marathi blog vishwa

Sunday 24 May 2020

वेगळ्या कथा क्र 2:- गडावरची ती रात्र

✍️

गडावरची ती रात्र...
- सुधांशु नाईक

आलोकला शनिवार- रविवार जोडून सुट्टी मिळणार होती. म्हणून त्यानं शुक्रवारी संध्याकाळीच 'त्या गडावर' जायचा बेत ठरवला. आलोक व त्याच्या 3-4 मित्रांचा ग्रुप नेहमीच उत्तम ट्रेक करणारा. अनेक प्रसिध्द किंवा अनवट गडांवर नेहमी जाणारे. तिथं प्रसंगी गडस्वच्छतेची लहानमोठी कामं करणारे. कधी सगळे एकदम जायचे तर कधी एक-दोघे मिळून. सुट्टी मिळाली की आलोकचा पाय मात्र घरी रहात नसे. कधी कुठे गडावर, जंगलात वगैरे जातो असं होई त्याला. कुणी आलं नाही तर प्रसंगी तो एकटाही निघून जाई.
आज नेमकी इतर मित्रांना काही न् काही अडचण आली अन् आलोक आपल्या बाईकवरुन एकटाच गडाकडे निघाला. सोबत आईनं बनवून दिलेले पराठे, लाडू होतेच.
साधारण तासाभरानं तो गडपायथ्याच्या गावी पोचला. या भल्या थोरल्या गडावर तो यापूर्वी दोन तीनदा येऊन गेलेला. मात्र मुक्कामी ट्रेक कधी जमला नव्हता. शहरापासून जवळ असल्यानं बहुतेकदा सकाळी येऊन संध्याकाळी परत जाणे असंच घडे. त्यामुळे यावेळी खास गडावर रहायलाच जायचं असं ठरलेलं!
गडपायथ्याच्या त्या गावात पोचला तेव्हा 5 वाजलेले. इथून तासभर चढण चढल्यावर भलं थोरलं पठार यायचं. तिथं लहानशी वाडी. मग तिथून पुन्हा पाऊण एक तास चढलं की गडमाथा यायचा. गावातल्या लहानशा हाॅटेलात मस्त गरम चहा घेतला. सोबत खास चमचमीत कांदाभजी होतीच. मग तिथेच एका बाजूला बाईक नीट पार्क करुन तो गडवाट चालू लागला. कानाला लावलेल्या हेडफोनवर निनादराव बेडेकरांचं एक सुरेख व्याख्यान ऐकत चालत तो तासाभरापूर्वीच ती चढण चढून पठारावर आला.
या पठाराच्या उजवीकडे पाहिलं की हाॅर्स शू आकारातली ती दरी नजर खिळवून ठेवायची. पावसाळ्यात तर पठारावर अनेक लहानमोठे झरे  दरीत उसळत उडी मारायचे. पठाराच्या मध्यापलीकडे मग उंच गेलेला गडमाथा दिसायचा. पठारावरील झाडाखाली बसून हे दृश्य पहाणं प्रत्येकालाच आवडायचं. आलोक तिथं नेहमीप्रमाणे जरासा टेकला. चार घोट पाणी प्याला. ते सगळं दृश्य, पलीकडे अस्ताचलाकडे झुकलेलं सूर्यबिंब हे सारं कॅमेरात साठवलं अन् मग झपाझप चालत वाडीकडे निघाला.


वाडीत पोचताच लहान चिल्ली पिल्ली भोवती गोळा झाली. खांद्यावरील सॅकच्या कप्प्यात ठेवलेल्या गोळ्या- चाॅकलेट त्यांना वाटली अन् एक झोपडीसमोर थांबला. तिथला धनगरमामा महादू जरा ओळखीचा होता. त्याच्याशी 5 मिनिटं बोलत बसला. मुक्कामाला गडावर जाणार म्हणताच महादू चमकला..
" आज रातच्याला.. गडावर? काय डोकं फिरलंय का.. आमुशा हाय की आज... नगं जाऊ आज.. झोप हिथं खळ्यात. मस्त झुणका भाकर खाऊन.. सकाळसकाळ जा रं लेका.."
" महादू मामा अरे अमुशा वगैरे काय लक्षात नसतं रे आमच्या. अन् एवढं जग पुढं केलं. हातात मोबाईल वापरणारा तू.. कुठं आमुशा पुर्णिमा करतो आता..."
" तुम्ही ताज्या रगताची पोरं. पन माजं ऐक. अमुशेला आमीबी कुनी गडावर कधी रायलो न्हाई. दंगा असतो लई वरती असं आमचा आज्जा सांगायचा. कायतरी घडलेलं भयंकर म्हनं पूर्वी. नगं..रं लेकरा.. नगं जाऊ. ऐक माजं..म्हाता-याचं.."

