marathi blog vishwa

Thursday, 3 March 2016

शिवरायांचं वेगळेपण

या नव्या लेखमालेच्या सुरुवातीला “शिवरायांचं वेगळेपण” हा लेख लिहावा असे मनात आले. 

मुख्य कारण म्हणजे इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी यांच्या व्यतिरिक्त सर्व सामान्य माणसाला शिवरायांचा इतिहास तसा पूर्ण माहित नाही. यासाठी खूप ग्रंथांचा अभ्यास आवश्यक आहे व तो करण्यासाठी सामान्य लोकांकडे पुरेसा वेळ नसल्याने लगेच माहीत होणारही नाही. मात्र काही महत्वाचे मुद्दे जर आपण सांगितले तर त्यांना यात अधिक रस निर्माण होईल व ते अधिक अभ्यास करतील असे मला वाटते.

रोजच्या जगण्यात व विविध ग्रंथ वाचताना माझ्यासारख्या साध्या माणसाला “शिवराय कसे दिसले, त्यांच्यापासून आपण कशी प्रेरणा घेऊ शकू असे वाटले” ते सांगणे मला महत्वाचे वाटते. हाच या लेखमालेचा उद्देश. अर्थात सगळेच मुद्दे या किंवा अशा एका लहान लेखात लिहिणे शक्य नाही, तरी  जितके जास्त मुद्दे पुढील लेखांमधून नक्की सांगता येतील तेवढे सांगण्याचा मी प्रयत्न करेन..
1

महाराजांच्या आयुष्यातील तेजस्वी अशा ५-६ घटना वगळता लोकांना अधिक इतिहास माहित नाही हे निखळ सत्य आहे. शिव-छत्रपतींचे आयुष्य हा चमत्कार नसून तीअद्वितीय अशीएक management होती. आणि आपल्या आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी, कुठे ना कुठे अशी management करावी लागतेच. तेंव्हा महाराजांच्या आयुष्यातील सर्व सामान्यांच्या दृष्टीने अपरिचित असा भाग जाणून घेणे, शिवरायांचं वेगळेपण समजून घेणे  म्हणूनच अत्यावश्यक ठरते. शिवरायांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ऐकल्या की सामान्यतः असे समजले जाते की प्रत्येक छोटी मोठी गोष्ट राजांनीच केली आहे. पण प्रत्यक्षात असे नसते. राजांचे शेकडो सहकारी, अष्ट प्रधान, सुभेदार, कारकून, समाजातील हजारो लहानथोर मंडळी अशा अनेकांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे, त्यांच्या स्वामीनिष्ठेमुळे स्वराज्य निर्मितीचे हे अत्यंत कष्टप्रद कार्य घडून आले होते..! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिवराय, शंभूराजे व राजाराम महाराज अशा तीन छत्रपतींच्या निधनानंतर सुद्धा हे स्वराज्य राखण्यासाठी सामान्य जनता प्राणपणाने लढली. हे बहुदा इतिहासातील एकमेव उदाहरण असावे. त्यामुळे “शिवरायांचं वेगळेपण” यातील काही मुद्दे पाहताना सर्वात महत्वाचा भाग हीच माणसे ठरतात..
१.      प्राणार्पण करणारी माणसे -
राजांनी आयुष्यभर लढाया आणि घोडदौड केलीच. पण त्याच बरोबर आपल्या मुलुखातील प्रजेच्या सुखी जीवनासाठी शेती व बलुतेदारी व्यवसायांना उत्तेजन दिले. त्यामुळे लोहार, सुतार, शिकलगार यासारख्यांना आणि सर्वसाधारण शेतकऱ्याला काम मिळाले. ज्यांच्याकडे जमिनी, बी-बियाणे, अवजारे इ.ची कमी होती, त्यांना त्या त्या गोष्टी सरकारी खर्चाने देण्यात आल्या. ते कर्ज पुढे त्यांच्या कमाईतून जरी वसूल करण्यात आले तरी प्रत्येकाकडे शिल्लक उरेल याची काळजी घेतली गेली. सतत त्रासदायक ठरणारी आक्रमणे व  शत्रूशी सामना करायला राजांचे सैन्य पाठीशी असायचे. त्यामुळे प्रजेचे मानसिक ताण-तणाव कमी झाले जीवनाची शाश्वती निर्माण झाली. त्याच बरोबर अशा राजाला आपापल्या परीने मदत करायची भावना विकसित झाली. लोकं त्यांना जे जे देता येईल ते दान देऊ लागले. कधी ते धान्याचे दान होते तर कधी प्राणांचे..!
जेंव्हा एखादे नेतृत्व तयार होते तेंव्हा त्याच्या मागे अनुयायी येतातच..पण त्यातील फारच थोडे प्रत्यक्ष बलिदानासाठी तयार होतात. शिवबाराजांच्या अलौकिक नेतृत्वाचे सर्वाधिक वेगळेपण म्हणजे कोणत्याही मोबदल्याविना त्यांच्यासाठी प्राणार्पण करायला सिद्ध झालेली, समाजातील सर्व जातीजामातीतून पुढे आलेली हजारो सर्वसामान्य माणसे..! अर्थात प्रत्येक जण काही फक्त लढाईसाठी सहभाग देऊन गेला म्हणून स्वराज्य उभे राहिले नाही, तर इथला प्रत्येक शेतकरी जसा महत्वाचा तसेच सूर्याजी काकडे, रामजी पांगेरे, गोदाजी जगताप, शिवा काशीद, जीवा महाले, कोंडाजी फर्जंद या सारखे शूर मावळे जसे महत्वाचे तसेच त्यांना चांगली शस्त्रे मिळावीत म्हणून दिवसरात्र राबणारे अनामिक लोहार, शिकलगार सुद्धा महत्वाचे..! “यशस्वी सारा पद्धत” अंमलात आणणारे अण्णाजी दत्तो महत्वाचे तसेच ठिकठिकाणी कारभार पाहणारे सुभेदार, घाटपांडे, जकातदार, आणि मदत वाटप करणारे कारकून हे ही महत्वाचे. कोणत्याही मोहिमेपूर्वी सर्व रस्ते, वस्त्या, शत्रूची हालचाल याची बित्तंबातमी आणणारे गुप्तहेर व विविध गावातून त्यांना जमेल ती मदत करणारी माणसेही महत्वाची होती. आणि अर्थातच स्वतःच्या सैन्याची काळजी घेत वेगाने मार्गक्रमण करून शत्रूवर झडप घालणारे, त्यांना नामोहरम करणारे मोरोपंत, नेताजी, प्रतापराव, हंबीरराव, आनंदराव, मायनाक भंडारी इ. सेनानीही महत्वाचे होते.
राज्यकारभार करताना सल्लागार मंडळाची भूमिका मोलाची असते त्यामुळे महाराजांशी विचार विनिमय करून त्यांना योग्य सल्ला देणारे गोमाजी काका, माणकोजी दहातोंडे, सोनोपंत डबीर, कृष्णाजी पानसंबळ, बाजी पासलकर, कान्होजी जेधे असे ज्येष्ठ मुत्सद्दी आणि ठरलेली भूमिका नीट पार पाडणारे गोपीनाथ बोकील, त्र्यंबकपंत, रघुनाथ पंत इ. वकीलही तेवढेच महत्वाचे. स्वराज्य हे असे सर्वांच्या कष्टातून आणि बलिदानातून निर्माण झाले याची जाणीव प्रत्यक्ष शिवरायांना होती. म्हणूनच सिंहासनावर बसण्यापूर्वी महाराज प्रथम बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी, सूर्यराव काकडे, प्रतापराव गुजर इत्यादी प्राणार्पण केलेल्या सहकाऱ्यांचे स्मरण करतात. जशी राजांना ही जाणीव होती तशीच आपण सर्व शिव-भक्तांना असायला हवी आणि म्हणूनच शिवरायांचा जयघोष करतानाच या हजारो अनामिक वीरांच्या बलिदानाची, त्यांनी खर्चिलेल्या घामाची आणि रक्ताची जाणीव ठेवून त्यांच्यासाठीही एक पणती लावायला हवी.
२.      नीतिवंत राजा –
मध्ययुगातील शिवकालीन कालखंड पाहिला म्हणजे असे लक्षात येते की, बहुतेक राजे महाराजे, बादशहा, सरदार, वतनदार हे सर्व ख्यालीखुशालीत मग्न. प्रत्येकाला फक्त आपल्या सुख सोयींचीच काळजी आहे. त्यासाठी सामान्य रयत मात्र रोज छळ सहन करत आहे. त्यांचे धान्य शेत, घर आणि सर्वात दुखःदायक म्हणजे स्त्रीची अब्रूही रोज लुटली जात आहे. कोणी वाली उरला नाही, ज्याकडे दाद मागावी असे शासन राहिले नाही ही तेंव्हाची परिस्थिती. शिवरायांनी या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर कुणी त्यांना कदाचित वाईट म्हटले नसते कारण सगळे भोग भोगण्यासाठीच सत्ता व अधिकार त्याकाळी राबवले जात. मात्र शिवरायांनी असे वागणे जीवनभर नाकारले हे त्यांचे मोठेपण. संपूर्ण शिवचरित्रात ते ठळकपणे प्रकर्षाने उठून दिसते. एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे राहणे, योगी किंवा विरागी वृत्तीने जगणे हे राजांचं वेगळेपण.
कोणत्याही राजाने केवळ सुशील व चारित्र्यवान असणे म्हणजे नीतिवंत राजा नव्हे. प्राचीन काळापासून आपल्या देशात अनेक “नीती” प्रसिद्ध आहेत. शुक्रनीती, विदुर नीती, कृष्ण नीती, कौटिल्य नीती, अर्थनीती, राजनीती धर्मनीती इ.“नीती” ग्रंथांचा अभ्यास करून त्याप्रमाणे स्वतःचे व आपल्या प्रजेचे वर्तन घडवणे ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. शिवाजी राजांनी आपल्या वर्तणुकीतून ती घडवून दाखवली. राजा हा उपभोगशून्य स्वामी असतो आणि संपूर्ण प्रजेचे त्याने पुत्रवत पालनपोषण केले पाहिजे हे राजांचं मुख्य कर्तव्य. त्यासाठी त्यांनी प्रसंगी जीव धोक्यात घातला पाहिजे, प्रसंगी प्रजेला मायेने क्षमा केली पाहिजे, प्रजेचे जीवन धोक्यात आणणाऱ्या व प्रजेला त्रासदायक ठरणाऱ्या लोकांचा, वृत्तींचा कठोरपणे बिमोड केला पाहिजे अशा शेकडो गोष्टी राजनीती सांगते. शिवरायांनी हे सर्व करून दाखवले. मात्र याकामी त्यांना सर्वाधिक संघर्ष करावा लागला तो स्वकीयांशी. गावोगावचे पाटील, देशमुख, सुभेदार, वतनदार या लोकांना साम दाम, दंड वापरून राजांनी वठणीवर आणले. आणि हे करत असताना प्रत्येक नीतीवरचे आपले प्रभुत्व दाखवून दिले. महत्वाची गोष्ट म्हणजे राजांना स्वतः अनेक नातेवाईकांशी संघर्ष करावा लागला. प्रसंगी लढावे लागले. तरी शिवराय कधी डगमगले नाहीत. स्वराज्याच्या मार्गात आडवा येणारा माणूस, जो स्वकीय असो वा परकीय, त्यांनी त्याचा बिमोड केला. आपले उद्दिष्ट साध्य केले.

