marathi blog vishwa

Wednesday 25 March 2020

कणखर पोलादी असा ग्राहम होप्स

गेल्या 27 वर्षात नोकरी व्यवसायामुळे अनेक माणसांशी संपर्क आला. त्यातील ज्या काही मोजक्या व्यक्ती कायम लक्षात राहतील त्यातच एक होता ग्राहम होप्स ( Graham Hopps). कित्येक रात्री आम्हाला झोपू न देणारा हा माणूस नंतर माझा छान मित्रही बनला..!


ग्राहम मूळचा इंग्लंडचा. कतारमधील एका अत्यंत कठीण अशा प्रोजेक्टवर काम करत असताना तो भेटला. नकोसा झालेला तो आमच्या कंपनीला. मात्र त्याच्यासोबतच मला मात्र जुळवून घेत काम करावं लागणार होतं...!
बहारीन मधला L&T चा आमचा प्रोजेक्ट संपत आलेला. पुढच्या प्रोजेक्ट साठी मी दुबई- अबुधाबी ला कुठेतरी जायचं असं वरिष्ठ पातळीवर ठरत होतं. आणि अचानक बॉम्ब पडला. आमच्या गल्फ हेडनी सांगितलं की, “कतार मधल्या हलुल आयलंड प्रोजेक्टवर गोंधळ सुरु आहे. दोन प्रोजेक्ट manager पळून गेलेत. दोन जणांना क्लायंट ने नाकारलं आहे. तिथे महत्वाचा माणूस हवाय. तू ताबडतोब तिकडे जायला हवं”. त्या प्रोजेक्ट बाबत कळले होतेच. जायची मुळीच इच्छा नव्हती मात्र सर्वोच्च पोस्टवरील साहेबाचं म्हणणंही टाळणं शक्य नव्हतं.
विविध सोपस्कार पार पाडून मी गडबडीने क़तार ला कंपनीच्या गेस्ट हाउस मध्ये दाखल झालो. त्यापूर्वी क्लायंटसमोर मला दाखवण्याचे” “ होकार मिळवण्याचे सोपस्कार पार पडले गेले होतेच.

मी दुपार नंतर पोचलो आमच्या प्रोजेक्ट ऑफिसला. माझ्या हाताखाली तुलनेनं नवीनच असलेली ४-५ मंडळी असणार होती. आपलं मुख्य ऑफिस तुम्हाला सगळा सपोर्ट देईल वगैरे आश्वासनं घेऊन मी माझ्या टीमकडे वळलो. सगळे प्रचंड घाबरलेले होते कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता weekly progress review मिटिंग होती..! आणि ती मीटिंग ग्राहम च्या नेतृत्वाखाली होत असे..!

मिटिंग मध्ये कोणते महत्वाचे प्रश्न समोर येतील, आपण आपला बचाव कसा करायचा वगैरेबाबत चर्चा, रिपोर्ट फायनल करणे यात रात्रीचे १० वाजून गेले होते. त्यानंतर कधीतरी गेस्ट हाउस ला येऊन जेवून झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता ग्राहम चा फोन. सुप्रभात वगैरे ५-१० सेकंदांची औपचारिकता संपल्यावर त्याची तोफ सुरु झाली... साईट वर काय काय झालं काल समजलं काय? त्याबाबत सगळे डीटेल्स घेऊन या तुम्ही... तुमची कंपनी युसलेस आहे... तुम्ही कधीच हा प्रोजेक्ट पुरा करू शकत नाही वगैरे...वगैरे..
सकाळ झाली होती..! पुढचे कित्येक दिवस रोजचा दिवस कसा उजाडणार त्याची ही नांदी होती..!
ही दर आठवड्याची मिटिंग होऊच नये, काही न काही कारणाने रद्द व्हावी असं आमच्या टीमला सतत का वाटत असे हे तिथे गेल्यावर कळले.
----
हलुल आयलंड. क़तार पासून १०० किमी आत समुद्रात असलेलं हे बेट. येथे क़तार च्या समुद्रात सापडणारे सर्व खनिज तेल एकत्रितपणे मोठमोठ्या टाक्यांमधून साठवले जाते. त्याविषयी जास्त काही मी सांगणार नाही कारण ते सर्व गोपनीय आहे. तिथे तोपर्यंत वीजपुरवठा हा जनरेटर्स च्या माध्यमातून होत होता. त्या ऐवजी कतार पासून हलुल पर्यंत समुद्राच्या तळाशी १०० किमी लांबीची १३२ केव्ही या उच्च दाबाची वीजवाहिनी टाकायची. दुसऱ्या टोकाला वीज केंद्र उभं करून सगळं त्याला जोडायचं असा हा प्रकल्प. पहिल्यांदाच त्या सर्व भागात घडणारा..!

