marathi blog vishwa

Friday 19 July 2013

विठ्ठल निश्चल..

 
टाळ वाजती वाजती , मृदुंग बोलती बोलती
अवघे भक्त चालSती, पंढरीच्या वाटेवरती...II धृ II
येथे नाही जातीभेद, येथे नाही वर्णभेद,
येथे नाही प्रांतभेद, हीच विठोबाची शक्ती...II १ II
                         अवघे भक्त चालती..पंढरीच्या वाटेवरती..
 
विश्व सारे अंधारले, सर्व सगुण लोपले,
परि संतरूपी रक्षियले, हीच विठोबाची शक्ती... II २ II
                   अवघे भक्त चालती..पंढरीच्या वाटेवरती..
युगे येतील जातील, जन बुडतील तरतील,
परि विठ्ठल निश्चल...सुधा म्हणे तेथे मुक्ती... II ३ II
               अवघे भक्त चालती..पंढरीच्या वाटेवरती..

Saturday 6 July 2013

“स्त्री” भयमुक्त व्हावी म्हणून..!



 परवा संध्याकाळची गोष्ट. इथे बहारीन मध्ये जवळच्या छोट्या सुपर मार्केट मध्ये गेलो होतो. नेहमीचा भाजीपाला, ब्रेड वगैरे आणायला. परत येताना पाहिलं तर मुख्य दरवाज्याजवळ एक बाई हंबरडा फोडून रडत होती. थोडी गर्दी जमा होऊ लागलेली. त्यात काही भारतीय, काही बहारिनी होते.

ती बाई जेमतेम तिशी पस्तिशीची. केरळी मुस्लीम. दिसायलाही सामान्य. त्यात तिला मल्याळी व्यतिरिक्त कोणतीच भाषा माहीत नाही. मग तिथे खरेदीसाठी आलेल्या एका मल्याळी कुटुंबाने तिच्याशी संवाद साधला.

कळलं की तिचा नवरा तिला इथे बहरीन मध्ये एकटा सोडून भारतात गेला होता, एक आठवडा तिकडे ऑफिसचे काम आहे असे सांगून. तिच्याजवळ थोडे पैसे दिले होते. आणि आज ती जेंव्हा इथे किरकोळ खरेदी करून परत जात होती तेंव्हा तिला त्याचा फोन आला की “मी आता तिकडे परत येणार नाही. मी दुसऱ्या बाईबरोबर राहणार आहे. तुला तलाक देतोय.” एका गरीब घरातील ती स्त्री आता पूर्ण असहाय होती. तिच्याकडे आता पुरेसे पैसेही उरले नव्हते. तिचा पासपोर्ट, बहारीनी कार्ड, बँकेची कागदपत्रे सर्व काही नवऱ्याकडे होती. तिला अक्षरशः इथे टाकून तो पळून गेला होता..!

मग पोलिसांना बोलावले गेले. त्यांनी तिथून भारतीय दुतावासात संपर्क साधला. तिच्या नवऱ्याचे नाव, गाव इ. कळवले. आणि स्पेशल केस म्हणून तिला सरकारी खर्चाने भारतात पाठवण्याची तयारी सुरु झाली...

ही एक त्यातल्या त्यात सुदैवी कहाणी म्हणायची. अन्यथा तिची रवानगी वेश्या व्यवसायात होणे ठरलेलेच.. जग २१ व्या, बाविसाव्या काय किंवा ३०व्या शतकात पोचले तरी होणारी “स्त्री”ची फरफट काही थांबणारी नाही त्याचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण.

कुठे जन्मापूर्वीच तिच्यावर मृत्यूचा घाला पडतो, तर कधी जन्मल्यावर गळ्याला “नख” लावलं जातं. यातूनही जगतात त्यांची अवस्था वेगळीच. भारत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड, फिलिपिन्स, इथिओपिया, लेबेनॉन, इजिप्त, रशिअन प्रांत अशा ठिकठिकाणच्या हजारो कोवळ्या मुली दरवर्षी या बाजारात विनासायास दाखल होत असतात. कधी प्रत्यक्ष बाप त्यांना विकतो, कधी भाऊ, कधी नवरा तर कधी आई...! पोरकी मुलं तर बाजरात येण्यापूर्वीच अनेक भोग भोगून आलेली असतात. वर्षानुवर्षे चाललेलं हे चक्र थांबवण्याची ताकद मात्र कुणाच्याच मनगटात आली नाही हे एक विदारक आणि वेदनादायी सत्य आहे..!

