marathi blog vishwa

Friday 21 February 2014

माझे दुर्ग सोबती

   
अगदी लहानपणी आजोळी जायचो संकेश्वरजवळ. तेंव्हा चिपळूण ते संकेश्वर या प्रवासात सह्याद्रीचे रांगडे रूप दिसायचे कुंभार्ली घाट संपेपर्यंत. त्यातले ते काही देखणे पर्वत म्हणजे व्याघ्रगड आणि जंगली जयगड आहेत हे खूप नंतर कळलें. पुढच्या रस्त्यात कराड जवळचा वसंतगड, संकेश्वर जवळचा हरगापूर उर्फ वल्लभगड दिसायचे. हे सगळे शिवबा राजांचे किल्ले. इतकंच कळायचं तेंव्हा. पण ते गड पहात रहावेसे वाटायचं.

पुढे शाळेच्या ट्रीपमधून पहिल्यांदा रायगड- प्रतापगड पाहिले. तो टकमकचा सुळका, त्या दऱ्या, तो महादरवाजा अगदी थक्क होऊन पहात राहिल्याचं अजून आठवतं. दरीच्या टोकाशी या तटबंदीचे काम कसं केलं असेल असा प्रश्नही विचारला होता सोबतच्या बाईना..! त्यांनी उत्तर दिलं होतं, “ते शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे आहेत नं, ते काहीही करू शकतात बरं..” आणि ते खरंच तर होतं एका अर्थाने..!

त्याच वर्षी आई-बाबांसोबत सज्जनगडही पहिला होता. एकाच वर्षात असे तीन महत्वाचे किल्ले. आणि मग केलेली “राजा शिव-छत्रपती” या बाबासाहेबांच्या ग्रंथाची अनेक पारायणे. महाराष्ट्रातील शेकडो भटक्यांप्रमाणे मग तेंव्हापासून दुर्ग माझे सोबती झाले ते कायमचेच..!

कॉलेजच्या दिवसात केलेले ट्रेक्स , नंतर नोकरीला लागल्यावर सुट्ट्या जोडून केलेले ट्रेक्स यातून ही ओढ अजून वाढत गेली. या सुट्टीतला ट्रेक संपवताना, थकून घरी परततानासुद्धा पुढच्या ट्रेकचे प्लान तयार होत असायचे. मी कसाही फिरलोय. कधी ग्रुपबरोबर. कधी एकदोन मित्रांबरोबर, कधी एकटा. फक्त नाशिक जिल्हातले काही दुर्ग, कातळ कडे चढून माथा गाठायचे काही दुर्ग राहिलेत पहायचे. बाकी महत्वाचे दुर्ग, पाहून झालेत.

कित्येक घाटवाटा तुडवत डोंगरातून हिंडलोय. कधी भर दुपारी, टळटळीत उन्हात धापा टाकत गड चढलोय, तर कधी मुसळधार पावसात समोरचं काही नीट दिसत नसतानाही..! कधी ऐन थंडीत रात्र घालवलीय कुठल्या गुहेत कुडकुडत बसून, तर कधी घालवालीय एखादी संध्याकाळ धनगराच्या चुलाणासमोर मस्त शेकत बसून.. यातली मजा सगळ्यांना नाही समजायची. भारी रिसोर्टवर एसी रूममध्ये रात्र घालवणे हे सुंदर असेलही, पण ऐन मुसळधार पावसाळी रात्री रायगडाच्या धर्मशाळेत, विठ्ठल भाऊने दिलेली घोंगडी पांघरून, दरवाजे-खिडक्यातून खोलीत घुसणारं धुकं अनुभवणं माझ्यासाठी जास्त भन्नाट आहे. घरात बसून पंख्याचा वारा घेण्यापेक्षा बुरुजाच्या माथ्यावर उभं राहून, बेभान वारा उरात भरून घेणं मला जास्त आवडतं. आमच्या सवयीच असल्या, त्याला कोण काय करणार ??

 
मात्र गेल्या काही वर्षात हे सगळं हळूहळू उणावत चाललंय. परदेशात नोकरीला येऊन बसलोय ना..! बायको-मुली, आई-बाप, नातेवाईक यांच्या बरोबर सह्याद्रीलासुद्धा सोडून एकटा इकडे आलोय. “मुलांच्या भविष्यासाठी” आज काही करून ठेवावं म्हणून मनापासून काम करतोय. भरपूर काम आहेच. सुट्टी देखील धड मिळत नाही. मात्र कधी कधी मायदेशाची ओढ, सह्याद्रीची ओढ असह्य होते. आठवतो कर्नाळ्याचा सुळका, ते रतनगडाजवळचं अमृतेश्वराचे मंदिर, गोरखगडाची गुहा, राजमाचीचा पाऊस, सिंधुदुर्ग चा तो दोन फांद्यांचा माड, राणीची वेळा आणि शिवरायांच्या पाउलखुणा, तोरण्याचा टप्पा चढताना झालेली दमछाक, रानातल्या एखाद्या आडवाटेवर कुण्या झोपडीत मिळालेलं अमृतासारखं ताक, गडावरच्या टाक्यातलं थंडगार पाणी, विसापूरच्या भक्कम तटबंदीवर झोपून पाहिलेलं तारांगण, पावसाळ्यात छातीपेक्षा उंच गवतातून चालत पाहिलेला माहुलीगड, आणि अशाच इतर गड-कोटांच्या स्मरणांबरोबर लक्षात राहिलेले शेकडो अविस्मरणीय सूर्योदय आणि सूर्यास्त..!
 

