marathi blog vishwa

Sunday, 29 November 2020

लायबेरियातून #१ - ट्रॅफिक व बाजारहाट

नमस्कार मंडळी, 18 नोवेहेंबरला उत्तर पश्चिम आफ्रेकतील लायबेरिया या देशात दाखल झालोय. 1848 मध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून लायबेरिया हा आफ्रिकेतील  पहिला लोकशाही व्यवस्था असलेला देश होता. 1944-45 मध्ये दुस-या महायुध्दात जर्मनीविरुध्द लढाईत मदत केल्यामुळे अमेरिकेनं बरीच मदत केलेली. मुळात इथले अनेक जण हे अमेरिकेतील गुलामीतून मुक्तता झाल्यानं इथं आणून रुजवले गेलेले.
जवळपास 100 वर्षं सगळं सुशेगाद असताना 1980 पासून सुमारे 10,15 वर्षं इथं मोठं यादवी युध्द होत राहिलं. त्यामुळे देश अत्यंत गरीबीत ढकलला गेला. 2005 नंतर हळूहळू पुन्हा सुधारणा होताहेत. 
" Light up Monrovia" हा आमचाही प्रोजेक्ट असाच. देशभरातील 25 टक्के लोकांना नियमित वीजपुरवठा होतो. बाकी सगळे जनरेटर वर अवलंबून. त्यामुळे नियमित वीजपुरवठा, वीजवितरण या क्षेत्रातील कामासाठी युरोपियन युनियन, वर्ल्ड बॅन्क यांच्या मदतीनं हा प्रोजेक्ट उभा होत आहे. त्यासाठी प्रत्यक्ष काम करायला आम्ही...! मुनरोविया या राजधानीच्या गावात हे काम सुरु आहे. तसेच आसपासच्या काही गावातही.
इथं रोजचं काम करताना सर्वात मोठा अडथळा वाटतो तो ट्रॅफिकचा. या टोकापासून त्या टोकापर्यंत एकच रस्ता. बाकी लहान लहान गल्ल्या. सकाळपासून रस्त्याच्या या किंवा त्या बाजूला ट्रॅफिक जाम झालेलं असतंच. माणसं तासनतास निवांत गाडीत बसून रहातात. उगीच कर्णकर्कश हाॅर्नबाजी न करता! 
हे पहा काही फोटोज् 
ट्रॅफिक जॅम झालं की लहानसहान छत्र्या उभारुन रस्त्याच्या कडेला काही न काही विकत उभे राहिलेले लोक मग डोक्यावर टोपल्या, हातात पिशव्या घेऊन गाड्यांभोवती हिंडत रहातात.
 कॅडबरी, पेप्सी, हेडफोन्स, फळं, बियरचे कॅन्स, केक, कुकीज्, पेन, स्टेशनरी असं काहीही सगळं आजूबाजूला दिसत रहातं.
इथं मोजकी शाॅपिंग सेंटर्स आहेत आपल्या डी मार्ट सारखी. दुबईत ज्या च्योईतराम यांची लहान स्टोअर्स आहेत, त्यांचं इथेही एक स्टोअर आहे. तिथं डाळ, तांदूळ, मसाले, हल्दीरामची प्राॅडक्ट्स वगैरे भारतीय काहीतरी मिळत राहतं. बाकी अन्यत्र सर्व लोकल वस्तू. 

मुळात लायबेरियात बहुसंख्य लोक रस्त्यावरच बाजारहाट करतात. आम्हालाही आमच्या मेस साठी भाजी आणायला एका लोकल मार्केटला जावं लागतं. एका रस्त्यावर आजूबाजूला लोक भाजी घेऊन बसलेले असतात. साधारण 200 ते 300 लायबेरियन डाॅलरला 1 पौंड भाजी मिळते. 