महादूमामा या सगळ्या अंधश्रध्दा असतात रे. आता तर मी मुद्दाम जाणारच बघ. उलट उद्या गडावरुन परत आलो की इथं गावात सगळ्यांना सांगू आपण. मी पहा कसा जिवंत परत आलोय. काही भूतबित नाहीये गडावर. आरे, हे गड म्हणजे मंदिरं आहेत रे. इथं कुठलं भूत बित नसतंय...हे सगळ्यांना पुराव्यानं दाखवून देईन मी..."

###

महादूमामाचं आग्रही बोलणं टाळून पुन्हा आलोक गडवाट तुडवू लागला. पहातापहाता पुढची खडी चढण चढून तो गडाच्या दरवाज्यात पोचला तेव्हा सूर्य मावळला होता. सगळीकडे गूढ संधिप्रकाश पसरला होता अन् पश्चिम क्षितीजावर शुक्रतारा ढळकपणे दिसू लागला. चढण चढून घामाघूम झालेला आलोक त्या उध्वस्त दरवाज्याच्या देवडीत टेकला. शांत निवांत जरा वेळ बसून राहिला.
गडावरची ही संध्याकाळ त्याला नेहमीच अंतर्मुख करत असे. आपलं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं हवं, आपले छंद, आवडीनिवडी यांना कायम प्राधान्य द्यायचं आपण यासाठी त्यानं परदेशातल्या नोकरीच्या संधी कायम नाकारल्या होत्या. शनिवार रविवारी जर सह्याद्रीत हिंडला नाही तर पुढचे काही दिवस अस्वस्थ व्हायचा तो. स्वत: विषयी, घरच्यांविषयी विचार करत जरावेळ तो तसाच बसला. मग उठून वरचं पठार तुडवू लागला.

##

हे पठारही ब-यापैकी विस्तीर्ण. पूर्व, पश्चिम, वायव्य, दक्षिण, उत्तरेकडे मोठे मोठे चिलखती बुरुज अन् इशान्येकडचा तो दरीकडे उतरत गेलेल्या वाटेच्या टोकावरचा कडेलोटाचा कडा. गडावर दोन दरवाज्यापैकी एक तर पूर्ण उध्वस्त. दुसरा अर्धवट. तर गडावरील महादेवाचं मंदिर जरी भग्न झालं असलं तरी देवीचं मंदिर बरंचसं सुस्थितीत. गावक-यांनी केलेल्या जीर्णोध्दारामुळे!
तो देवीच्या देवळाजवळ पोचला. पलीकडेच जरा खालच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाक्याची साखळीजवळ गेला. हातपाय तोंड धुतलं, पोटभर पाणी पिऊन घेतलं. गार पाण्यानं त्याचा सगळा शीण निघून गेला.

मग तो देवळात आला. सोबत आणलेलं मेणबत्ती, उदबत्तीचं पुडकं उघडलं. देवीसमोरची ती समई लावली. उदबत्त्यांच्या गंधानं ते लहानगं देऊळ भरुन गेलं. एका कोप-यात बॅग ठेवली. देवीसमोर साष्टांग नमस्कार घातला. शांत बसून जरावेळ प्रार्थना केली. ते झाल्यावर मग डबा उघडून आलेल्या पदार्थांवर ताव मारला. मोबाईलला अधून मधून रेंज येत जात होती. घरी फोन करुन मी पोचलोय गडावर इतकंच सांगितलं अन् परत रेंज गेली.

