marathi blog vishwa

Saturday 30 September 2023

गणेशोत्सव आणि वातावरणातील पावित्र्य..

#सुधा_म्हणे: गणेशोत्सव आणि वातावरणातील पावित्र्य..

30 सप्टेंबर 23

पावसाळा सुरू होत असतानाच गणपती येण्याचे वेध लागलेले असतात. कित्येक महिने आधीच गणेश मूर्ती तयार करण्यास सुरुवात झालेली असते. विशिष्ट माती आणून मूर्ती तयार करण्यासाठी खटपट सुरू होते. बहुतांश सर्व सार्वजनिक गणेश मूर्ती या पीओपी किंवा अन्य साहित्यातून बनवल्या जात असल्या तरी शाडूच्या / मातीच्या गणेशमूर्तीचे महत्व सर्वात जास्त असतेच. मुळात गणपती उत्सवात “पार्थिव” गणेशमूर्ती आणणे हेच अभिप्रेत आहे. गणपती मातीपासून बनवला जायला हवा. लहान मुलांना आजकाल शेकडो इंग्रजी शाळेत अॅक्टिविटी करताना “ क्ले पॅकेज” दिली जातात. त्याच धर्तीवर मुलांना आपण गणपतीच्या काळात मातीचे गणपती बनवायला, त्यांना उत्तम रंग द्यायला नक्कीच शिकवू शकतो ना? त्यामुळे मुलांची निरीक्षण शक्ती वाढेल, त्यांना तशी मूर्ती करण्यातील आनंद अनुभवता येईल.

गणपतीला विविध पत्री, दूर्वा, फुले अर्पण करण्यासाठी लहान गावात अजूनही आसपासच्या बागेत, रानात जाऊन फुले, दूर्वा गोळा केल्या जातात.  मातीशी असणारे नाते अधिक वृद्धिंगत होत राहते. त्याचबरोबर गणपती विसर्जनानंतर ही माती पुन्हा मातीत मिसळून जाणे हेही पर्यावरणासाठी आवश्यक नव्हे का ?


गणपतीच्या काळात अवघे वातावरण मोठ्या साऊंड सिस्टिमच्या आवाजात दणाणून टाकले जाते. खरंच याची गरज आहे का हे पाहायला हवे. वातावरणात, अवकाशात सुंदर सूर पसरवत राहण्यासाठी विविध वाद्यांचा सुयोग्य उपयोग करायला हवा. गाणी, वाद्य संगीत यांच्या सुरांनी लोकांच्या चित्तवृत्ती उल्हसित होणे अधिक गरजेचे असते. विशिष्ट डेसीबल्स पेक्षा अधिक आवाज जास्त वेळ ऐकणे लोकांच्या तब्येतीसाठी हितकारक नसते मग अतिशय मोठ्या आवाजाचा अट्टहास का? हे आवाज सुखकारक वाटावे इतक्याच मर्यादेत असावेत हे भान आपण नक्कीच सांभाळायला हवे. प्रत्येक गोष्टीसाठी कायदेशीर बडगा उगारणे हेच जर गरजेचे होणार असेल तर ते आपल्या माणूसपणासाठी नक्कीच योग्य नव्हे.

वातावरणातील महत्वाचा घटक म्हणजे पाणी. गावोगावी असणारे पाण्याचे स्त्रोत अधिकाधिक दूषित होत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात तरुण मंडळानी एकत्र येऊन नदी, विहिरी यांच्या स्वच्छतेची मोहीम राबवायला हवी. अनेक ठिकाणी सरकारी योजनांमध्ये त्रुटी राहिलेल्या असतात. सांडपाणी प्रक्रिया केंद्रे बंद पडलेली असतात. गटारे तुंबलेली असतात. कित्येक ठिकाणी सांडपाणी थेट नदीत सोडलेले असते. या सगळ्याविरुद्ध गणेश मंडळाच्या माध्यमातून एकत्र झालेली तरुणाई या सगळ्याविरुद्ध जर एकवटली तर यंत्रणा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण होऊ शकतो. नदी, नाले, तलाव यामध्ये गणेश विसर्जन केल्याने प्रदूषण कमी होण्यासाठी जरी खूप मोठा हातभार लागणार नसला तरी खारीचा वाटा तर नक्कीच असेल. तसेच गणपती विसर्जन झाल्यानंतर पुढील 2-4 दिवसांत तिथे स्वच्छता मोहीम देखील राबवायला हवी. त्यामुळे आपला परिसर, नदी, तलाव हे आपल्यासाठीच चांगल्या अवस्थेत उपलब्ध असतील. ईश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीचे, या वातावरणाचे पावित्र्य ईश्वरी उत्सवाच्या नावाखाली बिघडू न देणे हे आपल्याच हाती आहे असे मला वाटते.

- सुधांशु नाईक (9833299791)



Friday 29 September 2023

गणेशोत्सव आणि शिक्षणविषयक उपक्रम...

#सुधा_म्हणे: गणेशोत्सव आणि शिक्षणविषयक उपक्रम...

29 सप्टेंबर 23  

गणपतीला आपण विदयेची देवता मानतो. मात्र गणेशोत्सवात खूपच कमी प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवलेले दिसतात. एकतर बहुसंख्य शाळांना/ कॉलेजला गणपतीत सुट्टी असते आणि मुलेही सुट्टीचा आनंद घेत असतात. त्यामुळे बहुतेकदा त्यांच्याकडे आपले दुर्लक्ष होत असते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने खरेतर कितीतरी उपक्रम करणे शक्य आहे. 

गणपतीमध्ये फुले,पाने यांचे फार महत्व असते. विविध पत्री आणून त्यांचा पूजेत वापर होत असतो. या दरम्यान पाऊस होऊन गेलेला असल्याने रानात, डोंगरात अनेक प्रकारच्या वनस्पती उगवलेल्या असतात. मुलांना घेऊन अशावेळी डोंगरात, रानात जायला हवे. विविध चांगल्या वाईट वनस्पती, फुले हे सारे समजून द्यायला हवे. आपण फक्त मुलांना इंजिनियर, डॉक्टर किंवा आय टी इंजिनियर बनवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यासोबत त्यांना आपले पर्यावरणदेखील समजाऊन दिले पाहिजे असे मला वाटते.