जीव कासावीस होतो. मग कशीतरी ८-१०  दिवसाची सुट्टी काढून निघतो.

या ८-१० दिवसात किती जणांना आणि कसं भेटायचं ? तरी किमान एकतरी दुर्गभेट करतोच. हे दिवस पट्कन फुलपाखरासारखे उडून जातात. सध्या घरची मंडळी आहेत कोल्हापुरात. त्यामुळे तिथून निघतो पुन्हा मुंबईला यायला. ज्यांना भेटलो नाही त्या माणसांशी किमान फोनवरून बोलणंतरी होतं. पण माझे अनेक दुर्गसोबती तसेच राहून जातात..! त्यांना सर्वांना कसं भेटायचं ? त्यांच्याशी कसं बोलायचं ?

कोल्हापूरहून कराडजवळ येताना, उजवीकडचा मच्छिंद्रगड, पुढे सदाशिवगड, मग वसंतगड सामोरे येतात. गडाजवळ लढताना धारातीर्थी पडलेले “सरसेनापती हंबीरराव आणि त्याच गडाची माहेरवाशीण. जिनं साक्षात आलमगीर औरंगजेबाला अखंड लढवत ठेवलं ती ताराराणी” यांचं स्मरण करून देतो हा वसंतगड. त्याना मनोमन मुजरा करून पुढे जातो साताऱ्याकडे. खिंडीच्या अलीकडे डाव्या हाताला दिसतो सज्जनगड. “सुखालागी आरण्य सेवीत जावे...”, “ देव मस्तकी धरावा..अवघा हलकल्लोळ करावा..महाराष्ट्र धर्म वाढवावा..” असं बजावणाऱ्या समर्थांचा. त्यांचं काहीच न ऐकणारी, मुर्खांची सगळी लक्षणं जपणारी आम्ही माणसे.. कसं सामोरं जायचं त्यांना? समर्थांना दुरून नमस्कार करून पुढे सटकतो, मग पट्कन अजिंक्यतारा आडवा येतो. एकेकाळची ही मराठी सत्तेची राजधानी. आज गावोगावी, गल्लोगल्ली “शिव पुतळे” उभे करणाऱ्या, उठता-बसता शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या तमाम “राजे” लोकांना मात्र “शिव-शाहीचा” विसर पडलाय. किल्ल्यांचा विसर पडलाय. अजिंक्यताऱ्यासारखे किल्ले आज शेकडो वर्षं उभे आहेत. कुठे कुठे तटबंद्या ढासळत आहेत, मात्र वयोवृद्ध “बाजी पासलकरांसारख्या” सेनानीप्रमाणे त्यांचं मन अजूनही कणखर आहे. त्याना हवी आहेत माणसे, त्यांचं महत्व जाणणारी. त्यांच्या “त्या दिवसांचा” सन्मान राखणारी. या जिंवत स्मारकांच्या, बलिदानाच्या “त्या कहाण्या” पुढच्या पिढ्यांपर्यंत नेणारी.

तिथून पुढे जाताना उजवीकडचा पाटेश्वर, जरंडेश्वराचा डोंगर, कल्याणगड मान वर करून पाहतच असतात. जरा पुढे जावं तर एकीकडे वैराटगड, दुसरीकडं चंदन-वंदनची जोडगोळी. आता तिथं जवळपास पवनचक्क्या उभ्या राहिल्यात. खंबाटकीचा बोगदा ओलांडला की दिसतो, आकाशावेरी गेलेला तो “इंद्रपर्वत – पुरंदर”. पहारेकऱ्यासारखा दूर उभा ठाकलेला. जणू म्हणत असतो कडकपणे,

“काय राव, आस समोरून निघून जाताना काय लाजबीज न्हाई वाटतं? इकडं यायची वाट काय इसरला का काय??”
“कशापायी रागावतोस, म्होरच्या टायमाला नक्की येतो रं बाबा..” असं मी बापुडवाण्या चेहऱ्यानं विनवतो.

“ जावा..जावा..सुखानं जावा..पण म्होरच्या टायमाला आला न्हाईस तर बघच..” असं दरडावून मला पुढे जायची परवानगी देतो.

मग येतो नसरापूर फाटा. इथं मात्र काळीज लक्ककन हलतं. दूर तिकडे क्षितिजावर ढगात असतो राजांच्या राजगडाचा बालेकिल्ला. मागच्या वेळी ऐन पावसाळ्यात गेलो होतो तिथं. माझ्या भावाबरोबर. महामूर पावसात, ढगांच्या दुलईत एकुटवाणा बसला होता राजगड. अक्ख्या गडावर एकटा म्हातारा हवालदार. चुलीपाशी शेकत बसलेला. त्याच्या डोळ्यात त्या “भोर-संस्थानकालीन” दिवसांच्या आठवणी. तर गडाच्या मनात गेल्या चारशे वर्षांच्या आठवणींचा पाऊस बरसलेला...!

यावेळी मात्र राजगडला दुरून मुजरा करून पुढे निघतो, तर ऐसपैस पसरलेला सिंहगड दर्शन देतो. इतिहासातली एक वेगळीच घटना आठवते.

