marathi blog vishwa

Tuesday, 19 December 2017

‘थांग’च्या निमित्ताने...


# KIFF- कोल्हापूर फिल्म फेस्टिवलमध्ये “थांग” (QUEST) हा अमोल पालेकर दिग्दर्शित चित्रपट दाखवला गेला. खरंतर हा २००६ ला बनलेला चित्रपट. हा विषय आता जुना झालाय. गेल्या दहा वर्षात जगात प्रचंड उलथापालथ झालीय. पण खरंच मानवी नातेसंबंध, ज्यांना विकृती मानलं गेलं असे संबंध आणि एकूण समाजातील परस्परांविषयीचा समंजसपणा याविषयी आजही अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. किंबहुना अधिक तीव्रतेने यापुढे आणि समोर येणार आहेत. 
लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या नव्या गोष्टी या दशकात वेगाने पुढे आल्या आहेत. त्यापेक्षाही वेगळंच जग भविष्यात असणार आहे. त्यांना सामोरे जायला आपण सारे तयार आहोत का असं प्रश्न मला पडला. त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर मनात अतिशय खळबळ माजली. आपलेच विचार पुन्हा तपासून पाहावेत असं वाटून गेलं. त्या खळबळीतून मग लिहायला घेतलं. 

हा चित्रपट मुळातच प्रौढांसाठीचा आहे, तेंव्हा लेखात त्या अनुषंगाने लिहिणं अपरिहार्य आहे. ज्यांना असलं काही वाचायची इच्छा नाही त्यांनी, तसेच संस्कृतीरक्षक मंडळीनीही हा लेख न वाचता टाकून दिला तर हरकत नाही. मात्र जर वाचला तर नंतर तुमचं मत जरूर मांडा, ते कुणाला आवडतं का नाही त्याचा विचार करत बसू नका. आपले विचार व्यक्त करता येणे हे महत्वाचं... 



थांग. संध्या गोखले यांनी लिहिलेल्या कथेवर आधारलेला. संध्याबाई आणि अमोल पालेकर या दांपत्याने २००६ मध्ये निर्माण केलेला हा चित्रपट. समलिंगी संबंध ही गोष्ट २००० पर्यंत उघडपणे चर्चिली न जाणारी. त्यानंतर आता होमो, लेस्बिअन हे सारं सर्वांनाच ठाऊक झालंय. त्यापुढील पायरी म्हणजे उभयलिंगी संबंध. जे या चित्रपटातून समोर येतात. खरंतर हा दहा वर्षापूर्वीचा चित्रपट नवं काही देतो असं आज म्हणता येत नाही. फक्त समाजातील विविध प्रश्नांवर नव्याने विचार करायला उद्युक्त मात्र करतो.

चित्रपटाची कथा थोडक्यात अशी;
ती आणि तो एक सुखी कुटुंब. सई आणि आदित्य. दोघेही मोठ्या पदावर काम करतायत. त्याचे वडील विचारी आहेत. तिची आई समजूतदार आहे. लग्नाला ११-१२ वर्षं झालीयेत. ७-८ वर्षांचा गुणी मुलगा आहे. ही पार्श्वभूमी. सिनेमाच्या सुरुवातीलाच घडलेला प्रसंग तिला धक्का देऊन जातो.
ती एकदिवस अचानक लवकर घरी येते. बेडरूममध्ये पहाते तर तिचा नवरा आणि त्या दोघांचा जुना, घनिष्ठ मित्र –उदय हे “लैंगिक संबंधा”त गुंतलेले.
ती नखशिखांत हादरते. ती वकील आहे. जग पाहिलंय तिनं. तरीही गेली दोन-अडीच वर्षं हे संबंध सुरु आहेत हे कळल्यावर जो जबरदस्त धक्का बसतो त्यामुळे अतिशय त्रागा करत राहते.
तिच्या नवऱ्याची अवस्थाही नाजूक. आपला मित्र गे आहे हे त्याला पूर्वी माहिती होतं. त्याने आयुष्यात प्रचंड दुःखं भोगली आहेत हेही माहिती असतं. हे तिघेही एकत्र कार्यक्रम करायचे. मात्र उदयचा पूर्वीचा पार्टनर परदेशी कायमचा निघून गेल्यावर आपण त्याच्या जागी कसे जाऊन पोचलो हे त्यालाही कळत नाही. एकाच वेळी आदित्यचं बायकोवर अतिशय प्रेम आहे आणि उदयवर देखील... तो कुणालाच तोडू शकत नाहीये... जोपर्यंत हे माहिती नव्हतं तोपर्यंत तो निश्चिंत होता आणि आता दोघांकडूनही नाकारलं जाणे त्याला झेपणारं नाहीये. तिला त्याचं हतबल होऊन जाणे समजते.
