marathi blog vishwa

Friday, 26 August 2016

पावनखिंडीचे युध्द, युद्धापूर्वी व नंतर...

कोणत्याही नेत्याच्या “महान” होत जाण्याच्या वाटचालीत ३-४ मुख्य घटनांचा समावेश असतोच. राजासाठी स्वतःहून बलिदान देणाऱ्या, मरणाच्या दारात आपणहून जाणाऱ्या सैनिकांच्या ज्या मोजक्या घटना जगभरात आहेत, त्यात पावनखिंडीतले बलिदान ही अजोड घटना आहे ! 

आषाढ पौर्णिमे-प्रतिपदाला झालेल्या या युद्धाच्या स्मृतीनिमित्त शेकडो शिवभक्त व निसर्गप्रेमी ही पदयात्रा गेली कित्येक वर्ष जुलै –ऑगस्ट महिन्यात करतात, तेंव्हा मला वाटलं तसं या पावनखिंड घटनेपूर्वीचे व नंतरचे काही...

पावनखिंडीच्या कथानकाची खरी सुरुवात होते अफजलखान वधानंतर. कारण पावनखिंडीत बलिदान केलं ते बांदलाचे सैनिक प्रतापगड युद्धात विशेष त्वेषाने लढले. साऱ्यांच्या पसंतीला उतरले.
ज्या कान्होजीराव जेध्यांनी या मोहिमेपूर्वी सर्व मराठा सरदारांची एकजूट घडवून आणली त्यांचा “मानाची पहिली तलवार” (ज्याला मानाचे पहिले पान असं त्याकाळी म्हटले जाई) देऊन सत्कार केला राजांनी या युद्धानंतर. यामुळे शौर्यासोबत अन्यत्र केलेली मोठी कामगिरीही कशी गौरविली जाते त्याचं प्रत्यक्ष उदाहरण साऱ्यांना पाहायला मिळाले.
त्यानंतर मात्र प्रतापगडाच्या पायथ्याला खानाला संपवल्यावर मराठी सैन्य कोणताही विजयोत्सव न करता पुढच्या मोहिमेवर निघालं.

कौटिल्यनीतीत अगदी असंच सांगितलं आहे... तिथे म्हटलंय की शत्रूचे सैन्य कमकुवत झालंय, भयभीत झालंय हे दिसताच राजाने आपल्या पराक्रमी सैनिकांना सोबत घेऊन त्वरित शत्रूच्या अन्य भागावर आक्रमण करून अधिकाधिक प्रदेश ताब्यात घ्यावा. शिवरायांनी व त्यांच्या सोबतच्या सल्लागार मुत्सद्यांनी अनेकानेक ग्रंथांचा अभ्यास केलेला. त्यात कौटिल्यनीती अभ्यासली असेलच का हे तसं सांगता येत नाही. पण शिवकालाकडे पाहिलं की ते कृष्ण व चाणक्य यांच्याप्रमाणेच धूर्तपणे पाऊले उचलतात असं मला नेहमी जाणवते.

तर प्रतापगड परिसरतील घमासान युद्धात आदिलशाही फौजेला पूर्ण नेस्तनाबूत केल्यावर पुढील २-३ दिवसातच सरनोबत नेतोजी पालकर व शिवराय दोन तुकड्यांनीशी आदिलशाही मुलुखात घुसले. वाई, पाचवड, सातारा, उंब्रज, कराड, मसूर, आष्टा, वाळवा ताब्यात घेत अवघ्या २०-२२  दिवसात शिवराय कोल्हापूरजवळ आले. मोठा भूभाग स्वराज्यात आल्याने मराठी फौजेचा उत्साह द्विगुणीत झालेला. कोल्हापूर व पाठोपाठ पन्हाळा जिंकला गेला. पन्हाळ्याची ख्याती सर्वांना आधीच माहिती. त्यामुळे गड जिंकताच रातोरात तिथं पोचून भर रात्री मशालींच्या उजेडात शिवरायांनी दुर्गदर्शन केलं असं इतिहास सांगतो.  
मंडळी जरा विसावाताहेत तोवर बातमी आली की आदिल्शाहाने दिलेल्या आदेशानुसार, पळून गेलेला फाझलखान रुस्तुम-ए-जमा याला सोबत घेत मोठी फौज घेऊन राजांवर चालून येत आहे. या बातमीने घाबरून जाण्याऐवजी लढाईसाठी सज्ज मराठी सैन्य तलवारी घेऊन दौडत निघाले. शत्रूसैन्य पोचायच्या आधीच सांगली-कोल्हापूर दरम्यान खिंडीजवळ मोक्याची जागा पकडून सज्ज झाले. टेकडी चढून वर आलेल्या आदिलशाही फौजेला शस्त्रसज्ज मावळे दिसताच त्यांचे मनोधैर्य खचले. स्वराज्यासाठी झालेल्या या पहिल्या मैदानी लढाईत मराठ्यांनी शत्रूला अक्षरशः उधळून पळवून लावले.

