marathi blog vishwa

Thursday 26 December 2013

“दुरितांचे तिमिर जाओ..”

सुचेल तसं – लेखमालेतला या वर्षातला हा शेवटचा लेख..!

“दुरितांचे तिमिर जाओ..”
आज सकाळी CNN –HEROs हा कार्यक्रम पहात होतो. जगभरात कार्यरत असणाऱ्या खऱ्या-खुऱ्या समाजसेवकांना निवडून त्यातून CNN हे अमेरिकन च्यानेल त्यातील सर्वोत्तम माणसाना पुरस्कार देतं. या वर्षीच्या यादीत अशीच काही थोर मंडळी होती.

 डॉ. जॉर्ज हा त्यातीलच एक. कॅमरून या आफ्रिकेतील एका छोट्या देशामध्ये हा माणूस गरीब लोकांसाठी “फिरता दवाखाना” मोफत चालवतो. देशातील अनेक दुर्गम गावामधून तो फिरतो. तिथे एखाद्या टेंट मध्ये, गावातील झोपडीतून त्याची आरोग्य सेवा चालते. तिथे येण्यासाठी अनेकदा खेडूत लोकं ५० -६० किमी चालून येतात. पोटाच्या तक्रारी, डोळे, हात-पायाचे फ्राक्चर, किरकोळ शस्त्रक्रिया असं बरंच काही तो पूर्वी एकटा करे. मग हळूहळू त्याला साथीदार मिळत गेले...

तशीच एक कहाणी लौरा स्थाचेल आणि तिच्या “सोलर सुटकेस” ची. या बाईने एकदा नायजेरिया मध्ये एका सुईणीला बाळंतपण करताना पाहिले. कसे ? त्या गावाच्या पंचक्रोशीतील शेकडो कुटुंबांना तिच एकटी तारून नेई. कधी आपल्या मोपेड वरून फिरत ही सुईण दिवसाला १२-१३ बाळंतपणे करे. कित्येक घरातूनच नव्हे, तर तिच्या त्या तात्पुरत्या “दवाखान्यात” सुद्धा लाईट बऱ्याचदा नसे. मिट्ट काळोखात ती बाई बाळंतपण करे. मग कधी एखादी आई तर कधी एखादे पोर तिथे सुविधेअभावी मारून जाई. लौराने तिला एकदा एका मेणबत्तीच्या प्रकाशात बाळंतपण करताना पाहिले, ती अंतर्बाह्य हादरली. आणि त्यातून जन्म झाला तिच्या “सोलर सुटकेस” चा.
आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने तिने छोटी सुटकेस बनवली. छोटे सोलर दिवे, एलीडी बल्ब लावून तिने अशा हजारो सुटकेस सर्वत्र वाटल्या. “WE CARE SOLAR” अशी website बनवून त्या द्वारे हे जगात सर्वात पसरवले. आज दक्षिण अमेरिका, आफ्रिका खंडातील अनेक देशात ही सुटकेस “जादूची सुटकेस” म्हणून प्रसिद्ध झालीय...

यांच्या सारखेच अजून कित्येक जण होते तिथे.. त्यांचं स्टेज वर येणं, बोलणं हे अगदी साधं होतं. आपण काही फार मोठं काम केल्याचा त्यात अभिनिवेश नव्हता, उलट अजून बरंच करायचंय पण करता येत नाही याबद्दल अपराधीपणाची जाणीव होती..!! याला म्हणतात खरं “माणूस” म्हणून जगणं..! समोरच्या लोकांच्या प्रतिक्रिया अफलातून होत्या. कुणी दाखवलेली डॉक्युमेंटरी पाहताना रडत होतं, शेकडो जण उभं राहून त्याना मानवंदना देत होते. अनेक बडे उद्योगपती जागेवरूनच देणग्या देत होते...! हे सगळं पाहताना मन भरून आलं.
आपल्या देशातही गावोगावी कार्यरत आहेत अशी माणसे. बाबा आमट्यांच्या “आनंदवना”पासून ते बोर्डी- जव्हार च्या आदिवासी पाड्यातील कार्यकर्त्यांपर्यंत, कोकणातील “पक्षिमित्र भाऊ काटदरे” पासून पुण्यातील विलास चाफेकरांची “वंचित विकास”, कोल्हापूरच्या नसिमादिदींचे “हेल्पर्स” व कल्पना तावडेंच्या झोपडपट्टीतील “ज्ञानदीप विद्यामंदिर” पर्यंत..! ही केवळ प्रातिनिधिक नावे. आपल्या राज्यात, देशात अक्षरशः हजारो खरेखुरे समाजसेवक काम करतायत. कित्येकांनी आपलं अवघं आयुष्य, स्वतःची संपत्ती, मालमत्ता हे सगळं या समाज सेवेसाठी पणाला लावलंय. मात्र  पुरेशा प्रसिद्धीच्याअभावी यातल्या अनेकांचे काम लोकांपर्यत पोचतच नाही.

रोज कोणत्या नट- नटीने काय केलं, कोणत्या पुढाऱ्याने कसं थाटात आपल्या मुलाचं लग्न लावलं, कुठे चोरी झाली, कोणत्या बुवाने कसले कसले उपद्व्याप केले, अशा अत्यंत फुटकळ पण “कॅची” असणाऱ्या बातम्या सर्वत्र पाहायला मिळतात. पण जगाच्या भल्यासाठी जे राबताहेत ते दुर्लक्षित रहातात. कित्येकदा प्रसिद्धीला हपापलेले तथाकथित समाजसेवक मात्र गौरवले जातात. पुढेमागे त्यांचं भांडं फुटलं की मग त्यांच्यापायी इतर अनेक चांगल्या संघटना देखील बदनाम होऊन जातात. आजकाल तर अनेक पुढारीच स्वतःच्या “एन जी ओ” तयार करून सरकारी अनुदानं लुटून नेतात. यामुळे खरे कार्यकर्ते दुर्लक्षित राहतात.
खेडोपाडी पैशाअभावी, वाहनाअभावी, पुरेशा माणसांअभावी तरीही सामाजिक उपक्रम सुरु आहेत. कुणी दुर्लक्षित ऐतिहासिक वारशाचे जतन करू पाहतोय, कुणी गावातील गरीब मुलांना शिकवू पाहतोय, कुणी गावातील स्वच्छतेसाठी जीवाचं रान करतोय, कुणी प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आपला जीव पणाला लावतोय, कुणी अपंगासाठी तर कुणी थकल्या-भागल्या म्हाताऱ्या माणसांसाठी झगडतोय तरी कुणी आपल्या गावातील उजाड टेकड्या पुन्हा हिरव्यागार व्हाव्यात म्हणून लढतोय...! दुर्दैवाने यातील अनेकांपर्यंत सरकारची नजरसुद्धा पोचली नाहीये. काहीवेळा सरकारी मदत मिळतेही पण त्यासाठीचे कागद तयार करेपर्यंत, विविध कचेऱ्यातून हेलपाटे मारतानाच या लोकांची जास्त दमछाक होते. केवळ लोकांच्या मनातील चांगुलपणावर विसंबून ही मंडळी दिवस-रात्र राबताहेत. या विश्वातील “दुरितांचे तिमिर जाओ” म्हणून आपला घाम गाळताहेत.

आज त्यांना आर्थिक मदत तर लागणार आहेच, पण गरज आहे कुणीतरी त्यांच्या कामात प्रत्यक्ष हातभार लावायची. कधी आपण आपल्या रोजच्या आयुष्यातील किमान एक तास, एक दिवस जरी त्यांच्यासाठी देऊ केला तरी त्याच्या मनातील ती समाजसेवेची ज्योत पुन्हा विश्वासानं तेजाळून झगमगू लागेल. अनेक गोष्टी ते आपणहून निभावत आहेतच, पण कधीतरी प्रचंड उदासी मनाला झाकोळून टाकते, हातपाय थकून जातात. घडलेल्या एखाद्या छोट्याश्या घटनेने सुद्धा मनातील ती “समाजसेवेची उर्मी” अचानक ढासळते. “सगळं मीच का करायचं? किती दिवस करायचं? कोणालाच कसं साथ द्यावी असं वाटत नाही ? कुणी मदत केली नाही तर या अश्राप मुलांचं कसं होईल??” अशा विचारानं त्यांचं मन जेंव्हा थकून जाईल, तेंव्हा आपल्या सारख्या सामान्य माणसाने पुढे केलेला मदतीचा हात त्यांच्यातील तो आत्मविश्वास पुन्हा जागृत करून दाखवेल. एखाद्या अनाथाश्रमात घालवलेला अर्धा-एक दिवस तिथल्या मुलांच्या ओठावर हसू फुलवेलच पण तिथल्या कार्यकर्त्यांच्या मनातही समाधानाची जाणीव निर्माण करेल.