मग तो पायरीवर येऊन आकाश निरखत बसून राहिला. अख्ख्या गडावर केवळ आपण एकटेच आहोत यातलं थ्रिल त्याला खूप भारी फील देत होतं. रात्री इथं देवळाच्या ओवरीत स्लीपिंग कॅरमॅट पसरून झोपावं असं खरंतर त्यानं ठरवलेलं. पण बाहेर ते तारकांनी चमचमणारं आकाश पाहून त्यानं वेगळाच बेत ठरवला.

##

आपली बॅग तिथं देवळातच ठेवून तो निघाला पश्चिमेच्या बुरुजाकडे. संपूर्ण गडावरचा हा सर्वात मोठा बुरुज. वरती मस्त फरसबंदी केलेली. म्हटलं तर किमान 50 जण सहज तिथं झोपू शकतील इतका मोठा बुरुज. तिथं रात्रभर आकाशातले तारे न्याहाळत झोपून जायचं ठरवलं त्यानं. बॅटरी, स्लीपिंग कॅरमॅटची गुंडाळी, पाण्याची बाटली फोन व हातात काठी घेऊन तो तिकडे निघाला.
वाटेत तटबंदीजवळ गजांतलक्ष्मीचं फुटकं शिल्प पडलेलं आहे. तिथून डावीकडे वळलं की समाध्याचं मैदान, तिथून जरा पुढे गेलं की मग तो बुरुज. हे सगळं त्याला ठाऊक. गजांतलक्ष्मीला वाटेत नमस्कार करुन तो समाध्यांच्या मैदानात आला. 


इथं 25,30 लहानशा समाध्या विखुरलेल्या. 2, 4 समाध्या जरा मोठ्या. बहुदा कुणा तालेवार वीराच्या असाव्यात. कधीकाळी इथं मोठी लढाई झालेली. त्यातील वीरांच्या त्या समाध्या. तसेच अनेक वीरगळही देवीच्या देवळाजवळ मांडलेले. काय घडलं असेल त्याकाळी? त्यातलं बहुतेक तर इतिहासाच्या उदरात गडप झालंय. ना कुठे कसलं लिखाण ना कुठे नोंदलेला कागद. त्या समाध्या पाहून समजायचं फक्त.. काहीतरी मोठं युध्द झालंय असं...असे विचार करत करत तो बुरुजाजवळ पोचला. त्या भल्याथोरल्या 8,10 पाय-या चढून वर पोचला. चहूकडे किर्र अंधार. त्यानं हातातली बॅटरीही बंद करुन टाकली. मॅट पसरली. त्यावर पडून तो आकाश न्याहाळू लागला.

आकाशातल्या ता-यांविषयी त्याला जुजबी माहिती. हा व्याध, ते मृग नक्षत्र, तो वृश्चिक तारकासमूह, ते सप्तर्षी, त्याखाली तिकडे दूर उत्तरेला ध्रुवतारा...मधूनच लालसर चमकणारा मंगळ, बुध, गुरु हे पहात पहात त्याला कधी झोप लागली हे त्यालाही कळलं नाही....
###

रात्री कधीतरी त्याला अचानक जाग आली. त्याला प्रकर्षानं जाणवलं की कुणीतरी अगदी जवळ आहे. एक विचित्र कुजका वास भरलाय सर्वत्र... भीतीची थंडगार जाणीव पहिल्यांदाच झाली त्याला. हातापायातलं बळच जणू गेल्यासारखं वाटलं. डोळे उघडले तर जवळच असलेलं ते कुणीतरी कसं दिसेल.. कसं असेल ते... या भीतीनं त्यानं डोळे अधिक घट्ट मिटून घेतले. मग पुन्हा त्यानं क्षणभर विचार केला.. नाही.. घाबरायचं नाही.. पळायला हवं.. लगेच.. आता..याक्षणी...

अन् तो जीवाच्या कराराने धावू लागला... त्याला जाणवलं.. ते जे कुणी आहे तेही मागे धावतंय. त्याचा वेग जास्त आहे... तो अधिक वेगानं धावू लागला.. आपले डोळे मिटलेले आहेत की उघडे हेही त्याला कळेना...डोळे उघडल्यावरही दिसत होता सर्वत्र मिट्ट काळोख... त्या समाध्यांच्या मैदानातून ठेचकाळत तो पुढेपुढे धावला..
अंधारातून धावताना आपण नेमकं कुठं धावतोय हेच कळालं नाही त्याला..