क़तार पेट्रोलियम चा हा प्रोजेक्ट. ते प्रमुख. केबलचं काम करायला एक कोरियन कंपनी आणि बाकी सर्व कामं करायला आम्ही L&T चे भारतीय. ग्राहम त्या कोरियन कंपनीचा २ नंबर फळीतला अधिकारी होता, आणि त्याच्यासोबत आम्हाला रोज सर्व कामांचे नियोजन, निगराणी करायची होती..!
 समुद्र किनाऱ्याजवळील प्रवाळ खडकांना धक्का बसू नं देता त्यांना दुसरीकडे हलवणे, प्रोजेक्ट ला काम करायला साईटवर येणाऱ्या लोकांसाठी कॉलोनी उभी करणे, सुमारे चार-पाचशे लोकांचं जेवण दिवसात दोनदा बनू शकेल असं मोठं किचन, जेवणाचा हॉल उभा करणे, पाणी पुरवठा आणि ड्रेनेज सिस्टीम तयार करणे अशी अन्य कामही मुख्य कामासोबत करावी लागणार होती... आणि या सर्वांसाठी logistics यंत्रणा नव्हतीच. ती नव्याने घडवावी लागणार होती..!

मुख्य वीजकेंद्र उभं करणं या व्यतिरिक्त अन्य कामांपैकी बहुतेक कोणतीही गोष्ट माझ्या हाताखालील टीमला फारशी माहितीच नव्हती..! आमच्या वरिष्ठांना कामाची कल्पना असली तरी दूर समुद्रातील बेटावर हे सगळ कसं उभं करायचं याचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता. त्यामुळे जे बजेट तयार केलं गेलं होतं तेही अंदाजाने.
अशा परिस्थितीत तिथं कामासाठी जाणे म्हणजे जणू आत्महत्याच अशी सर्व अन्य प्रोजेक्ट managers भावना असल्याने सर्वांनी पळ काढला होता आणि मी तिथे पोचलो होतो..! आणि मला रोज ग्राहम ला तोंड द्यायचं होतं.



---
२०१३ मधल्या त्या पहिल्या वीकली मिटिंगचं दृश्य आजही मी विसरू शकत नाही. एका खूप मोठ्या टेबलच्या समोरच्या बाजूला त्या कंपनीचे ७-८ गोरे लोक बसलेले. ३-४ जण ब्रिटीश, कुणी तुर्कीचे, कुणी स्पेन चे आणि २ -३ कोरियन ही. इन्जिनिअरिन्ग डिझाईन, परचेस, contract, finance, Health and safety, क्वालिटी कंट्रोल आदि डिपार्टमेंटचे. सगळ्यांच्या समोर आम्ही ४ जण.

एक ज्वलंत विषय गेले दोन दिवस चर्चेत होता, आमची साईट वरील टीम तिथे एरियात खोदकाम आणि लेवालिंग करत होती. त्यांनी खोदकाम करताना पाण्याची एक लहानशी 1 इंची लहानशी पाईपलाईन तोडली होती. ती पुन्हा काही मिनिटात जोडलीही गेली, मात्र ग्राहम चे म्हणणे होते की आमचा साईट वरील manager अननुभवी आहे आणि त्याला ताबडतोब काढून टाकावे.

मग मी शांतपणे सागितले की काही लहानशी चूक झाली म्हणून एखाद्याला ताबडतोब काढून टाकणे हे योग्य नव्हे. आपण योग्य ती खबरदारी घेऊ. तसेच तिथे साईटवर योग्य नकाशे आपल्याला मिळालेले नाहीत, जमिनीखाली खूप पूर्वी काही काम केलं असेल तर त्याची  as built drawings आम्हाला ताबडतोब मिळवून द्यावीत, ती जर दिली नाहीत तर असं पुन्हा घडणे शक्य आहे.