आपल्या गावी नदी, तलाव, ओढे असतात. जवळपास एखाद्या गावी एखाद्या नदीचा उगम असतो. नदी कशी उगम पावते, तिचा विस्तार कसा होतो, तीच्या आसपास जैवसाखळी कशी निर्माण होते, कोणते प्राणी, पक्षी, कीटक नदीच्या, या जंगलांच्या सहवासात वाढतात हे सारे मुलांना शिकवायला हवे. त्यातही निसर्गात हिंडून येणे शक्यतो सर्व मुलांना अवडतेच. त्यांना ही आवड आपणच लावायला नको का ?


आपल्या गावात अनेक गरीब लोकांची वस्ती असते. तात्पुरती किंवा कायमचे झोपडे असणारी कित्येक माणसे असतात. वीटभट्टीवरील कामगार, बांबूच्या टोपल्या विणणारे कारागीर, कुंभार, भांडीवाले, लोहार आदि कित्येकजण आपल्याकडील पिढीजात उद्योगात कार्यरत असतात. त्यांच्याकडे जाऊन त्यांचे काम कसे असते, त्यांना त्यांच्या कामातून अधिकाधिक प्राप्ती कशी होईल याबाबत मार्गदर्शन करायला गणेश मंडलांनी पुढाकार घ्यायला हवा. यामुळे आपली मुले आणि या पालांवर किंवा झोपडीत राहणारी माणसे यांच्यात एक सहकार्यांचा बंध तयार होईल असे मला वाटते.

आपल्या आसपास असणाऱ्या गरीब मुलांना, पुस्तके – वह्या, शाळेची बॅग, युनिफॉर्म आदि वस्तूंचे वाटप करणे यासारखी कामे तर गणेशोत्सव मंडळे आवर्जून करू शकतात असे मला वाटते.

शेजारच्या गरीब घरात किंवा झोपडपट्टीत जाऊन मुलांना कॉम्प्युटर शिकवणे, गणित-सायन्स सारख्या विषयाचे क्लास घेणे असे उपक्रम गणेश मंडळाचे कार्यकर्ते नक्कीच करू शकतात. त्यांनी तशी योजना जाहीर केली तर समाजातील इतर लोकसुद्धा सहकार्याचा हात नक्कीच पुढे करतील. समाजातील दुफळी कमी होऊन अधिकाधिक एकात्मता वाढीस लागावी यासाठी हे आवश्यक आहे ना? तुम्हाला काय वाटते ?

-सुधांशु नाईक (9833299791)



Wednesday 27 September 2023

उत्सवातून जपले जावे सामाजिक भान..

#सुधा_म्हणे: उत्सवातून जपले जावे सामाजिक भान..

27 सप्टेंबर 23 

गणेशोत्सव असो, शारदीय नवरात्र असो, की गावातील अन्य एखाद्या देवतेचा उत्सव, आपण लगेच एक मोठा मंडप तयार करतो. प्रसंगी तिथे बाहेरून भली मोठी मूर्ती आणून बसवतो. त्यासाठी सगळीकडे प्रसंगी जबरदस्तीने वर्गणी गोळा करतो. मात्र या ऐवजी मूर्ती आणि नियमित पूजा- आरती या व्यतिरिक्त होणारे अनावश्यक खर्च टाळून त्याच वर्गणीतून एखादा सामाजिक उपक्रम करायाचे ठरवले तर लोक आपापल्या परीने नक्की सहकार्य करतील. डॉल्बीच्या मोठ्या आवाजाचा त्रास ही नाही आणि आपण दिलेले पैसे एका दृष्टीने आपल्याच आसपास असण्याऱ्या समस्या सोडवण्यासाठी उपयोगात येतील. सध्याच्या काळात आपल्याकडे पाणी प्रदूषण, कचऱ्याची विल्हेवाट, ट्रॅफिक समस्या, ई कचरा, इंधन समस्या, आरोग्याचे प्रश्न, डायबेटीस, कॅन्सर सारख्या मोठ्या आजारांचे वाढते प्रमाण, रस्त्यांची दुरावस्था आदि समस्या सर्व गावांमध्ये कमी जास्त प्रमाणात दिसून येतात.या समस्यांशी झुंजणारी कितीतरी व्यक्तिमत्वे आपल्याला ठाऊक आहेत. त्यांना आपण मदत करू शकतो किंवा स्वत:च्या विचाराने नवीन कार्य निर्माण करू शकतो.

एकेकाळी गणेशोत्सवा सारख्या विविध सामाजिक उपक्रमाचा वापर करून घेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विविध जाती-जमातीचे सामुदायिक भोजन, स्त्रियांसाठी एकत्र एकत्र हळदीकुंकू आदि कार्यक्रम यशस्वी करून दाखवले होते. आपणही ते सहज करू शकतो. आपल्या आसपास विविध गोष्टीमुळे समाजात मतभेद, मनभेद निर्माण होत आहेत. ते दूर करण्यासाठी आपणच पुढाकार घेऊ शकतो. समाजातील आपल्या आसपास असे कित्येक लोक असतात की ज्याना लहानमोठ्या मदतीची गरज असते. त्यांची गरज लक्षात घेऊन आपणच स्वतःहून सहकार्याचा हात पुढे केला तर समाजात सौहार्दाचे, सलोख्याचे वातावरण वाढायला नक्कीच मदत होईल.

पोपटराव पवार, अविनाश पोळ, डॉ. राजेंद्रसिंहजी यासारख्या सुप्रसिद्ध लोकांपासून आनंदवन, स्नेहालय, पाणी फाउंडेशन, आदिवासी कल्याण संस्था, वंचित विकास आदि विविध समाजोपयोगी संस्था आणि त्यांचे शकडो कार्यकर्ते कार्यरत आहेत. आरोग्य, जल संवर्धन, नदीतलाव स्वच्छता, प्राचीन वास्तूचे संवर्धन, वृक्ष संवर्धन, औषधी वृक्षांचे जतन, अपंग, मतिमंद किंवा गतीमंद मुलांची देखभाल, क्रीडा कौशल्ये यासाठी कित्येक व्यक्ती आणि संस्था कार्यरत आहेत. आपापल्या परीने आपण त्यांच्यासाठी खूप काही करू शकतो.