आज आपल्या मध्यमवर्गापर्यंत सुखवस्तूपणा झिरपत आलाय. आपलं आयुष्य छानपणे उपभोगत असतोच, अधूनमधून हॉटेलातून जेवण, थिएटर मध्ये जाऊन सिनेमा, रीसोर्टवर राहणं, एसी गाडीतून फिरणं असं कधी ना कधी आपण मनसोक्त अनुभवतो. पण आपल्या आयुष्यातील १० टक्के भाग जरी आपण एखाद्या सेवेसाठी खर्च केला तर मिळणारे समाधान हे त्या मनोरंजनापेक्षा जास्त सुखदायक असेल. आपले जुने कपडे, दरमहा आपला एक दिवसाचा पगार, सणासुदीला अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात जाऊन केलेलं खाऊ वाटप, एखाद्या रुग्णालयातील गरीब रुग्णाला केलेली औषधांची मदत, एखाद्या गरीब विद्यार्थ्यासाठी देऊ केलेला वर्षभराचा गणवेश व पुस्तकं... नव्या वर्षात प्रवेश करताना तुम्ही आनंदोत्सव जरूर साजरा करा, पण दुसऱ्याच्या आनंदासाठी असं काही करू शकलात तर ते जास्त सुंदर असेल. हे काही आपण सहज करू शकतो...किंवा असं करणे हीच खरी ईश्वरपूजा. अशा पूजेतून जगभरात “द्वेष- मत्सराऐवजी मैत्र जीवांचे जमून येओ” हीच नवीन वर्षानिमित्त सदिच्छा...!
-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

Friday 6 December 2013

एक लघुकथा - "डोळ्यात सांजवेळी.."

तो १०-१२ वर्षाचा. पांढरा शर्ट आणि खाकी चड्डीत शाळेत जाणारा. चड्डी सुद्धा बाबांच्या जुन्या प्यांटमधून बनवलेली. तीही दोन वर्षापूर्वी. त्यात वाढत्या अंगामुळे नुकतीच केलेली उसवण स्पष्ट दिसणारी. शर्टही पिवळटलेला. त्याच्या वर्गात अनेक मोठ्या घरची मुलं. शाळेतल्या अभ्यासात तो मागे नसला तरी फार पुढेही नसायचा. ६०-६५ टक्के मार्क मिळवत पुढच्या वर्गात जाणारा. ब्राह्मण असल्याने लहानपणापसून कानावर पडलेलं सगळं तोंडपाठ झालेलं. वेगळेपण होतंच त्याच्या बोलण्यात. बोलायला लागला समोरचे ऐकत राहायचे. अर्थातच सगळ्या वक्तृत्व स्पर्धातून याचं बक्षीस निश्चित असे. रविवारी सुटीच्या दिवशी बाबांच्या सायकल वर बसून कुठे अथर्वशीर्ष, रुद्राची आवर्तने करायला जा, कधी कुठे पूजा सांगायला जा असं अर्थार्जन सुरूच होतं. त्या वयातही घर खर्चाला हातभार लावत होता तो.

अर्थात त्याचं घर म्हणजे जणू एक खुराडच. एका चाळीच्या जिन्याखालच्या अरुंद जागेत त्या कुटुंबाचा संसार. तिथेच एका कोपऱ्यात जेमतेम एक माणूस उभं राहील इतकीच मोरी. शेजारच्या कट्ट्याचा उपयोग स्वैपाकासाठी. समोरच्या बाजूला एक जुना लाकडी पलंग. एक खुर्ची आणि भिंतीवर मारलेल्या फळ्यांवर पुस्तके, धान्याचे डबे असं उरलं सुरलं सगळं. मोरीला आडोसा असावा म्हणून बांधलेल्या दोरीवर पडद्याबरोबरच तिथे टांगलेले कपडे. या जागेला घर म्हणणं हीच एक अतिशयोक्ती. पण त्यातही तो मजेत राहात असे. मित्रांच्या भल्या मोठ्या घरात वावरताना जसं त्याला अवघडल्यासारखं वाटत नसे तसं इथे राहतानाही.
 

त्या खुराड्यात राहूनसुद्धा त्याचं जग अनुभवसमृध्द होतं. बाहेरच्या आंब्याच्या झाडावर कावळे व इतर पक्षी घरटी कधी बांधतात, शेजारच्या विहिरीत मासे कुठून येतात, घरामागे असलेल्या उकिरड्यावर सापाची बिळे कुठे आहेत, त्यातले कोणते साप विषारी आणि कोणते बिनविषारी आहेत, आईच्या समोर वावरल्यानं कोणत्या भाजीत हिंग घालावं आणि कोणत्या भाजीत लसूण, हे सगळं जसं त्याला माहीत होतं तसं अजाणत्या वयात आई-बापाचं “एकत्र” येणंही अचानक कळलेलं. शेजारच्या जोश्यांच्या मुलीचं पलीकडच्या मोडकांच्या मुलाशी हल्ली जास्त गुफ्तगू चालतं (गुफ्तगू शब्द ही त्यानं पहिल्यांदा वर्गात सांगितलेला) हे सुद्धा त्याला माहीत असायचं. या सगळ्याच्या जोडीला जन्मजात अंगात असलेला एक भन्नाट आत्मविश्वास, त्यामुळे तो म्हणजे एक वेगळंच रसायन. शाळा सुटल्यावरसुद्धा घरी जायची घाई न करता लायब्ररी मध्ये तासभर बसून पुस्तकं वाचणारा तो एकटाच. यातून त्याला असंख्य गोष्टी माहीत होऊन जात. अख्या वर्गाला समोर बसवून तो जेंव्हा या सगळ्यातलं काही सांगे तेंव्हा “अजि म्या ब्रह्म पाहिले...” च्या थाटात सगळे थक्क होऊन ऐकत राहात.

मैदानात क्रिकेट खेळतानासुद्धा एखादा जेंव्हा ऑफ ब्रेक टाकून समोरच्याची दांडी गुल करे, तेंव्हा कॉमेंट्री करणारा हा पट्कन म्हणून जाई “हा आमच्या शाळेचा प्रसन्ना..”.

वर्गात मात्र त्या नियमित तासाला तो कंटाळे. मग त्याचे विविध उद्योग चालत. पैज लावण्यात तर तो एक नंबर. आठवते की एकदा पैज लावून वर्गात गणिताचा तास सुरु असताना, त्याने आणि त्याच्या शेजारच्या चंद्याने आपल्या चड्ड्या काढून त्यांची अदलाबदल केली होती, कुणालाही न कळू देता..! कधी संस्कृतच्या तासाला एखादा “दधत्यंतस्तत्वमं किमपि यमिनसतत्खील्भवान” म्हणजे काय हो ?? असा प्रश्न विचारून म्याडमची दांडी गुल करे. आणि शेवटी सगळ्यांना सांगे “अरे अख्खं “महिम्न” म्हणून दाखवलं तर ही बया फीट येऊन पडेल इथंच..” अशा अनेक गंमती करताना कुणाला तो त्रास मात्र देत नसे. त्याला त्रास देणाऱ्या एखाद्या दांडगट मित्रालाही “च्यायझो, कशाला गरिबाला छळतोस..तुला काय मिळणार नाही, पाहिजे तर गणिताचा गृहपाठ करून देतो” असं म्हणे. या सगळ्यामुळे तो अख्ख्या वर्गाचा लाडका होता. गोरा, घाऱ्या डोळ्यांच्या त्याला सगळे मात्र “पोम्या” नावाने का बोलावत ते मात्र एक कोडेच होते..! हे नाव कसं पडलं ते त्यालासुद्धा ठाऊक नाही, पण त्याला त्याचं काही वाटतही नसे. शाळेत तसं त्याचं वर्गात नीट लक्ष नसे. लायब्ररीत बसून पुस्तकं वाचायला मिळवीत म्हणून तो शाळा लवकर सुटायचीच वाट पाही. या लायब्ररीतच मग रामायण घडलं...

