समाजात रोज विविध समस्यांवर तावातावाने बोलणारी, सतत सगळ्या जगाच्या
चुका दाखवून देणारी माणसे आपण रोजच पहात असतो. मात्र कित्येक मंडळी बहुतेकदा स्वतः
फारसे काहीही न करणारी. आपणही बरेचदा काही प्रमाणात त्याच समूहाचा भाग असतो. मात्र
अशी काही माणसे असतात की त्यांना कधीच स्वस्थ बसवत नाही.
समाजातील प्रत्येक
समस्येवर काहीच न बोलता ते शांतपणे थेट काम सुरु करतात. त्यांच्या कामाचा झपाटा,
त्याची व्याप्ती पाहता आपण थक्क होऊन जातो. अशा काही व्यक्तींपैकीच एक नाव म्हणजे
विलास चाफेकर.
नुकतंच १३ नोव्हेंबर रोजी त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली त्या
निमित्ताने त्यांच्याविषयी......
विलासकाका
आज पंच्याहत्तरीत आहेत. मात्र या माणसाच्या उत्साहाला वृद्धत्व शिवू शकलेले नाही.
कित्येक शारीरिक व मानसिक आघात पचवून हा माणूस आपल्या कार्यासाठी पाय रोवून उभा
आहे. प्रसिद्धीपासून दूर राहण्यात पारंगत असलेल्या, स्पष्ट व परखड विचारांसाठी
प्रसिद्ध असलेल्या विलासकाकांना भेटलं की आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव होते,
आपली भव्य क्षितिजे लहानशी भासू लागतात.
कोण हे विलास चाफेकर ? ठाण्यात एका सामान्य गरीब कुटुंबात जन्मलेलं
हे व्यक्तिमत्व. गरिबी, अनारोग्य याचा सुरुवातीपासून सामना करणारं. प्रतिकूल
कौटुंबिक परिस्थितीशी सामना करत स्वतःचे मार्ग आखणारं. ज्यांनी दुःखद अनुभव दिले
त्यांच्याविषयी कटुता न बाळगता त्यांच्याविषयीची कर्तव्यं निभावणारं. आपल्याला
समाजासाठीच जगायचं आहे हे ठामपणे ठरवून वैयक्तिक सुखोपभोगात रमणे शक्य असूनही
काट्यांनी भरलेली वाट चालणारं.
जाणीव
संघटना, वंचित विकास संस्था, वेश्यांच्या मुलांसाठीचे “नीहार” हे वसतिगृह व
पुनर्वसन केंद्र, पुणे, लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी फुलवा, अभिरुची असे
उपक्रम, पुण्यातील वेश्यांसाठी आरोग्य केंद्र व एड्स उपचार केंद्र, गोसावी वस्ती
प्रकल्प, सबला महिला केंद्र, लातूर, चंडीकादेवी आदिवासी महिला प्रकल्प यवतमाळ
जिल्हा इत्यादी १८ विविध प्रकल्पांची निर्मिती करून ते सक्षमपणे चालवणारे
व्यक्तिमत्व म्हणजे विलास चाफेकर.
वयाच्या
६१ नंतर सर्व प्रकल्पातील पदांवरून निश्चयपूर्वक पायऊतार होणारे निस्पृह
व्यक्तिमत्व म्हणजे विलास चाफेकर. सर्व पदांवरून निवृत्त झाल्यानंतरही आज वयाच्या
पंचाहत्तरीत देखील प्रत्यक्ष कामात एक कार्यकर्ता म्हणून सहभागी होत राहणारे
व्यक्तिमत्व म्हणजे विलास चाफेकर.
अनुताई
वाघ, जे पी. नाईक आदि मान्यवरांसोबत बालशिक्षण, आदिवासी विकास, भूकंपादी आपत्ती
निवारण कार्य, वेश्यांचे प्रश्न, आरोग्य, फेरीवाले अशा विविध गोष्टींसाठी निरंतर
कष्टणारे व्यक्तिमत्व म्हणजे विलास चाफेकर. आपल्याला वाचतानाही दम लागेल इतकी कामं
हा माणूस नुसती उभी करत नाही तर निष्ठेने राबून यशस्वी करून दाखवतो. तेही
स्वतःच्या मागे अनेक व्याधींचा, आजाराचा ससेमिरा सतत असताना..!
