marathi blog vishwa

Tuesday 24 December 2019

#kiff चे अनुभव - भाग 3 - सुसान बेयरचा डॅनिश चित्रपट.

🎭 # Kiff - closer day and Danish Movie " Brothers" .

 किफ्फ फेस्टिव्हल ला सुसान बेअरच्या " ब्रदर्स" या सिनेमानं पुन्हा एकदा अस्वस्थ केलं.
आपण आपलं आयुष्य जगत असतो सवयीनं पण, अचानक समोर आलेलं काहीतरी कसं आपल्याला हलवून सोडतं त्याचा हा अस्वस्थ करणारा अनुभव. मी हे अस्वस्थपण विसरु शकलो नाही. 

सिनेमाचं कथानकही एकदम सुरुवातीपासून धडाक्यात सामोरं येणारं.
-------
अफगाणिस्तानमधील युध्दात जायची आॅर्डर येते अन् सिनेमाचा नायक तयार होतो. लहान दोन मुलांचा निरोप घेताना, बायकोशी हलकाफुलका रोमान्स करताना त्यालाही माहिती आहे की आपण कदाचित परत येणारही नाही. तिलाही जाणीव आहे. मुलींना नीटसं अजून कळत नाहीये.

हा मेजर आहे, जायला तर हवंच. जातो. तिकडे शेवटी नको तेच घडतं. त्यांच्या तुकडीवर राॅकेट लाॅन्चरने हल्ला होतो. 
सगळे मेले असं कळवलं जातं.

याच्या घरी ती बायको निवांत बाथरुममध्ये टबबाथ घेत असते. कुणीतरी आलंय असं मुलीनं सांगताच टाॅवेल गुंडाळून बाहेर येते. 

समोर ते लष्करी अधिकारी पाहून न बोलताच कळतं तिला. तिच्या चेहे-यावरचे बदलते हावभाव पाहून आपल्या काळजाचं पाणी होतं..!

आता फ्युनरल ची तयारी. 

रात्री बाहेर तिचा दीर येतो. नव-याची गाडी वापरतो तो बरेचदा. तो पक्का दारुडा आहे. घरच्यांनी जवळजवळ त्याला बाजूलाच टाकलाय. तिलाही तो वाया गेलेला तरुण वाटतो. 
बोलताना त्याला ती म्हणते, नाऊ मायकल इज डेड... तुला फोन करत होते पण तुझा फोन लागला नाही.

तो हादरतो. त्याचं भावावर खूप प्रेम. आपल्या भावासारखं पर्टिक्युलर, नीट व फोकस्ड रहाता आलं नाही याचं दु:ख त्याला आहे.

तो मग वडिलांच्या घरी आईला भेटायला जातो. तेही त्या मध्यरात्री विमनस्क बसलेत. जुने फोटो पहात...

दुस-या दिवशी फ्युनरलला सगळे निघतात अन् पहिला धक्का बसतो प्रेक्षकांना. 
मायकल जिवंत असून त्याला दहशतवादी तळावर कैदेत ठेवायला घेऊन निघालेत. एका सेकंदात कॅमेरा यांचा तर दुस-या वेळी त्यांचा प्रवास. एकावेळी इथल्या प्रोसिजर्स तर दुस-याक्षणी तिथे त्याला कोठडीत बंद करणं... असं दाखवतो सिनेमा... अंगावरच येतात ते क्षण. 

तिथे अजून एका युध्दकैद्यासह त्याला बंदिस्त केलं जातं.

मग तिथे त्याची कैद सुरु. तर इथे भाऊ आपलं कर्तव्य समजून वहिनी व मुलींकडे येऊ लागतो. घराचं किचन दुरुस्त करणं, मुलींशी खेळणं असा मिसळत जातो. वहिनीला एकदा म्हणतोही की तू टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटीची असशील असं वाटलेलं पण तू छान समजूतदार आहेस...

मुलीही त्याच्यासोबत मोकळ्या होतात.....त्यांचे वाढदिवस साजरे होतात. मायकेल मेलाय हे स्वीकारुन सगळे जगत रहातात. मनातली वेदना विसरु पहातात. एकाक्षणी तर त्या दोघात कणभराची जवळीकही होते. एक किस घेतल्यावर दोघेही स्वत:ला सावरतात. पुढे जात नाहीत.

तिकडे आता दहशतवादी कॅम्पमध्ये दोघांमध्ये मैत्री आहे. तो दुसरा रडार टेक्निशियन आहे. त्याला मायकेल धीर देत रहातो. आपली नक्की सुटका होईल याची ग्वाही देत त्याचं मनोबल वाढवतो. आपल्या फॅमिलीज वाट पहात असतील... आपण मोडून नाही पडायचं हे बजावत रहातो स्वत:ला....
एकदिवस दहशतवादी दोघांना मैदानात उभं करतात व एकमेकाला मारा म्हणतात. त्याच्याने ते होत नाही. तू त्याला जर ठार मारलंस तर तुला जीवदान देऊ असं सांगत रहातात. शेवटचं बजावल्यावर मायकल धीर धरुन त्या सहका-यावर हल्ला करतो. मन दगड करत त्याला मारुन टाकतो. तो ताण मग त्याला असह्य होतो.... कोठडीत येऊन भडाभडा ओकतो... निपचित पडून रहातो. ..

पापणीसुध्दा मिडायचं धाडस होत नाही हा संपूर्ण प्रसंग पहाताना! 

शेवटी एकदिवस तळावर सैनिकी हल्ला होतो. दहशतवादी मरतात. मायकेलची सुटका होते.

घरी बातमी पोचते. घर आनंदानं उजळून निघतं. विमानतळावर मुली, बायको, भाऊ व आईवडिलांना भेटल्यावर मायकेलचं वागणं पहात राहण्याजोगं.
त्याच्या मनावरचा ताण मग घरच्यांवर रागाच्या रुपात निघू लागतो.

आपण आपल्या सहका-याला मारलंय हे सांगायचं धाडस त्याच्यात नाही. तो प्रयत्न करतो वरिष्ठांना सांगायचा, जमत नाही. त्या सहका-याच्या घरीही जाऊन पत्नीला भेटून येतो. त्यांचं ते लहान बाळ पाहून मनातून अधिक तुटतो....

मेंदूवर ताण आलेला तो. बायको व वरिष्ठ काहीवेळा विचारतातही, की काय घडलंय नेमकं. सांगून टाका... पण त्याला जमत नाहीच.

मग संतुलन बिघडलेला तो बायको व भावाला सतत विचारत रहातो की तुमच्यात 'तसे'  संबंध आले की नाही या काळात? का नाही आले? ती सत्य सांगते. पण याची मनस्थिती ठिकाणावर नाही. त्याला पटत नाही.

तो हिंस्त्र होतो. भाऊ त्याला वाचवायचे प्रयत्न करतो. शेवटी पोलिस तुरुंगात टाकतात.

