marathi blog vishwa

Monday 2 January 2017

शिवराय व युध्दनीती

शत्रू जेंव्हा कमकुवत असेल, बेसावध असेल तेंव्हा त्याचा पूर्ण नि:पात करावा असे कृष्ण व चाणक्य सांगतात. मात्र नंतरच्या काळात याचा पुरेपूर अवलंब कुणी केला असेल तर तो शिवरायांनी..! ज्या मंडळींनी शिवकालीन इतिहास वेळेअभावी पुरेसा वाचला नाहीये त्यांच्यासाठी हा लेख. चला जाणून घेऊ शिवकालीन युद्धनीतीविषयी...
“ कारतलाबखान व त्याचं सुमारे २५ हजाराचं सैन्य लोणावळ्यात दाखल झालं. इथून आता बोरघाट उतरलं की कोकणात पेण-खोपोली परीसातील शिवाजीच्या भागावर जोराचा हल्ला करायचा व त्याला नामोहरम करायचं हे खानाच्या सैन्याचे मनसुबे. शिवाजीला आपण बेसावध गाठायचं या विचाराने खानाने वेगळाच निर्णय घेतलेला.. तो कुरवंडा घाटाकडे वळला. खान असं ठरवतोय हे फार कमी लोकांना माहिती होतं. सैन्यात जराशी खळबळ माजली. पण सारे मग मुकाटपणे ती भयानक रानातील वाट चालू लागले...

सगळे घाट वाटेने उतरू लागले. तेवढ्यात दूर कुठेतरी हळूवार इशारे झाले. खाली कोकणातील वाट चढून एका विशिष्ट टप्प्यावर येऊन वाट पाहत असेलेले शिवबाराजे मग निर्धास्त झाले. लोहगड- कोरीगड परिसरातून नेताजी पालकर सावकाश अंतर ठेवून खानच्या मागे निघाले.. जे राजांना हवं होतं, जे गुप्तहेरांनी सांगितलं होतं तेच घडत होतं. मग सावकाश मराठी सैन्य अंबा नदीच्या त्या परिसरात आपापल्या जागा पकडून निवांत बसून राहिलं. प्रत्यक्ष शिवबाराजे चावणी किंवा छावणी नावाच्या गावाजवळ एका टेकडीच्या माथ्यावर थांबले.
खानाच्या त्या सैन्यात अवजड तोफा, दारुगोळा, खजिना, घोडे, उंट, तंबू, रोजच्या जेवणासाठीचे सामान असं किती न काय काय होतं. ते सैन्य घामाघूम होत निम्मी वाट उतरलं. मग तिथे अचानक शिवरायांचा वकील दाखल झाला. “ हा शिवरायांचा प्रदेश आहे. तुम्ही इथे चुकून आलेले दिसताय. कृपया परत जा.” असा संदेश दिला. मात्र तो धुडकावून सैन्य पुढे चालू लागलं.

एका विशिष्ट ठिकाणी ती मंडळी पोचताच मराठ्यांनी पहिला सणसणीत हल्ला केला. घनदाट जंगलात लढायचं आहे यामुळे नियोजनपूर्वक धनुष्यबाण, भाले, गोफण गुंडे अशा शस्त्रांनी शत्रूचा अचूक वेध घ्यायला सुरुवात केली. याउलट जंगलात लपलेले मावळे शत्रूला चट्कन दिसेनात, दिसले तर मारता येईना. एकच गोंधळ. काही मंडळी परत माघारी धाऊ लागली. त्याक्षणी मागे असलेली नेताजींच्या नेतृत्वाखालील तुकडी पुढे सरकली. त्यांनी घाटाची मागची बाजू बंद करून टाकली..!
मग कारतलाबखानाच्या सैन्यानं लढाई करायचा प्रयत्न केला. मात्र होणारे नुकसान खूप जास्त होते. शेवटी रायबाघनच्या सल्ल्यानुसार खान शिवरायांना शरण गेला. “अंगावरच्या कपड्यांशिवाय सर्व साहित्य आहे तिथेच सोडून आल्या वाटेने गुमान परत जायचं.” या अटीवर जीव वाचवून सर्व सैन्य परतलं. प्रचंड मोठे यश शिवरायांच्या अवघ्या २-३ हजारांच्या फौजेने मिळवलं...! त्याला कारण होतं शिवकालीन अचूक युद्धतंत्र.”
*******
“युद्धस्य कथा रम्य:” असं जरी म्हटलं असलं तरी शिवकालातील ही व अशी अनेक युध्दे अनुभवणे, अभ्यासणे हा फार फार वेगळा अनुभव आहे.

