marathi blog vishwa

Tuesday 16 December 2014

चिमण्यानो, परत फिरा, घराकडे...

लहान मुलींच्या लैंगिक शोषणाबद्दल जागतिक अहवाल असं सांगतो की किमान ६०% प्रकरणातील पुरुष हा त्या मुलीच्या परिचयाचा असतो. दुर्दैवाने हे कटू सत्य आहे की, स्वतःला प्रगत समजणाऱ्या तथाकथित पांढरपेशा समाजापासून अडाणी व अशिक्षित समाजापर्यंत सर्व थरातून मुलीचे लैंगिक शोषण हे जवळच्या ओळखीच्या माणसाकडून होते. हे थांबवायला हवं.


सुमित्रा. नेपाळ मध्ये उच्च माध्यमिक शाळेत शिकणारी. आई-बाप मोल मजुरी करणारे. घरी तिच्या व्यतिरिक्त आणि ३ बहिणी २ भाऊ. दहावी झाल्या-झाल्या बापानं सांगितलं, “पोरी, बास बाई आता तुझं शिक्षण. यापुढे तुला शिकवायला पैसे नाहीत माझ्याकडं. चार कामं कर. तेव्हढंच चार पैसे मिळतील, तुझं लगीन होईपर्यंत.” पण तिला शिकायचं होतं. मोलकरणीसारखं न राबता मोठ्या पगाराची नोकरी करायची होती. छान हौसे-मौजेत राहायचं होतं. मग आई-बापाशी वादावादी सुरु झाली.

त्यातंच एक दिवस मुंबईतून तिची मामे-बहिण गावाकडे आलेली. तिचं नटणं-मुरडणं, झकपक कपडे याची भूल पडली तिला. अल्लड कोवळं भिरभिरतं वय ते. बहिणीच्या बोलण्याला भुलली. चक्क नेपाळमधून पळून आली मुंबईला तिच्याबरोबर. बहिणीच्या घरात काही दिवस राहिली. तिचा नवरा बाहेर काही काम करे. एकदिवस त्यांच्या ओळखीची एक बाई आली. बहिणीने सांगितलं हीच तुला काम देईल, जा. “काही दिवस छोट्या चाळीत धुणी-भांडी करायचं काम कर. हजार रुपये मिळतील महिन्याचे. मग हळू हळू नोकरी शोध,” असं ती बाई म्हणाली.

सुमित्रा तिच्या घरी पोचली.

इंद्रधनुषी स्वप्न पाहणाऱ्या तिच्या फुलपंखी आयुष्यात मग अक्षरशः नरकयातना आल्या. कदाचित नरकयातना कमीच असतील..! त्या वेश्यावस्तीत या कोवळ्या मुलीवर एका दिवसात किती बलात्कार व्हावेत त्याची गणतीच नाही. कित्येक महिन्यानंतर अगदी योगायोगाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तिची व अन्य ५-६ नेपाळी युवतींची सुटका झाली. या संस्थेतून त्या संस्थेत असं करत करत त्यांना सुखरूप नेपाळला पोचवले गेले. मात्र तिच्या घरच्यांनी तिला घरी घेतले नाही. आता ती नेपाळच्या प्रसिद्ध अशा “माईती फौडेशन” च्या पंखाखाली सुखरूप आहे.

हे असं रोज सर्वत्र का घडतंय याचा आपण विचार करणार? कधी?

वेश्या व्यवसाय हा जगात नवीन नाही. पण वेश्या व्यवसायात लहान मुलामुलींना अडकवण्याच्या प्रकारात गेल्या काही वर्षात जबरदस्त वाढ झाली आहे. नेपाळसह भारत, बांगलादेश, थायलंड, फिलिपिन्स असे आशियाई  देश आज जगभरात अत्यंत कुप्रसिद्ध आहेत ते या child Trafficking साठी. हजारो लहान लहान मुली या देशातून परदेशी पाठवल्या जातात. यापैकी कित्येकींना जबरदस्तीने पकडून, अपहरण करून तर कित्येकींना गोड बोलून फसवून जगभर पाठवले जात आहे. कधी कुणाची तरी नातेवाईक मुलगी यात फसवली जाते तर कधी अनोळखी मुलीचे अपहरण करून तिला त्यात अडकवले जाते. असे फसवणाऱ्या लोकांच्यात त्या मुलीच्या आई-बापापासूनचे अनेक नातेवाईक सामील आहेत. प्रत्येकाची कारणे फक्त वेगळी. जगभरच्या तमाम पुरुषांच्या विकृत वासनातृप्तीसाठी केवळ या मुलीच नव्हे तर लहान लहान मुलेसुद्धा राबवली जात आहेत. हे सर्व भयानक आहे. सामान्य माणसाच्या विचारापलीकडले आहे.