जो पैसेवाला, माजोरी पुरुष या सगळ्यामागे आहे तो सर्व जाती-धर्म,पंथ,देश इ.इ. सगळ्यातून सामावलेला आहे. हा लढा फार फार जुना आहे...आणि इथे फक्त चालते मस्ती सत्तेची...!

“डोळ्यांना दिसलेली प्रत्येक सुंदर स्त्री माझ्या अंगाखाली आली पाहिजे”, “माझ्याकडील सत्ता, पैसा यामुळे मला हवी ती बाई भोगायला मिळालीच पाहिजे” याच पुरातन अत्याचारी कामांधतेतून हे सर्व सुरु आहे. हजारो वर्षापूर्वी द्रौपदीला भोगावं असं वाटणारा दुर्योधन, जयद्रथ, कीचक इ. असोत, एका छोट्याश्या खेड्यात पाटलाच्या सत्तेला प्रश्न विचारणारी एखादी ग्रामीण साधी स्त्री असो, कलावंत म्हणून नावाजलेली एखादी प्रतिथयश अभिनेत्री असो, एखाद्या कंपनीत उच्चपदावर पोचलेली कर्तबगार स्त्री असो, प्रत्येकीच्या नशिबी तीच अवहेलना, तोच विखार, तीच लालसा, तोच बलात्कार ..भोगवादी पुरुषाने जबरदस्तीने लादलेला...!



“कधी बदलणार हे चित्र?” असं विचारणं ही मूर्खपणाच. कारण हे चित्र कधीच बदलू नये अशीच बहुसंख्यांची तीव्र इच्छा. त्यातच त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता..!

निसर्ग पाहत पाहत माणूस मोठा झाला. अनेक गोष्टी शिकला. सुरुवातीला निसर्गाची तत्वे मानणारा तो आज निसर्गापासून वेगळा झालाय. “मीच जग निर्माण करतो, मीच चालवतो आणि मीच सर्व सत्ताधीश” अशा अहंकारानं फुगून गेलाय. त्यामुळे “प्राणीसुद्धा शक्यतो बलात्कार करत नाहीत रे.. ” हे त्याला सांगून कसं समजणार? “त्यांनी केला नाही म्हणून मीही करू नये की काय?” असं क्रूर उत्तर मिळण्याचीच शक्यता जास्त...! आणि एकदा बलात्कार करायचं ठरलं की मग कुणीही चालते आम्हा पुरुषांना.. अगदी ४ वर्षाच्या मुलीपासून ते ६० वर्षाच्या वृद्ध आजी पर्यंत..! केवढी ही विकृती...! याचा अर्थ असा नव्हे की तमाम पुरुषजात वाईटच. कारण अनेकांना अशीच सवय आहे, काही झालं की ठपका ठेवायला एक बकरा समोर ठेवायचा..त्याला शिव्या, मार दिला की झालं आपलं कर्तव्य. पुन्हा आम्ही मोकळे, अनिर्बंध वागायला..!

सवंगपणे बोलणं, मोर्चे काढणं, पोस्टर्स फाडणे, कुणाच्यातरी तोंडाला डांबर फासणं, असे तथाकाधित उपायच फक्त केले जातात. कारण त्यातूनही आम्हाला प्रसिद्धी, पैसे मिळतात..! समस्येच्या मुळापाशी जाणे अनेकांना नको आहे कारण तेच या अशा समस्यांची मुळं आहेत. घरातला बाप/भाऊ/काका/मामा, शेजारी, शाळेतला मास्तर, कॉलेजमधला समवयस्क, रस्त्यातला रिक्षावाला, ड्रायव्हर, कंडक्टर, ऑफिस मधला सहकारी, बॉस, नवरा, नवऱ्याचा मित्र, मैत्रिणीचा नवरा, गल्लीपासून दिल्लीपर्यंत चे अनेक वखवखलेले पुढारी, ज्यांनी रक्षण करायचं तेच भक्षक बनलेले पोलीस, न्यायालये, पत्रकार ...असे असे सगळे आपण पुरुष या समस्यांची खरी मुळं आहोत. यांना स्वतः काही करायचं नाहीये...कारण त्यांना म्हणे “स्त्री” बघितली की भुरळ पडते..! आणि मग आपोआप ते तसं वागतात. हे तर जास्त भयानक..! म्हणजे ते माणूस नसल्याचं स्वतःच सिद्ध होतं ना..!


