marathi blog vishwa

Sunday 6 November 2022

चाळीतले दिवस

" सहजच लिहिलेलं.. " या नव्या लेखमालेतील हा दुसरा लेख.
चाळीतले दिवस
- सुधांशु नाईक.
बटाट्याच्या चाळीपासून संभूसांच्या चाळीपर्यंत अनेक चाळी साहित्यक्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवून गेल्याहेत. सगळ्या चाळीतून कमी अधिक प्रमाणात तेच ते असं सगळं असतंच.
सार्वजनिक संडास, डुगडुगता जिना, तिथला अंधार, भांडणारे आणि तरीही जीवाला जीव देणारे शेजारी, धान्य - पदार्थ यांची देवाण घेवाण इत्यादी सगळं.
प्रत्येकाचं आपलं स्वतंत्र घर ही कितीही हवीहवीशी गोष्ट असली तरी तिथवर पोचेपर्यंत अनेकांना अशा चाळीत राहावं लागलेलं असतं. माझ्यासह अनेकांच्या जीवनात आलेल्या चाळीतील त्या दिवसांना विसरणं अशक्यच...
( हे रेखाचित्र गुगलवरून साभार. निलेश यांनी एकेकाळी लोकसत्तासाठी केलेलं हे स्केच उत्तमच. आमची चाळ काहीशी अशी दिसायची.)

वयाच्या 7,8 व्या वर्षी पहिल्यांदा चाळीत गेलो ते अजूनही आठवतं. आम्ही त्यापूर्वी चिपळूणला पागेवर चितळ्यांच्या घरी राहायचो. ते घर सोडून गावातच पंचायत समिती समोरच्या पाटकरांच्या चाळीत प्रथम जाताना सावंतांच्या रिक्षामधून गेलेलो. मोजकं सामान,आई बाबा आणि माझ्यासह लहानगा भाऊ. आजोबा सोबत होते की नाही हे नक्की आठवत नाहीये.

तिथं घराच्या भिंती मातीच्या होत्या. नुसतं पोपडे उडालेल्याच नव्हे तर खड्डे पडलेल्या. आई बाबा त्या भिंती दुरुस्त करायचे. कुणीतरी मदतीला आलेलं असायचे. मग रंगकाम. इतकंच नव्हे तर त्यावेळी स्क्रॅप मध्ये मिळणारे तेलाचे रिकामे डबे आणून त्याची पिंपं किंवा 2,3 डबे जोडून मोठे डबे बनवले जात. त्यात मग धान्य साठवलं जाई. वर्षादोनवर्षातून त्या डब्याना रंग लावणे, भिंतीना रंग लावणे हीही कामं घरी बाबा करायचे. त्या डब्याना रंग देण्याच्या कामी मग मी, चाळीतले अन्य 2,3 दादा लोक मदत करायचे.
पुढं जरा परिस्थिती सुधारल्यावर घरकाम करणाऱ्या लीलाबाईचे मिस्टर रंगकामाला येऊ लागले. ते अगदी पुढची जवळपास 30,35 वर्षं कायमचे झाले. अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत.