नेहमीप्रमाणे पोम्या लायब्ररीत वाचत बसलेला. मात्र त्या दिवशी तिथे दुसऱ्या वर्गातील एक मुलगी व एक मुलगा आले होते. कपाटामागे त्यांच्या “लीला” चालू असताना याला त्याचा पत्तासुद्धा नव्हता. अचानक तिथे शाळेचा शिपाई आला. तो दुसरा मुलगा पळून गेला. ती मुलगी याच्या जवळून बाहेर पळताना शिपायाने पकडलं. आणि तिने सगळं काही याच्यावर ढकललं...!! शिपाई, शाळेचे मुख्याध्यापक यांनी त्याला बेदम मारला. त्याचं म्हणणं कुणी ऐकून घेतलं नाही. तिथे मग त्याच्या बाबांना बोलावलं. त्यांनी तर त्याला अक्षरशः मारत मारत घरापर्यंत नेलं. गावातल्या काही प्रतिष्ठित माणसांनी मध्यस्थी केली म्हणून त्याला शाळेतून काढलं नाही. फक्त त्याला नववी “अ” तुकडीतून “ड” तुकडीत हाकलला.

आणि पोम्या बदलला. अगदी अंतर्बाह्य बदलला.

एका शांत, साध्या हरहुन्नरी मुलाचा एक “दादा” बनला. सगळ्यांना तो त्रास देऊ लागला. ज्या मुलीने त्याला फसवलं, तिलाच बापाबरोबर जात असताना त्याने एकदा रस्त्यात पकडलं, तिचे कपडे फाडले, केस कापले आणि केवळ दया म्हणून थोड्या कपड्यानिशी तिला घरी जाऊ दिलं. तर तिच्या बापाच्या तोंडावर शेण टाकले. मग मात्र पुन्हा त्याने असलं काही केलं नाही.

एकदा जेवल्यानंतर शेजारच्या मुलांना तो काही अश्लील जोक सांगताना त्याच्या बाबांनी पाहिलं, ते रागाने म्हणाले, “रांडेच्या, तुला लाज नाही वाटत रोज रात्री पोरांना जमवून असलं काही सांगायला? चल घरात आणि काही देवाचं म्हणत बस, अभ्यास करत बस..”

फट्कन तो म्हणाला, “ आणि सोबत काय तुमचा रोमान्स बघत बसू रोज? तुम्हाला लाज नाही वाटत काम करून थकलेल्या आईला रोज भोगताना?”

चिडलेला बाप जेंव्हा काठी घेऊन मरायला आला, तेंव्हा एका हातानं काठी धरून तो म्हणाला, “ बाबा, खबरदार, तुमच्या पेक्षा जास्त ताकद आहे माझ्यात आहे...हात नाही लावायचा मला.” त्या दिवसानंतर त्याचा आणि बापाचा संवाद थांबला तो कायमचा.

इतके दिवस त्याला पोम्या म्हणणारे सुद्धा आता “गोविंदा” असं नावानं हाक मारू लागले. तो गावातील बड्या दादा लोकांच्यात मिसळू लागला. इथेच त्याला नंद्या भेटला. नंद्या म्हणजे गावातला एक नामांकित गांजेकस. थेट घराच्या मागील डोंगरावर त्याने गांज्याची शेती केलेली. तिथल्या झोपडीत ठराविक वेळी सगळे गांजा फुकायला जमायचे. गोविंदा त्यात मिसळून गेला. मात्र त्याने नवी पद्धत तिथे सगळ्यांना शिकवली. गोविंदा गांजा ओढे तेही पद्धतशीरपणे.

आधी एक सिगारेट घ्यायची. तिच्यातील सगळं तंबाखू हळूहळू बाहेर काढायचा. मग त्यात गांज्याची एकदम बारीक केलेली पावडर भरायची. त्यात तो कधी लवंग घाले, कधी वेलची, कधी सुंठ...! आणि मग तिचे छान झुरके घेत बसून राही. कधी हा सगळं ऐवज चिलीमीत भरून ते गांजा ओढत बसत.

या व्यसनानं मात्र गोविंदाला आतून पोखरून काढलं. गांजा मिळवण्यासाठी पैसे हवेत. त्यासाठी तो भुरट्या चोऱ्या करू लागला. आणि एका साध्या गरीब घरातील हा मुलगा संपूर्ण कामातून गेला. मात्र हे सगळे उद्योग करताना तो बाईच्या वाटेला मात्र कधीच गेला नाही. त्याने कधी कुणाची छेड काढली नाही. मात्र समस्त स्त्री जातीचा तो तिरस्कार करे. अपवाद फक्त आईचा. तिच्यासमोर तो काही न बोलता राही. रात्री सगळे झोपले याची खात्री झाल्यावर घरी येई. आईने ताटात वाढून ठेवलेलं गारढोण अन्न बकाबका गिळून झोपी जाई. बिचारी आई पांघरुणातून अश्रू ढाळत राही. तिचं या घरात कधीच काही चालले नाही. त्या टीचभर घरात तिलासुद्धा कसली सत्ता नव्हती..!

बाप सकाळी कंपनीत निघून गेला की तीही एका हॉटेलसाठी पोळ्या करायला जायची. दिवसभर तिथे राबून ती परत संध्याकाळी घरी येई. गोविंदा दहावीत कसाबसा पास झाला होता पण अकरावीत नापास झाला आणि त्याचं शिक्षण थांबलं. गांजाडू मित्रांच्या बैठकीत तो सतत गावातील शिक्षकांना, शिक्षण पद्धतीला शिव्या देत राही. तर कधी आपल्या सुंदर आवाजात नाट्यगीते, जुनी हिंदी गाणी किंवा चक्क संस्कृत स्तोत्रं म्हणत राही. एक दिवस तिथे पोलिसांनी धाड टाकून सगळ्यांना अटक केली. आठवडाभर तुरुंगात ठेवलं त्यांना. मग बेदम मारून सोडून दिलं. इतर सगळे कुठे कुठे गायब झाले. पण गोविंदा आणि नंद्या पुन्हा आपल्या मार्गाला लागले. शेताजवळ एक “सिद्ध पुरुषाचं ठिकाण” होतं. त्या घुमटीत तिथल्या समाधीला टेकून हे दिवसभर गांजा पीत राहत. अनेकदा त्याची आई मग तिथे अर्ध-बेशुद्धीत पडलेल्या त्याला घरी घेऊन जाई.

एकदिवस तो असाच तिथे पडला होता, आणि कुणीतरी येऊन सांगितलं की त्याची आई रस्त्यात चक्कर येऊन पडलीय, आणि तिला गाडीने उडवलं. आधीच अर्धवट शुद्धीत असलेला गोविंदा ते ऐकून अधिकच सुन्नपणे बसून राहिला..जणू त्याचं आयुष्य कायमचं दूर निघून गेलं होतं त्याला एकटेपणाची शिक्षा देऊन.

आजही त्या गावाच्या गल्ल्यांतून अंगात कळकट कपडे घातलेला, दाढी वाढलेला, लाल तर्र डोळ्यांचा पण गोरापान गोविंदा जेंव्हा लडबडत जात असतो. तेंव्हा त्याच्याच वर्गात असलेले, एकेकाळी त्याचे जिवलग असलेले मित्र नजर चुकवून दूर जात असतात. कुणाकडेही लक्ष न देता तो चालत असतो.. अचानक त्याच्या तोंडातून सुरेल गाणं बाहेर येतं..

डोळ्यात सांजवेळी..आणू नकोस पाणी...त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी...”

