#जादूचीपेटी # भाग 11 :- हा समारोपाचा भाग
शिक्षण व युवा पिढी याबाबत.
नमस्कार मित्रहो, या सिरीजची दोन अडीच महिन्यापूर्वी सुरुवात केली ती दोन उद्देशाने. एक म्हणजे विविध लोकांना समुपदेशनाची गरज आहे हे जाणवलं. तर दुसरा उद्देश म्हणजे कोरोना संकटानं गांगरलेल्या लोकांना योग्य माहिती मिळावी, ज्यायोगे त्यांना शारिरीक व मानसिक स्वास्थ टिकवता यावं यासाठी माझी एक लहानशी मदत.
या दोन महिन्यात सुमारे सव्वाशे ते दीडशे लोकांशी बोललो. त्यात युवा पिढीपेक्षाही जेष्ठ नागरिक व महिलांचा अधिक सहभाग होता. युवापिढीच्या मुख्य समस्या या रोजगाराशी संबंधित होत्या तर इतरांच्या समस्या दैनंदिन जीवनातील अशा. या समुपदेशनाचा मुख्य उद्देश हा घाबरलेल्या, अडचणी कुणासोबत शेयर करु न शकणा-या लोकांना मनमोकळ्या संवादाची एक संधी देणे इतकाच होता. अनेकदा केवळ मनातलं बोलता आलं नाही म्हणून पुढे मोठे प्रश्न निर्माण होतात. ते घडू नयेत यासाठी मोफत समुपदेशनाचं हे उचललेलं एक लहानसं पाऊल होतं.
ज्यांना मदत झाली त्यांनी प्रत्यक्ष भेटून किंवा फोनवरुनही नंतर कृतज्ञता/ आभार व्यक्त केले. ज्या केसेस खरंच गंभीर होत्या त्यांना वैद्यकीय सल्ल्यासाठी, मदतीसाठी संपर्क करुन दिला. माझ्या परीने जे जे जमलं ते केलं.
एक यातीलच केस होती विक्रमची. (नाव बदललं आहे)
विक्रम 23 वर्षाचा एक मुलगा. शिक्षणाच्या जाळ्यात अडकलेला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विक्रमला मनापासून खेळाची व जंगल भटकंतीची आवड. फुटबाॅल, पोहणं अन् क्रिकेटमध्ये रस. मात्र आईची इच्छा त्यानं डाॅक्टर / इंजिनियर बनावं. आमच्यासारखं तडजोडी करत जगू नकोस हे सतत कानीकपाळी ओरडलं जाई. त्याला खेळायलाच पाठवलं जात नसे. गडकिल्ले किंवा जंगल भ्रमंतीला मात्र अधून मधून पाठवलं जाई त्याला. इच्छा नसूनही त्याला 10/ 12 वी ला विविध क्लासेस लावले गेले. त्याला कधीच 75 टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स पडले नाहीत. खरंतर उत्तम ग्रहणशक्तीचा ( Grasping power) हा मुलगा. जंगलात गेला की विविध झाडांची, पाना/ फुलांची/ फुलपाखरांची माहिती देणारा. मात्र त्याचं मन त्या शिक्षणात रमत नव्हतं.
12 वी नंतर हट्टानं त्याला Electronics and telecommunication साठी इंजिनियरिंगला घातलं गेलं. कुठूनतरी कर्ज काढून पैसे जमा करत होते आईबाबा. नंतर मग त्यावरुन त्याला बोललं जाई. " बघ, ऐपत नसताना प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन कर्ज काढलंय. तुझ्या शिक्षणासाठी.. जरा चांगले दिवे लावा.." मग विक्रम अधिक कसनुसा होई. पहिल्या दोन्ही वर्षी नापास होत, एटीकेटी घेत तो पुढं रडतखडत होता. अन् मग मात्र सगळं हाताबाहेर गेलं. मित्रांच्या संगतीनं त्याला दारुचं व्यसन लागलं. भांडणं, रडारड, मारणं हे घरात मग नित्याचं बनलं.
एकदिवशी त्यानं घर सोडून पळून जायचा प्रयत्न केला. एका दूरच्या गावी गावठी दारु पिऊन स्टॅन्डवर झोपलेल्या त्याला आईबाबा पोलिसांच्या मदतीनं घरी घेऊन आले. आई व तो दोघांचंही मानसिक संतुलन बिघडलेलं. हे घडेतोवर यंदाच्या वर्षी काॅलेजेस ही बंद झाली.
खूप काही लोक त्यांच्याशी बोलले. त्यांचे नातेवाईक, डाॅक्टर्स, व्यसनमुक्ती क्षेत्रातले त्यांचे स्नेही वगैरे वगैरे. सगळ्यांचं मत होतं की त्याला हव्या त्या क्षेत्रात शिकू दे. या गोष्टीला आई बाप तयार नव्हते. आपला निर्णय बदलायला लागणे ही गोष्ट अपमानास्पद वाटत होती त्यांना.