ही दृश्यं त्या भाजीवाल्या रस्त्यावरची..
वांगी, कोबी, ढबू मिरची, वालाच्या शेंगा, भेंडीची लहानशी अशी वेगळी जात, भोपळा, काकडी, दुधी भोपळा, पडवळ, टोमॅटो, मिरची इतक्या भाज्या मिळतात. कोथिंबीर व पुदिना फारच महाग आहे.
या मार्केटपर्यंत जायलाच जवळपास दीड तास जातो. इतकं ट्रॅफिक असतं. जर ट्रॅफिक नसेल तर 25 मिनिटं लागतात त्या विशिष्ट रस्त्यावर जायला. अन्यत्र लहान सहान दुकानातूनही भाज्या मिळतात. पण त्या इथल्यापेक्षा जवळपास दुप्पट महाग.

रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये जास्त करुन विविध प्रकारच्या कार्स आहेत. युरोप, अमेरिका, अरबी देशांतून 3,4 वर्षं वापरलेल्या/ स्क्रॅप केलेल्या कार्स मग विकल्या जातात. त्या कुठूनतरी इथं पोचतात. तुलनेनं खूप स्वस्तात विकल्या जातात. त्यामुळे टोयोटा, निसान, स्कोडा, किया मोटर्स, फाॅक्सवॅगन सारख्या मोठ्या कंपन्यांच्या मोठ्या गाड्या रस्त्यावर जीगा अडवून उभ्या असतात. त्याशिवाय जुनाट व्हॅन, पिकअप यांच्यातून शेयर बसच्या स्टाईलनं माणसं जातच असतात. इथं रिक्षाही आहेत बरं का..
इथल्या लोकांसाठी भारत सरकारनं टाटांच्या मदतीने जवळपास 50 बस लायबेरियाला दान केल्याहेत. त्यामुळेही लायबेरियात जी काही बस वाहतूक दिसते ती याच बसच्या माध्यमांतून.
गर्दी, ट्रॅफिक असलं तरी इथली माणसं अकांडतांडव करताना दिसत नाहीत. मिळेल तशी वाट काढत पुढे जायचे प्रयत्न करताना दिसतात. नाहीच वाट मिळाली तर शांतपणे गाडी बसून रहातात. पहातापहाता कुणीतरी एकजण ट
गाडीतल्या सीडीप्लेयरवर गाणी लावतो. मग पटापट माणसं खाली उतरतात. त्या गर्दीत पाच- दहा मिनिटं झकास नाचतात.. पुन्हा गाडी सुरु करुन पुढे जाऊ लागतात.
वन्यप्राणी जसे आजचा दिवस आनंदानं जगायचा, मिळेल ते खायचं, नाहीतर नुसतं निवांत बसून रहायचं असं वागतात ना... तस्संच वाटतं मला या मंडळींना पाहून.. गेल्या दिवसांचं दु:ख नाही अन् उद्याच्या चिंतेनं डोकं धरुन बसणं नाही. आजचा दिवस आपला, तो छान घालवूया ही यांची विचारसरणी पहायला छान वाटते. उत्तम समुद्रकिनारा आहे, आंबा, नारळ, फणस यांपासून विविध जंगली झाडं असलेला हिरवागार निसर्ग आहे अन् सोबतीला दारिद्र्यही! सगळं जणू एकमेकात पूर्ण मिसळून गेलंय. या लोकांना आवडणा-या रंगीबिरंगी कपड्यांसारखं!
- सुधांशु नाईक, मुक्काम मुनरोविया, लायबेरिया🌿
( nsudha19@gmail.com)

Sunday, 22 November 2020

मी...आता लिहीन थेट आफ्रिकेतल्या लायबेरियातून...

सुप्रभात मित्रहो...थेट लायबेरियातून.. इथं आता सकाळचे 10.30 झालेत. आम्ही आहोत GMT+0 या टाईमझोनवर, म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेच्या 5.30 तास मागे...!