धर्म नीती हा नेहमीच राज्यकारभारातील एक नाजूक भाग असतो. गेल्या हजारो वर्षांत भारतात अनेक धर्म- पंथ, संप्रदाय राजीखुषीने किंवा जबरदस्तीने रुजले. त्यांचं समाजाशी एक भावनिक नातं निर्माण झालेलं असते. राजालाही अनेकदा धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करणे शक्य होत नाही. मात्र राजांनी ते प्रेमाने करून दाखवले.
आपल्याच समस्यांमध्ये गुंतलेल्या हिंदू धर्मात परकीय आक्रमणामुळे अधिकच औदासिन्य आलेले होते. रुढींची बंधनं अधिक घट्ट होऊ लागलेली. अशा वेळी जबरदस्तीने “मुसलमान” बनवल्या गेलेल्या बजाजी निंबाळकर यांचे, आणि उत्तरार्धात नेताजी पालकर यांचे पुन्हा धर्मांतर करून घेतले गेले. ही एक फार मोठी क्रांतिकारक घटना होती. त्यासाठी राजांना नक्कीच अनेक प्रकारचा वाद-विवाद, मनस्ताप, प्रस्थापित मठाधीशांचा रोष सहन करावे लागले असतील. पण नेहमीप्रमाणे राजांनी इथे प्रेमाचा “गनिमी कावा” वापरून सर्वांची मने जिंकून घेतली आणि जे पाहिजे तेच घडवून आणले.
शिवाजीराजांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर शत्रूकडून होणारी देवळे, धार्मिक ग्रंथ यांची विटंबना कमी झाली. कारण असे वागणाऱ्या शत्रूला राजांच्या प्रखर हल्ल्याला सामोरं जावे लागे. स्वतः राजांनी आपल्या कोणत्याही स्वारीत प्रार्थना स्थळे, धर्मग्रंथ, स्त्रिया, लहान मुले, वृध्द, फकीर, मौलवी, साधू-संत यांना उपद्रव दिला नाही. त्यामुळे त्यांच्या नीतिमत्तेचा वचक शत्रूवरही निर्माण झाला.
राजांनी त्यांच्या दक्षिण स्वारीच्या वेळी, तामिळनाडू मध्ये, विटंबना झालेल्या, मशीद बनलेल्या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला. तिथे पुन्हा कार्तिक दीपोत्सव सुरु केला. तसेच श्रीशैलच्या मंदिरासमोर गोपूर उभे करणे, जवळच्या पाताळगंगेच्या तीरी घाट बांधणे, गोव्यातील सप्तकोटेश्वरच्या जागी पोर्तुगीजांनी बांधलेले चर्च पाडून तिथे पुन्हा मंदिराचा जीर्णोद्धार करणे, स्वराज्यातील अनेक मंदिरे, मठ, तीर्थक्षेत्रे यांना आर्थिक मदत  व संरक्षण देणे असे कितीतरी कार्य केले. या सर्व धर्मकार्यात हयगय होणार नाही तसेच कुणी विनाकारण लुडबूड करणार नाही याचीही दक्षता घेतली.
प्रतापगड वर भवानी मंदिर बांधून झाल्यावर समाजातील इतर वर्गालाही पूजेत, मिरवणुकीत सहभागी करून बंधुत्वाचा, सामाजिक समतेचा नवा पायंडा घालून दिला. सैन्यातील विविध जाती-जमातीच्या सर्व सैनिकांमध्ये बंधुभाव राखला. एकजुटीचा आदर्श निर्माण केला.

ज्या वेळी शत्रूशी तह करणे गरजेचे ठरले तेंव्हा सामनीतीचा वापर करून राजांनी शांतता प्रस्थापित केली. त्या काळात आपले सैन्यबळ, अश्वदल वाढवण्यावर भर दिला. तसेच किल्ल्यांची डागडुजी, शस्त्रनिर्मिती, वाहतूक व्यवस्था, शेती आणि व्यापारवृद्धी याकडे जास्त लक्ष दिले. युद्धापूर्वी आणि युद्धजन्य परिस्थितीतही यामुळे रसद पुरवठा सुरळीत होऊन राजांना त्याचा जास्त फायदा झाला.

राजकारणात भेदनीतीचे चे महत्व अनन्यसाधारण आहे. शत्रूच्या सैन्यात दुफळी निर्माण करणे, त्यांच्या मानसिकतेवर आघात करणे यामुळे साध्य होते. राजांनी आपल्या हेरखात्याचा सुयोग्य वापर करून शत्रुसैन्यात अनेकदा खळबळ उडवून दिली. शत्रूला कायम गाफील ठेवले. मोगली कागद पत्रातून असे अनेकदा लिहिलेले आहे की “सिवा त्याला जिथे आणि जेंव्हा पोचायचे तेंव्हा जातोच..मात्र आमच्या सैन्याला हात चोळत बसण्याव्यतिरिक्त काही करता येत नाही.”

दूतनीती किंवा आजच्या भाषेतील वकिली तर राजांनी फार चातुर्याने वापरली. सोनोपंत, त्र्यंबकपंत, रघुनाथ पंत, गोपीनाथ बोकील, रामचंद्र पंत अशा अनेकांच्या बुद्धीचा वापर करून राजांनी उदंड राजकारणे केली. यातला प्रत्येक जण बुद्धिमान होता. पण प्रत्येक वेळी समोरचा शत्रू आणि गरज ओळखून राजे आपला दूत /वकील बदलत. प्रत्येकाची क्षमता जाणून त्याप्रमाणे वापर करून दूतांना यशस्वी दूत बनवले. अफझलखानाचा पराभव करण्यात सगळ्यात जास्त महत्वाचे ठरले म्हणून राजांनी “गोपीनाथकाका बोकील ” खास सत्कार करवून आणला. तर आपल्या मातुश्री जिजाऊ यांच्या सोबतीनेच वृद्ध सोनोपन्तांचीही सुवर्णतुला घडवून आणली. सैन्यातील बलिदान दिलेल्या शूर शिपायांच्या घरी प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यांचा उदरनिर्वाहाची चिंता करत त्यासाठी वार्षिक तनखा नेमून दिला. आपल्या सेवकांनाही मानाने वागवणारा, त्यांची काळजी घेणारा असा राजा बहुदा दुसरा नाहीच..!
म्हणूनच कदाचित समर्थ रामदास त्यांची स्तुती करताना त्यांना “पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा” असे म्हणून जातात..!