धावता धावता दमला तो. तरीही धावत राहिला. अन् एकाक्षणी त्याला जाणवलं की कुणीतरी उचललंय त्याला... त्यानं डोळे गपकन् मिटून घेतले. मग लक्षात आलं की त्याला परत जमिनीवर ठेवलं गेलंय..
त्याच्या नाकाला आता वेगळाच वास जाणवला. तो मगाशीचा कुजका वास नव्हता हा. तर जंगलात फिरताना जवळपास वाघ, बिबट्या असल्यावर जसा उग्र वास येतो तसं काही जाणवलं त्याला... आधी भूत त्यात बहुदा इथं बिबट्या... या विचारानं अर्धमेला झाला तो....

काही मिनिटं तशीच गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की सगळीकडे एकदम शांतता पसरलीये. कसलाच आवाज नाहीये. फक्त वास आहे. तो वास...
त्यानं हळूच डोळे उघडले. त्या अंधारातही त्याच्या लक्षात आलं की तो अगदी दूर  दरीच्या काठावर आहे. कडेलोटाच्या कड्याजवळ...

##
त्याला कळलं काय झालं ते. तो धावता धावता त्या दरीतच पडणार होता अन् नेमकं त्याक्षणी कुणीतरी उचललं त्याला. जीव वाचवला होता त्याचा. त्याला जाणवत राहिलं की कुणीतरी जवळपास आहे. पण त्याची भीती वाटत नाहीये. उलट आधार वाटतोय त्याचा. मग त्याला आठवल्या विविध कथा कादंब-यातून गोनिदांनी, इतर लेखकांनी, भटक्या मंडळींनी रंगवलेल्या गडपुरुषाच्या कथा. आपल्याला ज्यानं वाचवलंय तोही बहुदा गडपुरुष असावा असं वाटलं त्याला.

त्यानं जमिनीवर वाकून नमस्कार केला त्या गडपुरुषाला. मनोमन आभार मानले अन् पुन्हा तो मागे वळून गडाच्या बुरुजाच्या दिशेने चालू लागला.

##

चालत चालत तो पुन्हा गजांतलक्ष्मीच्या शिल्पाजवळ आला. चाचपडत चाचपडत... तिथं पुन्हा त्या फुटक्या शिल्पाला नमस्कार केला. तासाभरापूर्वी भीतीनं थरकापलेल्या त्याच्या मनाला खूप धीर वाटला. तो पुढे वळून समाध्यांच्या मैदानात आला अन् पुन्हा झपकन् कुणीतरी ढकललं त्याला. ती झापड खूपच वेगवान होती. तो कोलमडलाच. पडला तो थेट एका समाधीवरच. नाक फुटलं. नाकातून रक्त येऊ लागलं. अन् त्याचक्षणी पुन्हा त्याला जाणवला तोच घाणेरडा कुजका वास. अन् यावेळी त्याला जाणवलं की जे कुणी आहे ते एकटं नाहीये. अजून काहीजण आहेत तिथे. ते सगळे त्याच्या जीवावर उठलेत....

मग पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन तो धावत सुटला... वाटेत गजांतलक्ष्मीचं शिल्प ओलांडून पुढे धावतांना त्याला पुन्हा तो मगाशीचा वास जाणवला. वाघाचा...! त्याची भीतीची भावना एकदम कमी झाली. आपल्याला मदत करु पहाणारंही कुणी इथं आहे अन् जीवावर उठलेलंही... हे क्षणात उमगलं त्याला. खरं म्हणजे त्या दोघांच्यातली ही लढाई होती अन् तो मध्ये आला होता!!!

तो आहे त्या जागी शांत उभा राहिला. मग त्याला अजून एक गोष्ट जाणवली. ते गजांतलक्ष्मीचं शिल्प जिथं पडलंय तिथून समाध्यांचं मैदान ते पश्चिमेकडचा बुरुज हा एरिया त्या वाईट प्रवृत्तीचा आहे अन् इकडच्या बाजूला देवीच्या देवळापर्यंतचा भाग चांगल्या प्रवृत्तीचा. त्या गडपुरुषाचा. अन् मग त्याला कळेना की बुरुजाच्या माथ्यावर ठेवलेली स्लीपिंग बॅग, मोबाईल वगैरे परत कसं आणायचं?