शिवाजी महाराज म्हटले की अनेकांना पट्कन गनिमी कावा हाच शब्द आठवतो. पण खरंच हे तंत्र शिवरायांनी निर्माण केले का? तर नाही हेच त्याचं खरं उत्तर.

“गनिमी कावा” याचे अभ्यासकांनी दोन अर्थ लावलेत. एक म्हणजे गानिमाने केलेला कावा किंवा शत्रू म्हणजे गनीम या अर्थाने गनिमाविरुध्द केलेला कावा. बहुतेकदा शिवाजीराजांना गनीम असं मोगली कागदपत्रे म्हणतात. व शिवरायांच्या कारवाया म्हणजे गनिमी कावा. त्याचबरोबर मोगली वा आदिलशाही सैन्य म्हणजे गनीम व शिवराय ज्या पद्धतीने त्यांना सामोरे जातात तो गनिमी कावा अशीच अनेकांची धारणा आहे.
तर काय आहे हे तंत्र? खरं म्हणजे याचं ठाशीव असं शास्त्र नाहीच. शत्रूला बेसावध ठेवून अचानक झडप घालणे व जास्तीत जास्त परिणाम साधणे म्हणजे हे तंत्र. मुळात या तंत्राचा उगम भारतात फार प्राचीन काळातला. पहिला संदर्भ चाणक्याच्या लेखनात सापडतो. चाणक्य त्याला “घात युध्द” असं म्हणतो.

पूर्वी शत्रूविरुध्द करायच्या विविध कारवाया असायच्या. अगदी विषकन्या वापरण्यापर्यंत अनेक पद्धतीने शत्रूला नामोहरम करायचे प्रयत्न होत असायचे. ते सारे घातयुध्दाचे भाग. शिवरायांनी जरी अगदी अत्यंत कपटी उपाय अवलंबले नाहीत तरी त्यांनी एका अर्थी कपटयुध्दाचा वापर केलाय असं म्हणायला हरकत नाही. मग शिवरायांनी युध्दात जे जास्त यश मिळवले त्याचं खरं कारण काय किंवा तंत्र काय?
ते समजून घेण्यासाठी थोडा त्यापूर्वीच्या काळाचा शोध घ्यायला हवा.

चाणक्य किंवा त्यापूर्वी जरी कृष्णानं कपटनीतीची ओळख करून दिली असली तरी मौर्यकालीन सम्राट अशोकानंतर मध्यंतरीच्या काळात नीतिमत्तेच्या कल्पना बदलत गेल्या. या दरम्यान उदयास आलेल्या जैन, बौध्द या धर्मानी व त्यामुळे काही प्रमाणात बदलेल्या हिंदूंनी इथल्या युद्ध्द नीती व राजकारण याच्या काही कल्पना बाजूला ठेवून माणुसकी व माणसाच्या आंतरिक मोठेपणासाठी, नातेसंबंधासाठी खूप काम केलं. त्यात मात्र अनेकजण त्यांचा लष्करी इतिहास, विविध युद्धनीती विसरून गेले. किंवा ते कपटी प्रकार, विविध धाडसी प्रकार वापरू नयेत अशी त्यांची धारणा बनली असावी. (अपवाद राजस्थान मधील सुरुवातीच्या काळात शूरवीर राणा सांगा यांनी परकीयांविरुद्ध केलेल्या लढाया, स्वातंत्र्याचे प्रयत्न व नंतर राणा प्रताप यांनी अकबराविरुद्ध जंगलातून केलेलं युध्द)
 तसेच या दरम्यान युध्दनीतीमध्ये विविध नव्या कल्पना आल्या ज्या इथल्या देशातील शेजारच्या राज्यातील शत्रूला डोळ्यासमोर ठेऊन केलेल्या होत्या. त्यातून मोठे गजदळ असणे, रथ असणे वगैरे गोष्टी वाढीस लागल्या होत्या. विविध कर्मकांडे वाढली. मोठमोठी साम्राज्यं आपापल्या चौकटीत रमली. मात्र त्याचवेळी युरोप व मध्य आशियात मात्र इस्लाम व ख्रिस्ती धर्मानी आक्रमण हा पाया ठरवत धर्म वाढवायचा प्रयत्न केला. त्यामुळे जेंव्हा हे आक्रमण भारतावर कोसळले तेंव्हा इथली मंडळी प्रतिकार तर जरूर करू गेली पण विशिष्ट संकल्पना कवटाळून बसल्याने पाचोळ्यासारखी उधळून लावली गेली.