-    सुधांशु नाईक, कतार (nsudha19@gmail.com)

Thursday 24 October 2013

एक विचार सतावणारा ...

 काही माणसे तशी तुमच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग झालेली असतात. अनेकदा त्यांना त्यांचे म्हणून काही वेगळे अस्तित्व आहे हेही समजत नाही. ही माणसे आपल्यासारखीच सामान्य असतात, पण अचानक कधीतरी जाणवते की तरीही त्यांनी स्वतःचा एक अमीट ठसा आपल्या मनावर कायमचा उमटवून ठेवला आहे...

दत्तात्रय शिगवण त्यातलेच एक. लीलाचा नवरा ही त्यांची पहिली ओळख. लीला आणि तिची आई लक्ष्मी घरोघरी भांडी-कपडे धुणी करायच्या. चिपळुणात एका चाळीत आम्ही राहात होतो तिथेच मग लीला आमच्याकडे काम करू लागली तेंव्हा मी दुसरी तिसरीत असेन. तिथून पुढे किमान वीसेक वर्षं ती आमच्याकडे काम करत राहिली. आम्हा दोघा भावंडाना बहिण नाही म्हणून तिची मुलगी अनेक वर्षे आम्हाला राखी बांधत राहिली.
जेंव्हा सुटीत आम्ही आईबरोबर मामाच्या गावाला, नातेवाईकांकडे जात असू तेंव्हा लीला किंवा लक्ष्मी बाबांसाठी स्वैपाक करून नीट झाकून ठेवून जात. घराची किल्लीही त्यांच्याकडेच असायची. कामही इतके नेटके की कुणाला वाटणारही नाही की हे परके आहेत. आम्ही ब्राह्मण व ते इतर जातीतले असे व अन्य कुठले अडथळे या आपुलकीच्या नात्यांमध्ये कधी आलेच नाहीत. सुरुवातीला एक जाणवे की लीला आईबरोबर काम करता करता गप्पा मारत असे. अधून मधून डोळे पुसत राही. आई तिची समजूत काढत असे. घरातलं अन्न कधी मध्ये देत असे. एखादी जुनी साडी, वस्तूही दिली जाई.
जरा मोठा झाल्यावर कळू लागले की लीलाचा नवरा दारू पितो. कधी मध्ये तिला मारतोही. तिला आधी फक्त मुली झालेल्या. आणि मुलगा हवा म्हणून त्याचा त्रास होतोय असंही कळलेले. त्यात तो नवरा लीलाच्या घरी राहतो, म्हणजे घरजावई आहे हे समजले. पण तरीही लीलाचे त्याच्यावर प्रेम आहे याचा उलगडा त्या लहान वयात होत नसे. मुलींसाठी पैसे शिल्लक राहावेत, नुसते दारूत खर्च होऊ नयेत म्हणून आपल्या कामाच्या झालेल्या पैशातली काही रक्कम मग ती बाबांकडे देई. बाबांनी तिच्या नावे पोस्टात बचत खाते उघडून दिलेले. हे तिच्या नवऱ्याला कित्येक वर्षं बहुदा माहित नव्हते. ती नवऱ्याला घेऊन कधी घरी येऊन जाई. आम्ही त्याना तेंव्हापासून “शिगवण” म्हणूनच बोलावू लागलो. खरं तर शिगवण एक चांगला पेंटर. घरं, दुकानं रंगवायची कामे घेत. पण सगळा लहरी कारभार. निम्मा दारूने कब्जात घेतलेला. तरी ते आमचेही घर रंगवायचे काम करू लागले. ती चाळ सोडून आम्ही मग अन्य दुसऱ्या घरांत गेलो, नंतर स्वतःच्या घरात गेलो तिथेही रंगकामाचे कार्य शिगवणच करू लागले.

 
लीलाची तब्येत म्हणजे अगदी तोळामासा. त्यात तिला कायम दम्याचा त्रास. तरीही अगदी हडकुळा असा देह बिचारा प्रामाणिकपणे राबराब राबायचा. पुढे मग तिला दोन मुलगे झाले आणि मग सगळं घर आनंदी झालं. पण ही मुलं वाढवायची तर पैसे तर हवेतच ना. त्यामुळे कष्टाला काही कमी नव्हतीच. म्हातारी लक्ष्मीही राबायची. नंतर लीलाच्या मुलीही मदत करू लागल्या.
आता नक्की आठवत नाही पण बऱ्याच वर्षापूर्वी, बहुदा एका मोठ्या आजारपणानंतर शिगवणांनी दारू सोडली. अगदी चक्क पूर्ण बंद केली..! जणू ते अंतर्बाह्य बदललेच. मग भरपूर कामही मिळू लागले. आमचे घर तर ते रंगवत होतेच पण आमच्या परिचितांपैकी अनेकांची घरे तेच रंगवायचे, इतर मोठी कामे वर्षानुवर्षे करत राहिले. मग जरा त्यांचे घर स्थिरावले.
एकदिवस म्हातारी लक्ष्मी शांतपणे मरून गेली. लीलाचा संसार खऱ्या अर्थी फक्त तिचा राहिला. पुढे मुलं मोठी झाली. कुणी रिक्षा चालवू लागला. कुणी काही बाही कामे करू लागला. घर कमाई थोडी थोडी वाढू लागली. अडी अडचणीला कुणी न कुणी मदत करत होतेच. पण दुर्दैव मात्र लीलाच्या मागे कायमचे हात धुवून लागलेले. दोन्ही मुलींची लग्न झाली. पण एका मुलीच्या लग्नानंतर काही दिवसात जावयाचा अपघाती मृत्यू झाला. ती पुन्हा घरी परतली उध्वस्त होऊन... पुढे मग लीला थकली. तिचे बाहेर काम करणेही बऱ्यापैकी थांबलेच. मात्र शिगवण भरपूर काम करत होते.
मी “पोटासाठी भटकत...” वेगवेगळ्या गावात जात राहिलो, तिथेही ते येत राहिले. घर रंगवत राहिले. आमच्या बरोबर पंक्तीत बसून जेवले. सामान शिफ्टिंग साठी मदत करत राहिले. परदेशात आमच्याकडे आले नाहीत इतकंच. मात्र चिपळुणातील घरात अनेक छोटी मोठी कामे, दुरुस्ती करत राहिले. गावोगावी आमच्या नातलगांकडे, परिचितांकडेही काम करत राहिले. घरी कुणी नसले, आम्ही सगळे भटकंतीला गेलो तरी घराची किल्ली त्यांच्याकडे असे. अधून मधून येऊन जात. साफसफाई करून जात असंत. सगळं कुटुंबच असं विश्वासू...!
वर्षातून कधी मध्ये जेंव्हा घरी जाई तेंव्हा हमखास भेटायला येत. “शेठ, कसे आहात? सगली मंडळी बरी हायेत नां?” असं त्यांच्या नेहमीच्या हसतमुख ष्ट्यायलीत विचारत..! चहा घेत. गप्पा मारत बसून राहात. गणपतीत जेंव्हा मी चिपळुणात येई, तेंव्हा हमखास त्यांच्या घरी जाऊन येत असे. नुकतीच त्यांच्या मुलांची लग्न झालेली. घरात एक लीलाचं आजारपण सोडलं तर सगळं ठीकठाक झालेलं.
 