त्यांच्या
वैयक्तिक आयुष्यावर त्यांनी “ रात्रंदिन आम्हा...” असं आत्मचरित्र लिहून जे
‘ युद्धाचे प्रसंग ’ सांगितलेत ते वाचून आपलीच छाती दडपून जाते. हा माणूस मात्र
आजदेखील अशा शेकडो समस्यांच्या छाताडावर पाय रोवून वयाच्या पंच्याहत्तरीत देखील
लढायला तयार असतो...!
पुणे,
मुंबई, मराठवाडा, विदर्भातील यवतमाळचा सर्वाधिक समस्याग्रस्त भाग, मध्यप्रदेशमधील
दुर्गम भाग आदि ठिकाणी समस्यांच्या निर्मूलनासाठी धडक काम करणे ही विलासाकाकांची
खासियत.
***
कोणतीही
लहानमोठी अडचण दिसली की जणू हत्तीचं बळ त्यांच्या अंगी येत असावं. मला गेली १५
वर्षे त्यांचा प्रत्यक्ष व पत्ररूपाने सहवास लाभला. त्यात अनेकदा त्यांचे हे
वेगळेपण प्रकर्षानं जाणवलं. एक लहानसा किस्सा सांगतो.
नीहार
हा त्यांनी निर्माण केलेला एक महत्वाचा प्रकल्प. वेश्याच्या मुलांचे संगोपन व
पुनर्वसन तिथे सर्वात प्रथम सुरु झाले. याकामी पु ल. देशपांडे, विंदा करंदीकर आदि
साहित्यिकांपासून अनेकांनी सहकार्य दिलेले. तर या ठिकाणी लहान मुलांना गोष्टी
सांगण्यासाठी आम्ही एकदा गेलो होतो. कार्यक्रम संपल्यावर परत येताना वाटेत
वाहतुकीची कोंडी झालेली. जवळच एक मंगल कार्यालय होते. तिथे कुणा राजकीय
पुढाऱ्याच्या नातलगाचे लग्न होते. खूप जास्त गाड्या आल्या होत्या. काहींनी
रस्त्यात वेड्या-वाकड्या गाड्या आणल्या. त्यामुळे सगळं विस्कळीत झालेलं. पाचेक
मिनिटे गाडीत बसून राहिल्यावर विलासकाका अस्वस्थ झाले.
“
काय झालंय रे..?” असं ड्रायव्हरला विचारलं. त्याला काही कळेना.
दुसऱ्या
मिनिटाला विलासकाका खाली उतरले. “सार्वजनिक रस्त्यावर कोण अशी अडवणूक करतोय
बघूया...” असं म्हणत थेट पुढे घुसलेच.
आम्ही
अन्य काही तरुण मंडळी “कशाला उगाच त्या पुढाऱ्यांच्या नादाला लागा, होईल २०-२५
मिनिटात सर्व सुरळीत..” असा विचार करत बसलेलो. मात्र काका उतरल्यामुळेच आम्हाला
उतरावं लागलं.
शांत
पण ठाम आवाजात काकांनी त्या ७-८ जणांना गाड्या बाजूला घेऊन रस्ता मोकळा करायला
सांगितलं. त्यांच्या शांत आवाजातही अशी जरब होती की पुढच्या ५-७ मिनिटात रस्ता
मोकळा झाला.
हे
असं समस्येला थेट भिडणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. तुमच्याकडे प्रचंड धाडस तर
आवश्यक आहेच पण आपल्या विचारांवर अव्यभिचारी निष्ठाही आवश्यक आहे. प्रसंगानुरूप
विचारांशी तडजोडी करत, कातडीबचाव धोरण अवलंबत आपण जेंव्हा कामं करत असतो तेंव्हा
विलासाकाकांना असं पाहणं ही जणू आपण स्वतःला मारलेली चपराक असते.
****
त्यांचे
शेकडो कार्यकर्ते हे त्यांना असं पहात उभे राहिलेत. त्यांच्यासाठी विलासकाका “सर” आहेत. सर्वजण त्यांना आदराने
“सर” असेच म्हणतात. अनेकदा असं होतं की सुरुवातीच्या दिवसात एखाद्या
कार्यकर्त्याला वाटते की मला सर काही मदत करत नाहीत. मात्र तो कार्यकर्ता त्या
कामाच्या ठिकाणी पोचण्यापूर्वी तिथे विलासकाका जाऊन आलेले असतात. तिथल्या अडचणी
त्यांना नेमक्या ठाऊक असतात. त्यातील कोणती अडचण त्या कार्यकर्त्यानं स्वतःहून
सोडवावी याच्या काही आखीव-रेखीव अपेक्षा असतात. जणू ती त्या कार्यकर्त्याची प्रवेश
परीक्षा (entrance exam हो आपल्या मराठीत..!) असते.
