marathi blog vishwa

Friday, 15 March 2013

बूटपालीश वाला..आणि एक नेता..!

" सुचेल तसं " लेखमालेतील हा पुढचा लेख एका सत्य परिस्थितीवर आधारित आहे.. रोजच्या जगण्यात अनेक गोष्टी समोर येतात पण आजकाल आपण अनेकदा त्यातील सत्य मात्र दुर्लक्षित करतो आहोत असे पुन्हा पुन्हा वाटत राहते...!


सुमारे वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेंव्हा बहारीनला आलो नव्हतो. मुंबईतच नोकरी करत होतो. एकदा ऑफिस टूरसाठी नागपूरला गेलो होतो. कामे संपवून रात्री नागपूर रेल्वे स्टेशनवर येऊन बसलो होतो पुस्तक वाचत..इतक्यात जरा गडबड ऐकू आली. काय झालं म्हणून पाहिलं तर एक नेता त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत तिथे येत होता. वाटेतील लोकांना धक्के मारत नेत्यासाठी जागा बनवत-बनवत ती मंडळी त्यांना तिथे फलाटावर घेऊन आली. स्वतःला "दीन दुबळ्यांचा" तारणहार समजणाऱ्या पार्टीचे ते एक नेते होते. (सत्तेत जाताना "हाताची" ताकद कमी पडली म्हणून हल्ली ते हातात "धनुष्यबाण" घेण्याचा प्रयत्न करताहेत म्हणे.)


दिवसभर भरपूर कामे किंवा भाषणे केल्यामुळे साहेबांचा आवाज भलताच "जड" झाला होता. (इथे पुलंच्या "म्हैस" मधील ऑर्डरली आठवायचा नाही हं..!) साहेब प्रथमश्रेणी विश्रामगृहात जागा नसल्याचे पाहून मग फलाटावरील एका बाकावर ऐसपैस बसले. एक कार्यकर्ता लगेच शेजारच्या दुकानाजवळ गेला. साहेबांसाठी खाण्याचे काही पदार्थ घेतले. शेजारच्या पेपरवाल्याकडून एक पेपर व "चटपटीत" फोटो असलेलं एक मासिक घेतलं. तसाच परत निघाला तेंव्हा त्या दुकानदाराने पैसे मागितले..
कार्यकर्ता गरजला, " साब के सामान के लिये पैसे मांगता है ..दुकान चाहिये या तोडना है ?" हताश दुकानदाराने परत कळवळून माफी मागितली आणि वर सांगितले, " और कुछ चाहे तो बताओ ..दुकान आपकीही समझो..!"
कार्यकर्ता मग सगळं घेऊन साहेबांकडे आला. झाल्या गोष्टीवर साहेबांचे लक्ष होतेच. त्यांनी ते मासिक पाहिले ..म्हणाले " हिंदी नको, इंग्रजीवाले आण, एसी डब्यातून जायचे आहे..!" पुन्हा कार्यकर्ता इंग्रजीवाले "चटपटीत" मासिक घेऊन आला..फुकटच..!

थोड्या वेळाने रेल्वे आली. लोकांची गडबड होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी साहेबांना आत घुसवले आणि त्यांच्या जागेवर स्थानापन्न केले. साहेबांनी दिलेले नोटांचे एक बंडल कार्यकर्त्यांच्या नेत्याने नको नको म्हणत खिशात ठेवले... पुन्हा पुन्हा नमस्कार करून बिचारे गेले परत आपल्या घरी..!
मग इतर सगळी माणसे आपापल्या जागी बसली. गाडीत बराच केर-कचरा तसाच होता. लोकं आपल्याकडचा कचरा दुसऱ्याबाजूला ढकलत होती. "आजकाल रेल्वेवाले पण माजलेत. साधी स्वच्छता ठेवता येत नाही रेल्वेत..! सरकारनेच काही केले पाहिजे..पण सरकारला वेळ कुठाय?" सरकारचे नाव आल्यावर हे पुढारी चमकले पण न बोलण्यात शहाणपण आहे हे समजल्याने गप्प बसले..अर्थात रेल्वेत आपण घाण केली नाही तर रेल्वे आपोआप स्वच्छ राहील हे मात्र सर्व लोकांच्या लक्षातच येत नव्हते...