मिर्झाराजेंशी तह करताना राजांनी अर्धं राज्य वाचवायचा प्रयत्न केलेला. तहासाठी जाताना मुद्दाम आई जिजाऊ आणि कुटुंबातील काहींना सिंहगडावर नेऊन ठेवलं. तहाच्या बैठकीत राजे बहुदा म्हणाले असतील,

“मिर्झाजी, आमच्या आऊसाहेब आणि मंडळी तिथे आहेत. तो गड तेवढा आमच्याकडं असू द्या.”

सिंहगडाचं महत्व माहीत असलेले बेरकी मिर्झाराजे उत्तरले, “राजे, नाही. पाहिजे तर तुम्ही तो गड स्वतः तिथे जाऊन आमच्या हवाली करा चार-दोन दिवसानंतर. पण गड आम्हांला हवाच.”

राजे मग तिकडे गेले. भगवा उतरवला गेला. मोगलाईचं निशाण चढलं. तो भगवा ध्वज घेऊन गड उतरताना राग, वेदना, दुःख सगळ्या भावना राजांच्या चेहऱ्यावर उमटल्या. ते समजून जिजाऊ म्हणाल्या,

“शिवबा, कशापाई उगा कष्टी होता? मिर्झा तर संपूर्ण स्वराज्याचा घास गिळायला आला होता. मोठ्या चलाखीनं तुम्ही अर्धं राज्य वाचवलं. आणि पुन्हा संधी मिळेल तेंव्हा घेऊन टाकू पुन्हा हे गडकोट. तुम्ही शिकारीला रानात जाता. कधी पाहिलंय का वाघ-सिंहाला नीट? एखाद्या भक्ष्यावर तुटून पडण्यापूर्वी ते चार पाउलं मागे येतात, आणि मग पुन्हा झेप घेतात. मात्र भक्ष्यावरची नजर कधीच हलू देत नाहीत. तुम्हीही शत्रूवरची नजर काढून नका घेऊ, फक्त वाट पहा योग्य संधीची..!

असं काही नं काही मनात येत असतं. मग पुण्याच्या बाहेरून पुढे सरकताना मध्येच डुलकी लागते.

अचानक, “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे..” टाळ-मृदुंगाच्या साथीनं अभंग कानात ऐकू येतो. पट्कन जागा होऊन पाहतो बाहेर तर, तुकोबांचे “भामचंद्र-भंडारा” दर्शन देऊन मागे जातात. आणि समोर दूरवर ती सुप्रसिध्द दुर्ग चौकडी दिसू लागते.
 
तुंग, तिकोना, लोहगड विसापूर. (घनगड, कोरीगड तरी मागे लपलेलेच असतात).

लोहगड-विसापूरच्या अगदी अंगणातून पुढे सरकताना त्यांचा उदासवाणा स्वर कानी पडतो,

“अरे अरे, जरा वाईच थांबून न्हाय का गेलास रं? टाक्यातलं पाणी पिऊन, भाकरतुकडा खाऊन तर जायचं की रं? कधी तुला पाठवलाय का इथून आम्ही खाऊ-पिऊ न घालता? आं? मग आजच कशापायी दुरावा असा?”

“बाबानो, काय करू? वेळ नाही रे.. जरा थांबा, १-२ वर्षानंतर मग कायमचा मायदेशी येणार आहे...मग येत जाईन पुन्हा पैल्यासारखा..”

कशीबशी त्यांची आणि स्वतःची समजूत घालतो. लोणावळ्याला पोचेपर्यंत मग मान वळवून वळवून मागे बघत राहतो. नकळत डोळे पुसतो.

एव्हाना हे सगळं पहात बसलेली, बाजूला बसलेली बायको न राहवून बोलून जाते,

“तुझी अगदी माहेरवाशिणी सारखी तऱ्हा झालेय बघ. सासरी तर जायचेय पण माहेरातून पाय निघत नाहीये...!”

मात्र अजून यातून सुटका नसते. खंडाळ्या जवळ राजमाचीची दुर्गजोडी उभीच असते. मला डिवचायला..!

“ काय साहेब, निघाला वाटतं पुन्यांदा न भेटता?? किती राबशीला? जरा आराम करावा मानसानं म्हनतो.. अवो, घरात नसेल इश्रांती मिळत तर हिकडं यायचं नं? उंबऱ्याच्या घरातली गरम भाजी-भाकरी खायची, श्रीवर्धनवर जाऊन सूर्योदय, मनरंजनवरून सूर्यास्त पहायचा..अगदीच काय नाय तर पठारावर पाय मोकळे करून याचं, आगीनगाडीच्या शिट्ट्या ऐकायच्या. तेबी नको आसलं तर तळ्याकाठी जावं, मंदिरात जाऊन निवांत गप्पा माराव्यात.. जरा मनसोक्त जगून घ्या की.. किती आपलं तडफडत जगनार?”

“होय बाबानो, खरंय रे तुमचं. पण या समोरच्या घाटाचं गाणं तुमाला ठावूक आहे नं “कशासाठी.. पोटासाठी.. खंडाळ्याच्या घाटासाठी...” तसं आमचं आयुष्य बाबानो. बरं असुदे, जातो आता, पुढच्या पावसाळ्यात येतो बघा नक्की..”