शेवट तर खूप सुंदर घेतलाय. ती भेटायला एकदा जाते. पुन:पुन्हा त्याला मन मोकळं करुन म्हणून विनवते. तो ठाम बसून रहातो.

ती शेवटी म्हणते की तू आज जर सत्य सांगितलं नाहीस तर मी कधीच भेटायला येणार नाही.... तो सांगून टाकतो. कोलमडतो... ' त्या चिमुकल्याच्या बापाला मी ठार मारलं हे आक्रोशत सांगत रहातो....' 
ती त्याला कुशीत घेऊन बसून रहाते....!

-_--------

मी शेवट सांगितला मुद्दाम. खरंतर रहस्य तुम्ही पहाच असं म्हणता आलं असतं. पण मला नक्की ठाऊक आहे की मानवी मन आणि परिस्थिती याची सांगड घालत जे अभूतपूर्व नाट्य समोर उभं राहतं ते नक्कीच लोक पहाणार. सिनेमा कुठूनही मिळवून पहाणार.

त्या तोडीचाच आहे चित्रपट. नियती म्हणा की परिस्थिती... आपल्यासमोर उद्या जे ताट वाढून ठेवणारेय त्याचा आज आपल्याला पत्ता नसतो. अन् मग गोंधळलेला, भेदरलेला मेंदू कसंतरी विचार करत चालू पहातो याचं जे चित्रण सुसान बेयरने उभं केलंय ते अंतर्बाह्य हलवून सोडणारं.

मृत घोषित केलेला सैनिक युध्दभूमीवरुन परतणं हे अाधीच नाट्यमय, त्यात तो मानसशास्त्रीय पेच....ते तुटत रहाणं...
हे असं सुचणं, धाडसानं अप्रतिमरित्या उभं करणं अन् प्रेक्षकाना सतत जागेवर खिळवून ठेवणं यासाठी खूप कौतुक करावंसं वाटतं.

असे चित्रपट दाखवल्याबद्दल आयोजकांचंही कौतुकच.

अजून मनावरचा परिणाम पुसला जात नाहीये तीन दिवसानंतरही. मानसशास्त्र हीच शाखा यापुढे कशी अधिकाधिक गरजेची ठरत जाणार या माझ्या मताला बळकटीच मिळाली या चित्रपटामुळे.
असे चित्रपट दाखवल्याबद्दल आयोजकांचंही कौतुक. 

हा एक अस्वस्थ करणारा अनुभव मी घेतला, तुम्हीही घ्या. इंटरनेटच्या महाकाय विश्वातून शोधाच हा चित्रपट...
- सुधांशु नाईक. (९८३३२९९७९१)🌿
( 2019-20 चा किफ्फ कोल्हापुरात फेब्रुवारी महिन्यात होत आहे. जरुर नावनोंदणी करा.)

Sunday 22 December 2019

#kiff चे अनुभव भाग 2 - पिंकी ब्युटी पार्लर

एका  उत्कंठावर्धक चित्रपटाचा भन्नाट अनुभव म्हणजे  
पिंकी ब्युटी पार्लर...
#KIFF- 2017 या कोल्हापूर फिल्म फेस्टिवलमध्ये काही मोजकेच चित्रपट  पाहायला वेळ काढता आला. त्यात अचानकपणे समोर आलेला भन्नाट चित्रपट होता " पिंकी ब्युटी पार्लर". jealousy thy name is woman.. असं एक जगप्रसिद्ध वाक्य आहे. ते अगदी ठळकपणे आठवत राहते चित्रपट पाहताना..!
अक्षय सिंग हा कलावंत विविध अन्य चित्रपटातून वगैरे आपल्या समोर येतोच. हा चित्रपट फूल टू त्याचा आहे. लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून तो एका वेगळ्या विश्वात आपल्याला खिळवून ठेवतो.

खर म्हणजे ब्युटी पार्लर या विषयावर तसं चित्रपट काढणं म्हणजेच एक आव्हान. नेमकं काय दाखवावं आणि का दाखवावं असंही.

त्यात या चित्रपटाची कथा म्हटलं तर १-२ ओळींचीच. म्हणजे " पिंकी ब्युटी पार्लर" चालवणाऱ्या बुलबुल या मुलीचा देह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळतो. आणि मग तो खून आहे की आत्महत्या यावर तपास सुरु होतो. अनेक वळणे घेत चित्रपट संपतो कधी तेच कळत नाही. 

ही दोन ओळींची कथा अक्षय सिंग अशी काही फुलवत नेतो की आपण थक्क होऊन जातो. बुलबुल आणि पिंकी या बहिणी. बुलबुल सावळी आहे तर पिंकी गोरी. 
गोरेपणाला भुललेल्या लाखो महिलांच्या मानसिकतेवर असं काही मस्त सुचवत जातो चित्रपट की जे अनेक सेमिनार्स घेऊन पण नाही सांगता येणार.

कथेच्या सुरुवातीलाच ती पार्लर ची मालकीण बुलबुल मरते. आणि तपास सुरु होतो. तो इन्स्पेक्टर आणि त्याचा सहायक एकेकाला घेऱ्यात घेतात. प्रत्येकवेळी आपल्याला वाटतं हाच खुनी असणार... पण त्यांच्या जबाबात काही दुसरं पुढे येतं. मग दुसरं व्यक्तिमत्व पुढे येतं. असं करत सिनेमा पुढे सरकत राहतो. 
बुलबुल च्या हाताखाली काम करणाऱ्या सर्व जणी तिला खूप सन्मानाने वागवतात. तिचं व्यक्तिमत्व छान आहेच. तिथे येणाऱ्या विविध बायका, त्यांची वागणूक हे सगळं हळूहळू स्टोरीतून उलगडत जातं.

एक भाई पण आहे त्यात. पार्लरची जागा त्याच्या मालकीची आहे. त्याचा कमरेखालील भाग लुळा पडलाय. पण परिसरातील त्याची जरब तशीच आहे. तो अधूनमधून बुलबुलला घरी मसाज करायला बोलावतो. त्याची पाठ,पोट आणि छाती तिच्याकडून रगडून घेतो. त्यातूनच स्वतःचं समाधान करून घेतो...
तिला हे करायला मनापासून नको असतं पण त्याची मदत तिला उपयुक्त असते. नाईलाजाने ती काम करत राहते. तिच्या खुनात त्याचा काही सहभाग आहे का हेही पोलीस तपासून पाहतात.
तिच्या मनात लहान बहिणीविषयी मत्सर आहे. केवळ ती गोरी असल्याने प्रत्येकवेळी आपल्याला दुयम्म लेखले जाते यामुळे मनात सतत ठसठसत असलेली वेदना आहे. म्हणून ती बहिणीला दिल्लीत पाठवते. पार्लर सांभाळत असतानाच तिचा जरा बुद्दू हरकाम्या मदतनीस एका अवचित क्षणी तिच्या रूपाचे कौतुक करतो आणि तिला तो आवडू लागतो.
या दरम्यान तिची बहीण पिंकी परत येते. पार्लरमध्येही तिची आता गरज असते आणि तिला दिल्लीत काम करायचं नाही. 