इतक्यात "टार्र कट्याक.." असा आवाज येऊ लागला. एक पांगळा मुलगा लाकडी फळकूटावर बसून डब्यातून फिरत येत होता. बिचाऱ्याचे दोन्ही पाय गुडघ्याखाली तुटलेले होते. तिथे फक्त एक मांसाचा गोळा बनला होता. पंधरा एक वर्षाच्या त्या मुलाच्या आयुष्यात काय घडलं होतं कुणास ठाऊक.. !
मात्र तो ठीक नीटनेटक्या कपड्यात होता. "बूट..पालीश..साब बूट पालीश.." करत तो डब्यातून फिरत होता. कुणी पालीश करून नाही घेतले की डब्यातील कचरा हातातील फडक्याने झाडत होता, मग कचरा एका प्लास्टिक पिशवीत भरत होता..त्यानंतर लोकांपुढे हात पसरायचा..कुणी दोन चार रुपये देत होते. असं करत त्याने तो डबा बऱ्यापैकी स्वच्छ करत आणला होता. माझे बूट बरे होते तरी उगाच त्याच्याकडून पालीश करून घ्यावसं वाटलं. वर त्याचे पैसे दिले.
तो मग "साहेबांकडे" वळला. "साब पालीश " म्हणून त्यांच्या पायाला हात लावताच साहेब ओरडले.."ऎ भिकारी, चल हटो दूर..साला हात क्यू लगाता है ?" तो पोरगा जाता जाता म्हणाला "साब, भिकारी नैय मै, काम करके पैसा लेता हू..!" परत साहेब ओरडले मग त्याच्यावर.. चिडून व हिरमुसून तो पुढे निघाला..
दरवाज्याजवळ पोचला. तिथे कुणीतरी बरेच सामान ठेवले होते. त्याचे ते फळकूट तिथून निघेना. तो कावराबावरा झाला. इकडे तिकडे पाहू लागला. माझे आणि दुसऱ्या एका पांढरपेशा माणसाचे तिकडे लक्ष गेले. आम्ही दोघेही चटकन उठलो. तिथे गेलो. आणि चक्क त्याला फळकूटासकट उचलले..! आम्ही तोंडाने "गणपतीबाप्पा .." म्हणताच हिंदी भाषिक असूनही तो स्वतःच म्हणाला.."मोरया.." आणि त्याच्या चेहऱ्यावर एक निर्मळ हसू फुलले..! त्याला फलाटावर ठेवला आणि आम्ही परत वळलो..तेव्हढ्यात त्याने त्या दुसऱ्या माणसाचा पाय पकडला...

"अरे पांव क्यू पकडा ? छोडो रे..ट्रेन छुट जायेगी.." तो माणूस म्हणाला.
"साब, आपका बूट बहोत गंदा है..रुको मै पालीश करता हू.." असं तो बोलला. ते लगेच म्हणाले.."नही नही रहने दो.."

तो पुन्हा म्हणाला, "साब पैसा नही चाहिये..आपने अभी मुझे ट्रेन से बाहर उतारा..और मै आपके लिये कुछ नही दू ये ठीक नही..! बस दो मिनिट.." आणि त्याने त्यांचे बूट पालीश करून दिले..! पुन्हा निर्मळ हसत आम्हाला त्याने "बाय" केले..
पाय जरी तुटले असले तरी जगातील कुठलीच गोष्ट फुकट नको असे मनाशी ठाम ठरवलेल्या त्या पांगळ्या युवकाला मी मनोमन सलाम ठोकला..सगळ्यांकडून बऱ्याच गोष्टी फुकट मिळवणाऱ्या त्या नेत्यापेक्षा हा मुलगाच मला "महान" वाटला होता..तुम्हाला काय वाटतं ?
---- सुधांशु नाईक, बहारीन (nsudha19@gmail.com)

Friday, 8 March 2013

स्मरण ..जागतिक महिला दिन व समर्थ रामदासांचे...!