जरा कुठे एखादी घटना घडली की कुणी लगेच म्हणते की स्त्रियांनी “कराटे क्लास” करावा, कुणी म्हणते की त्यांनी पर्समध्ये “तिखट किंवा चाकू” ठेवावा, कुणी म्हणेल की त्यांनी अंगभर कपडे घालावेत, कुणी म्हणेल की त्यांनी घराबाहेर पडू नये, कुणी म्हणेल की त्यांनी कायम बुरखाच वापरावा, कुणी म्हणेल की त्यांनी शिक्षणच घेऊ नये, पण एकही शहाणा असं म्हणत नाही की “मी कुणाची छेड काढणार नाही, मी स्वतःचं आणि माझ्या आजूबाजूला असलेले शेकडो पुरुष यांचं मतपरिवर्तन घडवून आणेन”, एकही घरात, एकाही शाळेत “स्त्रियांना त्रास देणं अत्यंत अयोग्य आहे, त्यांचा अपमान करणं चुकीचं आहे” असं रोज का शिकवत नाहीत?

ज्या घरात एक मुलगा, एक मुलगी आहे तिथेही त्यांच्यातच भेदभाव. घरात भेदभाव, गावात भेदभाव, कामाच्या ठिकाणी भेदभाव, मंगलकार्यात भेदभाव इतकंच काय स्मशानातही भेदभावच..!

समान नागरी कायदा तर दूरची गोष्ट पण आपण सर्वांशी समानतेने वागणंही विसरून गेलो आहोत की काय? आणि आम्हाला याची लाज न वाटता “हाताची पाच बोटे तरी कुठे एकसारखी असतात?” असं निर्लज्ज समर्थन करावं वाटतं हे जास्त धक्कादायक आणि भयानक वास्तव आहे..!
 
 

आजही “आमची भारतीय संस्कृती अशी आहे नी तशी आहे, ३ हजार वर्षापूर्वी असं होतं नी तसं होतं, सोन्याचा धूर होता, द्रष्टे ऋषी होते, विद्वान होते..” असं छाती ठोकत मिरवत फिरणारे स्वतः काय करताहेत ते कधीच सांगत नाहीत कारण सांगण्यासारखं काही ते करतच नाहीत हे निश्चित.

आपली ही थोर थोर परंपरा “अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा...पंचकन्यां स्मरे नित्यं महापातक नाशनम ...” असं म्हणते..! का तर या सगळ्यांनी अनेक पुरुषांचे अत्याचार सहन केले म्हणून..! द्रौपदीचा रागीट थयथयाट सुद्धा व्यर्थच गेलेला.. बिचाऱ्या कृष्णाने तिच्या विटंबनेचा सूड घेण्यासाठी काही प्रयत्न केले म्हणून किमान कुरुक्षेत्रावर युद्ध तरी झालं नाहीतर तिचे पतीही हात चोळतच बसलेले... थोडक्यात काय तर जी स्त्री सगळं सहन करेल तिलाच आम्ही देवता मानणार काय?

आजवर हे सगळं होतंच आहे, मी काय करणार एकटा बिचारा, असं म्हणून आता आपण गप्प बसणे हे आगामी विनाशाला दिलेलं आमंत्रण ठरेल असं मला वाटतंय. जेंव्हा सगळं असह्य होतं तेंव्हा निसर्ग म्हणा, देव म्हणा, अज्ञात शक्ती म्हणा, ही प्रकोप घडवत असतेच..आणि तेंव्हा आपल्या हाती मग काही उरत नाही...गावाच्या मध्यभागी उभा केदारनाथ जशी आपत्ती मनसोक्त भोगतो आणि काहीसुद्धा करत नाही आपल्यासाठी... तसं होणारच..!


तेंव्हा मित्रहो, स्त्रीला सन्मानाने वागवणं आपल्या हातातच आहे ते आपण करूया..एकेक काडी पेटवून जसं विश्व प्रकाशित होतं तसं आपल्यापुरतं कार्यरत होऊ या.. आज देशोदेशी आपल्या कार्याच्या शेकडो मशाली घेऊन अनेक प्रामाणिक माणसे कार्यरत आहेत त्यांना आपलीही साथ देऊ या...तर आणि तरच हे विश्व पुढच्या पिढ्यांसाठी आनंददायी उरेल अन्यथा त्याच्या विनाशाला कारणीभूत होण्याचं पाप आपल्याच माथी बसणार हे नक्की...!

-सुधांशु नाईक. (nsudha19@gmail.com)