेतनाची सुविधा दिली गेली. याचबरोबर सैनिकांसाठी आचारसंहिता तयार केली गेली. त्यामुळे सैनिक तर जोडला गेला स्वराज्याशी पण सैनिकांकडून होणारी रयतेची लुटालूट कमी झाली. यामुळे “हे राज्य आपले आहे” ही भावना लोकांच्या मनात निर्माण होऊ लागली. याचबरोबर जो मेहनत करेल त्यांना नक्की रोजगार मिळेल अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. असे करण्यात शासनकर्ता जेंव्हा यशस्वी होतो तेंव्हाच ते राज्य जपावे, वृद्धिंगत व्हावे म्हणून सामान्य माणूस योगदान देतो. लढाई, दुष्काळ अशा विशिष्ट वेळी सरकारी कोठीतून शेतकऱ्यांना धान्यापासून बी बियाणे देण्यापर्यंत मदत मिळू लागली. शिवकाळातील कल्याणकारी योजना किंवा शेतकऱ्याला मदत म्हणून केलेले काम हा विषय एका वेगळ्या लेखाचा आहे. तो स्वतंत्रपणे नंतर पाहूच.


जेंव्हा नेत्याकडून विशिष्ट आज्ञा मिळते तेव्हा त्या सूचनेची काटेकोर अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक असते. बरेचदा काय होते की, मिळालेली सूचना असते वेगळीच व लोक अंमलबजावणी वेगळ्या प्रकारे करतात. कोणत्याही राजाच्या आज्ञेत असणारे कारभारी नेहमीच मोठे कार्य करू शकतात. इथे संभाजी महाराजांच्या काळातील एका भन्नाट युद्धाची कहाणी सांगायला मला नक्कीच आवडेल.
आपल्या मृत्युपूर्वी कधीतरी शिवराय अशा प्रकारे बोलून गेले होते की, “ प्रत्येक गड असा मजबूत व्हायला हवा की तो किमान एक वर्ष लढत राहिला पाहिजे. आलमगीर जेव्हा स्वारीवर येईल तेंव्हा आपल्या ३६० गडानी असा मुकाबला केला पाहिजे की स्वराज्य अबाधित राहायला हवे.”
त्यानंतर संभाजीराजांच्या काळात “रामसेज” सारख्या तुलनेने लहान गडाने याची किती काटेकोर अंमलबजावणी केली ते पाहून ऊर भरून येतो. नाशिकपासून जवळ असलेल्या या रामसेजच्या किल्लेदाराने हा गड चक्क एक दोन नव्हे तर तब्बल पाच वर्षे लढवला. शत्रूच्या प्रत्येक आक्रमणाला प्रखर उत्तर दिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जेंव्हा एखादा माणूस अशी कामगिरी निभावतो तेंव्हा त्याच्यापुढे सारेच नतमस्तक होतात. दुर्दैवाने आजही आपल्याला त्या किल्लेदारांचे नावही नक्की माहिती नाही. (-विश्वास पाटील यांनी ते किल्लेदार सूर्याजी जेधे असल्याचा एकदा उल्लेख केलाय मात्र त्याला अन्य काही सबळ पुरावे मिळू शकलेले नाहीत).

स्वराज्य उभे राहण्यात सर्वात महत्वाचा मुद्दा होता प्रत्येकाने जबाबदारी घेणे. आजच्या भाषेत त्याला accountability असे म्हणतात. बरेचदा काय होते, की कोणत्याही उद्योगात, नोकरीत लोकांना पद मिळते पण त्या पदाचे पूर्ण अधिकार मिळत नाहीत. त्यामुळे काम दुसऱ्यावर ढकलण्याची किंवा विविध कारणें पुढे करण्याची भावना सर्वत्र वाढीस लागते. हे शिवकाळात किंवा नंतरही घडत नव्हते, बहुतेकदा प्रत्येकाने आपापली जबाबदारी पूर्णांशाने निभावायाचा प्रयत्न केलाय. त्यामुळेच स्वराज्य शिवरायांच्या मृत्युनंतर २७ वर्षे औरंगजेबशी लढत राहिले. त्यानंतरही भारतात विस्तारत राहिले.