नुकतीच समर्थ रामदासांचे स्मरण करत दासनवमी साजरी झाली....! आणि आज ८ मार्च हा जागतिक महिला दिन. ह्या दोन गोष्टीचा संबंध जोडत जोडत हा लेख सुचत गेलाय...

समर्थ रामदास म्हणजे कडकडीत ब्रह्मचारी व्यक्तिमत्व. त्यांच्या सारख्याच ब्रह्मचारी अशा हनुमंताचे ते उपासक. "हनुमंत आमुची शक्ती I हनुमंत आमुची भक्ती" असे त्यांनीच लिहून ठेवले आहे. तर ब्रह्मचारी व बलवान असे आराध्य दैवत. मात्र त्याला नमस्कार करायला, शनिवारी उपवास करणाऱ्या मात्र शेकडो महिला..! असे का ? या विचारांच्या आंदोलनातून मग "सुचेल तसं"चा हा सहावा लेख लिहू लागलो...

हनुमंत हा महाराष्ट्रात व त्यानंतर भारतातील अन्य प्रांतात देऊळ बनवून स्वतंत्र प्रस्थापित केलेला देव बनला याला समर्थ निश्चितच काही अंशी कारणीभूत आहेत. इतिहासाचा अभ्यास करताना इ.स.१६०० पूर्वीची मारुती मन्दिरे फार कमी आढळतात. प्राचीन राम मंदिरातील जागेतच बहुतेक ठिकाणी हनुमंत "रामाचा दास" अश्या पोझ मध्ये उभा केलेला आढळतो. मात्र त्याला "वीर मारुती" किंवा "प्रताप मारुती" अशा स्वरुपात स्वतंत्र मंदिरात स्थानापन्न करणारे पहिले समर्थ रामदासच ..! गावोगावी तरुण माणसे प्राप्त परिस्थितीने हताश होऊन गेलेली पाहून, हतबल झालेली पाहून पराक्रमाची पूजा करणारे रामदासस्वामी व्यथित होत होते आणि यातूनच जन्म झाला हनुमंताची उपासना लोकांना शिकवण्याचा..

त्याकाळची मंडळी देवभोळी होती. "जे काही होते त्याला देवच कारणीभूत आपण पामर त्यापुढे काय करणार?" असेच विचार करणारे. त्यातच महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या तमाम सुलतान मंडळीनी "आम्हीच तुमचा परमेश्वर" अशी द्वाही सर्वत्र फिरवलेली. समाजातील महत्वाचे असे ब्राह्मण व क्षत्रिय दोघेही त्या सुलतानाच्या सेवेत..मग बाकी दैन्यावस्थेतील जाती जमातीचे आयुष्य म्हणजे जणू पोतेरे झाले यात नवल ते काय?? असा सर्व समाज हतवीर्य होऊन गेलेला..या समाजाच्या मनात पुन्हा विचारांचे, आत्मविश्वासाचे स्फुल्लिंग चेतवणे हे खरेच एक अवघड काम..पण जे अशा अवघड कामांनाच हात घालून कार्य करतात तेच मोठे होतात..! समर्थ रामदासस्वामी त्यापैकीच एक होते..

