मना सज्जना... भाग २५ : केल्याने होत आहे रे...
-सुधांशु
नाईक
शनिवार, ३०/०३/२४
“मना सज्जना..” या तीन महिने सुरु असलेल्या लेखमालेचा उद्देश हाच होता की मनाला अधिकाधिक सक्षम करता येणे, आपल्यातील न्यून जाणून घेऊन त्यावर तोडगा काढायला उद्युक्त होणे, आपल्यातील सुप्त गुण ओळखणे, आपल्या आणि इतरांच्या भल्यासाठी काही कृती करायला सुरुवात करणे ज्यायोगे सर्वांच्या आयुष्यात चार क्षण आनंदाचे असू शकतात. आयुष्यात चांगले दिवस येण्यासाठी वाईट क्षण अनुभवणे, त्यावर तोडगा काढून पुढे जाणे क्रमप्राप्त असते म्हणूनच गेल्या काही भागात आपण चिंता, स्वार्थ, भय, क्रोध आदि गोष्टीबाबत विचार केला. आयुष्यात या सर्व गोष्टी आपल्या कृतीच्या, प्रगतीच्या आड येत असतात. त्याचबरोबर आर्थिक सहाय्य, फसवणूक, नैसर्गिक आपत्ती आदि अडचणींमुळे आपण निश्चित केलेले ध्येय गाठण्यात आपल्याला अनेकदा अपयश येते. कधी आपलेच निर्णय चुकल्याची जाणीव होते. कोणतीही चूक ही अजिबात वाईट नसते अशा अर्थाचे एक वचन आहे, त्याचा अर्थ हाच की झालेली चूक, पदरी पडलेले अपयश हे तुम्हाला उलट ज्ञान देऊन जाते. काय करायचे नाही हे आपल्या मनाला ठाम ठरवता आले की मग काय करायला हवे यावर लक्ष केंद्रित करता येते.
ज्या ज्या थोर माणसांची चरित्रे आपण वाचलेली असतात, किंवा काही मोठ्या व्यक्तींचे आयुष्य घडताना पाहिलेले असते त्यांना देखील या सगळ्या अडचणी भेडसावत होत्याच. तरीही मोठ्या जिद्दीने, चिकाटीने ते पुढे पुढे वाटचाल करत राहिले. मोठ्यांच्या चरित्रातून हेच तर आपल्याला शिकता येते. कित्येक वेळा असे घडते की आपण अमुक केले तर असे होईल, ही अडचण येईल, ते जमणार नाही असे म्हणून कृती करण्यापूर्वी सुरुवातीलाच माघार घेतो. तर कित्येकदा हाती एखादे काम घेतल्यावर लगेचच धरसोड करत ते काम टाकून देतो. इथे आपली प्रगल्भता न दिसता केवळ आरंभशूरता दिसते.त्यामुळे या सगळ्याविषयी सारासार विचार करून मग पाऊल उचलणे आवश्यक ठरते. केवळ गप्पा मारल्याने, मोठमोठ्या बढाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती घडणे महत्वाचे. त्यातही योग्य ती कृती घडणे अधिक महत्वाचे. म्हणूनच समर्थ म्हणतात की,
केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ।
यत्न्य तो देव जाणावा । अंतरी धरता बरे ।।
जेंव्हा विचारपूर्वक आपण कृती करू जातो तेंव्हा मन आत्मविश्वासाने भरून जाते. छत्रपती शिवाजी महाराज, शंभू राजे, पहिले बाजीराव पेशवे यांची चरित्रे अभ्यासली की असे दिसते की हजारो अडचणी त्यांच्या समोर होत्या. मात्र ध्येयनिश्चिती केल्यानंतर, वाटचाल करताना कितीही अडचणी आल्या तरीही त्यांनी आपले लक्ष कधीच विचलित होऊ दिले नाही. कठोपनिषदात म्हटल्यानुसार “उत्तिष्ठ...जागृत: प्राप्य वरान्निबोधत...” हेच महत्वाचे. पोकळ गप्पांमध्ये न रमता समाज कृतीशील होणे हे फलदायी आहे यात शंकाच नाही.
-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)
गेले तीन महिने या लेखमालेद्वारे मनाविषयीचे हे लेख लिहिले. आता गुढीपाडव्यापासून अजून काहीतरी वेगळे लिहायचा प्रयत्न असेल. ही लेखमाला तुम्हाला कशी वाटली, मन याविषयी तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल हे आवर्जून सांगावे ही विनंती.
No comments:
Post a Comment