या accountability चे उत्तम उदाहरण म्हणजे शिवकाळात घडलेली एक घटना.
शिवराज्याभिषेकाचा काळ जवळ आलेला. त्यातच लढाई जिंकल्यावर हाती आलेल्या बहलोलखान याला सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी उदारपणे सोडून दिले. हा बहलोलखान किती कपटी आहे हे ठाऊक असलेले शिवराय त्यामुळे भडकले. त्यांनी प्रतापरांवाना खरमरीत पत्र पाठवले. प्रतापरावना आपली चूक कळली. त्यामुळे पुन्हा आक्रमण करायला आलेल्या बहलोलखानावर ते आततायीपणाने, अविचाराने चालून गेले. मराठ्यांना आपला सरसेनापती गमवावा लागला.
मात्र यानंतर प्रतापरावांचे सहायक आनंदराव जे काही करतात ते म्हणजे जबाबदारी स्वीकारून काम निभावून नेणे. आनंदराव यांनी मग सैन्यासह बहलोलखानसमोर लढाई नाही केली तर गनिमीकाव्याने ते सरळ मार्ग बदलून कर्नाटकात असलेल्या बहलोलखानाच्या जहागिरीवर तुटून पडले. बहलोलखानाला मग आपली चाल बदलून तिकडे यावे लागले. मग तिथे त्याचा पराभव केला. संपगाव लुटले व नंतर हे सारे आनंदरावांनी शिवरायांना येऊन सांगितले. दुसरा कुणी असता तर एकतर शोक करत राहिला असता किंवा आज्ञा मिळायची वाट पाहत राहिला असता.

कोणत्याही राज्यासाठी, उद्योगासाठी सर्वात महत्वाची असते ती आर्थिक व्यवस्थापनाची शिस्त. पै पै चा हिशोब देखील अनेकांनी नीट ठेवलेला नसतो हे आजही आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते.

भावनेच्या आहारी जाऊन व्यवहार करणे, ढिसाळ व अनागोंदी कारभार, आपला व आपल्या नातेवाईक मंडळींचा उत्कर्ष करून घेताना संस्थेकडे दुर्लक्ष करणे, चुकीच्या माणसाच्या हाती व्यवहार सोपवणे, व्यवहार सोपवल्यानंतर त्यावर नियमित बारकाईने लक्ष न ठेवणे, एखाद्या ठिकाणी नुकसान होतेय हे कळल्यावरही त्याच चुका पुन्हा पुन्हा करणे अशा अनेक चुका आजही लोक भरभरून करताहेत. त्याचवेळी शिवकाळ किंवा नंतर पेशव्यांनी सांभाळलेली आर्थिक शिस्त पाहून अचंबित व्हायला होते. (पेशवाईतील उत्तरार्ध हा याबाबत अत्यंत चुकीचा होता. तरीही बरेचदा चुकीच्या मार्गाने केलेल्या खर्चाचे हिशोब मात्र नेमकेपणाने ठेवलेले आढळतात.!).


शिवकाळात आर्थिक शिस्त काटेकोरपणे सांभाळली गेली. शेतकऱ्याकडून केलेल्या सारा वसुलीपासून एखाद्या स्वारीत केलेल्या लुटीपर्यंत सर्वत्र नीट हिशोब ठेवले गेले. प्रत्येक लष्करी स्वारीत असा नियम असे की लुटलेली प्रत्येक गोष्ट सैनिकाने सरकारी तिजोरीतच जमा करावी. अगदीच एखादी गोष्ट हवी असल्यास त्या विशिष्ट वस्तू इतकी रक्कम जमा करायची सवलत कधीतरी मिळत असे. हा नियम राजासह सर्वांना लागू होता. 
तसेच रयतेला तोशीश पडू नये म्हणून शेतसारा तसेच झालेल्या एखाद्या चुकीबद्दलचा दंड वस्तुरूपाने भरण्याची सवलत असे. ठराविक कालावधीनंतर गडावरील कोषाधिकारी, धान्यकोठाराचे प्रमुख यांच्या बदल्या होत असायच्या. यामुळे गैरव्यवहाराला आळा बसत असे. त्यातूनही गैरव्यवहार आढळल्यास कडक सजा होई. पदाचा गैरवापर करून रयतेशी गैरव्यवहार केला म्हणून शिवरायांनी एकदा तर शामराजपंत यांना पेशवेपदावरून काढून टाकण्यात आले होते. अशा उदाहरणांमुळे सर्वांवर वचक रहात असे.