घरदार सोडल्यावर स्वतःच्या बळावर तपोसाधना , विद्याभ्यास पूर्ण केलेल्या त्या तेजस्वी "नारायणाचा" "समर्थ रामदास" बनायला मुख्य कारण ठरली ती त्यांनी देशभर केलेली भ्रमंती. अर्थात ते पर्यटन वा मनोरंजन मुळीच नव्हते. गावोगावी रामदासस्वामी जात. तिथल्या लोकांत मिसळत. कीर्तन -प्रवचन करत. आणि तेजस्वी अश्या रामाच्या / हनुमंताच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत. गावात जो काही २-४ दिवस मुक्काम असे त्यात प्रत्येक दिवशी भल्या पहाटे उठून हजारो सूर्यनमस्कार घालत. गावातल्या मुलांना , युवकांना तसे करायला प्रवृत्त करत. गावागावात एकी निर्माण व्हावी म्हणून युवकांना एकत्र करत. त्यांना बलोपासनेचे महत्व सांगत. आणि एकदा का त्यांच्या मनात ठिणगी पेटली की मारुती मंदिराची स्थापना करून रोज तिथे बलोपासना केली जाईल याची आखणी करत. गावांच्या समूहावर देखरेख करायला विशिष्ट भागातून मठाची स्थापना करत. एक गाव झाले की दुसरे ..एक भाग झाला की दुसरा..असे करत करत रामदासस्वामीनी भारतभर तब्बल ११०० मठांचे जाळे निर्माण केले..हजारो मारुती मंदिरांची उभारणी केली, तेही संपूर्ण देशावर परकीयांचे वर्चस्व आणि धर्मावर त्यांचे अतिक्रमण होत असताना..!! गावागावातून शिवमंदिरे, देवीची मंदिरे उध्वस्त होत असताना ही नवी मंदिरे उभी करताना समर्थ रामदासस्वामी व त्यांच्या सहकाऱ्यांना किती त्रास सहन करावे लागले असतील याची इतिहासात दुर्दैवाने कुठेच नोंद उपलब्ध नाही.

गावागावातून हे सगळे कार्य उभे करताना रामदासस्वामी स्वतःला मात्र कुठेच देवत्व घेताना दिसत नाहीत. ते कायम दिसतात ते आचार्याच्या भूमिकेत..! त्यांच्या शब्दात सांगायचे तर वृत्ती कशी ..तर

“जितुके आपणासी ठावे I तितुके हळूहळू सिकवावे I शहाणे करून सोडावे I सकळ जन II”

जेवायचे तेही भिक्षा मागून.. ही भिक्षा मागताना तोंडाने काय म्हणावे या जाणीवेतून मग जन्म झाला श्लोकांचा.. ! भिक्षामिसे संबंध येणार तो अंधाऱ्या कोपऱ्यात चुलीजवळ स्वैपाक करणाऱ्या गृहिणी बरोबर. त्या बिचाऱ्या स्त्रीचे हाल तर अतिवाईट. शिक्षण नाहीच, अनेक रूढी व परंपरांचा भर सहायचा, सगळ्यांचेच ऐकत जगताना किंमत मात्र एखाद्या वस्तू इतकीही नाहीच..! मग अशा स्त्रीच्या मनापर्यंत पोचणारे ते श्लोक एक अगदी साध्या भाषेतील असावेत दुसरे म्हणजे रोजच्या जगण्यावर भाष्य करणारे व प्रसंगी मार्गदर्शन करणारे असावेत या जाणीवेतून ते "मनाचे श्लोक" जन्मले. आणि पाहता पाहता "जनाचे श्लोक" बनले..!

"मना सांग पा रावणा काय झाले  I अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले I

म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी I  बळे लागला काळ हा पाठीलागी I I

अश्या श्लोकातून परस्त्रीला त्रास देण्याविषयी भाष्य असो किंवा,

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी I मन सज्जना हेचि क्रिया धरावी I