19 नोव्हेंबरला उत्तर-पश्चिम आफ्रिकेतील एका टोकावर असलेल्या या देशात मी दाखल झालोय. Light up Monrovia या प्रोजेक्टअंतर्गत पाॅवर सबस्टेशन्स, ट्रान्मिशन लाईन्स, घराघरात वीज पुरवण्यासाठीची वितरण व्यवस्था याबाबत इथे काम सुरु आहे. एका भारतीय कंपनीचा प्रोजेक्ट हेड म्हणून इथं दाखल झालोय. मी येण्यापूर्वीच या वर्षभरात इथं काम सुरु झालंय. कोविडसंकटामुळे माझं येणं लांबलेलं.
अत्यंत गरीब अशा या देशात अनेकांच्या घरात आजही वीज नाही. रस्त्यांची अवस्थाही फारशी ठीक नाही. काही बडी मंडळी सोडल्यास 70 टक्के जनता गरीब आहे... 
त्यांच्यासाठी युरोपियन युनियन, वर्ल्ड बॅन्कमार्फत काही मदत योजनांचा एक भाग म्हणून हा प्रोजेक्ट राबवला जात आहे.

आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे मोदी सरकारच्या काळात या 2- 5 वर्षांत इथं ब-यापैकी मदत देण्यात आली आहे. टाटांच्या सहकार्यानं भारत सरकार ने तब्बल 50 प्रवासी बस इथं लोकांना प्रदान केल्या आहेत. तसेच अन्य विविध प्रकारे या देशाला मदतीचे प्रयत्न सुरु आहेत.
इथं काम करणं नक्कीच आव्हानात्मक आहे अन् त्याचवेळी आनंददायीदेखील!
भरपूर झाडं आहेत. त्यात आंबा, काजू, फणस, नारळ, केळी, अननस आदि परिचित झाडंही खूप आहेत सर्वत्र. या देशात भरपूर रबर व पाम यांची लागवड केली गेलीये. 

प्रगत जगाशी यासारख्या अन्य देशांना जोडून घेण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत त्यातीलच हा आमचाही एक  प्रोजेक्ट....

कामं सांभाळून इथल्या गंमतीजमती मी माझ्या ब्लाॅगमधून यापुढे जमेल तसं लिहायचा प्रयत्न करेन. भेटत राहू इथं..!
- सुधांशु नाईक, मुनरोविया, लायबेरिया. 🌿 
(फोटोत लायबेरियाच्या विमानतळाची नवी लहान इमारत, तसेच पूर्वीची साधी सुधी अशी जुनी इमारतही. आमच्या आॅफिसच्या मागे जरा दूरवर दिसणारा अटलांटिक महासागराचा किनारा. मीही अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, लाल समुद्र यानंतर प्रथमच हा अटलांटिक सागर पहातोय.)

Sunday, 15 November 2020

पुस्तक परिचय # वेध महामानवाचा:- डाॅ. श्रीनिवास सामंत

पुस्तक परिचय या लेखमालेतील  पुढील ग्रंथाविषयी अनेकांशी यापूर्वी गप्पांमध्ये, माझ्या शिवचरित्रावरील व्याख्यानातून सांगितले आहे, आज लिहितो. 
- सुधांशु नाईक
छत्रपती शिवाजी महाराज हा मराठी माणसाचा अत्यंत आवडता विषय. आजवर विविध शिवचरित्रे, शिवरायांच्या कार्याचा मागोवा घेणारी विविध पुस्तके, कथा- कादंब-या सर्वांनी वाचल्या असतीलच. मात्र ज्या विविध युध्दांतील पराक्रमांमुळे शिवरायांना देवत्व मिळालंय त्या युध्दांविषयी तसेच एकंदर शिवरायांची कार्यपध्दती, राजकारण, अर्थकारण याचा समग्र व वेगळ्या पध्दतीनं आढावा घेणारं माझे दोन अत्यंत आवडतं असे ग्रंथ म्हणजे विजयराव देशमुख यांनी लिहिलेलं शककर्ते शिवराय अन् दुसरा अधिक महत्वाचा ग्रंथ म्हणजे वेध महामानवाचा... आज या विषयी...
ग्रंथ : वेध महामानवाचा
लेखक : डाॅ. श्रीनिवास सामंत
प्रकाशन : देशमुख आणि कंपनी
प्रथमावृत्ती 1996, 1998. 
( सध्या कितवी आवृत्ती बाजारात आहे हे माहिती नाही.)
माझ्याकडील द्वितीय आवृत्तीचे मूल्य : 500 रु.