पाटकर चाळ आणि शेजारची कामत चाळ असं मिळून 8,10 जणांची ती घरं. आमचे घरमालक पाटकर ही तिथंच राहायचे.
त्यांच्याकडे सागर हे रोजचं स्थानिक वृत्तपत्र यायचं आणि मग टेपरेकॉर्डरही आणला होता. याचं तेंव्हा खूप अप्रूप वाटे. मी 3 री चौथीत असेन. त्यावेळी काका पुलंच्या कथाकथनाच्या कॅसेट लावून ऐकत बसायचे. म्हैस, रावसाहेब, अंतू बरवा, पानवाला, हरितात्या, चितळे मास्तर हे तेंव्हा पहिल्यांदा कळले. आणि रोज रोज ऐकून ते सगळं पाठ ही झालेलं.
पलीकडच्या घरात केळकर काका राहायचे. अक्ख्या चाळीत तेंव्हा फ़क्त त्यांच्याकडेच " महाराष्ट्र टाइम्स " यायचा. लायब्ररी मधील पुस्तकं असायची. लहान असलो तरी त्यांनी कधी वावगं वागवलं नाही. वाचायला पेपर , पुस्तकं मागितली तर कधी नाही म्हटलं नाही. मी वाचत बसलेलो असताना कित्येकदा मात्र म्हणायचे, " जरा पायावर पाय दे रे. तू छान पाय दाबतोस. " मी उभं राहून त्यांच्या पायावर पाय देत रगडून देई. आणि पुन्हा पुस्तक उघडून वाचत बसे. त्यांच्याकडेच पॅनासॉनिक चा टू इन वन होता. संध्याकाळी ते घरासमोर कट्ट्यावर बसून 7 च्या बातम्या, इंग्रजी बातम्या, जुनी गाणी वगैरे ऐकत बसायचे. . आम्ही मुलं आसपास खेळताना लक्ष त्यांच्या रेडिओकडे असायचंच.
मात्र पुस्तकं किंवा सर्वात जास्त वाचन त्या काळात झालं ते चाळीतच राहणाऱ्या परांजपे काकांच्या घरी. परांजपे मॅडम आमच्याच शाळेत शिकवायच्या. अत्यंत कडक असा त्यांचा लौकिक. मात्र आमच्या तुकडीवर त्या कधीच नव्हत्या. शाळेत इतर मुलं मॅडम ना घाबरत असताना आम्ही चाळीतली मुलं मात्र त्यांना कधी फारसं घाबरलो नव्हतो. काका तर अतिशय शान्त आणि प्रेमळ व्यक्तिमत्व. मोठी लेक उत्तरा ताई ही अभ्यासू. आम्हा सगळ्यांना चाळीत तिच्यावरून सांगितलं जाई.. " बघ, ती उत्तरा कशी अभ्यास करत असते. किती शांत आहे. नाहीतर तुम्ही, सतत उनाडक्या आणि खेळ.. " असं आम्हाला घरी ऐकवलं जाई.

त्यांच्या घरी दोन्ही मुलांसाठी किशोर, इंद्रजाल कॉमिक्स, चांदोबा आदि मुलांसाठीची मासिके येत. एका कोपऱ्यात एका पत्र्याच्या खुर्चीत तासंतास बसून मी ते सगळं वाचून काढी. मधूनच कधी परांजपे काका किंवा मॅडम चकली, लाडू असं काही खायला देत. मात्र सगळं लक्ष पुस्तकातच असायचे. अनेकदा तो लाडू तसाच बाजूला असायचा. मग मॅडम म्हणायच्या, अरे पुस्तक कुठं पळून जात नाहीयेत. आधी खा आणि मग बस वाचत...

परांजपे काकांचा रवि आणि केळकरांचा मिलिंदा हे आमचे 'दोन दादा ' तिथले.
क्रिकेट, कबड्डी, भोज्या, लपाछपी खेळणे, पावसाळ्यात चाळीसमोर मोकळ्या उतरत्या जागेत वाहणाऱ्या लहान पाण्याच्या प्रवाहावर धरणे बांधणे, डिसेक्शन बॉक्स वापरून - बेडूक पकडून त्याची ऑपरेशन्स करणं, घरात रस्ते आखणे, त्यावरून पुठ्ठयाच्या बनवलेल्या गाड्या चालवत बसणे या सगळ्या खेळात त्यांची दादागिरी. ती दोघं जे म्हणतील ते सगळं आम्ही चिल्ली पिल्ली करायचो. नाहीतर दोघं बुकलायचे आम्हाला.
त्यांच्या शेजारच्या घरातील बिऱ्हाड मात्र कायम बदलत असायची. अरविंदेकर, पोलिसातले चोडणकर, सी ए शशिकांत काळे, " चिपळूण नागरी पतसंस्था" च्या माध्यमातून ज्यांनी भलं मोठं विश्व उभं केलंय ते चव्हाण काका, कात व्यापारातील मोठं नाव असलेले शिर्के काका हे सगळे इथं चाळीत काही काळ राहिलेले.

पाध्ये काका आणि वहिनी हे ही चाळीतलं अत्यंत प्रेमळ असं कुटुंब.
सकाळी, संध्याकाळी तंबाखूची मिश्री लावणाऱ्या पाध्ये काकांना गंमतीजमती करत राहायची, विनोदी बोलत, हसतमुख राहायची सवय. सतत एकतर ते सायकल वगैरे स्वच्छ करत बसलेले असायचे किंवा जुन्या नाटकातील पद गात असायचे. पेटीवर देखील त्यांचा हात सराईतपणे फिरायचा.