त्याला नेमकं कुणाबरोबर राहायचं आहे याचा निर्णय शांतपणे घेता यावा म्हणून ती त्याला मुक्त करते. आपल्यामुळे आपल्याच जिवलग मित्राचा संसार तुटतोय हे कळून तो मित्रही त्याला सोडून निघून जातो आणि आदित्यची फार हालत होते. समाजातील त्याच्यासोबत काम करणारी माणसेही त्याला फार वाईट वागवतात. त्याचा बॉससुद्धा त्याला घाणेरडे कृत्य करायला लावतो. मग तो देश सोडून दुसरीकडे जाऊन काम करू पाहतो.
या दरम्यान एक छोटी कथा घडते..एका एड्सग्रस्त माणसाच्या मुलाला त्याच्या शाळेनं बाहेर हाकलायचं ठरवलेलं असतं. त्या केसमध्ये सई लढते. अशा माणसाला उलट मदतीची गरज आहे, उपेक्षेची नव्हे हे ठामपणे सांगते. मुलाला न्याय मिळवून देते. मग तिलाप्रश्न पडतो की तिच्या आयुष्यात तिचं कृत्य चुकलं का? तिनं आदित्यला आधार दिला असता तर? त्याला मानसिक गोंधळातून बाहेर पडायला मदत केली असती तर... 
 याचवेळी परदेशी एकटा पडलेला तो- आदित्य तुटतो. आत्महत्येचा प्रयत्न करतो. त्याचे वडील त्याला त्यातून वाचवतात. तीही मदतीला पुन्हा धावून येते. त्यांचा मित्र उदय, आता एड्सग्रस्त संस्था स्थापन करून एक सकारात्मक काम करत असतो. सई त्याचा शोध घेते. त्याला भेटते. सगळं घडलेलं सांगते. आणि आपण दोघांनी उध्वस्त होऊ पाहणारे आदित्यचे आयुष्य सावरायला हवं असं सूचित करते.
शक्यतो या विषयावरील चित्रपट शोकात्म बनलेले असताना हा चित्रपट सकारात्मक शेवट सूचित करतो. प्रेक्षकांना पुढे काय घडलं, घडावं याबद्दल विचार करायला सोडून देतो....

मृणाल कुलकर्णी ही अफाट अभिनेत्री आहे, हे ती पुन्हा सईच्या भूमिकेतून सिद्ध करतेच. सोबतचे सर्व नामवंत कलाकार आपल्या पदरी पडलेली भूमिका पार पाडून दाखवतात. खरं तर सचिन खेडेकर, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी यांना फारसं कामच नाहीये. लेखिकेने त्यांना तुलनेनं किरकोळ रोल दिलेत. त्यांच्याऐवजी दुसरं कुणीही चाललं असतं असं वाटण्याइतपत. अपवाद विजया मेहता यांची भूमिका. विजयाबाईनी तिच्या आईची लहानशी भूमिका सुरेख उभी केलीय. त्यांना पहिल्यांदा जेंव्हा “हे” कळते तेंव्हा त्या अतिशय अस्वस्थ होतात. मनातील खळबळ चेहेऱ्यावर न दाखवायचा प्रयत्न करतात. चालत खिडकीपाशी जातात. म्हणतात, “ हिच्या वडिलांना एकदा मी विचारलेलं त्यांच्या बाहेरच्या नात्यांविषयी. ते ताड्कन म्हणालेले की खलाशाची प्रत्येक बंदरात एक बायको असतेच. कुणाकुणाचे हिशोब ठेवायचे...??” विजयाबाई हे सांगताना आणि आपल्यापेक्षा काहीतरी भयंकर पोरीच्या नशिबी आलंय हे कळल्यावर जो अभिनय करतात तो केवळ अद्वितीय...!’


सिनेमा तसा तुकड्यातुकड्यातून पुढे सरकत जातो. अनेकदा स्वतः काही भाष्य न करता प्रेक्षकांना विचार करायला मोकळं सोडतो. त्यामुळे सर्वांनाच तो भावत नाही. पटत नाही. सध्या अशा विषयावर चित्रपट आणला की प्रसिद्धी व पैसा मिळतो असंही वाटू शकते कित्येकांना. मात्र या चित्रपटाला दिलेली treetment पैसा मिळवण्यासाठी आहे असं मला वाटत नाही. सिनेमा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे विचार करा असंच सांगतो. आज विचार मांडणे, मतभेद समजून घेणे आणि समोरच्याला स्वीकारणे हे सारं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. २००६ मध्ये बनलेला सिनेमा आज मर्यादित वाटतो, कुचकामी मात्र वाटत नाही. तो पाहताना आज बदललेल्या अनेक गोष्टी मला विचारप्रवृत्त करून गेल्या....