डाॅ. श्रीनिवास सामंत हे मुंबई विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक. तसेच भारत व फ्रान्सच्या एका संयुक्त संशोधनप्रकल्पातही कार्यरत. सतत सह्याद्रीत भटकंती करायचे वेड. त्यातूनच इथला भूगोल व इतिहासाची सांगड घालत त्यांनी हा ग्रंथ सिध्द केलाय.
सह्याद्रीत शिवचरित्रातील महत्वाच्या घटना घडल्या त्यांबाबत चरित्रमय लेखन झालं. मात्र विविध युध्दांत प्रसंगानुरुप स्वीकारलेली युध्दनीती, इथल्या भूगोलाचा केलेला सुयोग्य वापर, त्यानुसार आखलेली रणनीती, या सगळ्याबाबत या ग्रंथापूर्वी खूपच कमी असं लेखन झालं होतं. 'वेध महामानवाचा' या ग्रंथामुळे मात्र या सर्व कालखंडातील घटनांचा युध्दनीतीच्या अनषंगानं सखोल असा इतिहास व त्यावरील विवेचन हे सारं प्राप्त झालं. त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे सामंत सरांनी या ग्रंथात बनवून समाविष्ट केलेले उत्तम असे विविध नकाशे.

 या नकाशांसाठी तरी प्रत्येकानं हा ग्रंथ जरुर पहायला हवा.
साधं एकच प्रतापगडच्या युध्दाचं उदाहरण घेऊ. अफजलखान विजापूर निघाल्यापासून कुठल्या मार्गे आला, प्रतापगडचं भौगोलिक महत्व काय, या परिसरात सैन्याची जमवाजमव कुठे व कशी केली गेली हे सर्व नकाशांचा आधार देऊन इतकं सुरेख पध्दतीनं मांडण्यात आलंय की आपल्याला जणू वाटतं हा सगळा प्रसंग आपण समोर प्रत्यक्ष पाहत आहोत.
सामंत सरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते नुसता इतिहास व भूगोल मांडत नाहीत तर राजनीती, युध्दनीती कशी असावी याबाबत चाणक्यानी प्राचीन काळी लिहिलेल्या ' अर्थनीती' या ग्रंथातील संदर्भ देत हे सारं शिवाजीमहाराजांनीही किती योग्य प्रकारे हाताळलं हे साधार दाखवून देतात. एक माणूस म्हणून शून्यातून सुरुवात करताना शिवराय अन् त्यांच्या सर्व सहका-यांनी विविध नीतींचा अभ्यास करुन प्रसंगानुरुप त्यांचा कसा सुयोग्य वापर केला हे दाखवून देतात. शिवचरित्रातील बहुतेक सर्व लढाया त्यांनी या ग्रंथात कव्हर केल्या आहेतच मात्र ते करताना शिवरायांचं दैवतीकरण न करता एक बुध्दिमान राजा व त्यांचे हुषार सहकारी राजनीती, युध्दनीतीचा अभ्यास करुन त्यात किती पारंगत झाले व कसे यशस्वी झाले हे दर्शवत राहतात.
गेली 20 वर्षं शिवचरित्रावर व्याख्यानं देताना, स्लाईड शोज् दाखवताना मला व अन्य अनेक अभ्यासकांना या ग्रंथाचा फार उपयोग झाला आहे. इतकंच नव्हे तर हा ग्रंथ तुम्ही कशा प्रकारे इतिहासाकडे पाहिलं पाहिजे हेच जणू दाखवून देतो. आपणा भारतीयांना महामानवांचं दैवतीकरण करायची फार वाईट खोड आहे. त्या महामानवांचे विचाऱ, आचार, जगण्याची वृत्ती, सज्जनांचं पालन व दुर्जनांचं निर्दालन करायची त्यांची धमक हे सारं आपल्यात यावं यासाठी प्रयत्न करायचे नसतात हे कटू सत्य जाणवते. 