निरोप घेईपर्यंत गाडी बोगद्यातून पलीकडे जाते. खोपोलीमार्गे पनवेलकडे जाऊ लागते. मग माथेरानजवळचा पेब, प्रबळ, इरशाळ, चंदेरी आणि डावीकडे दूरवर कर्नाळ्याचा “लिंगोबाचा डोंगुर” दिसतो. यांना आता मुंबईच्या “फाष्ट लाईफ” ची सवय झालेली. सतत येणाऱ्या–जाणाऱ्या कर्जत, खोपोली, कसारा लोकल. त्यांना लोंबकळत जाणारी माणसं यांना तशी सवयीची. म्हणून ते आपले पट्कन हसऱ्या चेहऱ्यानं  “Happy journey” म्हणून जातात. त्यांना माहीत असतं, की जेव्हा कधी वेळ मिळेल तेंव्हा माणसं येणार भेटीला. उगाच आजचा दिवस का उदास घालवा ? रस्त्यात दिसलेल्या या “दुर्गमित्रां”शिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इ. जिल्ह्यातले अनेक दुर्ग.. तिथे घालवलेले सुंदर क्षण ते आठवत मी पुढे जातो. त्यांना पुन्हा भेटायचे राहूनच जाते.

शेवटी मी या सगळ्यांच्या सोबत रहायची इच्छा उरी दाबून कसातरी विमानतळावर पोचतो. घरच्यांचा निरोप घेऊन आत शिरताना पायात मणामणाच्या बेड्या पडल्यासारखं वाटतं. पाय ओढत मी बोर्डिंग पास घेतो. कसाबसा विमानात शिरतो. सीटवर जाऊन धपकन बसतो. मनातून डोळ्यावाटे उतू जाणारं सारं काही कठोरपणे पापणीआड बंद करून टाकतो. मनात भावनांचा कल्लोळ उठलेला. विचारांची आणि प्रश्नांची गर्दी..
 “कशाला परत चाललायस परदेशात?”
“मग घरच्यांच्या भविष्याची काळजी घ्यायला, पुढची तजवीज नको का करायला??”
“इथं नाहीत का नोकऱ्या मिळत? परदेशातलीच कशाला हवी?”
“चांगला पगार आहे, नवं तंत्रज्ञान पाहायला मिळते. अजून थोडी वर्षं तर जायचेय, परत येणारच आहे नं मायदेशी??”

तुकोबांच्या शब्दांत सांगायचं तर “आपुलाची वाद आपणासी..” सुरु झालेला असतो, निघालेल्या विमानासोबत..!
-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)
( पुढचा लेख – माझे जीवन“गाणे”...!)

Thursday 13 February 2014

काली घटा छाये मोरा जिया तरसाये...

१४ फेब्रुवारी – Valentine Day. विदेशी पद्धतीनुसार, प्रेम साजरा करण्याचा दिवस. म्हणूनच ही “प्रेम”ळ भावकथा, “मनापासून” या लेखमालेतील हा दुसरा लेख - रसिकहो, तुमच्यासाठी.

 
 
तालुक्याचं एक छोटं गाव. सुमारे ३० वर्षापूर्वी तिथं तो आणि ती राहायचे. त्याचे वडील डोळ्यांचे डॉक्टर. दर आठवड्यात या गावाबरोबर जिल्ह्यातील महत्वाच्या गावीसुद्धा भेट देऊन तिथल्या पेशंटला बरे करणारे. तर तिचे वडील सरकारी खात्यात कारकून. त्याचा एक टुमदार बंगला. त्याच्या आजोबांनी बांधलेला. तिचं घर त्यांच्या बंगल्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला असलेल्या “बापटांच्या त्या चाळीत” ३ नंबरचे. त्याच्या घरी येणारी माणसे उच्च व उच्च मध्यमवर्गीय प्रकारची. घरात तो व त्याच्या मोठ्या भावाला, आईबाबांना सेपरेट बेडरूम आणि बाथरूम. तर तिच्या चाळीत टिपिकल चाळीचं वातावरण. दोन खोल्यांच्या घरात दाटीवाटीने राहणं, शेजारच्या घरातून कधी वाटीभर डाळीचं पीठ उसनं आणणे, रात्री जागून कॅरम खेळणे अशा असंख्य गोष्टींपासून ते संडाससाठी डालड्याचे डबे वापरून लायनीत उभे राहण्यापर्यंत. ती दोघं कधी एकत्र येतील अशी शक्यता सुद्धा नव्हती. पण ते घडलं.

नववीला असताना शाळेत क्रिकेटचा खेळ अगदी रंगात आलेला. मैदानात तो चांगला फलंदाज म्हणून प्रसिद्ध. शाळा सुरु होण्यापूर्वीच रोजच मुलं खेळायला यायची. तसाच खेळ सुरु होता. तो ब्याटिंग करत होता. आणि त्याने मारलेला एक जोरदार फटका, मैदानाच्या कोपऱ्यातून शाळेत येत असलेल्या तिच्या तोंडावर फाडकन बसला. अगदी थेट डोळ्यावरच. ती खाली कोसळली. काही क्षण ती बेशुद्ध. सगळी मुलं गोळा झाली. काही पळून गेले. तो मात्र तिथेच थांबला. कुणीतरी तिच्या तोंडावर पाणी मारलं. ती शुद्धीवर आली. डोळ्याजवळून रक्त येत होतं.