मग बोललो त्यांच्याशी. मूल आपलंच. त्यानं छान जगावं, आनंदी रहावं हीच तर आपली अपेक्षा असते. मग का त्याच्यावर करियरचा आॅप्शन लादायचा? चांगले सल्ले देणं मान्य परंतु मुलांच्या आयुष्यात किती गुंतायचं हे आपल्याला कळतच नाही अजून. खरंच परदेशातील व्यवस्था यामानानं जरा बरी. प्रत्येक मुलाला जे आवडतं ते करायचं स्वातंत्र्य मिळतं. अर्थात आपल्याकडे " चांगल्या पगाराची नोकरी किंवा भरपूर पैसे मिळवून देणारा व्यवसाय" यालाच सर्वत्र उगीच प्रतिष्ठा मिळते व त्यामुळे अनेक वेगळे पर्याय निवडायला मुलं बावरतात.
आर्थिक स्थैर्य हवं म्हणून आम्ही सांगतोय ही पालकांची बाजू जितकी बरोबर तितकंच ज्यामध्ये मन रमत नाही ते का करु ही मुलांचीही बाजू बरोबरच. मात्र आपल्या मुलांनी त्यांना आवडत्या क्षेत्रात आनंदी रहावं याकडे पालकांचा कटाक्ष हवा असं मला वाटतं. मी विक्रमच्या आईबाबांना म्हटलं की आज इंजिनियर झालेलीही हजारो मुलं बेकार आहेत. त्याचवेळी वनस्पतीशास्त्र वनस्पतींचे औषधी गुणधर्म याबाबत संशोधन करणा-या क्षेत्रात मुलांची कमतरता आहे. आज आयुर्वेदिक क्षेत्रात उत्पादन करणा-या विविध कंपन्यांना देखील या क्षेत्रातली मंडळी हवी आहेत. तुमच्या मुलाला जर या क्षेत्रात आवड असेल तर का नाही करु देत ते? तसंच 10वीत असतानाच विविध कलचाचणी (aptitude test) चे पर्याय हल्ली उपलब्ध आहेत. ते तुम्ही का तपासले नाहीत असं विचारल्यावर दोघे गप्प बसले. शेवटी त्यांना पटलं की आपल्याकडून उगीचच फार दडपण आणलं गेलं. विक्रमला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घ्यायला त्यांनी आता तयारी दर्शवलीये. फक्त त्यानं दारुच्या व्यसनापासून दूर रहावं ही त्यांची अपेक्षा.
मात्र या सगळ्यात त्याच्या तरुणपणातील 2,4 वर्षं वाया गेली. इतर व आपल्यापेक्षा वयानं लहान मुलांसोबत वेगळ्या काॅलेजमध्ये जाऊन शिकताना त्यालाही विविध तणावांचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी तो तयार झालाय हीच मोठी गोष्ट. व्यसनमुक्ती क्षेत्रातले त्यांचे परिचित व्यसन सोडवायला मदत नक्की करतील मात्र जी मोलाची 4 वर्षं वाया गेली त्याचं मलाच वाईट वाटलं.
आपल्या मुलांसाठी आपण दिवसरात्र मेहनत करतो मात्र अनेकांनी हजारो वेळा सांगूनही घरातून मुलांवर स्वप्नं लादणं काही कमी होत नाही. पालकांचा अहंकार, त्यांच्या मनातील प्रतिष्ठेच्या तकलादू कल्पना व त्यामुळे मुलांवर होणारी जबरदस्ती यामुळे अनेक चांगले संशोधक, कलाकार, खेळाडू यांना कदाचित आपण मुकलो असू.
यंदाच्या वर्षात जगभरातील सर्वच क्षेत्रात प्रचंड उलथापालथ झालीये. जे काही आगळं वेगळं असेल, सदैव लोकांच्या उपयोगी पडेल त्या क्षेत्रातच नोकरी/ धंदा चालू राहील. तसेच पूर्वीच्या तुलनेनं शेकडो नवीन क्षेत्रात संधी उपलब्ध होताहेत. तिथं आव्हानंही असणारच. त्यामुळे मुलांना विविध पर्याय समोर ठेवायला जरुर हवेत. त्यातील फायदे तोटेही आपण समजावून सांगायला हवेत. मात्र त्यानंतर त्यांना निर्णय स्वातंत्र्य ही द्यायला हवं. चुकेल तिथं अवश्य कान पकडावा मात्र सतत टीका- टोमणे व अपमानास्पद बोलून मुलांची मन:स्थिती कमजोर नको करायला.
हीच मुलं यापुढं देशाचं भवितव्य असतील, त्यांना छान जगायला प्रोत्साहन द्यायला हवं असं मला वाटतं. आपल्या आसपासच्या मुलांसाठी आपणही प्रयत्न करुया!
####
आजही ज्यांना विविध कारणांमुळे मानसिक तणाव जाणवत असेल त्यांनी मन मोकळं करायला बोलतं व्हावं आणि #जादूचीपेटी या मोफत उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी 9833299791 या नंबरवर किंवा nsudha19@gmail.com या ईमेलवर अवश्य संपर्क साधावा ही विनंती.
यापुढे या सिरीजमधील लेख / केस स्टडीज् मी लिहिणार नाही, मात्र ज्यांना खरंच मनमोकळं बोलायचंय ते कधीही संपर्क साधू शकतात.
अनेकांनी या उपक्रमाबद्दल फोन करुन अभिप्राय दिले त्यांचे मनापासून आभार. केवळ माझ्या शब्दांतून काही लोकांना माझा आधार वाटला, त्यांच्या समस्या सोडवण्यात खारीचा वाटा देता आला यातच मला समाधान आहे. भेटत राहूया.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर( 9833299791)🌿