आपली मजल कुठवर तर या महामानवांची मंदिरं बांधून त्यांची पूजा करणे, रस्ते, चौक, शहरांना त्यांची नावं देणे इथवरच. या देशात राम-कृष्णापासून चाणक्य, चंद्रगुप्त, सम्राट हर्ष, विक्रमादित्य, सातवाहन, चालुक्य आदि अनेक मोठी माणसं होऊन गेली मात्र त्यांच्यापासून दुर्दैवानं आपण काही फारसं शिकलो नाही असं खेदानं सांगावंसं वाटतं. छत्रपती शिवरायांसारखा एक तेजस्वी पुरुष याच पंक्तीतला. या माणसांच्या मोठेपणाचा अापण अभ्यास करायला हवा अन् त्यांच्याप्रमाणे आचरण केलं तरच त्यांचं नाव घेण्याची आपली लायकी आहे असं म्हणता येईल.
वेध महामानव हा शिवरायांवरचा जसा ग्रंथ आहे तसेच अभ्यासात्मक ग्रंथ इतरांविषयी लिहिले गेले पाहिजेत तर समाजाला एक दृष्टी मिळू शकेल. शिवरायांच्या जगण्याविषयी, विचारांविषयी जाणून घ्यायची इच्छा असणा-यांना या ग्रंथाला कधीच टाळता येणार नाही असे मला वाटते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी हा ग्रंथ अवश्य अभ्यासायला हवा हे पुन:पुन्हा मला सांगावेसे वाटते.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(9833299791)🌿

पुस्तक परिचय # युध्द जीवांचे :- गिरीश कुबेर

पुस्तक परिचय या उपक्रमांतर्गत ज्या पुस्तकाविषयी आवर्जून लिहावंसं वाटतंय ते पुढचं पुस्तक आहे युध्द जीवांचे.
 " माणसाच्या प्रगतीचा इतिहास हा माणसं मारायच्या नवनवीन साधनांच्या प्रगतीचा इतिहास आहे" अशा परखड ओळीनं यातलं दुसरं प्रकरण सुरु होतं. कडवट अशा सत्याची पानोपानी प्रचिती देणारं हे पुस्तक. सध्या कोरोना विषाणूच्या हाहाकारानं आपण सगळेच विविध प्रकारे त्रस्त झालो आहोत. हे चायनानं निर्माण केलेलं बायो वाॅर असंही काहीजण म्हणतायत.  मात्र गेली जवळपास 100 वर्षे सर्व बलशाली देशांकडून जगभर विषाणू/ जीवाणू निर्माण करुन बायो वाॅर खेळलं जात आहे, दुर्दैवानं ते आपल्याला ठाऊक नाही. या भयानक जीवघेण्या प्रक्रिया अन् त्याचे भीषण परिणाम मांडणारं पुस्तक आहे हे.

पुस्तक : युध्द जीवांचे
लेखक : गिरीश कुबेर
प्रकाशन : राजहंस
मूल्य : 275 रु. फक्त.