तो
कार्यकर्ता तिथं पोहोचताच १०-१५ दिवसांनी प्रत्यक्ष विलासकाका तिथे दाखल होतात.
त्याने स्वतःची सोय कशी करून घेतलीय हे पाहतात. त्यानंतरही काही मोठी अडचण असेल तर
मग मदत करतात. बहुदा एव्हाना तो कार्यकर्ता तिथं शारीरिक-मानसिक दृष्ट्या स्थिर
झालेला असतो.
त्यांनीच
सांगितलेला एक किस्सा यवतमाळ जवळच्या खेडेगावातला.
तिथं
असाच एक कार्यकर्ता गेला. काही दिवसानंतर जेंव्हा विलासकाका तिथं पोचले तेंव्हा
त्यानं अक्षरशः यांच्या पायाला मिठी मारली. ढसाढसा रडला तो. यांना पट्कन काही
कळेना. काय झालं. कुणी याला धमकावलं की काय. मारहाण वगैरे केली की काय... तो जरा
शांत झाल्यावर विचारलं मग...
“काय
झालं रे... तुला कुणी त्रास देतोय का...”
“नाही
हो...मला नाही कुणी त्रास देत...”
“
मग तू का रड्तोयस?”
“
सर, ही माणसे रस्त्याकडेचा किंवा रानातला कोणताही पाला शिजवून खातात हो... यांना
अन्नच मिळत नाही...! हे बघवत नाही मला. मीही गरिबी पाहिलीय, समस्या पाहिल्याहेत पण
हे सारं भयंकर आहे.”
त्यांना
किमान या परिस्थितीची कल्पना होती. मात्र ज्यांनी शहरापलीकडे, आपल्या
घर-गावापलीकडे असणारे हे भेदक वास्तव पाहिलेले नसते, त्यांची अवस्था कशी होईल ?
****
सायनला
हॉस्पिटलमध्ये जात असताना तिथली धारावीची झोपडपट्टी हे विलासकाकांचे पहिले
कार्यक्षेत्र. नंतर घाटकोपरच्या झोपडपट्टीत. झुनझुनवाला कॉलेजजवळच्या वेश्यावस्तीत
तिथल्या मुलांसाठी त्यांनी “अनौपचारिक शिक्षणाचे” अफलातून प्रयोग केले. त्याविषयी
साधना सारख्या साप्ताहिकात लेखन केलं. पुढे जेंव्हा त्यांना दडपशाही व मारहाणीचा
सामना करावा लागला तरी ते डगमगले नाहीत. मात्र तिथल्या वेश्यांचा उदरनिर्वाह चालणे
धोक्यात आल्यावर तिथून ते बाहेर पडले.
पुण्यासारख्या
विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या गेलेल्या शहरात, शहराबाहेर २५-३० वर्षापूर्वी
गरिबांचे, दुर्बल घटकांचे जे प्रश्न पाहिले त्याने विलासकाका कळवळले. त्यातून मग
जाणीव संघटना व वंचित विकास या संस्था उभ्या राहिल्या. या संस्थांच्या माध्यमातून
विविध प्रकल्पांची निर्मिती झाली. त्यातील “नीहार” हा एक महत्वाचा प्रकल्प.
वेश्यांच्या
मुलांच्या प्रश्नाची ओळख झालेलीच होती. ते प्रश्न सोडवण्यासाठी काय करायला हवे
तेही ठाऊक होते. घाटकोपरला जरी शारीरिक / भावनिक दडपशाहीने माघार घ्यावी लागली तरी
आता पुण्यात ते काम अधिक ताकदीने करायचं असे ठरवून विलासकाका त्याला भिडले.
१९९०-२०००
च्या दशकात “नीहार” साठी तर अडचणींचा डोंगर समोर तयार होताच. जागा नाही. मग
लोहगावला जागा मिळाली तर तिथे लोक बांधकाम करू देईनात. पाण्याचा प्रश्न होता.
आर्थिक अडचणी तर होत्याच.
निधी
गोळा करायला सुरुवात केली तेंव्हाचा एक किस्सा कधीतरी विलासकाकानी सांगितलेला.
सर्वत्र
ते आपल्या कामासाठी निधी मिळावा म्हणून पोस्टकार्ड / माहितीपत्रक असं विविध
जणांच्या घरी स्वतः जाऊन देत. एकदा पु. ल. देशपांडे यांच्या घरी गेले. तर कुणी
नव्हतं. मग तसंच तिथे माहितीपत्रक टाकून ते परतले.