मग आदिलशाहीला धडा शिकवण्यासाठी नेतोजीराव चिकोडी, रायबाग, अथणी, कुडची असे विजापुरकडे दौडत निघाले तर शिवरायांनी मिरजेच्या बुलंद भुईकोट किल्ल्याला वेढा घातला. मात्र इथे त्यांना विजय मिळाला नाही. कित्येक दिवस गेले. मग बातमी आली की आदिलशहाने शिवरायांच्या पाडावासाठी कर्नूलचा सुभेदार सिद्दी जौहर याला नामजद केले आहे. त्याला सुमारे ४५ हजार खडी फौज व २० हजारचे अन्य सेवक दिले. खास किताब दिले. सिद्दी जौहर हा रांगडा व काटेकोर शिस्तीत वागणारा सरळमार्गी शिपाई गडी. अफझलखानासारखा इकडे तिकडे वेळ न घालवता तो सरळ मिरजेकडे दौडू लागला.

मग शिवरायांनी सल्लामसलत करून एक अफलातून निर्णय घेतला. मिरजेतून माघार घ्यायची मात्र पुन्हा पुण्याकडे स्वराज्यात न जाता, ही लढाई नुकत्याच जिंकलेल्या पन्हाळ्यावर बसून लढायची. यामागे दोन प्रमुख कारणे होती. एक म्हणजे सोबत असलेल्या सुमारे ६-७ हजार सैन्यासाठी पन्हाळ्यावर भरपूर धान्य, दारुगोळा व पाणी उपलब्ध होते तसेच परिसर डोंगर व लहान टेकड्यांनी भरलेला असल्याने झटपट युद्धासाठी, छापेमारीसाठी सुयोग्य होता. राजे गडावरून लहान लहान तुकड्या अचानक युद्धासाठी पाठवू शकत होते व त्या तुकडीला बाहेर असणारे मराठी सैन्य मदत करू शकणार होते.
तर दुसरे कारण म्हणजे हा भाग नुकताच स्वराज्यात आलेला. इथे युध्द झाल्यास स्वराज्याचा गाभा असलेले मूळ प्रदेश, राजगड, प्रतापगड, पुणे पट्टा, पुरंदर व कोकण यांना युद्धाची झळ लागणार नव्हती. युद्धाचा काहीही निर्णय लागला तरी त्यावेळी तयार झालेलं ते लहानसे स्वराज्य अबाधित राहणार होते. तर जेथे शिवाजीराजे जातील तेथेच युद्धाला जायचा निर्णय सिद्दी जौहरने घेतला. भक्कम शिपाईगडी असलेल्या सिद्दी जौहरचा हा निर्णयसुद्धा लष्करी दृष्ट्या योग्यच होता.
“एकदा का हा शिवाजी कब्जात आला की मग सगळे स्वराज्य आपलेच” हे त्याचे म्हणणे संयुक्तिक होते व त्याला स्वतःचे बळ नक्की ठाऊक होते. 


पाहतापाहता शिवराय सोबतच्या ६-७ हजार फौजेनिशी पन्हाळ्यावर पोहोचले. त्र्यंबकपंत या गडाच्या हवालदाराने (किल्लेदाराने) तत्कालीन व्यवस्थेनुसार चहू बाजूनी चोख बंदोबस्त केला. मोक्याच्या बुरुजांवर चांगल्या तोफा सज्ज केल्या. सर्वांच्या राहुट्यांची विविध भागात राहण्याची सोय केली. त्यांच्यासाठी अन्न, चारा-पाणी याची सोय केली.
अशा तऱ्हेने सर्व मंडळी सिद्धीचे स्वागत करायला उत्सुकतेने सज्ज झाली. सिद्दीने मोठ्या जोमाने पन्हाळगडावर हल्ला चढवला. त्याच्या सोबत शिवरायांच्या कुटुंबियांचा कायमचा वैरी बाजी घोरपडे, फाजलखान, रुस्तुम-ए-जमा, सिद्दीचा कर्तबगार जावई सिद्दी मसूद असे सर्व सरदार होते.
मात्र ज्या वेगाने आदिलशाही सैन्य गडाला भिडले त्याच वेगानं मागे सरकले. कारण होते गडावरून तोफा-बंदुका, गोफणी, बाण यांच्या सहाय्याने झालेला प्रखर हल्ला..!
मग सिद्दीने सुबुरीचे धोरण स्वीकारले. सैन्याची विभागणी केली. चौफेर वेढा आवळायला सुरुवात केली. गडाच्या सभोवती सुमारे ७-८ मैलाच्या परिसरात जागोजागी चौक्या, मेटे उभारली. गडाकडे रसद व सैनिक जाऊ शकतील असे सारे लहानमोठे मार्ग बंद केले. गडाचा तीन दरवाजा, चार दरवाजा, वाघ दरवाजा याच्या समोर मुख्य तुकड्या नेमल्या. उत्तामोत्तम तोफांनी या दरवाज्यावर व तटबंदीवर मारा करायला तोफखाना सज्ज केला. वैशाखाच्या महिन्याच्या त्या तापत्या उन्हात दोन्ही सैन्यं वेळ मिळेल तेंव्हा भांडू लागली. गडावरून होण्याऱ्या तोफेचा मारा टाळण्यासाठी सिद्दीने आपल्या तोफा त्या पल्ल्याच्या बाहेरील बाजूस ठेवल्या. यामुळे गडावर मारा होईना पण नाकेबंदीला उपयोग होऊ लागला.

