marathi blog vishwa

Monday 12 November 2012

दीपावली

दीपावली

दिव्यांची आरास ..उटण्याचा सुगंध
चिमुकल्यांच्या डोळ्यात आनंदाच्या फुलबाज्या...

देखणं फराळाचं ताट ..दरवळला अत्तराचा घमघमाट
शेवंतीची नाजूक फुले.. झाला लक्ष्मीपूजनाचा थाट ...

जेवताना पानात आग्रहाची पोळी
पाडव्याची भेट बनते सोन्याची दिवाळी ...

सासरी असूनही मनात माहेर..
भावाची आठवण... आणि डोळ्यात मोत्यांच्या ओळी.-                                                                                                           --सुधांशु नाईक , बहारिन १२/११/१२

Wednesday 26 September 2012

मन



मन गंभीर, मन उदास
मन एकाकी ... गहिवरलेले..

मन हसरे , मन नाचरे
मन गहिरे ... आसुसलेले..

मन कठीण, मन वाईट
मन ओंगळ ... बरबटलेले..

मन चंचल, मन अस्थिर
मन वासरू ... भरकटलेले..

मन तृप्त, मन शांत
मन आत्मरंगी ..रंगलेले..

---सुधांशु , बहरीन - २६ /०९ /१२

Friday 14 September 2012

सुंदर

 
देवा तुझे होते सुंदर आकाश
 
आम्ही काळवंडली I त्याची निळाई II
 
सुंदर होती झाडे आणि सुंदर फुले
 
आम्ही तोडीयली I लोभापायी I 
 
सुंदर तलाव सुंदर ती नदी
 
आम्ही नासवली I स्वार्थापायी II
 
सुंदर ती माती सुंदर ती नाती
 
आम्ही हरवली I पैशापायी II
 
असुंदर सारे कराया सुंदर
 
चालू नवी वाट  I सुधा म्हणे.. II
                                 --- सुधांशु नाईक , बहरीन.  १४ /०९ /२०१२

Thursday 28 June 2012

---विठ्ठल विठ्ठल...

मनी विठ्ठल I जनी विठ्ठल I
ध्यानी विठ्ठल I डोलतो II

ओठात विठ्ठल I पोटात विठ्ठल I
कानात विठ्ठल I गुणगुणतो II

रंग विठ्ठल I रूप विठ्ठल I
गंध विठ्ठल I परीमळतो II

ताल विठ्ठल I बोल विठ्ठल I
नाद विठ्ठल I दुमदुमतो II

भुई विठ्ठल I नभ विठ्ठल I
वारा विठ्ठल I झुळझुळतो II

सुख विठ्ठल I दु:ख विठ्ठल I

जीवन विठ्ठल I सुधा म्हणे II

-------------- सुधांशु नाईक, बहारीन - २८ जून २०१२.


Wednesday 16 May 2012

वारा विसरला गारवा .. अन उरात पेटला वणवा..

विहिरी शोधताहेत पाणी.. आणि प्राणी शोधताहेत चारा..

दुष्काळाचा काटा मात्र...भुईत खोलवर गेलेला....

उपाशी पोटे आणि ओढलेले चेहेरे

पोट तुडुंब भरलेल्यांची ...तिथे उगाच झाली गर्दी..

मनात दुष्काळ गावात दुष्काळ...

पुन्हा काळ्या ढगांनी कधी भरून येईल आभाळ??

...सुधांशु नाईक --१६/५/१२

Tuesday 1 May 2012

दिवस गेला पुन्हा आली मंद पाऊली सांज गं..
सखा येईल आता म्हणुनी मनात उमलते जाई गं..

सांज होती खुळवणारी जाई उधळी अत्तर गं..
चमचमणारा चंद्र होई आकाशीचे झुंबर गं..

सांज गेली रात आली अवघी आशा सरली गं..
मनातली जाई माझ्या उदास एकटी मिटली गं..