त्याचवेळी राणा प्रताप सारखी काही मंडळी पारंपारिक युध्दात जरी हरली तरी “गनिमी कावा” प्रकारचे युध्द खेळत राहिली. बहामनी, मोगल, आदिलशाही, निजामशाही इत्यादी शाह्यांनी, त्यांच्या संस्थापकांनी, सरदारांनी परदेशात तसेच इथल्या भूगोलाचा पुरेपूर अभ्यास केला. त्यामुळेच घोडदळ हाच आपला मुख्य भाग बनवला व विजयाचा वारू धावता ठेवला. त्याच्या जोडीला कपटीपणा, विश्वासघात आदि गोष्टींचा उदारहस्ते वापर करत प्रजेच्या मनात भीती निर्माण केली. पूर्ण अंकुश प्रस्थापित केला.
या परिस्थिती महाराष्ट्र-कर्नाटक परिसरात शहाजीराजे व त्यांच्यासारखे काही शूर सरदार उदयास आले. त्यांनी अश्वदल किंवा घोडदळ किती परिणामकारक आहे हे जाणलं. खरंतर “यस्याश्वा तस्य राज्यं...” अशा प्रकारचा श्लोक आपल्या मंडळीना ठाऊक होता पण काही कारणामुळे ते सार ज्ञान विस्मृतीत गेलेलं.

ते सारं पुन्हा ताकदीने पुढे आणले ते शहाजीराजे यांनी. त्यामुळे त्यांच्या शौर्याची ख्याती त्याकाळी सर्वत्र पसरलेली होती. तोच वारसा पुढे शिवरायांना मिळाला.
१६४०-४१ मध्ये जेंव्हा शिवाबराजे व जिजाऊ बंगळूरहून पुणे जहागिरीकडे परतणार होत्या तेंव्हा त्यांच्या सोबत शहाजीराजांनी जी मंडळी दिली ती सर्व अत्यंत मोलाची माणसे होती. तत्पूर्वी पुण्यात जहागिरीचा सर्व अंमल व्यवस्थित बसला होता. दादोजी कोंडदेव जे मुख्यत: महसूल व न्यायप्रवीण होते त्यांनी निष्ठेने काम केलेलं. जिजाबाईंनी त्यावर बारीक नजर ठेवलेली. एक स्वप्न उदयाला येत होतं. त्यासाठी मिळाली ही मोलाची माणसे. त्यात होते शामराज नीलकंठ रांझेकर पेशवे, सोनोपंत डबीर, माणकोजी दहातोंडे, रघुनाथ बल्लाळ (अत्रे) सबनीस. या साऱ्यांच्या नंतर सुमारे १६५० मध्ये कान्होजी जेधे व दादोजी लोहोकरे शिवरायांकडे दाखल झाले.

या साऱ्या मंडळीनी आदिलशाही, निजामशाही, मोगल वगैरे सारं काही जवळून अनुभवलं होतें. त्यांना शहाजीराजांची स्वप्नं व पूर्वी झालेल्या काही चुका किंवा त्रुटी चांगल्या माहिती होत्या. यापेक्षा वेगळे काय करता येईल याचे काही आराखडे डोक्यात होते, गरज होती एका तडफदार नायकाची. जो स्वतःच्या ताकदीवर ते विचार, तो अभ्यास प्रत्यक्षात आणून दाखवेल...आणि त्यांना शिवराय दिसले...!
या सुमारे १५-२० वर्षाच्या काळात शिवरायांनी नक्कीच आपल्या इतिहासाचा अभ्यास केलेला होता. आपल्या वर्तमानाचा अभ्यास केलेला होता. आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या, शत्रूच्या मनोवृत्तीचा अभ्यास केलेला होता आणि ज्या परिसरात आपण वाढतोय त्या भूगोलाचा बारीक अभ्यास केलेला होता.