मन चंदनाचेपरी त्वा झिजावे I परी अंतरी सज्जना नीववावे I I

असे प्रेमळ उपदेशाचे सांगणे असो दे.. समर्थ रामदासस्वामी गावोगावच्या महिला वर्गातही लोकप्रिय होत गेले. भिक्षा मागायला येणारा हा बुवा काही वेगळाच आहे हे त्यांच्या मनावर ठसले. आणि मग बलोपासनेसाठी जेंव्हा समर्थ मुलांना व युवकांना आवाहन करीत तेंव्हा हाच महिलावर्ग कदाचित त्यांना साथ देत असावा. आपल्या घरातील उगाच उंडारत फिरणाऱ्या मुलाला समर्थांकडे पाठवून देत त्यांनी जणू समाजकारणालाच हातभार लावला..! रोज अंथरुणात लोळत पडणारी मुले जेंव्हा भल्या पहाटे उठून सूर्यनमस्कार घालू लागली, व्यायामशाळेत घाम गाळू लागली तेंव्हा समर्थांचा उद्देश सफल होऊ लागला..!! याच बरोबर मारुती दर्शनाचे निमित्त साधून महिलांना घराबाहेर पडण्यास एक निमित्त मिळाले. त्याकाळी मारुती मंदिराजवळच व्यायामशाळा असे. त्यामुळे आईबरोबर आलेल्या लहानग्या मुलाला तिथे चाललेल्या मल्लखांब ,कुस्ती, अन्य व्यायामप्रकाराबाबत कुतूहल निर्माण होणे साहजिकच होते. त्यातूनच तो मुलगाही तिथे खेचला जाई. आणि आपलं मूल काही चांगलं करू पहातंय याचे आईलाही समाधान मिळे. म्हणूनच बहुदा महिला आणि मारुतीचे एक नवे नाते निर्माण झाले असावे..!..!

याहीपुढे जाऊन समर्थांनी महिला वर्गाला कीर्तनातून उपदेश केला. कदाचित समर्थ असे म्हणाले असतील, " मायबहिणीनो, मुलाला जन्म देणे हे तुमच्या नशिबी आहेच मग जन्मणारे मूल हे हनुमंता प्रमाणे, राम-कृष्णाप्रमाणे बलवान व तेजस्वी व्हावे यासाठी तुम्हीच लक्ष दिले पाहिजे. आज समाज आपले तेज विसरून गेला आहे तो पुन्हा जागृत करणे हे तुमच्या हातात आहे. तुम्ही प्रत्यक्ष दुर्गेचा अंश आहात.आणि जेंव्हा जेंव्हा महिषासुर माजतात तेंव्हा दुर्गेलाच प्रसंगी शस्त्र हाती घ्यावे लागते...! तेंव्हा तुम्ही स्वतः आधी तेजस्वी बना आणि तुमच्या पुत्रालाही मग तेजस्वी बनवा.. !!" गावोगावच्या महिलांनी मग समर्थांना जर मदत केली नसती तरच नवल होते. महिलांनी त्यांचा सहभाग दिला नसता तर कदाचित समर्थांचे कार्य एवढे मोठे बनू शकले नसते हे निखळ सत्य आहे..!! समर्थ रामदासस्वामीनी महिलांना आपल्या कार्यात सक्रीय सहभाग घ्यायला प्रवृत्त केलेच पण त्यांना मानाची जागाही दिली.

त्याही पुढे जाऊन समर्थांनी जी गोष्ट केली ती तर त्या काळाच्या दृष्टीने खरोखरच क्रांतिकारी होती. काय केले समर्थांनी ? तर त्याकाळी अत्यंत खडतर जीवन जगणाऱ्या विधवेला पुन्हा प्रतिष्ठा मिळण्यासाठी केलेली कृती. एक तर मुलींची लहानपणी लग्ने होत. आणि सतत काही साथी वा आजारपणात जर त्यांचा नवरा मेला की मग आयुष्याचा जणू नरक बनून जाई. समर्थ रामदासांनी अशा विधवा स्त्रीला चक्क आपल्या शिष्य परिवारात घेतले.!! त्याकाळी याविरुद्ध किती गदारोळ झाला असेल आणि समर्थ व त्यांच्या सहकाऱ्यांना किती छळ सोसावे लागले असतील याची कल्पनाच करवत नाही..!

