कोरोनाकाळात "जादूची पेटी" हा उपक्रम सुरु होऊन कित्येक दिवस झाले. या काळात अनेकांशी बोललो. कोरोनाची भीती व उपचार याव्यतिरिक्त जे काॅल्स येत होते त्यात सर्वाधिक समस्या ह्या महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संबधित होत्या. सर्वात जास्त गुंतागुंतीचे प्रश्न हे घरातील महिलेबाबत आहेत अन् सुशिक्षित व कमी शिक्षित अशा दोन्ही प्रकारच्या घरात हे घडलं आहे, घडत आहे. आजचा हा लेख घटस्फोटासाठी धडपडणा-या महिलांबाबत अन् घरातील समस्यांबाबत....
- सुधांशु नाईक
#जादूचीपेटी #09 #वैवाहिकजीवन
भारतीय समाजात लग्न ही एक सहज साधी गोष्ट नसतेच मुळी. दोन वयात आलेल्या स्त्रीपुरुषांनी वैवाहिक जीवनातील आनंद लुटायला, नव्या पिढीची निर्मिती करायला एकत्र यावे इतकं साधं नसतंच मुळी हे. म्हणूनच तर चांगल्या व वाईट अशा दोन्ही अर्थानं असं म्हटलं जातं की, " भारतीय घरात लग्न हे दोन व्यक्तींचं नसून दोन कुटुंबांचं असतं." याचे फायदे तोटे भरपूर आहेत अन् ते मुख्यत: व्यक्तीसाक्षेप आहेत.
म्हणजे एखाद्या कुटुंबात एकत्र कुटुंब पध्दती असल्याने घरातील अडचणी एकमेकाच्या सहकार्यानं सोडवल्या जातात. तर दुस-या ठिकाणी एकत्र कुटुंब हेच भांडणाचं कारण बनलेलं.
या काही आठवड्यात मी किमान 15, 20 अशा महिलांशी बोललो की ज्या घटस्फोटित / घटस्फोटाचा अर्ज केलेल्या / घरात त्रास होतोय म्हणून माहेरी आलेल्या अशा आहेत.
प्रत्येकीची दुर्दैवी कर्मकहाणी वेगळीच. बहुतांश बाबतीत नव-याचं व्यसन, घरात मारहाण करणं, शारिरीक मानसिक त्रास, लैंगिक संबंधातील दु:खद अनुभव असं काही आहेच. प्रत्येक बाबतीत पुरुष चुकीचा आहे किंवा सासरचेच चुकीचे आहेत असंही नाही. मात्र शेवटी संसार तुटला तर त्याचा त्रास त्या स्त्रीलाच जास्त होतो हे मात्र खरं व दुर्दैवी.
एका केसमध्ये त्या ताईंचा पती दारुच्या व्यसनात बुडालाय. लग्नाला केवळ 2 वर्ष झालीयत. ह्या व्यसनाबाबत घरच्यांना कल्पना असूनही सासर बड्या घरचं आहे व हळूहळू होईल दारु पिणं कमी अशी समजूत घालत लग्न करुन दिलं गेलं. प्रसंगी तिनं नव-याचं मन राखायला त्याला 2,4 दा कंपनी दिली. मनातून प्रचंड घाण वाटत असताना दारुचे घोट घेतले. नंतर त्याची लैंगिक भूक, विकृत चाळे हेही सहन केले. पण सगळंच असह्य झाल्यावर ती माहेरी परत आली. नशिबानं मूल झालं नाहीये. तर माहेरी स्वत:चा भाऊ- वहिनी व आईबाबांकडून तिला रोज ऐकून घ्यावं लागतंय. त्यातच तुझे मित्र भरपूर... तुझंच कुणाशी तरी लफडं आहे म्हणून तूच पळून आलीयस असा संशयही प्रत्यक्ष आईबापानं घेतला. घटस्फोटाची केस कोर्टात 3,4 वर्षं आहे व कासवगतीनं काम सुरु आहे. या कोरोना काळात सगळेच घरात त्यामुळे सततचे टोमणे ऐकून तिला प्रचंड मानसिक त्रास होत होता. तिकडे नवरा तसा इकडे आपली माहेरची माणसं अशी... काय करु? जीवच देते या विचारांकडे ती वळत होती सतत.. सुदैवानं तिची मावशी, एका मैत्रिणीच्या कुटुंबानं तिला धीर दिलाय. ती सध्या मावशीकडे जाऊन राहिलीये व एका महिला संघटनेमार्फत तिच्याशी संवाद सुरु झालाय.