पट्कन तो म्हणाला, “माझे बाबा डोळ्यांचे डॉक्टर आहेत आणि आज इथे गावातच असतील, तिला नेऊया तिकडे.” कुणीतरी रिक्षा आणली. शाळेतला घडशी शिपाई, तो आणि एक मित्र तिला घेऊन गेले. त्याच्या बाबांनी तपासलं. सुदैवाने जखम वरवरची,पापणीला झाली होती. त्यांनी ड्रेसिंग केलं. मग औषधं दिली. म्हणाले, “तीन दिवसांनी पुन्हा एकदा मला डोळा दाखवून जा.” मग लेकाला म्हणाले, “जारे, तिला नीट घरी पोचवून ये.” तो सोबत तिच्या घरी गेला. घरी तिची आई होती.

“काकू, तुमच्या मुलीच्या डोळ्याला थोडं लागलंय, मी क्रिकेट खेळताना मारलेला फटका लागला. मी बाबांच्या दवाखान्यातून तिला औषधपाणी करून आणलंय. आता काळजी करायचं काही कारण नाही. मात्र माझी चूक होती. मला माफ कर...” शेवटचं वाक्य तिला उद्देशून होतं. पट्कन तो निघून गेलासुद्धा.

सगळं काही इतकं फटाफट घडत गेलं, की मग तिच्या लक्षात आले की, डॉक्टर काकांशी थोडं बोलण्याव्यतिरिक्त एवढा वेळ ती त्याच्याशी आणि तो तिच्याशी बोललेही नव्हते...!

०-०-०-

ती पुन्हा त्यांच्या दवाखान्यात डोळा दाखवायला गेली, तेंव्हा तो बाहेर त्यांच्या भल्या थोरल्या अल्सेशिअन कुत्र्याला – जिमीला आंघोळ घालत होता, अगदी साबण लाऊन..! ती पहातच राहिली. त्यांच्या चाळीतल्या छोट्याशा मोरीत आंघोळ ही उरकायची गोष्ट होती, तर इथे एक कुत्रासुद्धा मस्त मजेत आंघोळीचे सुख अनुभवत होता.!

त्याचं लक्ष गेलं तिच्याकडे. जिमीला साखळीने उन्हात एका ठिकाणी बांधून तो तिच्याजवळ आला.

“कसा आहे डोळा ? आणि तू नववी ब मध्ये आहेस नं? त्या दिवशी मला कळलं. मी नववी अ मध्ये आहे.”

“डोळा आता बरा आहे. तुला कुत्र्याची भीती नाई वाटत?”

“याची, आमच्या जिमीची ? अगं फार प्रेमळ आहे तो. अगदी तोंडात हात दिला नं तरी नाही चावणार, पण फक्त ओळखीच्या माणसांना... ये तुझी ओळख करून देतो.”

तो तिला जिमीजवळ घेऊन गेला. तिचा हात हातात घेऊन त्यानं जिमीच्या मस्तकावरून फिरवला. त्यानं आपलं ओलं नाक तिच्या हाताला लावलं. हुंगून वास घेतला. हळूच खरखरत्या जिभेनं हात चाटला. तिनं पट्कन हात काढून घेतला..

“ई, कसं ओलं ओलं नाक आहे याचं..!”

“अगं कुत्राची सवय असते ती. आता तुझा वास, स्पर्श तो कधीच विसरणार नाही बघ. फार हुशार असतात ते. बरं चल तुला घरात नेतो. बाबा आहेतच. ते बघतील तुझा डोळा..”

बाबा, त्याची आई, तो सगळेच मग तिच्याशी गप्पा मारत बसले. मग त्याची आई त्यांच्या साठी खायला काही आणायला गेली. त्या घराची ती मुख्य खोलीसुद्धा त्यांच्या चाळीतील २ घरांइतकी होती..! तिथला तो जुना लाकडी सोफासेट, झुंबर, रेडीओ, टेप रेकॉर्डर आणि टीवी ती पहातच राहिली.

“अय्या, तुमच्याकडे टीवी आहे? रामायण लागतं का रे रविवारी.”

“हो नं. आणि छायागीत, चित्रहार सुद्धा लागतो., तू येशील रामायण बघायला?”

“बघते, बाबांना विचारून. रविवारी ते घरी असतात नं, मग आम्ही सगळे सकाळी शेजारच्या नदीवर पोहायला जातो. तुला येतं पोहायला ?”

असं काही अन कितीतरी ते बोलत राहिले. घरी परतताना तिला उगाच पिसासारखं हळुवार तरंगत आल्यासारखं वाटत राहिलं...!
 
 
०-०-०-

दोन कुटुंबांना या दोघांनी एकत्र आणलं. तिचे बाबा जरी सरकारी खात्यात असले तरी गावातील क्रीडा स्पर्धातून स्वतः भाग घेत. नियोजनात सहभागी होत. क्रिकेट, कबड्डी, पोहणे यात त्यांना खूप रस होता. त्यामुळे त्यांचा तसाही परिचय होता. पण या दोन मुलांमुळे दोन्ही घर जवळ आली. त्याचं घर मोठं असल्यानं मग तीही दहावीच्या अभ्यासाला त्याच्याकडे थांबू लागली. आईने तिलाही स्वैपाक शिकवला होता. मग कधीतरी ती त्याच्या आईला स्वैपाकात मदत करे. त्याच्या आईला खूप कौतुक वाटे तिचं..! एवढ्याशा वयात किती समजूतदार आहे, किती नीटनेटकी आहे..असं म्हणून ती कौतुक करे. तिला खूप बरं वाटे.