आता पाहू या...
मला काय वाटतं ?
स्त्री-पुरुष संबंध, कुटुंब व्यवस्था, नात्यातल्या गुंतागुंती, मानवाचं विविध प्रसंगी असणारं वर्तन हे सारं मानसशास्त्राशी संबंधित. मला मानसशास्त्र या विषयाचं फार आकर्षण. त्यामुळे सहजच खूप वाचत गेलो. या लेखातील विषयापुरतेच बोलायचे तर “ भारतीय विवाह संस्थेचा इतिहास” या इतिहासाचार्य राजवाडे यांच्या संशोधनात्मक अफलातून पुस्तकापासून, abnormal psychology विषयावरील पुस्तकांपर्यंत विविध लोकांचं लेखन यानिमित्त वाचत गेलोय. शशांक सामक, शांता साठे, राजेंद्र बर्वे, आनंद नाडकर्णी या मंडळींनी या क्षेत्रात महाराष्ट्रात उदंड काम केलं आहे. तरीही हा विषय आपल्याला पुरता आकळला आहे का हा प्रश्नच आहे. २००२ ते २००५ आम्ही “तरुण भारत” कोल्हापूरच्या “स्त्रीविषयक पुरवणी” च्या माध्यमातून विविध लेख, मेळावे, व्याख्यानं आदि स्त्री-जागृतीसाठीचे उपक्रम करत होतो. तेंव्हापासून आजपर्यंत परिस्थिती फार बदललीय असं मात्र वाटत नाही.
नुकतंच २०१६ मध्ये लोकसत्ता पुरवणीत “स्त्री- आणि पुरुष” अनेक प्रसंगी वेगवेगळे का वागतात, लैंगिक संबंध आणि वर्तन  आदिविषयी २०१६ मध्ये डॉ. शशांक सामक यांनी लिहिलेली “ कामस्वास्थ” ही लेखमाला विशेष लक्षात राहिलेली. ती सर्वांनी पुनःपुन्हा वाचायला हवी. खरंतर या नाजूक विषयावर भारतीय प्राचीन संस्कृतीतील ग्रंथानइतक्या मोकळेपणाने अन्य कुणी यावर गेल्या काही शतकांपर्यंत लिहिलं नव्हतं. १९ व्या शतकात पाश्चात्य संशोधक पुढे सरसावले. सिग्मंत फ़्रोइड, जॉन्सन आदिनी मग उदंड काम केलं. आपण आजचे भारतीय मात्र या विषयाबद्दल अजूनही बरेच अनभिज्ञ आहोत, आपापले पूर्वग्रह जपणारे आहोत. “सेक्स” हा शब्दसुद्धा सहजपणे उच्चारणं आपल्याला जमत नाही. त्यापुढील गोष्टी तर दूर की बात.
---
मी जंगलात हिंडणारा. प्राणी-पक्षांच्यावर प्रेम करणारा. त्यामुळे प्राणी, पक्षी यांचं कामजीवनही सहज पाहिलेलं. त्यामुळे मग प्राणी-माणूस यांच्यातील तुलनाही केली. प्राणी कधी बलात्कार करत नाहीत असं ठासून यापूर्वी बोललो देखील होतो. ते खरं असलं तरी म्हणून माणूस असं का वागतो याचं उत्तर मात्र मिळत नाही.
आजकाल पूर्वीपेक्षा माणसे मोकळी देखील झाली आहेत. किमान लहान ग्रुपमधून चर्चा करू लागली आहेत. त्यात तंत्रज्ञान प्रगत झालंय. अनेक गोष्टी एका क्लिकवर आता आपल्याला दिसतात. त्या योग्य असतात की अयोग्य हा भाग वेगळा. मात्र त्या आपल्या मनावर परिणाम करणाऱ्या जरूर असतात. हे सर्व टाळता न येणारं आहे. मग आपलं मन कसं ताब्यात ठेवायचं हा भाग महत्वाचा बनू लागतो. प्राण्यांचा मेंदू आणि आपला मेंदू यात हा फरक असावा. मादी मिळावी म्हणून नर परस्परांत भांडतात. प्रसंगी जीव देखील घेतात. मात्र मादीवर शक्यतो बलात्कार करत नाहीत. (बलात्कार प्राण्यांच्यातही क्वचित घडतात, त्याची कारणंही वेगळी असतात.).