गेल्या काही आठवड्यात तिचं समुपदेशन तर केलंच पण खटला लवकर निकाली निघेल यासाठी त्या संघटनेमार्फतचे प्रयत्न त्यांच्या शहरात सुरु झालेत. तसेच तिला काॅम्प्युटर आॅपरेटरच्या एका लहानशा नोकरीचीही संधी मिळाली आहे. काहीशी स्थिती सुधारत आहे सध्या.
दुस-या घटनेत घरात नवरा बायकोची भांडणं तशी नाहीयेत. दोघेही नोकरी करतात. दुर्दैवानं या कोरोनाकाळात नव-याची नोकरी गेली तर आयटीत काम करणारी ती वर्क फ्राॅम होम करत होती. आॅफिस जवळच असल्यानं काहीवेळा तिथं जात होती. मग घराकडे कसं तुझं दुर्लक्ष होतंय, तू स्वत:ला मोठी समजतीयस, तुझं आॅफिसात कुणाशी तरी अफेयर आहे असे आरोप करत तिला त्रास सुरु झाला. तिचे मोबाईल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चेक करणं, तिच्यावर पाळत ठेवणं इथपासून प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत मजल गेली. अनेकदा तिनं सांगितलं की तुला नोकरी मिळेल रे, निराश होऊ नकोस. जरा धीर धर.. तर त्याचे विपरीत अर्थ काढले गेले. तिच्यावर जबरदस्तीनं शारिरीक संबंध लादून स्वत:चं वर्चस्व सिध्द करायचे प्रयत्न केले गेले.
सासू सास-यांनी 2-4 दा मुलाला समजवायचा प्रयत्न केला मग घाबरुन त्यांनी एका बेडरुममध्ये स्वत:ला अडकवून घेतलं. तुझं तू पहा बाई... नको राहूस हवं तर असं सांगितल्यावर ती अधिकच खचली.
तिची एटीएम कार्डस् ताब्यात घेणं, मोबाईल मधील व्हाटसअप फेसबुक आदि अॅप जबरदस्तीनं डिलीट करणं, रोज मुद्दाम घरात वेगवेगळे पदार्थ करायला लावणं, तिची कामं थांबवून घरकाम करायला लावणं, दिवसा वा रात्री शारिरीक संबंध लादणं हे सारं सुरु होतं. सुशिक्षित अशा त्या घरात हे असह्य झाल्यावर शेवटी तिनं घर सोडलं. आता घटस्फोटाची केस दाखल झालीय अन् तिच्या पोटात 5 महिन्याचा गर्भ आहे. मात्र ती जिद्दीनं लढतीये पण तिचे आईबाबा खूप मानसिक तणावात होते. त्यांना सतत ही भीती की आम्हाला काही झालं तर या एकुलत्या एका मुलीचं कसं होईल? पण तिचे काकाकाकू, चुलतभाऊ हे सारे तिच्या पाठीशी आहेत हाच दिलासा. तिच्या आईवडिलांशीच जास्त बोलावं लागलं. त्यांनाच धीर द्यावा लागला...
एकूणच या लाॅकडाऊनच्या काळात घरातील अत्याचारांमध्ये वाढ झालीये हे जे वृत्तपत्रांतून, मिडीयातून सांगितलं जात होतं त्याचं हे केवळ एक टोक आहे.
तिस-या केसमध्ये घरातल्या त्या स्त्रीला सगळे समजून घेत होते. फेब्रुवारीत तिचं लग्न झालेलं अन् मार्चपासून लाॅकडाऊन. तिला घरकामाची काही सवय नव्हती माहेरी अन् इथं सगळ्या कामाचा बोजा पडला. सासू किचनमध्ये मदत करायची पण केरवारे, फरशी पुसणे, भांडी घासणे, स्वैपाकात नवनवीन पदार्थांची मागणी हे काही तिला जमेना. मग त्यावरुन नवरा बायकोची धुसफूस. नव-यानं तिला मदत करायचा प्रयत्न केला की सासू भडकायची. 4 खोल्यांचं तर घर... त्यात स्वैपाक तर निम्मा मीच करतेय... ही फक्त पोळ्या करते व काही सॅलड वगैरे. एवढीही कामं करायला नवरा कशाला हवा. त्याला करु दे ना त्याच्या आॅफिसचं काम.