त्याच्या घरातील टेप रेकॉर्डर वर गाण्यांच्या कॅसेट्स लाऊन दोघं अभ्यास करत बसायची. एकाबाजूला लता, आशा, रफी, मुकेश, किशोर गात असताना ते घरभर भरून राहिलेले सूर त्यांच्या मनात रुंजी घालायचे.

तिला आशाचं गाणं आवडे. अगदी फार मनापासून.

“जब चली ठंडी हवा..” , “काली घटा छाये मोरा जिया तरसाये..” वो हसीन दर्द दे दो..” “आओ, हुजूर तुमको सितारो मे ले चलू..” “झुमका गिरा रे...” “जाईये आप कहा जायेंगे...” या अशा मधाळ गाण्यांनी मनात तिच्या भावनांची कारंजी थुई थुई उडायची. अधे मध्ये होणारे त्याचे नकळत स्पर्श अंगावर एक वेगळेच रोमांच फुलवत. अवघं आयुष्य असं त्याच्या सोबत घालवावं वाटून जाई. त्यांच्या घरातून तिचं पाऊल बाहेर पडायला तयारच होत नसे...मग कुठेतरी मनात वाटे, “ते कुठे आपण कुठे? हा असा विचार करणं बरं नव्हे..” आणि नेमकं त्यावेळी आशाचा घायाळ सूर म्हणून जाई... “चैन से हमको कभी आपने जीने न दिया..” उदास मनाची कशीतरी समजूत काढत ती घरी परते. मनातलं ते हळवं, तरल असं काही त्याला कसं सांगावं, त्यालाही असं वाटत असेल का? अशा प्रश्नांच्या फेऱ्यात गुंतून जाई. दुसऱ्या दिवसाची वाट पहात.

त्याची अवस्था काही वेगळी नव्हती. रोज संध्याकाळी शाळा सुटल्यावर दोघं घरी जात. त्याच्याच घरी खाऊन पुन्हा अभ्यासाला बसत. मग रात्री ७ वाजता ती आपल्या घरी जाई.

सगळ्या वर्गातली मुलं त्याला तिच्यावरून चिडवत. त्याला वरवर राग येई. पण मनातून तो खूप सुखावे. कधीही मनापासून अभ्यास न करणारा तो हल्ली छान अभ्यास करे. अभ्यास, खेळ, विविध स्पर्धा, अशा सगळ्या ठिकाणी त्याचं नाव चमकत होतं. “आपण सगळं असं छान केलं की मग तिलाही आनंद होईल” या विचाराने, तिच्या नजरेत ते काही “खूप भारी” भाव दिसावेत म्हणून तो खूप मेहनत घेत होता.

प्रत्येक परीक्षेपूर्वी , स्पर्धेपूर्वी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या तरी, “बेस्टलक रे, तू छान यशस्वी हो..” असं तिनं सांगताच त्याच्या मनाला एक वेगळीच उभारी मिळे.

तिच्या छोट्या छोट्या गोष्टी तो लक्षात ठेवी. तिला “केशरी” रंग आवडतो म्हणून शाळेव्यतिरिक्त त्या रंगाचे शर्ट, टी शर्ट वापरे. तिला आवडतात म्हणून घरातल्या बागेतली मोगऱ्याची फुलं त्याच्या अभ्यासाच्या खोलीत आणून ठेवी. त्याला किशोरची गाणी आवडत असूनही टेपवर तिच्यासाठी “आशाच्या” कॅसेट्स लावे. त्याला खूप वाटायचं तिला सांगावं सिनेमातल्या सारखं.. “तू मला खूप खूप आवडतेस..” मात्र आपण तिला काही असं बोललो, आणि ती रागावली तर ? चिडून निघून गेली तर ? कायमची दुरावली तर? या भीतीने तोही मनातलं सगळं मनात ठेऊन वागत राही.

ते दिवस त्यांच्यासाठी जणू मखमली, रेशमी मुलायम असे काहीतरी होते..!
 

दहावीची परीक्षा झाली. तिला त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले होते. त्याच्या बाबांसारखं आपणही डॉक्टर व्हायचं हे तिचं स्वप्न. तर त्याला सायन्स मध्ये जास्त रस. पुढच्या शिक्षणासाठी ती पुण्याला काकांच्याकडे जाणार होती. तर तो मुंबईला....

जायच्या आदल्या दिवशी ती त्याला, त्याच्या घरच्यांना भेटायला घरी आली. तो घरी नव्हता. त्याची आई म्हणाली, “अगं तो तिकडे गावदेवीला गेलाय सायकलने. मंदिर, मागचा डोंगर, तिथलं कुंड, झरा, नदी, सगळं एकदा जाण्यापूर्वी बघून येतो असं म्हणत होता. तो पण सगळ्यांना सोडून, या परिसराला सोडून जायच्या भावनेने गडबडलाय, सांगत नाही मला, पण कळतं गं.. शेवटी आई आहे मी त्याची, आता तुम्ही दोघही गाव सोडून जाणार, आम्हाला पण करमणार नाही बघ आता...”

काकूंशी थोडं काहीबाही बोलून तीही पट्कन बाहेर पडली. थेट सायकल दामटत निघाली, अर्थातच मंदिराकडे.

मंदिरामागच्या टेकडीवरून त्यानं तिला येताना पाहिलं. तिथूनच जोरात हाळी दिली,

“देवीचं दर्शन घेऊन ये गं इकडे..”

ती दर्शन घेऊन मग टेकडी चढून वर गेली. तिथल्या एका विस्तीर्ण कातळावर तो बसला होता.