दिवस येईल पुन्हा एकदा स्वप्ने घेऊन हळवी गं..
एका डोळ्यामध्ये आसू दुसऱ्यामध्ये हासू गं..

---सुधांशु नाईक ..१/५/१२.

Thursday 15 March 2012

कशाला हवीत असली स्मारके?

गेले २ दिवस मुंबई च्या जवळ समुद्रात नवे बेट तयार करून शिवस्मारक निर्माण  करायचा मुद्दा गाजतोय..काय गरज आहे अशा स्मारकाची आणि खोट्या कळवळ्याची? आहेत ते किल्ले दुर्लक्षित, आणि समुद्रात ३-४०० कोटी खर्चू म्हणे सरकार भव्य स्मारक बांधणार..आपले शिवप्रेम दाखवण्यासाठी..!! आजकाल शिवाजी महाराजांचे नाव हे राजकारण्यांसाठी आपली पोळी भाजून घेण्याचे उत्तम साधन बनले आहे. गल्लोगल्ली शिवरायांचे पुतळे आहेत, राज्यभर त्यांच्या नावाचे रस्ते आहेत पण खरे शिवबा मात्र लोकांच्या मनात आहेत...आणि नेत्यांच्या खिशात..!!
 कित्येक किल्ल्यांच्या परिसरातील जमिनी "पावरबाज" नेत्यांच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मालकीच्या झालेल्या आहेत, एवढेच नव्हे तर गोपाळगड, यशवंत गड आदि काही किल्ले चक्क लोकांनी आपली property बनवले आहेत आणि राजांचे शेकडो किल्ले अत्यंत दुरावस्थेत आहेत, अशा वेळी प्रत्येक किल्ला - जिथे अनेक शूर मराठी लोकांनी आपले रक्त सांडून जपला त्या किल्ल्यांचे जतन करणे जास्त आवश्यक आहे कि अशी तथाकथित स्मारके उभारून खोटे प्रेम दाखवणे ? अगदी प्रत्येक किल्ल्यासाठी १ करोड जरी खर्च केले तरी ते समुद्राच्या पाण्यात किंवा राजकारण्यांच्या खिशात जाणारे ३०० कोटी रुपये खऱ्या अर्थाने कामी येऊ शकतात. प्रत्येक किल्ला नीट जतन झाला तर तेथे पर्यटन विकसित होईल, प्रत्यक्ष सामान्य रयतेला काही छोट्या व्यवसायातून आर्थिक उत्पन्न मिळवता येईल. त्या गावातील लोक स्वावलंबी होऊ शकतील आणि याच बरोबर आपला इतिहास पुन्हा मनामनात जागवला जाईल ..पण अशी सुबुद्धी आपल्या मंत्र्यांना का होत नाही? कारण यातून त्यांना उत्पन्न मिळत नाही ना..हेच खरे कटू सत्य आहे..!!



अगदी समुद्रातच स्मारक करायचे होते, तेही मुंबई जवळ तर मग ते खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग अशा शिवरायांच्या कर्तृत्वाशी निगडीत किल्ल्यांवर का करता येत नाही सरकारला ? त्यासाठी नवा खर्च हवाच कशाला? की फक्त पुन्हा लोकांमध्ये मतभेद निर्माण करून खरे प्रश्न बाजूला थायाचे आहेत? स्मारकासाठी खरे तर खांदेरी हा जलदुर्ग सर्वोत्तम. मुंबई पासून स्पीड बोटीने तासभर अंतरावरच तर आहे..माय नाईक भंडारी यांनी अवघ्या ४ तोफा व १५० माणसांना सोबत घेऊन इंग्रजांचे बलाढ्य नौदल व सिद्धीचे क्रूर शिपाई यांचा प्रतिकार करत हा जलदुर्ग असा काही उभा केला की इंग्रजानाही आपला पराभव लंडन ला कळवावा लागला..आपल्या आयुष्याच्या अखेरीच्या दिवसात शिवरायांनी यासाठी जे काटेकोर नियोजन केले, धावपळ केली त्यामुळे या जलदुर्गावर त्यांचे स्मारक होणे ही खरी आदरांजली ठरली असती..! पण आज ह्या खांदेरी ला जायचे तर आपले सरकार परवानगी सुद्धा वेळेवर देत नाही..कोणत्याही शिवप्रेमी मराठी माणसाला इथे पटकन जाताच येत नाही..असे आपल्या सरकारचे खरे शिवप्रेम..!!