गेल्या वर्षी बहरीनमध्ये होतो. गणपतीच्या वेळी घरी जाता आले नाही. एक दिवस अचानक खबर मिळाली, “ लीलाचा तरुण मुलगा सकाळी तोंड धुताधुता कोसळला, “हार्ट फेल” आणि गेलासुद्धा..!” फार वाईट वाटले. थकलेल्या, आजारपणाला कंटाळलेल्या लीलाच्या मनाला मुलाचा असा मृत्यू पाहून किती यातना झाल्या असतील? कल्पनाच करवत नाही..! कोणत्याही आईबापासाठी हा सर्वात यातनामय क्षण..! पण करावे काय ?
यंदा घरी गेलो आणि कळाले की शिगवण आजारी आहेत. घशात गाठ झाल्यामुळे दवाखान्याच्या चकरा सुरु आहेत. नीट जेवता येत नाहीये. साधारण कल्पना आली. आम्ही भेटायला गेलो. घरात गणपती असूनही घरावरची उदासकळा लपत नव्हती.
“काय शिगवण, काय झालंय? तब्येत बरी नाही वाटतं?” मी आपलं उगाच वेड पांघरलं.
“जरा घशात गाठ झालीवती. घाणेकराकडे जाऊन काढली. आता त्याची कसलीशी टेस्ट करतायत. रिपोर्ट आल्यावर कळेल. त्यात ही महागाई. गेल्यावर्षी चांगला धडधाकट मुलगा अचानक गेला. आता काय करावं काय कळत नाही. पण सगळं चालवायला तर हवेच ना..बसून कसं चालेल ? त्यात हिचं आजारपण तर तुम्हाला म्हायतीच आहे.”
मला जास्त काय बोलावं कळेचना. सोबत काही रक्कम घेऊनच गेलो होतो. त्यांच्या हातात ठेवली. त्यांचे डोळे भरून आले.
“एक मुलगा गेला म्हणून उदास होणं साहजिक आहे. पण आम्हीही तुम्हाला मुलासारखेच. उपचारात हलगर्जी करू नका. जे लागेल ते सांगा...” यापुढे मला बोलवलं नाही.. भरल्या गळ्याने आणि जड पावलाने पट्कन उठून तिथून निघून आलो. त्यांचे उपचार, केमोथेरपी सगळं सुरु असल्याचं बाबांनी कळवलंय.
 
माणसे आपल्या आपल्या व्यापात गुंतत असतात. पण मन मात्र कुठेतरी अन्यत्र गुंतलेलं असतं. भरपूर काम करत असताना मलाही एकच विचार विलक्षण सतावतोय...
पुढच्या वर्षी भारतात येईन तेंव्हा लीला आणि शिगवण पुन्हा भेटतील??
n   सुधांशु नाईक, क़तार (nsudha19@gmail.com)
 

Sunday 13 October 2013

प्रेम म्हणजे...


लोकं म्हणतात “ माझं तुझ्यावर प्रेम आहे..असं सांगावं लागतं..”

मी मात्र म्हणतो, सगळं विश्वच तर प्रेममय असतं..!

प्रेम म्हणजे भल्या पहाटे आईनं करून दिलेली भाजी भाकरी असतं,

थकून झोपलेल्या मुलाच्या कपाळावरून फिरलेला बापाचा हात असतं...

प्रेम म्हणजे इवल्याश्या बाळाने घेतलेला पापा असतं,

हात चाटताना गायीची ओलसर खरखरीत जीभ असतं...

तिच्या मिठीत घुसमटत जाणे म्हणजेही प्रेम असतं,

कातरवेळी जिवलगाची वाट पहात तेही दारात उभं असतं...

प्रेम म्हणजे कुटुंबाला दोन घास मिळावे म्हणून राबणारा हमाल असतं,

उरलेली अर्धी भाकरी दुसऱ्याला वाढून आपण उपाशी राहात असतं...

प्रेम म्हणजे सांत्वनाचा धीरोदात्त स्पर्श असतं,

खूप दिवसांनी भेटल्यावर गळ्यात पडलेला मित्र असतं...

प्रेम म्हणजे गोधडीत झोपून ऐकलेली आजीची गोष्ट असतं,

तर कधी भल्या पहाटे उठून डोंगरातून केलेली भटकंती असतं..

प्रेम म्हणजे सुनसान एकाकी रस्त्यावर मिळालेली लिफ्ट असतं...

तहानलेल्या पांथस्थाला दिलेलं ओंजळभर पाणी असतं...

प्रेम जसं बहिणीनं बांधलेली राखी असतं

तसं सोनं म्हणून दिलेलं आपट्याचं पान असतं...!
 
 
“शुभ विजयादशमी”

n     सुधांशु नाईक, क़तार (nsudha19@gmail.com)

Thursday 26 September 2013

प्राजक्ताची फुलं

दक्षिणोत्तर धावणाऱ्या डोंगर रांगेत एका मोक्याच्या जागी सुंदरगड वसलेला. त्याच्या डावीकडून एक घाटवाट थेट खाली उतरत जाते ती तळातल्या कोकणापर्यंत. तिच्या एका बाजूस उंच काळाकभिन्न सह्याद्रीचा कडा आणि दुसरीकडे खोल दरी. त्या घाटमाथ्यावरून ती दरी भीतीदायक वाटते खरी पण ती नवख्यालाच. बाकी सगळी मंडळी उलट या डोंगर रांगेशी एकजीव झालेली.
जिथं घाट वाट तळातल्या इवलुश्या नदीजवळ पोचते तिथं तसंच एक छोटं गाव- दुर्गेवाडी. गावात अवघी दो – तीनशे घरं. त्यातली ४-५ ब्राह्मणाची, १०-12 मुसलमानांची आणि बाकी बहुतेक कुणब्यांची व नवबौद्धांची.
विष्णू दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दादा त्यातले एक. गावातले प्रथम मानकरी. गडावरील वरदायिनी देवीची यात्रा असो की गावच्या सुन्दरेश्वराची पूजा असो, त्यांच्याशिवाय कुणाचे पान हलायचे नाही.
दादांचं वागणंही तसंच. शांत, ऋजू व्यक्तिमत्वाचे दादा तसे सजग. दूर तिकडे अमेरिकेनं मंगळावर यान पाठवलंय इथपासून ते वश्या सुताराची बायको आजारी आहे इथपर्यंत सगळं ठाऊक असणारे. गावात त्यांचं किराणा मालाचं दुकान. त्यामुळे कायम लोकांची वर्दळ. मग अडी अडचणीला लोकं त्यांच्याकडे यायची. मदत घेऊनच माघारी जायची.
दादांना दोन मुलं आणि सुवर्णा, अवघ्या गावाची “वहिनीमाय..”. त्यांच्यासारखीच आल्यागेल्याचं पाहणारी. एक मुलगा –अविनाश, अतिशय बुद्धिमान, डॉक्टर होऊन पुण्यात आपल्या संसारात स्थायिक झालेला. दुसरा आशुतोष, मोठ्यापेक्षा जरा कमी हुषार. पण दुकानात नीटपणे लक्ष घालणारा. गावातली कामं सांभाळणारा. सगळ्यांशी संबंध राखून असलेला ;पण विलक्षण अबोल.

मात्र आता वहिनी थकली. घरचं आणि दारचं आता एकटीनं जमेना. जरा उठून बसलं किंवा, जरा चालून आले की गुढघे दुखायचे. अधून मधून कुणी न कुणी कसली कसली तेलं आणून देत. ती लावत त्या बसून राहत.
येताजाता लेकाला म्हणत, “ शुत्या, अरे, एकदा तुझे लग्न उरकून टाकले की मी मरायला मोकळी...पण बाबा तू असा ह्या गावात राहिलेला, हल्ली कोणा मुलीला गावाचे स्थळ नको हो..! सगळ्या मेल्या शहरात जायला सोकावलेल्या. तुझ्या सारख्या मुखदुर्बळ शंकरासाठी कोण पार्वती कुठं हरितालिका पुजतेय कुणास ठाऊक..! ये गो बाय, लवकर..सोडव मला म्हातारीला...”
तशा आजूबाजूच्या गावातल्या काही मुली सांगून आल्यावत्या. पण त्या बहुदा कुठे लग्न न ठरत असलेल्या. काही ना काही कमी असणाऱ्या. मग वहिनीच काही ना काही कारण सांगून त्यांना वाटेला लावत. “कुणीतरी मुलाच्या गळ्यात कशी बांधायची हो..शेवटी संसार आहे हा, शेवटापर्यंत नीट नको का व्हायला..?” असं मग येणाऱ्या जाणाऱ्यालाही सांगत.. सगळ्यावर आशुतोषची शून्य प्रतिक्रिया असे. अगदीच जास्त झालं तर तो मंद हसून म्हणे, “आई, कशाला गो इतकी बडबड करतेस, तू कोणतीही मुलगी निवड, मला चालेल...”

