#जादूचीपेटी या उपक्रमांतून गेले तीन आठवडे विविध लोकांशी बोलतो आहे. अनेकांच्या खरंच गंभीर समस्या ऐकताना मलाच शब्द सुचेनासे होतात. मग जमेल त्या मार्गानं त्यांना इतरांशी जोडून द्यायचे प्रयत्न करतो. ज्यांच्या समस्या या मुख्यत: मानसिक दडपणाच्या आहेत, कोरोनाच्या भीतीबाबत आहेत त्यांना माझ्या शब्दांचा दिलासा देत रहातो.
ज्या समस्या मलाही अंतर्मुख करतात त्यात ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या समस्या सर्वात जास्त प्रमाणात आहेत. 9833299791 या नंबरवर ते काॅल करतायत, संवाद साधतायत. ज्येष्ठ नागरिकांबाबत दोन गोष्टी गेल्यावेळी सांगितलेल्या, आजही दोन अगदी परस्परविरोधी किस्से..
#जादूचीपेटी #ज्येष्ठनागरिक #07
यातली एक गोष्ट तर माझ्या परिचयातील व्यक्तीबाबतची. माझा एक स्नेही व त्यांची पत्नी ( त्यांची नावं अनिकेत व अश्विनी आहेत असं समजूया) माझ्याशी बोलत होते त्यांच्या वडिलांविषयी.
अनिकेत एमआयडीसीतील एका नामवंत कंपनीत मॅनेजर आहे तर अश्विनी एका मोबाईल कंपनीच्या आॅफिसात पार्ट टाईम 5,6 तास काम करते. घरी त्याचे वडील एकटेच व या दोघांचा 7वीतला मुलगा. असं मर्यादित कुटुंब. मात्र सततच्या भांडणांनी तणावात धुमसतय घर. कारण अनिकेतचे बाबा. त्यांनी एका कंपनीत पुण्यात अनेक वर्ष अॅडमिन आॅफिसरची नोकरी केलेली. मग रिटायर्ड झाल्यावर सगळे कोल्हापुरात दाखल झालेले. अनिकेतनं स्वत:च्या कर्तृत्वावर आपलं स्थान मिळवलेलं. वडिलांचा फारसा सपोर्ट नाही. त्यात त्यांना दारुचं व्यसन. त्यावरुन घरी आई व वडिलांची भांडणं सतत त्यांनं पाहिलेली. तो कायम दारुपासून दूरच राहिला त्यामुळे.
अनिकेत सांगत होता, " 7 वर्षांपूर्वी हार्टफेलनं अचानक आई गेली अन् मग वडिलांना जणू मोकळं रान मिळालंय रे. रोज पितात. संध्याकाळी एकतर कुणा मित्राकडे जाऊन बसतात किंवा घरीच हाॅलमध्ये मोठमोठ्यानं टीव्हीवर गाणी लावायची व एकटंच पीत बसायचं. मुलाचा अभ्यास असतो, हिची काही कामं असतात, फोन सुरु असतात, कुणी येत जात असतं याचं कसलं भान नाही त्यांना. वर वेगवेगळ्या हाॅटेलमधून मनाला येईल ते मागवायचे. ते तसंच टेबलवर कसंही पडलेलं असतं. त्यांच्या खोलीत जाऊन काय ते करा असं ही एकदा म्हणाली तर अंगावरच आले. हे माझंही घर आहे मी हाॅलमध्येच बसणार, बघू कोण मला हलवतो ते.. अशी भाषा.."
अश्विनी मग सरसावली.." त्यांचं तोंड पाहिलं तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते. मी आॅफिसला निघाले की यांचं तोंड सुरु होतं.. निघाली हिराॅईन हिंडायला. कुठं जाते काय करते देव जाणे. तो सकाळी 9 ला गेला रात्री 8 ला येतो. हिची मजा..