मध्यंतरी एका कार्यक्रमात चर्चा सुरु असताना एक प्रतिष्ठित गृहस्थ म्हणाले, “वेश्या वस्ती आहे म्हणून आमच्या घराच्या मुली-बाळी सुखरूप आहेत”. त्यांचे वक्तव्य अनुदार आहेच कारण आपल्या सुखासाठी जो समाज दुसऱ्याच्या आयुष्याचा नरक बनवतो, तो माणूस नव्हेच. त्यामुळे त्यांच्या विचारांना तीव्र विरोध केला गेलाच. मात्र त्याही पुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की दुर्दैवाने आपल्या मुली-बाळी सुखी राहण्याचे दिवसही आता झपाट्याने बदललेत. आज माजोरी पुरुषत्व जे समाजात थैमान घालतेय ते फार फार चिंताजनक आहे आणि यावर वेळीच उपाय केले नाहीत तर परिस्थिती अक्षरशः हाताबाहेर जाणार हे नक्की.

सगळ्यात मोठी चिंता वाटते ती मिडियाची. इतक्या उथळपणे या गोष्टीची चर्चा केली जाते की त्यामुळे सत्ताधीशांवर दबाव निर्माण होतंच नाही. अपवाद “निर्भया” सारख्या बलात्कारांच्या काही प्रकरणांचा. समाजातील प्रतिष्ठित लोकं “मेणबत्ती मोर्चा” काढून प्रचंड काहीतरी केल्याचं समाधान मिळवतात. तरीही ठराविक दिवसांनी अशा अत्याचारांच्या बातम्या येतंच राहतात. टीव्हीवर थोर थोर विचारवंत तावातावाने फक्त चर्चा करतात. पेपरची पाने लेखांवर लेख छापून भरली जातात. पाने नंतर कचऱ्यात टाकली जातात. टीव्हीचे च्यानेल बदलले जातात. पुन्हा सगळं जैसे थे. पुढे काय ? काही नाही. पुन्हा येरे माझ्या मागल्या...!

आज तथाकथित सुखमय जीवनाची झिंग चढलेल्या आपल्या मनांना जाग कधी येणार? या समस्यांच्या मुळाशी आपण कधी पोचणार?


एखाद्या घरातील छोटी मुलगी आपल्या घरी /शाळेत किंवा ओळखीच्या माणसांच्या घरी निरागसपणे खेळत असते. तिला अजून सेक्स काय हे माहितीही नसतं. शरीर व मन त्यासाठी तयार झालेलं नसतं. अशावेळी आपल्याच परिवारातील, आसपासचा ओळखीचा कुणीतरी, शाळेतला कुणीतरी किंवा एखादा अनोळखी माणूसही त्या मुलीला ( किंवा मुलालासुद्धा) काही आमिष दाखवून चक्क आपले खेळणे बनवतो. स्वतःची विकृत भूक भागवून घेतो. त्या धक्क्यातून जर जगली वाचलीच तर ती मुलगी आयुष्यभर तो तसला प्रसंग विसरू शकत नाही. अशा हजारो मुली मग एकतर मोडून पडतात व आयुष्य संपवून घेतात किंवा वेश्यावस्तीत आणून पोचवल्या जातात. हे कितीही भयानक असलं तरी दुर्दैवाने आज वास्तव बनलंय.

“मग काय करायचं? आपल्या मुलांना घरात कोंडून ठेवायचं का ?” असं कदाचित उद्विग्नपणे विचारावं असं तुम्हालाही वाटेल. पण रागाच्या भरात, भावनेच्या भरात वागून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी स्वतःपासून काही कृती सुरु करायला हवी. बहुसंख्य मुलांच्या बाबतीत “बालपणीचा काळ सुखाचा” असतो आणि तो तसाच “सुखाचा” असावा यासाठी मुलांचे आईबाप व शिक्षक हेच अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतात. आपल्या मुलांच्या आवडी-निवडी, हट्ट पुरवताना त्यांना बऱ्या-बाईट गोष्टींची जाणीव करून देणं अतिशय गरजेचं बनलं आहे.