अधूनमधून गडावरून उतरून मावळी फौजा खालच्या सैन्यावर हल्ला करत. कडवा प्रतिकार होऊ लागताच परतून गडावर परत जात. यामागे शत्रुसैन्याला जरब बसवणे, त्यांच्या मनात भीती निर्माण करणे तसेच वेढयाची कमकुवत बाजू पाहून तिथे आघात करणे असे विचार असंत. याचबरोबर त्याचवेळी जर बाहेरील मदत मिळाली तर शत्रुसैन्याला मोठा धक्का देणे हा प्रयत्न असे.
मात्र सिद्धी जौहरने त्याच्या सरदारांवर अशी कडक नजर ठेवलेली की कुठेही कामचुकारपणा होत नव्हता. झालेल्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जात होते. त्यातच बाहेरून नेतोजी पालकर यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. त्यांना हताशपणे परतावे लागले. भक्कम वेढयामुळे राजे गडामध्ये कोंडले गेले.
याच दरम्यान आदिलशहाच्या सततच्या विनंत्यांना होकार देत बादशहा औरंगजेब यानं आपली मोठी फौज लहानसं स्वराज्य बुडवायला पाठवली. याचं नेतृत्व होतं त्याचा पराक्रमी मामा शाहिस्तेखान याच्याकडे. अशा तऱ्हेने मोठं संकट पुणे प्रांतावर आलेलं असताना राजे जास्त काळ अडकून पडणे धोकादायक होतं. त्यामुळे आता राजांना प्रतीक्षा होती पावसाची.
पन्हाळा, विशाळगड, गगनगड, आंबा –अणुस्कुरा घाट इ. प्रांतात कोकणासारखाच सुरुवातीचा पाऊस मुसळधार बरसतो. या पावसात जेंव्हा सिद्दीचा वेढा अस्ताव्यस्त होईल तेंव्हा काही नं काही प्रकारे आपण धडक देऊन इथून पलायन करू असं शिवरायांनी ठरवले.
मात्र....
एखादी जबरदस्त टोळधाड यावी तसा पाऊस परिसरात धुमाकूळ घालू लागला. तरीही सिद्दी जौहर जराही बिचकला नाही. तो शिवरायांच्या अपेक्षेपेक्षा हुषार निघाला. त्यांनं सगळ्याचा उत्तम बंदोबस्त करायचं नियोजन आधीच केलेलं. चौक्या, मेटे, लपायच्या जागा इ. सगळ्या ठिकाणी गवताची छप्परं उभी राहिली. तोफांना तेलपाणी केलं गेलं. जणू पाऊस पडतच नाहीये अशा थाटात वेढा सुरु राहिला.
त्यात भर म्हणून नवी समस्या उभी राहिली. सिद्दीच्या फौजेत लांब पल्ल्याची तोफ व ती चालवणारे टोपीकर इंग्रज दाखल झाले..!