आणि मग ग्राहम पेटला. त्याची अपेक्षा होती की मी लगेच त्याचं ऐकेन, आमच्या साईट manager ला परत बोलवेन... मात्र मीही बाह्या सरसावलेल्या त्याला पसंत पडले नाही. मी माझ्या टीमच्या पूर्ण पाठीशी उभा राहिलो. प्रत्येक गोष्टीबाबत योग्य documents बनवून ठेवायच्या सर्वांना सूचना दिल्या हेही त्याला आवडलं नाही.

आणि तिथून मग जवळपास रोजची फोनवरून होणारी भांडणं, इमेल वरूनची भांडणं सुरु झाली. मला पाठवलेल्या मेल ची कॉपी तो माझ्या व त्याच्या वरिष्ठांना मुद्दाम मार्क करायचा. जणू त्यामुळे मी घाबरून जाईन असं त्याला वाटत असावे. मी उलट याच गोष्टींचा फायदा करून घेतला.
एकूणच प्रोजेक्ट स्पेसिफिकेशन मध्ये किती त्रुटी आहेत, कोणती गोष्ट आमच्या अखत्यारीत नाही, कोणत्या कामाला क्लायंट मुळे उशीर होतोय किंवा झालाय हे सगळं मी त्यात सांगू लागलो. दिवसात १०-१२ मेल यायचे त्याचे. त्यावर उत्तरं द्यावी लागायची. ते सगळं सांभाळून अन्य कामं करायची. त्यात पुन्हा लोकांचे कॉल्स, यंत्र-सामुग्री देणाऱ्या venders च्या मिटींग्स या सगळ्यात रात्रीचे १० कधी वाजून जात ते कळत नसे.

मग मी अधिकृत पत्रव्यवहार करून सगळ्याचं रेकॉर्ड तयार केलं. ती पत्र जशी वरिष्ठांना मिळू लागली त्यामुळे ग्राहम अधिकाधिक भडकू लागला. कारण मी त्याच्या वरिष्ठांना पत्र लिहिणं त्याला मंजूर नव्हते. आणि मग रोजच्या भांडणांना अधिकाधिक धार येऊ लागली. रोज कुठलातरी एक मुद्दा घेऊन आम्हाला छळणे हा त्याचा जणू छंद बनला. त्याच्या प्रत्येक इमेल ला, प्रत्येक पत्राला मी तितकच ठोस उत्तर देत होतो मात्र शांत भाषेत. कारण शेवटी तो आमचा क्लायंट होता..!
या माणसाला कामाची अचूक माहिती आहे मात्र त्याला इतका इगो का, इतका superiority complex याचा मग मी शोध घेऊ लागलो.
-----
ग्राहम विविध प्रोजेक्ट्सवर काम करून आलेला. त्याहीपेक्षा महत्वाचं काही त्याच्यासोबत घडलं होतं ते इराकमध्ये.
इराकमध्ये तो २००३ मध्ये एका प्रोजेक्टवर काम करत होता. बसरा या शहरात. तेंव्हा तिथे युद्धजन्य परिस्थितीच होती. साईटवर जायचं तर सोबत सैनिक घेऊन जावं लागे. एक दिवस काही कामासाठी त्याला बाहेर जायचं होतं तर काही रस्ते बंद केलेले. कार मधून ते जात होते आणि रस्त्यावर बॉम्बस्फोट झाले. ग्राहम ला जेंव्हा शुध्द आली तेंव्हा कळले की शेजारी असलेल्या इराकी माणसाचे डोकेच गायब आहे आणि त्याला खूप ठिकाणी लागलं आहे. तो पुन्हा बेशुद्धावस्थेत गेला.

हॉस्पिटलमध्ये कित्येक तासानंतर तो शुद्धीवर आला. प्रथम बसरा मध्ये आणि नंतर इग्लंडमध्ये तो कित्येक महिने हॉस्पिटलमध्येच होता. त्याचा उजवा खांदा पूर्ण निकामी झालेला आणि शरीरात लहानमोठ्या अशा १३६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या..!