लहान मुलांचं शोषण करणारी माणसे ही काही आकाशातून पडत नाहीत. त्यांना गोष्टीतल्या राक्षसासारखे जास्त हात, शिंग असलं काही नसतं. ती तुमच्या आमच्यासारखीच माणसं असतात फक्त त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटलेला असतो. इथे थोडंसं विज्ञानाचा आधारसुद्धा जरुरी आहे. मुळात स्त्री आणि पुरुष यांची शारीरिक रचना अतिशय भिन्न आहे. त्यांची मानसिकता, त्यांच्यातील हार्मोन्स (संप्रेरके) ही भिन्न आहेत. त्यामुळे चित्रपटातील एखादं अश्लील गाणं किंवा मासिकातले फोटो पाहून जसं एखादा पुरुष उद्दीपित होऊ शकतो आणि बलात्काराची इच्छा बाळगतो तसं दुसरा पुरुष करेलच असं नाही. तो अनेकदा दुर्लक्ष करून मोकळा होईल. किंवा आपल्या कायदेशीर जोडीदाराशी संबंध ठेऊन मनातील कामभावनेचा निचरा करेल.


प्रत्येक माणसाच्या मनातील “केमिकल लोचा” काही वेगळी समीकरणं बनवतो. आणि यामध्ये मेंदूचा मोठा सहभाग असतो. म्हणूनच सर्व मुलांना जर त्यांच्या उमलत्या वयात या सर्वांचं योग्य शिक्षण / लैंगिक शिक्षण मिळालं तर मोठेपणी त्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या असू शकतात. त्या तशाच चांगल्या हव्यात. अन्यथा माणूस म्हणून त्याची गणना कशी करायची? “आहार, निद्र, भय आणि मैथुन” या चार आदिम भावना सर्व प्राण्यांमध्ये असतातच. मात्र माणसाला त्यापुढे जाऊन संवेदनशीलता, परस्पर सहकार्याची आणि समतेची जाणीव, बंधुत्व अशा प्रेरणांचे वरदान मिळाले आहे. मात्र या प्रेरणा लहापणापासून विकसित व्हाव्या / कराव्या लागतात. त्या जाणीवा तशा विकसित झाल्या तरच त्याच्या मध्ये माणूसपण निर्माण होतं. आणि मगच त्याच्याकडून आपण नेहमी चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा ठेऊ शकतो.

उदाहरण घेऊ एखादं. लहान मुलांना मुळात नवीन समजून घ्यायची उत्सुकता जास्त असते. ती विचारतातच तुम्हाला, “माझा जन्म कसा झाला? लग्न म्हणजे काय? माझी मैत्रीण अमुक तमुक आहे, तिच्याशी माझं लग्न होईल का? आम्हालापण छान बाळ होईल का? इ.इ.” त्या प्रश्नांची त्यांना समाजातील अशा भाषेत उत्तर दिली पाहिजेत. इथे काहीतरी बोलून त्यांना टाळू नये. तसं टाळण्याने मग काय होतं, की मुलं स्वतःहून उत्तर शोधू पाहतात. आणि जर अशावेळी त्यांच्या हातात अयोग्य पुस्तकं, चित्रपट, ब्ल्यू फिल्म्स असं काही सापडलं की मग त्या मुलाची विचारक्षमता त्या पद्धतीने विकसित होते.

याउलट त्या मुलाच्या आई-वडिलांनी किंवा शिक्षकांनी जर त्याला, “एक ठराविक वयाचा टप्पा गाठल्याशिवाय लग्न करता येत नाही. त्यासाठी आधी खूप शिकायला लागतं. स्वतः कमवावे लागते. प्रत्येक मुलाने मुलीचा, व मुलीने मुलाचा आदर केला पाहिजे. एकमेकांचं स्वातंत्र्य जपलं पाहिजे. आज शाळकरी असणारी मुलगी उद्या जशी कुणाची तरी आई असणार आहे, तसाच मुलगा सुद्धा कुणाचा तरी बाप असणार आहे” असं समजावलं तर त्याच्यावर अधिक योग्य संस्कार होऊ शकतात. तसंच प्रत्येक मुलगी ही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, तिच्या मनाविरुद्ध आपण वागायचं नाही हे शिकवलं पाहिजे. त्यामुळे ते मूल “पुरुषत्वाचा” बुरखा बाजूला करून माणूस म्हणून जगू शकेल. यामुळे मग ज्या-ज्यावेळी त्याच्या सभोवतीची परिस्थिती त्याच्या मनात कामवासना निर्माण करेल, तेंव्हा त्याची “सत्सद्विवेकबुद्धी” त्याला वाईट कृती करण्यापासून रोखत राहील.