त्यानं पुन्हा हद्द ओलांडायचा प्रयत्न करताच त्या कुणीतरी त्याला मागे खेचलं. अत्यंत ताकदीनं. जणू तो निर्वाणीचा इशाराच होता त्याला...
कुणीतरी जणू कानात गंभीरपणे सांगत होतं, " दोनदा सुटलायस तू.. परत जर आता पाऊल पलीकडे टाकलंस तर... तर मग जीवाला मुकशील तू...." त्याला जाणवत राहिलं की त्या दोन शक्तींच्या काही झटापट सुरु आहे. मधूनच जोरदार वारा वाहतोय. कसलेतरी अगम्य आवाज येतायत. मधेच सगळं शांत होतंय... मग परत कुठुनतरी हिंस्त्र गुरगुरुराट होतोय...
झटापट सुरुय.. दोघांच्यात. पण कोण कुणावर मात करणार हे काही दिसत नव्हतं.
हे काहीतरी आसपास घडतंय हे कळत होतं त्याला. पण उमगत नव्हतं. एकक्षण मनाला ते पटत नव्हतं. पण पुन्हा जे घडतंय ते वेगळं आहे हेही कळत होतं... काहीच दिसत मात्र नव्हतं. गेले दोन तास धावून धावून थकला तो...मग त्या शिल्पाशेजारी तटबंदीला टेकून स्तब्ध बसून राहिला.... सकाळ उजाडेल का, उद्याचा सूर्य आपण पाहू का  याची वाट पहात!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर (९८३३२९९७९१)🌿
( मंडळी आजवर गडकोटांवर अनेकदा फिरलोय पण असं काही घडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. ही कथा आहे की खरं हे तुमचं तुम्हीच ठरवा, मात्र गडकोटावर प्रेम करणा-या कुणालाच कोणतीही वाईट शक्ती कधीच त्रास देऊ शकत नाही असं आजही मला ठामपणे वाटतं हे नक्की. !) 

Friday 22 May 2020

वेगळ्या लघुकथा... क्र 1 - सूड

प्रांजली एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. वडील सरकारी नोकरीत. आई गृहिणी. वडिलांची कमाई खूप नसल्यानं जवळपासच्या काही गरजूंना जेवणाचे डबे पोचवायचं काम आई करायची. प्रांजलीला दोन मोठ्या बहिणीच. पहिल्या दोघींपेक्षा ही जवळपास 8 वर्षानं लहान. आतातरी मुलगा होईल असं वाटलं अन् ही झाली त्यामुळे आई वडिलांचं फारसं प्रेम कधीच मिळालं नाही. 
मोठी लेक प्रेमविवाह करुन पळून गेली तर मधलीला नात्यातील एकाकडून मागणी आलेली.

त्यानंतर प्रांजली लग्नाला येईपर्यंत वडील रिटायरमेंटला पोचलेले. प्रांजली होती हुषार पण सतत धास्तावलेली. घरात लहानपणापासून आई व बहिणी सतत बोलायच्या तिला. वडील आईच्या धाकात त्यामुळे गप्पच. 
आईच्या कामात तीच एकटी मदत करायची पण कधी पदरात कौतुक पडलंच नाही. अंगभूत हुषारीवर तिनं बी काॅम पूर्ण केलं व एम काॅम ही... काॅलेजमधील सरांच्या ओळखीनं एका नामवंत सीएच्या फर्ममध्ये नोकरीलाही चिकटली. गप्प गप्प रहाणारी प्रांजली इमाने इतबारे काम करु लागली....