आमच्या शेजारच्या घरात देखील बीडीओ जाधव बाई, आणि आईला घाबरून राहत असलेली त्यांची मुलगी जयुताई, त्यांच्या आगे मागे आलेलं सहस्त्रबुद्धे कुटुंब, आमच्या वरच्या मजल्यावर रहाणाऱ्या भुते आजी, वणकुद्रे काका ही सगळीच माणसं मायाळू होती. आयुष्यात पहिलं आम्लेट भुते आजीनी खायला घातलेलं. त्या आम्लेट ला " अंड्याची पोळी " असं म्हणायच्या हेही उगीच लक्षात राहिलंय.

कधी कुणाच्यात भांडणे झालेलं फारसं आठवत नाही. मात्र केळकर वहिनी मिलिंददादावर रागवायच्या. त्यानं काहीतरी उपदव्याप केलेला असायचा किंवा भांडण. पण त्याला मारताना - ओरडताना त्यांनाच फिट यायची. सगळे त्यांच्याभोवती जमायचे. मिलिंद दादा मग जोरजोरात धावत सुटे. गावभर कुठंतरी धावत जाऊन तासाभरात परत येई. त्यावेळी मात्र त्याला कुणी ओरडत नसत. हे आम्हाला त्यावेळी फार वेगळं वाटायचं. आमच्या घरी बाबा ओरडायचे, मारायचेही.  मात्र शिक्षा म्हणजे जास्त करून घराबाहेर उभं करणं असे. रात्री 9 वाजेपर्यंत वगैरे मी बाहेर उभा असायचा. आमचं दार बंद असायचं. जयुताई, पाटकर वहिनी असं कुणीतरी मला गुपचूप घरात नेऊन खायला देत. लहान मुलाला असं कुणी उपाशी बाहेर ठेवतं काय असं म्हणून बाबांवर नाराजी दाखवत. मात्र बाबांसमोर सगळे चुपचाप. मला परत घरात आत घेईपर्यंत जयुताई माझ्यासोबत बसून राही.
चाळीत परांजपे काका, पाध्ये काका, पाटकर काका
असे सर्वजण बऱ्यापैकी प्रेमळ. त्यामुळे आमच्याच बाबांचा सर्वाना धाक वाटे.
त्यावेळी संध्याकाळी सगळ्या पोरांना गोळा करून त्यांना पाढे शिकवणे, विविध स्तोत्रे शिकवणे ही कामं बाबांची. त्यामुळे सगळी मुलं बाबांना थोडी घाबरूनच. गणपतीमध्यें रस्त्यावर पडद्यावरील सिनेमा दाखवले जात. मुख्यत: अमिताभ चे आणि मराठी सिनेमे असायचे. त्या सिनेमाला जायला ही आमच्या घरून परवानगी नसे. एखाद्या खास सिनेमाला जायचं असलं तरी कुणाला तरी आमच्यासाठी बाबांकडं येऊन विनवण्या कराव्या लागायच्या. मग जाता येई.

सगळ्यांच्या घरी साधी जेवणं असायची. त्यातही मुलं कधीही कुणाच्याही घरी जेवून येत. रविवारी काहीतरी वेगळं असायचं. मग तो वेगळा पदार्थ  एकमेकांना दिला जाई. मात्र ठराविक कुटुंबातच ही देवाण घेवाण होई.

चाळ आणि परिसर तसा स्वच्छ नीटनेटका असायचा.
पावसाळ्यानंतर परिसराची साफसफाई, सार्वजनिक संडासाची सर्वांकडून केली जाणारी नियमित सफाई, रोज अंगण झाडणं हे सगळं आपापल्या पद्धतीने आपापसात वाटलं जाई.
या अनेक कामात आम्हा मुलांचा सहभाग असायचाच.

मागच्या बाजूला अर्धवट मुजवलेली विहीर होती. तिथं कचरा टाकला जाई. कुणीतरी त्या विहिरीत जीव दिलाय, त्यांचं भूत आहे अशी कहाणी अधूनमधून कानी पडायची. मात्र दिवसा आणि रात्रीदेखील तिथं आसपास हिंडताना, खेळताना आम्हा मुलांना कधी भीती वाटली नाही.