त्याचे असे झाले की, आदिलशाही सैन्याला खबर मिळालेली की इंग्रजांकडे लांब पल्ल्याच्या तोफा येत आहेत. जागरूक सिद्दीच्या वकिलाने मग राजापूरच्या इंग्रजांना तोफा देण्याची मागणी केली.
काही काळापूर्वीच दाभोळ पट्ट्यात पोचलेल्या मराठी सैन्यानं इंग्रजांना धमकावलं होतं. कोकण प्रांतात व्यापार करण्यापूर्वी परवाने घेण्यास भाग पाडलेलं. इथल्या राजकारणापासून दूर राहण्याचं स्पष्ट सुचवलेलं. शिवरायांच्या वाढत्या हालचालींच्या धसक्याने इंग्रजांनी ते ऐकलेलं तेंव्हा. मात्र आता राजापूरच्या इंग्रज अधिकारी मंडळीनी असा विचार केला की, “ या पन्हाळ्याच्या वेढ्यात बहुदा शिवाजी कैद होईल व आपली भीती संपेल व शिवाजीचे सैन्य पुन्हा आपल्याला त्रास देऊ शकणार नाही”. तसेच यापुढे पुन्हा आदिलशहाला सामोरे जावे लागेल. मग त्यांना विरोध करणे, तोफा द्यायला नकार देणेही आपल्याला कसे परवडणार असा विचार करून हेनरी रेविन्गटन, गिफर्ड आदि मंडळी त्या लांब पल्ल्याच्या तोफांपैकी एक तोफ घेऊन पावसाच्या तोंडावर दाखल झाले. दुसरी तोफ पावसानंतर येणार होती.
ती तोफ दक्षिण बाजूस, चार दरवाजा ते तीन दरवाज्यासमोरच्या प्रमुख बाजूला नेमली गेली.
एक दिवस जेंव्हा ती तोफ गडावर मारा करू लागली. यामुळे गडाची सुरक्षा धोक्यात आली. हे पाहून शिवराय प्रचंड संतापले. विश्वासघातकी इंग्रजांना कायमची अद्दल घडवण्याचे तेंव्हा ठरवलंच. इंग्रज व्यापारी इथे व्यापार करण्यापुरते आलेले नाहीत हेच या प्रसंगातून दिसलं. त्यानंतर नेहमीच शिवरायांनी इंग्रजांना कठोर वागणूक दिली त्याचे मूळ या पन्हाळ्याच्या वेढ्यात होते..!
त्यातच पुण्यात पोचलेल्या मोगली सरदार शाहिस्तेखान याने थेट लालमहालात तळ ठोकला होता. सुमारे लाखभराची फौज घेऊन आता तो चाकणला भिडला होता. त्याचे सरदार इतरत्र स्वाऱ्या करत होते. अशावेळी राजांनी एका जागी अडकून पडणे जास्त धोकादायक होते. या सगळ्या परिस्थितीत आता निर्णायक काही करण्याची गरज निर्माण झाली.
निर्णायक परिस्थिती येते तेंव्हा जो वेगळा विचार करतो त्याचं नायकत्व इतिहासात ठसठशीतपणे अधोरेखित होतं. शिवराय त्यातलेच एक..!
शिवरायांनी वरकरणी निर्णय घेतला की सिद्दी जौहरला शरण जायचं. ती बातमी चहूकडे गडाखाली पसरेल याची निश्चिती केली. त्यानुसार पांढरे निशाण घेऊन वकील शत्रूच्या छावणीत वाटाघाटींसाठी पाठवला गेला.
आषाढसरी जोरदार बरसत असल्या तरी इंग्रजी महिन्यानुसार या जुलै महिन्यात रात्र मोठी असते. बऱ्यापैकी चंद्रप्रकाश असतो वातावरणात. त्यामुळे शत्रू सैन्यातील कमकुवत जागा हेरून तिथून पलायन करायचं हा अंतस्थ बेत पक्का केला गेला.
पश्चिम-नैऋत्यकडील पहारा तसा दोन चौक्यात अंतर राखून असलेला. कारण मसाई पठार व त्याखालील रान अशी अडचणीची भौगोलिक परिस्थिती. पळायचं शक्य झालं तर तिथूनच पळावे व विशाळगड किंवा रांगण्याकडे जावे अशी बातमी हेरांकडून कळलेली. रांगणा तसा दूर त्यामुळे इथून थेट विशाळगड गाठायला हवा हे नक्की ठरलं.
मात्र आजच्या पद्धतीनं सांगायचं तर हे अंतर सुमारे ५०-५५ किलोमीटर. त्यामुळे तेवढे अंतर झपाझप जाऊ शकतील अशी निवडक माणसे गोळा करायची आज्ञा झाली. काही महिन्यापूर्वी झालेल्या प्रतापगडच्या युद्धात बांदल-देशमुखांच्या तुकडीने मोठं काम केलेलं. बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली ती तुकडी गडावर सज्ज होतीच. मग ती ६-७०० लोकांची तुकडी शिवरायांसोबत जाईल व उर्वरित ५-६००० मंडळी गड लढवत राहतील हेही निश्चित झाले.
चाणक्य त्याच्या लेखनात म्हणतो की हातघाईच्या प्रसंगी राजाने आपली प्रतिरूपे चतुराईने वापरावीत. प्रसंगी वेशपालट करावा. या प्रसंगी नेमकं शिवाजीराजे तेच करताना आढळतात. खरंतर अफझल प्रसंगी सुद्धा असा सल्ला मिळालेला. पण ते शक्य नव्हतं.
याप्रसंगी खरा सलाम करायला हवा तो शिवा काशीद यांना..! 