एकदिवस पहाटे बाहेरच्या अंगणात तुळशीला पाणी घालताना वाहिनीचं लक्ष कोपऱ्यात गेलं, आणि मनोमन सुखावल्या त्या. कोपऱ्यात आज किती तरी वर्षानंतर प्राजक्ताचा सडा पडला होता..! कित्येक वर्षापूर्वी माहेरून येताना त्यांनी हे प्राजक्ताचं रोपटं सोबत आणलेलं. अंगणाच्या एका कोपऱ्यात स्वतः लावलं. त्याच्या शेजारी बसायला एक चौथरा करून घेतलेला. तिथून दूर तळातल्या नदीपर्यंत सगळं कसं सुस्पष्ट दिसायचं. त्या प्राजक्ताशी त्यांचं भाबडं प्रेमळ नातं होतं. कारण माहेराशी जोडणारी ती एकच गोष्ट आता त्यांच्यासाठी जिवंत राहिली होती...!

मात्र कित्येक वर्ष झाली तरी तो प्राजक्त काही बहरला नाही.
वहिनीनं तर किती स्वप्नं पाहिलेली. “रोज सकाळी इथे छान सडा असेल, मी न्हाहून मस्त बाहेर तुळशीला पाणी घालायला आले की तेंव्हा तिथं मंद सुवास असेल त्याचा..! मग मी छान परडी भरून फुलं गोळा करेन, अगदी हलक्या हातानं, आणि देव्हाऱ्यासमोर छान सजावट करेन, रोज...तीही वेगवेगळी...! अगदी एक सुद्धा फूल तुडवलं जाणार नाही याची काळजी घेईन...! पण हा मेला प्राजक्त बहरेल तेंव्हा ना..? नुसताच आपला मोठा झालाय...!”

 
आणि तोच  प्राजक्त आज भरभरून बहरला होता..! त्यांना तो शुभशकुन वाटला. आपल्या गुढघ्यातली वेदना विसरून वहिनी घरात धावल्या...परकऱ्या मुलीच्या उत्साहानं परडी घेऊन आल्या...एकेक टपोरं फूल वेचू लागल्या...! 
परडी भरून गेली, तरी फुलं संपेनात. साडीच्या पदरात मग उरलेली फुलं गोळा करून त्या घरात आल्या. दादा एव्हाना आंघोळ करून अंग पुसत उभे होते.
“अहो, आपला प्राजक्त फुलला हो आज शेवटी...मला मेलीला वाटलं होतं की त्याची फुलं या जन्मी काही पाहायला मिळायची नाहीत..पण फुलला आता..! माझ्या लहानपणी हीच परडी घेऊन मी फुलं वेचताना अगदी थकून जाई. आज अगदी तस्सचं वाटतंय बघा..आता शुत्याचं लग्न निश्चित ठरणारच..”

बरेच दिवसानंतर तिचा तो सुखाने ओथंबलेला चेहरा पाहून दादानाही बरंच वाटलं.

आणि बोलाफुलाला गाठ पडावी तसं त्याच दिवशी पत्र आलं. थेट दूर सोलापुरातल्या जनू अण्णांचं - एका जुन्या मित्राचं. आपली तिसरी मुलगी- नलिनी, हिला दादांनी सून म्हणून स्वीकारावी अशी थेट विनंतीच त्यानं केली होती. तरीही समंजस दादांनी उलट टपाली कळवलं,
“ आमचा आशुतोष हा असा खेड्यातला. हे घरही तसं जुनं. तुम्ही सगळे अनेक वर्षं शहरात राहिलेले. तेंव्हा एकदा मुलीला घेऊन या. तिला घर, हे गाव, परिसर आणि आमचं जगणं पसंत पडले तरच मग कार्य उरकून टाकू...”

मग एकदिवस संध्याकाळी जनू अण्णा नलिनीला घेऊन आलेच गावात. घाट माथ्यावरून ते सगळं विलोभनीय दृश्य पाहून ती विलक्षण हरखूनच गेली. तसं त्यांचं मूळ गाव गुहागरजवळ. पण गेली अनेक वर्ष संपर्कच तुटलेला. तिच्यासाठी कोकण अगदी अगदी नवं होतं !
घरासमोर येताच ते जुनं डौलदार कौलारू घर, घराच्या मागून थेट दूर नदीपर्यंत उतरत गेलेली हिरवीगार डोंगर रांग, घरासमोरच मोठं अंगण, दुतर्फा असणारी झाडं, बाजूला फुललेला गुलाब, चाफा आणि तो प्राजक्ताच्या जवळचा बसायचा कट्टा...! ती खुळावल्या सारखी ते सगळं पहातच राहिली !

“अगो, तिथेच का उभी राहणारेस ? घरात तर येशील ना? वेडी गो पोर माझी...!” असं म्हणत वहिनी तिला सामोऱ्या गेल्या. तिला खांद्यावरून हात टाकून आपल्याबरोबर घरात घेऊन आल्या. समोरच्या बैठकीवर बसवत चेष्टेच्या सुरात म्हणाल्या, “ पहिल्यांदाच पाहतेस म्हणून कौतुक वाटतंय हो, नंतर कंटाळशील बघ..”
भानावर आलेल्या नलिनीने उठून त्यांना व दादांना वाकून नमस्कार केला. प्रेमळ पण ठाम सुरात म्हणाली,
“माई, पहिल्यांदाच हे पाहतेय ही खरी गोष्ट. पण कंटाळणार मात्र मुळीच नाही...आमच्या भागात तर दूर दूर दिसतात नुसत्या मोकळ्या जमिनी. माळराने. हिरवाई अगदी अधून मधून. तीही बाभळी किंवा कडुलिंबाची. आता आधी पाय धुवून येते मग पाहीन सगळं नीट तुमच्या बरोबर..”

 
तिचं बोलणं, त्यातला तो नकळता होकार समजून हरखलेल्या वहिनी तिला घेऊन आत गेल्या. दादा आणि जनू अण्णा ओटीवर बोलत बसले.

 
“दादा, गाव अजून अगदी तसंच आहे बघ. येताना पहात आलोय. ते कोपऱ्यावरचं गण्या तांब्याचे पत्र्याचे हॉटेल असो, कि गंगारामची पिठाची गिरणी असो, सगळे तसेच आहे रे. नाही म्हणायला चार सहा नवी चकचकीत दुकानं उभी राहिलीयेत, रस्ते डांबरी झालेत आणि ट्युबा बसल्यात इथे तिथं..!”

“अण्णा, रें आपली ही दुर्गेवाडी आहे इतकीशी. काय नवीन होणार इथं. त्यात हल्ली जो तो उठतो तो तिकडे चिपळुणाकडे धावतो कामाला. उरलेली जातात गुहागरच्या एनरॉनकडे मजुरी करायला. हल्ली शेती, बागायत करायचीय कुणाला ? सगळ्याना कमी कष्टात जास्त पैसे देणारी नोकरी हवी..”
 
रात्रीची जेवणं उरकून मंडळी झोपून गेली. नलू वहिनींच्या जवळ गप्पा गोष्टी करत करत पट्कन झोपून गेली. शांत झोपलेल्या तिच्याकडे वहिनी बराच वेळ पहात राहिल्या..कधी त्यांचा डोळा लागला त्यांनाच कळले नाही.
 
पहाटे वहिनींना जाग आली. पाहतात तो शेजारी ती नाही. लगबगीनं त्या उठल्या. दार उघडून बाहेर आल्या पहाटेचा मंद प्रसन्न प्रकाश पसरला होता. नलिनी हलक्या हातानं प्राजक्ताची फुलं गोळा करत होती. आणि तिच्या मागे पूर्वेकडे आकाश हळूहळू प्रकाशत होतं...जणू एका नव्या युगाचा उदय होत होता..! वहिनी मुग्ध होऊन ते पहातच राहिल्या. जरा वेळाने भानावर येत म्हणाल्या,
 
नलिनी, अगो इतक्या लवकर उठलीस तू ? आणि थेट बाहेर कशी काय आलीस ?”
 