उत्सवातील 10 दिवस पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा, आगमनविसर्जन मिरवणुकीला दिलेले लोभस रूप इतके अवश्य करावे. मात्र मोठमोठे स्पीकर्स, अचकट विचकट नृत्य आदि गोष्टींवरील खर्च आपण नक्कीच कमी करू शकतो. याच रकमेतून जर सामाजिक भान जपणाऱ्या कार्याला आपण मदत करू शकलो तर त्याचे समाधान नक्कीच जास्त असेल असे मला वाटते.

-सुधांशु नाईक (9833299791)



Tuesday 26 September 2023

उत्सव हे कलागुणांसाठी पर्वणी व्हावेत..

#सुधा_म्हणे: उत्सव हे कलागुणांसाठी पर्वणी व्हावेत..

26 सप्टेंबर 23

श्री गणरायाला आपण कलांचा अधिपती मानतो त्यामुळे गणेशोत्सवा सारख्या सार्वजनिक कार्यक्रमात विविध कलागुणांना वाव मिळेल असे कार्यक्रम अधिकाधिक प्रमाणात सादर व्हायला हवेत. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही कलागुण असतातच. कित्येकदा आपल्याला त्याची ओळख होत नाही तर कित्येकदा आपल्याला सुयोग्य व्यासपीठ मिळत नाही. पुण्या-मुंबईसारख्या शहरात तर विविध कार्यक्रम शक्य असतात, होतही असतात मात्र त्या धर्तीवर गावोगावी अशी सुरुवात व्हायला हवी.

पूर्वी विविध सार्वजनिक गणेशोत्सव असलेल्या ठिकाणी काही खास थीम घेऊन मूर्ती किंवा शेजारी देखावे बनवले जात. कित्येक गावांतून व्याख्याने, कथाकथन, एकांकिका, शास्त्रीय किंवा सुगम संगीताच्या मैफली, नृत्यविष्कार, असे किती काही घडत असे. त्यासाठी स्थानिक कलावंत मेहनत घेत. आजही हे सगळे उपक्रम आपण आपापल्या गावी करू शकतो. प्रा. शिवाजीराव भोसले, निनाद बेडेकर, प्र. के घाणेकर, किरण पुरंदरे आदि ज्येष्ठ व्याख्याते/अभ्यासक आपापल्या आवडत्या विषयांवर असे काही बोलून जातात की माणूस तहान भूक विसरून जाई. माधव गाडगीळ असोत किंवा मारुती चितमपल्ली, त्यांच्याकडून जंगलांचे, पर्यावरणाचे अनुभव ऐकत बसणे ही पर्वणीच असते. हे असे सारे कार्यक्रम पुन्हा गावोगावी सुरू व्हायला हवेत. प्राणी, पक्षी, झाडे, पाने, फुले, कीटक यांची दुनियाच वेगळी. ती समजून घेता येईल.

पं. भीमसेन जोशी यांच्यापासून ते हल्लीच्या पिढीतील सावनी शेंडे, संजीव अभ्यंकर यांच्यापर्यंत अनेक गायकगायिकांनी गणेशोत्सवात मैफली रंगवल्या आहेत. सुचेता भिडे-चापेकर, शर्वरी जमेनीस आदिनी या उत्सवातून लोकांसमोर उत्तम शास्त्रीय नृत्याविष्कार पेश केले आहेत. कित्येक उत्तमोत्तम चित्रकार, शिल्पकार, फोटोग्राफर्स यांची प्रदर्शने आयोजित करता येतील. मुख्य म्हणजे असे कार्यक्रम यापुढे केवळ मोठ्या शहरांपुरते न राहता गावागावात व्हायला हवेत. इतकेच नव्हे तर प्रसंगी खर्च कमी करण्यासाठी या कलाकारांच्या ऑनलाइन मैफिली देखील आपण आयोजित करू शकतो

प्रत्येकवेळी खूप दिग्गज कलाकार बोलवायला हवेत असे नाही. आपल्या गावात गुणी कलाकार असतातच. त्यांना जर आपण स्टेज देऊ शकलो तर कित्येक युवा कलाकारांना आपले गुण दाखवणे शक्य होईल. आपल्या मंडळाच्या समोरील मंडपात उत्तम रांगोळी स्पर्धा घेणे, श्लोक,स्तोत्र स्पर्धा,चित्रशिल्पगायन- नृत्य आदि स्पर्धा घेणे आपल्याला सहज शक्य आहे. आपल्याकडे विविध भाषांमधून दर्जेदार साहित्य प्रकाशित होत असते. आपली मराठी भाषा किंवा या अन्य भारतीय भाषांमधील उत्तमोत्तम साहित्यिक उताऱ्यांचे अभिवाचन करण्याचे कार्यक्रम आपण नक्कीच सादर करू शकतो.

सध्याच्या काळात आपल्या देशातील संस्कृत, पाली, अर्ध मागधी आदि भाषा तर परदेशातील लोक देखील शिकत आहेत. त्याचबरोबर सध्या वापरात असलेल्या पंजाबी, बंगाली, असामी, उडिया, तमिळ, मल्याळम आदि अन्य भाषा शिकायची संधी मिळावी म्हणून अशा उत्सवतून या भाषेची तोंडओळख होईल असे छोटे रंजनात्मक कार्यक्रम अवश्य घेऊ शकतो. सतत जर्मन, जपानी, फ्रेंच आदि परकीय भाषाच शिकल्या पाहिजेत असे नाही. आपल्या भाषा नव्या पिढीपर्यन्त आपणच नक्की नेऊ शकतो असे मला वाटते.

गायन-वादन-नृत्य-चित्र-शिल्प-काव्य-साहित्य अशा विविध कलांच्या सहाय्याने आपले उत्सव अधिकाधिक लोकप्रिय करणे आपल्याला सहज शक्य आहे. इतर कुणीतरी सुरुवात करावी असे न म्हणता आपणच ते करायला हवे, बरोबर ना?

-सुधांशु नाईक (9833299791)

Monday 25 September 2023

उत्सव विधायक व्हावेत...

#सुधा_म्हणे: उत्सव विधायक व्हावेत...

