मना सज्जना…: तुजवीण रामा मज कंठवेना…
रामनवमी, १७/०४/२४
- सुधांशु नाईक
आज रामनवमी आणि समर्थ रामदास यांचीसुद्धा जयंती. आपण ज्याला सर्वाधिक जवळचा, जीवीचा जिवलग मानतो, प्रत्येक क्षण आपण ज्याचा निदिध्यास घेतो, त्याचा आणि आपला जन्मक्षण सारखाच असणे ही किती अलौकिक आणि भाग्याची गोष्ट. हे भाग्य समर्थांच्या वाट्याला आले. तरी आयुष्यभराची दगदग टळली नाही. त्या रामरायाचे पिसे लागले आणि मग समर्थांच्या पायाला चक्र लाभले.
घर सोडून पळून गेलेल्या त्या लहान मुलाने मग अखंड पायपीट केली. एकीकडे “तन-मन-धन माझें राघवा रूप तुझें...” असे मानणारे समर्थ, लोकांना आपलेसे करणारे समर्थ गावोगावी जोडलेल्या नाती-गोती-माया-जिव्हाळा यांच्या बेड्याना नक्कीच उमजून असणार. विरागी विरक्त संन्यासी मनोवृत्तीच्या मनाला हे सारे बंध नाजूक पण कठोर हातानी अलगद दूर करणे किती कष्टदायक..!
समर्थ हे सारे अनुभवत पुढे जात होते. जिथे जिथे लोकसंग्रह करायचा आहे, लोकांचा समूह बनवायचा आहे, ते घडवून त्यांना नि:स्वार्थी, निस्पृह बनवून पुन्हा त्यातून बाहेर पडत होते. “दास डोंगरी राहतो...यात्रा देवाची पाहतो...” अशा तटस्थभावाने पुढे जात राहिले. तरीही मैत्रीचे, जिव्हाळ्याचे, गावोगावी भेटणाऱ्या मायाळू माऊल्यांचे वात्सल्यबंध निश्चयाने दूर करताना त्यानाही किती यातना झाल्या असतील. ते स्वतःच हे सारे मोजक्या शब्दात अतीव परिमाणकारकरित्या सांगताना म्हणतात,
चपळपण
मनाचें मोडितां मोडवेना । सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । म्हणवुनि करूणा हे बोलतो
दीनवाचा ॥
या सगळ्यातून जाताना त्यांच्या मनातील लोककल्याणाचा विचार कधीही दुर्लक्षित राहिला नाही. जनजागरण, भ्रमंती, बलोपासनेचे धडे, देशभर विविध मठांची निर्मिती हे सारे कार्य जोमाने सुरु असताना मनात मात्र सदैव रामरायाला भेटण्याची, जगातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा बळावलेली होतीच. नियतीने हाती सोपवलेले कार्य पूर्ण होण्यासाठी एखाद्याला जगणे क्रमप्राप्त होते तेंव्हा तळमळणारे मन मग मोक्ष आणि मुक्तीच्या अपेक्षेने आक्रंदन करत म्हणू लागते;
आम्हां
अनाथांसि तूं एक दाता । संसारचिंता चुकवीं समर्था ॥
दासा मनीं आठव वीसरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥
आयुष्य रामरायाला समर्पित केलेल्या रामदासांना सुद्धा जेंव्हा रामाचा विरह सोसवेनासा होतो तिथे आपल्यासारख्या बापुड्यानी काय करायचे? रामाची आणि रामदासांची आठवण आली की हमखास करुणाष्टके आठवतातच आणि भावविभोर मन हेलावून जाते.
-सुधांशु नाईक(९८३३१२९९७९१)🌿
No comments:
Post a Comment