कितीवेळा सांगितलं अहो काहीही काय बोलता. मी कुठं जाते, काय करते हे पहा येऊन एकदा. सकाळी 10 ला अंकितचा क्लास असतो, त्याला सोडते मीच..त्याचा डबा मीच करते.. मग 11 ला शाळेत मीच सोडते.. 5 वाजता परत त्याला आणायचं. पटकन् खायला देऊन ज्युदोच्या क्लासला सोडते. मग घरी येतो दोघेही सोबत. मग घरचं स्वैपाक पाणी. यांचं जेवण बनवून ठेवलेलं असतं. पण अनेकदा ते तसंच व यांनी शेजारच्या हाॅटेलमधून काही मागवून ठेवलेलं असतं. अर्धवट उरलेलं अन्न धड फ्रीजमधे ठेवत नाहीत. निम्मं सांडलेलं, निम्मं खराब... घरभर पसारा... नकोच वाटतं मला घरी यायला खरंतर.. वर यांची बडबड. सतत केवळ मला टोमणे मारत असतात. खरंतर 10 वर्षांपूर्वी यांचं मोठं आजारपण झालेलं. तेव्हा सगळी सेवा, अगदी शी शू काढण्यापासून मी केलेली. पण आता त्यांना कसली जाणीवच नाही. सतत मला टोमणे मारुन काय मिळतं त्यांना देव जाणे. वर इतरांसमोर, नातेवाईकांसमोर माझी विनाकारण बदनामी सुरु असते ती वेगळीच. मी शक्यतो कधीच त्यांना काहीच बोलायला जात नाही. आमचे नातेवाईक कधी कुणी आलेच घरी तर जाताना म्हणतात, अगं तू छान आहेस की आम्हाला वेगळंच वाटलेलं..."
आता या लाॅकडाऊनमध्ये तर दिवसभर त्यांची घरातली बडबड, चिडचिड ऐकून दोघांनाही प्रचंड त्रास झालाय. एका बाजूला मुलाशी गोड बोलणारे हे वडील सून व नातवाशी मात्र फटकून वागतात. सतत बोलायला निमित् शोधतात. काही कारणानं जर अनिकेत अश्विनीवर ओरडला तर लहान मुलासारखे खूष होतात. त्यांचं भांडणं व्हावं हीच जणू इच्छा... यामुळे अश्विनीची मनस्थिती बिघडलीये. दोघांच्यातलं नवरा बायकोचं नातं, शरीरसंबंध यातही अंतर पडत चाललंय. कशातून आनंद मिळत नाही अशी गत. तिनं मध्यंतरी तर काही दिवस डाॅक्टरांकडून होमियोपॅथीची ट्रीटमेंटही घेतलेली..
हे सगळं सांगतानाही त्या दोघांना कसंतरी होत होतं. त्यांच्या घरी काहीतरी सुरु असतं इतकंच आम्हाला माहिती. पण हे हाताबाहेर जाणं योग्य नव्हतं. खरंतर इतका छान संसार आहे मस्त मजेत रहावं, प्रेमानं चांगलं बोलावं तर ते या काकांना का करायचं नाही याला उत्तर नाही. घराबाहेर सर्वांशी छान वागणारे काका घरात मात्र वाईट वागताहेत. त्यांना या उतारवयात एकटं सोडणं, कुठेतरी वृध्दाश्रमात ठेवणं या दोघांना नको वाटतं म्हणून तेही सहन करतायत अन् आपल्या चांगल्या दिवसांची माती करुन घेतायत. काकांच्या मित्रामार्फत, नात्यातील काही ज्येष्ठ व्यक्तींमार्फत काकांना समजुतीच्या चार गोष्टी सांगायचे प्रयत्न करुनही झालेत पण पालथ्या घड्यावर पाणी. आता शेवटी कधीतरी जास्त काही बोलले तर मी तरी कायमचं घर सोडून दुसरीकडे राहीन नाहीतर त्यांनी वृध्दाश्रमात जाऊन राहावं. माझा संसार विस्कटू नये त्यांनी ही अश्विनीची अपेक्षा योग्यच आहे. सध्यातरी सगळं धुमसतंय. दोघेही सहन करतायत पण ही मंडळी अशी एकत्र न रहाणं हाच जणू यावरचा कटू उपाय आहे. हे सगळं नकोसं वाटतं पण नाईलाज झालाय...
तर दुसरी गोष्ट यापेक्षा जरा वेगळी आहे रामचंद्र जोशीकाका-काकूंची. तेच परवा बोलत बसलेले. जोशीकाका म्हणजे एकदम नीटनेटका माणूस. पापभीरु माणूस. रस्त्यात पायात किडामुंगी आली तरी त्यावर पाय न देता बाजूनं जाणारा. ते व त्यांची बायको आपल्या आपल्यात छान रमलेले. पहाटे उठून फिरणं, मग घरातील केरवारे, रो हाऊस समोरच्या मोकळ्या जागेतील लहानशी बाग नीट करणे हे सगळं होईपर्यंत मुलगा सून झोपलेलेच असतात. मुलाचा एक चांगला व्यवसाय आहे तर सून घरीच बसून त्यांची अकौंटस वगैरेची कामं पहाते. प्रसंगी आॅफिसातही जात येत असते. दोन्ही मुलांपैकी 1 काॅलेजला तर दुसरा शाळेत. त्यांच्या स्कूलबसेस वगैरे सगळंही आजी- आजोबांनीच जास्त माहिती. सुनेचा व त्यांचा जणू 36 चा आकडा आहे.