25 सप्टेंबर 23  

घरगुती गणपतीचे विसर्जन झाले की लोकांची पावले सार्वजनिक गणपतीकडे वळतात. लोकानी आपापसातील मतभेद, राग-रूसवे, अहंकार हे सारे विसरून एकत्र येणे समाजाच्या हिताचे असते. नुसतेच एकत्र या असे म्हटले की कुणी येईलच असे नव्हे. यासाठी एखाद्या निमित्ताची आवश्यकता असते. प्राचीन काळी गावातील मंदिरे, तिथे होणारे उत्सव यासाठी निमित्त ठरायचे. लोक एकत्र येत, ग्रंथ वाचत, नृत्यगायनभजन- कीर्तन यांचा आस्वाद घेत. नवी नाती जुळत. जुने स्नेहबंध वृद्धिंगत होत असायचे. नंतरच्या मुसलमानी आणि ब्रिटिश आक्रमण काळात बऱ्याच गोष्टीना धक्का लागला. 20 व्या शतकात लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही सुसंधी पुन्हा निर्माण झाली. ज्या उद्देशाने हे सुरू झाले त्याला सध्या आपण न्याय देत आहोत का हा प्रश्न विचारणे आता आवश्यक ठरले आहे.

एकजूट निर्माण व्हावी या उद्देशाने निर्माण झालेले हे उत्सव सध्या तर फाटाफुटीसाठी निमित्त ठरत आहेत. एखाद्या वर्षी एका गल्लीत सुरू झालेल्या गणेशोत्सव मंडळाची पुढील दोन तीन वर्षात 4-5 मंडळे झालेली असतात. याच्या मंडपातील डॉल्बी सिस्टिम जास्त आवाज देते की त्याच्या मंडळातील, असले उद्योग आपल्या आसपास सुरू असतात. ढोल पथक, लेझिम पथक समजा मिरवणुकीसाठी मागवले तरी त्यावेळी त्या ढोलापेक्षा साऊंड सिस्टिमचाच आवाज मोठा असतो. संपूर्ण उत्सवात प्रत्येक गोष्ट करताना भरून उरते फक्त चढाओढ. त्यातून त्या डॉल्बी सिस्टिमवर सकाळची आणि रात्रीची आरतीची वेळ वगळता फक्त तडकतीभडकती गाणी सुरू असतात. मोठ्या मुलांच्या मागोमाग त्या मंडपात किंवा रस्त्यावर 7-8 वर्षाची चिल्लीपिल्ली मुले देखीलआंख मारे हो लडकी आंख मारे..” सारख्या गाण्यावर नाचत असतात, त्या बिचाऱ्यांना काही कळत देखील नसते. मात्र नकळत त्या मोठ्या मुलांचे अनुकरण करत असताना नको ते संस्कार मात्र सहज होऊन जातात. अशा प्रकारे काय काय करू नये, किंवा काय चुकीचे घडत आहे हे आता आपल्याला सर्वाना ठाऊक झाले आहे. त्याची यादी जितकी देऊ तितकी थोडीच. त्यामुळे या पुढील काही लेखातून आपण विधायक पद्धतीने सार्वजनिक उत्सव कसे साजरे करता येतील याबद्दल बोलावे असे मला वाटते.

एकेकाळीएक गाव एक गणपतीसारखी अत्यंत सुंदर कल्पना आपल्या राज्यात मांडली गेली होती आणि त्याचे अनुकरण होत होते. मधल्या काळात हे सगळे बाजूला पडले आहे. ते आपण पुन्हा सुरू करायला हवे. प्रत्येक गावाचे, प्रत्येक जिल्ह्याचे काहीतरी वैशिष्ट्य असते त्याला अनुसरून आपण नवीन कल्पना मांडायला हव्यात. तरुण पिढी ही कायम तडफदार असतेच. त्यांच्याकडील ऊर्जा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्या उर्जेला योग्य वाट मिळेल हे आपण नक्कीच पाहू शकतो. 







यंदा नुकत्याच झालेल्या यशस्वी चंद्रयान मोहिमेमुळे कित्येक घरी त्याबाबतचा देखावा लहान मुलांनी बनवला ही किती सुंदर गोष्ट आहे. कित्येक मुलीनी आपल्या परिसरातील फुले, पाने गोळा करून उत्तम अशा फुलांच्या रांगोळी तयार केल्या. काही मुलीनी शालेय साहित्य वापरुन गणपतीची आरास केली. असे छान काहीतरी आपण घडवले तर युवा पिढीला समाधान तर लाभतेच शिवाय आपल्या अंगी असलेल्या कलेची, आपल्या आवडीनिवडीची नव्याने जाणीव देखील होते. त्या निमित्ताने आपल्या आसपासच्या माणसांशी छान नाते तयार होते. विविध कलेच्या, सामाजिक जाणिवेच्या उद्देशाने एकत्र आलेली अशी माणसे मग नक्कीच वेगळे विश्व घडवू शकतात. स्वत: आत्मविश्वासाने फुलतात आणि इतराना देखील प्रेरणा देतात असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते ?

-सुधांशु नाईक (9833299791)



Saturday 23 September 2023

गणेशोत्सव आणि आरतीच्या आठवणी...!

#सुधा_म्हणे: गणेशोत्सव आणि आरतीच्या आठवणी...

22 सप्टेंबर 23

गणेशोत्सव सुरू झाला की महाराष्ट्रात आणि देशात अनेक ठिकाणी घरोघरी आनंदाला उधाण तर येते. तरीही या सगळ्यांपेक्षा कोकणात मात्र जरा वेगळे आणि अधिक उत्साही वातावरण असते. तसेही होळी आणि गणपती या दोन सणांसाठी कोंकणी माणूस कुठेही असला तरी शक्यतो घरी धाव घेत असतो. तसं पाहिलं तर प्रत्येक गावातील प्रथा, परंपरा या वेगळ्या असतात. त्या त्या प्रथेप्रमाणे सर्व सण उत्साहानेच साजरे होतात. मात्र या दोन्ही सणांच्या वेळचा उत्साह काही औरच. आमच्या गावी महाशिवरात्र, गोकुळाष्टमी, होळी आणि गणपतीचे दिवस ज्या पद्धतीने साजरे होतात ते कायमच स्मरणात राहणारे आहे.

