marathi blog vishwa

Sunday, 24 May 2020

वेगळ्या कथा क्र 2:- गडावरची ती रात्र

✍️

गडावरची ती रात्र...
- सुधांशु नाईक

आलोकला शनिवार- रविवार जोडून सुट्टी मिळणार होती. म्हणून त्यानं शुक्रवारी संध्याकाळीच 'त्या गडावर' जायचा बेत ठरवला. आलोक व त्याच्या 3-4 मित्रांचा ग्रुप नेहमीच उत्तम ट्रेक करणारा. अनेक प्रसिध्द किंवा अनवट गडांवर नेहमी जाणारे. तिथं प्रसंगी गडस्वच्छतेची लहानमोठी कामं करणारे. कधी सगळे एकदम जायचे तर कधी एक-दोघे मिळून. सुट्टी मिळाली की आलोकचा पाय मात्र घरी रहात नसे. कधी कुठे गडावर, जंगलात वगैरे जातो असं होई त्याला. कुणी आलं नाही तर प्रसंगी तो एकटाही निघून जाई.
आज नेमकी इतर मित्रांना काही न् काही अडचण आली अन् आलोक आपल्या बाईकवरुन एकटाच गडाकडे निघाला. सोबत आईनं बनवून दिलेले पराठे, लाडू होतेच.
साधारण तासाभरानं तो गडपायथ्याच्या गावी पोचला. या भल्या थोरल्या गडावर तो यापूर्वी दोन तीनदा येऊन गेलेला. मात्र मुक्कामी ट्रेक कधी जमला नव्हता. शहरापासून जवळ असल्यानं बहुतेकदा सकाळी येऊन संध्याकाळी परत जाणे असंच घडे. त्यामुळे यावेळी खास गडावर रहायलाच जायचं असं ठरलेलं!
गडपायथ्याच्या त्या गावात पोचला तेव्हा 5 वाजलेले. इथून तासभर चढण चढल्यावर भलं थोरलं पठार यायचं. तिथं लहानशी वाडी. मग तिथून पुन्हा पाऊण एक तास चढलं की गडमाथा यायचा. गावातल्या लहानशा हाॅटेलात मस्त गरम चहा घेतला. सोबत खास चमचमीत कांदाभजी होतीच. मग तिथेच एका बाजूला बाईक नीट पार्क करुन तो गडवाट चालू लागला. कानाला लावलेल्या हेडफोनवर निनादराव बेडेकरांचं एक सुरेख व्याख्यान ऐकत चालत तो तासाभरापूर्वीच ती चढण चढून पठारावर आला.
या पठाराच्या उजवीकडे पाहिलं की हाॅर्स शू आकारातली ती दरी नजर खिळवून ठेवायची. पावसाळ्यात तर पठारावर अनेक लहानमोठे झरे  दरीत उसळत उडी मारायचे. पठाराच्या मध्यापलीकडे मग उंच गेलेला गडमाथा दिसायचा. पठारावरील झाडाखाली बसून हे दृश्य पहाणं प्रत्येकालाच आवडायचं. आलोक तिथं नेहमीप्रमाणे जरासा टेकला. चार घोट पाणी प्याला. ते सगळं दृश्य, पलीकडे अस्ताचलाकडे झुकलेलं सूर्यबिंब हे सारं कॅमेरात साठवलं अन् मग झपाझप चालत वाडीकडे निघाला.


वाडीत पोचताच लहान चिल्ली पिल्ली भोवती गोळा झाली. खांद्यावरील सॅकच्या कप्प्यात ठेवलेल्या गोळ्या- चाॅकलेट त्यांना वाटली अन् एक झोपडीसमोर थांबला. तिथला धनगरमामा महादू जरा ओळखीचा होता. त्याच्याशी 5 मिनिटं बोलत बसला. मुक्कामाला गडावर जाणार म्हणताच महादू चमकला..
" आज रातच्याला.. गडावर? काय डोकं फिरलंय का.. आमुशा हाय की आज... नगं जाऊ आज.. झोप हिथं खळ्यात. मस्त झुणका भाकर खाऊन.. सकाळसकाळ जा रं लेका.."
" महादू मामा अरे अमुशा वगैरे काय लक्षात नसतं रे आमच्या. अन् एवढं जग पुढं केलं. हातात मोबाईल वापरणारा तू.. कुठं आमुशा पुर्णिमा करतो आता..."
" तुम्ही ताज्या रगताची पोरं. पन माजं ऐक. अमुशेला आमीबी कुनी गडावर कधी रायलो न्हाई. दंगा असतो लई वरती असं आमचा आज्जा सांगायचा. कायतरी घडलेलं भयंकर म्हनं पूर्वी. नगं..रं लेकरा.. नगं जाऊ. ऐक माजं..म्हाता-याचं.."