त्याच्या पत्नीला प्रथम सांगण्यात आले की त्याला थोडीफार दुखापत झालीये. मात्र ती जेंव्हा हॉस्पिटलमध्ये त्याला पाहायला आली तेंव्हा त्याचा अवतार पाहून खुर्चीतून ती खालीच कोसळली...! इतकं सगळं ग्राहम ने सोसलं. त्या वेदना, तो त्रास सहन करत तो त्या अंथरुणातून उठून बसला. इतकंच नव्हे तर त्याने इराकी मिलिटरी आणि त्याच्या कंपनीवर केस देखील केली. माझ्यासोबत सैनिक न दिल्याने मला इतका शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला..असं सांगत त्याने 1 मिलिअन युरो चा खटला दाखल गेला. कोर्टात तो खूप भांडला. मात्र सैनिक असता तर त्याला इजा झाली नसती असं काही शक्य नव्हते त्यामुळे त्याचा दावा मंजूर होऊ शकला नाही. या अपघातानं त्याला भरपूर शारीरिक इजा झाली. त्याच्या उजव्या हाताने साधा बल्ब बदलणे इतकं काम ही तो करू शकत नसे. अनेक रात्री मानसिक अस्वास्थ्यामुळे झोप येत नसे.
या सगळ्यातून सावरून तो पुन्हा कामाला लागला होता.! विविध प्रोजेक्ट्सवर काम करत होता.. मला त्याच्याविषयी खूप कौतुक वाटलं. साध्या साध्या अपघाताने, आजारपणाने आपण हतबल होऊन जातो तिथं हा पठ्ठ्या मात्र पुन्हा पाय रोवून उभा होता..!
---
दुसऱ्या दिवशी कामानिमित्त आम्ही भेटलो. त्यानंतर मी त्याच्याशी गप्पा मारत बसलो. त्यानं जे भोगलं, सोसलं त्याविषयी कौतुक आणि सहानुभूती व्यक्त केली. ग्राहम सुखावला. मात्र म्हणून त्याचं वागणं बदलणार नव्हतंच.

मी माझ्यापरीने काम करत राहिलो. मुख्यतः आम्ही कतार च्या राजधानीत दोहा येथे राहत होतो. मात्र साईटवर सुरु असलेल्या कामाची पाहणी करायला हेलिकॉप्टर ने जात होतो. साईटवर सध्या खिळ्यापासून ते फळे, भाजीपाला, धान्य, टिशू पेपर्स सह मोठ्या मशिनरी पर्यंत कोणतीही वस्तू केवळ बोटीने पाठवावी लागे. दर ८-१५ दिवसांनी जाणाऱ्या बोटीवर काय काय पाठवायचं याचं खूप बारकाईने प्लानिंग करावं लागे. अनेकदा त्यासाठीही, सेफ्टी डिपार्टमेंटच्या कामांसाठी साईटवर जावं लागे. कित्येकदा मग ग्राहम ही सोबत यायला लागला.
आपलं जिथे काही चुकेल तिथं सरळ ते कबूल करायचं. जिथे एखादी गोष्ट समजत नाही तिथे त्याबद्दल नीट खुलासा मागायचा ही माझी नेहमीची पद्धत. माझ्या पारदर्शक कामामुळे त्याला माझ्याविषयी विश्वास वाटू लागला. इतका विश्वास की त्याच्या अनुभवामुळे त्याला समजू शकणाऱ्या, कामाबाबतच्या काही खास गोष्टी तो मलाही सांगू लागला. प्रोजेक्ट्स ला पुढे कोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात याबाबत आधीच त्याला काय वाटतं ह्याबाबत चर्चा करू लागला. कित्येकदा त्याचं मत मला पटायचं नाही कारण सतत तो कुणाला तरी दोष देत असायचा. कधी कोण्या उत्पादकाला कधी कुणा इंजिनिअर ला, कधी कुण्या सहकाऱ्याला..