प्राणी मादीशी अनैसर्गिक संबंध ठेवत नाहीत. विकृतपणे कामेच्छा भागवून घेत नाहीत. पैसा, प्रतिष्ठा असे लोभ त्यांना नसतात. त्यामुळे हुंडाबळी, ऑनर किलिंग सारखे प्रकार करत नाहीत. त्याचवेळी अनेकदा माघार घेतलेला नर पुन्हा त्या दोघांच्या समागमात अडसर आणत नाही. तो कट-कारस्थान करून मादीला बळकावत नाही. तिला तिच्या मर्जीने जाऊ देतो.
मात्र माणूस असं वागत नाही. का वागत नाही? फक्त सेक्स नव्हे तर अन्य गोष्टीबाबतही माणूस अनेकदा अनाकलनीय वर्तन करतो. त्यावेळी तो पद, प्रतिष्ठा, परंपरा, कुटुंब असा कोणताही विचार करत नाही. कधी ती बाई असते तर कधी पुरुष. हे असं का घडतं हे शोधू गेलं की समोर येतात मेंदूतील केमिकल लोचे. विविध ग्रंथीतून स्त्रवणारी संप्रेरके आपल्याला असं काही करायला भाग पाडतात. सामान्यतः आपण “आपल्या दृष्टीने वाईट वागलेल्या” माणसाला शिव्याशाप देतो. ओरडतो, मारतो, संबंध तोडून टाकतो. वर म्हणतोही हा किती नरपशू आहे..!! पण पशू असे नसतात हे कळतच नाही.
अगदी आदिवासी समाजात देखील अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा आहेत. मात्र बहुतेकदा तिथे समलैंगिकता का दिसून येत नाही? हाही प्रश्न मला अस्वस्थ करतो. (माझ्या वाचनात आदिवासींच्या जीवनात असं काही असल्याचे आढळलेले नाही.)
मात्र कैदी, सैनिक अशा लोकांमध्ये समलिंगी संबंध घडल्याचे अनेकदा वाचायला पूर्वी मिळाले आहे. थोडक्यात जिथे नेहमीसारख्या स्त्री-पुरुष संबंधांची शक्यता नाही तिथे असं घडणं समजून घेता येतं. मात्र कामभावना तृप्तीचे सगळे नेहमीचे मार्ग उपलब्ध असताना माणूस (स्त्री आणि पुरुषही) का असं वेगळंच वागतो हा प्रश्न पडतो मला. तसा तो अनेकांना बहुदा पडत असावा. म्हणूनच या सगळ्याच्या मुळाशी जाणारे संशोधन अनेक वर्षं सुरु आहे पण तरीही सर्वमान्य असे कोणतेही ठोकताळे बांधता आले नाहीत.
या सिनेमातील सिच्युएशन विचारात घेतली तर, सुखी कुटुंब आहे. अगदी त्यांचे शारीरिक संबंध देखील सुखाचे आहेत तरीही त्या माणसाला एका पुरुषाचं आकर्षण का वाटतं ?? हा मूळ प्रश्न आहे. तो अस्वस्थ करणारा आहे. विवाहित स्त्रीला परपुरुषाचे किंवा पुरुषाला अन्य स्त्रीचे आकर्षण वाटणे, त्यांचे संबंध असणे ही गोष्ट एकेकाळी सहज स्वीकारली गेलेली. नंतर त्यावर बंदी आणली गेली. विविध नियमात लैंगिकता बांधली गेली. तर आता कुठे लोक हल्ली कुचकुचत का होईना जोडीदाराचे असे संबंध स्वीकारू लागलेत. शहरांपेक्षा गावागावातून पतीच्या बाहेरख्यालीपणाचा असा स्वीकार (acceptance) जास्त सहजपणे झालेला दिसतो. तसं स्त्रीच्या बाबत मात्र घडत नाही. तिलाच बदफैली ठरवायची समाज घाई करतो.
प्रश्न शिक्षेचा नाही, स्वीकार किंवा अस्वीकार करण्याचा नाही तर ते आकर्षण मुळात का वाटतं हा आहे. याचा धांडोळा घेतला तर मेंदूतील केमिकल लोचे, नर-मादीच्या आदिम भावना सामोऱ्या येतात.
समोर स्त्री पाहिली की तिच्या विशिष्ट अवयवांकडे पुरुषांचं सर्वप्रथम लक्ष जाणं हे स्वाभाविकच असतं कारण त्याच्या मेंदूची रचनाच तशी असते. स्त्री मात्र असा विचार नेहमीच करत नाही. समोर आलेल्या पुरुषातील अन्य क्वालिटी ती पहाते. पुरुषांचं प्रथम वर्तन जरी एकवेळ मान्य केलं तरी दिसेल ती स्त्री आपल्यासोबत बेडवर आलीच पाहिजे हा अनेकांना वाटणारा विचार आणि त्यासाठी घडणारी बलात्कारासारखी कृती हा मात्र अत्यंत चुकीचा मार्ग आहे. तिथे समस्या आहे.
