marathi blog vishwa

Wednesday 30 August 2017

सह्याद्रीतील अनोखी प्रयोगभूमी

🍂
भारतातलं सामाजिक व भौगोलिक वैविध्य इतकं आहे की एका ठिकाणी यशस्वी झालेला प्रयोग दुसरीकडे राबवता येईलच याची शाश्वती नाही व राबवलाच तर यशस्वी होईल याची खात्री नाही. हे अन्य कार्यकर्त्यांप्रमाणेच  मंडळींना ठाऊक होतं. त्यामुळे आपल्या अडचणींवर आपणच उपाय शोधत पुढे जायचं तत्व अनुसरुन कामाला सुरुवात झाली. त्यातूनच एक नवी प्रयोगभूमी लवकरच निर्माण होणार होती..!

कोयना ते चिपळूण हा घाटमाथा ते पायथ्यापर्यंतचा प्रवास डोळ्यांना नेहमीच अवर्णनीय सुख देत रहातो. त्यात पावसाळ्यातले दिवस म्हणजे सगळीकडे घनदाट हिरवाई. एक कुंभार्ली घाटाची वाट व किरकोळ रस्ते सोडले तर सारं काही झाडी झुडुपात दडून गेलेलं असतं.

घाटाची दहाबारा वळणं ओलांडत खाली उतरलं की हवेतला गच्च दमटपणा लगेच जाणवू लागतोच.
घाट संपवून खाली उतरल्यानंतर जरा गाडी बाजूला थांबवून मागे पाहिलं की दिसते सह्याद्रीची उभी कातळभिंत. माथ्यावरचा जंगली जयगड धुक्यातून मधूनच डोकावतो. काही विशिष्ट ठिकाणाहून जर धुकं नसेल वासोटा, नागेश्वर, चकदेव आदि गिरीशिखरं अधूनमधून दर्शन देतात.

या सगळ्या पर्वतरांगा, त्यांच्या खालपर्यंत उतरलेल्या सोंडा व त्यातल्या द-याखो-यात इथली खरी स्थानिक प्रजा अनेक दशकं रहातेय. तीही लहानसहान झोपडी किंवा झापांतून.

ते आहेत गवळी- धनगर आणि कातकरी.

प्राचीन काळी कधीतरी घाटवाटांच्या संरक्षणासाठी, व्यापारी तांड्याना मदत करताना ही मंडळी इथं स्थिरावली. कोणत्याही शहरी सुविधांचा फारसा लाभ यांच्या अनेक पिढ्यांना फारसा कधीच लाभला नाही. इथं मुलं जन्माला येत राहिली, गुरंढोरं व वन्य प्राण्यांच्या साथीनं जगत मरत राहिली. क्वचित कुणी शिक्षणाची वाट चालू लागला तर दारिद्र्यानं त्याची पाऊलं रोखली.


इथल्या मुलांचं शिक्षण हाच मुख्य विषय डोक्यात ठेवून मग " श्रमिक सहयोग" या संघटनेचं काम सुरु झालं. राष्ट्र सेवादलाचे संस्कार रक्तात भिनवलेली ही मंडळी. सानेगुरुजी, एस एम जोशी, ना. ग. गोरे, प्रधान सर आदि मंडळींचं शिक्षणविषयक तत्वज्ञान " साधना"तून व अन्य प्रकारे तनामनात झिरपलेलं होतंच. त्याला आता अनुभवाची जोड मिळू लागली.

भारतातलं सामाजिक व भौगोलिक वैविध्य इतकं आहे की एका ठिकाणी यशस्वी झालेला प्रयोग दुसरीकडे राबवता येईलच याची शाश्वती नाही व राबवलाच तर यशस्वी होईल याची खात्री नाही. हे अन्य कार्यकर्त्यांप्रमाणेच याही मंडळींना ठाऊक होतं. त्यामुळे आपल्या अडचणींवर आपणच उपाय शोधत पुढे जायचं तत्व अनुसरुन कामाला सुरुवात झाली. त्यातूनच एक नवी प्रयोगभूमी लवकरच निर्माण होणार होती..!

