marathi blog vishwa

Thursday 12 September 2024

खांब बाबा किंवा हेलीओडोरसचा स्तंभ

#सुधा_म्हणे ....
खांब बाबा किंवा हेलीओडोरसचा स्तंभ....
सुधांशु नाईक
१२/०९/२०२४. 
आपल्या देशात अनेक ठिकाणे अशी असतात की त्यांचा इतिहास हा थेट दोन चार हजार वर्षांपर्यंत जातो. तो जाणून घेताना, त्या काळी भन्नाट जगलेल्या काही लोकांच्या आयुष्याचा पट उमजून घेताना मन हरखून जाते. अवचित काहीतरी वेगळे आढळते आणि आपण थक्क होऊन जातो. विदिशाजवळील “खांब-बाबा किंवा हेलीओडोरसचा स्तंभ” ही आपल्यासाठी अशीच एक आगळीवेगळी गोष्ट आहे...!

कोण होता हेलीओडोरस असं विचारलं तर अगदी जवळच्या भोपाळसारख्या शहरातील १०% लोक तरी उत्तर देऊ शकतील का अशी खरंतर आपली अवस्था. म्हणूनच असा इतिहास, अशी वारसा स्थळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे हे आपले कर्तव्य बनते....
तर मित्रहो, हा हेलीओडोरस एक ग्रीक राजदूत होता. इ.स. पूर्व ११३-११५ च्या सुमारास त्याला इकडे विदिशामध्ये पाठवले गेले. त्या काळी इंडो-ग्रीक प्रदेश मानल्या गेलेल्या तक्षशिलेच्या प्रांतावर Antialcidas नावाच्या ग्रीक राजाची सत्ता होती. त्याचाच राजदूत म्हणून हेलीओडोरस शुंगवंशीय भागभद्र राजाकडे आला. त्याने येथे येऊन वैष्णव किंवा भागवत धर्म स्वीकारला आणि एक स्तंभ निर्माण केला जो आपल्याला प्राचीन काळात घेऊन जातो.
मौर्यांचा शेवटचा राजा बृहद्रथ याच्या कारकिर्दीत त्याचा सेनापती असलेल्या पुष्यमित्र शुंग याने राजाची हत्या केली आणि सत्ता आपल्या ताब्यात घेतली. शुंग वंशाच्या काळात पश्चिमेकडून आलेल्या परकीय यवनांचा पराभव करून त्यांना पुन्हा देशाच्या सीमेबाहेर पिटाळले गेले होते. मौर्यांच्या नंतर विदिशाचा हा सर्व प्रदेश शुंग घराण्याच्या ताब्यात आला. शुंग वंशातील विविध राजांनी पुढील कित्येक दशके सारी मगध सत्ता आपल्या ताब्यात ठेवली. विदिशामधील स्तूपाच्या आसपासचे काही काम किंवा अन्य ठिकाणी काही बांधकामे त्यांच्याच काळात झाली होती. त्यातच एक आहे हा हेलीओडोरस स्तंभ किंवा पिलर. 
हेलीओडोरस हा ग्रीक राजदूत इथे आल्याचा हा नुसता भक्कम पुरावा नव्हे तर त्यापेक्षा अधिक काहीतरी हा स्तंभ आपल्याला सांगत राहतो.
हेलीओडोरसच्या या स्तंभावर भागभद्र राजाचा उल्लेख आढळतो. या स्तंभावर ब्राम्ही/पाली भाषेत शिलालेख कोरला आहे. भागभद्र राजाची कारकीर्द सुरु असताना, त्याच्या कारकिर्दीच्या 14 व्या वर्षात हा स्तंभ निर्माण केल्याचा उल्लेख तिथे आढळतो. हा भागभद्र राजा आणि शुंग वंशातील भागभद्र राजा बहुदा एकच असावेत असा इतिहास तज्ञांचा कयास आहे.
त्या काळात वैष्णव किंवा भागवत धर्म मोठ्या प्रमाणात वाढत होता. हेलीओडोरस देखील यामुळे प्रभावित झाला. त्याने भागवत धर्म स्वीकारला आणि गरुडस्तंभाची निर्मिती केली. वासुदेव म्हणजेच कृष्ण किंवा विष्णूचा उल्लेख देखील या स्तंभावर केल्याचे आढळून आले आहे.  