आपण नक्की मारले जाणार हे माहित असूनही शिवा काशीद यांनी प्रति-शिवाजी बनायचं कबूल केलं. ते शिवरायांच्या सपोर्ट सर्विसेस मध्ये होते. राजासोबत त्यांची आन्हिके सांभाळणारे, कपडे सांभाळणारे, निरोपांची देवाण घेवाण करणारे असे जे काही विश्वासू कर्मचारी असतात त्यातीलच हे शिवा काशीद. 

मात्र त्यांनी सिद्दीच्या छावणीत विटा हे शस्त्र चालवले असे काही वाटत नाही. त्यांचा तोंडवळा शिवरायांसारखा होता हे एक कारण, व राजांसोबत राहिल्याने हावभाव, वर्तणूक यांची तोंडओळख होती म्हणून बहुदा त्यांची निवड केली गेली.
त्यांना एक गोष्ट स्पष्ट सांगितली गेली असावी, “की जेवढा वेळ घालवता येईल तितका घालवावा” म्हणजे त्या वेळात राजे जरा दूर पोचतील.

त्या दिवशी राजे पालखीतून गेले असं सर्वजण म्हणतात. पण या वाटेवरून काही वेळा चालून आल्यानंतर ते तितकसे योग्य नसावे असेच मला वाटते. ज्या वाटेवर पावसात, चिखलातून, ओढ्यातून नुसते चालणे आजदेखील जरा कठीण जाते तिथं पालखीतून जाणे जास्त जिकीरीचे व वेळकाढू आहे. त्यामुळे “राजे पालखीतून पळताहेत” हे सिद्ध व्हावे म्हणून शिवा काशीद नक्कीच ५०-६० माणसांसह पालखीतून मलकापूर मार्गे निघालेत. मात्र बाजीप्रभू व शिवरायांनी बहुदा वेष बदलून सामान्य मावळ्यांच्या वेषात आतल्या वाटेने पलायन केले असावे हे माझे मत.


राजे ज्या दिंडीतून बाहेर पडले तिथून खालपर्यंत आजदेखील झाडी आहे. त्यामुळे साधारण म्हाळुंगे मार्गे मसाई पठार गाठेपर्यंतच्या पुढच्या तासाभरात शत्रूला तसे काही कळणे कठीण होते.
तसेच जी तुकडी मलकापूर मार्गे जाणार, त्यांना त्या मार्गाजवळ असलेल्या शत्रूच्या चौकीतून अडवणूक होणार हे निश्चित होतं. त्याप्रमाणे झाली. व “शिवाजी पळून जात होता, आम्ही पकडला” ही बातमी त्वरीत छावणीभर झालीच.
 “आपल्या रणनीतीला यश आले, प्रत्यक्ष शिवाजी ताब्यात म्हणजे त्याचे अवघे राज्य ताब्यात” या भावनेत तो कदाचित १-२ दिवसासाठी निश्चिंत झाला असावा व त्यात ही बातमी..! सिद्दी जौहरची तर झोपच उडाली.
मात्र बातमी काळातच सर्व पहारे कठोरपणे तपासण्याचे फर्मान सुटले. म्हणजे पहारे असतील त्याच्या चौफेर १-२ मैलाचा प्रदेश बारकाईने पाहायचा असतो. ही तपासणी सुरु होईपर्यंत राजनसोबत असणारी ५-६०० जणांची तुकडी मसाई पठारावर पोचली असावी.
इकडे छावणीत सिद्दी सोबत फाझलखान, बाजी घोरपडे आदि शिवरायांना ओळखणाऱ्या सरदारांसोबत अन्य सैनिकही होतेच. त्यामुळे पकडला गेलेला माणूस शिवाजी नाही हे अल्पावधीत त्यांच्या लक्षात आले. शिवा काशीद व सोबत जे सैनिक होते ते धारातीर्थी पडले. या बलिदानाचे मोल अपार आहे...!
मात्र मरण्यापूर्वी बहुदा त्यातील कुणी सांगितले असावे की शिवराय वेगळ्या तुकडीसह विशाळगड कडे निघून गेलेत.
मग सिद्दी जौहर ने आपला कर्तबगार जावई सिद्दी मसूद याला २-२५०० च्या फौजेनिशी ताबडतोब पाठलागावर जायचा आदेश दिला. त्यात मुख्यत्वे हजारभर घोडदळ व उर्वरित पायदळ असावे.
सिद्दी मसूद मलकापूरच्या नेहमीच्या मार्गे निघाला.