आज अनेक गिर्यारोहक संस्था, काही स्थानिक गावकरी प्रसंगी पदरमोड करून कित्येक किल्ल्यांचे जतन करायचा लहानमोठा प्रयत्न करत आहेत त्यांना जरी सरकारने बळ दिले तरी शिवरायांची अनेक खरी खुरी स्मारके देशभर उभी राहतील...एकट्या रायगडावरील वास्तू जरी सरकारने जशाच्या तशा उभ्या करून दाखवल्या तरी तेही जगविख्यात स्मारक बनू शकते..हवे तर महाराष्ट्रातील अनेक मोठे वास्तुरचनाकार त्यासाठी स्वतःहून मदतही करतील पण गरज आहे अशा खऱ्या निष्ठेची..ज्यामुळे जुने बांधकाम गडकोट जतन होतील आणि आपणही पुढच्या पिढीला ते दाखवू शकू.!

म्हणूनच प्रत्येक शिवभक्ताने सरकारच्या ह्या मुंबई समोरील तकलादू प्रकल्पाला खणखणीत विरोध करायला हवा...महाराष्ट्रातील लोक मूर्ख नाहीत आणि अजूनही त्यांच्या मनगटातील जोर पैशाच्या बळावर विकत घेता येत नाही हे एकदा ह्या सर्व राजकारण्यांना दाखवण्याची आता खरच गरज आहे असे मला वाटते..तुम्हालाही वाटत असेल तर चला शक्य त्या सर्व मार्गांनी सरकारला योग्य ते करण्यासाठी प्रवृत्त करू या..!! गडकोटांच्या जतनासाठी सरकार वर दबाव टाकूया..!
-- सुधांशू नाईक, कल्याण (०९८३३२९९७९१ /०९९३०९४४९७०)
ई-मेल - nsudha19@gmail.com

Tuesday 3 January 2012

जुन्या वर्षाला निरोप..रायगडावरून..!

जवळपास रोजच विचार करायचो की रायगड ला जायला हवे..पण काही ना काही कारणे आडवी येत होती..गेल्या वर्षात इतर अनेक दुर्गांच्या भेटी झाल्या पण रायगड आपला दूर दूरच..!! शेवटी तडकाफडकी ठरवले आणि वर्ष अखेर रायगडावरच करायची ठरवून ३० डिसेम्बर ला रायगडवर डेरेदाखल झालो.."अगदी निश्चित येणार.." असे सांगणारे सोबती ऐनवेळी गाळले आणि मी, बायको व आमच्या छोट्या दोन कन्या तेव्हढ्या सोबत आल्या..पण रायगडावर पोचलो की खरच मला कुणा मित्राची कमतरता जाणवत नाही.अगदी तसेच झाले..

