marathi blog vishwa

Sunday 20 November 2022

भूक

"सहजच सुचलेलं..."  या लेखमालेतील हा पुढचा लेख आपल्या सर्वांच्या आयुष्याशी जोडल्या गेलेल्या भुकेबाबत....
3. भूक
- सुधांशु नाईक 
गेल्या काही आठवड्यात भुकेबाबत 2,3 गोष्टी जाहीरपणे जागतिक मीडियातून समोर आल्या. एक म्हणजे केनिया मध्ये यंदा अत्यंत दुष्काळ असून कित्येक प्राणी अन्नपाण्यावाचून तडफडून मरत आहेत. त्याचबरोबर युक्रेन मधील युद्धामुळे धान्यउद्पादनावर मोठया प्रमाणात परिणाम होणार असून आगामी काळात भूकबळी वाढण्याबाबत चिंता व्यक्त केली गेली.

आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या भुकेबाबतचं हे चिंतन....

पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन
मी राजाच्या सदनि अथवा घोर रानी शिरेन....

असं खरेशास्त्री अनेक वर्षांपूर्वी म्हणून गेलेत. त्या भुकेचा अनुभव मात्र सर्वच प्राणीमात्रासाठी जीवघेणा असतो. जर वीतभर पोटात भूक नसती तर जगणं किती सहजसोपं झालं असतं असं अनेक तत्वचिंतक सांगून जातात तर तुम्ही तुमच्या भुकेवर नियंत्रण ठेवलं तर तुमचं आरोग्य चांगलं राहील असं आहारतज्ज्ञ सांगतात.
भुकेवर कंट्रोल किंवा नियंत्रण ठेवणं इतकं सोपं आहे का हो? मुळात ज्यांना मुबलक प्रमाणात अन्न उपलब्ध आहे त्यांच्यापेक्षा ज्यांना दोन वेळ पोटभर अन्न मिळतच नाही त्यांची संख्या जगात जास्त असावी.
अफ्रिका काय आणि भारत काय सगळीकडेच लोकांचे भुकेले चेहेरे आपल्याला उदास करत राहतात. शहरापासून मेळघाट सारख्या दुर्गम भागापर्यंत भुकेचं भीषण रूप दिसत राहतं
आफ्रिकेत कामं करत असताना तर ही भूक ठाई ठाई दिसत राहिली.

कित्येक देशात आजही लोकांना एकवेळचं अन्न उपलब्ध नाहीये. साईटवर जाताना अनेकदा माणसांच्या, मुलांच्या लहान मोठया झुंडी गाडीमागे धावत येत. बिस्किटे, फळं, चॉकलेट असं जे काही देऊ त्यासाठी जीव टाकत.
या सगळ्यांना एकवेळचं खाणं देखील आपण रोज देऊ शकत नाही या जाणीवेने मन खट्टू होऊन जाई.
अनेक मुलं, स्त्रिया आसपासच्या दुकानातून काही न काही घेऊन बाहेर विकायला गाड्यांभोवती धावत असतात. दिवसभरात जितकं विकतात त्यावर त्यांना तुटपुंजे कमिशन मिळतं. सिग्नलला तर ती सगळी असतातच पण ट्रॅफिकमध्यें ही गाड्यांच्या आजूबाजूला धावत असतात. कुणी बिस्किटे, टिशू पेपर, पेन, वही, कोल्ड्रिंक असं काही विकलं जावं म्हणून उन्हातून धावत असतं. रोज सगळ्यांकडून सगळं कसं आपण विकत घेऊ शकणार? गाडीच्या काचेवर टकटक करून लक्ष वेधून घेणारे त्यांचे दीनवाणे चेहरे पाहून गलबलून येतं. त्यांच्यापासून चेहरा लपवायचे आपण प्रयत्न करत बसतो आणि मनोमन वेदना भरून येतें.