ती परतल्यावर घरी जाऊन जी ब्युटी सर्व्हिस महिलांना दिली जाते ते काम तिच्यावर सोपवते बुलबुल. सोबत हाच मदतनीस. त्यातून त्या दोघात नातं फुलू लागते.
ह्याच्यावर आपली बहीण देखील फिदा आहे हे कळल्यावर पिंकी नाराज होते. पण आता जर बहिणीने दिल्लीला पाठवलं तर जायचं नाही असं ठरवते आणि थेट त्याच्याशी लग्न करून येते..

त्या नंतरच बुलबुलचा मृत्यू होतो..! त्याचं रहस्य अगदी शेवटी उलगडते.

या सिनेमाची मजा त्या पोलीस तपासात, स्क्रिप्ट मध्ये आणि वेगळ्या दिग्दर्शनात आहे. 
सगळे कलाकार नवे आहेत, अक्खा चित्रपट फक्त बनारस मध्ये शूट होतो. त्यातही सरळ साधं चित्रीकरण. जसं आहे तसं ते गल्लीवालं, गंगाघाट वाले बनारस. तरीही क्षणभर देखील चित्रपट तुम्हाला हलू देत नाही.

अध्यात्मिक आणि शिक्षणासाठी जगभर प्रसिध्द असलेल्या आपल्या देशात सर्वाधिक खप हा सौंदर्य प्रसाधनांचा आहे. आजही शेकडो मुलींना ४ किंवा ६ आठवड्यात गोरं व्हायचं असतं. कारण गोरी मुलगीच सुंदर हे आपल्यावर सर्व प्रकारच्या मीडियातून सतत ठसवलं जातं. लग्नानंतर १०-१२ वर्षांनी सुद्धा बायकोला गोरी पाहण्याचा अट्टाहास बाळगणारे थोर पुरुषही याच देशात जागोजागी सापडतात.
या अपप्रचाराला  कशा स्त्रिया बळी पडतात याचं सहजसुंदर चित्रीकरण पाहून समाजाची मानसिकता बदलेल असं मुळीच नाही. मात्र अशा विषयावर एक नितातसुंदर चित्रपट नक्कीच नवा विचार रुजवू शकतो असं वाटून अक्षय सिंग यांचं मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं..!
- सुधांशु नाईक (९८३३२९९७९१) 

( #kiff यंदा जरासा पुढे गेलाय. डिसेंबर जानेवारीत होणारा हा फेस्टिव्हल फेब्रुवारी 2020 ला कोल्हापुरात  होईल. मात्र तोपर्यंत रसिकांनी फिल्म सोसायटीचं सभासदत्व जरुर घ्यावं. दर महिना 2 चित्रपट जरुर पहावेत, सोसायटीलाही अधिकाधिक मेंबर्सची गरज आहे..!
 संपर्क दिलीप बापट कोल्हापूर -9371377077) 

Friday 20 December 2019

अनुभव kiff च्या विविध चित्रपटांचे..! भाग १ - Sound Of Silence

डिसेंबर-जानेवारी उजाडला की चित्रपट वेड्यांना फिल्म फेस्टिवल चे वेध लागतात. गोव्यातीलइफ्फी पाठोपाठ येतो कोल्हापुरातील kiff म्हणजेच कोल्हापूर इंटर्नाशनल फिल्म फेस्टिवल चे. या महोत्सवात आजवर कित्येक चित्रपट पहिले होते. यापूर्वी पाहिलेल्या अनेक चित्रपटांपैकी काही मोजक्या स्पेशल चित्रपटांवर मी परीक्षण लिहिलेलं. त्याचं हे संकलन विविध पोस्ट्स च्या रुपात... आपल्या ब्लॉग साठी...
त्या आठवणीतील हा पहिला चित्रपट...

*****
१) शांततेचा सुमधूर नाद म्हणजेच साऊंड ऑफ  सायलेन्स.... हा चित्रपट !

#kiff कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट सुरुवातीला चुकलेला म्हणून हळहळलो होतो. अाज पाहिला मिळाला याचा आनंद फार आहे.
शांततेला आवाज असतो असं कुणाचंतरी वाक्यपण आहे म्हणे. मी शांततेचा आवाज ऐकला भटकंती करताना. एकटं, दुकटं फिरताना अनेक ठिकाणं अशी समोर येतात की आपण केवळ थक्क होऊन बसून रहातो. कसलाच आवाज नकोसा वाटतो तेव्हा.
ती अनुभूती कितीकदा घेतलेली.
पहिल्यांदा रायगड चढून गेल्यावर भवानी टोकाच्या गुहेत बसून सूर्योदय पहाताना, वाघ दरवाज्याच्या माथ्यावरुन थंडीतली उबदार दुपार भोगताना, राजगडाच्या डुब्याजवळून चांदण्या रात्री चमचमता जलाशय अनुभवताना, गरुडेश्वरला किंवा भेडाघाटला अंधा-या रात्री लुकलुकणा-या दिव्यांचं नर्मदेतील प्रतिबिंब पिताना, लीडर नदीचा खळखळाट पहेलगामला ऐकताना... अशा किती ठिकाणी हा शांततेचा रम्य आवाज उरात भरुन घेतलेला.
असं कुठे एकटं-दुकटं जाऊन बसलं की मी माझा नसतो. सभोवतालच्या निसर्गाचा होऊन जातो. प्रत्येक झाडाची वेगवेगळी सळसळ, पानगळ अन् पक्ष्यांचे विविध आवाज मनात खोलवर रुजत जातात. लहानशा झ-याचा खळखळाट मन भरुन टाकतो. पायाखालच्या पाचोळ्याचा, मोडलेल्या लहानशा काटकीचा आवाज देखील मेंदू टिपत रहातो. मग जाणवतं की आपण किती गोंगाट करत रहातो रोज. अनेक छोटे छोटे आवाज असतात हेच उमगेनासं झालंय आपल्याला रोजच्या धबडग्यात.
मग ते आवाज शांतपणे ऐकत बसून राहिलं की आपण जणू बसल्याजागी वारुळ झालोय की काय असं वाटू लागतं.
शांततेचा हाच अनुभव ' साऊंड ऑफ  सायलेन्स' हा चित्रपट देऊन जातो.