३.      शत्रूंशी राजांचे वर्तन –
शिवराय आणि त्यांचे सहकारी प्रत्येक शत्रूला वेगवेगळ्या प्रकारे सामोरे गेले. लढाई पूर्वी त्यांनी प्रत्येकाच्या स्वभावाचा, लष्करी ताकदीचा स्वतंत्र अभ्यास केला. त्यानुसार आपले धोरण ठरवले. आणि ते काटेकोरपणे अंमलात आणले. भारतावर आक्रमण करून स्वतःची सत्ता प्रस्थापित करू पाहणारे मोगल साम्राज्य आणि तत्कालीन बादशहा औरंगजेब हाच आपला मुख्य शत्रू आहे हे राजांनी सर्वात आधीच ओळखले होते. राजांच्या सुरवातीच्या हालचाली अभ्यासल्या की हे लगेच लक्षात येते.
आजकाल काही मंडळी औरंगझेब व शिवाजी महाराज यांचे संबंध चांगले असल्याचे दाखवू पाहत आहेत याची खरी काही गरज नाही. कारण राजांनी आयुष्यभर विशिष्ट जाती व धर्माला कधीही टार्गेट केले नाही. “तुम्ही तुमच्या राज्यात,देशात सुखाने नांदा आणि आम्हालाही सुखाने जगू द्या” अशा सरळमार्गी विचारातून राजांचा लढा सुरु होता. कधी तो आदिलशाही विरुद्ध होता, कधी पोर्तुगिजांबरोबर, कधी इंग्रजांशी तर कधी प्रत्यक्ष रक्ताच्या नात्यातील माणसांशी सुद्धा..! हे सर्व करत असतानाही त्यांचे मोगलांकडे बारीक लक्ष होते म्हणूनच त्यांनी आपले सर्व बळ औरंगझेबाविरुद्द होणाऱ्या युद्धासाठी एकवटायला सुरुवात केली होती. मात्र त्यांच्या अचानक निधनामुळे पुढचा इतिहासच बदलून गेला...!
सुरुवातीच्या काळात जेंव्हा औरंगझेब विजापुरशी युध्द करत होता तेंव्हा त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी राजांनी नगर, जुन्नर, भिवंडी, कल्याण अशा प्रांतांवर स्वाऱ्या केल्या. तिथून जास्तीत जास्त संपत्ती मिळावी म्हणून लुटालूट केली. लगेच पुन्हा औरंगझेबाकडे खलिते धाडून क्षमायाचना केली, त्याचवेळी ताब्यात घेतलेला सगळा मुलूख मात्र स्वराज्यातच राहील याची दक्षता घेतली. यातून त्यांनी आदिलशाही व मोगल दोघानाही नेमका संदेश दिला.
आदिलशाहीच्या प्रदेशात सर्वात प्रथम शिवबाराजानी उठाव केला. तिथला प्रांत, गड किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली. एक प्रकारे ही बंडखोरी होती कारण राजे व त्यांचे वडील हे आदिलशाहीचे वतनदार होते. त्यामुळे या बंडाळीचा बिमोड करण्यासाठी शत्रू सैन्य येणार हे निश्चितच होते. राजांचे वेगळेपण हे की त्यांनी या सगळ्याचा आधीच अंदाज घेऊन राजगड, पुरंदर, प्रतापगड, जावळीचे खोरे, पन्हाळगड अशी संभाव्य रणमैदाने सिद्ध केली. लढाई किंवा युध्द हे आधी सेनानीच्या मनात सुरु होते, त्याप्रकारे व्यूहरचना सिद्ध होते आणि जर ती रचना योग्य असेल तरच त्याचा परिणाम प्रत्यक्ष युद्धभूमीवर दिसून येतो.तसेच शक्यतो रणभूमी ही नेहमी स्वराज्याच्या गाभ्यापासून दूर ठेवण्याची दक्षता घेतली. प्रत्येक युद्धापूर्वी राजांनी व त्यांच्या सल्लागारांनी मनोमन युद्धाचे आराखडे, भूगोल या गोष्टी पक्क्या केल्या, त्याप्रमाणे हालचाली केल्या म्हणूनच प्रत्यक्ष युद्धात ते प्रचंड यशस्वी ठरले. हा चमत्कार नव्हता तर अचूक प्रयत्नांना, नियोजनाला मिळालेली ती यशाची पावतीच होती..!
प्रत्येक युद्धात महाराजांनी वेगवेगळी नीती वापरली तीही समोरच्या माणसाचा अभ्यास करूनच..! म्हणूनच कपटी व क्रूर अफझलखानाशी राजे “कपट नीती” वापरतात तर शाहिस्तेखानला अचानक हल्ल्याची “धक्कातंत्र नीती” वापरून त्याचा पूर्ण मानसिक पराभव घडवून आणतात. बहादुरखानासारख्या पराक्रमी परंतु बावळट शत्रूला खेळवत ठेऊन आपली विजयपताका फडकत ठेवतात. दिलेरखानाशी अत्यंत सावधपणे वागतानाच मिर्झाराजांसारख्या पराक्रमी, बुद्धिमान आणि वचनाला पक्क्या अशा दिग्गजालाही प्रेमाने वश करून आपला कार्यभाग साधून घेतात..!
मोगलांबरोबरच इंग्रज, पोर्तुगीज फ्रेंच आणि डच या त्याकाळातील परकीय सत्तांशी राजांनी जे वर्तन केले आहे त्याचा अभ्यास केला तर आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण कधीच चुकणार नाही. मात्र आम्ही या परकीयांना जवळ करून राजांच्या इतिहासाला मात्र अडगळीत टाकले आहे आणि त्याचे परिणाम वर्षानुवर्षे भोगत आहोत.
आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत, दक्षिणेतील शाह्यांचे ऐक्य घडवून आणण्याचा जो प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला तो थक्क करणारा आहे. प्रत्यक्ष शत्रूच्या गोटातून स्वतःचा पुत्र लढत असताना राजे कुठेही ढासळलेले, खचलेले दिसत नाहीत. उलट जोमाने राजकारण आणि युद्धकारण करताना दिसतात. आयुष्यभर ज्यांच्याशी शत्रुत्व पत्करले त्या आदिलशाहीला वाचवायला धावत जातात. हे सर्व फार बारकाईने अभ्यासले पाहिजे. ज्यातून आपल्याला सतत मार्गदर्शन व स्फूर्ती मिळत राहील.
४.      अफवांचा व हेरांचा वापर :-
राजांनी शत्रूला कायम गाफील व भयग्रस्त ठेवण्यासाठी विविध कल्पना वापरल्या. त्यातील एक गोष्ट म्हणजे अफवा. अफवांचा परिणामकारक वापर करून राजांनी कौटिल्य नीतीची चुणूक अनेक वेळा दाखवली. “राजे भिंतीतूनही येऊ शकतात, चार पुरुष उंच उडी मारतात, अचानक अदृश्य होऊ शकतात, कोणत्याही प्राण्याचे वा माणसाचे रूप घेऊ शकतात, राजांना दैवी शक्तीचे वरदान आहे, राजांना काळी जादू अवगत आहेत ” अशा अनेक अफवा राजांच्या गुप्तहेरांनी यशस्वी पाने शत्रूच्या गोटात रुजवल्या होत्या. त्यामुळे शिवाजीराजांच्या विषयी सामान्य शत्रुसैनिकाचे विचार नेहमीच गोंधळलेले राहिले.
तसेच राजांनी हेरांचा जबरदस्त उपयोग करून घेतला. आपल्या समाजातील प्रत्येक जातीतील कितीतरी माणसे त्यांच्या हेरखात्यात होती. शत्रू प्रदेशातील समाजाच्या सर्व थरातील बातम्या मिळवणे त्यामुळे साध्य झाले. शिवरायांच्या हेरखात्याचे मोठेपण इतके उत्तुंग की, हजारो हेरांमधील  बहिर्जी नाईक व त्यांच्या दोन-चार सहकाऱ्याशिवाय एकाचंही नाव कुणाला ठाऊक नाही..! केवढी ही गुप्तता व सावधपण!
प्रत्येक मोहिमा, किंवा शत्रूच्या हालचालींवर इतके बारीक लक्ष ठेवल्यामुळेच विविध रणनीतीत ते यशस्वी ठरले. म्हणूनच आग्र्याच्या त्या मुक्कामात राजांविषयी सर्व मोगली सरदारात भीतीची भावनाच जास्त प्रबळ होती. आणि याचाच पुरेपूर फायदा राजांनी उठवला नसता तरच नवल होतं. आजच्या इ-बिझनेसच्या जमान्यातही ही गोष्ट अनेकांना जमत नाही.
५.      परिणामकारक संदेशवहन आणि दळणवळण:-
आजच्या भाषेत सांगायचं तर effective communication आणि timely movements. शिवकालीन भूगोल आणि वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास केला तर कुणाच्याही लक्षात येईल की एका ठिकाणाहून दुसरीकडे त्वरेने पोहोचणे फार अवघड होते. जंगले, वाटेतील नद्या, शत्रूचा प्रदेश, अवघड डोंगर दऱ्या या सगळ्यातून मार्ग काढत इच्छित स्थळी वेळेवर पोचणे हे एक दिव्यच होते. तरीही शिवकाळात आणि नंतरही मराठी सैन्याच्या हालचाली या अतिवेगवान व अचूक राहिल्या. शत्रूला कळण्यापूर्वी सैन्य सगळ्या संकटावर मत करून तिथे पोचलेले असायचे. नद्या ओलांडण्यासाठी नावा, धान्य, दारुगोळा, शस्त्रास्त्रे पुरवणारी तुकडीही वेळेवर मदत देऊन पसारही होत असे. कोणताही मोबाईल अथवा फोन उपलब्ध नसलातरी विविध तुकड्यांमध्ये अचूक संदेश पाठवले जात असंत. शत्रूच्या हालचालींचा वेध घेत सेनापतीला अचूक माहिती मिळत असे. ज्यामुळे ऐनवेळी युद्धभूमी बदलणे, शत्रूची ताकद जास्त असल्यास पसार होणे अथवा जास्त कठीण जागी शत्रूला घेऊन जाणे हे निर्णय घेता येत त्यामुळे युद्ध जास्त परिणामकारक ठरे.
एका किल्ल्यावरून दिलेला संदेश हा साधारणतः २५ चौ. मैलांपर्यंत दिसू शकतो याचा फायदा उठवत किल्ल्यांवरून आगीचे लोळ दाखवणे, धूर करून दाखवणे, मशालींच्या सहाय्याने विशिष्ट संदेश देणे, तोफ डागणे आदि संकेतांचा प्रभावी वापर करून संदेशवहन होत असे.
राजांच्या संदेशवहनाचे यश इतके होते की शाहिस्तेखान, अफझलखान, मिर्झा राजा जयसिंग अशा शत्रू सरदारांच्या हालचाली त्यांना दर तासाला कळत होत्या. त्याही राजगडासारख्या दुर्गम ठिकाणी बसून..!
तसेच प्रसंगी राजे आपल्या एखाद्या सरदाराला विशिष्ट सूचना पाठवून काही वेगवान हालचाली घडवून आणत. त्याचबरोबर हेही सांगायला हवे की जेंव्हा राजे स्वतः एखाद्या मोहिमेवर असंत तेंव्हाही हेरखात्यांच्या बातम्या राजगडावर येत. एखादी महत्वाची बातमी मग राजांना सांगितली जाई. त्याचं उदाहरण आहेच. जेंव्हा राजे आदिलशाही वजीर खवासखान याच्याविरुद्ध कुडाळ मोहिमेत होते तेंव्हा राजगडावर बातमी कळली की मुधोळहून राजांचा दूरचा नातेवाईक बाजी घोरपडे खावासखानाला सामील व्हायला निघणार आहे. तेंव्हा जिजाबाई यांनी त्वरित निरोप पाठवला की “बाजीचे पारिपत्य करून येणे”. राजांनी त्वरीत त्याची अमलबजावणी केली व बाजीचा मुधोळ मध्ये शिरून वध केला व शहजीराजेना त्याने कैद केले होते त्याचा बदला घेतला. तुम्ही जरा नकाशा काढून पहाच की राजगड कुठे आहे, कुडाळ कुठे आहे, मुधोळ कुठे आहे. जायला यायला लागणारा वेळ मोजा मग लक्षात येईल की किती वेगाने व अचूकपणे हे घडत होते. म्हणून त्याचं फार कौतुक वाटते.