आज सुदैवाने सेक्स-एज्युकेशनची मोकळेपणाने चर्चा होते. मात्र हल्ली मुलांचं लवकर वयात येणं लक्षात घेता हे शिक्षण वयाच्या १०-१२ व्या वर्षापासून सुरु व्हायला हवे. मुलींना पाळीविषयी, स्वतःच्या अवयवांविषयी शास्त्रीय माहिती दिली पाहिजे. आजकाल भरपूर प्रकारचं शिक्षण, त्यानंतरची नोकरी- व्यवसायातील स्पर्धा यामुळे मुलांचं लग्नाचं वय पुढे गेलं आहे. त्यामुळे सुरक्षित लैंगिक संबंध, कामभावनेचा नैसर्गिक निचरा करणारे हस्तमैथुनासारखे उपाय सांगितले पाहिजेत. कामभावनेचा निचरा करण्याचा “बलात्कार” हा मार्ग नव्हे हे प्रत्येक मुलाला शिकवलं गेलंच पाहिजे. तरच प्रत्येक स्त्री कडे भोगवस्तू म्हणून पाहण्याची पुरुषी वृत्ती कमी करता येईल.

अर्थात हे सर्व आदर्श परिस्थितीचे चित्र आहे. आणि समाजातील पुरुष-प्रधान संस्कृती पाहता सर्व मुलांना असं उत्तम शिकवलं जाईल अशी अपेक्षा करणं वास्तवाला धरून नाहीच. मात्र सर्वत्र आई-वडील आणि शिक्षकांसाठी कार्यशाळा (workshops) घेतली गेली तर काहीप्रमाणात सुधारणा नक्कीच होऊ शकते.

लहान मुलींच्या लैंगिक शोषणाबद्दल जागतिक अहवाल असं सांगतो की किमान ६०% प्रकरणातील पुरुष हा त्या मुलीच्या परिचयाचा असतो. दुर्दैवाने हे कटू सत्य आहे की, स्वतःला प्रगत समजणाऱ्या तथाकथित पांढरपेशा समाजापासून अडाणी व अशिक्षित समाजापर्यंत सर्व थरातून मुलीचे लैंगिक शोषण हे जवळच्या ओळखीच्या माणसाकडून होते. हे थांबवायला हवं. कधी एखादा काका, चुलत भाऊ, मामा, मामेभाऊ, भावाचा मित्र आणि कित्येक प्रसंगात प्रत्यक्ष बाप आपल्या मुलीचं शोषण करताना सापडला आहे. ती लहान मुलगी या सगळ्या आपल्या आधी जन्मलेल्या माणसांची मानसिकता कशी बदलवू शकेल? ते अशक्य आहे. त्यामुळे कोणत्याही लहान मुलांच्या बाबतीत काही वाईट घडू नये म्हणून आपणच काळजी घ्यायला हवी.

 

प्रत्येक घरातील आईला वाटत असतंच की शाळा, क्लास किंवा कॉलेजसाठी बाहेर गेलेली आपली मुलं सुखरूप घरी परत यावीत आणि मग प्रत्येक संध्याकाळी या गाण्याच्या ओळी नेहमीच काळजावर सुरी चालवून जातात;

दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर,
अशा अवेळी असू नका रे आईपासुन दूर
चुकचुक करिते पाल उगाच, चिंता मज लागल्या...

या चिमण्यांनो, परत फिरा घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या....

  लहानग्या मुलांना भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागू नये म्हणून काय केलं पाहिजे हे आता आपण शिकवलंच पाहिजे. त्यासाठी पुढील काही छोटे छोटे उपाय आपण निश्चित अंमलात आणू शकतो;

१.      प्रत्येक वेळी आपल्या लहान मुलीला कोणत्याही वेळी, कोणत्याही पुरुषासोबत कधीही एकटे सोडू नका. समजा आई स्वैपाकात मग्न आहे आणि घरातील शाळकरी मुलगी काका, मामा, आजोबा किंवा शेजारचे काका यांच्यासोबत आहे, तरी अधून मधून तिच्याकडे लक्ष द्या. ते दोघं ज्या खोलीत असतील तिथे चक्कर मारा.

२.      आपल्या मुलीला तिच्या अवयवांची माहिती करून द्या. तसेच तिला असे सांगा की, “जर कुणी काका- मामा किंवा अन्य मुलगा तिच्या छातीवरून, पाठीवरून, मांड्यावरून हात फिरवत असेल, तिच्या शू च्या जागी मुद्दामहून हात लावत असेल, तर त्याला तसे मुळीच करू देऊ नका”. सतत सांगूनही तो माणूस ऐकत नसेल तर त्यानं असं करताच “अगदी मोठ्याने ओरडायचं, कुणालातरी बोलवायचं” असं मुलींना सांगा. त्यामुळे मुलगी जेंव्हा अशी मोठ्याने ओरडेल तेंव्हा तिची आई-बाप, शिक्षक किंवा अन्य कुणी पट्कन तिथे येऊ शकेल आणि त्यामुळे एखादा कटू प्रसंग टाळता येईल. आपली मुलगी जेंव्हा अशी मोठ्याने ओरडेल, किंवा अन्य कुणी मुलगी कुठेही अशी ओरडताना आढळली, तर हातातले काम सोडून प्रथम तिच्याकडे जा. तिला काही त्रास नाही ना हे विचारा.