पुन्हा एकदा 12 वर्षांच्या एका मुलाचाच हा चित्रपट. तो मुका आहे. जन्मत:च आईला गमावून बसलेला. आईला जणू यानंच खाल्लं असं समजून बाप त्याचा राग राग करतो. बायकोचं दु:ख विसरायच्या नावावर दारुत स्वत:ला विसरत रहातो.
हा बापाची जमेल ती सगळी सेवा करतो. गाई गुरं चरायला नेतो. पण आपल्यावर बापाचं प्रेम नाही ही गोष्ट सतत त्याच्या मनात ठसठसत रहाते.
जंगलात त्याला बौध्द भिख्खू भेटतो. त्याच्यासोबत त्याचं जमतं. तो याला ध्यान शिकवतो. निसर्गातील प्रत्येक लबानसहान आवाज ऐकायला शिकवतो. स्वत:चा आवाज मनात ऐकत.
गाई विकून पैसे मिळवणा-या बापाला हा रोखू शकत नाही. त्या बापाचा मित्रही रोज दारु पिताना समजावत रहातो. त्याला पटत नाही. एकदिवस तो मित्रालाच मारुन टाकतो.
मुलगा हादरतो बापाचं ते रुप पाहून. बाप त्यालाही घरातून जा म्हणून सुनावतो.
मग भिख्खू त्याला मठात आणतो. मठात खरंतर कुणी मूक, बधीर नाही. पण याला प्रवेश देतात.
तिथली मुलं त्याला वेगळं वागवत रहातात. टपल्या मारत रहातात. हा शांत रहातो. जणू शांती म्हणजे काय हे कळल्यासारखं.
एकदा जंगलातून परतताना तो आपल्या मित्राची काळजी घेतो. सगळे त्याचं कौतुक करतात. त्याचं मन तरीही खिन्न रहातं. कधीही न पाहिलेल्या आईला स्वप्नात आठवत रहातं.
शेवटी तो तुरुंगातल्या बापाला फक्त पत्राने एक प्रश्न विचारतो, तुम्ही कधीतरी एक क्षणभर तरी माझ्यावर प्रेम केलं होतं का??
ते पहाताना आपलंही अंत:करण ओलावतं. संपूर्ण सिनेमाभर कुठेही फारसे संवाद नाहीतच. शांत वाजणारी बासरी, चेलो, मेंडोलिन, संतूर आदि वाद्यांच्या पार्श्वभूमीवर कॅमेरा चित्रपटातून हिमाचल प्रदेशातलं सौंदर्य दाखवत रहातो. तिथली शांतता समोर ओतत रहातो.
चित्रपट संपताना बुध्दाच्या मूर्तीवरील अन् त्याच्या चेहे-यावरील ती अथांग शांतता आपल्यालाही चहूबाजूंनी वेढून टाकते. खोलखोल कुठेतरी सर्व काही विसरायला लावते.
चित्रपट संपतो. थिएटर बाहेरच्या कोलाहलात प्रवेश करायला मन मात्र मुळीच तयार होत नाही..!
- सुधांशु नाईक(९८३३२९९७९१)🌿

यंदा कोल्हापुरात हा फिल्म फेस्टिवल फेब्रुवारी २०२० मध्ये होत आहे. त्यासाठी रसिकांनी आवर्जून नाव नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क- दिलीप बापट - ९३७१३७७०७७.

Tuesday 17 December 2019

मखमली स्वरांची देणगी लाभलेल्या रजनीताई


 झुंजणं, झगडणं, परिस्थितीनं पदरात टाकलेल्या दानानं हताश न होता स्वतःचं नवं विश्व घडवून दाखवणं खूप कमी जणांना जमतं. ज्यांना जमतं त्यांच्या अलौकिकत्वामुळे आपण स्तिमित होऊन जातो. अशा काही लोकांपैकीच एक होत्या रजनीताई...
झुंजणं, झगडणं हा तर त्यांचा जणू स्थायीभावच बनलेला. करणार तरी काय? १५ आॅगस्टला जेव्हा भारत स्वतंत्र होत होता तेव्हा कोकणातल्या तुरळ या एका लहानशा गावात ही चार वर्षांची चिमुरडी आजाराशी झुंजत होती. त्या पोलियोनं, त्या तापानं तिला जन्मभर पुरेल असं अधूपण दिलं अन् त्याचबरोबर झुंजत रहायची एक अजोड ताकद.
तेव्हापासून गेली सत्तर वर्षं ती चिमुरडी झुंजत होती..!

रजनी-करकरे देशपांडे. सत्तर वर्षांपूर्वी महानगरातही अपंग व्यक्तींचं जिणं भीषण होतं, तिथं लहान लहान गावांतल्या परिस्थितीबद्दल काय बोलायचं? वाढत्या वयाबरोबर या मुलीनं कायकाय अन् कसं सोसलं असेल याची कल्पनादेखील अंगावर काटा आणते अन् डोळ्यात पाणी.
मात्र एखाद्या जिवलगाला सहज सोबत मिरवावं तसं रजनीताईंनी हे पांगळेपण सोबत मिरवलं. कधीच त्याचा बाऊ केला नाही व त्याचा वापर करत कुणाची दया, करुणाही मिळवली नाही.
स्नेहल स्वभावाच्या रजनीताईंना दैवानं पांगळेपण जरूर दिलं मात्र सोबत तीन महत्वाच्या गोष्टीही दिल्या. कुशाग्र बुध्दी, अतुलनीय धैर्य अन् कंठातला सुंदर कोमल मखमली सूर. केवळ अन् केवळ या तीन गोष्टींच्या जोरावर मग त्या जग जिंकत निघाल्या.
आपल्या अपंगत्वाचा कोणताच बाऊ न करता त्यांनी शिक्षण तर पूर्ण केलंच पण गाण्याचं शास्त्रीय शिक्षणही आत्मसात केलं. पं. नामदेवराव भोईटे, पं. विश्वनाथबुवा पोतदार, पं. सुधाकरबुवा डिग्रजकर नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे या गुरुवर्यांकडून त्यांनी संगीत शिक्षण घेतलं. पुढे संगीतकार दिनकर पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुगम संगीताचाही सूक्ष्म अभ्यास करून स्वतःच गाणं घडवलं.
सुधाकर बुवांचा किस्सा त्यांनी सांगितलेला एकदा.. म्हणाल्या, “गाणं शिकवा असं सांगत मी भेटायला गेले. बुवांनी नंतर ये सांगितलं. कित्येक दिवस मी जात होते. त्यांच्या जुन्या घरी माझ्या कुबड्या वगैरे सांभाळत जायचे. शेवटी जवळपास सहा महिन्यानंतर बुवांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं. ते जणू पाहत होते की ही मुलगी नुसती हौस म्हणून शिकू या म्हणते की ही चिकाटीने गाणं शिकेल..गाणं पेलू शकेल..! मी अपंग आहे यासाठी मला खास सवलत द्या असं मीही कधी म्हटलं नाही आणि बुवांनीही कधी तसं वागवलं नाही.”
आपण कितीही प्रगतीच्या गप्पा मारल्या तरी आजही समाजात अपंग व्यक्तीची कुचेष्टा होतेच किंवा त्यांना उगाच केविलवाण्या दयार्द्र नजरांना सामोरं जावं लागतं. रजनीताई काखेत कुबडी घेऊन या दोन्हीविरुध्द नेहमीच कणखरपणे उभ्या राहिल्या.