तुलनाच करायची म्हटली तर आजच्या प्रभावी तंत्रज्ञानाच्या जमान्यात, जेंव्हा फोन, उपग्रह अशा गोष्टी हाताशी असूनही आपल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना एखादी गोष्ट मीडियातून बातमी प्रसिध्द झाल्यावर कळते आणि त्यावर कारवाई अनेक महिन्यानंतर होते. शेजारी देश घुसखोरी करतो त्याची कोणतीही कल्पना नसलेले आपले नेते पार्ट्या, क्रिकेट यात मश्गुल असतात...!



६.      भौगोलिक परिस्थितीचा सुयोग्य वापर – पाठीशी उभ्या असलेल्या सह्याद्री सारख्या पर्वतरांगांचा शिवरायांनी जो वापर करून घेतलाय त्याला तोड नाही. पश्चिमेचा सागर किनारा, मधली ४०- किमी रुंदींची चिंचोळी कोकणपट्टी, पुढे असलेल्या १०-२० किमी रुंदीच्या पर्वतरांगा, त्यांचे पसरत गेलेले बालाघाट, महादेव डोंगर सारखे फाटे, नद्यांची खोरी हा सगळा भाग जाणूनबुजून स्वराज्याचा गाभा राहिला व ठेवला गेला. या परिसरातील घाटरस्ते, दुर्गम वाटा, चोरवाटा, सागर किनारे, जंगले, बाजारपेठ, खाडीकाठ या सगळ्यावर कठोर नियंत्रण ठेवले गेले. ते नियंत्रण मिळवता यावे म्हणून आधीपासून असलेले दुर्ग ताब्यात घेण्यात आले. तिथे आधी दुर्ग नसल्यास नवे दुर्ग मुद्दाम बांधून घेतले गेले. लहान मोठ्या लष्करी छावण्या विविध ठिकाणी अशा विखरून ठेवण्यात आल्या की त्यांना परिणामकारक व त्वरित हालचाल करता यावी. या सगळ्या नियोजनात तिथल्या स्थानिक माणसांचा हुशारीने वापर करून घेण्यात आला. हे एवढं नियोजन तितकी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी माणसे जमावणे तितकं सोपे नाही. त्यामुळे स्वराज्यात कोणालाही थेट पदे न देता त्यांना अंगभूत गुण विकसित करण्याची संधी देण्यात आली. त्यांच्या कार्यक्षमतेकडे पाहूनच पदे दिली गेली व सर्व परिसरावर नियंत्रण मिळवले.
***********
वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांव्यातिरिक्त शिवरायांचे आरमार, युद्धनिती, व्यापार व शेती अशाप्रकारचे कितीतरी मुद्दे थोडक्यात उरकण्यासारखे नाहीत. त्यामुळे शिवरायांच्या आयुष्यातील विविध पैलूंचा वेध आपण या संपूर्ण लेखमालेतून घेतच राहूया. तेंव्हा मंडळी, माझा पुढचा लेख येईपर्यंत तुमच्या कपाटात असलेलं शिव-चरित्र पुन्हा नव्यानं वाचायला घ्या. तुमच्या प्रतिक्रियाही न चुकता सांगायला विसरू नका. काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या, मला कळवा ही विनंती...!
-                    -  सुधांशु नाईक, 3-3-२०१६ ( nsudha19@gmail.com) 

Thursday, 11 February 2016

गोनीदांच्या छायेत...

गेल्या वर्षी “मनापासून” ही लेखमाला सुरु होती, त्या लेखमालेतील हा शेवटचा लेख गुरुतुल्य गोनिदांवर. गो. नी. दाण्डेकरांच्या नावामागे “कै.” असं मला लिहवत नाही, कारण फक्त माझ्याच नव्हे तर अनेक साहित्य व दुर्गप्रेमींच्या मनात निरंतर राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे “गोनीदा”.. २०१५-१६ हे गोनीदांच्या जन्म-शताब्दीचे वर्ष. त्यामुळे लिहायचं ठरवलं होतंच.


तसेच इथून पुढे वर्षभर “वेध छत्रपतींच्या तेजस्वी जीवनाचा” ही लेखमाला लिहिणार आहे. माझ्यासारख्या लहान माणसाला तो दिव्यपुरुष कसा दिसला तेच लिहायचा यथामती प्रयत्न करणार आहे. ते लिहिण्यापूर्वी जणू गुरूला केलेलं हे वंदन समजून गोड मानून घ्या....

गोपाल नीलकंठ दाण्डेकर. हजारो जणांचे अप्पा. मला पहिले भेटले ते “उडोनी हंस चालला” या पुस्तकात. माझं वय ६-७ वर्षाचं. मे महिन्याची सुट्टी. इकडेतिकडे उचकपाचक करताना बाबांच्या पुस्तकं भरलेल्या ट्रंकेतून हे पुस्तक हाती लागलं. मग एका कोपऱ्यात ठाण मांडले. त्या कोपऱ्यात बसून भान हरपून गेलेला तो मी, मला अजून आठवतोय.
नळराजा व दमयंतीची ती कहाणी. अत्यंत सर्वगुणसंपन्न असा तो नळराजा. त्याचा तो दुष्ट मनोवृत्तीचा बंधू पुष्कर. नळराजाचं औदार्य, त्याचं शौर्य, त्याची अश्व-परीक्षा, त्याची औषधोपचारातील निपुणता, द्यूत खेळण्यात तरबेज. हे सारं असूनही त्या नळदमयंतीनं नंतर भोगलेली दुःख हे सगळं सगळं खरं वाटलेलं. ते पुस्तक अधाशासारखं कितीक वेळा वाचलं नंतर. कायम लक्षात राहिली ती त्यातली मधुर भाषा. ते उत्कट संवाद. तेच तर वैशिट्य होते गोनीदांच्या भाषेचे. विषय कोणताही निवडावा पण तो भावोत्कट असावा. मग त्याच्याशी संबंधित सर्व संदर्भ एकत्र करावेत. आणि त्या सगळ्या फुलांची एक सुरेख माला देखण्या शब्दात ओवली तर जे काही समोर येईल ते म्हणजे गोनीदांचं लेखन.


त्या पहिल्या पुस्तकानंतर अक्षरशः “गोपाल नीलकंठ दाण्डेकर” हे नाव ज्या पुस्तकावर दिसेल तेच वाचत सुटलो. सुदैवाने बाबांच्या संग्रहात त्यांची बया दर उघड, हर हर महादेव, दर्याभवानी व कुणा एकाची भ्रमणगाथा ही अन्य चार व अप्पांचे परममित्र बाबासाहेब पुरंदरे याचं “राजा शिवछत्रपती” ही पुस्तकं होती. नंतर पुढच्या ४-५ वर्षात या पुस्तकांची मग अनेक पारायणं झाली.
पुढे शाळेच्या किंवा आमच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातील ( चिपळूणकरांनी “लोटिस्मा” असं प्रेमानं दिलेलं नाव) गोनीदांच्या कादंबऱ्याचा फडशा पाडला. शितू, पडघवली, तांबडफुटी, मृण्मयी यात दिसणारं कोकण आजूबाजूला होतंच. पण त्याच्याकडे पहायची दृष्टी मिळाली ती गोनीदांच्या कृपेने.
त्याशिवाय महाराष्ट्र दर्शन, दुर्गभ्रमणगाथा, माचीवरला बुधा या पुस्तकांनी भूगोल पाहायला व निरखायला शिकवलं. प्रत्येक पान, फूल, फांदी यासह सर्व पंचमहाभूतातील देखणेपण निरखायला शिकवलं. त्यावर प्रेम करायला शिकवलं.
जैत रे जैत, पवनाकाठचा धोंडी, पूर्णामायची लेकरं यात दिसलेली नवी बोलीभाषा मनाला अतीव आनंद देऊन गेली. प्रत्येक बोलीभाषेतील विशिष्ट शब्द, क्रियापदे, म्हणी, वाक्प्रचार यांकडे लक्ष वेधले ते त्यांनीच. ते जर झाले नसते तर कदाचित या बोली भाषा कधीच लावण्यवती वाटल्या नसत्या.
त्या लहान कळत्या-नकळत्या वयात भाषेचे जे संस्कार मनावर उमटलेत ते अमीट आहेत.