या फर्मचा क्लायंट असणा-या एका कंपनीत श्रेयस काम करायचा. दिसायला गोरापान, राजबिंडा. त्याचे कपडे, गाॅगल, बाईक हे सगळं स्टायलिश. मात्र तो कायम त्याच्याच तंद्रीत असायचा. एकदा ऑफिसमध्ये येताना दोघं एकमेकासमोर आले. ती पहिल्यांदा नजरेत आली त्याच्या. कोणतेही निर्णय वेगानं घेणा-या श्रेयसनं घरच्यांशी बोलत थेट तिला मागणी घातली.
त्याचं काही फार शिक्षण झालं नव्हतं. साधा पदवीधारक असलेला तो पर्सनॅलिटीमुळे सगळ्यांच्या नजरेत भरायचा. ही नोकरी करण्यापूर्वी अन्य लहानमोठ्या नोक-या करुन तो इथं ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजर बनलेला. पगार काही फार नव्हे पण खाऊन पिऊन सुखी होतं घर.!

प्रांजलीच्या आईवडिलांना तर घाई होतीच. नेहमीचे सगळे सोपस्कार होऊन लग्न पार पडलं व संसार सुरु झाला. आपल्या देखण्या नव-यासोबत उत्तम संसाराची स्वप्न पहाणा-या प्रांजलीचा संसार सुरु झाला.
नवा नवा संसार. वयात आलेली दोघांची शरीरं यामुळे पहिली 3,4 वर्षं कशी गेली हे कळलंच नाही. तोवर प्रांजलीला दिवस गेले. एक गोंडस मुलगा झाला. सासू सासरे फारसे कशात हस्तक्षेप करायचे नाहीत. आपण बरं- आपलं बरं असेच वागायचे. गरोदरपणात प्रांजली जास्तीत जास्त घरी राहिलीच नाही. सासूनं घ्यायची ती काळजी घेतली. मात्र या दरम्यान प्रांजलीला हळूहळू समजू लागलं की श्रेयस दिसतो तितका सज्जन नाही. त्याच्या कंपनीत तो काही गैरव्यवहारही करतोय. इतकंच नव्हे तर विविध तरुणींना फशी पाडून त्यांच्याशी संबंधही ठेवतोय. एक मुलगी अशीच एक दिवस थेट त्याचं घर शोधत आली.. तिनं मोठा गोंधळ घातला... मग नातेवाईक- शेजारचे सज्जन काका यांच्या मध्यस्थीनं एक भलीभक्कम रक्कम देऊन ते प्रकरण मिटवण्यात आलं. त्यासाठी प्रांजलीचे दागिनेच शेवटी विकावे लागले.
यानंतर तरी नवरा शहाणा होईल असं तिला वाटलं पण घडलं उलटच. आजवर लपूनछपून सुरु असलेले त्याचे उद्योग राजरोस सुरु झाले. त्याचा धसका घेत आईनं अंथरुण धरलं. एक दोन महिन्यात गेलीच ती. सास-यांनी लेकाच्या वर्तणुकीकडे कानाडोळा करत जगायचं ठरवलं अन् श्रेयसला मोकळं रान मिळालं. 
दिवसभर घरात कुणी नसायचं तर हा कुणा तरुणीला घरीही घेऊन येऊ लागला. यावरुन मग दोघांच्यात वादावादी सुरु झाली. 
सतत तो तिला गलिच्छ शिव्या द्यायचा. 
एकदा वादावादी झाली तेव्हा म्हणाला, " तुझ्यात पाहण्यासारखं काही उरलं नाहीये, आवडत नाहीस तू, घाण आहेस.. सतत डोकं दुखतं, अंग दुखतं म्हणून रडतेस तू.. पगार मिळवतेस म्हणून ठेवलंय घरी तुला...नाहीतर लाथ मारुन हाकलली असती.." 
त्याचा तो रुद्रावतार पाहून ती भयंकर घाबरली. मात्र असहाय्य होती..! गप्प सोसत राहिली. मनात आक्रंदत राहिली.