एखाद्या उद्योगसमुहाचे, राष्ट्राचे भवितव्य हे नेता-अनुयायी, राजा-प्रजा, मालक-चाकर यातील नात्यावर अवलंबून असते. जेंव्हा नेता किंवा राजा आपले भले करणार, आपल्याला उज्ज्वल भविष्य प्राप्त करून देणार यावर लोकांची श्रद्धा बसते तेंव्हाच ते राज्यासाठी संपूर्ण शक्ती, तन-मन-धन वापरून काम करतात. आपले संपूर्ण योगदान (Dedication) देतात. आणि जेंव्हा प्रजा आपले असे संपूर्ण योगदान देते तेंव्हा त्या नेत्याच्याही अंगी दहा हत्तीचे बळ येते. आपल्या राष्ट्राला अधिकाधिक महान करण्यासाठी तो जास्तीत जास्त प्रयत्नशील राहतो.
यासाठी पुढील घटना हे उत्तम उदाहरण आहे.

शिवबाराजे त्यांच्या तुकडीसोबत दौडत होते. दुपारची वेळ. कुठेतरी भाकरतुकडा खायचा होता. एक गाव जवळच होते. राजांनी तिथे गावातून काही भाजीपाला मिळतो का पाहायला सांगितले. त्याची किंमत अदा करायला सांगितली. इतक्यात कुणीसं म्हणालं, “ राजे हे तर आपल्या रामजीचे गाव. मागच्या कणेरगडाच्या जुझात त्येनी लई शर्थ केली. दिलेरखानाला त्वांडात बोटं घालाया लावली, मातुर जीव गमावला...हिथ घरी म्हातारा असतुया त्याचा, आनी लेकरू-बाईल हैत..”
“अस्स, मग चला. घरी जाऊन भेट देऊया..” राजे म्हणाले.
ही तुकडी गावाजवळ येताच गलका उडाला. पण प्रत्यक्ष शिवाजीराजे आलेत कळल्यावर गावकरी खूष झाले. स्वागताला सामोरे आलेल्या मंडळींचे मुजरे स्वीकारल्यावर चौकशी केली गेली. राजे त्या घराकडे चालत निघाले.

घरापर्यंत तोपर्यंत वर्दी गेलेली.

राजे दारी पोचण्यापूर्वी एक थरथरता म्हातारा बाहेर आला, राजांच्या पाया पडू लागला. राजांनी त्यांना उठवलं. म्हणाले, “आबा, अहो तुम्ही वयाने मोठे. आम्ही तुमच्या पाया पडायचं. तुम्ही नाही...”
म्हातारा गहिवरला. गदगदून आले त्याला. कुणीसं म्हणालं,” त्याचा पोर लढाईत गेला तेंव्हापासून मन हळव झालंय त्याचं....”
म्हातारा लगेच सावरला. म्हणाला, “ तसं न्हाई ओ. पर्त्येक्ष शिवबा राजा घरी येतुया म्हंजे देव दारी आल्यावानीच की. त्या पांडुरंगाला पाहिल्यावर डोला भरून यायला कुठं कुणाची परवानगी लागती व्हय...”
घरात कांबळे पसरले गेले. राजे व जवळची मंडळी बसली. घरात भाकरी-पिठलं टाकायचं फर्मान केव्हाच गेलेलं. म्हाताऱ्याला काय करावे कळेना झालेलं. पुढे केलेलं गूळ पाणी घेत राजांनी म्हाताऱ्याचं सांत्वन केलं.
राजे म्हणाले, “ तुमचा लेक गेला असं समजू नका. यापुढे तुम्हाला कसलीही तोशीस होणार नाही याची काळजी आमच्या कारभाऱ्याने घेतली आहेच.  त्याउप्पर तुम्हाला अधिक काय हवं तर बोला, आबा...संकोच करू नका..”