अर्थात गोनीदांच्या पुस्तकांनी नुसतं वाचन नव्हे तर या देशातील इतिहासावर, मातीवर, इथल्या माणसांवर, इथल्या दगडधोंड्यांवर, नदी-समुद्रकिनाऱ्यावर, डोंगर-दऱ्यांवर प्रेम करायला शिकवलं.
“दुर्गभ्रमणगाथा” व “स्मरणगाथा” ही दोन पुस्तकं माझ्या नेहमीच जवळ असतात. जेंव्हा देशापासून दूर कुठेतरी राहत होतो, तेंव्हा त्या “दुर्गभ्रमणगाथेनं” भासमान भ्रमंती (virtual travel) घडवून आणली. थकलेल्या मनाला किती उभारी दिली ते शब्दात सांगणे अशक्य. त्यांच्या आयुष्याविषयी त्यांनीच विपुल लिहिलं आहे. त्यामुळे त्याबाबत मी काही लिहित नाही. माझ्यासारख्याला ते कसे दिसले हे सांगणं जास्त योग्य होईल.

निसर्ग पाहावा तो गोनीदांच्या नजरेनंच. ज्ञानोबांनी म्हटल्याप्रमाणे “करतळी आवळा ठेवून चौबाजूने निरखावा” तसं गोनीदा ते ठिकाण पाहत. एखादा दुर्ग, त्याभोवतीची नद्या-ओढ्यांची पात्रे, त्यातील रंगीत खडे-दगड, उंच आकाशावेरी गेलेले सुळके, झाडाची एखादी फांदी, एखाद्या जंगलातील सुहृदाची झोपडी, तिथलं साधं राहणं, हे सगळं त्यांच्या बारीक नजरेनं टिपून घेत. त्याचा लेखन व छायाचित्रणातून मुक्त आस्वाद घेत. मात्र तिथेच थांबत नसत. तर ते सारं दुसऱ्याला दाखवायला उत्सुक होत. आणि मग त्यांच्या मागून तशीच उत्सुक मंडळी पुन्हा त्या वाटेने चालू लागत.
कुणीही कधी न चढलेला रायगडच्या वाघ दरवाजाजवळील कडा चढून येणे असो, रानात सापडलेली “ज्योतवंती” ही वनस्पती असो, किंवा आनंदवनात सुरु झालेलं बाबा आमट्यांचं कार्य असो, हे सारं महाराष्ट्रासमोर त्यांनीच प्रथम आणले. तेही पुन्हा त्याचे कोणतेही श्रेय न घेता..!
 “जे जे उत्तम, उदात्त, सुंदर” त्याची लगबगीने जाऊन अनुभूती घेणे व ते रसिकांशी शेअर करणे यासाठीचा त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा. अनेक लोक आपले अनुभव, आपलं खाजगी आयुष्य लोकांपासून लपवून ठेवतात. त्यांचे वेगवेगळे चेहरे असतात. तसं गोनीदांनी बहुदा कधीच केलं नाही. उलट गोनीदा त्यांचं नेहमीचं भावूक रूप कधी लपवत / लाजवत फिरले नाहीत. त्यांच्यावर अनेकांनी लिहिलंय. त्यात समवयस्क आहेत, त्यांचं आयुष्य जवळून पाहणारे आहेत. त्यापैकी काही जणांनी त्यांच्या भावूक, उत्कट वागण्याबद्दल किंचित टीकेने व उपहासाने लिहिलंय. पण त्यांचं ते “अचानक भरून येण, गदगदून येणे” हे नक्कीच खरं होतं हेही नमूद केलंय. लहानशा वाऱ्याच्या झोताने जशी बकुळीची फुले अलगद जमिनीवर उतरावीत तसं ते गदगदून येणे असायचे. मनातला आवेग लपवायला राजकारणी मन लागते, ते गोनीदांच्याकडे नव्हतेच.

“जो अतीव, अवर्णनीय अनुभव मी घेतलाय, तो दुसऱ्यानीही घ्यावा” ही त्यांची भावना मोठीच. त्यातूनच ते अनेकांना महाराष्ट्र दाखवत हिंडले. मोठमोठे अधिकारी, लेखक, कलावंत याच्यासाठी प्रसंगी स्वतःची पदरमोड करून त्यांनी गड-कोट दाखवले. या गड-कोटाचं जतन व्हावं, तिथलं सारं काही नोंदवून ठेवावं यासाठी त्यांनी जीवापाड कष्ट घेतले. अनेक दुर्गांचे नकाशे बनवले. विविध अवशेषांची नोंद केली. सरकारदरबारी खेटे मारून छायाचित्रण, वृत्तांकन करून ठेवण्यासाठी नया पैशाचीही अपेक्षा न करता रक्त आटवले. कारण या सगळ्याविषयी त्यांना फार ममत्व होते. जेंव्हा एखादा माणूस “काय पाहायचं त्या गडावर. नुसते दगड-धोंडे तर आहेत” असं म्हणे, तेंव्हा त्याच ठिकाणाचा इतिहास ते आपल्या वाणीने जिवंत करत. बलिदानाची जाणीव ठेवणं हे आपलं कर्त्यव्य या भावनेने त्या स्थळांच्या जपणुकीसाठी तळमळत.

लेखांव्यतिरिक्त नाटक, नृत्य-नाटिका या प्रकारात त्या काळी काही प्रयोग करण्यात त्यांनी जे योगदान दिले ते विशेष उल्लेख करण्यासारखं. विजया मेहता, रोहिणी भाटे यासारख्या कलावंतांसोबत त्यांनी जे केलं ते त्या वेळी काळापुढचे. तसेच त्यांच्या “कादंबरी वाचन” प्रकाराबाबत. मराठीत “कथाकथन” खूपच लोकप्रिय होते पण भावोत्कट कादंबरीचे वाचन हा नवाच प्रकार त्यांनी सुरु केला व त्यांच्या माघारी त्यांच्या कुटुंबीयांनी तो नेटकेपणाने चालू ठेवलाय.

सध्या सर्वत्र दुर्ग-संवर्धनाची कामे भटकंती करणारी अनेक मंडळी करताहेत. याचाही खरा पाया घातला तो गोनीदांनी. त्याकाळी तर आजच्या इतक्या सोयीसुविधा नव्हत्या. तरीही युवकांचे जथ्थे घेऊन हा “तरणा म्हातारा” गडावरची स्वच्छता, पाण्याच्या टाक्यांची, तलावांची स्वच्छता अशी कामे करायचा. गड परिसरात राहणाऱ्या आदिवासी, गरीब लोकांना आपल्या परीने जमेल तशी कर्तव्यभावनेने मदत करत राहायचा. त्याची कसलीही वाच्यता न करता.

गोनिदांवर संतांचं गारुड. शेकडो ग्रंथ मुखोद्गत. त्यातून मग कृतज्ञता म्हणून त्यांनी संतांवर लिहिलं. थोर व्यक्तींवर लिहिलं. गोनीदांनी स्वतः लिहिल्याप्रमाणे “लिहिणं ही त्यावेळची गरज होती”. पण म्हणून भाराभर लिहूनही त्यातली गुणवत्ता कुठे उणावत नाही हे त्यांच्यातील लेखकाचे मोठेपण. नाही म्हणायला कधी कधी एखाद्या पुस्तकात जाणवतं की इतरांच्या लेखनाचे उतारे जरा जास्त दिसताहेत. हा जर दोष असेल तर तो त्यांच्या स्वभावाचा, किंवा त्यांच्यावर जगण्याने केलेल्या संस्कारांचा असावा. कारण त्याची जडणघडण झाली ती संत साहित्यावर. ज्ञानोबा, तुकोबा, रामदास याचं लेखन विविध संदर्भांवर / दाखल्यांवर भर देणारं. समोरील अज्ञानी जनांनी शहाणे व्हावे या कळकळीतून निर्माण झालेलं. तसेच तत्कालीन कीर्तन, प्रवचन आदि ठिकाणी सुद्धा विविध संतांचे, पुराणांचे दाखले देण्यावर भर असायचा. तेच संस्कार नकळत गोनीदांनी उचलले असावेत असं मला वाटते.

गोनीदांचे नुसते पाठांतर होते असे नव्हे तर शेकडो अभंग, पदरचना, ते सुरेल गात असंत. त्यातूनच त्यांच्या व हृदयनाथ मंगेशकरांच्या कल्पनेतून एक अद्भुत प्रयोग साकारला “ भगवतगीतेचा लताच्या स्वरांनी सजलेले दोन अध्याय, ज्ञानेश्वर माऊली व अभंग तुकयाचे” या ध्वनिमुद्रिका. गोनीदांचे मंगेशकर कुटुंबियांसमवेत घरगुती संबंध. सगळे मंगेशकर गोनीदांच्या लेखनावर फिदा होतेच. गोनीदांच्या “जैत रे जैत” या कादंबरीवर या कुटुंबाने सिनेमा काढलेला. एकदा मुंबईतील त्यांच्या घरी गोनीदा ज्ञानेश्वरांच्या विराण्या ऐकवत होते. त्यातील गोडवा सगळ्यांनाच भावला. मग हृदयनाथांनी ते लताच्या आवाजात करण्याचं ठरवले. सहकार्याला गोनीदा होतेच.