घरोघरी दूधवाले अर्धा /एक लिटर दूध देत असत. त्यातच सगळ्यांचं भागायचं. प्रसंगी डेअरीच्या दुधाच्या बाटल्या आणायचं कामही आम्हा मुलांवर असायचं. मुलं आणि मुली असा फारसा भेदही आम्हाला कधी जाणवला नाही तिथं. आम्हा मुलांसोबतच पाध्ये, शिर्के यांच्या मुली सहज कबड्डी, क्रिकेट, लगोरी, भोज्या, डबा ऐसपैस असं सगळं खेळत असायच्या.

सणाच्या दिवसात काही फारसं वेगळं  नसायचं. दिवाळी, गणपती आणि होळी हेच मुख्यत: जरा विशेष दिवस. कुणाकडे पाहुणे आले तर तेही सर्वांच्या परिचयाचे असायचे.
सुख - दुःख सगळंच एका विशिष्ट शांतपणे अनुभवणे सुरु असायचं.

ऐन दिवाळीच्या दिवशी पहाटे पाटकर काकांचा झालेला अपघाती मृत्यू  मात्र आजदेखील आम्ही कुणी विसरू शकलो नाही. तेंव्हा मी 6वीत असेन आणि त्यांचा मुलगा व भाऊ चौथीत. त्यांच्यावर काय आभाळ तेंव्हा कोसळल असेल ते पुरतं उमगलं नव्हतं. आता जाणवते. त्यातूनही पाटकर वहिनी तेंव्हा खंबीरपणे उभ्या राहिल्या. मुलाचं शिक्षण वगैरे सगळं एकटीने निभाऊन नेलं. आज जेंव्हा हे सगळं आठवतं तेंव्हा जाणवते की कोणताही बडेजाव न करता, किती नेटाने ही माणसं तेंव्हा जगत होती. लहानसहान गोष्टी देखील उपलब्ध नसताना किती शान्त सुखात जगत होती.

नंतर आमच्याही घरी लहानसा रेडिओ आला. रोज सकाळी आई रेडिओवरील गाणी ऐकत कामं करायची. मुंबई आकाशवाणीवरून ऐकू येणाऱ्या " घनू वाजे घुणघुणा.. अमृताहूनी गोड... उठी उठी गोपाला.. " आदि स्वरांमुळे झोपेतून सकाळी जागे होताना वाटलेलं प्रसन्नपण आजही आठवतं. शाळेत जाताना 11 वाजता कानावर पडलेली, ती रेडिओवरच्या कामगार सभेतील गाणी आठवतात.

बाबांना प्राण्यांचं वेड. चाळीत सुरुवातीला फ़क्त आमच्या घरात मांजरे असायची. कुत्रे असायचे. मांजर आणि कुत्रा एकत्र बसलेलं पाहून अनेकांना आश्चर्य वाटायचं.
त्याहीपेक्षा बाबा त्यांच्याशी जे बोलायचे ते चाळीत जाम फेमस झालेलं. पिंकी डोनाल्ड, सुंदर, चंपाकली, खरबी अशी  मांजरांची विविध नावं तर ज्यूली, राणी, वाघ्या, राजू, मोती असे कुत्रे. ही सगळी बाबांच्या आसपास असायची. बाबा आम्हा मुलांशी बोलायचे त्यापेक्षा कितीतरी पट जास्त ते सतत या मंडळींशी बोलायचे..

" सुंदर, गाढवा कुठं उंडगून आलायस.. बघ ते अंग कसं मळलंय.. थांब, अंगावर उडया मारू नको.. देतो देतो दूध.. जरा धीर धर.. " असं काही बोक्याशी बोलणं असायचं.
" राणू बाई.., ये गं.. काय झालं तुला.. अशी का रुसून बसलीये. इथं जवळ ये बघू.. " असं काहीसं ऐकू गेल्यावर एकदा शेजारच्या वहिनी तर चक्क बघायला आलेल्या.. अहो नाईक काका, कोण आलंय, कुणाशी बोलताय.. वहिनी कुठंयत..? " मग जेंव्हा कळलं की हे असं बोक्याशी, भाटीशी, कुत्र्यांशी बोलत असतात तेंव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला...!