याच गरुडस्तंभाला सध्या खांबबाबा किंवा हेलीओडोरस पिलर अशा नावाने ओळखले जाते. या परीसरात १८७७ मध्ये अलेक्झांडर कनिंघमच्या काळात उत्खनन केले गेले. त्यात हा स्तंभ प्रथम आढळून आला. त्याच्यावर साचलेल्या थरामुळे इथला शिलालेख नीटसा अजिबात दिसत नव्हता. नंतरच्या काळात १९१० च्या सुमारास एच.एच. लाके यांच्या नेतृत्वाखाली काही भारतीय आणि ब्रिटीश पुरातत्व अधिकाऱ्यांनी या स्तंभाची स्वच्छता केली. त्यावरील थर काढून टाकले आणि तेंव्हा ब्राह्मी / पाली भाषेतील हा शिलालेख स्पष्ट दिसू लागला. भागवत धर्म स्वीकारलेल्या ग्रीक वंशीय हेलीओडोरस या राजदूताने हा स्तंभ उभारला असून तो तक्षशिलेहून इथे आल्याचे त्यावर लिहिले होते..! 
भारतीय मंदिर स्थापत्यशैलीनुसार गरुड स्तंभ किंवा गरुड मूर्ती ही शक्यतो विष्णूमंदिराच्या समोर उभी केली जाते. या स्तंभाच्या अनुषंगाने जेंव्हा आसपास उत्खनन केले गेले तेंव्हा तिथे परिसरात विष्णूमंदिर असल्याचे अवशेष आढळून आले. बेतवा आणि बेस नद्यांच्या संगमाच्या शेजारी असलेला हा परिसर. एकेकाळी आलेल्या महापुरात इथले विष्णूमंदिर वाहून गेले असाही उल्लेख आढळतो. गरुड स्तंभावर हेलीओडोरसने वासुदेवाचा का उल्लेख केला असावा हे कोडे त्यामुळे उलगडले.
हे सर्व वाचून अभ्यासक थक्क होऊन गेले. एकेकाळी भागवत धर्म इतका लोकप्रिय झाला होता ही माहितीदेखील प्रथमच आढळून आली होती. नंतरच्या काळात हाच भागवत धर्म वैष्णव धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला. 
१९१० मधील उत्खननाचे निष्कर्ष समोर आल्यावर इथे अभ्यासकांची रीघ लागली. भांडारकर यांच्यासारखे अनेकजण तिथे दाखल झाले. गेल्या दोन हजार वर्षात आलेल्या अनेक महापुरांमुळे इथले सारे अवशेष मातीच्या मोठ्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. त्या परिसरात राहणाऱ्या पुजारी आदि लोकांची घरे त्यावर बांधली गेली होती. ती टाळून उत्खनन होत राहिले. १९६०-७० च्या दशकात मात्र त्यांना बाजूला जागा दिली गेली आणि मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले. 
या स्तंभाच्या समोरच विष्णूमंदिराचे जे अवशेष आढळून आले ते सुमारे 30 मीटर x 30 मीटर इतक्या मोठ्या आकाराचे होते. दगडी बांधकाम, विटांचे बांधकाम तिथे आढळून आले. काळाच्या उदरात काय काय गडप होऊन जाते हे असं सामोरे आलं की आपण थक्क होऊन जातो..! 
सुमारे २५०० वर्षापूर्वीचा तो काळ. एक परदेशी माणूस दूर गांधार प्रांतातून (म्हणजे आताचा अफगाणिस्तान) मध्य भारतापर्यंत येतो, इथल्या भौगोलिक, सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेतो आणि अखेर इथलाच होऊन जातो. एकमेकांना जपणारा, विश्वबंधुत्वाची कल्पना मांडणाऱ्या भारतीय धर्माशी एकरूप होऊन जातो. हे सगळं स्थित्यंतर एका कालखंडात कसं सावकाश घडलं असेल यावर चिंतन करत बसणं फार सुखद आहे. 
हेलीओडोरस स्थंभ आज खूप सुरेख प्रकारे जतन केला नाहीये. खरंतर इथं छान छोटंसं संग्रहालय व्हायला हवं. इथून अन्य संग्रहालयात हलवलेले अवशेष, त्या बाबत उपलब्ध असलेले नकाशे, रेखाचित्रे हे सर्व काही इथं मांडायला हवं. आज छोट्याशा खेडेगावासारख्या ठिकाणी एकेकाळी उत्तम राज्य अस्तित्वात होते, इथे वासुदेवाचे प्राचीन भव्य मंदिर होते, इथेच ग्रीकांचा राजदूत येऊन राहिला होता आणि परदेशात संपर्क होत होता, हे सारं लोकांना माहिती होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत असं वाटतं. 
या ठिकाणी भोपाळहून जाताना वाटेत आपण कर्कवृत्त ओलांडून जातो. तिथेही छोटासा फलक मध्यप्रदेश सरकारने उभा केला आहे. 
ती जागा, विदिशाजवळील सांचीचे स्तूप, बीजामंडलचे उध्वस्त विजय मंदिर, उदयगिरीची गुंफा लेणी आणि स्तंभबाबा म्हणजेच हा हेलीओडोरसचा पिलर हे सारं पाहत एक पूर्ण दिवस कसा निघून जातो हे कळत नाही. हे सारं पाहून आपण जेंव्हा पुन्हा घराकडे परतू लागतो तेंव्हा आपला इतिहास, तत्कालीन लोकजीवन, त्या काळातील लोकांनी अपार कष्टाने घडवलेली वारसास्थळे याविषयीच्या जाणीवेने आपला ऊर भरून येतो !
-सुधांशु नाईक,पुणे (९८३३२९९७९१)🌿

No comments:

Post a Comment