म्हातारा जागेवरून उठला, राजांचं हात हातात घेत म्हणाला, “राजा, मरनाचे काय न्हाई रं. ते कसं बी कधी बी येनार की. माझ्या पोराचं तर सोनं झालं...या जिमिनिपाई, आपल्या राज्यापाई जीव दिऊन गेला त्यो...तुझ्यासारका राजा असल्यावर कसला तरास? आपलं घर-दार सोडून तुम्ही सगळे जुझता ते कुणासाठी रं. आमच्यासार्क्याना चार बरं दिस दिसावं म्हनूनच की. ह्ये उमगतंय की आमाला...मला काय बी देऊ नगस...आमच्या जिमिनीतून पिकतंय त्यावर भागतंय बग आमचं. मातुर या गरीबाकडून तुलाच काय तरी द्यायचंय.. ते घेऊन जा..” असं म्हणून त्यानं पलीकडे बसलेल्या, नुकतीच मिसरूड फुटलेल्या एका युवकाला पुढे बोलावलं.
“राजा, ह्यो आमचा रुपाजी. आता वयात येतोय बगा. ह्येला तुझ्या सैन्यात जागा दे. भावाच्या जागी त्यो लढल...त्येच्याबी आयुष्याचं सोनं होईल...”

एका पोराला वीरमरण आलेलं असताना म्हातारा बाप दुसऱ्या पोरालाही सैन्यात घे म्हणून सांगतो हे पाहून जागच्या जागी राजे गहिवरले. “आबा, तुमच्यासारखी माणसे सर्वार्थानं पाठीशी आहेत म्हणून हे राज्य उभं राहतंय. आपलं राज्य इतिहासात नोंदलं जाईल ते तुम्हासारख्या लोकांच्या प्रेमामुळेच..”
रयतेच्या अशा प्रेमामुळेच शिवराय, शंभू छत्रपती, राजाराम महाराज यांच्यानंतर सुद्धा मराठी सैन्य मोगलांशी लढत राहिलं. जणू प्रत्येक सामान्य माणूस तेंव्हा शिवबा बनला होता. जे काही शक्य होतं स्वराज्यासाठी, ते ते करत होता..!

संपूर्ण योगदान याला म्हणतात...! 


आणि जेंव्हा राजासह प्रजा एखाद्या राष्ट्राच्या उभारणीत आपले संपूर्ण योगदान देते तेंव्हाच तिथे रामराज्य ही उत्तम व्यवस्थापनाची संकल्पना काही काळापुरती तरी का का होईना रुजू पाहते. एखाद्या राष्ट्राच्या बलशाली होण्यामध्ये व्यवस्थापन कौशल्यातील वरील सर्व बाबींचा समावेश कसा गरजेचा असतो हे आपण पहिले.
 त्याचबरोबर काळाशी सुसंगत  भक्कम लष्करी धोरणही आवश्यक असते. शिवराय व त्यांची लष्करी धोरणे याविषयी अधिक माहिती करून घेऊ पुढच्या लेखात..!

- सुधांशु नाईक, कोल्हापूर. ( +९१ ९८३३२९९७९१, ईमेल – nsudha19@gmail.com)
( आपल्या परिसरात ऐतिहासिक शिवकालासंबंधी व्याख्याने आयोजित करून याबाबत अधिकाधिक जागृती करावी ही वाचकांना विनंती.)

No comments:

Post a Comment