महादूमामा या सगळ्या अंधश्रध्दा असतात रे. आता तर मी मुद्दाम जाणारच बघ. उलट उद्या गडावरुन परत आलो की इथं गावात सगळ्यांना सांगू आपण. मी पहा कसा जिवंत परत आलोय. काही भूतबित नाहीये गडावर. आरे, हे गड म्हणजे मंदिरं आहेत रे. इथं कुठलं भूत बित नसतंय...हे सगळ्यांना पुराव्यानं दाखवून देईन मी..."

###

महादूमामाचं आग्रही बोलणं टाळून पुन्हा आलोक गडवाट तुडवू लागला. पहातापहाता पुढची खडी चढण चढून तो गडाच्या दरवाज्यात पोचला तेव्हा सूर्य मावळला होता. सगळीकडे गूढ संधिप्रकाश पसरला होता अन् पश्चिम क्षितीजावर शुक्रतारा ढळकपणे दिसू लागला. चढण चढून घामाघूम झालेला आलोक त्या उध्वस्त दरवाज्याच्या देवडीत टेकला. शांत निवांत जरा वेळ बसून राहिला.
गडावरची ही संध्याकाळ त्याला नेहमीच अंतर्मुख करत असे. आपलं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं हवं, आपले छंद, आवडीनिवडी यांना कायम प्राधान्य द्यायचं आपण यासाठी त्यानं परदेशातल्या नोकरीच्या संधी कायम नाकारल्या होत्या. शनिवार रविवारी जर सह्याद्रीत हिंडला नाही तर पुढचे काही दिवस अस्वस्थ व्हायचा तो. स्वत: विषयी, घरच्यांविषयी विचार करत जरावेळ तो तसाच बसला. मग उठून वरचं पठार तुडवू लागला.

##

हे पठारही ब-यापैकी विस्तीर्ण. पूर्व, पश्चिम, वायव्य, दक्षिण, उत्तरेकडे मोठे मोठे चिलखती बुरुज अन् इशान्येकडचा तो दरीकडे उतरत गेलेल्या वाटेच्या टोकावरचा कडेलोटाचा कडा. गडावर दोन दरवाज्यापैकी एक तर पूर्ण उध्वस्त. दुसरा अर्धवट. तर गडावरील महादेवाचं मंदिर जरी भग्न झालं असलं तरी देवीचं मंदिर बरंचसं सुस्थितीत. गावक-यांनी केलेल्या जीर्णोध्दारामुळे!
तो देवीच्या देवळाजवळ पोचला. पलीकडेच जरा खालच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाक्याची साखळीजवळ गेला. हातपाय तोंड धुतलं, पोटभर पाणी पिऊन घेतलं. गार पाण्यानं त्याचा सगळा शीण निघून गेला.

मग तो देवळात आला. सोबत आणलेलं मेणबत्ती, उदबत्तीचं पुडकं उघडलं. देवीसमोरची ती समई लावली. उदबत्त्यांच्या गंधानं ते लहानगं देऊळ भरुन गेलं. एका कोप-यात बॅग ठेवली. देवीसमोर साष्टांग नमस्कार घातला. शांत बसून जरावेळ प्रार्थना केली. ते झाल्यावर मग डबा उघडून आलेल्या पदार्थांवर ताव मारला. मोबाईलला अधून मधून रेंज येत जात होती. घरी फोन करुन मी पोचलोय गडावर इतकंच सांगितलं अन् परत रेंज गेली.

मग तो पायरीवर येऊन आकाश निरखत बसून राहिला. अख्ख्या गडावर केवळ आपण एकटेच आहोत यातलं थ्रिल त्याला खूप भारी फील देत होतं. रात्री इथं देवळाच्या ओवरीत स्लीपिंग कॅरमॅट पसरून झोपावं असं खरंतर त्यानं ठरवलेलं. पण बाहेर ते तारकांनी चमचमणारं आकाश पाहून त्यानं वेगळाच बेत ठरवला.

##

आपली बॅग तिथं देवळातच ठेवून तो निघाला पश्चिमेच्या बुरुजाकडे. संपूर्ण गडावरचा हा सर्वात मोठा बुरुज. वरती मस्त फरसबंदी केलेली. म्हटलं तर किमान 50 जण सहज तिथं झोपू शकतील इतका मोठा बुरुज. तिथं रात्रभर आकाशातले तारे न्याहाळत झोपून जायचं ठरवलं त्यानं. बॅटरी, स्लीपिंग कॅरमॅटची गुंडाळी, पाण्याची बाटली फोन व हातात काठी घेऊन तो तिकडे निघाला.
वाटेत तटबंदीजवळ गजांतलक्ष्मीचं फुटकं शिल्प पडलेलं आहे. तिथून डावीकडे वळलं की समाध्याचं मैदान, तिथून जरा पुढे गेलं की मग तो बुरुज. हे सगळं त्याला ठाऊक. गजांतलक्ष्मीला वाटेत नमस्कार करुन तो समाध्यांच्या मैदानात आला. 