या साऱ्यांचा परिपाक म्हणजे शिवरायांनी वापरलेली युद्धनीती.

“परिस्थितीनुसार उपलब्ध भूगोलाचा जास्तीत जास्त चांगला वापर करून, घोडदळ व पायदळाच्या केलेल्या वेगवान व सुनियोजित हालचाली” म्हणजेच शिवरायांचे युध्दतंत्र...! ज्याला निष्ठावान सहकार्यांची अपूर्व साथ मिळाली व एक न विसरणारा इतिहास निर्माण झाला. शिवरायांच्या यशस्वी युद्धतंत्रात पुढील काही गोष्टी महत्वाच्या ठरतात.

घोडदळ :- शहाजीराजांनी प्रेमाने घोडदळ वाढवले. ते उत्तम अश्वरोहण करत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या अनेक सरदारांना खास तयार केले होते. माणकोजी दहातोंडे हे स्वराज्याचे पहिले सरनोबत, शिवरायांच्या पहिल्या मोहिमेत ज्यांनी प्राण गमावले ते बाजीकाका पासलकर व कान्होजी नाईक जेधे त्यांच्याच तालमीत मोठे झालेले. हे सारे शिवरायांना लाभले. त्यांच्या हाताखाली नवीन फळी तयार झाली. नेतोजी पालकर, सूर्याजी काकडे, दोरोजी, रघुनाथ बल्लाळ, मोरोपंत, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, आनंदराव आदि शूर साथीदारांच्या असीम शौर्यामुळे शत्रूला दहशत वाटू लागली. घोडदळाच्या अशा सतत वेगवान व सुनियंत्रित हालचाली यापूर्वी फारशा कुणीच केल्या नव्हत्या. त्यामुळे शिवरायांचा दरारा फार वेगाने वाढला.

पायदळ:- हा प्रकार जरी जुना असला तरी महाराष्ट्राच्या भूगोलाचा, इथल्या घाटवाटा, जंगलं, दुर्ग, नद्या, सागर किनारे या सगळ्यातून सहज हालचाल करायला पायदळी सैन्य अत्यावश्यक होतेच. शत्रू सैन्याला अंदाज तर लागला नाही पाहिजे मात्र आपल्या सैन्याला आधीच जागा निश्चित करता येण्यासाठी, शत्रूच्या वेढ्यातून वेगाने वाट काढत गडकोट गाठण्यासाठी, मुख्य लढाईवेळी सतत रसद पुरवठा करण्यासाठी उत्तम पायदळ फार गरजेचे असते.

बांदल, शिळीमकर, देशमुख आदि निष्ठावान मंडळींच्या तुकड्या, शिवरायांनी वेचून निवडलेली बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी, येसाजी कंक यांनी पायदळाची गरज उत्तम रित्या पार पाडली. त्याचबरोबर घाट-वाटा तयार करणे, गुप्त वाटा झाकून ठेवणे आदि कामेही याच तुकड्यांची कामगिरी. पायदळाला मुख्यत्वे शिवरायांच्या काळात घोडदलाच्या हालचालींशी जोडले गेले. त्यासाठी खूप काटेकोर नियोजन  केले गेले. त्यामुळे काही अपवाद वगळता गोंधळाचे प्रसंग कधीच आले नाहीत.
नियोजन हा शिवकालीन युध्दाचा प्राण. आणि सांगितलेली काम निष्ठेने तडीस नेणारी माणसे हीच त्यांची आयुधे होती. जेंव्हा नियोजनात अधिक धोके असत तिथे स्वतः आघाडीवर राहण्याचा आत्मविश्वास शिवरायांना देवत्व देऊन गेला असं नक्कीच म्हणता येईल.