 एकुलता एक लेक आता 6 वर्षाचा. त्याची शाळा सुरु झालेली. ती शाळा, स्वत:ची नोकरी यात कसंबसं मन रमवायची. तिच्या फर्मचे सर मायाळू होते. तिला मुलीसारखं मानायचे. त्यांची मुलगीही हिच्याच वयाची. तीही फर्ममध्ये यायची. या दोघांकडेच ती मन मोकळं करायची. आठ दहा दिवसांतून म्हाता-या आईबाबांना भेटून यायची. त्यांनाही हिच्या सुख दु:खाशी फार देणं घेणं नव्हतंच. ती मात्र त्यांची काळजी घ्यायची. त्यांना काही दुखलं खुपलं की लगेच धावून जायची. मोठ्या दोन्ही बहिणी परगावी. आल्या तरी पाहुण्यासारख्या चार दिवस येऊन जायच्या. तेव्हाही कितीदा हिलाच बोलवायच्या. कामासाठी राबायला...!

खरं सांगायचं तर तिला हे जगणं नकोसं झालेलं. ज्याच्यावर प्रेम केलं तो नवरा महिनोन्महिने जवळही घ्यायचा नाही. शरीरसुख नाही, प्रेमानं बोलणं नाही.. कोणत्याही कामात मदत नाही अन् वर सतत होणारा पाणउतारा. अधूनमधून तिला घरी कुणीतरी येऊन गेल्याच्या खुणा सापडायच्या. कुणाचा रुमाल, कधी वापरलेले कन्डोम, कधी ड्रेसवरची ओढणी... काहीही दिसलं की तिच्यासमोर सगळं अंधारुन यायचं. मनात राग, संताप, चीड अन् अपमानाची आग भडकायची. मात्र दांडगट नव-याला काही प्रश्न विचारु गेलं की त्याच्या एका फटक्यासरशी तिचं अवसान गळून पडायचं. त्याचं हिंस्त्र रुप दारामागे लपून पहाताना तिचा लहानगा मुलगाही भीतीनं थरथरु लागायचा.

एकदिवस मात्र अतिरेक झाला. एका गलिच्छ वस्तीतील लहान मुलीला घेऊन नवरा बेडरुममध्ये होता. ती घरी आली याचंही भान नव्हतं त्याला. वयानं अगदीच कोवळ्या अशा त्या मुलींशी झोंबणारा नवरा पाहून तिला किळस आली. 
ती रागानं अद्वातद्वा बोलू लागली. ती मुलगी पटकन् कपडे गोळा करुन निघून गेल्यावर नव-यानं ही आवाज चढवला..
तो म्हणाला, " तू पण जा ना कुणासोबतही. रांड साली. झोप ना जाऊन कुणाहीसोबत. तुला काय तेच हवं असेल. माझ्या मार्गात कशाला येतेस..?"
प्रांजली थक्क झाली. स्वत: घाणेरडे वागणारा हा माणूस इतका वाईट कसं बोलू शकतो.? तिनं पलीकडच्या खोलीत जाऊन सास-यांना बाहेर खेचलं. त्यांनीही कानावर हात ठेवले. तुमचं तुम्ही पहा असं सांगून ते पायात चप्पल अडकवून बाहेर निघून गेले. लहानगा लेक हाॅलच्या एका कोप-यात थरथरत बसून होता..!
प्रांजलीनंच मग आवाज चढवला. " श्रेयस, अरे चांगल्या घरचा मुलगा तू. माझ्यात काय कमी म्हणून असं वागतोयस. का छळतोयस मला.. तुझ्या या नादापायी मागची नोकरीही गेली तुझी. आताही तू दुपारी घरी येऊन हे उद्योग करतोयस. का हे असं??  मी आता पोलिसातच तक्रार देते. घटस्फोट घेऊया. कर मोकळं मला यातून..."
रागानं भडकलेल्या श्रेयसनं तिच्या केसांना धरुन चार कानाखाली दिल्या. ओरडत म्हणाला, " पोलिसात जाणार तू. जा..जा. मीच सांगतो पोलिसात ही बाॅससोबत झोपते रोज, इतर क्लायंटस् सोबतही मजा मारत हिंडते.. ही चारित्र्यहीन आहे. वेश्या आहे. थांब तुला घराबाहेर काढून तुझ्या आईबापालाच सांगतो. हिला घेऊन जा. नाहीतर समुद्रात ढकला..माझी बदनामी करणार काय तू... थांब दाखवतोच तुला..उद्याची सकाळ होण्यापूर्वी निघून जायचं तू.. नाहीतर ठार मारेन तुला मी. ही टेलिफोनची वायर घेऊन गळा दाबेन तुझा .."
तो ताडताड बाहेर पडला... 
### 
दुस-या दिवशी दुपारी 11 वाजता श्रेयस घरी परतला. त्याचे वडील कुठेतरी बाहेर गेलेले. बेडरुममध्ये शिरताच त्यानं पाहिलं.. प्रांजली तिथं भिंतीला टेकून रडत बसलीये....
" रांडे, हरामी.. का इथं अजून तू. घर सोडून जा म्हटलेलं ना. थांब तुला कायमचीच संपवतो आता..." असं म्हणत तो तिच्याकडे पुढे जाणार इतक्यात त्याचा फोन वाजला...