आपल्या काॅलेजच्या दिवसांविषयी सांगताना एकदा म्हणालेल्या, " तुम्हाला सांगते सुधांशु, अख्खं काॅलेज, म्हणजे मुलं आणि शिक्षक सगळे घाबरायचे मला. काय बिशाद कुणी वेडंवाकडं वागेल. मी सरसावून तयारच असे. मीच नाही तर अन्य कुणाशीही कुणी वावगं वागलेलं मी कधीच सहन केलं नाही." नेहमी कोमल सूर गाणारा त्यांचा गळा अशावेळी तीव्र सुरांचं कडकडीत सौंदर्यही सहज दाखवून जायचा.
त्यांचा स्वभाव तर एकदम रोखठोक. 'एक घाव दोन तुकडे'वाला. वागण्या-बोलण्यातलं व्यंग त्यांना चटकन् समजतं, अन् मग थेट मुळावरच घाव. " उध्दटासी व्हावे उध्दट" असं आचरण असलं तरी त्यांच्याइतकी माया करणं फारच कमी लोकांना जमतं.
गेली काही वर्षे तर त्या अंथरुणालाच खिळून होत्या. तरीही शेकडो परिचितांचे वाढदिवस वगैरे सगळं त्यांना मुखोद्गत. त्या त्या दिवशी त्या व्यक्तीचं कौतुक होणारच. एकेकाळी आपल्या सुरेख अक्षरात त्यांचं पत्र वेळेवर मिळून जायचं. पत्रात प्रेम, सुरेख अक्षरासोबत एखादं फूल, मस्त लहानशी वेलबुट्टी वगैरे काही चित्रही असायचं. विविध माणसांच्या आवडीनिवडी ही त्यांनी अचूक टिपून ठेवलेल्या. त्यानुसार घरी तो अमकातमका पदार्थ केला की त्या माणसाच्या घरी रजनीताईकडून हमखास डबा पोचणारच. पूर्वी स्वैपाकघरात स्वत: पदर खोचून निगुतीनं सारं करायच्या. प्रत्येक गोष्टीत खरं म्हणजे त्या अति चिकित्सकच. या पदार्थाच्या फोडणीत हिंग हवं म्हणजे हिंगच घालणार तिथं कधीच लसणाची फोडणी असणार नाही इतकं त्यांचं परफेक्शन. अंथरुणाला खिळल्यानंतर ओट्याजवळ उभं राहून करता येईना. मात्र अनिता त्यांच्या सुचनेनुसार जेंव्हा स्वैपाक करायची तेंव्हा कुठला डबा कुठे आणि कुठली गोष्ट किती प्रमाणात घालायाचीये याकडे त्यांचं दूरवरूनही  लक्ष असायचं.
**
खाणं अन् गाणं यावर मनापासून प्रेम. मध्यंतरी  एकदा  अचानक  त्यांच्याकडे  गेलो. त्यांना आणि पीडीना आवडतात म्हणून जाताना  गरमागरम  बटाटेवडे नेलेले. त्या दिवशी काहीतरी बिनसलं होतं त्यांचं... तब्येतीची तक्रार होतीच. वडा आवडतो म्हणून पहिला घास घेतला. तिखट नव्हतं पण त्यांना सोसेना. डोळ्यात पाणीच आलं त्यांच्या.
वैतागून म्हणाल्या, “ सगळं सगळं नकोसं झालंय मला आज. मगाशी तर अनिताला म्हणत होते मी, चल बाहेर पड. पलीकडे रंकाळ्याजवळ घेऊन चल. जीवच देते आता..”


गंमतीनं मी म्हटलं," ताई, अहो, जीव द्यायचाय ना, मग रंकाळा कशाला? किती घाण झालंय तिथे पलीकडे. वास मारतोय हल्ली पाण्याला. तुम्हाला चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी नेतो आम्ही, तिथं हवंतर करा विचार मग जीव द्यायचा. इतकं झकास जगल्यावर मृत्यूही छान असू दे ना...."
क्षणभर विनोदावर हसल्या त्या. म्हणाल्या, “ तुम्ही विनोद करून माझा मूड चेंज करायचा प्रयत्न करताय हे उमगतंय हो. पण नकोसं झालंय खरंच सगळं. मला हिंडायला- फिरायला खूप आवडायचं, ते देवानं बंद करून टाकलं. चमचमीत, तिखट खायला आवडायचं त्यावर बंधनं आली. सततच्या औषधांमुळे तोंड आलेलं असतंय. गाणं म्हणजे तर जीव की प्राण. मात्र आता गातानाही दम लागतो. हे असं आडव पडून पडून ताकदच गेली माझी. मगाशी शिकायला आलेल्या काहीजणी. “ सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू...” ही ओळ म्हणतानाही खूप दमले मी. शेकडो वेळा म्हटलं असेल हे गाणं. आता गाताही येईना हो नीट. कसं जगू हो आता सुरांशिवाय.. ?
पण मग मुक्तपणे रडत राहिल्या काही वेळ. आम्ही शांतपणे त्यांना मोकळं होऊ देत राहिलो.... काय करणार होतो आम्ही?
***
त्यांनी आपल्या आयुष्यात मात्र इतरांच्या अडचणींवेळी नेहमीच धावून जात मदत केली. त्या व त्यांची मैत्रीण नसीमादीदी हुरजूक यांनी " अपंगांच्या मदतीसाठी व स्वावलंबी बनण्यासाठी असलेल्या संस्थेचं" स्वप्न पाहिलं. एकेकाळी अपंगत्वाचा घाला बसल्यावर रजनीताईनी नसीमादीदीना मानसिक बळ दिलं. पुढे त्या दोघींनी मिळून अनंत अडचणींवर मात करत " हेल्पर्स आॅफ दि हॅन्डिकॅप्ड" या संस्थेची उभारणी केली. त्या संस्थेचा आज वटवृक्ष झालाय. संस्थेच्या माध्यमातून अनेकांना नाजूक क्षणी मदत मिळत गेली व स्वत:चं अपंगत्व जमिनीत गाडून अनेक गुणवंत आज समाजात धीराने काम करु लागले.
संस्था उभी करण्यासाठी रजनीताई आपलं अपंगत्व सोबत घेऊन भारतभर हिंडल्या. शब्दशः हजारो मैफिली केल्या. आपल्याला मिळालेल्या सुरेल स्वराचे बळ वापरून त्यांनी लाखो रुपये जमवले संस्थेसाठी. त्यातही कुठे मिरवायचा हट्ट नसायचा. कुठल्याही स्पेशल ट्रीटमेंटची त्यांनी कधीही अपेक्षा केली नाही.  सगळ्या कामात रजनीताईंना कधीही कौतुकानं मिरवताना आम्ही पाहिलं नाही. आज किरकोळ कामं करुन पदव्या-पुरस्कार पदरात पाडून घेणारी मंडळी पाहिली की हे मोठेपण अधिकच भव्य वाटू लागतं. गायिका रजनी करकरे-देशपांडे व समाजसेविका रजनीताई या दोन्ही आघाड्यांवर त्या नेहमीच डौलानं कार्यरत राहिल्या. अनेकांना स्फूर्ती देत राहिल्या.