मग तो प्रकल्प सिद्धीस गेला व आजही लतादीदींच्या आवाजातील त्या विराण्या, ते अभंग ऐकणं हा आपल्यासाठी एक आनंदाचा ठेवाच आहे. गीतेतील अध्याय रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडीओची उपलब्धता, लतादीदींची अन्य रेकॉर्डिंग यातून अवघा ८-१० दिवसांचा वेळ मिळालेला. त्यात ते जमवायचं म्हणजे कठीण गोष्ट. मात्र गोनीदांनी दीदींना रोज कित्येक तास संथा दिली. प्रत्येक उच्चार घासून पुसून बसवून घेतला. लतादीदीनी मेहनत घेतली व एक सुंदर रेकॉर्डिंग रसिकांना लाभले.

गोनीदांच्या मित्रपरिवारात हजारो जण. तिथे आर्थिक परिस्थिती, प्रतिष्ठा, समाजातील स्थान या गोष्टी गौण होत्या. कोणताही गाजावाजा न करता ते अनेक रुढींचे निर्मूलन स्वतः करत. राजमाचीचा खंड्बा उंबरे, रायगडावरील आवकीरकर, राजगडावरील भिकुले पासून अनेक लहान मोठ्या घरातील थेट स्वैपाकघरापर्यंत त्यांचा संचार होता. वैभव वा दारिद्रयापेक्षा लोकांच्या मनातील श्रीमंती त्यांना जास्त भावणारी होती. अशा शेकडो लोकांशी त्यांचे जे मैत्र जुळले ते त्यांच्या माघारी कुटुंबीयासोबतही टिकले आहे.
ज्यांना गोनीदांचा प्रत्यक्ष सहवास लाभला नाही अशा कित्येकांना त्यांचा सहवास मिळाला तो त्यांच्या पत्रातून. गावोगावी, देशोदेशीच्या हजारो लोकांशी अप्पांची पत्र-मैत्री. लहानशा पोस्ट कार्डावरील देखण्या अक्षरातील यातील कित्येकांनी अप्पांची स्वतःला आलेली १-२ पत्रेसुद्धा किती मनापासून जपली आहेत. ते पाहिले की हा अकृत्रिम स्नेहबंध पाहून मन भरून येते.


त्यांच्यासोबत ज्यांनी भटकंती सुरु केली तेही आज साठीच्या घरात किंवा त्यापलीकडे पोचलेत. त्यांनीही नवे भटके घडवलेत. “आपल्या अप्पांची” विचारधारा पुढे चालवलीय. अप्पांना जाऊनही आज जवळपास २० वर्षे होत आली पण आजही “अप्पांच्या” आठवणीने त्यांची मने फुलून येतात.

साहित्य व दुर्गप्रेम यांचा मेळ घालत गेली काही वर्षे “गोनीदा प्रेमी” “दुर्ग साहित्य संमेलन” उत्साहाने आयोजित करतात. त्याव्यतिरिक्त विविध संघटना दुर्ग-संवर्धनाचे काम करताहेत. गोनीदांचे साहित्य नव्या पिढीलाही भुरळ घालत आहे हे खूप आशादायक चित्र आहे.

ज्या माणसाने या देशातील मातीवर जीवापाड प्रेम केले त्याची आठवण ठेवत सर्व लोकांनी या विविध कामात खारीचा वाटा उचलणे यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट ती काय?

गोनीदांच्या साहित्याच्या छायेत सदैव राहण्यासारखे सुख नाही हेच खरं. आता अधिक काही न सांगता थांबतोच. अप्पांच्याच भाषेत सांगायचं तर...

इति – तुमचाच सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

Tuesday, 8 December 2015

नवी स्वप्नं व नव्या दिशा !

२०१५ हे वर्ष सुरु झालं तेंव्हा असं वाटलं होतं की हे वर्ष लवकर संपणारच नाही. संपू नयेच. डोंगराएवढी कामं समोर होती. समोर असलेल्या अडचणी पाहता ही सारी कामं खरंच हातावेगळी करता येतील का असं एक मन विचारत होतं तरीही त्यातून जमेल तसं “मनापासून” हे सदर माझ्या ब्लॉगवर लिहित गेलो आणि आता बहुदा हा या वर्षातला शेवटचा लेख...उर्वरित दिवसांत काही लिहायला जमलं तर छानच, अन्यथा पुढच्या वर्षी नवं काही....

चहुबाजूनी अनिश्चितता, क्लायन्ट्सच्या वाढत्या व नवनवीन अपेक्षा, उद्दिष्ट पूर्ततेसाठी स्वतः आखलेली धोरणे यामुळे जानेवारी २०१५ मध्ये आम्ही सर्वजण अक्षरशः “युद्ध सदृश” परिस्थितीचा अनुभव घेत होतो. साधारण मे अखेरपर्यंत हीच परिस्थिती होती. सोबतच्या व हाताखालच्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांचा व स्वतःचा धीर सुटू न देणे, घाई गडबडीत संपूर्ण टीमकडून नव्या काही चुका होऊ न देणे, सतत चर्चा करून क्लायन्ट्सच्या मंडळींचं मन वळवणे यात आम्ही सर्व गळयाइतके बुडलो होतो. २० मे नंतर मग चित्र हळूहळू पालटू लागले. ज्या गोष्टी क़तार मध्ये कधीच कुणी केल्या नव्हत्या ते आम्ही करू लागलो. यशस्वीपणे एकेक टप्पे पूर्ण होऊ लागले. आणि मग मला भारतात पुन्हा परतायचे वेध लागले.
२०१२ मध्ये हे नक्की ठरलं होतंच की शक्यतो २०१६ ची सुरुवात पुन्हा आपल्या देशात करायची. पण कशी, कधी व कुठे याचं चित्र स्पष्ट नव्हतं.

पाहता पाहता घडामोडी जुळून आल्या. गेली ७-८ वर्षं ज्यांच्या सोबत होतो त्या L&T सारख्या कंपनीतील सर्व स्नेह्यांना सोडून येणं जड गेलंच पण सर्वांनी समजून घेतलं. मला माझ्या स्वप्नांसाठी काही वेळ मोकळं सोडलं. त्यातच माझे मित्रवर्य पी.डी. उर्फ प्रमोदजी देशपांडे यांचं मार्गदर्शन मिळालं आणि गेल्या महिन्यात थेट भारतात दाखल झालोच.

एक नक्की ठरवलं होतं की Engineering चं field पुनश्च जरा बाजूला ठेवून इतर तितक्याच आवडीच्या क्षेत्रात काही करू पाहायचं. बरोबर १५ वर्षापूर्वी हे केलं होतंच. कुठलीही पदवी न घेता वृत्तपत्र संपादन क्षेत्रात काही वर्षं आनंदानं घालवली होती. यावेळी आता ठरवलंय की मनुष्य कौशल्यविकास, पर्यटन, व्यवस्थापन व बालशिक्षण प्रशिक्षण, अपारंपरिक उर्जा यापैकी किमान एक-दोन क्षेत्रात आणि त्याबरोबर सामाजिक क्षेत्राशी संबंधित काही करायचंय. अनेक मित्र मंडळी सोबत / साथ करायला आहेतच. घराच्या जबाबदाऱ्या सांभाळून किमान दोन-तीन वर्ष स्वतःची चाचणी घ्यायचीय.

त्याचबरोबर लेखन तर चालू राहणार आहेच. मुख्यतः “शिव-चरित्र व सध्याची युवा पिढी, आणि त्या अनुषंगाने सध्या भारताचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील वाढते महत्व” याबाबत व्याख्यानाचे काही विषय प्रत्यक्षात उतरावयाचे आहेत. पश्चिम घाटातील धोक्यात येणारं पर्यावरण, जलसंवर्धन यासाठी काय करता येईल, आपल्या देशातील नवशिक्षित पिढी आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या दृष्टीने कशी कार्यक्षम होईल याबाबत मनातलं काही सुहृदांशी, नवं काही शिकू पाहणाऱ्या मंडळींसोबत शेअर करायचं आहे. त्याबाबत काम करायची इच्छा आहे. अडचणी येणारच आहेत पण सोबत्यांच्या साथीनं त्यांचं निराकरण करू शकू असा विश्वास वाटतोय. याचबरोबर मुख्य म्हणजे गेली काही वर्षे दुरावलेली डोंगरयात्रा पुन्हा सुरु करायची आहेच...!

म्हणून मग कोल्हापुरात दाखल झालो आणि आल्या-आल्या थेट दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे ज्योतिबा डोंगरावर चालत निघालो.

पहाटेची वेळ. आजूबाजूला फुललेल्या प्राजक्त व सोनचाफ्याचा दरवळ घराच्या परिसरात. तो उरात भरून पुढे निघालो. सोबत्याबरोबर पंचगंगा नदी ओलांडून पलीकडे गेलो. उसाच्या शेतातून येणारा गारवा अंगावर हवीहवीशी शिरशिरी उमटवून गेला. संपूर्ण शहर जेंव्हा धुक्याची किंचित दुलई पांघरून अजून गाढ झोपेत होतं तेंव्हा नदीपलीकडे लहानग्या गावात मात्र जाग होती. कुणी गोठ्यात गाई-म्हशीन्सोबत होतं, कुणी माऊली अंगण सारवून रांगोळी रेखाटत होती. कुणी शेताकडे निघाले होते. कुठे चुली पेटल्या होत्या. कुठे कुणी शेकोटी पेटवून बसला होता. तो शेण-गोठ्याचा, सडा-सारवणं केलेल्याचा, पेटलेल्या चुलीतील धुराचा, कुठल्या तरी पाना-फुलांचा येणारा वास आसमंतात होताच. त्यातच दूर कुठूनतरी गुऱ्हाळातून आलेला गोडूस वासही दरवळत मिसळला होता. किती वर्षं झाली हे सगळं असं उरात भरून घेऊन...! ही आपली माती, हा आपला निसर्ग हेच आपलं जीवन, आता यापासून पुन्हा दुरावायचं नाही असं वाटून गेलं.
डोंगर चढायची सवय मोडलेली. दम लागत होताच. अधूनमधून क्षणभर थांबत, चौफेर पहात गेलो सहज चढून.