दरम्यानच्या कालावधीत राजे व सोबत असणारे बांदल-तुकडीचे प्रमुख बाजीप्रभू देशपांडे मसाई पठार उतरून कुंभारवाडा, चापेवाडी, मांदलाईवाडी, करपेवाडी, आंबेवाडी, कळकवाडी, पाटेवाडी मार्गे विशाळगड कडे धावत होते. या मार्गे आज बहुसंख्य ट्रेक-मोहिमा दोन दिवसात अंतर पूर्ण करतात. तर काही अधिक तरबेज ट्रेकर्स हे अंतर एक दिवस किंवा एका रात्रीतही कापतात. त्यामुळे अधिक वेगाने हे सैन्य चालत-धावत गेले हे पटण्यासारखे आहे.



या वाटेवर आजदेखील फार कमी वस्ती आहे. तसेच एका बाजूला उंचावर मसाईचे पठार व पुढील डोंगर रांग आहे. तसंच परिसरातील झाडी अधिक भौगोलिक संरक्षण देते. त्यामुळे तरी रात्री १०-११ नंतर साधारण पाटेवाडी पर्यंत सुमारे ६ - ७ तास राजांच्या तुकडीने निर्धास्त वाटचाल केली असावी.

मग घोडदळ घेऊन येणाऱ्या सिद्दी मसूद च्या सैन्याची दूरवर चाहूल लागली असावी. किंवा त्याच्या सैन्याची ही घोडदळाची तुकडी शिरोळे –मालेवाडी या मार्गाने राजांच्या पाठलागावर पुढे आली असावी. राजांची तुकडी जी धावत होती, त्या मार्गावर राजांचे खबरे आधीच पोचले असावेत. त्यांनी मार्ग निर्धोक असल्याचं सांगितल्यावर तुकडी पुढे जात असावी. पाटेवाडी दरम्यान खबर पक्की झाली की शत्रूसैन्याची मोठी तुकडी मागावर आहे. मलकापूर कडून मुख्य मार्ग पाटेवाडी ते पांढरपाणी या दरम्यान या मार्गाला मिळतो. तेथे या तुकडीसोबत मुकाबला होईल. त्यामुळे होणारी निर्णायक लढाई पांढरपाणी ते गजापूर या पट्ट्यात होणार हे चित्र स्पष्ट झाले.

तिथे जी खलबतं झाली त्याविषयी इतिहास फारसे काही बोलत नाही. तो इतकंच सांगतो की, “बाजीप्रभू व फुलाजी प्रभू राजांना म्हणाले, “निम्मी तुकडी घेऊन विशाळगडला निघावं. तोपर्यंत पुढचे काही तास आम्ही शत्रूला या परिसरात रोखतो. विशाळगडी पोचताच इशाऱ्याची तोफ करावी  मग आम्ही त्वरेने तिकडे पोचू. काही अधिक उणे झालेच, साहेबकामी खस्त झालो तर सरकारातून कुटुंबाची जबाबदारी घेतली जाईल याचा भरवसा वाटतो. राजांनी अधिक वेळ न घालवता त्वरीत पुढे जावे.” यावर शिवराय म्हणाले, ” उत्तम. आम्ही गडावर पोचताच इशाऱ्याची तोफ डागतो. तुम्ही आपला जीव सांभाळून यावे.”