त्यांचं सर्वात मोलाचं काम कुठलं असेल तर अपंगाची लग्न जुळवणं. अपंगत्वाचे शेकडो प्रकार आहेत. मात्र याचा अर्थ असा नव्हे की त्यांचं सहजीवन असूच नये. दैवजात मिळालेलं एकटेपण भोगणं ही फार कठीण व वेदनादायी गोष्ट असते याचा प्रखर अनुभव असलेल्या रजनीताईंनी अनेक अपंगांचे, संस्थेच्या कार्यकर्त्यांचे संसार उभे करुन दिले. त्यापूर्वी त्यांना स्पष्ट व अत्यावश्यक सर्व समजावून देत उत्तम समुपदेशन केलं. त्याचं ऋण विसरणं अशक्यच.
तीच त-हा गाण्याची. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडवताना त्यांच्याकडून कठोर मेहनत करुन घेतली त्यांनी. सर्वपरिचित कोसंबी बंधूंसारख्या अनेकांना त्यांनी केलेलं मार्गदर्शन भविष्यातील वाटचालीसाठी बळ देणारंच होतं.

इतरांचं सहजीवन फुलवणा-या, सुरांत रमलेल्या रजनीताईंचं भाग्य तरीही थोर म्हणायला हवं म्हणून पी. डी. देशपांडेंसारखा पती त्यांना लाभला. वयानं १६-१७ वर्षं लहान पीडींना लग्न करताना प्रखर विरोध सहन करावा लागला पण शेवटी प्रेम जिंकलं. संगीत, साहित्य, समाजकार्य अशा तिन्हीत रमणारा साथीदार व मित्रवर्ग यासह त्यांच्या सहजीवनाचे दिवस फार आनंदाचे होते ! त्यांचं सहजीवन हे अनेकांसाठी आदर्शवत असं होतं.
म्हणतात ना, काव्यशास्त्र विनोदेन कालौं गच्छति धीमताम.. तसं त्यांच्या सहजीवनात समानधर्मी मित्रांची साथ मिळाली आणि संगीत, साहित्य, समाजकार्य यांच्या साथीनं वाटचाल होत राहिली. म्हणूनच दिवस नव्हे तर सहजीवनाची ३२ वर्ष कशी गेली हे कळलंच नाही.

आता दिवस सरत नाही हे हल्ली हल्ली त्यांना जाणवू लागलं अंथरुणाला खिळल्यावर. तरीही काहीतरी करायची उर्मी असायचीय.
**

२०१७ च्या जानेवारीतलीच गोष्ट. माझी आई व सासरे कॅन्सरमुळे मृत्यूशय्येला खिळलेले. पहिलं कोण जाणार अशी जणू शर्यतच होती घरात. आमची प्रचंड धावपळ सुरु होती व अचानक संध्याकाळी पीडींना घेऊन रजनीताई दत्त म्हणून दारात उभ्या.
थक्क होऊन मी पीडींना म्हटलं, " अहो, त्यांची तब्येत बरी नाही, कशाला त्रास देत घेऊन आला त्यांना?"
ताडकन् रजनीताई म्हणाल्या, " त्यांनी मला नव्हे, मी आणलंय त्यांना. आज सकाळी उठल्यावर ठरवलेलं आज तुमच्याकडे जाऊन यायचंच. इथं तुमच्यावर पहाडाएवढं संकट अन् मी घरात कशी बसून राहून हो?"

मग सर्वांशी गप्पा मारत बसल्या. त्यांनी काहीतरी गाऊन दाखवावं अशी इच्छा व्यक्त केली दोघांनीही. मग आईला आणि सास-यांना आवडणारं गाणं कुठलं ते विचारलं. मग ती गाणी सुरु झाली... मृत्युशय्येवर निजलेल्या त्या दोन जीवांना सुखाचे सुरेल चार क्षण द्यायला  जीव ओतून गात राहिल्या. गळा साथ देत नव्हता, दम लागत होता.. तरी त्या गात होत्या. हे पाहून आमच्या सर्वांचे डोळे डबडबले. त्यानाही भरून आलं..
डोळे टिपत म्हणाल्या, “ तुम्हाला मी काय देणार हो. तुम्ही काहीतरी मागितलं ते देऊ शकले याचा आनंद होतोय. फार बर वाटलं.”
त्यानंतर दहा दिवसांच्या आत दोघेही गेलेच. सहा-आठ महिन्याची जीवघेणी झुंज अखेर शांत झाली. पण त्या सर्व दिवसात जवळपास रोज रजनीताई फोनवरुन चौकशी करत होत्या. कुणाबरोबर तरी सूप, सार असं काहीबाही करुन पाठवत होत्या..! त्यांच्या अंथरुणावर त्या तिथे दूर असूनही त्यांचं सदैव आमच्यावर लक्ष होतं. हे असं त्यांनी बहुतेक सर्व परिचितांसाठी केलंच आहे.
त्यांना भटकंती खूप प्रिय. नातेवाईकांसोबत, संस्थेतील सहकार्यांसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत त्यांनी उदंड प्रवास केला. कधी मैफिलींच्या निमित्ताने तर कधी खास टूरला जायचं म्हणून. प्रत्येक प्रवासाची आखणी करताना त्यातही ताई आघाडीवर. कुठे जायचं, काय करायचं, काय पाहायचं, काय खरेदी करायचं यासाठी त्यांचं सगळं नियोजन पक्कं असायचं. वेळेच्या बाबतीतही तितकंच काटेकोर वागणं. त्यामुळेच मृत्यूची वेळ ही चुकतेय अशी आशा आम्हाला वाटत असताना त्यांनी मात्र मृत्यूलाही फार ताटकळत ठेवलं नाही. तब्बल महिन्याभराची त्यांची तगमग आम्हालाच पाहवत नव्हती.

१५ ऑगस्ट हा दिवस त्यांच्यासाठी जणू खलनायकच ठरलेला. एकेकाळी १५ ऑगस्ट ला त्यांना अपंगत्व आलं. ती आठवण कायमची पुसून टाकायची या हेतूने पीडीनी मुद्दाम १५ ऑगस्टलाच लग्न केले. यापुढे लग्नाचा वाढदिवस म्हणून तो दिवस आनंदात घालवायचा म्हणून.. १५ ऑगस्ट २०१७  या दिवसानं मात्र पुन्हा धक्का दिला...! खरतर एक दिवस आधी, 14 ऑगस्टला त्यांना आता खूप बरं वाटतंय म्हणून हॉस्पिटलमधून घरी सोडलेलं. संध्याकाळी मी केक घेऊन गेलो त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला. खूप मस्त नेहमीच्या सुरात त्या छान गप्पा मारत बसल्या होत्या. जीवावरचं संकट टळल याचा आम्हालाही आनंद होता. मात्र तो आनंद क्षणभंगुर ठरला. दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांना खूप त्रास झाला आणि त्या बेशुध्द पडल्या. पुढचे १५ दिवस मग जीवन-मृत्युच्या सीमारेषेवरच राहिल्या. सदैव सुरेल गात-बोलत राहणाऱ्या त्या एकही शब्द बोलू शकत नाहीत हे पाहणं आमच्यासाठीही जीवघेणं ठरलं.
शेवटी सगळं संपलंच.