समोर दूरवर पसरलेले डोंगर, मधूनच वाहत गेलेली नदी, नदीच्या दो-बाजूस असलेली शेतं, गावाच्या जवळच्या भागात असलेली माडा-पोफळीची झाडं...सगळं सगळं कसं मनात साठवून घेत होता...!

ती जवळ आली. पाहिलं तर त्याचे डोळे पाण्यानं भरलेले.

रडक्या आवाजात तो म्हणाला, “नाही जायचं मला मुंबईला, हे सगळं सोडून..! कशाला शिकायचं तिकडे दूर जाऊन ? इथे पण आहेच न सोय पुढच्या शिक्षणाची? माझी मित्रमंडळी, ही माझी जन्मभूमी दुरावणार असेल तर...का जायचं? इथली माणसं, इथे घालवलेलं बालपण, हे डोंगर, ही नदी, माझा जिमी आणि अर्थातच तू..! कसं राहू मी या सगळ्याशिवाय? ”

तिलाही भरून आलं. काय बोलणार होती ती ? त्याच्या बाजूला बसत त्याचा हात हातात घेऊन हळुवार थोपटत म्हणाली, “वेड्या, हे विसरायला कुणी सांगितलं तुला? जपून ठेव नं सगळं मनाच्या तळाशी. घरच्या ट्रंकेत माझी आई, ठेवणीतली पैठणी जपून ठेवते नं अगदी तसं...! जेंव्हा तिथं मुंबईत कधी चिडशील, कंटाळशील, उदास होशील, तेंव्हा हेच सगळं आठव. तुला बरं वाटेल. आणि आपण पुढे कधी कुठे जाऊ, काय करू हे थोडंच सगळ्यांना माहीत असतं ? पण तुला मोठा संशोधक व्हायचंय तर हे सोसलं पाहिजे रे. “टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही” असं आपले पटवर्धन सर नेहमी सांगतात ते विसरलास काय? शेवटी देवाच्या मनात जे असेल ते होईलच. तू कशाला इतकं मनाला लाऊन घेतोस? तू मोठा हो. तुला असं आभाळाएवढं मोठं झालेलं पहायचंय मला ! आणि आपण कधी विसरू शकतो का हे सगळं?”


तेवढ्यात आकाशात ढग भरून आले, आणि नेमकं त्याच वेळी पलीकडे दूर एका घरातील रेडिओवर लागलेलं आशाचं  गाणं आकाशात उंच पसरत गेलं... “काली घटा छाये, मोरा जिया तरसाये..ऐसे मे कही कोई मिल जाये..” तो दिवस, ते क्षण, मग दोघांच्याही मनात कायमचे रुजून गेले.

००-००-००-

सुरुवातीचे काही महिने दोघांनी एकमेकांना भरपूर पत्रे लिहिली. सुट्टीत घरी आले- भेटले की दोघं तासंतास गप्पा मारत बसत. आपल्या आपल्या कॉलेजमधल्या गमतीजमती सांगत. जसजसे दिवस गेले तसे हळू हळू दोघे आपल्या आपल्या विश्वात मग पार बुडून गेले.. त्या उमलत्या वयात अनुभवलं ते कोवळं प्रेम, ती निरपेक्ष, निस्वार्थी भावना कायमच त्यांनी उराशी जपली...

आज इतक्या वर्षानंतर दोघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्यरत आहेत. तो औषधाच्या मोठ्या  कंपनीत संशोधक म्हणून काम करतो, तर ती उत्कृष्ट सर्जन म्हणून स्वतःच्या हॉस्पिटल मध्ये कार्यरत असते. जेंव्हा जेंव्हा आभाळ भरून येतं तेंव्हा तेंव्हा “काली घटा छाये..” हे गाणं त्यांच्या सीडी प्लेअरवर लागतं. तिचं मन हळुवार होतं, त्याला आठवू लागतं. तेंव्हा ती पुण्यात तिच्या घरात असते आणि तो दिल्लीत त्याच्या घरात असतो इतकंच...!

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

(पुढचा लेख – “माझे दुर्ग सोबती..” )

Saturday 8 February 2014

“ पयलं नमन – वेड लागले मला वेड लागले.... ”

गेल्या वर्षी “सुचेल तसं” या नावाने लेखमाला लिहिली होती. या वर्षी आता सुरु करतो लेखमाला एका नव्या नावाने – मनापासून...”

 
 