जागतिक राजकारण अन् अर्थकारण याबाबत ब-याचदा आपण मराठी वाचक काहीप्रमाणात अनभिज्ञ असतो कारण त्याबाबतची अनेक विदेशी पुस्तके, अनेक परदेशी वृत्तपत्रे, शोधपत्रकारिता याबाबत आपला तुलनेनं कमी अभ्यास असतो. त्यात हा देश आपला, तो परका वगैरे ठोकताळेही सर्वांचे असतातच. हे आपल्याच बाबतीत नव्हे तर अनेकांच्या बाबतीत जगभर घडतं. त्यामुळेच जागतिक इतिहासावर खळबळजनक असं काही वाचलं की ' डोळे उघडल्याची' भावना होते. जगभरच्या विविध पुस्तकांचा वगैरे जो संदर्भ गिरीश कुबेर यांनी पुस्तकाच्या शेवटी जोडला आहे ते पाहून अशा वाचनाची जशी त्यांना गोडी लागलीये तशीच सर्वसामान्याना गोडी लागावी असे वाटते. 
जागतिक राजकारण अन् अर्थकारण हा गिरीश कुबेर यांचा हातखंडा विषय. त्यांचं परदेशी संदर्भग्रंथांचं वाचनही भरपूर आहे. त्यातून मिळत असलेल्या अनेक महत्वाच्या गोष्टी त्यांनी मराठी वाचकांना नेहमीच दिल्या आहेत. 'तेल नावाचा इतिहास", " एका तेलियाने", " अधर्मयुध्द" ही त्यांची या पुस्तकाच्या पूर्वीची पुस्तकंही सर्वांनी आवर्जून वाचावीत अशीच.
युध्द जीवांचे हे पुस्तक म्हणजे  जागतिक राजकारणात, अर्थकारणात आपल्या फायद्यासाठी जी युध्दं घडवली गेली, अनेक विषाणू प्रयोगशाळेत कसे निर्माण केले, त्यांचा क्रूरपणे लोकांवर कसा वापर केला गेला त्याचाच विदारक इतिहास आहे.

आपल्याला हिटलरने केलेला ज्यूंचा नरसंहार माहिती असतो मात्र ब्रिटनने केलेला, जपाननं चीनमध्ये केलेला, अमेरिकेनं व्हिएतनाम वगैरे देशात केलेला, आखाती देशातील क्रूर बादशहांनी केलेला अघोरी नरसंहार ठाऊकच नसतो. या नरसंहाराला जैविक वा रासायनिक अस्त्रांची जोड दिली गेली त्यामुळे त्याची भयानकता अधिक वाढली आहे.

कुबेर एका ठिकाणी म्हणतात , " जपानचा विषय निघाला की दोन प्रतिक्रिया हमखास येतात एक म्हणजे किती सोसलंय या देशानं अन् दुसरं म्हणजे इतकं होऊनही तो देश कसा फिनिक्स पक्षा सारखा उभा राहिलाय वगैरे. मात्र गेल्या शतकात जपाननं जे उद्योग केलेत ते सहृदयी सोडाच पण कोणताच साधाहृदयी माणूसही करु शकणार नाही. माणसाच्या क्रौर्याला मर्यादा असतात या विधानाच व्यत्यास म्हणजे जपान...!" 
काय केलं होतं जपाननं ते बारकाईनं या पुस्तकात वाचायला मिळतंच. फक्त एक उल्लेख सांगतो. 
चीनमधल्या एका प्रांतात युनिट 731 ची स्थापना झाली. जपानच्या ताब्यातील चिनी कैद्यांवर इथं प्रयोग केले जात. पटकी, काॅलरा, टायफाॅईड, प्लेग असे विविध रोगांचे विषाणू त्यांच्या शरीरात सोडले जात व हे विषाणू नक्की आत काय करतात  हे पहाण्यासाठी जिवंतपणीच कैद्यांची शरीर फाडली जात. जवळपास 300 किलो प्लेग, 900 कि टायफाॅईड अशा प्रकारे हजारो किलोंची औषधं बाॅम्बमध्ये भरुन जपाननं तयार केली. मग काही चिनी गावांवर विमानातून बाॅम्बफेक व्हायची. लोकांना दिसायचं तर काही नाही पण काही दिवसानंतर कुत्री, कोंबड्या, गुरं व माणसं विशिष्ट साथीच्या रोगानं मरायची. हिटलरनं ज्यूंचा जो विनाश केला त्याच्या कितीतरी पट अधिक विनाश जपाननं घडवला. हे इतकं भयानक होतं की हिटलरसुध्दा दयाळू वाटण्याची शक्यता आहे.