एकेकाळी रेडिओ-स्टार, प्रति-आशा अशा उपमांनी गौरवल्या गेलेल्या रजनीताई आयुष्यभर सुरेल-सुगंधी जगल्या. शेकडो लोकांना माया लावून गेल्या. शारीरिक-मानसिक-आर्थिक किंवा अन्य कोणताही अपंगत्व तुमच्या प्रगतीच्या आड येऊ शकत नाही याचं खणखणीत उदाहरण बनून गेल्या..! आजही अचानक कुठूनतरी जीवलगा राहिले रे दूर घर माझे... कानी ऐकू येतं, आणि पाणावल्या डोळ्यासमोर आशाताईंच्या ऐवजी रजनीताई दिसू लागतात. त्यांचा प्रेमळ मखमली स्वर आठवतो... मग पुढचं सगळं सगळं धूसर धूसर होऊन जातं...!!
-    सुधांशु नाईक, कोल्हापूर. (९८३३२९९७९१)


*****

Saturday 7 December 2019

एक होती आजी...


माझ्या लहानपणाच्या आठवणीतच एक चिमुकलं खेडेगाव आहे. आजूबाजूच्या विस्तीर्ण शेताच्या मध्यावर तिथे मातीचं एक घर. बाजूला लालबुंद फुललेला गुलमोहर अन समोर चिंचेचे गर्द सावली देणारं एक भलं थोरलं झाड. झाडाच्या पायाशी एक बैलजोडी बांधलेली, कुणी एखादं गडीमाणूस काही बाही काम करत तिथेच... अन त्या घराच्या कट्ट्यावर त्या चिंचेसारखीच मायेची गर्द सावली अशी बसलेली माझी आजी ....
आम्हाला दुरून येताना पाहूनच ती आनंदाने हरखून जायची. तिच्या पायाशीच बसलेला ‘खंड्या’ शेपटी हालवत आमच्याकडे येईपर्यंत ती आत जाऊन चुलीवर चहाच आधण ठेवायची. ‘आलात, बाबानो या.. रे... या.. हात-पाय धुवून घ्या, मागनं तुम्हाला चहा देते.’
तिच्या त्या मायभरल्या शब्दांनी सगळा शीण पळून जायचा. चहाबरोबरच एखादा चुरमुऱ्याचा किंवा मुगाचा लाडू हातावर मिळायचा...
बालपण ही मोठी मौजेची गोष्ट आहे नं ! लहान असताना आपल्याला लवकर मोठ होण्याची घाई झालेली असते अन मोठेपणी मात्र बालपणातल्या अनेक आठवणी मनात पिंगा घालत असतात, अस्वस्थ करतात तर कधी हेलावून सोडतात...


( हे प्रतीकात्मक क्षणचित्र इंटरनेटवर मिळालेलं) 
पूर्वी मुंबई इलाख्यात असलेलं पण नंतर कर्नाटकात गेलेल्या चिकोडीजवळचं हे चिंचणी गाव. इथे कधी काळी आमची शेतजमीन होती. काका चिकोडीत राहत असूनही आजी मात्र बहुतेक वेळा शेतात आजोबांच्या माघारीसुद्धा एकटी राहायची. किंबहुना ती तिचीच आवड होती.
मुळचा गोरापान रंग, वयानुसार पडलेलं सुरकुत्यांच जाळ अन अत्यंत प्रेमळ भाषा... आजीकडे कुणीही चटकन आकर्षित व्हायचंच.. चिपळूणला ती आली कि इथल्या सगळ्या बाळगोपाळांचा तिच्याभोवती गराडा असायचा पण इथे राहिली तरी तिचं मन कायम शेतात, गडीमाणसात, प्राण्यांच्यात गुंतलेलं असायचं. कुत्रामांजर, गाई-गुरं अशी सगळ्या प्राण्यांबद्दलची तिची आवडच बहुधा आमच्यात उतरलीय.
आजीचं संपूर्ण आयुष्यच तसं हलाखीत गेलं. खर तर तिचं माहेर श्रीमंत होतं. सगळीकडे सुबत्ता होती... पण सासरी आल्यावर सगळ दारिद्रही तिनं सोसलं. त्यात आजोबा म्हणजे जमदग्नीचा अवतार पण तिनं कुठेही कुरकुर केली नाही. त्याच्या संतापल्याच्या गोष्टीही ती नंतर आम्हा मुलांना हसत हसत सांगायची. सणासुदीलाही कित्येकवेळा घरात काही खायला नसायचं पण तिनं कधीच कुणापुढे पदर पसरला नाही... अन मुलांवरही असे संस्कार केले कि उपाशीपोटी सुद्धा ती अशी राहायची... जणू आत्ताच जेवून आली आहेत...
माझे मोठे काका नोकरीसाठी रंगून, काठमांडू, पोखरा, रांची, ग्वाल्हेर असे कुठेकुठे पोटासाठी भटकत होते तर दुसरे काका शेताकडे बघत गावात राहिले. आजोबांच्या माघारी आजीशेतातल्या घरात एकटीच राहिली. सगळं काहीमन घट्ट करून सोसत राहिली.
रिटायर्ड झाल्यावर मोठे काका देखील शेतातल्या घरात येऊन राहिले... घरात थोडीफार दुरुस्ती केली पण आजीला सुख नाहीच मिळालं. काकूकडून तर काही आरोप झाल्यावर ती खूपच दुखावली गेली. शिक्षणाला बाहेर पडलेले बाबा नंतर नोकरीसाठी सुद्धा बाहेरच राहिले त्यामुळे खरतर तिचा बाबांकडे ओढा कमीच...त्यामुळे आमच्याकडे अधेमध्ये आली तरी ती काही दिवसांपुरतीच राहत असे. 
पण १९८९-९० मध्ये मधल्या काकांच्या मृत्यूनंतर हट्टाने बाबा मग तिला चिपळूणला आमच्या घरी घेऊन आले... मग ती इथेही रुळली.
खरतर येताना ती एखाद्या निर्वासितासारखीच आली होती... गावाच्या घरच्या अनुभवांचे चटके सोसून शहाणी झाली होती... परक्यासारखीच रहायची सुरुवातीला. पण इथे मात्र तिचे आडाखे चुकले, आईने प्रेमाने तिची खूप सेवा केली अन ती पुन्हा खुशीत आली... मग घरच्या- दारच्या सर्वांवर अपार माया केली तिने.
माझ्यावर  तर तिचा जास्त जीव होता. कॉलेज संपल्यावर अवघ्या १८व्या वर्षी मी चिपळूण जवळ परशुराम लोट्यातील एका कंपनीत सर्व्हिसला लागलो... कधी दिवसाचे १६-१८ तास सुद्धा काम करावे लागे. मग आजीचा जीव कळवळायचा. ‘हिंडण्याफिरण्याचे वय हे... पोराला किती दगदग होते....’ असं सारखं म्हणायची... मी रात्री आल्यावर माझ्यासाठी गादी घालून ठेवायची... खरतर मी तिची गादी घालून द्यायची... पण मग म्हणायची, ‘ इथं घरात काय काम आहे? नुसतं बसून खातेय ना... जरा हालचाल हवी कि शरीराला.’
रात्री झोपल्यावर तिने चेहऱ्यावरून हात फिरवला नाही असं कधीच झालं नाही... सुरुवातीला आल्यावर गप्प गप्प राहणारी, विचारात हरवलेली आजी नंतर मात्र गाणी वगैरे म्हणायची. कितीतरी मराठी, कानडी गीत, अभंग तिला पाठ होते. देवाचे अभंग जरी ती म्हणायची तरी देवाचं नाव मात्र घ्यायची नाही... ‘काय माझ असं चांगलं केलंय देवाने म्हणून मी नाव घेऊ?’ असंच म्हणायची.
पण तिचा देव हा माणसांच्यात होता. स्वतः पुरेपूर दारिद्र्य भोगल्यामुळे गरीब, अडल्यानडल्या माणसांबद्दल तिला खूप कळवळा होता. स्वतःच्या ताटातली अर्धी भाकरीसुद्धा वाटून टाकण्याएवढी उदार वृत्ती होती अन कित्येकवेळा स्वतःचा घास तिने दुसऱ्याला दिलाही होता.
मला पहिला पगार मिळाल्यावर मी तिच्या हातावर त्यातले १००/- रुपये ठेवल्यावर तिचे डोळे पाणावले. ‘अरे तुझा काका एवढा म्हातारा झाला, पण कधी मला ५/- रुपये द्यावे असे त्याला वाटले नाही रे!’ असं थरथरत्या आवाजात बोलली... मला जवळ घेऊन म्हणाली, ‘हे ठेव रे तुझ्याकडे लागले तर मागून घेईन... असाच मोठा हो.’
तिला पैशाची हाव कधीच नव्हती पण कायम दारिद्र्यात राहिल्यामुळे पैशाचं आकर्षणही होतं... तिला पैसे लागायचे कशाला? तर कुणा गरिबाला देण्यासाठी... दारावर आलेल्या भिकाऱ्यालाही पटकन काहीतरी देऊन टाकायची. घरात आलेल्या कुणालाही काही देऊन टाकायची. घरात आलेल्या प्रत्येकाला  खायला घालावं असं कायम वाटायचं तिला. पण तिच्या याचं इच्छेमुळे एकदा काकूने तिला वाईट-साईट शब्दात बोलल्यामुळे तिची कुचंबणा व्हायची. एखाद्याची ओढग्रस्त अवस्था तिला कधीच बघवत नसे. ‘पैसा  काय रे आज आहे उद्या नाही, माणूस उपाशी रहायला नको’ असं म्हणायची. 