“माई, मला या फुलांचं भारी वेड. माझ्या लहानपणी आम्ही सोलापुरात एका छोट्या घरात भाड्याने रहात होतो. तिथं असंच एक छान पारिजातकाचे झाड होतं. मी परकराच्या ओच्यातून खूप फुलं पहाटे पहाटे गोळा करून आणायची बाबांच्या पूजेसाठी. नंतर घरं बदलत गेली आणि मी दुरावले या आनंदाला. काल तुमच्या दारात हे झाड पाहिलं आणि मनोमन ठरवलंच होतं आज पहाटे उठून फुलं गोळा करायची म्हणून...!”
 
“तुला मी नलूच म्हणते बाई आता...तर नले, अगं हा प्राजक्त म्हणजे देवांचा वृक्ष. कुणी म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळी तो बाहेर आला, कुणी त्याला कृष्णाच्या कथेत गुंतवतात पण मला बाई हळव्या मनाच्या संन्याशासारखा वाटतो हा प्राजक्त. पहाटे पहाटे भरभरून फुलतो, आणि सूर्योदयाला अर्घ्य दिल्यासारखं सगळं दान वाटून निःसंगपणे उभा राहतो, कुणी ती फुलं गोळा करोत अथवा तुडवून जावोत, याला त्याशी काही देणंघेणं नाही. फुलं सुद्धा किती नाजूक. प्रत्येक फूल, फिकट केशरी झाक असलेला त्या इवल्याशा पांढऱ्या पाकळ्या, त्याचा तो केशरी देठ पुन्हा मला संन्याशाचीच आठवण करून देतो बघ. माणसानं असंच वागावं, आपलं काम करत राहावं, दुसऱ्याचा विचार न करता. पण तसं होत नाही बघ, आपण स्वतःपेक्षा दुसऱ्याकडे जास्त बघत बसतो आणि मग दुःखी, मत्सरी होत राहतो..”

 “माई, किती छान बोलता हो तुम्ही..”
 “अगं हे काही माझं शहाणपण नव्हे, या आजूबाजूच्या निसर्गानं शिकवलं बघ हे... आमचं माहेर तसं बऱ्या पैकी श्रीमंताचं. तेही रत्नागिरी सारखं मोठ्या गावातलं. त्यामानानं सासर तसं गरीबच अन या अशा आडगावातलं. मी सुरवातीला फार धुसफूस करायची. यांच्या शांत स्वभावाचा तर कित्येकदा राग राग करायची. पण हळू हळू बदलत गेले. एक माझी मेली सततची बडबड सोडली तर बाकी साफ बदलले बघ.. पण तू तशी नाहीस. तू जास्त समंजस दिसतेस. आणि परिस्थिती पहात वाढलीयेस. तुला बघितलं कालपासून आणि माझी काळजी मिटली बघ. मी आता मरायला मोकळी. सांभाळशील न आपलं घर नीट??”

 “माई, सांभाळीन हो. पण तुम्ही मरायच्या गोष्टी नाही करायच्या. मग मला सासुरवास कोण करेल...?”
दोघी मग खळखळून हसत होत्या, तोच दादा बाहेर आले. त्यांना पाहून मिश्किलपणे म्हणाले,

“अरे तुम्हा दोघींचं गुळपीठ चांगलं जमलेलं दिसतंय. बरय बघ नलिनी, आता माझ्या मागची कटकट तुझ्या मागे लागणार..सुटलो एकदाचा..”
“सुटकेचा श्वास सोडू नका असे. नाही सोडणार तुमचा पिच्छा असा सरळ पणे..” माई उत्तरल्या.
 “ बराय बाई, आता चहा तरी करशील, का बसणार तुम्ही दोघी अश्या इथेच ?”
 मग सगळे घरात गेले. चहा घेताना माई आशुतोषला म्हणाल्या,
“शुत्या, आज तू दुकानात नको बसूस. ह्या नलेला घेऊन वर गडावर जाऊन ये. तिच्याशी चार गोष्टी कर. तिला आपला परिसर दाखव. आज हे सांभाळतील दुकान..”
 आशुतोष च्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद नलिनीने अचूक हेरला.

आंघोळी झाल्यावर गूळ पोहे, नाचणीचे पापड अन मऊ भात खाऊन मग दोघे बाहेर पडले.
घराच्या मागचा एक छोटा डोंगर चढून अर्ध्या तासात ते मधल्या सपाटीवर पोचले तोवर नलिनी घामानं चिंब भिजली होती. आधीच गोरापान असणारा तिचा चेहरा लालबुंद झाला होता. तिथल्या एका दगडावर टेकत म्हणाली,
“अहो, तुम्ही सपासप चालत निघालाय पुढे, एकदा तरी मागें पहा ना..माझी कशी तारांबळ उडतेय ते. मला हे सगळं आवडतं, पण असे डोंगर चढायची सवय नाहीये हो..जरा इथे थांबू या..”
“ओ, सॉरी..माझ्या लक्षातच आले नाही. मी घराबाहेर पडलो की या निसर्गात वेडावून जातो. तसं मी बोलतो कमीच आणि त्यात हे आजूबाजूचे पर्वत, दऱ्या, पावसाळ्यातले झरे, धबधबे, धुकं पाहून अजूनच थक्क होऊन जातो. माझी बोलतीच बंद होते निसर्गापुढे. किती वर्षापासून हे सगळं इथं आहे. काय काय पाहिलं या डोगर दऱ्यानी..


असं म्हणतात की, एकदा कोकणातल्या स्वारीच्या वेळी शिवबाराजे आले होते. परत जाताना शेजारच्या त्या  घाटाने जाणार होते. तू बसलीयेस नं तसेच म्हणे ते या पठारावर थांबले. आणि समोरचा तो कडा, त्याचं आभाळात घुसलेलं टोक पाहून उद्गारले...”कशी सुंदर जागा..कसा हा निसर्ग..!.या समोरच्या कड्याच्या माथ्यावर एक छोटा गड बांधून त्याचं नाव ठेवा “सुंदरगड”. या घाट वाटेवर लक्ष ठेवायचे काम करेल तो...”
आणि मग त्यांच्या माणसांनी हा गड बांधून काढला. वर तिथे काही फार शिल्लक नाही आता. चार दोन बुरुज आहेत. पडका दरवाजा आणि आवश्यक तेथेच बांधलेली थोडकी तटबंदी..पण तिथून खालचे कोकण असं काही दिसतं की आपण पहातच राहतो. त्यातही नवरात्र –दिवाळीच्या नंतर अवघं कोकण दाट धुक्यात बुडून जातं तेंव्हा सकाळच्या वेळी जे काही दृश्य दिसतं तसं बहुदा जगात कुठेच नसावं...सुंदरगड नाव खरंच अगदी समर्पक ठेवलंय राजांनी ! “
 “तुम्हीपण तुमच्या आईसारखंच किती सुंदर बोलता हो..उगाचच लोकं सांगत होती आम्हाला, “ हा मुलगा घुम्या आहे म्हणून !” हसून नलिनी बोलली. 
तिच्या बोलण्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आशुतोष म्हणाला, “इथून पुढे गडावर जायला दोन वाटा आहेत. एक समोरच्या कड्याला पूर्ण वळसा घालून जाणारी, जरा सोपी पण जास्त वेळ घेणारी, दुसरी थेट कड्याच्या पोटात शिरते. तिथं एक “कळकी ची शिडी” आहे. ती चढून थेट कड्यावर पोचता येतं.. पण उभा कडा चढावा लागतो..कुठून येशील?”
“कळकीची शिडी म्हणजे?”
“अगं, आमच्याकडे बांबूला कळक म्हणतात, बांबू जोडून केलेली ती ही शिडी.”
“तुम्ही नेहमी कसे जाता?
“शिडीच्या वाटेनं”
“मग तसेच जाऊ या..फक्त जरा माझ्याकडे लक्ष असू दे म्हणजे झाले. नाहीतर कड्यावर पोचल्यावर मागे बघाल..तर कुणीच दिसणार नाही..” मिस्कीलपणे ती म्हणाली.

अर्धा तास पायपीट करून दोघे कड्याजवळ पोचले. ती शिडी म्हणजे चक्क जुने बांबू होते, एकमेकात घट्ट बांधत वरपर्यंत नेलेले. आणि त्या शिडीचे टोक दिसतसुद्धा नव्हते इतका उंच कडा...!