हेरखाते व संदेश वहन – अतिशय कार्यक्षम हेरखाते असणे ही कोणत्याही राज्याची अत्यंत महत्वाची गरज असते. यादवकालीन रामदेवराय आदि राजांनी याकडे पुरेसे लक्ष दिले नाही. मात्र शिवरायांनी ही चूक केली नाही. विश्वासराव मोसेगावकर, बहिर्जी नाईक आदि मंडळींच्या नेतृत्वाखाली उत्तम हेरखाते तयार झाले. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या शिवकालीन हेरांची नावेही आपल्याला माहिती नाहीत, यावरूनच या कामाच्या यशस्वी गुप्ततेची जाणीव होते.
हे हेरखाते इतके कार्यक्षम होते की शत्रूच्या गोटातील प्रत्येक लहानसहान बातमीसोबत आपल्या सैन्यातील, गडांवरील बातम्याही त्वरेने शिवरायांना पोहोचवत. कोंढाणा किल्ल्यावर काही फितुरीची शक्यता आहे अशी बातमी मिळताच शिवरायांनी त्वरेने हालचाली केल्याचे ऐतिहासिक कागदपत्रात वाचायला मिळते. तसेच अगदी दिल्ली, आग्र्यापासून विविध प्रांतात काय सुरु आहे हेही वेळच्यावेळी कळत असे. हे संपूर्ण खाते शिवरायांनी कायमच स्वतःच्या थेट कंट्रोलमध्ये ठेवले होते. त्याचबरोबर जिजाबाई, मोरोपंत, सरनोबत आदि मंडळींना अहवाल पाठवणारी हेर मंडळीही होतीच. शिवरायांच्या अनुपस्थितीतही हेरखात्याने कायमच अचूक माहिती दिली. त्यामुळे प्रत्येकवेळी अचूक युद्धनीती आखणे जमू शकले.

हेरखात्यातील एखाद्या हेराने मिळवलेली उत्तम माहिती शेकडो किलोमीटर दूर पोचवणे हे संदेशवहनाचे किती कठीण काम होते याचा आपण अंदाज करू शकतो. त्याकाळी आजच्यासारखी वाहने नव्हती. रस्ते नव्हते. टेलिफोन, मोबाईल वगैरे संपर्काची साधने नव्हती. वाटेत चोर, दरोडेखोर, जंगलं व वन्य प्राणी, शत्रू सैन्य, साथीचे आजार असे अनेक अडथळे असायचे. तरीही सर्व बातम्या अत्यंत अचूकतेने योग्य वेळी जीवाच्या कराराने पोचवल्या जात. हातघाईच्या प्रसंगी गडावरून पांढरा किंवा काळा धूर करणे, आग पेटवणे, मशालींचे संकेत करणे, तोफांचे बार करणे असे प्रकार धूर्तपणे केले जात. संदेशवहन करण्यासाठी गुप्तभाषा ( code language ) वापरली जाई. म्हणूनच सुरतेचा खजिना कुठे आहे हे कळले. तो खजिना आणायला कसे जायचे व तो कोणत्या मार्गाने सुरक्षित परत आणता येईल याचे नियोजन करता आले.
शिवकालातील सर्व लढायांच्या यशाचे निम्मे श्रेय या हेरखात्याला आहे यात शंकाच नाही. शत्रूच्या हालचालींबाबतच्या माहितीसोबतच ज्या राजाला आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, काय घडणार आहे हे माहिती नसते तो राजा जास्त काळ राजेपद उपभोगू शकत नाही असं प्राचीन ग्रंथात लिहिलं आहे ते योग्य आहेच व शिवकाळात सर्वांना ते ठाऊक होतं असे अभिमानाने म्हणावेसे वाटते.