तो विचार मेंदूत कसा येऊन बसला याचा मागोवा घेतला तर मग आपण संगोपन, संस्कार, आजूबाजूची परिस्थिती आदि मुद्द्यांकडे येऊन पोचतो. घरातले, शेजारचे लोक एखाद्या परस्त्रीकडे कोणत्या नजरेने पाहतात हे जेंव्हा लहान मूल / युवक  आजूबाजूला पहात असतो तेंव्हा ते तसा विचार करायला प्रवृत्त होऊ शकतात. तसेच सर्व काही ठीक असताना नंतरच्या आयुष्यात त्याच्या लैंगिक जाणीवा सकारण-अकारण दडपल्या गेल्या असतील तर तो विकृत विचाराला प्रवृत्त होऊ शकतो. मुळात स्त्रीवर लैंगिक अत्याचार करणं हा तिच्यावर अधिकार गाजवण्याचा एक भाग असतो. तसं पाहायला गेलं तर पुरुष हा लैंगिक संबंधाबाबत परावलंबी आहे. स्त्री त्याला सहज प्रतिसाद देईल असं टेक्निकली होत नाही. त्याने तिचा अनुनय करणे, तिला फुलवत नेणे अपेक्षित असते. मात्र वर्षानुवर्षे झालेल्या संस्कारामुळे स्त्रीचा अनुनय करणं त्याला मानहानीकारक वाटतं. “मी म्हणतो तसं आणि तेच तू केलं पाहिजे” या पुरुषप्रधान मानसिकतेमुळे सगळीच गोची होऊन जाते. आणि म्हणून मुलींना स्व-संरक्षण, लैंगिक शिक्षण देण्यापेक्षा मुलांना “स्त्री सोबत कसं वागले पाहिजे?” याचं शिक्षण देण्याची आता गरज आहे.
सामान्य स्त्री-पुरुष संबंधातच इतक्या समस्या आहेत की त्यावेगळया गोष्टींबाबत बोलणं मग बाजूला पडते नेहमी.
मुळात विवाहित स्त्री आणि पुरुषातील संबंध हीसुद्धा आपल्यासाठी फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. विविध सर्वेक्षणांचे निष्कर्ष, महिला दक्षता समिती, स्त्री सहायक संघटना यांच्यासमोर इतक्या घृणास्पद गोष्टी येतात की आपली तर मतीच गुंग होऊन जाते. मध्यंतरी एक घटना अशीच घडलेली की, एका पतीने रागाच्या भरात एक झाडू पत्नीच्या गुप्तांगात घातला. ती त्यातून शेवटी मेलीच. काय सोसलं असेल तिनं? पण तरीही तिनं सुरुवातीला तक्रार दाखल केली नाही. हे ऐकलं की मन थरकापून उठतं.
कित्येकदा लग्नाच्या बायका देखील त्यांच्या इच्छेविरुद्ध नवऱ्याकडूनच भोगल्या जातात. त्यांनी याविरुध्द ब्र उच्चारला की जवळच्या, वयाने ज्येष्ठ बायका देखील त्यांना “नवरा आहे बाई...सगळं सगळं सहन करायचं..” असं सांगून गप्प करतात...! मुळात सेक्स आणि त्यातून मिळणारं समाधान ही मेंदूत घडणारी घटना आहे, आपली इंद्रिये ही केवळ एक टूल / साधन आहेत हेच लोकांना कळत नाही. म्हणूनच मग विविध तेलांच्या जाहिराती, जास्त वेळ संबंध ठेवता यावीत म्हणून संप्रेरके असं काही न काही बाजारात येत जातं. खपवलं जातं. दोन माणसांची मने जुळली की शरीर जुळणं ही सहज घडलेली प्रक्रिया असायला हवी हेच लोकांना उमगत नाही. त्या जुळण्यासाठी कोणतंही बंधन असता कामा नये हे जितकं खरं तितकंच विकत घेऊन किंवा जबरदस्तीने संबंध घडता कामा नये हे देखील खरं. लग्न करून दिलं की आपली जबाबदारी संपली असं मानणारी आपली संस्कृती जितकी याबाबत वरवर पहाते तितकंच स्त्री म्हणजे एक भोगवस्तू हेही पुनःपुन्हा ठासून सांगत राहते.
त्यामुळे समलैंगिक संबंध हा त्यानंतरचा भाग मग अधिकच गुंतागुंतीचा बनतो.