कुत्र्या मांजरावर पण तिचा खूप जीव. पूर्वी तर शेतात ‘खंड्या’ नावाचा कुत्रा होता. कायम तिच्याभोवती असायचा. जन्माचं दारिद्य्र, त्यात रूपाचं दान देवानं भरभरून दिलेलं पण एकटे राहतानासुद्धा तिला कधीच कसली भीती वाटली नाही... शहरात राहणारी माणसदेखील रात्री घराबाहेर पडायला घाबरतात पण त्या अंधारलेल्या खेडेगावात एक कंदील हाताशी घेऊन आजी बिनधास्त जगायची. कामसूपणा तर विचारायलाच नको. वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा एखादं छोट काम समोर आल्यावर ‘आता नको, नंतर करू’ असं ती कधीच म्हणाली नाही. सगळ कस झटपट! तिच्या हातालाही एक वेगळीच चव होती. शेतातल्या घरात हाताशी काही नसताना तिनं बनवलेली साध्या तिखटमिठाची आमटी-भाकरीसुद्धा तृप्त करून जात असे. 
शेवटपर्यत ती ठणठणीत राहिली. दिवाळीला पहिला बोनस मिळाल्यावर मी तिच्यासाठी एक साधी, छानसी साडी आणली होती. कितीजणांना तिने ती कौतुकाने दाखवली पण तिने ती साडी नेसावी असं नियतीच्या मनात नव्हतं. ती साडी तिच्या प्रेतालाच नेसवावी लागली शेवटी !!
सकाळी तेल लावून डोक्याला तिच्याकडून मसाज करवून घ्यायला मला आवडायचं. ती डोकं चोळत असतानाच कशी झोप येऊ लागायची. दिवाळीतही त्या दिवशी मला मस्त तेल लावून मसाज केला, आईलाही न्हायला घातलं... अन दुपारची जेवण उरकल्यावर तिला अॅटॅक आला. मेंदूतील यंत्रणा निकामी होऊन एक बाजू लुळी पडली, वाचा गेली... अन पुढचे आठ दिवस नुसती तिची तडफड होत होती. मुळात तिला दुसऱ्यांनी तिचं काही केलेलं आवडत नसे. ती नापसंती डोळ्यात दिसायची. त्या चार-पाच दिवसात आमची पण खूप धावपळ झाली... एक दिवस तिच्या बाजूला बसलो होतो.. थंडी होतीच.. अन माझा अंगावरचा टॉवेल खाली घसरला. तो परत खांद्यावर ठेवायला ती धडपडू लागली. एका हाताने स्वतः मृत्यूच्या दारात असतानाही दुसऱ्याची काळजी करणाऱ्या तिला पाहून भडभडून आलं...
पण ती गेली... खरंतर  आठच दिवसाची ती तडफड पाहताना तिने लवकर जावं असंच वाटत होतं. त्यानंतर गेल्या कित्येक वर्षात मग दिवाळीला काही अर्थच नाही उरला. घराघरातून फराळाचे पदार्थ, आकाश कंदील, फटाके, वगैरे सुरु झालं कि मला तडफडणारी आजी आठवते... मग दिवाळीतल्या सगळ्या मौजमजेकडे पाठ फिरवून मी डोंगरदऱ्यातून भटकत बसतो... पिसाटासारखा...!!!
-    सुधांशु नाईक, कोल्हापूर ९८३३२९९७९१
-    ( पूर्व प्रसिद्धी दै. सागर, चिपळूण)