शस्त्रास्त्रं व उत्तम प्रतीचं युध्द साहित्य- भारत-चीन युद्धाचा ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना ही गोष्ट किती महत्वाची आहे हे नक्कीच कळले असेल. जेंव्हा शिवबाराजे लहानशा सैन्याबरोबर पहिल्या लढाया करत होते तेंव्हाही उत्तम शस्त्रास्त्रे कशी मिळतील याचा ध्यास घेतला होता... हीच गोष्ट स्वतंत्र भारताच्या नेतृत्वाला समजली नाही व सैन्याचे सक्षमीकरण, आधुनिकीकरण करण्याकडे आपण एकेकाळी अक्षम्य दुर्लक्ष्य होते. मात्र शिवकाळातला इतिहास पाहताना उत्तम शस्त्रांसाठी आसुसलेले शिवराय पाहून खूप समाधान वाटते. शिवरायांनी स्थानीक व्यापारी मंडळीसोबत इंग्रज, पोर्तुगीज, डच आदि परकीय व्यापारी मंडळींकडून उत्तम तांबे, पितळ, लोखंड, शिसं अशा धातूंची नेहमीच खरेदी केली. त्यातून तोफा ओतण्याचे कारखाने उभे केले. तलवारी, भाले, बरच्या, बाण, कट्यारी, जंबिये आदि शस्त्रास्त्रे बनवण्यासाठी शिकलगार मंडळीना प्रोत्साहन दिले. लोहार, सुतार, पाथरवट, चांभार, शिंपी आदि बलुतेदार मंडळीचा वापर करून घेत शस्त्रांव्यातिरिक्त उत्तमोत्तम सामान तयार करून घेतले. घोड्यासाठी उत्तम खोगीर, जास्तीत जास्त टिकावू असे लष्करी तंबू, तोफा फिरवण्यासाठीचे गाडे, गडांची दारे, दिंड्यादरवाजे, कोठारांसाठी लागणारे सारे साहित्य हे याच मातीतल्या सामान्य माणसाने बनवले आहे. या साऱ्यांच्या रक्षणासाठी अत्यंत अडचणीच्या जागीही उभी केलेली व ३-४ शतके टिकली ती इथली तटबंदी, बुरुज निर्माण करताना जी उच्च गुणवत्ता दाखवली गेली त्याला तोड नाही. हल्ली ज्याला quality control म्हणतात ते शिवकाळातील कित्येक निरक्षर लोकांनीही दाखवून दिलं आहे. आणि तेही कित्येकदा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न बाळगता. त्यामुळेच प्रत्यक्ष रणमैदानात वीर लढू शकले याची नोंद न घेणं हा त्या निर्मिक लोकांवर अन्याय ठरेल.

रसद पुरवठा व मदत करणाऱ्या तुकड्या- या तुकड्यांचे काम प्रत्यक्ष युध्दात भाग घेणाऱ्या सैनिकाइतकेच मोलाचे आहे. कारण मगाशी उल्लेख केलं ते साहित्य नुसतं निर्माण करून जर योग्य वेळी योग्य ठिकाणी पोचलं नाही तर युद्धं जिंकणं कठीण होऊ शकतं याची जाणीव शिवकाळात होती व त्यानुसार सर्व आखणी केली जाई. प्रधान, अमात्य, सचिव, मंत्री या मंडळीकडे याबाबतचे विविध अधिकार असायचे. हेरखात्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कामाचे नियोजन केले जाई. प्रत्येक गडांवर पुरेशी रसद आहे का, तोफा, दारुगोळा आहे का अशा विविध गोष्टींचा पाठपुरावा केला जाई. गडाचे हवालदार, सबनीस, तटरक्षक इत्यादी मंडळींमार्फत सर्व सामानसुमानाची नीट निगराणी केली जाई. एका सुईपासून खजिन्यापर्यंत प्रत्येक गोष्ट जीवापाड जपली जाई. हेरखात्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लढाईसाठी सज्जता केली जाई. हे एकप्रकारचे micro management होते. ज्याचा अंतिम कंट्रोल शिवरायांच्या हाती असे. त्यामुळेच समजा कुठे कुचराई झालीच तर शिवरायांच्या बारीक नजरेतून ती कदापीही सुटत नसे.
प्रभावळीच्या सुभेदाराला, कुडाळच्या सुभेदाराला, चिपळूणच्या छावणीतील सरकारकुनाला, सिंधुदुर्ग बांधणीवेळी लिहिलेल्या विविध पत्रातून शिवरायांचे “बारीक लक्ष कसे होते” हे ठसठशीतपणे समोर येते.

हे सर्व काम अत्यंत उचित अशा time management मध्ये बांधले असायचे की त्यात शक्यतो कधीच कुचराई होत नसे. म्हणूनच ऐन युद्धाच्या धामधुमीत पुरंदरवर दारुगोळा पोचता केला जातो, आग्र्याला शिवराय कैदेत असतानाही सिंधुदुर्गचे बांधकाम सुरु राहते..!