वाटेत जुन्या काळात लोकांनी निगुतीनं खोदलेली तळी, विहिरी पहिल्या. यावर्षी तसं दुष्काळी वातावरण असूनही त्या पाण्यानं तुडूंबलेल्या. मात्र तरीही त्यांची पुरेशी निगा राखली जात नाहीये हे दिसत होतंच. जे आपल्या आधीच्या पिढ्यांना शेकडो वर्षापूर्वी जमलं ते आम्हाला का जमू नये असा प्रश्न पडला. मग लक्षात आले की बहुदा आपण आपला परीघ संकोचून घेतल्यामुळे हे घडत असावं. आजकाल कमी होणाऱ्या संवादामुळे हे घडत असावं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या तीन चार दशकात “जे काही करायचं ते सरकारने करावं” असा जो सार्वत्रिक समज निर्माण झालाय त्यामुळेही हे घडत असावं.

अचानक आठवलं की या वर्षी दरमहा जे ब्लॉग लेखन केलंय त्यात दोन-तीन लेख पाण्यावर आहेतच. मी तर देशापासून / राज्यापासून दूर राहून लिहित होतो. जे कदाचित अनेकांनी वाचलंसुद्धा नसेल. पण तसंच इथंही अनेक विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार या विषयावर लिहित होतेच ना. तरीही दुर्दैवाने आपण जल-संधारण यासाठी खूप कमी काम करतोय हे मात्र खरंच. आता “जल-शिवार” योजनेमुळे सरकारी खात्यात जरा हालचाल दिसतेय आणि कामसुद्धा सुरु झालेय ही आनंदाची बाब म्हणायला हवी. पण एकूण सर्व-सामान्य जनता जोपर्यंत हिरीरीने अशा समाजासाठी अत्यावश्यक गोष्टींसाठी स्वतःचा खारीचा वाटा उचलणार नाही तोपर्यंत बदल कसा होणार? हाती असलेल्या “सोशल मिडिया”चा आज कार्यकर्ते प्रभावी वापर करताहेत, ती चळवळ अधिक खोलवर न्यायला हवी. त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड द्यायला हवी. तरच चित्र बदलता येईल.यासाठी सुद्धा काही करायचं आहे.

“मी एकटा काय करणार, मी एकट्याने केलेल्या किरकोळ कामांमुळे असा काय बदल होणार, मी सांगितलेलं ऐकलं तरी जाईल का ?” असा मी विचार करू लागलो किंवा दुसरा एखादा माणूस हेच प्रश्न मला विचारू लागला तर कदाचित कशाचीच सुरुवात होणार नाही. किंबहुना प्रत्येकाची सदसदविवेकबुद्धी जेंव्हा त्याला काही करायला उद्युक्त करते तेंव्हा स्वतःच्या व दुसऱ्याच्या मनातील हे असेच प्रश्न आपले मानसिक खच्चीकरण करतात. त्यांच्या जाळ्यात न सापडता जे पुढे जातात त्यांना आपोआप सोबती मिळून जातात. एकमेकांचे हात पकडून पुढे जातानाच कार्य उभं राहते. नवा दिवस दिसू लागतो.

त्यामुळे आता जास्त विचार करत बसणारच नाहीये. नव्या-दिशा व नव्या स्वप्नांचा ध्यास घेणार आहे. जसं जमेल तसं नियोजन करून कामाला सुरुवात करणार आहे. चुकत-माकत का असेना पण पुढे जाणार आहे.  
जेंव्हा अगदीच गरज भासेल तेंव्हा तुम्ही सर्व मित्र पाठीशी उभे राहाल अशी आशा उराशी बाळगतो...!
-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

Saturday, 10 October 2015

गारुड “अमिताभ” नावाचं !


अभिनयाची उंची, जबरदस्त आवाज, रिएलिटी शो मधील सहज व आदबशीर वावर, सामाजिक प्रकल्प, कविता व निसर्ग याविषयीची संवेदनशीलता आणि त्यासोबतच अत्यंत व्यावसायिक वर्तणूक हे सर्व एखाद्या व्यक्तीने वक्तशीरपणे सतत दाखवत राहणे हे एखाद्या चमत्कारासारखेच. 
म्हणूनच गेले ४० वर्षे संपूर्ण भारतीय मनावर अमिताभचे गारुड कायम आहे.


अमिताभ बच्चन. जन्म ११ ऑक्टोबर १९४२. अरेच्चा, म्हणजे माझ्या बाबांच्या पेक्षा फक्त २ दिवसांनी मोठा असलेल्या या ७३ वर्षाच्या माणसामध्ये अजूनही कार्यरत असण्याची उर्मी व उर्जा कशी येते ?
जेंव्हा कालपरवा प्रसिद्धी मिळालेले नट सेटवर तमाशा करतात, उशिरा येतात तेंव्हा सिनेजगतातील मोठी मोठी माणसे आजही सांगतात की शुटींगच्या वेळेपूर्वी अमिताभ बच्चन नियमितपणे हजर असतात. दिग्दर्शक जे म्हणेल त्याचा आदर करत असतात. अमिताभभोवती नेहमीच लोकप्रियतेचे वलय राहिले. लोकप्रियतेबरोबर वादाचे, मसालेदार चर्चांचे गहिरे नाते. तरीही राजकारणातील वादग्रस्त काळ, एबीसीएल कॉर्पोरेशनचं कर्जबाजारी होणं या व्यतिरिक्त इतर वेळी त्याच्याबाबत नकारात्मक भावना कमीवेळाच पाहायला मिळाली त्याला कारण अर्थातच त्याचं संपूर्ण व्यावसाईक व वक्तशीर वागणे आणि संवेदनशीलता.

अमिताभ हे नाव “सुमित्रानंदन पंत” या काविमित्राच्या सांगण्यावरून वडील व ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांनी ठेवलेलं. त्याचा अर्थच मुळी “कधीही न विझणारा प्रकाश”. आज कविवर्य जर हयात असते तर काळाने नाव खरं ठरवलंय हे पाहून त्यांना अत्यानंद झाला असता..!

१९७० च्या दशकात “सात हिंदुस्तानी” या सिनेमातून लौकिकार्थाने अमिताभची कारकीर्द सुरु झाली.  सुपरस्टार राजेश खन्नाने गाजवलेला तो काळ. कुठेही अमिताभला ठळक लक्षात येईल असे काम मिळत नव्हते. त्यापूर्वी व नंतरही अनेक ठिकाणचे अपयश सतत पाठीशी होतेच. अमिताभच्या जादुई आवाजाची निरंतर आठवण काढणाऱ्या आपल्याला खरंही वाटणार नाही की एकेकाळी त्याचा “आवाज” आकाशवाणीने नाकारला होता. नोकरीच्या शोधात असलेला अमिताभ निराश मनाने तिथून परतला होता.
१९७१ मध्ये आलेल्या “आनंद” मध्ये अमिताभने उभा केलेला बाबू मोशाय व “रेश्मा और शेरा” मधला छोटासा रोल सर्वांच्या लक्षात होताच पण म्हणावं तसं यश मिळत नव्हतं.

अपयशाने थकलेला अमिताभ मुंबईतून परत जायला निघालेला. अशात त्याला अडवलं विनोदवीर “मेहमूद”नं. दिलदार मैत्रीसाठी प्रसिध्द अशा मेहमूदने त्याच्या “बॉम्बे टू गोवा” मधील एक मुख्य भूमिकाच अमिताभला दिली. सिनेमा लोकप्रिय ठरला. मात्र त्याच्या धडपडीला यशाची खरी कमान लाभली ती १९७३ च्या “जंजीर”मुळेच. राजकुमार आदि दिग्गजांनी नाकारलेला रोल अमिताभच्या वाट्याला आला आणि अमिताभची घोडदौड सुरु झाली. त्यानं पहिलं फिल्मफेअर अवार्डच मिळवलं त्यासाठी.
स्वराज्याची स्वप्नं पाहिलेली/ साकारलेली पिढी मागे पडून आता “ कोणत्याही मार्गे लवकर पैसे कमवून श्रीमंत होऊ पाहणारी” जमात उदयास येत होती. भ्रष्टाचार ठसठशीत दिसू लागला होता. त्यासोबत आजूबाजूला वाढलेल्या गुंडगिरीने तत्कालीन समाजाला एक नैराश्य आलेलं. त्यात अमिताभचा तो “थंड पण क्रुद्ध अवतार” जणू मशालीसारखा तेजाळून उठला. लोकांना मानसिक समाधान देऊ लागला.
त्यामुळे १०-२० जणांशी एकटा लढणारा, लढून जिंकणारा “तो” नायक कितीही खोटा असला तरी “त्याला” अमिताभच्या चेहऱ्याने, आवाजाने, अभिनयाने एक वेगळेच परिमाण दिले हे नक्की.
प्रत्यक्षात हिंसेच्या विरुद्ध असणारा, कविता, सतारवादन यात रुची असणारा अमिताभ पडद्यावर मात्र उलट प्रतिमा साकारत होता. तसेच कधीही आयुष्यात दारू न पिणाऱ्या या माणसाने अट्टल दारुड्याचे वठवलेले सीन त्याची अभिनय क्षमता दाखवतात हेच खरे.