इथून विशाळगड गाठायला सुमारे ३ तास लागतात. त्यामुळे ३-४  तास शत्रू सैन्य रोखून धरणे मराठ्यांच्या तुकडीला तसे शक्य होतेच.
एव्हाना शत्रूच्या तुकड्या तिथे पोचल्या. हा सर्व भाग लहान-मोठ्या टेकड्यांनी, ओढे-ओघळीनी भरलेला आहे. त्याचा साहजिकच मावळी सैन्याला फायदा मिळाला व घोडदळाला फार काही करता येईना. त्यांना माघार घ्यावी लागली. यात किमान २ तास गेले असावेत. मावळी सैन्य सुद्धा कराराने लढले. मग बहुदा सैन्यानं घोडे बाजूला केले असावेत किंवा तोपर्यंत पायदळाचे सैन्य तिथवर पोचले असावे.
पायदळाचे सैन्य पोचताच गनिमाची ताकद वाढली व मराठ्यांना कडवा प्रतिकार होऊ लागला. बाजीप्रभूंची ही तुकडी हळूहळू नेहमीच्या पद्धतीने माघार घेत हल्ले करत होती. हे सगळे युध्द त्या एवढ्याश्या खिंडीत झाले नाही हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. तो सगळा ६-८ किमीचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यात हे युध्द झाले.
टप्प्याटप्प्याने मावळी सैन्य मागे रेटले जात होते. प्रत्येक मावळा जीवाची शर्थ करत होता. मारण्यापूर्वी गनीमाच्या किमान २-५ जणांना लोळवत होता. अत्यंत विजोड परिस्थितीत सर्वांनी रणकंदन माजवले होते कारण त्यांच्या लाडक्या राजांचा जीव वाचवायचा होता...!!
ज्या राज्यासाठी कोणत्याही अमिषाशिवाय लोकं स्वतः प्राणाहुती देतात तो राजा, ते राज्य व ती माणसे खरंच महान..!
आता मागच्या ३-४ तासातले युध्द अंतिम टप्प्यात आलेलं. हा टप्पा म्हणजे आता जो कासारी नदीचा धबधबा दाखवला जातो त्याच्या वरचा, त्या लहान दरीतला भाग. इथे वर हल्ली लहानसा बंधारा बांधलाय. याच दरीत मग शेवटचे घणाघाती युध्द झालं. ही दरीतील खिंड चढून वर गेलं की विशाळगड पर्यंत वेगाने जाता येतं. म्हणून इथेच मावळे शत्रूच्या वाटेवर उभे होते.
बाजीप्रभूंच्या सह अनेक जण घायाळ झालेले. मात्र लक्ष विशाळगडच्या संदेशाकडे होतं. तिथं काय चाललंय, राजांना पोचायला उशीर का झालाय याची त्यांना कल्पना नव्हती.
शेवटी अचानक तोफेचा आवाज वर डोंगरमाथ्यावर उभ्या, टेहळणी करणाऱ्या मावळ्यांनी ऐकला. इतरांनी मग पुढचे तोफेचे बार ऐकले. जखमेने भरलेलं शरीर थकले असले तरी इच्छाशक्तीच्या जोरावर लढणाऱ्या बाजींच्या तोंडचे शेवटचे शब्द होते, “ गनिमास खिंड चढो दिल्ही नाही...राजे मुजरा...”