गणपतीला घरी जाण्याचे वेध सर्व कोंकणी लोकांना खूप आधीपासून लागतात. बस, ट्रेन आदिची आरक्षणे करून कोंकणी माणूस गणेश प्रतिष्ठापना करायच्या आदल्या दिवसापर्यंत पोचायचा अट्टाहास करतोच. आरास पूर्ण होते. घराला प्रसंगी रंगरंगोटी होते. घरा-घरात मोदकांची तयारी सुरू होते. एकदा गणेशाची प्रतिष्ठापना झाली की सगळ्याना वेध लागतात आरतीचे.

आमच्या लहानपणी आम्ही चिपळूणला बुरूमतळीवर केतकरकाकांच्या घरी राहत होतो. तिथे परिसरात संध्याकाळच्या आरतीला सगळ्यानी एकत्र जमायचा रिवाज. आपापल्या घरातील आरती लवकर उरकून कुणा एका घरी मग मोठी आरती असे. त्याचाही क्रम लावला जाई. ज्याच्या घरी शेवटची मोठी आरती तिथे महाप्रसाद असे नियोजन. आरती नंतर महाप्रसाद म्हणून कोणता खाऊ बनवायचा त्याची तयारी सर्व घरातील महिला वर्ग मिळून ठरवत असे, प्रसंगी एकमेकाना मदत करत असे. पुढे आमचे घर झाल्यावर त्या भागातदेखील आम्ही हा रिवाज न चुकता पाळत होतो.

आपापल्या घरातील आरती आवरून सगळे वेळेवर या मोठ्या आरतीला एकत्र येत. निरांजन लावून, उदबत्ती लावून एका संथ लयीतसुखकर्ता दुखहर्ता..” सुरू होत असे. ही गणपतीची आरती असो की त्या नंतर पाठोपाठ येणारीलवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा..” ही शंकराची आरती असो, त्यातील नादमधुर शब्द हळूहळू आपल्या मनातील अन्य विचार दूर करून टाकायचे. ही किमया होती समर्थ रामदासांच्या शब्दांची

कर्पूरगौरा भोळा..” असो की “..शंकर शोभे उमावेल्हाळा..” असो.. किंवाव्याघ्रांबर फणिवरधर सुंदर..” यासारख्या ओळी असोत, त्या शब्दांची किमया मनावर छान परिणाम करून जाई.पण त्याला जी पारंपरिक चाल आहे तीही फार सुरेल असल्याने आपले शरीर त्या सूर लयीशी एकरूप होत जाई. शब्द सुरांच्या आणि हातातील वाजणाऱ्या टाळांच्या साथीने मग हळूहळू आरत्या रंगू लागत. देवीची आरती, दत्ताची आरती झाली की मग त्या त्या दिवशी जो वार आहे त्या अनुषंगाने अन्य आरती घेतली जाई. शनिवार असेल तर मारुतीची आरती म्हणताना त्यातले जोशपूर्ण शब्द एक वेगळाच रंग भरायचे.

मध्येच मगआरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म..” ही किंवायेई ओ विठ्ठले माझे माऊली ये..” ही आरती सुरू होई. त्याची विशिष्ट लय, शेवटच्या ओळीतले ते दीर्घ लांबवलेले सूर हे सगळं सगळं फार मनमोहक आहे. उंच स्वरात दमसास टिकवण्याची जणू अदृश्य स्पर्धा असे.

 “गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला..” हे म्हणताना जणू तो विठ्ठल समोर आल्याचा भास होई. त्यानंतर मग शांत आवाजातआरती ज्ञानराजा..” असे म्हणत ज्ञानोबांची आरती म्हटली जाई. अलगद डोळे कधी भरून येत ते कळतच नसे. तासभर विविध आरत्या रंगवून झाल्या की मगधूप दीप झाल्या आता कर्पूरआरती..” म्हणत कापूर / धूप लावला जाई

ज्ञान कळेना, ध्यान कळेना.. मजला ना कळे काही.. शब्दरूपी गुंफूनी माला, वाहतो पायी..” असे म्हणतान आपले क्षुद्रत्व जाणवत राही. त्यानंतर घालीन लोटांगण वंदीन चरण आणि मग मंत्रपुष्पांजलीचा गजर सुरू होई. “आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम्... पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर..” असे म्हणून समारोप करताना गळा दाटून येई

तास दीड तास रंगलेला हा आरती सोहळा संपला की महाप्रसाद. विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत इकडच्या तिकडच्या गप्पा रंगत आणि मंडळी उद्या पुन्हा भेटूया असे सांगून निरोप घेत.

गणपती विसर्जनासाठी देखील छान छोटी मिरवणूक काढली जाई. लेझिम आणि झांज वाजताना त्या तालावर “पायी हळूहळू चाला.. मुखाने गजानन बोला..” अशी भजने रंगत. विसर्जन करण्यापूर्वी पुन्हा आरती होई. या आरतीला मात्र गणेशाच्या वियोगाची किनार असे. आता पुन्हा पुढल्या वर्षापर्यंत वाट पाहत राहायची या विचाराने त्यावेळी मात्र लहान थोर सगळ्यांचे डोळे भरून येत. गणपती उत्सव संपल्यावर देखील कित्येक दिवस संध्याकाळ झाली की पुन्हा एकदा धूप, दीप, कापूर लावून छान मन भरून आरती करावी असे वाटत राही.

रंगलेल्या आरत्यांनी अनेक वर्ष अपार सुख दिले आहे. काही सुखे अशी असतात की कितीही लाभली तरी त्यांची ओढ कमी न होता वाढतच राहते. हे त्यातलेच एक सुख. सतत हवेहवेसे वाटणारे..!

-सुधांशु नाईक(9833299791)




Friday 22 September 2023

आनंददायी गजानन...

 #सुधा_म्हणे: आनंददायी गजानन...