आफ्रिकेत फिरताना या लहान विक्रेत्यांमध्ये  वेगळ्या मुलीही असतात. देह विकू पाहणाऱ्या. 1 वेळचं जेवण मिळावं इतक्या माफक अपेक्षेने जेंव्हा मुली, स्त्रिया देह विकू जातात तेंव्हा आपण माणूस म्हणून कशाला जन्माला आलो असं वाटू लागतं.
दिवसाला 50,100 रु मिळावेत, स्वतःची आणि सोबत अन्य कुणी नातेवाईक असलाच तर त्यांचीही 2 वेळच्या अन्नाची सोय व्हावी, भूक भागावी म्हणून कुणाचीही शय्यासोबत करणाऱ्या मुली जगभरात दिसत राहतात. काळ्या, गोऱ्या, सावळ्या, उंच, बुटक्या... सगळ्यांच्या आयुष्यात केवळ अक्राळ विक्राळ भूक उरलेली असते. पोटाची भूक तर त्यांना त्रास देत असतेच पण इतर आधाशीपणे तुटून पडणाऱ्या लोकांच्या वासनेची भूक देखील त्यांना कित्येकदा उपाशीपोटी भागवावी लागते.

वर्ल्ड फूड ऑरगॅनायझेशन पासून गावोगावी असणाऱ्या लहान मोठया सामाजिक संस्थांपर्यंत कित्येक जण भुकेलेल्याना अन्न मिळावं म्हणून धडपडत आहेत मात्र त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. खरं म्हणजे " भुकेलेल्याना अन्न आणि तहानलेल्याना पाणी द्यावं " असं सांगणारी आपली प्राचीन संस्कृती. मात्र हल्लीच्या
काळात " मी आणि माझ्यापुरतं " हीच वृत्ती इतकी वाढलीये की काही अपवाद वगळता बहुसंख्य आपण जणू निगरगट्ट बनून गेलोय.

आसपास भुकेने कळवळणारे जीव आपल्याला कुठंच हल्ली भिडत नाहीत का?

आपण कुठं कुठं फिरायला जातो, कामानिमित्त दिवसभर हिंडत राहतो. प्रचंड भूक लागते तेंव्हा जे मिळेल ते खाऊन टाकतो. वडापाव, सॅन्डविच, इडली, पोहे, चिकन 65, व्रॅप सॅन्डविच, नूडल्स असं ज्या त्या वेळी लोकांना मिळावं म्हणून गावोगावी हजारो लहान मोठी हॉटेल्स, टपऱ्या असतात. शेकडो लोक त्यातूनच राबत असतात. मात्र एखाद्यादिवशी काहीच मिळालं नाही तर आपल्या पोटात अक्षरशः आग पडते. कधी घरी जातो आणि काही खातो असं होऊन जातं. एखाद्या दिवशी देखील आपल्याला भूक सहन होत नाही मग ही लाखो माणसं रोजचे उपवास कसं निभावून नेत असतील हा विचार प्रचंड अस्वस्थ करतो.
कॅमेरून ची राजधानी याऊंदे. तिथल्या आमच्या ऑफिस मध्यें हेल्पर म्हणून काम करत असलेल्या ज्युलीयसला विचारलं, काय बाबा आज तब्येत बरी नाही का? असा का गप्प गप्प बसलायस..?
तर आधी त्यानं उत्तरं द्यायला टाळाटाळ केली.
मग म्हणाला, " सर, 2 दिवस जेवणच नाहीये घरात कुणाला... "
मी म्हटलं, " का, तुझा पगार तर मिळालाय, काय केलं त्याचं? "
" घराचं भाडं, फोन, पाणी आणि वीज बिल यासोबत या महिन्यात मुलांच्या शाळेची फी भरली. एका मित्राचा वाढदिवस म्हणून बापानं उरलेल्या पैसे त्यावर खर्च केले. आता सगळे घरात बसलोय. इतर कुणी कामं करत नाहीत. "
त्याला मी आणि इतर सहकाऱ्यांनी वैयक्तिक काही मदत केली. घरी सगळ्यांना पुढच्या 8 दिवसाचं जेवण मिळेल याची सोय करून दिली. मात्र पुढं काय हा प्रश्न होताच.
इथं आफ्रिकेत एका प्रकर्षाने जाणवलं की लोकांना फक्त आजमध्ये जगतात. फ़क्त आजचाच विचार करतात. आले पैसे हाताशी की लगेच खर्च करून मोकळे. अगदी रोजकमाई करणारी मंडळी देखील हाती पैसे आले की हातात बियरचे कॅन आणि जेवणासाठी पदार्थ घेऊन ती कमाई संपवून टाकतात. शहरांत श्रीमंत आणि गरीब लोकांमधील दरी तर ठळकपणे जाणवणारी.