फोन पोलिसस्टेशन मधून होता...
" हां साहेब बोला. हो..मी श्रेयसच बोलतोय... काय सांगता ?? माझ्या बायकोचा ऍक्सिडेंट झालाय, डेडबाॅडी सापडलीये?? काय चेष्टा करता काय राव... माझी बायको इथं समोर बेडरुम मध्ये बसलीये. तिचा तो गलिच्छ असा पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून..."
" काय म्हणता.. पिवळ्या रंगाचाच ड्रेस.. पर्समध्ये माझा फोटो..आधारकार्ड.. मोबाईल .. कसं शक्य आहे...?"

असं म्हणत त्यानं पुन्हा मागे वळून पाहिलं... तर प्रांजली त्याच्याजवळ येऊन पोहोचली होती अन् तिच्या हातात होती तीच टेलिफोनची वायर... खदाखदा हसत तिनं पाऊल पुढं टाकलं.. मग क्षणात त्याच्या हातातला मोबाईल गळून पडला...
- सुधांशु नाईक, कोल्हापूर( ९८३३२९९७९१)
( आजवर विविध प्रकारच्या कथा लिहिल्या. मात्र ज्या प्रकारचं लेखन कमी प्रमाणात केलेलं त्या प्रकारचं लेखन करायचा हा वेगळा प्रयोग. तुमच्या प्रतिक्रिया अवश्य सांगा. )

Friday 1 May 2020

क्वारंटाईन डायरीचे 10 भाग एकत्र...

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर 23 मार्च ला भारतात लाॅकडाऊन सुरु झालं. त्यानंतर विविध विषयांवर मनापासून मला त्या त्या दिवशी " जे सुचेल तसं.." लिहायला सुरुवात केली. कधी गंभीर चिंतन तर कधी हलकंफुलकं काही. कधी पुस्तकांविषयी, कधी सिनेमाविषयी...
त्या  क्वारंटाईन डायरीचे भाग फेसबुकवरुन लिहित गेलो. त्याच्या या लिंक्स. आधी दहावा व ताजा भाग..अन् मग उलट क्रमाने शेवटी पहिला भाग असं...
ज्यांना सगळे भाग एकत्र वाचावेसे वाटतायत. त्यांच्यासाठी..!

##
भाग 10 वा. मनात व समाजात निर्माण झालेली अस्वस्थता.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10212835072190874&id=1810975908
##

भाग 9 वा :- टाईमपास/ केशकर्तन
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10212791471820892&id=1810975908
##

भाग 8 वा : चिंतन- वसुंधरा दिनाच्या निमित्ताने..
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10212778811504392&id=1810975908
##

भाग 7 वा.. इतिहास विषयक पुस्तकांविषयीचं लेखन
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10212743649465363&id=1810975908
##

भाग 6 वा ... सिनेमाविषयीचं लेखन
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10212715478641110&id=1810975908
##

भाग 5 वा चिंतन.. परिस्थितीविषयीचं.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10212697142822726&id=1810975908
###

भाग 4था .. सुनीताबाईंविषयीचा दीर्घ लेख
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10212664375643567&id=1810975908
##

भाग 3रा - वाचलेल्या पुस्तकांविषयीचं मनोगत
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10212651326317342&id=1810975908
##

भाग 2रा.. मुलींचं लेखन वगैरे वगैरे..
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10212623316657118&id=1810975908
##
भाग पहिला - डायरी लिहायची सुरुवात
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10212608251080488&id=1810975908

##############