मात्र "समर्थाचिया सेवका वक्र पाहे I असा सर्व भूमंडळी कोण आहे II" असे मानणारे समर्थ रामदास या सगळ्यांना पुरून उरले. त्यांच्या शिष्या झालेल्या या महिलांना त्यांनी थेट मठ सांभाळण्याची जबाबदारी देऊन टाकली. अक्काबाई, वेणाबाई अशा त्यांच्या शिष्यांनी ज्याप्रकारे उत्तम व्यवस्थापन करून दाखवले त्यामुळे समाजाचे मतपरिवर्तन होण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन मिळाले..!

आजच्या आधुनिक व विज्ञानमयी काळातही स्त्रियांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात तर समर्थ रामदासांच्याकाळी असणारी अवस्था निश्चितच भयावह असणार. म्हणूनच ही कृती जगावेगळी होती असे म्हणावयास हवे. जगभरात आज गर्भ संस्कारापासून पुत्र संस्काराचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत जे बहुतांशी महिला वर्गाच्या हातात असतात. आणि कोणतीही स्त्री ही आधी एक आई असते त्यामुळे तिचे निसर्गतः कर्तव्य कोणते तर समाजाला तेजस्वी संतती द्यावी. हेच करण्यासाठी बहुदा समर्थ रामदास स्वामींनी हनुमंत भक्तीची वाट महिला वर्गाला दाखवली असावी. याच वाटेवरून अनेकांनी मार्गक्रमण केले असेल, ज्यामुळे तत्कालीन शिवछत्रपतींच्या राज्याला शेकडो मावळे मिळाले असतील असे मानायला हरकत नाही. आजपर्यंत महिला जी मारुती उपासना करतात त्याचे मूळ बहुदा या समर्थ रामदासस्वामींच्या शिकवणुकीत असावे असे मला वाटते.

म्हणूनच राष्ट्रहिताचे तेजस्वी विचार, "कष्टेवीण फळ नाही I कष्टेवीण राज्य नाही " असा प्रयत्नवाद समाजात रुजवणारे समर्थ रामदास आणि त्यांच्या कार्याला ज्यांनी पाठिंबा दिला अशा अनामिक शेकडो मायबहिणीना जागतिक महिलादिनाचे निमित्त साधत मनापासून नमस्कार..!!

---- सुधांशु नाईक, बहारीन (nsudha19@gmail.com)

Sunday, 3 March 2013

सिनेमा... सिनेमा...


"सुचेल तसं" लेखमालेतील हा पाचवा लेख..या वर्षी सिनेमाला १०० वर्षे पूर्ण झाली..त्यानिमित्ताने..
सिनेमा... सिनेमा...
खरं सांगतो, चित्रपट हा शब्द मला नेहमीच परका वाटतो. शासकीय कार्यालयातील अनाकलनीय पाट्या वाचाव्यात तसे वाटते..! लहानपणी सुद्धा पहिल्यांदा तो "पिक्चर" म्हणून भेटला आणि मग पुढे त्याचा "सिनेमा" झाला आणि आपल्यासारख्या करोडो लोकांचे भावविश्व त्यात अडकून गेलेय..कधी काळी पडद्यावर चित्रे हलू - बोलू लागली तेंव्हा म्हणे लोकं भुताटकी म्हणून पळून जात होते..! पण आज सिनेमाने सगळ्यांना असे काही झपाटले की ही भुताटकी कधी संपणारी नाहीच.