22 सप्टेंबर 23

घरोघरी गणपती येण्यापूर्वी आरास करण्यासाठी जागरणे होत असतात. गणेश आगमन झाले की रोजची पूजा, नैवेद्य यात कसा वेळ जातो हे कळत नाही. कोकणात तर घरे पाहुण्यांनी भरून जातात. त्या निमित्ताने बाजारपेठा फुलून येतात. आसपासच्या गावातील मित्रमंडळीच्या घरी आवर्जून जावेसे वाटते. घरोघरी जाऊन गणपतीचे दर्शन घ्यायला कुणी आमंत्रण देण्याची गरज नसते. त्या निमित्ताने सगळे एकत्र होतात. अथर्वशीर्षाची आवर्तने केली जातात. सत्यनारायण पूजा होतात. गौरीच्या आगमनानंतर स्त्रियांचे हळदीकुंकू समारंभ रंगतात. वर्षभरात न भेटलेली मंडळी एकमेकाना भेटतात. एकमेकांकडील प्रसाद, मोदक, खास केलेला एखादा पदार्थ यांची देवाण घेवाण होते. कुणाच्या घरी कोणती आरास केली आहे त्याचे कौतुक होते. नियमित भेटणारे कुणी दिसले नाही की त्याची चौकशी होते. ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या आठवणी निघतात. आरतीच्या वेळी हमखास सगळ्यानी एकत्र जमावे अशी प्रेमळ आज्ञा दिली जाते. 

गणपतीला “ त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:। त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि ।। असे म्हटले जाते. म्हणजेच गणपती हा आनंद देणारा आहे. ब्रह्मस्वरूप आहे, सच्चिदानंद असून अद्वितीय आहे. आपल्या परिसरातील भूगोल, पर्यावरण याचा विचार केला तर या काळात शेतीची कामे बऱ्यापैकी झालेली असतात. शेतात मुख्यत: भात किंवा खरीपाचे अन्य पीक तयार होत असते. येणाऱ्या काळात कोणतेही संकट न येता हे सारे पीक भरभरून यावे, पुढल्या काही महिन्यात सर्वत्र सुख-समाधान असावे यासाठी सुद्धा गणरायाचे आशीर्वाद मागितले जातात. मुख्यत: कामे उरकली असल्याने लोकाना देखील परस्परांकडे जाणे सुलभ होते. सुख-दुःखाच्या गोष्टी होतात. रोज रात्री गणपतीची आरती झाल्यावर एखाद्या घरी छान मैफल रंगते. गायन, वादन, भजन, कोकणातील खास असे जाखडी नृत्य / खेळे हे सारे गावोगावी रंगते. माणसे त्यात भान विसरून रमतात. पुढील कामांसाठी, कष्टासाठी पुन्हा सज्ज होऊन जातात. त्यांच्या मनाला उभारी मिळण्यासाठी आवश्यक असे आनंदी,प्रसन्न असे वातावरण गणपती उत्सवामुळे मिळते असे सांगितले तर वावगे ठरणार नाही.

गावागावात विविध सार्वजनिक गणपती असायचे. हल्ली त्यांचा जरा जास्तच अतिरेक होत असला तरी पूर्वी या सार्वजनिक गणपतीच्या मंडपात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत. अनेक दिग्गजांचे गायन, वादन, भाषण, विविध वाद्यवृंदांचे कार्यक्रम यामुळे गावोगावी गणेशोत्सव हा अगदी हवीहवीशी गोष्ट वाटायची. गणपती आले असे म्हणे पर्यन्त गणपती विसर्जनाचा दिवस जवळ येत राहायचा. आपापले दुःख, दैन्य, एकटेपण,अपयश हे सारे काही काळ विसरायला लावणारा, लोडाला टेकून मोदक फस्त करणारा तो प्रसन्न गजानन म्हणूनच आनंददायी जिवलग वाटला नसता तरच नवल होते.

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com )



Thursday 21 September 2023

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा....

 #सुधा_म्हणे: गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा...

21 सप्टेंबर 23

एकेकाळी पारतंत्र्यात असलेल्या महाराष्ट्रात “शक्तीने राज्य चालते..” असे सांगत समर्थ रामदासांनी लोकाना शक्तीची साधना करण्याचा आग्रह केला. हनुमंतासारखे, पराक्रमी रामासारखे आराध्य दैवत समोर ठेऊन बलोपासना करायला प्रवृत्त केले. कीर्तन, प्रवचन, वैयक्तिक भेटीगाठी यामधून हजारो लोकांना पुन्हा आत्मविश्वास दिला. नाशिक ते सातारा –कोल्हापूर या संपूर्ण पट्ट्यात अनेक ठिकाणी हनुमंताची मंदिरे उभी करून तिथे व्यायामशाळा उभ्या करण्यासाठी लोकाना प्रोत्साहन दिले. समाज प्रबोधनासाठी गावोगावी हिंडणाऱ्या, शेकडो लोकाना भेटणाऱ्या समर्थांनी मुक्काम मात्र एकांत स्थळी केले. घळी, जंगले, वनातील मंदिरे इथे वास्तव्य केले.

चाफळ सारख्या ठिकाणी देवाचा उत्सव असताना देखील ते “दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो..” असे म्हणतात. दासबोधासारखा अनमोल ग्रंथ, विविध आरत्या, अभंग, श्लोक अशा प्रकारे उदंड साहित्य निर्माण केलेल्या समर्थांनी गावोगावी शिष्य गोळा केले. संपूर्ण भारतात सुमारे 1100 मठांची निर्मिती करून उत्तम संघटन कौशल्याचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले. या सगळ्या संघटन कार्यात त्यांचे मुख्य शस्त्र होते मनाचे श्लोक. घरोघरी माधुकरी म्हणजे भिक्षा मागूनच रामदासी शिष्याने आपला उदरनिर्वाह करावा असा त्यांचा दंडक होता. ही भिक्षा मागत असताना शिष्याने जो श्लोक म्हणावा त्यासाठी त्यांनी अद्वितीय अशा “मनाच्या श्लोकांची” निर्मिती केली. लोकांच्या जगण्यातील, वर्तणूकीतील साध्या साध्या गोष्टींवर भाष्य करणारे हे मनाचे श्लोक अतिशय लोकप्रिय झाले. त्यातील भावना, आर्तता आणि उपदेश लोकाना सहज समजत राहिला.