आम्ही गावी वगैरे गेल्यावर सगळं शांत असे. शेजारी कुणीतरी या मांजराना, कुत्र्याला खायला देत. ही मंडळी इतकी गुणी होती की आमच्याच घरात नव्हे तर इतरांच्या घरात देखील कधी चोरून दूध पिणं वगैरे प्रकार त्यांनी कधी केले नाहीत.

बाबा आले की पहिलं त्यांच्याशी बोलणं सुरु होई.. मग सगळ्यांना कळे की मंडळी आली गावाहून.  माणसांशी बोलणं त्यानंतर असायचं.

चार चाकी गाडी कुणाकडे ही नव्हती. शिर्के काकांचा काताची मालवाहतूक करणारा ट्रक म्हणजे काहीतरी भव्य दिव्य वाटायचं आम्हाला. बाबांकडे दर गुरुवारी  पुरुषानाना भागवत आणि चितळे अण्णा येत ते पुरुषानानांच्या दणकट आम्बासेडर गाडीतून.  सगळे स्वामी समर्थांच्या मठात जाऊन येत आणि त्यांनतर काहीतरी खास नाश्ता. तिघांच्या घरी आळीपाळीने असं काही खास नाश्त्याला बने. आम्ही त्याची वाट पाहत असायचो.
एक वेगळंच जिव्हाळ्याचं विश्व होतं ते.

काळाच्या ओघात बहुतेक सगळ्यांनी अन्य ठिकाणी आपापली घरं बांधली. रवी, पाध्येकाका, परांजपे मॅडम, माझी आई हेही आता देवाघरी... बाकीची ज्येष्ठ मंडळी पैलतीरी नजर लावून बसलीयत.

आम्ही या पिढीतले सारेही कुठंकुठं विखुरलं गेलोय. मात्र अजून ही बालपण म्हटलं की तिथल्या, त्या चाळीतल्याच असंख्य लहान मोठया गोष्टी आठवत राहतात. "836, पाटकर चाळ" हा पत्तादेखील अजूनही उगीच लक्षात राहिलाय.

खेळ, वाचन, रेडिओवरील जुनी गाणी, ते कामगार सभेसारखे कार्यक्रम, टेपरेकॉर्डरवर प्रथम ऐकलेले पु. ल., एकमेकांना सुखात, दुःखात सहज सहभागी करून घेणं, कोणतेही मोठे समारंभ, दिखावा न करता देखील एकमेकांचं मन जपणं आदि गोष्टीनी त्या वाढत्या वयात नवीन काही दिलं. जे त्यावेळी कळलं नव्हतं, मात्र नंतर जाणवत राहिलं.. अगदी आजपर्यन्त. सगळ्यांच्याच आयुष्यात अशा चाळी, असे शेजारी, असे दिवस कदाचित आले असतीलच. त्या जगण्यानं दिलेले संस्कार, त्या जाणीवा वेगळ्याच.
नकळत झालेल्या त्या संस्कारांनी आयुष्य किती समृद्ध झालं याची मोजदाद कशी करायची?
- सुधांशु नाईक, 9833299791
मुक्काम - सध्या कॅमेरून 🌿

9 comments:

  1. मी मीनल ओगले.माझे पण बालपण दादर,मुंबईतील एका चाळीतच गेले आहे.चाळ सोडून खूप वर्ष झाली.तरी काहीं काहीं गोष्टी अजून वेळोवेळी आठवतात.तुम्ही छान लिहीले आहे.

    ReplyDelete
  2. 😄😄😄😄😄😄

    ReplyDelete
  3. वा, खूप छान आठवणी, मी या काळात चिपळूणात नव्हते तरीही ते सगळंच आपलं वाटलं, खूप आवडलंय

    ReplyDelete
  4. अतिशय हृद्य आठवणी. मुंबईत राहूनही चाळीचा अनुभव घेता येत नाही म्हणून शाळकरी वयात मी मुद्दाम माझ्या एका नातेवाईकांकडे रहायला जायचे , त्या आठवणी मनाच्या कप्प्यातून अलगद वर आल्या.
    धन्यवाद !

    ReplyDelete
  5. छान लिहिलं आहे🥰

    ReplyDelete
  6. Hrishikesh kelkar6 November 2022 at 20:44

    आठवणी जाग्या झाल्या....

    ReplyDelete
  7. छान आठवणी व व्यक्तिचित्रं!

    ReplyDelete
  8. खुप छान लिहिले आहे...

    ReplyDelete