लहानपणीची आठवण म्हणजे रस्त्यावर किंवा जरा मोकळ्या जागी बसून पडद्यावरचा पिक्चर पाहणे हीच. तेंव्हा खूपच लवकर जाणे आणि सतरंज्या टाकून जागा अडवणे ..हेच सर्वात महत्वाचे असे..! कित्येकदा मग जागा मिळालेली लोकं पडद्याच्या पलीकडेही बसून पिक्चर पहात. ते रीळं फिरवणारे मशीन, मध्ये रीळ तुटल्यावर होणारा आरडा ओरडा हे सगळे छान गमतीशीर होते...! लोकांच्या गरजा कमी होत्या, अपेक्षा कमी होत्या म्हणा किंवा आहे त्यात समाधान मानायची वृत्ती म्हणा पण त्या तेवढ्या मनोरंजनावर लोक खूष असत. कारण प्रत्येक तालुक्याच्या गावी थेटर नसायचे..त्यामुळे पडद्यावरचे, तंबूत बसून पाहिलेले सिनेमे हे सिनेमा व्यतिरिक्त अनेक गोष्टीमुळे लक्षात रहात.
त्याकाळापासून नुसते मनोरंजन नव्हे तर कित्येकांच्या व्यवसायाची लिंकही सिनेमाशी जोडली गेली आहे. पानवाला, गोटी-सोडावाला, वडापाव वाला, आईस्क्रीम वाला आणि black तिकीट वाला असे अनेक जण सिनेमाच्या जगाशी संबंध ठेऊन असतात इतकंच नव्हे तर वेश्या आणि त्यांचे दलाल हेही सिनेमागृहाजवळ सापडायचे..किंबहुना सांगलीच्या "स्वरूप" सारख्या अनेक थिएटर जवळ वेश्या वस्ती वाढल्याचीही उदाहरणे आहेत..समाजाच्या या खालच्या विविध थरातील अशा लोकांप्रमाणेच समाजातील वरचा वर्ग देखील सिनेमावर अवलंबून...मग त्यात फायनान्सर पासून ते जाहिरातदारापर्यंतचे अनेकजण आहेत. निव्वळ सिनेमासाठी निघणाऱ्या मासिकं, साप्ताहिकं यांचेही उदरभरण सिनेमाच तर करतो ना..? मात्र या वरच्या वर्गातील लोकांचे जग वेगळे आहे.
 

वाढत्या वयाबरोबर सिनेमा, सिनेसंगीत . बाबतचे आकर्षण ज्ञान वाढत गेले पण मन मात्र सिनेमापेक्षा गाण्यांतच जास्त गुंतून राहिले असे वाटते. भारतात सिनेमा लोकप्रिय करायचे खरे काम कुणी केले  असेल तर सिनेसंगीताने..! तो १९५०-६० पासूनचा सुवर्णकाळ होताच तसा. अर्थात ती सगळी गाणी जरी ऐकली असली तरी तेंव्हाचे किस्से, बिनाका गीतमाला वगैरे हे माझ्या पिढीसाठी ऐकीवच आहे. मात्र तेंव्हापासून सिनेमा लोकप्रिय करण्यासाठी  गाणी” हे महत्वाचे माध्यम ठरले ते कायमचे..!
तटस्थपणे अभ्यासले तर, किंवा जुने सिनेमा आता पुन्हा पहिले तर असे लक्षात येते की ज्या सिनेमाची गाणी अफाट गाजली ते सगळेच काही अफलातून नव्हते..(उदा. अनारकली, बरसात की रात .) आणि काही गाजलेल्या सिनेमासाठी गाणी हा दुय्यम निकष होता..(उदा. शोले). प्रदीपकुमार, भारतभूषण,जॉय मुखर्जी अशी मंडळी काही सुपर हिट सिनेमे करू शकली ती केवळ गाण्यांच्या जोरावर..!