वर पोचलो तो रायगड जणू माणसांनी गजबजला होता..शाळांच्या अनेक सहली आलेल्या..त्या चिमुकल्या डोळ्यातून इतिहासाचा वेध घेतला जात होता.."इथे शिवाजी महाराज बसायचे..इथूनच ते लढाईची योजना आखायचे.." अशा कल्पनांनी त्या चिमुकल्या मनांना भारावून टाकले होते..काही इतिहासप्रेमी, जातिवंत गड-भटके, rope way  सुरु झाल्यामुळे येऊ शकलेले काही वृद्ध अशीही मंडळी होतीच..!
कित्येक जण म्हणतात की आता रायगडावर बाजार झालाय माणसांचा...! पण मला नाही तितकेसे पटत..उलट असे वाटते की जास्तीत जास्त लोकांनी गडावर यावे..गड नीट निरखून पाहावा..इथले अनेक अवशेष पाहावेत..गड बांधकामाची वैशिष्ट्ये पहावीत..मनाने  त्या काळात जावे..विचार करावा की अतिशय  प्रतिकूल परिस्थिती असूनही त्या थोर राजाने आपले जीवन कसे दैदिप्यमान करून दाखवले..उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचा अपूर्व नमुना पेश केला..!! मात्र या सगळ्या लोकांना थोडी शिस्त लावणे आपल्या हातात आहेच ना..आपण तिथे कमी पडतो म्हणून "बाजार झाल्यासारखा" वाटतो.. आज शिवप्रेमाने भरलेले अनेक ग्रुप हे काम निश्चित करू शकतील...

राजांच्या काळी सुद्धा गडावर हजारो माणसांचा राबता होता..पण केवढी शिस्त होती...कुणी कधी यायचे, कुणी कुठे राहायचे, कुणी कोणत्या बुरुजावर पहारा करायचा हे सगळे कठोरपणे अंमलात आणले जाई. गडावरील पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, पावसाचे जास्तीचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था, अठरा कारखान्यांचे कामकाम..असे किती आणि कायकाय इथे नेटकेपणाने होत असे..!! कुणाची काय बिशाद होती नियमभंग करायची..ते गरुडासारखे भेदक डोळे सगळीकडे पाहत होते ना..!!
यावरून एक अजून सांगावेसे वाटते..

आपण जेंव्हा गडावर जातो तेंव्हा फक्त शिवाजी महाराजांचाच विचार करतो हे किती चुकीचे आहे ना?? १६८० मध्ये शिव छत्रपती गेल्यानंतर १८१८ च्या त्या मे महिन्यात रायगड इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत या गडावर जे काही घडले ते का आठवत नाही आपण??

हाच तो रायगड जिथे शंभूराजांच्या विरोधात कारस्थाने झाली..पहिल्या वेळी त्यांनी सर्वाना माफ ही केले..पण दुसऱ्या वेळी मात्र त्यांचे उग्र रूप आणि कठोर शासन याच गडाने पहिले..१६८१ मध्ये औरंगझेब स्वराज्यावर चालून आल्यावर याच शंभूराजांनी त्या आलमगीराला  जी प्रखर झुंज दिली त्याचे नियोजन येथूनच झाले असेल ना..?
१६८९ मध्ये शम्भूराजाना क्रूरपणे संपवले तेंव्हा याच रायगडावरून महाराणी येसूबाई यांना कैद करून नेण्यात आले..त्यापूर्वी याच गडाच्या वाघ दरवाज्यातून कड्यावरील अवघड वाटेने त्यांनी भावी राजे म्हणून राजाराम महाराज व ताराराणी यांना जिंजीकडे पाठवले नसते तर कदाचित इतिहास वेगळाच झाला असता..!! तो वाघ दरवाजा इथल्या गडयात्रेत पाहायलाच हवा ना..!!