मात्र मी शांतपणे त्याचं ऐकून घ्यायचो. आमच्या सगळ्या टीमला ही सांगून ठेवलं होतं की ग्राहम तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे, घरात एखादा खडूस ज्येष्ठ माणूस असतो तसा तो आहे असं समजा. त्याला उगीच उलट उत्तरं देऊ नका. जे काही सांगायचं ते मी सांगेन. तुम्ही त्याला उगीच चिथावू नका...
तरीही तो काही खूप प्रेमाने वागू लागला असं नव्हे. सतत समोरच्याला घाबरवत राहणं त्याला बहुदा आवडत असावं. आम्ही त्याला घाबरायचं बंद केलं. त्याचा मान जरूर ठेवला मात्र कोणत्याही चुकीच्या आरोपांना कधीच स्वीकारलं नाही.. त्याचा प्रतिवाद आम्ही करत राहिलो. मात्र त्यात आता कटुता उरली नव्हती. तो त्याच्या कंपनीच्या बाजूने आम्हाला टार्गेट करायला पाही. आम्ही आमच्या कंपनीचं भलं पाहत होतो.

एक दिवस त्याला म्हटलं की, ग्राहम, तू आमच्या टीमला रोज शिव्या देत राहिलास तरी हा प्रोजेक्ट फक्त आम्हीच पूर्ण करून दाखवू शकतो, अक्ख्या कतार मध्ये दुसरी कोणतीही कंपनी हे करून दाखवू शकणार नाही हे तुलाही माहिती आहे. तेंव्हा तुझा कडवटपणा, हे सतत नावं ठेवणं कमी कर. जी मानसं खरंच चांगलं काम करतायत मग त्यात एखादा कामगार असेल, एखादा सुपरवायझर असेल एखादा इंजिनिअर असेल, किचन सांभाळणारा कुक असेल किंवा मालवाहतूक करणारा ड्रायव्हरही. तुझ्यासारख्या ज्येष्ठ माणसाने त्याचं जरा कौतुक करायला हवं. ही माणसे घरापासून दूर राबतायत त्यानाही कधीतरी प्रोत्साहनपर शब्दांची गरज असते. वयानं मोठा असूनही ग्राहमनं ते ऐकलं. यापुढे नक्की मी हे लक्षात ठेवेन असं म्हणाला...! नेहमी ताठ्यात वागणारा तो कधीकधी छान मित्रासारखा वागायचा माझ्याशी. त्या दिवशी त्याचा मूड असाच छान होता. आपला संसार, बायको, मुलगी यांच्याविषयी तो भरभरून बोलत राहिला.
त्यानंतर २-३ दिवस गेले असतील.

आणि एक दिवस अचानक...
शुक्रवार हा आमचा क़तार मधील सुट्टीचा दिवस. शनिवारी सकाळी ७ वाजता ऑफिसमध्ये पोचलो आणि वसिलिअस या अन्य सहकारी मित्राचा कॉल आला. ग्राहम ला खूप मोठा अपघात झालाय. आयसीयु मध्ये आहे तो.

त्याचं झालं असं की, शुक्रवार सुट्टीचा दिवस. सगळी मित्रमंडळी फिरायला बाहेर पडली होती. दोहा पासून ५०-६० किमी अंतरावर वाळूच्या टेकड्या आहेत. तिथे ग्राहमसह काही जण वाळवंटात बाईक चालवायला गेलेले. वाळूच्या लहान टेकड्यांवर चार चाकी मोटारसायकल चालवायची असते त्याला तिथे quad biking असं म्हणतात. बाईक चालवताना एका उंचवट्यावरून खाली येताना जोरदार झटका बसला आणि ग्राहम चं डोकं त्याच्याच बाईकवर प्रचंड वेगाने आदळलं. तो आघात इतका वेगवान होता की कपाळ फुटलं, डोळ्याला मोठा मार लागला, प्रचंड रक्त वाहू लागलं आणि ग्राहम क्षणात बेशुध्द झाला.
जवळच्या लोकांनी वेगवान हालचाली केल्या. डॉक्टर्स आले. हेलिकॉप्टरमधून लगेचच त्याला दोहा मध्ये मोठ्या हॉस्पिटलला आणलं गेलं.
--

२-३ दिवसांनी तो शुद्धीवर आला. विविध ऑपरेशन्स झाली होती. डोळ्याला मोठा मार लागलेला. डोक्याला मोठ्या जखमा.. त्यानंतरही कुणालाही भेटायची परवानगी नव्हती. ७-८ दिवस अजून गेले. मग भेटायला गेलो आम्ही काहीजण.
ग्राहमचा हात हाती घेतला. काळजी घे. लगेच धडपडत ऑफिसमध्ये यायची गडबड करू नको असं सांगितलं. बँडेज मध्ये बांधलेल्या त्याच्या फुटक्या चेहेऱ्यावर हसू फुटलं. क्षणात त्याचे डोळे भरून आले.. म्हणाला, “ दुसऱ्यांदा मोठ्या अपघातातून वाचलो. का देव असे हाल करतो माझे? ह्या वेदनांपेक्षा पट्कन गेलेलं बरं..