इथं 25,30 लहानशा समाध्या विखुरलेल्या. 2, 4 समाध्या जरा मोठ्या. बहुदा कुणा तालेवार वीराच्या असाव्यात. कधीकाळी इथं मोठी लढाई झालेली. त्यातील वीरांच्या त्या समाध्या. तसेच अनेक वीरगळही देवीच्या देवळाजवळ मांडलेले. काय घडलं असेल त्याकाळी? त्यातलं बहुतेक तर इतिहासाच्या उदरात गडप झालंय. ना कुठे कसलं लिखाण ना कुठे नोंदलेला कागद. त्या समाध्या पाहून समजायचं फक्त.. काहीतरी मोठं युध्द झालंय असं...असे विचार करत करत तो बुरुजाजवळ पोचला. त्या भल्याथोरल्या 8,10 पाय-या चढून वर पोचला. चहूकडे किर्र अंधार. त्यानं हातातली बॅटरीही बंद करुन टाकली. मॅट पसरली. त्यावर पडून तो आकाश न्याहाळू लागला.

आकाशातल्या ता-यांविषयी त्याला जुजबी माहिती. हा व्याध, ते मृग नक्षत्र, तो वृश्चिक तारकासमूह, ते सप्तर्षी, त्याखाली तिकडे दूर उत्तरेला ध्रुवतारा...मधूनच लालसर चमकणारा मंगळ, बुध, गुरु हे पहात पहात त्याला कधी झोप लागली हे त्यालाही कळलं नाही....
###

रात्री कधीतरी त्याला अचानक जाग आली. त्याला प्रकर्षानं जाणवलं की कुणीतरी अगदी जवळ आहे. एक विचित्र कुजका वास भरलाय सर्वत्र... भीतीची थंडगार जाणीव पहिल्यांदाच झाली त्याला. हातापायातलं बळच जणू गेल्यासारखं वाटलं. डोळे उघडले तर जवळच असलेलं ते कुणीतरी कसं दिसेल.. कसं असेल ते... या भीतीनं त्यानं डोळे अधिक घट्ट मिटून घेतले. मग पुन्हा त्यानं क्षणभर विचार केला.. नाही.. घाबरायचं नाही.. पळायला हवं.. लगेच.. आता..याक्षणी...

अन् तो जीवाच्या कराराने धावू लागला... त्याला जाणवलं.. ते जे कुणी आहे तेही मागे धावतंय. त्याचा वेग जास्त आहे... तो अधिक वेगानं धावू लागला.. आपले डोळे मिटलेले आहेत की उघडे हेही त्याला कळेना...डोळे उघडल्यावरही दिसत होता सर्वत्र मिट्ट काळोख... त्या समाध्यांच्या मैदानातून ठेचकाळत तो पुढेपुढे धावला..
अंधारातून धावताना आपण नेमकं कुठं धावतोय हेच कळालं नाही त्याला..

धावता धावता दमला तो. तरीही धावत राहिला. अन् एकाक्षणी त्याला जाणवलं की कुणीतरी उचललंय त्याला... त्यानं डोळे गपकन् मिटून घेतले. मग लक्षात आलं की त्याला परत जमिनीवर ठेवलं गेलंय..
त्याच्या नाकाला आता वेगळाच वास जाणवला. तो मगाशीचा कुजका वास नव्हता हा. तर जंगलात फिरताना जवळपास वाघ, बिबट्या असल्यावर जसा उग्र वास येतो तसं काही जाणवलं त्याला... आधी भूत त्यात बहुदा इथं बिबट्या... या विचारानं अर्धमेला झाला तो....

काही मिनिटं तशीच गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की सगळीकडे एकदम शांतता पसरलीये. कसलाच आवाज नाहीये. फक्त वास आहे. तो वास...
त्यानं हळूच डोळे उघडले. त्या अंधारातही त्याच्या लक्षात आलं की तो अगदी दूर  दरीच्या काठावर आहे. कडेलोटाच्या कड्याजवळ...

##
त्याला कळलं काय झालं ते. तो धावता धावता त्या दरीतच पडणार होता अन् नेमकं त्याक्षणी कुणीतरी उचललं त्याला. जीव वाचवला होता त्याचा. त्याला जाणवत राहिलं की कुणीतरी जवळपास आहे. पण त्याची भीती वाटत नाहीये. उलट आधार वाटतोय त्याचा. मग त्याला आठवल्या विविध कथा कादंब-यातून गोनिदांनी, इतर लेखकांनी, भटक्या मंडळींनी रंगवलेल्या गडपुरुषाच्या कथा. आपल्याला ज्यानं वाचवलंय तोही बहुदा गडपुरुष असावा असं वाटलं त्याला.