त्यानंतर १७३४ पर्यंत मोगल व नंतर सिद्दी यांच्याकडे रायगडचा ताबा होता..त्या काळात इथे काय काय झाले असेल त्याच्या आठवणीने इतिहास ही जणू मूक झाला आहे..!! पुन्हा पहिल्या बाजीरावाच्या काळात आणि सातारच्या पहिल्या शाहू राजांच्या तीव्र इच्छेमुळे रायगड मराठ्यांकडे आला तो १८१८ पर्यंत..या काळात रायगडची कशी देखभाल होत होती याची नेटकी वर्णने पेशव्यांनी कागदपत्रात लिहिली म्हणून आपल्याला त्याकाळची थोडी तरी कल्पना येते..मात्र १८१८ मध्ये शिवरायांचा तीव्र दुस्वास करणाऱ्या इंग्रजांनी रायगड जिंकूनच मग भारतावर पूर्ण कब्जा केला..असे म्हणतात की रायगड तेंव्हा ६ महिने जळत होता..राजवाडा आणि अनेक घरांचा त्यांनी जाणीवपूर्वक नाश केला..येथून कुणाला स्फूर्ती मिळू नये म्हणून..!! पण ज्या महाराष्ट्रातील दगडा दगडावर बलिदानाचा इतिहास आहे तिथे स्वातंत्र्याचा हुंकार दाबून टाकणे कसे शक्य होते..!!
रायगडावर पोचलो की असंच मन कुठे कुठे भटकत राहत..आणि मी वेड्यासारखा पुन्हा पुन्हा गडावरचे लहान मोठे अवशेष पाहत राहतो..यावेळी अजून एक ठरवले होते की राणी काशीबाई यांची समाधी व कुशावर्त तलावाजवळील दोन समाध्या (त्यातील एक ही शिवाजी महाराजांचे विश्वासू पंतप्रधान मोरोपंत यांची असावी असे काही अभ्यासकांचे मत आहे) यांची स्वच्छता करावी..ते एक काम केले. मग जेवढा जमेल तेव्हडा कचरा रोज येता जाता जमा केला..शिव प्रतिष्ठान चे जे कार्यकर्ते आले होते त्यांच्या बरोबर शिवसमाधी, शिव पुतळ्याची पूजा केली..काही ग्रुपना थोडा इतिहास सांगितला..असे जेव्हढे जमले ते केले..

रायगडावर आलो की विठ्ठलदादा आवकीरकर ला भेटतोच..यावेळी तर कुटुंबकबिला घेऊन त्यांच्याच झोपडीत डेरेदाखल झालो..विठ्ठल दादा अप्पांचा - गोनीदांचा लाडका..त्याला रायगड अक्षरश इंच इंच माहित आहे..हिरकणीचा कडा, वाघ दरवाज्याचा कडा, भवानी कडा तो तर चढून आलाच आहे  पण त्याच्या लेकीही चढून आल्या आहेत..!! असा हा विठ्ठल --त्याला आता पणतू ही झालेत पण अजूनही तो मात्र तसाच कटक आणि कणखर आहे..!! ६०-७० किलोचे ओझे डोक्यावर घेऊन तो सहजपणे रायगड चढून येतो आणि आमची तरुण पिढी मात्र धापा टाकत गड चढते..!! त्त्याच्याबरोबर थोडा फिरलो..काही महत्वाचे अवशेष गायब झाल्याचेही त्याच्या नजरेतून सुटलेले नाही..पण कोण रोखणार हे सगळं ?

दिवसभर गडाच्या मुख्य भागात तेव्हडी गर्दी असते पण बारा टाकी, दारूकोठाराचे टोक, हिरकणी कडा, भवानी टोक इकडे फारसे कुणी फिरकत नाही..तिकडे मस्त फिरावे, रात्री विठ्ठल च्या झोपडीत पिठले भाकरीचा स्वाद घेऊन अंगणात तारे मोजत अलगद झोपेच्या आधीन होण्यातले सुख अलिशान हॉटेलमधील तैनातीमध्ये नाहीच नाही..!!
म्हणूनच तीन दिवस राहूनही मन काही तृप्त झाले नाही..पण शेवटी गड उतरावा लागलाच.. आता पुन्हा जाताना मात्र थोडी अधिक मंडळी बरोबर घेऊन जायचे आहे..थोडी कामे करायची आहेत गड स्वच्छतेची..मग येणार ना तुम्ही पण??
--सुधांशू नाईक, कल्याण
- ०९८३३२९९७९१