जपान प्रमाणेच वागलेत अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, चीन, रशिया अन् आखाती देश.
ब्रिटन हा देश नेहमीच मानवतावाद, सर्वोत्तम लोकशाहीवादी असल्याचे ढिंढोरे पिटत आलाय. ज्या चर्चिल यांचा युध्दकालीन नेतृत्वाबद्दल उदोउदो होतो त्या चर्चिल यांनीही जैविक अस्त्रांच्या वापराला अनुमती दिली होती. इतकंच नव्हे तर मध्यपूर्व किंवा आशियातील असंस्कृत अशा लोकांच्या विरोधात ही रसायनास्त्रं वापरायला माझा पूर्ण पाठिंबा आहे असं त्यांनी 1920 मध्ये एका लष्करी अधिका-याला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
जगभरचं राजकारण अर्थकारण ज्यांच्या ताब्यात एकवटलंय त्या रशिया व अमेरिका या देशांमध्ये अधिकाधिक हानीकारक जैव/ रसायनास्त्र आपल्याकडे असावीत यासाठी प्रचंड चढाओढ निर्माण झाली होती. आजही आहे. 

जेव्हा प्रचंड प्रमाणात निर्माण केल्या गेलेल्या रसायनास्त्रांवर टीका केली गेली तेव्हा मग काही प्रमाणात काही गोष्टी नष्ट केल्याचं दाखवण्यात आलं. म्हणजे काय तर चक्क समुद्रात टाकली गेली ही अस्त्रं. प्रचंड विनाशकारी प्रदूषण निर्माण करत. समुद्रात टाकला गेलेला कचरा म्हणजे 375 टन अश्रूधूर, 190 टन लेविसाईट, लाखभर फाॅस्जेन बाॅम्ब, 4 लाख पौंडापेक्षा जास्त किरणोत्सारी कचरा...इत्यादी. त्यातही ही फक्त अमेरिकेची यादी. 2006 मध्ये अमेरिकन संरक्षण खात्यानंच सांगितलं की हा कचरा साफ करायचा असेल तर किमान 3400 कोटी डाॅलर्स खर्च करावे लागतील... अर्थातच हे बजेट बजेटच राहिलं आहे. सूज्ञास अधिक सांगणे न लगे.
आजही घातक जैविक व रासायनिक अस्त्रं बनवण्याचं काम अनेक देशांतून जोरात सुरु आहे. आगामी युध्दं ही विषाणू व जीवाणूंच्या जोरावर लढली जातील असा बहुतेक सर्व संरक्षण तज्ज्ञ मंडळींना वाटते.
त्यामुळे विविध देशांत यावरील संशोधन व निर्मितीला वेग आला आहे.
आर्थिक फायद्याची गणितं घालून हे घातक तंत्रज्ञान आता जगभरच्या अनेक लहानमोठ्या आतंकी देशांच्या हाती पोचलं आहे. 

यापुढचा काळ कसा असणार हे कोरोना साथीनं आपल्याला उमगलं आहेच. मात्र यातून सर्वांनी शहाणं होण्याची गरज आहे. जगभर वाढत असलेली स्वार्थी वृत्ती, सत्ताकांक्षा, हपापलेपण, लोभी वृत्ती पहाता पुढचे दिवस अधिकाधिक जैविक युध्दांचे असण्याचीच शक्यता. ते युध्द कसं असं शकतं यांचं रुप या पुस्तकातून नक्कीच विदारकपणे समोर येतं. 

भविष्यात असं काही घडूच नये अन् माणसामाणसात द्वेषापेक्षा प्रेमाची भावना वाढावी, सर्वांनी माणूस म्हणून माणसाची व अवघ्या सृष्टीची काळजी घ्यावी या प्रार्थनेशिवाय आपल्या हाती मात्र काहीच उरत नाही.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर ( 9833299791)🌿