सुधा_म्हणे ....
गाथा एका गौरवशाली अवशेषाची....
-सुधांशु नाईक
२३/०७/२०२४.
आजपासून नव्या संसद भवनातील सभागृहात नव्या सरकारकडून अर्थसंकल्प सादर होणार आहे. नवे संसद भवन आणि पूर्वीचे संसद भवन यांची रचना काही मंदिरांच्या रचनेशी साधर्म्य सांगणारी आहे. आधीचे संसद भवन हे “चौसष्ट योगिनी मंदिरांच्या वास्तू रचनेशी साधर्म्य सांगणारे होते. तर नवे सेन्ट्रल विस्टा हे संसद भवन विजय मंदिराशी मिळते जुळते आहे. ही दोन्ही मंदिरे मध्य प्रदेशातच आहेत हा एक छान योगायोग.
“सेन्ट्रल विस्टा”हे नवे संसद भवन निर्माण करताना विविध प्रकारचे आराखडे, विविध प्राचीन स्थळांचे आराखडे हे सारे अभ्यासले गेले. मध्य भारतातील एका प्राचीन मंदिराचादेखील त्यात समावेश होता आणि सध्याच्या वास्तूचे या मंदिरासोबत खूपसे साधर्म्य असल्याचे आढळून येते याविषयी वृत्तपत्रात एकदा बातमीदेखील आलेली. औरंजेबाने सतत तोफा डागून उध्वस्त केलेल्या या भव्य मंदिराला भेट देण्याचा योग आला. त्याविषयीचा हा लेख...
आपल्या देशाला प्राचीन वारसा स्थळांची अजिबात कमतरता नाही. बांधकामाबाबत अनेक आश्चर्ये आपल्याला दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत आपल्याला पहायला मिळतात. बेलूर –हळेबिडू-तंजावर-कोणार्क- खजुराहो आदि ठिकाणांसह शेकडो मंदिरे आजही लोकांना विस्मयाने खिळवून ठेवणारी आहेत. तर काही जागा अशा आहेत की त्यांचे उध्वस्त अवशेष पाहताना देखील तिथं काय काय घडलं असेल याच्या कल्पनेने देखील अंगावर काटा येतो. भोपाळ परिसरातील बीजा मंडल या लहानशा गावातील सूर्य मंदिर किंवा विजय मंदिरदेखील असेच एक स्थळ.
( जुने संसद भवन आणि चौसष्ट योगिनी मंदिर. नवे संसद भवन आणि विजय मंदिर )
हिंदुस्थान. भारत. हजारो वर्षांपासून चिवट कण्याने लढून स्वतःचे वेगळे अस्तित्व जपलेला देश. आपल्या इतिहासातील सर्वात महत्वाची गोष्ट कोणती, आपले वैशिष्ट्य काय असे कुणी विचारल्यावर मी तर म्हणेन, “ हजारो वर्षांपासून कुणी ना कुणी आक्रमक इथे येत राहिला, इथली संस्कृती, इथला वारसा, इथलं जनजीवन ढवळत राहिला, हे सारं उध्वस्त करायला अनन्वित अत्याचार करत राहिला तरीही जी संस्कृती नामशेष झाली नाही, उलट गौरवाने पुन्हा उभी राहिली ती आपली संस्कृती. त्याच बरोबर हेही सांगायला हवे की इतके अत्याचार सोसूनही दर ५०-१०० वर्षांनी पुन:पुन्हा गाफील राहणारा देश म्हणजे आपला देश.” मला तर इतिहासात असेच दिसत राहते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बीजा मंडल येथील हे मंदिर.