 त्रिशूल, दिवार, डॉन, देशप्रेमी, आखरी रास्ता, अमर अकबर अन्थोनी, रोटी कपडा और मकान, लावारीस अशा अनेक सिनेमातले त्याचे अवतार गाजलेच. मात्र १९७५ च्या “शोले” ने दैदिप्यमान यश दिले. त्यानंतर तसे यश मिळाले ते “मुकद्दर का सिकंदर” साठी. त्याचा तो “रुद्रावतारी” नायक लोकप्रिय असतानाच त्याने केलेले अन्य चित्रपटसुद्धा मला तितकेच महत्वाचे वाटतात. ह्रिषीकेश मुखर्जींचा “चुपके चुपके”, “अभिमान”, संजोग, सौदागर, “कभी कभी”, “सिलसिला”, “कस्मे वादे”, “दोस्ताना” "शराबी" यातला अमिताभ नेहमीच लक्षात राहणारा.

“कभी कभी मेरे दिल में खयाल आता है” हा त्याचा डायलॉग व “सिलसिला” मधील ते प्रणयरम्य संवाद विसरणं कसं शक्य आहे? त्याच्यावर चित्रित झालेली शेकडो गाणी विसरणं कसं शक्य आहे?
आपल्या या प्रवासात अमिताभ ने संपूर्ण चित्रपट क्षेत्रात उलथापालथ घडवली. इतर अभिनेत्यांना अक्षरशः बाजूला फेकले असता अमिताभ आपल्या सहनायकांशी नेहमीच चांगला वागलाय (काही अपवाद वगळता). शशी कपूर, धर्मेंद्र, ऋषिकपूर, विनोद खन्ना, मिथुन चक्रवर्ती यांच्याबरोबर त्याची जोडी चांगलीच गाजलीच. तसेच त्याच्या समोर असणारे खलनायक सुद्धा तितकेच महत्वाचे. अजित, रणजीत, कादर खान याबरोबर अमजद खान सारख्या खलनायकांचा त्याच्या यशात निश्चित सहभाग होताच. तेच त्याच्या नायिकांच्या बाबतीत. अमिताभच्या चित्रपटात नायिकांना फार काम नसले तरीही रेखा, जयाप्रदा, राखी, हेमा मालिनी यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवलाय. जया भादुरी-बच्चनवर तर एक वेगळा लेखच लिहायला हवा. स्वतः सुप्रसिद्ध असतानाही तिनं या नवोदित अभिनेत्यासाठी, त्याच्या संसारासाठी आपलं करिअर बाजूला ठेवलं..!
सहनायक, नायिका, खलनायक, गायक व संगीतकार अशी सर्व टीम असली तरी मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा आदि निर्मात्यांची सर्व भिस्त अमिताभवर असायची. आपल्या परिपूर्ण मेहनतीने अमिताभने त्यांच्या विश्वासाला कधी धक्का लागू दिला नाही. म्हणूनच १९७३ च्या जंजीर, अभिमान पासून सुरु झालेला यशस्वी प्रवास १९८२ पर्यंत चालू होता. मात्र १९८२ मध्ये याला प्रचंड धक्का बसला.
निमित्त होतं “कुली” सिनेमावेळी झालेला अपघात. बंगलोर मध्ये त्या अपघातात अमिताभ जबर जखमी झाला. नंतरचे कित्येक महिने मग फक्त हॉस्पिटल एके हॉस्पिटल. ज्याचा जीव वाचवा म्हणून मुंबईतच नव्हे तर देशभर सर्वधर्मियांनी प्रार्थना म्हटल्या असा हा माणूस त्यातून तो काही महान नेता वैगैरे नव्हे तर होता फक्त एक अभिनेता..!
असं असलं तरी माध्यमांशी त्याचे संबंध तितकेसे चांगले नव्हते. त्याच्याशी असलेल्या वादामुळे विविध मासिकांनी, पत्रकारांनी कित्येक वर्षे त्याच्यावर अघोषित बंदीच घातलेली. तर त्याने पत्रकारांना सेटवर यायला मज्जाव केलेला.
हे चित्र पालटलं ते “ २००० च्या दशकात “कौन बनेगा करोडपती” हा शो सुरु झाल्यावर. तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. १९८४ मध्ये इंदिराजींच्या हत्येनंतरच्या कालखंडात अमिताभ जुना मित्र राजीव गांधी यांच्या मदतीला राजकारणात गेला. मात्र हे राजकारण त्याच्या भलतंच अंगाशी आले. कसाबसा त्यातून अमिताभ सहीसलामत बाहेर पडतो न पडतो तोच “एबीसीएल कॉर्पोरेशन” कर्जबाजारी परिस्थितीला सामोरे जावे लागले. “शहेनशहा” “जादूगर”, “अजूबा” अशा काही चित्रपटांना याच काळात अपयश पाहावे लागले. सर्वत्र एकाच हाकाटी सुरु झाली, “अमिताभ संपला”...! आणि अशावेळी नेमकं अमिताभ समोर प्रपोजल आलं “केबीसी” चं. 


या रिअलिटी शोने मात्र भारतात इतिहास घडवला. अर्थात त्यात स्वतः अमिताभचा देखील कायापालट झालेला.
माध्यमांशी नम्रतेने वागणारा, सर्व सामान्य जनतेला अत्यंत आदराने, ऋजुतेने वागवणारा, नर्मविनोदाची पखरण करणारा हा बुद्धिवान नवा अमिताभ पुन्हा “सर्वांचा लाडका” बनला. त्यानंतर आले अमिताभच्या “सुपरस्टार” पदाचे दुसरे पर्व.
आमीर, सलमान व शाहरुख ही खान“त्रयी”, सोबत अनिल कपूरसारखे अन्य तगडे अभिनेते असूनही अमिताभचे चित्रपट गर्दी खेचत राहिले. “मोहोब्बते”, “कभी ख़ुशी कभी गम”, “बागबान”, “खाकी” असे एकसे बढकर एक चित्रपट लोकांची पसंती मिळवत राहिले.

“ब्लॅक”, “सरकार”, “पा”, “चीनी कम” “ पीकू” " भूतनाथ" सारखे चित्रपट उतारवयातील अमिताभ ज्या निष्ठेने करतो ते निश्चितच कौतुकास्पद आहे. असं ऐकलंय की अमिताभचा दिवस भल्या पहाटे ३ वाजता सुरु होतो. तो सकाळी आजही जिममध्ये व्यायाम करतो. सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आणि कधी रात्री उशिरा १० वाजेपर्यंत तो व्यस्त असतो.


वयाच्या साठीनंतर जेंव्हा लोक स्वतःच्या समस्यांनी गांजून, थकून जातात, एकतर देवा-धर्माच्या मागे लागतात किंवा दुसऱ्याची उणी-दुणी काढत समाधान मिळवू पाहतात तेंव्हा हा माणूस दिवसाचे १२-१४ तास काम करतोय याचं खरंच कौतुक वाटते.

अमिताभचं सगळं आयुष्य लोकप्रियतेने वेढलेलं. आजही त्याच्या घरासमोर त्याचं किमान एकदा दर्शन मिळावे या हेतूने चाहते गर्दी करतात. त्याच्या आयुष्यात प्रायव्हसी हा भाग कमीच. कारण तो जिथे जाईल तिथे गर्दी जमतेच. त्याचं ते पहाटे उठून सिध्दीविनायकापर्यंत चालत जाणे असू दे किंवा एखाद्या सामाजिक घटनेवर ट्विटरच्या माध्यमातून केलेलं भाष्य असू दे. त्याच्या प्रत्येक वागण्याचा इवेन्ट होतो, बातमी होते. हे सगळं होत असूनही अजूनही तो जमिनीवर आहे, आपल्या क्षेत्रात नेहमीच्याच काटेकोर वक्तशीरपणे काम करतोय. त्याचबरोबर सरकारी योजनांसाठी “स्वतःच्या नावाचा, प्रसिद्धी”चा वापर करू देत आहे. जगात अनेक थोर अभिनेते झाले, भारतात सुद्धा अभिनयाच्या बाबतीत अमिताभला वरचढ ठरू शकतील असे कित्येक अभिनेते होते व आहेत. तरीही अमिताभला आठवत राहणे, पुनपुन्हा पहावासा वाटणे यातच त्याचं वेगळेपण आहे.

एखाद्या दिवशी आपण थकून घरी येतो. सगळ्या जगाचा राग आलेला असतो. टीव्हीवर शेकडो च्यानेलांच्या गर्दीतून सर्फिंग करताना अचानक जंजीर, दोस्ताना, त्रिशूल, किंवा डॉन लागलेला दिसला की हात थबकतोच. अनेकदा पाहिलेला तो सिनेमा आपण पुन्हा पाहू लागतो. अनेकदा ऐकून पाठ झालेले डायलॉग आपणही त्याच्यासोबत म्हणू लागतो..! आपल्याच नकळत अन्यायाविरोधात उभे राहणाऱ्या अमिताभच्या जागी स्वतःला पाहू लागतो. मनावरचा ताण हळूहळू निवळत जातो. रोजच्या लढाईसाठी उभे राहण्यास पुन्हा नवी उर्जा मिळू लागते. सगळं भासमान आहे हे माहीत असूनही आपण त्या खेळात रंगून जातो...! हेच अमिताभचं वेगळेपण.
म्हणूनच अमिताभ नावाचं गारुड असेच वर्षानुवर्षे कायम राहणार आहे !

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)