संस्थेच्या उभारणीत सुमारे तीस वर्षांपूर्वी सहभागी असलेल्या राजन इंदुलकर यांच्याशी बोलताना मग हा सारा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहू लागतो.

आजही कोळकेवाडी, ओमळी, अडरे, अनारी, तिवरे, कळकवणे, धामणंद, चोरवणे या सा-या पट्ट्यात वाहतुकीची मर्यादित साधनं उपलब्ध आहेत मग 30 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी.

जिथं रोजचं तेल मीठ आणायलाही कित्येक मैल चालून जावं लागे, कुणाच्या घरी, शेतात दिवसभर  गड्यासारखं राबावं लागे तेव्हा कुठे दोन चार दिवस पोट भरेल इतके तांदूळ मिळत. रानातलंच काहीतरी शिजवून खायचं याचीही पोटाला सवय झालेली.

रोज जगणं व पोट भरणं हेच इतकं संघर्षपूर्ण होतं की शिक्षणबिक्षण यासाठी वेळ कुठून आणायचा?
त्यातही जवळच्या गावात जास्तीत जास्त चौथीपर्यंतची शाळा. तिथंही विविध अडचणी.

 त्यातही ते चारभिंतीतलं शिक्षण या रानोरानी हिंडणा-या कातक-यांसाठी अगदीच निरुपयोगी होतं. झाडांवरचा मध कसा काढायचा, फळं कशी काढायची, घर शाकारणी कशी करायची, गाईगुरांना रोग होऊ नये म्हणून काय करायचं, लहानसहान आजारावर कोणतं अौषध द्यायचं याचं कोणतंही शिक्षण त्या शाळेत मिळत नव्हतं.

या सा-यांसाठी मग श्रमिक सहयोग कष्ट करु लागलं. अनेक धनगरवाडे, वस्त्यांमधे कुणीतरी एखादा शिक्षक पोचू लागला. कधी काही डोंगर चालत ओलांडावे लागायचे तर कधी अनगड डोंगरधारेवरुन खडा चढ चढून जावं लागे. इतके श्रम करुन तिथं पोचावं तर मुलं बापासोबत डोंगरात काही कामाला गेलेली असायची.

1992 ते 2004 या काळात तरीही संस्थेनं एकदोन नव्हे तर तब्बल 26 शाळा आडवाटेवर विविध ठिकाणी चालवल्या. मुलांना शिकवतांनाच तिथलं जीवन, त्यांचं राहणीमान, भाषा, जगण्यासाठीचे आडाखे याची नोंद घेण्यात आली.
या कामात सर दोराबजी ट्रस्ट, इंडो जर्मन सोशल सर्व्हिस सोसायटी, सेव्ह द चिल्ड्रन कॅनडा आदि संस्थांचंही सहकार्य मिळालं.

या सगळ्या मदतीतून सह्याद्रीच्या उभ्या कड्याच्या पायथ्याशी व कोळकेवाडी जलाशयाच्या पिछाडीस ( कोयनेचं पाणी वीज निर्मितीनंतर डोंगराच्या पोटातून याच जलाशयात येतं. पुन्हा त्यावर वीजनिर्मिती होते व मग ते वाशिष्ठी नदीत सोडलं जातं.) सुमारे 17 एकर जागा ताब्यात आली.


आणि इथे सुरु झालं एक प्रामाणिक कार्य. तीच ही प्रयोगभूमी.

राजन इंदुलकर, मंगेश मोहिते व त्यांचे सहकारी गेली 10-12 वर्षे इथं एक आगळीवेगळी निवासी शाळा चालवत आहेत. कातकरी, गवळी-धनगर आदि वनवासी मंडळींची सुमारे 30 - 40 मुलं सध्या इथं रहाताहेत.