समलैंगिकता किंवा अन्य प्रकार हे विकृती मानावेत का याविषयी बरंच चर्चा-चर्वण समाजात होत आहे. “ह्या घाणेरड्या विषयावर बोलता तरी कसं हो??” इथपासून विषय टाळण्याकडे झुकणारा समाज आता चर्चा, संमेलन, मोर्चे, चित्रपट, पुस्तकं या द्वारे किमान व्यक्त होऊ पाहतोय, बोललेलं ऐकायचा प्रयत्न करतोय  हे एक चांगलं लक्षण म्हणायला हवं का?. मुळात जगभरातील सर्व जाती-धर्माच्या, परंपरेच्या लोकांमध्ये सामान्य स्त्री-पुरुष संबंधाव्यातिरिक्त अन्य संबंध असतात / होते  हे आता जगमान्य आहे. ते तसे असावेत का? हा संघर्षाचा मुद्दा आहे.

मुंबईच्या ट्रेन मध्ये लहान मुलांना कुरवाळणारी, अन्य पुरुषांच्याच अंगचटीला जाणारी काही सामान्य माणसं मी पाहिलेली. एकाला तर लोकानी पकडून पोलिसाकडे दिलं. सगळे शिव्या देत असताना पोलिसांनी त्याला स्टेशनवर खूप मारलेलं. कुठल्यातरी ऑफिसमधला तो साधा कारकून असावा. कसं असेल त्याचं खाजगी जीवन? त्याच्या नैसर्गिक कामभावनांची तो का घरी तृप्ती करू शकला नसेल? मग वेश्यागमन करण्याऐवजी असे विकृत चाळे का गुपचूप करत असेल? असे प्रश्न मनात निर्माण झालेले. ते कुणाला विचारायचं धाडस तेंव्हा नव्हतं. आताही अशा गोष्टीवर कुणाशी आपण चर्चा करू शकतो?? असेच  अन्य काही जण पाहिलेले. त्यात अविवाहित होते पण नीट संसार असणारेदेखील होते. अविवाहित माणसाची, पौगंडावस्थेतील मुलांची कुचंबणा एकवेळ समजून घेता येईल. पण विवाहित माणूस असं कसं वागू शकतो हे पाहून धक्का बसलेला तेंव्हा.
आता जाणवतंय की अनेक गोष्टी खरंच आपल्या हातात नसतात. आपला मेंदू एखाद्या क्षणी फार वेगळा वागू शकतो याची आपल्याला कल्पना असायला हवी. ती आपण केलेली नसते. आपल्या मेंदूनं कसं वागावं याचं कितीही शिक्षण आपण दिलं तरी काही आडाखे बांधणे इतकंच आपण करू शकतो. जेंव्हा घटना समोर येते तेंव्हा आकांडतांडव करणं, मारहाण करणं अशी जी प्रतिक्रिया दिली जाते ती चुकीची असते. अशा प्रसंगी आवश्यक असतं समुपदेशन. अत्यंत तज्ञ व्यक्तीने शांतपणे केलेलं. ते मात्र आपण करत नाही. अनेकदा हे प्रसंग भल्यामोठ्या पहाडासारखे समोर उभे ठाकतात आणि आपली मतीच गुंग होऊन जाते. आपण त्यात अधिक कोलमडत जातो.
मुळात चूक काय आणि बरोबर काय हे नेहमी आपण आपल्या सोयीने ठरवत असतो असं मला वाटतं. कधी ती वैयक्तिक सोय असते, कधी कौटुंबिक तर कधी सामाजिक. मात्र “त्या” व्यक्तीला काय वाटतं याचकडे आपण दुर्लक्ष करतो. खरंतर तिचं मत हे प्राधान्यक्रमात असलं पाहिजे. एखाद्या मुलीला एखाद्या घरी नांदायचं नाहीये तरी तिला तिथेच जबरदस्तीने ठेवणं हे जितकं अनावश्यक आहे तितकंच एखाद्या मुलीला तिच्या मित्रासोबतची मैत्री जपू देणं, अगदी शरीरसंबंध ठेऊ देणं आवश्यक आहे. त्या मुलीला जे वाटतं ते तिला करता यायला हवं. ते चूक आहे का बरोबर हे तिला आज नाही तर उद्या उमगेल. तेंव्हा तिचे निर्णय तिला घेऊ देत. मात्र आपण असं करत नाही.
लहान वयापासून सतत आपण मुलांना “हे कर/ हे करू नको..” असंच शिकवत जातो. तिथून चुकांची मालिका सुरु होते. अगदी लग्नानंतर एकत्र राहणाऱ्या जोडप्यातील किती नवरे स्त्रीच्या संमतीनंतर समागम करतात? त्या समागमानंतर कितीजण स्त्रीला “सुख” मिळालं का याचा विचार करतात. तिच्याशी हळुवार संवाद साधतात?? मला वाटतं काही मोजकीच माणसं असं करत असतील. आपली वासना भागली की बास अशीच आपली पुरुषी मानसिकता. शेकडो वर्षांपासूनची.