सुमारे २५० मावळे व ७-८०० चं शत्रुसैन्य या युद्धात धारातीर्थी पडले असं काहीसं वाचलंय. म्हणजे प्रत्येक मावळ्याने मारण्यापूर्वी शत्रूच्या किमान तीन सैनिकांना कंठस्नान घातले होते..!
मग उरलेल्या मावळ्यांनी सहकार्यांची प्रेतं ताब्यात घेऊन रणक्षेत्रातून माघार घेतली. ते आडवाटेने जंगलात पळाले.
सिद्दी मसूद मग विशाळगडच्या वाटेला लागला.
या ५-६ तासात विशाळगडला दुसरं नाट्य घडलेलं. तिथे शिवराय पोचले सुमारे ३ तासात. तिथे आधीच सुर्वे व दळवी या आदिलशाहीला सामील झालेल्या कोकणातील सरदारांनी सिद्दी जौहर च्या सूचनेनुसार विशाळगड जिंकण्यासाठी कित्येक दिवस आधीच मोर्चे लावले होते. मात्र गडावर असलेल्या मोठ्या शिबंदीने त्यांना चोख उत्तर दिलेले.
आता प्रत्यक्ष शिवराय तिथे पोचले हे दिसताच गडावरचे सैन्य उत्साहाने तुटून पडले. मग तासाभरात त्या वेढ्याला उधळून लावत शिवराय गडात प्रवेशले... धावत गड चढणाऱ्या राजांनी पहिला आदेश दिला, “ तोफांचे बार करा..”
विशाळगडवर ती संध्याकाळ दोन मिश्र भावनांचा कल्लोळ घेऊन आली. राजे सुखरूप सुटले हे वर्तमान सर्वत्र आनंदाची लहर घेऊन पसरलं तर बांदलांच्या तुकडीने केलेल्या बलिदानाने सर्वांचे डोळे ओलावले. रात्री गडावर सर्वांचे मृतदेह आले. त्यावर इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. त्यावेळी राजांच्या मनात काय आले असेल हे इतिहासालाच ठाऊक..!
तिथवर पाठलाग करत आलेल्या सिद्दी मसूदच्या सैन्याने आता विशाळगडला वेढा दिला. पण आता वेळ गेली होती. तो वेढा घट्ट आवळण्यापूर्वीच मावळ्यांनी जोरदार हल्ले केले. मग सिद्दी जौहरने ते सैन्य माघारी बोलावले.
स्वराज्याचं एक ग्रहण सुटलं...!
मग कोकणात उतरून राजे त्वरेने राजगड कडे निघून गेले. शाहिस्तेखानच्या पारीपत्याच्या तयारीसाठी..!
------------------------------------------
यावेळी एक वेगळी गोष्ट राजगडच्या सदरेवर घडली.
एकदिवस राजे कान्होजी जेध्याना म्हणाले, “ नाईक, तुम्ही रागावणार नसाल तर एक विचारू का?”
जेधे म्हणाले, “ राजे विचारता काय, आज्ञा करा. तुम्ही सांगावं व आम्ही ऐकावं...”
राजे म्हणाले, “ बांदलांची एक पिढी या झुजात खस्त झाली. बांदलांच्या तुकडीने शर्थ केली.. मानाचे पहिले पान त्यांना द्यावं असं मनात आहे. तुमची हरकत नसेल तर देऊया का..?”
कान्होजी जेधे नाईक खरेच दिलदार..! जेंव्हा लहानमोठ्या मानपानासाठी तत्कालीन सरदार एकमेकांचे जीव घेत, तेंव्हा नाईकांनी क्षणार्धात आपल्या कमरेची ती मानाची तलवार काढली व राजांच्या हाती ठेवली..! भारावलेल्या राजांनी कान्होजीना गळामिठीत घेतलं. कान्होजींसाठी ती मिठीच लाखमोलाची होती..!! शेकडो मानाच्या तलवारी ओवाळून टाकाव्यात अशी..!
राजांनी मग बाजीप्रभू व अन्य लोकांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांची वास्तपुस्त केली. त्यांच्या चरितार्थाची सोय केली. अफझलखान मोहिमेसाठी बाहेर पडलेले राजे स्वतःही सुमारे ८-९ महिन्याने राजगडी परतले होते.
या ८-९ महिन्यात जिवावरची दोन धाडसे करून त्यांनी स्वराज्य विस्तारले होते. सह्याद्रीच्या कडेकपारीतील या लहानशा राज्याचे नाव आता दूर दूर अरबस्तानापर्यंत, युरोपपर्यंत पोचले होते..!
एकावेळी दोन शत्रू अंगावर घेण्यात शहाणपण नसते. हे ठाऊक असल्याने आदिलशहासोबत तह केला गेला.
प्रसंगानुरूप युद्धनीती कशी बदलावी लागते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही तीन युद्धे. तसेच आदिलशाहीसोबत केलेला तह हे उत्तम मुत्सद्दीपणा दर्शवते.
------------------------
आज या परिसरात दरवर्षी हौशी भटके, ट्रेकर्स व इतिहासप्रेमी येत असतात. मात्र हा उत्साह एक-दोन महिन्यापर्यंत असतो. काही संस्था या दुर्गम भागात वाडी-वस्त्यांवरील माणसांसाठी कार्यरत आहेत. त्यांना अधिकाधिक मदत मिळायला हवी. या परिसरात पाणी, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, आपत्कालीन व्यवस्था, प्रातर्विधी आदि मुलभूत गरजांसाठीच्या सोयी करायला हव्यात. ज्याचा स्थानिक ग्रामास्थानाही लाभ मिळू शकेल. आज विविध शहरीकरण, चंगळवाद, रिसोर्ट संस्कृती इथेही रुजायला सुरुवात झालीय. त्यामुळे हा परिसर मद्यपींचा अड्डा बनू नये यासाठी समाज व शासन पातळीवरील प्रयत्नांची गरज आहे.


या परिसरात पर्यटनास व त्यानुसार रोजगाराच्या संधींसाठी उत्तम वाव आहे मात्र ही रणभूमी, धारातीर्थ आहे याचा विसर पडता कामा नये.
दुर्दैवाने आता सर्वत्र गड-किल्ल्यांची, अन्य पर्यटनस्थळे यांची जी अवस्था आहे ती होता कामा नये.
जागच्या इतिहासात पावनखिंड प्रकरणासारखी युद्धे क्वचित घडली व जिथे घडली तिथे उत्तम स्मारके, तत्कालीन परिस्थितीनुसार बनवलेली पर्यटनस्थळे आहेत. त्याच धर्तीवर इथे काही घडावे अन्यथा काहीही न केलेले जास्त उत्तम. किमान ते निसर्ग सौंदर्य तरी डागाळता कामा नये असे वाटते.
-         -  सुधांशु नाईक, कोल्हापूर. ( +९१ ९८३३२९९७९१, ईमेल – nsudha19@gmail.com)

(आपल्या परिसरात ऐतिहासिक शिवाकालासंबंधी व्याख्याने आयोजित करून याबाबत अधिकाधिक जागृती करावी ही वाचकांना विनंती.)

1 comment:

  1. गिरीश वैशंपायन26 August 2016 at 17:35

    खरंच रिसॉर्ट संस्कृती इथेही आली तर वाट लागेल. या भूमीची किंमत राहिली पाहिजे. खूप छान लेख आहे.

    ReplyDelete