या मनाच्या श्लोकांची सुरुवात करताना अर्थातच त्यांनी गणेशाला वंदन केले आहे. ते म्हणतात,

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा

नमू शारदा मूळ चत्वार वाचा

गमू पंथ आनंत या राघवाचा

सर्वगुण संपन्न असा तो गुणेश, मूलाधारचक्राचा अधिपती असा तो गणपती, सर्व शिवगण किंवा शिवशंभूच्या सैन्याचा सेनापती असा तो विघ्नहर्ता गणनायक म्हणूनच हजारो वर्षे सर्वाना वंदनीय ठरला. बाल गणेश, नृत्य गणेश, संगीतज्ञ गणेश, सेनापती गणेश, रिद्धी-सिद्धीचा गणेश अशी गणेशाची किती रुपे सांगावी. “कोटी कोटी रुपे तुझी..”असेच म्हणावे लागते.

समर्थ सुद्धा “मनाचे श्लोक” या आपल्या अद्वितीय रचनेच्या सुरुवातीला सर्वगुणसंपन्न गणपतीला, त्या गणाधीशाला वंदन करताना निर्गुणाचा आरंभ म्हणतात. त्याच्या कोटी कोटी सगुण रूपातच गुंतून राहण्यापेक्षा त्याच्या निर्गुण निराकार रूपाकडे आपले लक्ष वेधतात असे मला वाटते.

मित्रहो, समर्थांनी आपल्या विविध रचनांमधून ईश्वरी शक्तीचे गुणगान केले. देवाची भक्ती करत राहताना त्यापासून आपण ऊर्जा घ्यावी, आदर्श घ्यावा, दुर्गुण त्यागावे आणि उत्तम गुण अंगी बाळगावे असे या मनाच्या श्लोकातून सांगत राहतात.

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी

मना सज्जना हेची क्रिया धरावी

मना चंदनाचे परी त्वा झिजावे

परी अंतरी सज्जना निववावे

अशा साध्या शब्दातून लोकाना जगण्याचे उत्तम मार्ग दाखवत राहिले.

गणपतीच्या, रामाच्या, शंकराच्या, हनुमंताच्या विशाल बुद्धी आणि शक्तीची जोड आपल्याही आयुष्याला लाभावी असे मागणे मागत राहतात. खंडोबा किंवा मल्हारीच्या आरती मध्ये तर अशा शक्तिशाली ईश्वराची स्तुति करताना “रामी रामदास जिवलग भेटला..” असे म्हणतात. गावोगावी हिंडून लोकसंग्रह करणाऱ्या समर्थांना उत्तम गुण वाढवत लोकानी एकत्र यावे असे वाटते. “देव मस्तकी धरावा.. अवघा हलकल्लोळ करावा” असे त्यांना तळमळून सांगावेसे वाटते. हा हलकल्लोळ पराक्रमाचा आहे, सदगुणांचा आहे याची जाणीव आपण ठेवून वागलो तरी पुरेसे आहे असे मला वाटते.

(विशेष नोंद: सोबतचे छायाचित्र हे हळेबीडू येथील विशालदेही गणेशाचे आहे. इतक्या भव्य आणि देखण्या मूर्तीला शिल्पकारांनी फार नाजूकपणे दगडातील दागिने घडवत सजवले होते. ज्या मूर्ख आणि विध्वंसक लोकाना या मूर्तीची तोडफोड करावीशी वाटली त्यांच्याविषयी अत्यंत कीव आणि संताप वाटतो.)

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com )



Tuesday 19 September 2023

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची...

 #सुधा_म्हणे: सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची...

19 सप्टेंबर 23

श्री गणराय घरी येऊन विराजमान झाले की अवघ्या घराची कळाच बदलून जाते. तुमचे घर लहानसे दोन खोल्यांचे असो की मोठे ऐसपैस असो, विशिष्ट जागी विराजमान झालेली गणेशाची ती तुंदीलतनु स्मितवदनी मूर्ती घरात भरभरून चैतन्य घेऊन येते. लंबोदर असला तरी गणपती चपळ आहे, पराक्रमी आहे, एकीकडे साहित्य आणि संगीतज्ञ असलेला गणपती प्रसंगी कठोर दुष्टनिर्दालक आहे. खादाड आणि निवांत लोडाला टेकून बसलेला दिसत असला तरी ज्ञान-विज्ञान-कला यांच्यावर त्याचे प्रभुत्व आहे. म्हणूनच त्याची स्तुति करताना हजारो वर्षांपूर्वी ऋषीनी “त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि..” असे म्हटले आहे. 

अशी कोणतीच गोष्ट नाही की जी गणपतीला शक्य नाही. म्हणूनच त्याच्या दर्शनाने आपल्या चित्तवृत्ती शांतवत रहातात. आपण सोसलेले त्रास, दुःखे या सगळ्याचा त्याच्या संगतीत जणू विसर पडतो. तो राहणार असतो मोजकेच असे काही दिवस मात्र तरीही त्याच्या अस्तित्वाने अवघे घर जणू आनंदाने भरून जाते. इतकेच नव्हे तर त्याच्या नुसत्या येण्याच्या चाहुलीनेदेखील अंगी उत्साह संचारतो. किती आणि काय करू असे होऊन जाते.

म्हणूनच बाप्पा गणेश येण्यापूर्वीच सर्वत्र त्याच्या स्वागताची तयारी सुरू होते. आरास करणे, नैवेद्यासाठी विविध पदार्थ करायचे असतात त्याची तयारी करणे यामध्ये कसा वेळ जातो ते कळत नाही. लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तिपर्यंत सर्वाना गणपती आपला वाटतो हेच त्याचे वेगळेपण. त्याचे ते गोंडस रूप मनात आनंदलहरी निर्माण करते.