सकाळी त्यांचा दिवस नेहमीप्रमाणे सुरु होतो. शालेय शिक्षण व विविध खेळ खेळतानाच त्यांना जंगलांची जोपासना कशी करायची, शेती कशी करायची, पाणी जपून कसं वापरायचं आदि जीवनावश्यक गोष्टींचंही शिक्षण मिळतं. जगण्यासाठीची कौशल्यं विकसित करायचं शिक्षण मिळवतानाच संगीत, गायन, चित्रकला आदि छंदांचंही शिक्षण मिळतं. मुलं मस्त आनंदात शिकत रहातात.

या प्रकल्पाच्या सुरुवातीला कोल्हापूरच्या शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांनी अर्थसहाय्य दिलं. मुलांच्या गरजा ओळखून आवश्यक तशी इमारत उभी राहिली. रत्नागिरी, पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर आदि जिल्ह्यांतूनही काही ना काही मदत मिळत गेली. त्यातून संस्थेचं काम सुरु राहिलंय.

यापुढेही इथं बरंच काही घडवायची या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र विविध साधनं, त्यासाठीचे पैसे हे सारं कमी पडतंय.
शेकडो हातांच्या मदतीची त्यांना गरज आहेच. जेव्हा मुंबई पुण्यात एकेका मुलाच्या शिक्षणासाठी वर्षाला दीड दोन लाख रुपये सहज खर्च केले जातात, त्याचवेळी प्रयोगभूमीतील निवासी शिक्षणव्यवस्थेत 30-40 मुलांचा दरमहाचा खर्च सुमारे 70 हजारांपर्यंत जातोच. केवळ लोकांच्या सहकार्यानेच हा प्रकल्प कार्यरत आहे व यापुढेही कार्यरत राहिला हवा.

इथल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, त्यांना काही स्वयंरोजगार करता यावा यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे करायला हवा. आपला घरसंसार सांभाळून, चैन व मौजेच्या सर्व मोहांना बाजूला करत जी मंडळी इथं निरंतर राबताहेत त्यांना मनोमन सलाम करावासा वाटतो.

त्यांचं काम पुढे जोमाने वाढावं व या दुर्गम आदिवासी मुलांनाही सुखाचे चार क्षण मिळावेत म्हणून शहरांतील अनेकांनी या संस्थेला भेट द्यायलाच हवी. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. त्यानंतर मग जमेल तशी मदतही करायला हवी. तीच एक उत्तम देवपूजा व तेच अतिशय पवित्र असं काम ठरेल हे निश्चित.

आज देशविकासाचं आवाहन सर्व स्तरांवरुन होत असताना गावोगावी,  दुर्गम ठिकाणी राहणा-या, साध्यासुध्या  सोयींपासूनही वंचित असलेल्या  आपल्या अशा  देशबांधवांना मदत केली तर हीच सगळ्यात मोठी देव, देश अन् धर्मसेवा ठरेल असं मला वाटतं. तुम्हांला ?

- सुधांशु नाईक ( nsudha19@gmail.com) 🌿

सर्व वाचकांनी जरुर भेट द्यावी म्हणून संस्थेचा पत्ता, कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर पुढे देत आहे.

संस्थेचा पत्ता :-
प्रयोगभूमी, कोळकेवाडी, कोयना प्रकल्पाच्या  चौथ्या टप्प्याजवळ, ता. चिपळूण.

श्रमिक सहयोग कार्यालय:-
मु. पो. सती चिंचघरी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. - 415604.

फोन - 02355- 256004, 256027

मोबाईल - 9423047620.

ईमेल - shramik2@rediffmail.com

( नोंद - संस्थेला देणगी दिल्यास कलम 80 G अंतर्गत आयकर सवलत उपलब्ध आहे. )

No comments:

Post a Comment