काही
दिवसानंतर फोन आला की तुम्हाला पुलंच्या घरी बोलावलंय.
घरी
पोचल्यावर औपचारिक गप्पा सुरु होण्यापूर्वी सुनीताबाईनी थेट एक लाखाचा चेक हातात
ठेवला. आपण स्वतःचे काही बोलणं मांडण्यापूर्वी चेक हातात पडतो हे पाहून काका
क्षणभर स्तब्ध झाले. मग ते दोघे म्हणाले, “अहो, तुमचं काम आम्हाला माहिती आहे, ही
रक्कम योग्य ठिकाणीच खर्च होईल यावर आमचा विश्वास आहे.”
तशीच
तऱ्हा कविवर्य विंदा करंदीकर यांची. त्यांना मिळालेल्या पुरस्काराची रक्कम त्यांनी
ज्या समाजोपयोगी कामांना वाटून दिली त्यात “वंचित विकास” होतेच.
पुण्यातील
जावडेकर कुटुंबीय हेही असेच विलासकाकांच्या निरंतर पाठीशी उभे राहिलेले आहेत.
मात्र
या आर्थिक मदतीइतकीच मोलाची मदत कुणी केली असेल तर जाणीव संघटना व वंचित विकास या
दोन संस्थांसाठी सतत कार्यरत राहणाऱ्या अर्धवेळ, पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी.
एखादी
समस्या मग ती वेश्यांसाठी आरोग्य केंद्र असो की किल्लारी भूकंपावेळी गावागावातून
केलेले काम असो यवतमाळ येथील आदिवासी महिला केंद्र असो एकदा कार्यकर्ते कामाला
भिडले की मागे हटत नाहीत. आज हजारो कार्यकर्त्यांचे जे पाठबळ विलासकाकांच्या मागे
आहे तीच त्यांची खरी शक्ती आहे. सध्याच्या मतलबी युगात जेंव्हा सख्खा भाऊ भावासाठी
मदतीला उभा राहताना दहा वेळा विचार करतो तेंव्हा हे हजारो कार्यकर्ते
विलासकाकांच्या संस्थेत विविध प्रकल्पांवर निरपेक्ष भावनेने कार्यरत असतात.
कित्येक जण तुटपुंज्या मानधनावर कामाचा गाडा ओढत असतात. विलासकाकांच्या
आत्मचरित्रात काही जणांचे नावानिशी उल्लेख आहेत पण बहुसंख्य मंडळी ही पडद्यामागे
कार्यरत आहेत.
कधीकाळी
घरदार सोडून समाजासाठी आयुष्य दोन्ही हाताने उधळणाऱ्या या अवलियाचे हे सारे नवे
कुटुंबीय गावोगावी आपापल्या परीने काम पुढे नेत आहेत. रोजच नवी लढाई खेळताना विविध
समस्यांसोबत झुंज देत आहेत.
हे
सारं पाहताना वयाच्या पंच्याहत्तरीत पोचलेल्या विलासकाकांना मात्र नव्या कामांची
क्षितिजे खुणावत आहेत. सामाजिक उपक्रम अधिक परिणामकारक पद्धतीने राबवण्यासाठी
“कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र” अभिनव पद्धतीने कसं चालवता येईल याची आखणी
त्यांच्या डोक्यात सुरु आहे. फिल्डवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणसांना अधिक
कार्यक्षम होता यावे यासाठीचे नियोजन सुरु आहे.
वयाच्या
चाळीशीत तणावग्रस्त होऊन लवकर निवृत्ती पत्करणारी, स्वतःच्या चार भिंतीत तृप्तपणे राहणारी
अनेक कॉर्पोरेट मंडळी आपल्या आसपास वाढत असताना विलासकाकांसारख्यांचा
पंचाहत्तरीतील “तारुण्याचा आविष्कार” आपल्याला स्तिमित करतो आणि मग नुसत्याच
शुभेच्छा न देता आपण त्यांच्या कामात नकळत कधी सहभागी होऊन जातो ते कळत नाही..!
-
वंचित विकास व
विलास चाफेकर यांच्याशी
संपर्कासाठीचा पत्ता
श्री. विलास
चाफेकर
वंचित विकास, ४०५/९, मोदी गणपतीमागे, नारायण पेठ, पुणे-
४११०३०.
संपर्क –
०२०-२४४५४६५७, २४४८३०५०, २५४४८०१९. मोबाईल- ९४२२००३७२६
वेबसाईट:- www. vanchitvikas.org
No comments:
Post a Comment