समाजातील सर्व थरातील लोक आपापल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करू शकतात ही किती सुंदर गोष्ट आहे. तो गणपती कुणा विशिष्ट लोकांचा, विशिष्ट वर्गाचा नव्हे तर सर्वांचा जिवलग आहे ही जाणीवच एक आनंदमय वातावरण निर्माण करते. म्हणूनच मग घरोघरी आरतीची सुरुवात करताना ओठावर हेच शब्द येतात;

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची|

समर्थ रामदासांनी रचलेली ही आरती म्हटल्याशिवाय घरोघरी गणपती आलेत असे वाटतच नाही. इतकेच नव्हे तर वर्षभर जिथे जिथे आरतीची वेळ असते तिथे तिथे सर्वप्रथम “सुखकर्ता दुखहर्ता..” म्हणणे अपरिहार्य आहे. समर्थ रामदास हे मुळात शब्दप्रभू. त्यामुळे त्यांना दिसलेला गणेश कसा आहे याचे ते अतिशय प्रसन्न अशा शब्दात वर्णन करतात. आरती लिहिताना कोणत्याही जड शब्दांच्या ऐवजी सर्वांच्या तोंडी सहज रुळतील अशा “दर्शनमात्रे मनकामना पुरती..” सारख्या सहजसोप्या नादमधुर शब्दांचा समर्पक उपयोग करतात. लंबोदर, वक्रतुंड आदि गणेश नामे सहजतेने आरतीमध्ये गुंफताना “रुणझुणती नुपुरे चरणी..” असे म्हणत आपल्या रचनेला गेयता देतात.

समाजाचे प्रबोधन करायचे असेल, लोकाना नवीन काही शिकवायचे असेल तर थेट व्यासपीठावर बसून उपदेशांचे डोस द्यायचे नसतात तर आधी लोकांच्या मिसळायचे असते, त्यांना आपल्या वागणुकीने आपलेसे करायचे असते. त्यांना उमगेल त्यांच्यासाठी ज्या गोष्टी सुखाच्या असतात ते उमगले पाहिजे, त्यांच्या दुःखाच्या क्षणी आपल्याला त्यांना आधार देता यायला हवा आदि सगळ्या गोष्टी समर्थांना पुरेपूर ठाऊक होत्या. त्यामुळे जेंव्हा ते समाज प्रबोधनासाठी सर्वत्र बाहेर पडले तेंव्हा कीर्तन, प्रवचन याद्वारे जनसंपर्क साधताना, लोकांच्या मनात रुजण्यासाठी अशा उत्तमोत्तम आरत्या त्यांनी लिहिल्या. गेली सुमारे चारशे वर्षे ही आरती समाजाच्या ओठावर आहे यातच त्या शब्दांचे, त्या भक्तीभावनेचे अमरत्व आहे असे मला वाटते.

विशेष नोंद: सोबतचे गणपतीचे चित्र हे प्रतिभाशाली चित्रकार अशी मान्यता पावलेले, कोल्हापूरमधील थोर चित्रकार आबालाल रेहमान यांनी १९१७ मध्ये रेखाटलेले आहे.)

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com )





Monday 18 September 2023

ॐकार प्रधान रूप गणेशाचे..

#सुधा_म्हणेॐकार प्रधान रूप गणेशाचे..

18 सप्टेंबर 23

दरवर्षी श्रावण संपत आला की आपल्या सर्वाना वेध लागतात ते गणपतीचे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र लगबग सुरू होते. अवघे वातावरण प्रसन्न होऊन जाते. लहानापासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांचे लग्न गणपतीकडे लागून राहते. विविध मूर्तीशाळांमध्ये तयार होणाऱ्या मूर्तीवर शेवटचा हात फिरत असतो. त्या रेखीव मूर्तीचे डोळे असे काही रंगवले जातात की जणू प्रेमळ नजरेने गजानन आपल्याकडे पाहत आहे असेच वाटून जाते. “बाप्पा मोरया” च्या गजरात ती लंबोदर मायाळू अशी गणेशमूर्ती घरी येऊन विराजमान होते. एक हवाहवासा जिवलग घरी आल्याचे समाधान आपल्याच चेहेऱ्यावर विलसू लागते.

आपल्या आयुष्यात कोणतीच अडचण येऊ नये म्हणून कोणत्याही कार्यात सर्वप्रथम विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करावी असा एक संकेत आहे. तो विघ्नहर्ता आहे, दीनांचा कैवारी आहे, सुखवृद्धी करणारा आहे. त्याचबरोबर 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असा हा गणपती. त्यामुळे त्याच्या पासून प्रेरणा घेत अनेक कलावंत देखील आपल्या सादरीकरणापूर्वी गणेशवंदन करतात. सर्वांना आनंद देणारा, सुख देणारा असा गणेश म्हणूनच अनेकांचा आवडता देव. प्राचीन काळातील यज्ञयाग असो, विविध उपासना असोत, गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कविनामुपमश्रवस्तम्” असे म्हणत कायम गणेशाला अग्रपूजेचा मान दिला जातो.

साहित्याचा विचार केला तर वेदकाळापासून अनेक ग्रंथांच्या सुरुवातीला गणेश वंदन केले जाते. विविध स्तोत्रांची सुरुवातच “श्रीगणेशाय नम:” अशी केली जाते. वेदकालीन गणपती अथर्वशीर्षामध्ये “ त्वं ब्रह्मा.. त्वं विष्णु: त्वं रुद्र: त्वं इन्द्र त्वं अग्नि: त्वं वायु: त्वं सूर्य: त्वं चंद्रमास्त्वं..” असे म्हणताना विश्वात सर्व काही गणेश आहे असे मानले जाते. ज्याना वेदाध्ययन करण्याचा अधिकार तत्कालीन समाजव्यवस्थेने दिला नव्हता ते तुकोबा देखील व्यासांचा दाखला देत अगदी हेच सांगून जातात. तुकोबांचे शब्द इतके साधे सोपे की अडाणी माणसालादेखील सहज समजून जावेत.

ॐकार  प्रधान रूप गणेशाचे I

हे तिन्ही देवांचे जन्मस्थान II

अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णु I

मकार महेश जाणीयेला II

ऐसे तिन्ही देव जेथूनी उत्पन्न I

तो हा गजानन मायबाप II

तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी I

पहावे पुराणी व्यासाचिया II

सुमन कल्याणपूर यांच्या सुरेल आवाजातील ही गणेशवंदना मनाला भिडणारीच. तुकोबांच्या सुरेख शब्दांना संगीत दिले होते कमलाकर भागवत यांनी. आज घरोघरी गणपती येत राहतील आणि उद्या यथाशक्ति यथामति पूजा झाल्यावर गणरायाची प्राणप्रतिष्ठा होईल त्यावेळी नक्कीच हे गाणे आपल्या मनात गुंजत राहील. आपापल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणेशाने सर्वाना उदंड आशीर्वाद द्यावेत ही प्रार्थना.

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com )