भोपाळपासून सुमारे ५० किलोमीटरवर आहे सांची. इथला प्राचीन बौद्ध स्तूप हे आज जागतिक दर्जाचे वारसा स्थळ आहे. हजारो लोक तिथं दरवर्षी भेट देत असतात. मात्र तिथून पुढे अवघ्या १०-१२ किलोमीटरवर असलेल्या विदिशाजवळील हे प्राचीन मंदिर पाहायला मोजकीच माणसे जातात कारण इथला इतिहासच त्यांना कुणी सांगितलेला नसतो. हेच आपले दुर्दैव..!मुळात विदिशा या शहराचा इतिहास फार प्राचीन. अगदी सम्राट अशोकाच्या काळापर्यंत जाणारा. राजा अशोक यांची राणी वेदीस महादेवी ही इथल्या एका धनाढ्य व्यापाऱ्याची मुलगी असल्याचे उल्लेख आढळतात. तिच्या नावावरून या नगरीचे नाव विदिशा झाले असावे असा एक मतप्रवाह आहे. या नगराचे चालुक्य कालीन प्राचीन नाव भेलसा असे देखील आहे. चालुक्यकालीन राजा कृष्ण यांनी विदिशा किंवा भेलसावर विजय मिळवला. सूर्यवंशी असलेल्या चालुक्यांनी मिळालेल्या विजयानंतर, त्यांच्या पंतप्रधान वाचस्पती याने इथे “भेल्लीस्वामीन” म्हणजेच सूर्य मंदिराची उभारणी केली असे इतिहास सांगतो आणि त्यानंतर इथं चर्चिकादेवी म्हणजेच चामुंडादेवीचे मंदिरदेखील उभारण्यात आले होते हेही नोंदवून ठेवतो.एकेकाळी इथले मंदिर इतके भव्य होते की संपूर्ण मंदिर परिसर हा जवळपास अर्धा मैल लांब होता. इथले शिखर सुमारे तीनशे फुटांइतके उंच होते आणि आसपासच्या सर्व गावातून ते सहज नजरेस पडत असे असे उल्लेख आढळतात. तिथे आठ –दहा फूट उंचीच्या मूर्ती होत्या. मात्र सगळे सगळे नंतर मुस्लिम आक्रमकांनी उध्वस्त केलं.या मंदिर परिसरात एक अतिशय सुंदर अशी “पायऱ्यांची मोठी विहीर” (stepwell) किंवा बाव आहे. त्यावरील कोरीव काम आजदेखील पाहण्यासारखे आहे. आजही तिथे भरपूर पाणी उपलब्ध आहे. मंदिराचा त्रिकोणी परिसर, उंच उंच पायऱ्या, मैदानसदृश मोकळी जागा हे सारे आजच्या नव्या संसद भवनाच्या रचनेशी खूप साधर्म्य सांगणारे आहे. मात्र केवळ इतक्याच गोष्टीचा अभिमान न बाळगता, या परिसराची नीट पुनर्मांडणी व्हायला हवी. आसपासचा परिसर केवळ एक खेडं बनून राहिला आहे. ते बदलायला हवं. या मंदिराचा, इथल्या लोकांनी दिलेल्या लढ्याचा, त्यांच्या बलिदानाचा इतिहास सर्वत्र दुमदुमला पाहिजे असे मला वाटते.
यंदाच्या दौऱ्यात मोजकीच ठिकाणे पाहता आली, आता पुनश्चः एकदा निवांतपणे जायचं आहे. इथल्या निसर्गात, शांत सुशेगात वातावरणात, इथल्या प्राचीन इतिहासात खोलवर बुडून जायचे आहे. विजयमंदिर आणि परिसरातील अन्य देखण्या स्थानांचे अधिक सुंदर जतन होत राहावे आणि हा इतिहास जगासमोर अधिकाधिक येत राहावा यासाठी प्रयत्न करत राहायला हवे..!
-सुधांशु नाईक,पुणे. (९८३३२९९७९१)🌿
I read your blog and I really liked it. I have read another blog similar to this one, I liked the table very much click here
ReplyDeleteधन्यवाद . आपले नाव आणि त्या अन्य लेखाचे डिटेल्स द्याल का ? वाचून पाहतो.
Delete