सिनेमात काम करायच्या उर्मीने डेरेदाखल झालेल्या मंडळींच्या कहाण्या,दंतकथा वर्षानुवर्षे चवीने ऐकल्या-सांगितल्या जातात त्या फक्त भारतीय सिनेमाबाबतच..! आधीचा एखादा बस कंडक्टर पुढे मागे सिनेसृष्टी गाजवून मोकळा होतो..तर कधी सिनेमात गाजलेला एखादा नंतर सिग्नलजवळ हात पसरून उभा असतो...! अक्षरशः रस्त्यावरून उठून एखादी इथे सुपरहिट होते तर सौदर्याचे प्रतिक मानली गेलेली एखादी बेवारस अवस्थेत मरून जाते...सुदैव-दुर्दैवाचे दशावतार दाखवणारी ही आगळी वेगळी दुनिया..! इथे बरचसं नियमबाह्य किबहुना नियमाच्या चौकटीत बसवता येणारं..
या झगमगत्या रंगीन आणि रंगील्या दुनियेतील पडद्यामागच्या शेकडो कहाण्या मात्र दर्दभऱ्या आहेत. अनेकांची आयुष्यं इथे पैसा, मदिरा आणि मदिराक्षी साठी बरबाद झाली आहेत. अनेकांच्या मेहनतीचे श्रेय मात्र त्यांना कधीच मिळाले नाही तर पाहतापाहता एखाद्याच्या पदरात नियतीने भरभरून दान टाकले आहे..! पोस्टर रंगविणाऱ्या कलावंतापासून ते कपडेपट सांभाळणाऱ्यापर्यंत , मेकपमन पासून ते हेअर ड्रेसर पर्यंत अनेकांचे आयुष्य आपल्याला कधीच कळत नाही आणि आपण ते जाणून घेण्याचा कधी प्रयत्नही करत नाही..!
तीन तासांच्या त्या भासमान आयुष्यात स्वतःची सुख दुक्ख, वासना आणि संताप आपण ओतून देतो आणि बाहेर पडताना "चला, छान टाईमपास झाला.." म्हणून मोकळे होतो ! कदाचित यासाठीच सिनेमा बनतो का? मनोरंजन वा करमणुकीला जरी प्राधान्य असले तरी सिनेमाने त्याव्यतिरिक्त काहीतरी देणे गरजेचे आहे असे प्रामाणिकपणे वाटते.


मात्र एखादा सिनेमा असा असतो जो आपल्या आयुष्याला कलाटणी देतो. वर्षानुवर्षं आपण शोधत असलेलं प्रेयस आपल्याला अचानक शोधून देतो. डोळ्यासमोरच धूसर स्वप्न स्वच्छ सुंदर आणि आपल्या आवाक्यातील दिसू लागतं, आपल्याच आत दडून बसलेला तो खरा "मी" सापडतो आणि एका वेगळ्या प्रवासाची सुरुवात होऊन जाते..!
 
इथे एक आठवण आवर्जून सांगावीशी वाटते..पुण्यात वंचित विकास नावाची एक समाजसेवी संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर हे एक विलक्षण व्यक्तिमत्व. अक्षरश: रक्त आणि घाम गाळून त्यांनी संस्था व विविध समाजोपयोगी कार्ये उभी केली आहेत तेही प्रसिद्धीच्या मागे न लागता..

एकदा मी गप्पा मारताना विलास काकांना विचारले.."तुमच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले असतील की जेंव्हा तुम्ही व्यवस्थेशी लढताना थकला असाल, निराश झाला असाल, मग त्यातून बाहेर पडून पुन्हा जोमाने कामाला लागण्यासाठी कुठून ताकद मिळायची?"  ते पटकन म्हणाले, "तुला सांगतो सुधांशु, मी सगळ्या कामातून जेव्हा वेळ मिळेल तेंव्हा जाऊन सिनेमा पाहायचो..अगदी भान विसरून पाहायचो..त्या सिनेमा पाहण्यातून बहुदा माझा थकवा निघून जायचा..आणि पुन्हा नव्या जोमाने मी कामाला लागायचो...!.." विलास काकांसारख्या अनेक कार्यकर्त्यांना पुन्हा मानसिक उभारी देणारा एक सिनेमा असू शकतो हेच किती विस्मयकारक पण आवश्यक आहे ना....!

सिनेमातून प्रत्येकाला आपली अशी वाट सापडावी की त्यामुळे त्याचे इतरांचेही जीवन सुखी समृद्ध व्हावे आणि याचसाठी "सुमित्रा भावे" पंथातील निर्माता दिग्दर्शक जास्तीत जास्त निर्माण व्हावेत ही अपेक्षा यापुढे बाळगावी का?

-सुधांशु नाईक, बहारीन (nsudha19@gmail.com)