एका बाईला देखील माणूस म्हणून जाणीवा आहेत याचाच आजदेखील आपण विचार करणार नसू तर आपण प्रगत झालो असं कसं म्हणायचं? हातात मोबाईल आले, हाय क्वालिटीच्या पोर्न फिल्म पाहता येऊ लागल्या, अनेक नवनवीन साधनं वापरता यायला लागली म्हणजे प्रगती समजायची का? याच लेखात वर म्हटलं तसं, आपण पुन्हा एकदा लैंगिक संबंध हे “विशिष्ट अवयवांपुरते” असतात हेच तर गृहीत धरतोय की मग. मेंदूतली सुखद संवेदना कुठं राहिली मग?? परस्परपूरक सुखद संबंधांचा कधी विचार करणार आपण? त्यात पुन्हा अनेक चुकीच्या गोष्टी सतत मीडियातून पाहून “स्त्रीला असंच वाटत असणार”, “हे असं केलं की तिला चालतं” वगैरे चुकीचे ठोकताळे वर्षानुवर्षे आपण उराशी धरून बसलोयच. हे कधी बदलणार?
आपण प्रगत न होता उलट मागास होत तर नाही ना चाललोय? अशी भीती मग वाटू लागते.
मुळात स्त्री चूक की बरोबर, भिन्नलिंगी आकर्षण हेच उत्तम असं ठोक विचार यापुढे करून चालणार नाहीये. प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकाची समस्या / वर्तन वेगळंच असू शकतं हे आता समजून घ्यायला हवं. त्या व्यक्तीला निरोगी जगता यायला हवं, त्याच्या वर्तनातून समाजाला त्रास होणार नसेल तर त्याला जसं वाटेल तसं जगता यायला हवं हे महत्वाचे आहे.
आज जगातल्या केवळ ८६ देशात समलैंगिकता आणि अन्य गोष्टी स्वीकारल्या गेल्या नाहीयेत. त्यात आपण आहोतच. मात्र उर्वरित जग केंव्हाच पुढच्या नियोजनाला लागलंय. मुक्त वातावरणामुळे लोक आता किमान व्यक्त होऊ शकतील. ते स्वातंत्र्य त्यांना आणि महिलांना गेल्या हजार वर्षात नव्हतंच. विविध आरोग्य सुविधा, समुपदेशन सुविधा, दडपणरहित जीवन अशा साठी काम करू लागलेत. सध्याची कुटुंबव्यवस्था हा भाग तर हळूहळू सर्वत्र इतिहासजमाच होत राहील असं वाटतं. त्याऐवजी विविध लहान कम्युनिटीज तयार होतील. आपल्याला जिथं सुखी, सुरक्षित वाटतं तिथं एकत्र येण्याची मानसिकता वाढेल. जात-धर्म-पंथ-प्रांत आदि वर आधारित कम्युनिटीज तिथं असतीलच पण एक-पालकत्व निभावणारे, लिव-इन-रिलेशनशिप वाले, समलैंगिक, उभयलिंगी, अखंड ब्रह्मचारी राहणारे अशा विविध ग्रुपमधून समाज पुढे सरकत राहील. माणूस नव्या वाटा शोधत राहील. कधी चुकेल कधी पुढे जाईल.
हा सगळा काळ ताण-तणावाचाच असणार आहे. त्यामुळेच मानसशास्त्रातील विविध शाखांवर नवे संशोधन करावे लागेल. नवे परिणाम समोर आले तर त्यानुसार बदल करून घ्यावे लागतील. अभ्यासपूर्ण समुपदेशन अल्प खर्चात उपलब्ध करून द्यावं लागेल. त्यामुळे वर्तनसमस्यांकडे वैज्ञानिकदृष्ट्या पाहता येईल.
भारतीय जीवनशैलीतील त्रुटींमुळे अर्थातच त्रास भोगण्यात पुन्हा महिलाच केंद्रस्थानी येऊ शकतात. त्यासाठी तसेच भिन्न वर्तनशैलीमुळे स्त्रीचे शोषण होऊ नये यासाठी जास्त काम करावे लागणार आहे.
तुम्ही होमो आहात, लेस्बो आहात की बाय सेक्सुअल हा भाग तुमच्या बेडरूमपुरता उरला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या लैंगिक गरजा, कुणाचही शोषण करून भागवत नसाल तर ते समाजानेही स्वीकारायला हवं.  तुमच्या आवडीनिवडीचा समाज चालत राहण्यावर परिणाम होता कामा नये हे स्वीकारायला हवं. एकेकाळी अनेकजण जे स्वतःला कोसत असतील, आपण विकृत आहोत असं समजत असतील, त्यांचे गुण बाजूला ठेवून जर जीवन व्यतित केलं असेल तर त्यांना आता मोकळेपणाने समोर येता येईल. आपली करियरची स्वप्नं पूर्ण करायला धडपडता येईल.