त्यानं जमिनीवर वाकून नमस्कार केला त्या गडपुरुषाला. मनोमन आभार मानले अन् पुन्हा तो मागे वळून गडाच्या बुरुजाच्या दिशेने चालू लागला.

##

चालत चालत तो पुन्हा गजांतलक्ष्मीच्या शिल्पाजवळ आला. चाचपडत चाचपडत... तिथं पुन्हा त्या फुटक्या शिल्पाला नमस्कार केला. तासाभरापूर्वी भीतीनं थरकापलेल्या त्याच्या मनाला खूप धीर वाटला. तो पुढे वळून समाध्यांच्या मैदानात आला अन् पुन्हा झपकन् कुणीतरी ढकललं त्याला. ती झापड खूपच वेगवान होती. तो कोलमडलाच. पडला तो थेट एका समाधीवरच. नाक फुटलं. नाकातून रक्त येऊ लागलं. अन् त्याचक्षणी पुन्हा त्याला जाणवला तोच घाणेरडा कुजका वास. अन् यावेळी त्याला जाणवलं की जे कुणी आहे ते एकटं नाहीये. अजून काहीजण आहेत तिथे. ते सगळे त्याच्या जीवावर उठलेत....

मग पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन तो धावत सुटला... वाटेत गजांतलक्ष्मीचं शिल्प ओलांडून पुढे धावतांना त्याला पुन्हा तो मगाशीचा वास जाणवला. वाघाचा...! त्याची भीतीची भावना एकदम कमी झाली. आपल्याला मदत करु पहाणारंही कुणी इथं आहे अन् जीवावर उठलेलंही... हे क्षणात उमगलं त्याला. खरं म्हणजे त्या दोघांच्यातली ही लढाई होती अन् तो मध्ये आला होता!!!

तो आहे त्या जागी शांत उभा राहिला. मग त्याला अजून एक गोष्ट जाणवली. ते गजांतलक्ष्मीचं शिल्प जिथं पडलंय तिथून समाध्यांचं मैदान ते पश्चिमेकडचा बुरुज हा एरिया त्या वाईट प्रवृत्तीचा आहे अन् इकडच्या बाजूला देवीच्या देवळापर्यंतचा भाग चांगल्या प्रवृत्तीचा. त्या गडपुरुषाचा. अन् मग त्याला कळेना की बुरुजाच्या माथ्यावर ठेवलेली स्लीपिंग बॅग, मोबाईल वगैरे परत कसं आणायचं?

त्यानं पुन्हा हद्द ओलांडायचा प्रयत्न करताच त्या कुणीतरी त्याला मागे खेचलं. अत्यंत ताकदीनं. जणू तो निर्वाणीचा इशाराच होता त्याला...
कुणीतरी जणू कानात गंभीरपणे सांगत होतं, " दोनदा सुटलायस तू.. परत जर आता पाऊल पलीकडे टाकलंस तर... तर मग जीवाला मुकशील तू...." त्याला जाणवत राहिलं की त्या दोन शक्तींच्या काही झटापट सुरु आहे. मधूनच जोरदार वारा वाहतोय. कसलेतरी अगम्य आवाज येतायत. मधेच सगळं शांत होतंय... मग परत कुठुनतरी हिंस्त्र गुरगुरुराट होतोय...
झटापट सुरुय.. दोघांच्यात. पण कोण कुणावर मात करणार हे काही दिसत नव्हतं.
हे काहीतरी आसपास घडतंय हे कळत होतं त्याला. पण उमगत नव्हतं. एकक्षण मनाला ते पटत नव्हतं. पण पुन्हा जे घडतंय ते वेगळं आहे हेही कळत होतं... काहीच दिसत मात्र नव्हतं. गेले दोन तास धावून धावून थकला तो...मग त्या शिल्पाशेजारी तटबंदीला टेकून स्तब्ध बसून राहिला.... सकाळ उजाडेल का, उद्याचा सूर्य आपण पाहू का  याची वाट पहात!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर (९८३३२९९७९१)🌿
( मंडळी आजवर गडकोटांवर अनेकदा फिरलोय पण असं काही घडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. ही कथा आहे की खरं हे तुमचं तुम्हीच ठरवा, मात्र गडकोटावर प्रेम करणा-या कुणालाच कोणतीही वाईट शक्ती कधीच त्रास देऊ शकत नाही असं आजही मला ठामपणे वाटतं हे नक्की. !) 

7 comments:

  1. Umesh Sontakke29 May 2021 at 23:39

    खूप छान रंगवली आहे गोष्ट/अनुभव जे काही असेल ते...धन्यवाद गडावरच वातावरण सजीव झालं आहे

    ReplyDelete