आसपासच्या खेड्यात मात्र जरा लोक स्वयंपूर्ण असल्याचे आढळते. मातीची किंवा लाकडी घरं, आसपास केळी, प्लम, पपया, आंब्याची झाडें असतात. बटाटा, कसावा सुरणासारख्या अन्य काही कंदाची लागवड केलेली असते. कित्येकदा तर जवळच्या बाजारापर्यंत कित्येकदा किलोमीटर लोक चालत जातात. कच्च्या केळ्याचे वेफर्स, फळं विकून जे काही मिळेल त्यावर गुजराण.
हे सगळं पोटासाठी. त्यातही मुख्यत: घरची बाईच जास्त कामं करते. मुलं जन्माला घालण्यापुरता पुरुष. अनेकदा असं दिसतं की आपापल्या मुलांना या बायकाच वाढवतात. आमच्या गेस्टहाऊस वर कुक म्हणून काम करणारी लौवेट ही तिशीची बाई. इथं आधी मैत्री, प्रेम होते. मुलं होतात. मग चार पैसे गाठीशी जमले, खर्च करू शकतोय अशी परिस्थिती आलीच तर मग चर्च मध्यें जाऊन लग्न.
वयाच्या 17 व्या वर्षी पहिली मुलगी. मग अजून 2 मुलं. नंतर तो दुसऱ्या गावी निघून गेलाय. तिथं दुसरीसोबत पुन्हा तिची मुलं..

इथं ही मग त्या मुलांना वाढवते. दुपारपर्यंत आमच्याकडे कामं करते. दुपारनंतर बाजारच्या रस्त्यावर लहानसा फूड स्टॉल चालवते. कित्येक दिवस उपाशी घालवल्यावर मग तिनं स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं. आज आपल्या मुलांसोबत बहीण आणि तिच्या 2 मुलांच्या पोटाची भूक भागवतेय, त्यांच्या शिक्षणाचा खर्च निभावून नेतेय. " सर, पोटात अन्न नसताना मुलं कशी कळवळायची, पाणी पिऊन सगळेच झोपायचो तेंव्हा फार वाईट वाटायचं. आपण मुलं जन्माला का घातलीय असं अपराधी वाटायचं. अनेक ठिकाणी कामं मागितली. कुणी काम देईना. मग रस्त्यावर वस्तू विकून पैसे गोळा केले. लहानसा फूड स्टॉल सुरु केला. रात्री 4 घास जेवून जेंव्हा मुलं तृप्त झोपतात तेंव्हा फार समाधान वाटतं. But life is very difficult sir... Better to die than living Without food... " असं तिचं वाक्य मनात बाणासारखं घुसतं.

तरीही लायबेरिया, कॉंगो, गिनी, आयवरी कोस्ट अशा देशांपेक्षा कॅमेरून खूपच बरं म्हणायला हवं. इथं किमान प्रत्येकजण पोटासाठी काही धडपड करताना दिसतो. रस्त्यांवर भिकारीदेखील कमी दिसतात. मात्र इतर काही देशांत भुकेने व्याकुळलेले जथेच्या जथे दिसतात. मोजकी लोक कामं करतात, कित्येक जण ईश्वरावर हवाला ठेऊन दिवस ढकलतात कुणी भीक मागतं तर कुणी चोऱ्यामाऱ्या करतं. भुकेल्या लोकांना अन्नाची आशा दाखवून राजरोस लुबाडणारे किंवा संभावितपणे सभ्यतेच्या बुरख्याआडून त्यांना गंडवून जाणारेही मग दिसत राहतात. सगळं कसं जंगलातल्या आयुष्यासारखं. रोजच्या घासभर अन्नासाठी सगळी यातायात...!
माणसांची ही अवस्था तर मुक्या प्राण्यांच्या वेदनेविषयी सगळं बोलायच्या पलीकडे.

जगभर सगळीकडेच अशा कहाण्या. असे किस्से. किती आणि कुणाला सांगायचं? 2,4 उपाशी माणसांच्या पोटात रोज किमान एकवेळचं अन्न जात राहावं इतकंच आपण करू शकतो. करत राहूया.
- सुधांशु नाईक,9833299791 🌿

2 comments:

  1. अवघड परिस्थिती आहे पण प्रयत्न निश्चित करू.

    ReplyDelete
  2. बापरे भयंकरच....अवघड आहे सगळं....भूक नसती तर खरंच जगणं सोपं झालं असतं.....गाडी भोवती मुलं गोळा होतात ते वाचून तर खूप वाईट वाटलं

    ReplyDelete