मी म्हटलं, ग्राहम आमच्याकडे भारतीय तत्त्वज्ञान असं सांगते की, “ तुम्ही जेवढं सहन करू शकता तेवढ्याच वेदना देव तुम्हाला देतो. तू खूप शूर आणि पोलादी माणूस आहेस. तूच हे सगळं सोसू शकतोस. ते आम्हाला जमणार नाही..! लवकर बरा हो. काळजी घे स्वतःची..
ज्याच्याविषयी आम्हा सर्वांच्या मनात गेली वर्षं-दोन वर्षं राग असायचा, त्याची ती अवस्था बघवली नाही. त्या दिवशी तरी वाटत होतं यातून ग्राहम काही बरा होत नाही. पण हा माणूस त्या मोठ्या जखमांवरही मात करून पुन्हा काही आठवड्यांनी ऑफिसमध्ये दाखल झाला. खरंच त्याच्या जिद्दीचं, कणखर मनाचं कौतुक वाटत राहिलं सर्वांना..!
---
पुढच्या काही महिन्यात प्रोजेक्टवर खूप मोठ- मोठी कामं आम्ही पार पाडली. मोठ्या बार्जेस मधून टनावारी वजनाचे ट्रान्सफॉरमर्स, स्वीचगिअर्स वगैरे बरंच काही पहिल्यांदाच त्या बेटावर आम्ही सुरक्षितपणे नेऊ शकलो. या सगळ्या कामातून एक नवीन प्रकल्प तिथे उभा राहिला. कतार पेट्रोलियम, एल एस केबल ही कोरियन कंपनी आणि आमची एल & टी या तीन कंपन्यांनी मिळून सुरुवातीला अशक्य वाटणारं असं ते सारं शक्य करून दाखवलं. खूप वेळा विविध मुद्द्यांवरून वाद-विवाद झाले, प्रसंगी काही माईलस्टोन गाठल्यानंतर सेलिब्रेशन्स झाली आणि एक इतिहास निर्माण झाला. त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सारं निर्माण करताना जी शेकडो माणसे तिथे राबत होती त्यातील एकालाही साईटवर साधी लहानशी जखमही झाली नाही. हेल्थ आणि सेफ्टी चे सर्व निकष पळून हे काम निर्माण झालं. त्याबाबतची सर्टिफिकेटस सर्वांना वाटली गेली.

आज मागे वळून पाहताना वाटतं, ग्राहम सारखं सतत चुका काढायला तत्पर असं व्यक्तिमत्व तिथं होतं म्हणूनच कदाचित आम्ही खूप बारकाईने काळजी घेऊन काम करू शकलो. साईटवरील सुपरवायझर पासून सर्वांच्या मनात ग्राहम चा आरडाओरडा नकोहा विचार असायचाच. त्यामुळे सगळे नेहमीच सतर्क राहिले.

 केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार,
मनुजा चातुर्य येत असे फार..

असा एक सुभाषितवजा श्लोक आहे. खूप फिरल्यामुळे मला चातुर्य प्राप्त झालंय की नाही हे माहिती नाही मात्र टणक पोलादी अशा ग्राहमसारखी वेगळी माणसं जवळून पाहता आली. त्यांच्याकडून कळत नकळत काही शिकायला मिळालं हे मात्र नक्की.
प्रोजेक्ट सोडून नंतर आम्ही कुठं कुठं निघून गेलो. ग्राहम पुन्हा ब्रिटनला गेला. मग परत गल्फमध्ये कामासाठी आलाय. आजही तो फेसबुक लिंक्ड इन च्या माध्यमातून संपर्कात आहे. कित्येकदा फोनवर गप्पा मारतो आम्ही. जुन्या गोष्टी आठवतो... एकमेकांना नावं ठेवतो, एकमेकांचं कौतुक करतो.. उज्ज्वल भविष्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देत राहतो..!

-    सुधांशु नाईक