माघारीचे किंवा जीवन बचावाचे धोरण – लढाईला सैनिक उभा राहिला की तो त्या रणावेशात असा भारून जातो की वेळ पडल्यास माघार घेण्याचेही भान त्याला राहत नाही. तसेच जर सेनाधिकारी असा भान हरवून लढत राहिला की सैन्यालाही पळता येत नसे. मग शेकडो लोक आपल्या प्राणाला मुकत. शिवकाळात नेमकी ही गोष्ट शिवरायांनी टाळली. त्यांची प्रत्येक किल्लेदाराला सक्त सूचना असे की “ जीवात जीव असेपर्यंत गड भांडता ठेवावा. मात्र पराभवाची शक्यता दिसताच सर्वांचा जीव वाचवावा.” त्याचबरोबर छापा घालायला गेलेल्या सैन्याच्या तुकड्यांनाही प्रसंगी झटपट माघार घेण्याच्या सक्त सूचना असायच्या. शत्रूला घाबरून सोडणे, आपल्याविषयी दरारा वाटायला भाग पाडणे हाच मराठी आक्रमणाचा मुख्य उद्देश असे ज्याचे भान लहानमोठ्या सरदारांकडून राखले जाई. (अपवाद प्रतापराव गुजर यांचे प्रकरण).

कित्येक युध्दात प्रत्यक्ष शिवराय स्वतः आघाडीवर असायचे. मात्र तरीही त्यांच्यासह कोणत्याही सैनिकास कुटुंबकबिला जवळ बाळगता येत नसे. त्यामुळे ऐन युध्दात वेगवान हालचाली होत. प्रसंगी पलायन केल्याने जीवितहानी कमीतकमी होई. इतकेच नव्हे तर बहुतेक वेळा महत्वाच्या लोकांना त्यांचा कुटुंबकबिला सुरक्षित स्थळी ठेवून मग लढाईला जाण्यासाठी सूचना दिल्या जात. ( संदर्भ- सर्जेराव जेधे यांना लिहिलेलं पत्र) लढाईत समजा एखादा वीर कमी आला तर त्याच्या घराचा खर्च सांभाळला जाई. त्यांच्या मुलाचे शिक्षण, घरातल्यांचा चरितार्थ याची काळजी घेतली जाई.
ही अशी धोरणे  असल्याने सैनिक शिवरायांविषयी प्रीती बाळगे. त्यांच्यासाठी जीवावर उदार होऊन युध्दात सहभागी होई. युद्धाच्या मानसशास्त्रानुसार जेंव्हा सध्या सैनिकापासून सेनापतीपर्यंत सारे एकविचाराने राजासाठी लढतात तेंव्हा युद्धातील विजयाची शक्यता जास्तीत जास्त असते..!

शिवकालातील प्रत्येक महत्वाची लढाई अभ्यासताना या काही मुद्द्यांचे संदर्भ इतके सातत्याने व झगझगीतपणे समोर येतात की आपण स्तिमित होऊन जातो. आजही शिवकालातील शेकडो कागदपत्रे नीट पाहिली गेली नाहीयेत. मात्र जे काही उपलब्ध आहे त्यातून समोर येणाऱ्या इतिहासातून अखंड स्वराज्याचा ध्यास घेतलेल्या शिवबाराजांचे जे चित्र समोर उभे राहते ते फार फार मनोरम आहे.
एकेकाळी हेच सारं पाहून शंभूराजेना “शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप...” वगैरे लिहिणारे समर्थ त्याचं पत्रात “राज्यस्थापनेची लगबग केली कैसी...” असं लिहूनच जातात..!

आपल्या आयुष्यातील जवळपास ७५ टक्के आयुष्य घोड्यावरून मोहिमा करणाऱ्या शिवरायांना अभ्यासताना आपलेही बाहू स्फुरण पाऊ लागतात, आपल्या समोरच्या अडचणी लहान वाटू लागतात. धास्तावलेलं, थकलेलं मन पुन्हा उमेदीने भारून येतं. खरंच शिव-चरित्राचे ऋण न फिटणारेच आहे.

- सुधांशु नाईक, कोल्हापूर. ( +९१ ९८३३२९९७९१, ईमेल – nsudha19@gmail.com)

- ( आपल्या परिसरात ऐतिहासिक शिवकालासंबंधी व्याख्याने आयोजित करून याबाबत अधिकाधिक जागृती करावी ही वाचकांना विनंती.)

No comments:

Post a Comment