३.      अनेकदा मुलं सांगतात, की मला अमुक एक काका आवडत नाहीत. ते त्रास देतात. तेंव्हा अशा गोष्टी हसण्यावारी नेऊन त्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित तो माणूस काय करतोय हे मुलांना समजत नसेल. त्यांना सांगता येत नसेल.

४.      अनेक घडलेल्या घटना असं सिद्ध करतात की लहान मुलांनी आपल्या काका, मामा, तर कधी प्रत्यक्ष बापाविरुद्ध आईकडे किंवा अन्य कुणा मोठ्या माणसाकडे वारंवार तक्रार केली होती. ते आपल्याशी नीट वागत नसल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आणि त्यातून मग पुढे अजून जास्त भयंकर प्रकार घडत गेले.

५.      अनेक घरात मुलं सांभाळायला बाई ठेवलेली असते. तिथे अशा घटना घडल्या आहेत की ती बाई किंवा घरात येणारा तिचा प्रियकर हेसुद्धा मुलीचं/ मुलांचं शोषण करतात. आणि घाबरलेली मुलं रात्री आपल्या आई-बापाला काही सांगू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या घरात असं मुलं सांभाळायला कुणी असल्यास कधीतरी अचानक घरी या. आपल्या मुलाला नीट सांभाळलं जातंय का याची खात्री करा.

६.      आपल्या मुलांना सांगा की कोणत्याही ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून घराबाहेर आईस्क्रीम, चौकलेट, खाऊचे पदार्थ घ्यायचे नाहीत. जरी त्यांनी दिले तरी आधी घरी आईला किंवा शाळेत शिक्षकांना दाखवल्याशिवाय खायचे नाहीत हे सतत रोज सांगा. त्यांच्या मनावर कोरलं जाईपर्यंत सांगत राहा. कधी गोष्टीतून सांगा.

 “एका मुलीनं असं दिलेलं आईस्क्रीम खाल्लं, मग तिला झोप आली. त्यानंतर जेंव्हा तिला जाग आली तेंव्हा तिला दुसऱ्या गावी नेऊन तिथे तुरुंगात ठेवलं होतं. नंतर तिला भिकारी बनवलं” अशी एखादी गोष्ट त्यांना जास्त परिणामकारक रित्या समजू शकेल. त्यामुळे असा खाऊ देणाऱ्यापासून आपली मुलगी कायम सतर्क राहील.

७.      आपल्या नात्यातील, ओळखीतील कुणी व्यक्ती, रिक्षामामा, स्कूल बस चा ड्रायव्हर, शाळेतील शिक्षक, शेजारील मुलगा असं कुणीही आपल्या किंवा दुसऱ्यांच्या मुलांशी चाळे करताना आढळले  तर त्यांना स्पष्ट शब्दांत समज द्या. जर फरक दिसला नाही तर सरळ पोलिसात तक्रार दखल करा.

८.      आपल्या मुलांची शाळा, परिसरातील शाळा या ठिकाणी अशा विषयांवर कार्यक्रम केले जातील, मुलांना जागृत करणारे कार्यक्रम केले जातील यासाठी प्रयत्न करा.

असे अनेक उपाय प्रत्येकाला सांगता येतील. अंमलात आणता येतील. प्रत्येकाने आपल्याला शक्य होईल असं योगदान दिलं पाहिजेच. पण याचबरोबर जर कुणा लहानग्याचं आयुष्य वाईट चक्रात सापडलं असेल तर त्यालाही तिथून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

मग लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची ही अत्यंत भयानक गोष्ट आपण निश्चित रोखू शकू. आजची लहान मुलं पुढे जाऊन देशाचं भविष्य घडवणार आहेत त्यामुळे त्यांचं वर्तमान सुरक्षित असेल आणि त्यांना प्रगतीसाठी चांगलं वातावरण मिळेल याची आपणच काळजी घेतली तर त्यांनाही “हे जीवन सुंदर आहे” असं निश्चित असं वाटू लागेल...!

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)