अवघ्या सहा महिन्यात नव्या संसाराची नवलाई उरली नाही. रोजच्या वादावादीनंतर मग हिच्याकडून लैंगिक संबंधात असहकार असतो. नवरा त्यामुळेही वैतागलाय. बायको म्हणून हिला आणलं पण ना हिचा घराला फायदा ना मला वैयक्तिक... हे वाक्य ऐकायला कटू वाटलं पण त्यात तथ्यही होतंच. आता घरी कामवाल्या मावशी येताहेत गेल्या महिन्यात. पण त्यांचं नवरा बायकोचं नातं ताणलं गेलंय. त्यांच्यात शारिरीक जवळिकीचा प्रसंग आला की ती जणू गोठून जाते. तो भडकत राहतो.
लग्नाचं मुख्य कारण हे खरंतर निरामय कामजीवन असतं. त्यामुळे शरीर व मनावर चांगले परिणाम होतात. हार्मोनल बॅलन्स नीट राहतो वगैरे गोष्टी त्यांना कुणी समजावून सांगितल्या नाहीयेत. त्यांचं ते महत्वाचं नातं खरंतर या सहा महिन्यात छान सहवासातून फुलायला हवं होतं मात्र यांच्यात तेच उरलं नाहीये. शेवटी त्यांना आता आधी गायनाॅकाॅलाॅजिस्टसोबत बोलायला सांगितलंय. स्पष्टपणे आपले प्रश्न / अडचणी सांगा हे सुचवलंय. तसंच प्रसंगी अधिकृत मानसोपचार तज्ञांकडून काहीदिवस थेरपीची गरज लागल्यास ती करावी हे सुचवलं.
या दोघांनाच नव्हे समाजातील शेकडो युवक युवतींना आजही या नाजूक गोष्टीबद्दल पुरेशी माहिती नाहीये हे दुर्दैवी वास्तव. पुरुषार्थाच्या चुकीच्या कल्पना, स्त्रिया- स्त्रियांमधील किंवा पुरुषांमधील अवास्तव गप्पा/ फुशारक्या/ टोमणे यामुळे अनेक नवविवाहितांना नेमकं काही कळत नाही. अनेकजण चुकत चुकत शिकतात तर बहुसंख्य वेळा स्त्री सोशिकपणे जे घडेल ते सोसत बसते. कित्येकदा आततायी स्त्री मुळे पुरुषांचीही कुचंबणा होते. अनेक मनोविकार तज्ज्ञांचा असा निष्कर्ष आहे की कित्येकदा एखाद्या मानसिक आरोग्य समस्येच्या मुळाशी बिघडलेलं कामजीवन असू शकतं.
प्रत्येकानं संकटकाळात खरंतर एकमेकाला आधार, प्रेम द्यायला हवं. मात्र त्याऐवजी नाती तुटेपर्यंत ताणली जातात. पशू करत नाहीत असं वागणं माणसांकडून घडतं. हे वेदनादायी आहे. कुणीही अन्याय वा अत्याचार सोसू नयेत ही माझी नेहमीची भूमिका आहे.
आजही जिथं कुठे कुणाला काही मानसिक, भावनिक समस्या भेडसावत असतील तर त्यांनी आपल्या या #जादूचीपेटी उपक्रमाचा लाभ घ्यावा व 9833299791 या नंबरवर काॅल करुन मनमोकळा संवाद साधावा. ह्या काॅलिंगसाठी कोणतीही फी नाही तसेच तुमची सिक्रेटस् कुणालाही सांगितली जाणार नाहीत याची खात्री देतो. ज्यांना बोलायला संकोच वाटतो त्यांनी nsudha19@gmail.com यावर इमेल पाठवावा.
#जादूचीपेटी या उपक्रमातील काही मोजके प्रश्न या सिरीजमधून मी मांडत गेलो. यानंतरचा भाग हा शेवटचा भाग असेल. त्यानंतरही संवाद, समुपदेशन सुरु राहील व ज्यांना गरज आहे ते नक्की काॅल करु शकतात.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(9833299791)🌿
No comments:
Post a Comment