ती डोळे विस्फारून ते पहात राहिली...!
“भीती वाटत असेल तर राहूदे. आपण नंतर कधी येऊ.”
क्षणभर तिची द्विधा मनस्थिती झाली. मग निर्धाराने म्हणाली, “ नाही परत नको..जाऊया. इथूनच..”
-----
गडावर पोचली तेंव्हा हात भरून आलेले. चट्कन आशुतोषने जवळच्या एका दगडी टाक्यातले पाणी आणले. खांद्यावरच्या स्याकमधून एक मुगाचा लाडू काढून तिच्या हातात दिला..
तो लाडू, आणि ते अमृतासारखं पाणी पिऊन ती जरा कुठे भानावर आली..! समोरचं ते अवघं दृश्य भान हरपून पहात राहिली...

काही वेळानं शेजारच्या आशुतोषचा हात पकडून म्हणाली,
“माझ्या आयुष्यातला सर्वात अपार आनंद देणारा हा क्षण..तुमच्यामुळेच..मी सदैव ऋणी राहीन तुमची...तुम्ही मला नापसंत केलीत तरीसुद्धा...!”
----
नापसंतीचा प्रश्नच आता उरला नव्हता. लवकरच एका सुमुहूर्तावर लग्न झाले सुद्धा.
आशुतोष, नलिनी दोघानाही निसर्गाचं, पानाफुलांचे वेड. अगदी गोठ्यातल्या गुरांची काळजी घेण्यापासून ते स्वैपाकापर्यंत तिनं सगळं पाहता पाहता सांभाळायला सुरुवात केली. सोमवारी दुकान बंद असे. तेंव्हा दोघं डोंगरात फिरायला जात. जवळचा वासोटा किंवा व्याघ्रगड, नागेश्वर, रामघळ अशी अनेक ठिकाणं बघून झाली. पण तो सुंदरगड मात्र त्यांच्या सर्वात आवडीचा. कित्येकदा दोघं तिथं जात.
त्यांचं पाहता पाहता एकमेकात गुंतून गेलेलं आयुष्य पाहून वहिनी सुखावल्या. संसारातून हळू हळू लक्ष काढून घेऊ लागल्या. आणि त्यातच येणाऱ्या महाशिवरात्रीचे वेध लागले. त्यांनाच नव्हे सगळ्या गावाला..!
----
गावातले  सर्वात मोठे उत्सव तीनच, महाशिवरात्र, शिमगा आणि गणपती. दरवर्षी महाशिवरात्रीला गावातील सुन्दरेश्वराला अभिषेक असायचा. आधी तीन दिवस रात्री कीर्तन, छबिना असायचा. शिवरात्रीच्या आधीची रात्र जागवली जायची. सूर्योदयाला अभिषेक सुरु होई. त्यासाठी वरच्या गडावरच्या टाक्यातले पाणी आणले जाई. गावातल्या तरुण मुलांना डोळ्यासमोर ठेऊन मग स्पर्धा सुरु केली दादांनी. पहाटे गडावर जायचं आणि सूर्योदयापूर्वी कळशीभर पाणी घेऊन मंदिरात पोचायचं. गेली दोन वर्षं हा मान पटकावण्यात आशुतोष मागे पडत होता. त्याने फक्त एकदा ती स्पर्धा जिंकली होती. इतर वेळी त्याचा दुसरा नंबर येई. त्याचाच मित्र असलेला कदमांचा सुरेश दोन्ही वेळेला पहिला आला होता.
शिवरात्रीच्या आधी मग सगळे जण खूप तयारी करायचे. एकदा सगळे थकून परत आले तेंव्हा चहा घ्यायला आशुतोष बरोबर घरी आले.
गप्पा मारताना नलिनीला सुरेश म्हणाला,
“वहिनी, यंदा पण मी नाही हो तुमच्या नवऱ्याला जिंकू देणार..मला hat trick करायचीय यंदा.”
“भाऊजी, यंदा मीपण सामील होणारेय तुमच्या शर्यतीत..”
“नको वहिनी, तुला इतकं वेगानं चालणं जमणार नाही.  तसा अंधार असतो पहाटे..पाहिजे तर तू शिडीपर्यंत ये फक्त..”
“बघूया कुणाला काय काय जमतंय ते..!” हसून नलिनी म्हणाली.
------
शिवरात्रीला अवघं गाव स्वच्छ झालं. पताका, तोरणं लावून सजलं. मंदिराची रंग रंगोटी झाली. आणि स्पर्धा सुरु झाली.. शिरस्ता असा की खाली गावातील मंदिरातून दर्शन घेऊन वाट चालायला सुरुवात करायची, चढ सुरु होई तिथं वाटेत दादांच्या घराजवळ दोन मिनिटे थांबायचं. नेहमीप्रमाणे प्राजक्ताच्या कट्ट्यावर बसून वहिनी जाणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर काही ना काही प्रसाद ठेवत होत्या...आणि वर बोलणं सुरूच होतं,
“मेल्या जगन्या, नीट जा हो, नाहीतर अंधारात गडावर जायच्या ऐवजी जंगलात शिरशील..”
आशुतोष आणि नलिनी जेंव्हा दोघं समोर आले, तेंव्हा त्या म्हणाल्या, “शुत्या, तुझी स्पर्धा मरूंदे, माझ्या पोरीला नीट जपून ने आणि परत आण म्हणजे झालं..”
सगळे निघून गेले. वहिनी तिथंच बसून राहिल्या. उत्तर रात्रीची शांत वेळ. गावातून मंदिरात रात्रभर रंगलेल्या कीर्तनाचा उत्तररंग सुरु होता. स्वतः दादा रात्रभर कीर्तन करीत उभे राहात. त्यांच्या आवाजातला अभंग इथं बसलेल्या वहिनीना कर्ण्यातून छान ऐकू येत होता,

 “वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे ! पक्षीही सुस्वरे आळविती !!

आकाश मंडप प्रिथवी आसन ! रामे तेथे मन क्रीडा करी !!

तुका म्हणे होय मनासी संवाद ! आपुलाची वाद आपणासी !!”

ऐकता ऐकता वहिनीचा डोळा लागला. इतक्यात त्यांच्या माथ्यावर टपकन एक प्राजक्ताचं फूल पडलं, त्या जाग्या झाल्या. बाजूला फुलं टपटपत होती. समाधानाने उठून आत गेल्या. परडी घेऊन आल्या..तिथं बसून. स्वतःशीच बोलत पुटपुटत फुलं वेचू लागल्या;
“प्राजक्ता, तुझं आपलं बराय बाबा. रोज फुलतोस आणि रिकामा होतोस, निःसंगासारखा. आम्हाला आमची नाती सोडवून घेताना मात्र उरात दुखत राहते. या आयुष्यातून बाहेर तर पडायचे पण कसे ते काही उमगत नाही बाबा..”
------
 
सूर्योदयाच्या काही वेळ आधी धावत पळत आशुतोष येत होता...चक्क नलिनीसुद्धा त्याच्या बरोबर होती. त्यानं दूरवरून प्राजक्ताला टेकून बसलेल्या वहिनींना पाहिलं. दूर कुंपणापलीकडून हाक दिली,
“आई, मी पुन्हा पहिला येतोय गं यंदा..”
तो तसाच पुढे चालला होता..पण आई बोलली कशी नाही हे उमगून अचानक थांबला...

कुंपण ओलांडून आत आला..
वहिनी झाडाला टेकून तशाच बसलेल्या होत्या आणि त्यांच्या माथ्यावर प्राजक्ताची फुलं पडली होती. हातातली परडी फुलांनी भरून गेली होती आणि उरलेल्या शेकडो फुलांचा आजूबाजूला सडा पडला होता.
जवळ येऊन त्यानं हात लावताच वहिनींचा निष्प्राण देह त्या फुलांवर पसरला..आणि...

 “आई गं....” त्याच्या तोंडून आलेली किंकाळी आसमंतात गुंजत राहिली...!!

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)