घरात सकाळी किचनमध्ये काम करताना चुकून हातातून एखादं भांडं सांडलं तरी आभाळ कोसळल्यासारखं तांडव करते सून. घरातील 1 वस्तूही इकडे तिकडे उचलून ठेवलेली तिला पसंत नसते. स्वैपाकाला येणा-या बाईला आम्ही काहीही फर्माईश केलेली तिला चालत नाही. कधी काही खावंसं वाटलं तरी सांगायला मन संकोचतं. त्यात लाॅकडाऊनमुळे 5 महिने घरी बायका येत नव्हत्या. काही किचनमध्ये करु गेलं तरी हिची धुसफूस चालू. तरी बरं हिला आम्ही आॅर्डरी सोडत नाही.
आमच्या लेकाला तर ताटाखालचं मांजर करुन ठेवलंय. घरात वयात येणारी मुलं आहेत पण यांचं जे सुरु असतं ते पाहून आम्हालाच कानकोंडं होतं. तिच्या सौंदर्यापुढं त्याच्यातला पुरुष पार नामोहरम झालाय पहा. तिच्याशिवाय राहायला नको म्हणून तो तिच्या शब्दाला अवाक्षरही विरोध करत नाही. उलट आम्हालाच म्हणतो, नशीब समजा तुम्हाला इतरांसारखं वृध्दाश्रमात रहावं लागत नाही हे... ना आमच्या औषधांकडे त्यांचं लक्ष, ना आमच्या आवडीनिवडींकडे. स्वत: उठून किचनमध्ये काही करु गेलं तर तेही नकोसं तिला.
काकू म्हणाल्या, ' यांना भजी फार आवडतात हो. मध्ये एकदा मीच सगळ्यांसाठी भजी करते म्हटलं तर अंगावरच आली. कोरोनाच्या या दिवसांमध्ये तेलकट खाऊ नका असं डाॅक्टर बोंबलतायत, तुम्हा वयस्कर लोकांना तेवढंही समजत नाही का हल्ली. भजी नाही खाल्ली 2 महिने तर मराल काय? असं म्हणाली ही... यांच्या तर डोळ्यात पाणीच आलं. म्हणाले, मी मेलो तरी चालेल पण परत भजीचं नाव काढणार नाही. या वयात अशा अपेक्षा तरी किती उरल्याहेत पण त्या क्षुल्लक गोष्टींसाठी मनं मारत जगण्यापेक्षा या कोरोनानं मरण तरी पदरी द्यावं.. कुणाला आपण नकोसे झालो असलो तर तिथं राहू नये हेच खरं...
काकांना व काकूंना मी वेगळं काय सांगणार होतो.? जमेल तितकं दुर्लक्ष करा, नका मनाला लावून घेऊ इतकच सांगू शकत होतो. लाॅकडाऊन मुळे ते कुठेही घराबाहेर किंवा नातेवाईकांकडे परगावी जाऊ शकले नव्हते. आॅक्टोबर नंतर कुठेतरी 2,3 महिने हिंडून या. तुम्हालाही तुमची स्पेस मिळेल व त्यांच्यापासून दूर राहिल्याचं समाधान...इतकच बोललो.
माणसं एकमेकांच्या जवळ असूनही द्वेष, मत्सर, इगो, ईर्षा हे सगळं का मनाशी धरुन बसतात हेच उमगत नाही. प्रेमानं आनंदानं रहावं, जे काही आपल्याकडे आहे ते छान सर्वांनी शेयर करावं, या संकटकाळात भांडणं शक्यतो टाळून आनंदानं वागून एकमेकाला धीर, दिलासा व आधार द्यावा असं का वाटत नसेल या माणसांना? असा प्रश्न मलाच पडतोय.
मात्र जरा मनमोकळं बोलल्यानं या मंडळींना जरा बरं वाटलं. माझ्याकडून मी इतकंच तर सध्या करु शकत होतो...यापेक्षा जास्त काही करता येत नाही ही खंत मात्र जरुर वाटते.
तुम्हालाही तुमच्या मनातली व्यथा, ताण तणाव कुणाशी बोलता येत नसतील तर अवश्य आपल्या #जादूचीपेटी उपक्रमांतर्गत मला 9833299791 या नंबरवर काॅल करा किंवा nsudha19@gmail.com यावर पत्र लिहा. तुमच्या मनातील चिंतेची जळमटं दूर करायचे जरासे प्रयत्न करुया.
आनंदी जगूया, इतरांना आनंद देऊया.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर (9833299791)🌿
No comments:
Post a Comment