रोजच्या आयुष्यात आपण जे काही करतो ते मनापासून असतंच असं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात मात्र तरी एक गोष्ट असतेच, अत्यंत खास. आवडती. कुणाला लहानग्या वयातच रंगांची दुनिया भुलवून टाकते. तर कुणाला स्वरांची. कुणी एखाद्या खेळाचं वेड डोक्यात भरवून घेतो तर कुणी असतो अगदी मनापासून गुंड. एखादी जन्मजात आवड तर कधी परिस्थितीने देऊ केलेलं एखादं वळण यामुळे “ती आवडती गोष्ट” त्याच्या आयुष्याला एक अर्थ देऊन जाते. तो त्याचा खाजगी कप्पा असतो, स्वतःला रमवायचा. तेही अगदी मनापासून...! अनेकदा आपल्यातली “ती स्पेशल गोष्ट” आपल्याला ठाऊक असते, तर अनेकदा नसतेही. जगण्याच्या धबडग्यात आपल्या मनातलं “ते हवंहवंसं आयुष्य” कधी हरवतं, कधी एका वळणावर अचानक गवसतं तर कधी पार तोंड फिरवून दूर निघून जातं. नशीब कुणाच्या पदरात काय दान देऊन जाईल हे जरी आपल्याला माहीत नसलं तर मिळालेलं दान जपायची सुबुद्धी मात्र फार कमी जणांना असते. इथे मला कुमारजींचा किस्सा सांगावासा वाटतो.
त्या “टीबीच्या – क्षयाच्या” आजाराने त्यांना पार खिळखिळे करून टाकले होते. अवघा हिंदुस्थान गाजवलेला हा गायक देवास सारख्या छोट्या गावात अंथरुणाला खिळून होता. सगळा मानसन्मान, सगळे कौतुक करणारे दूरदूर. पत्नी-भानुमती शाळेत  नोकरी करायची, त्यावर, आणि काही उदार मनाच्या मित्रांच्या सोबतीवर जीवन कसंबसं चालू होतं. एखादा माणूस मनाने खचून त्यातच संपून गेला असता. एक तर त्यांचं शिक्षण काही नाही, संगीत साधनेव्यतिरिक्त इतर कोणता उद्योग माहीत नाही. अशावेळी मोठा धीर गोळा करून “आजारी कुमारजी” विमा-एजंट म्हणून काम करायच्या उद्देशाने बाहेर पडले. परिचिताच्या घरी गेले. त्यांच्या तोंडावरच खाड्कन दार बंद करण्यात आलं. मनात अखंड संताप..पण सांगायचे कुणाला ? त्याक्षणी ते आपल्याच मनाला म्हणाले, “कुमार मायनस म्युझिक इक्क़्वल टू झिरो...”. राखेतून भरारी घेणाऱ्या पक्ष्यासारखे तिथून ते पुन्हा उसळी मारून वर आले. आजारावर तर मात केलीच पण संगीत क्षेत्रात नवनिर्माण केले. आपलीच जुनी प्रचलित गायकी साफ पुसून नवी गायकी प्रस्थापित केली. नवा विचार मांडला.
प्रत्येकाला हे जमतच असं नाही. तेवढी प्रसिद्धी, सन्मान, धन-दौलत मिळतेच असंही नाही. आपलं प्रेयस आणि आपलं रोजच काम एकच असलं तर सोन्याहून पिवळे. हजारो वादक, नर्तक, खेळाडू, गायक, अभिनेते, लेखक यांना अनेकदा नशिबाने ते साधतंही. मात्र प्रत्येकाच्या बाबतीत हे शक्य होईल असं नाही. तरीही आपल्यातलं ते “देणे ईश्वराचे” प्रत्येकाने जरूर जपले पाहिजे.
माझा एक मित्र आहे. अखंड कामात बुडालेला असतो. पण बासरी हा त्याचा खरा श्वास आहे. वेळ मिळेल तेंव्हा मायेने ती बासरी काढतो. डोळे मिटून शांतपणे त्या सुरात तल्लीन होऊन जातो. ते शांत, सुंदर असे काही क्षण त्याला उर्जा देऊन जातात, पुन्हा कार्यरत होण्याची. ते जणू त्याचं “ब्याटरी चार्जिंग” असतं ! दुसरा एक मित्र, त्याला व्यसन हिमालयाचं. दरवर्षी भरपूर राबायचा. वार्षिक सुट्टीतले २५-३० दिवस थेट हिमालयात ट्रेकिंगला जायचा. कुठली कुठली शिखरे पादाक्रांत करून यायचा. आता त्याने स्वतःची एक छोटी पर्यटन संस्थाच सुरु केलीय. आयुष्यातलं ते प्रेयस त्यानं पकडून ठेवलं होतं. आणि एका वळणावर नियतीने त्याला त्याच्या आवडत्या विश्वात “शिफ्ट” केलं. हे असं घडणार यावर आपला विश्वास असायला हवा. आणि त्यासाठी जरूर प्रयत्न केले पाहिजेत.
प्रत्येकाला असं वेड हवं कसलं तरी.. मलाही वेड आहे पुस्तकांच्या दुनियेचं. संदीप खरेच्या भाषेत सांगायचं तर “वेड लागलं मला वेड लागलं...”शब्दांचं वेड !


लहानपणापासून हे जे “शब्दांचं वेड” लागलं, ते उत्तरोत्तर वाढतंच गेलं. जे पुस्तक, मासिक, साप्ताहिक हाती पडलं ते वाचत गेलो. त्या दुनियेत स्वतःला हरवण्यातली मजा काही वेगळीच...! आणि त्यातच एका क्षणी लिहिता झालो. खूप लिहिलं आजवर, अनेक विषयांवर. शेकडो सुहृदांनी छान प्रतिसाद दिला, कित्येक जाणकारांनी योग्य सूचना दिल्या. गाण्यात जशी एक लय असते, तशीच शब्दांनाही. मीही अशीच एक लय पकडून ही लेखमाला लिहिण्याचं ठरवलंय, कोणत्या विषयाच्या बंधनात न अडकता विचारांच्या, भावनेच्या भरात जे मनापासून लिहून होईल, तेच सगळ्यांसमोर, ब्लॉग मधून मांडणार आहे. आवडून घ्याल ही अपेक्षा..!
( पुढच्या आठवड्यात “valentine Special” काहीतरी...)
-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)