काहीच चूक नसतं आणि काहीच बरोबर नसतं. प्राप्त परिस्थितीनुसार अनेक गोष्टी बदलत राहतात. भूक, झोप, भय, मैथुन, लोभ, मोह, मत्सर ह्या भावना आपल्यासोबत जन्मजात असतातच. त्यांचा अतिरेक वाईट असतो. हे जसं आपल्याला आता कळू लागलंय तसंच कामप्रेरणा हीही मनुष्यागणीक वेगवेगळी असणार याचा स्वीकार करायला हवा. जबरदस्तीने संबंध न ठेवता आपापली भूक कुणी भागवत असेल तर त्याला अटकाव करणे, त्याचा निषेध करणे, त्याला वाळीत टाकणे हे आपण करू नये असं मला वाटतं.
आपण कितीही मुखवटे घेतले तरी त्याला “ती” हवी आणि तिला “तो” हवा हेच वैश्विक सत्य आहे. ९० टक्के माणसं परस्परांशी एकनिष्ठ राहतीलही. त्यांनी राहावं देखील. त्याचा आनंद आहेच. त्यांनी परस्परांना समजून घेत उत्तम सहजीवनाची मजा जरूर लुटावी. मात्र जर एखादा किंवा एखादी वेगळी वागत असेल तर अशी ती उरलेली मंडळी संपवून टाकली पाहिजेत असं बाकीच्यांना वाटता कामा नये. त्यांना त्यांची स्पेस मिळायला हवी.
 त्याला अपेक्षित असणारी “ती” जर त्याला “मित्राच्यात” सापडत असेल, किंवा तिला हवं असलेलं सुख “त्याच्याकडून” मिळत नसेल, आणि म्हणून त्यांनी आपापले मार्ग स्वीकारले तर त्यांना रोखणारा मी कोण हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. स्वतःला नैतिक पोलीस समजत राहू नये असं मला वाटतं.

“ जो जे वांछील तो ते लाहो...” असं जगता आले तर विश्व सुखी होईल. विशिष्ट बंधनं यापुढे कुणावरही लादली जाता कामा नयेत. मात्र त्याचवेळी प्रत्येक नागरिकाला स्वतःचे मन जपणे अत्यावश्यक ठरेल. आणि इथे पुन्हा आपल्या प्राचीन परंपरेतील “मुक्तता” मदतीला येईल. “अचपळ मन माझे, नावरे आवरीता...” असं म्हणणारे समर्थ रामदास आणि त्यांच्यासारखे विविध गुरुजन मानसशास्त्राच्या अंगाने पुन्हा नव्याने अभ्यासावे लागतील. विविध उपायांद्वारे आपल्या मनावर आपणच अंकुश ठेऊ शकलो तर आणि तरच समाज म्हणून मानवाची प्रगती होऊ शकेल. त्यातून कदाचित अशी नाती हळूहळू कमी देखील होत जातील किंवा वाढतीलही. नेमकं सांगता येत नाही. मात्र कोणतही नातं हे मुक्त असावं पण शोषण करणारं नसावं. नुसती मुक्त व्यवस्था हेही उत्तम समाजाचं प्रतिक असू शकत नाही तर “शोषणमुक्त” व्यवस्था हे समाजाचं वैशिष्ट्य बनायला हवं.
निकोप आणि शोषणमुक्त लैंगिक संबंध हा आणि हा त्याचा बेस ठरणार आहे. शतकानुशतके/ वर्षानुवर्षे आपल्या मनात / समाजात दडपून ठेवलेलं वर उफाळून येताना काहीजणांना त्याचा चटका नक्कीच बसेल. ती ज्वाला कुणाच्या घरातून उठेल हेही सांगता येणार नाही. मात्र ती उठली तर आपण कसं वागायला हवं हे प्रत्येकाला आता ठरवावं लागेल. भविष्यात आपल्या घरात, शेजारीपाजारी, परिचितांच्या घरात सर्वमान्य नसणारं काही नक्कीच घडू शकतं. त्याची धग आपल्यालाही लागू शकते. मात्र एखाद्याचं कोंडलेलं विश्व मुक्त होतं असेल तर ती धग सोसायला हवी. मला असं वाटतं...
तुम्हाला??
-सुधांशु नाईक, कोल्हापूर. ( ९८३३२९९७९१).

1 comment: