marathi blog vishwa

Sunday 26 July 2020

पराक्रमी चिमाजीअप्पा

' जगावेगळं' या पेजसाठी मी लिहित असलेल्या "इतिहासाच्या पोतडीतून"  या मालिकेतील हा लेखांक ८ वा - सुधांशु नाईक.

पराक्रमी चिमाजीअप्पा...
बाजीराव पेशवे यांच्या संपूर्ण कारकिर्दीत हिंदवी स्वराज्य हिंदुस्थानभर व्हावे यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले त्यासाठी राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, उदाजी पवार आदि सरदारांसोबत नेहमीच समर्थ साथ दिली ती त्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी. बाजीरावांच्या बद्दल आपल्या बऱ्यापैकी माहिती असते मात्र चिमाजीअप्पा यांच्याविषयी अनेकांना फारसं माहिती नसतं. आज जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याविषयी  या  लेखातून....
बाजीराव आणि चिमाजीअप्पा. यांना जणू राम-लक्ष्मणाची जोडी म्हणूनच ओळखले जात होते. तेजतर्रार, दिलदार आणि तडफदार म्हणून आपण बाजीरावांकडे पाहतो तर चिमाजीअप्पा म्हणजे शांत, धीरोदात्त, मुत्सद्दी, अपूर्व नियोजन करणारं, फडावरील कामावर अत्यंत बारीक लक्ष ठेवणारं, एकावेळी अनेक आघाड्यांमध्ये सुसंगती निर्माण करणारं व्यक्तिमत्व होतं. बाजीरावांचा अकाली मृत्यू झाला आणि काही काळात तसंच अचानक चिमाजीअप्पांनाही अकाली मृत्यूने ओढून नेलं. तसं झालं नसतं तर.....
पण इतिहासाला जर तर मंजूर नसतात. 

इ.स. १७०३ च्या सुमारास बाळाजी विश्वनाथ आणि राधाबाई या दाम्पत्याला दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव ठेवले अंताजी. मात्र चिमणाजी या नावाने सर्व बोलावत त्याला. त्याच चिमणाजी ला इतिहास आज पराक्रमी चिमाजीअप्पा म्हणून ओळखतो. अप्पांचं आपल्या मोठ्या भावावर फार प्रेम. जणू सतत भावाची काळजी करणारा तो दुसरा लक्ष्मणच. बाजीराव, पेशवे झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात अप्पा सातारा दरबारात मुतालिकी करायचे. पहिल्यांदा निजामाचा पराभव करून, जेंव्हा बाजीराव प्रथम सातारला आले तेंव्हा त्यांचं स्वागत करताना अप्पांना धन्य धन्य वाटले होते.
१७२७ मध्ये जेंव्हा करवीरकर संभाजीराजे छत्रपती आणि निजामाने पुण्यावर आक्रमण केले तेंव्हा सातारकर शाहू महाराजांना घेऊन चिमाजीअप्पा सुरक्षेच्या कारणस्तव पुरंदर गडावर जाऊन राहिले होते.  बाजीरावांनी केलेल्या व्युहरचनेत नंतर  निजाम अडकला आणि पुढे पालखेडच्या लढाईत पराभूत झाला.
त्यातच निघाले माळव्याचे राजकारण. जिथे मुख्यतः अप्पांनी पराक्रम गाजवला. काय होते हे राजकारण? 
मध्यंतरीच्या काळात बाजीरावांनी १७२२ मध्येच माळव्यात धार येथे उदाजीराव पवार यांची नेमणूक केली होती व नंतर उज्जैनचा मोगल सुभेदार दयाबहाद्दर याचा पराभव केला होता. त्यावेळी जयपूर नरेश सवाई जयसिंहासोबत बाजीरावांनी संधान बांधलेले. दयाबहाद्दरचा पराभव केल्यानंतर तिथे गिरधरबहाद्दर ची नेमणूक केलेली जयपूर नरेश यांनी. माळव्यात अधिक राज्यविस्तारासाठी मराठे उतरल्यावर त्याने मदत करावी ही अपेक्षा होती. मात्र त्याने निजामाप्रमाणे माळव्यात स्वतंत्र कारभार थाटायचे उद्योग सुरु केले. सवाई जयसिंहाचे उपकार तो विसरला. मराठ्यानाही जुमानेसा झाला. 

या काळात ग्वाल्हेरला शिंदे आणि इंदौरला होळकरांच्या नेमणुक बाजीराव पेशव्यांनी केलेली. आणि ते दक्षिणेत मोहिमेवर गेले.
इकडे मोगल गिरीधर बहाद्दरला रसद पुरवू लागले. आणि त्याच्या पारीपत्याची जबाबदारी अप्पांच्यावर आली. शिंदे होळकर आणि उदाजी पवारांच्या फौजाही त्यांच्यासोबत आल्या आणि सगळे माळव्यात दौडू लागले. धामनोद, मांडवगड, अमझेरा, नालच्छा या प्रदेशात लढाई जुंपली. मोठे युध्द सुरु झाले.

अप्पा थेट गिरधरबहाद्दरला जाऊन भिडले. तलवारीच्या एका घावात अचानक गिरधर बहाद्दर ठार झाला. तोच पडला म्हटल्यावर मोगली सैन्य पळून गेले. मराठा सैन्याने अप्पांचं अपार कौतुक केलं. शाहुमहाराजांच्याकडून खास कौतुकाचे पत्र आले. या मोहिमेत माळव्याच्या प्रांतातील वर्चस्वासह सोबत महसूल ही मिळाला. त्यामुळे बाजीराव आणि अप्पा यांच्याविरोधात कट करणाऱ्या सातारा दरबारातील ब्राह्मण विरोधकांची तोंडे बंद झाली.

चिमाजीअप्पांच्या मुत्सद्दीपणाची झलक लवकरच यानंतर पाहायला मिळाली. मराठ्यांनी माळवा जिंकल्यानंतर काही महिन्यांनी राजा छत्रसाल आणि बुन्देलखंडचे राजकारण झाले. शिवछत्रपतींच्या आदर्शानुसार काम करून स्वतंत्र राज्य उभे केलेल्या या राजाच्या मदतीला बाजीराव धावून गेले. यशस्वी झाले आणि परत येताना यावनी मस्तानीसोबत लग्न करून घरी घेऊन आले. त्यावेळी शनिवारवाड्याचे काम सुरु होते. पेशव्यांचे कुटुंब धडफळे यांच्या वाड्यात राहत होते. तिथे जागा कमी आहे या सबबीखाली अप्पांनी मस्तानी बाईसाहेबांचा मुक्काम दुसरीकडे करवला आणि केवळ बाजीरावांना वाड्यात आणले.

या संपूर्ण मस्तानी प्रकरणात राऊ-मस्तानीच्या खालोखाल जर कुणाची मानसिक कुचंबणा झाली असेल तर ती अप्पांची. एका बाजूला भावावर जीवापाड प्रेम, त्याचवेळी तितकीच तीव्र मातृभक्ती आणि रूढी-परंपरेवरील विश्वास. पराक्रमी भावाची हिंदुस्तानभर स्वराज्य विस्तार करण्याची स्वप्नं सत्यात यायला हवीत तर त्याला दुखावून चालणार नाही हे जसं कळत होतं तसंच परंपरेची बंधनं मोडवत नव्हती. 
त्यात स्वतःची तोळामासा तब्येत. सतत येणारी आजारपणे. त्यात अजून एक घटना त्यांच्या आयुष्यात घडली. शके १६५२ मध्ये, ४ ऑगस्ट १७३० ला त्यांची पत्नी रखमाबाई यांना मुलगा झाला. हे बाळ म्हणजेच थोर शूरवीर सेनानी सदाशिवराव भाऊ. ज्यांनी दिल्लीचे तख्त फोडले. शिवरायांचे स्वप्न साकारण्यासाठी. 

मात्र या बाळंतपणातून रखमाबाईची तब्येत ढासळली. शेवटी ३१ ऑगस्टला त्या गेल्याच. जेमतेम एक महिन्याच्या त्या लहानग्या सदाशिवची काळजी मग राऊच्या पत्नी काशीबाई यांनीच घेतली. पत्नीच्या मृत्यूनंतर खिन्न असूनही अप्पा कामाला लागले. फडावरच्या कामाला शिस्त लावली. येणाऱ्या महसुलातून योग्य खर्च व्हावेत यासाठी आखणी केली. स्वतः सातारच्या दरबारातील मुतालिकीची कामं करत होते. बाजीरावांचा ज्येष्ठ पुत्र नानासाहेब त्यांच्यासोबत राहून कामकाजाचे धडे घेत राहिले. 

या काळातच बाजीरावांनी गुजरातेत दाभाड्यांची मोहीम पूर्ण केली. ते पुन्हा पुण्यात आल्यावर मातोश्रीकडे गेले. राधाबाई म्हणाल्या, “ राऊ, तुम्ही तुमच्याच संसाराकडे पाहू नका केवळ. अप्पा कडे पहा. सदाशिव आता सव्वा वर्षाचा झाला. आम्ही रोज अप्पाला सांगतो दुसरं लग्न करूया तर तो तयार नाही. तुम्ही तरी सांगून पहा...”

मग राऊ अप्पांशी बोलत बसले. आपण दुसरं लग्न केलं आणि जर मुलाला सापत्न वागणूक मिळाली तर ते वाईट ठरेल या उद्देशाने हळव्या मनाचे अप्पा दुसरं लग्न करायला तयार नव्हते. मात्र राऊनी समजूत काढली. उत्तम स्थळ निवडू असं आश्वासन दिलं. राधाबाईंनी अलिबागच्या थत्ते सावकारांची कन्या अन्नपूर्णा हिला अप्पांची दुसरी म्हणून पसंत केलीच होती. ती अप्पांनाही पसंत पडली आणि विवाह झाला. यानंतरच सारे २२ जानेवारी १७३२ मध्ये रथसप्तमीच्या मुहूर्तावर नव्याने बनलेल्या शनिवारवाड्यात राहायला गेले. तिथेही बाजीरावांनी आपल्या लाडक्या भावाच्या नावे एक बाग वसवली. तिचं नाव होतं चिमणबाग...!

अन्नपूर्णाबाईनीही लहानग्या सदाशिवचा फार मायेने सांभाळ केला. त्यामुळे घराच्या जबाबदारीतून अप्पांना स्वस्थता मिळाली. पुढची २-३ वर्षे बाजीराव कोकणात, उत्तरेत असे विविध मोहिमांवर असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे अप्पा मात्र शनिवारवाड्यातून कामकाज करत राहिले. विविध सुभ्यातील सारावसुलीकडे लक्ष देत राहिले. 
मात्र त्यांचे बारीक लक्ष नेहमीच बाजीरावांच्याकडे असायचं. त्यांच्या मोहिमांसाठी रसद पुरवठा सुरळीत राहावा, पैशाची चणचण मोहिमेवर जाणवू नये यासाठी ते उस्तवार करत राहायचे. विविध सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचा हिशोब सांभाळायचे. त्यातील पै न पैचा योग्य विनियोग होईल याकडे कटाक्ष ठेवत. बाजीरावांना मनस्ताप होऊ नये म्हणून मनाविरुद्ध असूनही मस्तानी महालाची सुरक्षा, तिथली व्यवस्थाही नीट होतेय की नाही याकडे लक्ष देत. 
नोव्हेंबर १७३६ मात्र अप्पा कोकणात उतरले. आधीच्या लढाईत बाजीराव, प्रतिनिधी यांनी सिद्दी सात याकुतखान याला पायबंद घातला होता. १६८९ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेलेला राजधानीचा गड याच सिद्दीच्या ताब्यात होता. तो शेवटी प्रतिनिधींनी एल्गार करून याच मोहिमेत मिळवला. मात्र सिद्दीचा पुरता बिमोड करता आला नाही. जंजिरा वगळता सर्व कोकणवर ताबा मिळवून बाजीराव १७३४ ला पुण्यात आले आणि उत्तरेतील राजकारणात गुंतले. त्यामुळे सिद्दी सात चा बंदोबस्त करायची जबाबदारी अप्पांच्यावर आली.

सरखेल कान्होजींचे पुत्र आणि नंतरचे सरखेल अशा सेखोजी आंग्रे यांचाही याच दरम्यान मृत्यू झाला. आणि कोकणात सिद्दीचा पुन्हा धुमाकूळ सुरु झाला. सेखोजीनंतर मानाजी आंग्र्यांना शाहुमहाराजांनी सरखेलपद बहाल केले. तेही अप्पाच्या मदतीला आले.
१७३६ च्या या मोहिमेत अप्पांनी उदंड पराक्रम दाखवला आणि थेट सिद्दीसात यालाच ठार केले. जंजिरा, पद्मदुर्ग आणि उंदेरी हे तीन किल्ले वगळता सर्व मुलुख मग शाहुमहाराजांच्या स्वाधीन केला सिद्दीच्या वारसाने. आता तो मराठ्यांचा मांडलिक बनला. आजही जंजिरा हा जलदुर्ग पाहायला जाणाऱ्या हजारो पर्यटकांना हा इतिहास मात्र कुणीच सांगत नाही... हीच आपली शोकांतिका आहे.

याच सिद्दी सातने एकेकाळी पेशवे आणि शाहुमहाराजांच्या गुरुस्थानी असलेल्या ब्रह्मेंद्रस्वामींना त्रास देत चिपळूणजवळचे परशुराम मंदिर उध्वस्त केले होते. त्यामुळे सर्वांनी चिमाजीअप्पांचे कौतुक केले. एवढी मोठी मोहीम यशस्वी झाली तरी जंजिरा दुर्ग स्वराज्यात आला नाही याची खंत मात्र अप्पा नेहमी बोलून दाखवत राहिले. हे त्यांचं मोठेपण..!

१७३७ च्या निजामाविरुद्धच्या भोपाळ मोहिमेत मात्र अप्पा पुन्हा बाजीरावांच्या सोबत गेले. बाजीरावांनी पुढे मुसंडी मारली आणि तापीच्या दक्षिणेकडे पिछाडीवर नाकेबंदी करत अप्पा थांबले. निजामाला बाजीरावांच्या सोबत लढाईत मदत करायला निघालेला निजामपुत्र नासिरजंग याची त्यामुळे काहीच मात्रा चालली नाही. चिमाजीअप्पांनी त्याला वरणगाव- खरगोण प्रांतात रोखून धरले. शेवटी या भोपाळच्या युद्धात बाजीरावांनी निजामाला असा काही धुतला की पुढची काही वर्षं तो अगदी शांत बसून राहिला. या विजयामध्ये पिछाडीवर जय्यत तयार होऊन लढलेल्या चिमाजीअप्पाचा मोठा वाटा होता..!
या मोहिमेनंतर मग जाणून घेऊ त्यांच्या आयुष्यातील ती सर्वाधिक गाजलेली मोहीम..! अर्थातच वसईचे युध्द.

खरतर केवळ वसईचे युध्द आणि पोर्तुगीजांचा पाडाव यावर मोठा लेख होईल. ते अनेकांनी लिहिलंही आहेच. मात्र त्यापूर्वी चिमाजीअप्पांनी काय काय केलं हे सगळं आज या लेखाच्या निमित्ताने मुद्दाम सांगतोय कारण लोकांना वसईच्या युद्धाव्यतिरिक्त चिमाजीअप्पांनी केलेले पराक्रम माहितीच नाहीत. 
ठाणे, भिवंडी या प्रांतात पेशव्यांचे सरदार होते गंगाजी नाईक अणजूरकर. सध्या ठाणे ते अहमदाबाद या हायवेवर जो अंजूरफाटा लागतो तेच ते हे अणजूर.

१७२२ पासून ते या परिसरातील पोर्तुगीजांच्या वाढत्या हालचाली, त्यांचे अत्याचार याविषयी सतत कळवत होतेच. इथे मोठी मोहीम उघडायला हवी याविषयी सांगत होते. ख्रिश्चन मिशनरी या भागातील गरीब कोळी, भंडारी, खारवी आदि समाजातील लोकांना जबरदस्तीने पकडून वसईच्या किल्ल्यात नेत आणि तिथे जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर करत. याबाबत अनेकदा पोर्तुगीज गव्हर्नरला ताकीद दिली गेलेली. मात्र परिणाम होत नव्हता. 
शेवटी अप्पांनी निर्वाणीचा संदेश पाठवला, “ यापुढे हे प्रकार असेच सुरु राहिले तर मराठा सैन्य थेट किल्ल्यात घुसेल. तुमच्या देवळांच्या घंटांचे ध्वनी आमच्या मंदिरात वाजू लागतील...” तरीही गव्हर्नरने ऐकले नाही.
मग प्रत्यक्षात मोहीम सुरु झाली ती १७३८ मध्ये. चिमाजीअप्पांनी आपले शब्द खरे करून दाखवले..!

वसईच्या जवळचे विविध प्रदेश जिंकून जानेवारी १७३९ मध्ये वसईला वेढा घातला अप्पांच्या फौजांनी. तीन चार महिने झाले तरी किल्ला दाद देत नव्हता. पोर्तुगीज नेटाने प्रतिकार करत होते. मुंबईकडून किंवा गोव्याकडून कोणतीही रसद मिळत नसतानाही लढत होते.
शेवटी अप्पा प्रचंड संतापले. सैन्याच्या समोर उभे राहिले आणि त्वेषाने म्हणाले, “ तीन तीन महिने लढून जर तुम्हाला हा साधा एक कोट जिंकता येत नसेल तर एका तोफेला मला बांधा. तोफेला बत्ती दिल्यावर माझे मस्तक आत जाऊन पडेल असे करा. मगच माझे समाधान होईल...”
आणि मराठे संतापले. रातोरात योजना ठरली. तटबंदीखाली खणून सुरुंग पेरण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोर्तुगीजांच्या ध्यानीमनी नसताना एक प्रचंड बुरुज आकाशात उडाला. शेकडो लोक ठार झाले. तिथून मराठे सैन्य आत घुसलं. त्याचवेळी दुसऱ्या बुरजाजवळ सुरुंग उडाला. त्यात अनेक मराठेही ठार झाले. मात्र मराठ्यांनी शौर्याची पराकाष्ठा केली. ५ मे १७३९ रोजी शेवटी वसई ताब्यात आली. मुंबई सोडल्यास गोव्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरून पोर्तुगीजांचे उच्चाटन झाले.

नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रचंड अत्याचार केलेल्या त्या पोर्तुगीज गव्हर्नरला आणि त्यांच्या उरलेल्या सैन्याला अप्पांनी जीवदान दिले. त्यांचे सामान-सुमान घेऊन किल्ला सोडून जायला सांगितले. ते सगळे तिथून निघून गेल्यानंतरच मराठे किल्ल्यात शिरले...! 
हा सगळा इतिहास पोर्तुगीजांनी त्यांच्या लिस्बनच्या मुख्य ऑफीसला कळवलेला आहे हे नोंद घेण्यासारखे आहे.

ही नीतीमत्ता शिवरायांनी निर्माण केली आणि मराठ्यांनी नेहमीच जपली याचा मला फार अभिमान वाटतो...!

अप्पा वसईत लढत असताना बाजीरावांनी इचलकरंजीकर घोरपडे ( त्यांचे मेव्हणे) यांना थेट गोव्यावर स्वारीला धाडले. जेणेकरून पोर्तुगीजांचे पूर्ण उच्चाटन व्हावे. मात्र ते तिथे हल्ला करणार तोच वसईत तह झाल्याचे कळले आणि गोवा ताब्यात यायचा राहून गेला. 
शिवरायांनी, शंभूराजांनी गोवा ताब्यात घ्यायचे प्रयत्न केले होते. त्यानंतरच्या काळातला हाही प्रयत्न फोल गेला. आणि शेवटी १९६१ पर्यंत गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला. त्रास देत राहिला. शेवटी मोठी कारवाई झाल्यानंतरच भारतातून पोर्तुगीजांचे कायमचे उच्चाटन झाले. जर अप्पांनी जशी वसई घेतली तसंच गोवा घेतला गेला असता तर ?? असो.

४ सप्टेंबर ला अप्पा मोठा विजय घेऊन पुण्यात पोचले. लूट तर होतीच मात्र आपले शब्द खरे करत त्यांनी वसईतील चर्चमधल्या घंटा काढून आणल्या होत्या. वसईच्या मोहिमेतून आणलेल्या या अजस्त्र घंटा नाशिक, पुणे, सातारा परिसरातील अनेक मंदिरातून आजही पाहायला मिळतात. त्यांच्या त्या विजयाची तीच आज जिवंत आठवण. रोज निनाद्णारी.
यानंतर मात्र पेशवाईला धक्का बसला...! २८ एप्रिल १७४० रोजी थोर पराक्रमी बाजीराव पेशव्यांचं निधन झालं. आधीच ढासळलेली तब्येत घेऊन निर्धाराने काम करत असलेल्या अप्पांना हा मोठा धक्का होता. मस्तानीबाई आणि एकूणच जे काही घडलं त्यात त्यानांही मनाविरुद्ध पडावे लागले. त्यांचीही कुचंबणा झाली. आणि याच प्रसंगांमुळे राऊ शेवटी खचले हे वास्तव स्वीकारताना त्यानाही किती मानसिक यातना झाल्या असतील त्याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. तरीही ते काम करत राहिले.
२५ जून रोजी नानासाहेब यांना पेशवाईची वस्त्रे शाहुमहाराजांच्या हस्ते बहाल करण्यात आली. त्याप्रसंगी अप्पांचाही मोठा सन्मान केला गेला. पावसाळ्यात त्यांनी पुन्हा प्रबळ होऊ लागलेल्या शत्रूंना तंबी देणारी पत्रे पाठवली. ते लिहितात, “ राव गेले. परंतु कुल फौजा व रावांचा आशीर्वाद आमच्या व चिरंजीव नानांच्या पाठीशी आहे....”.

ऑक्टोबर मध्ये नवी मोहीम सुरु करायची होती पण अप्पा आजारी पडले. आणि १७ डिसेंबर १७४० रोजी त्यांचे निधन झाले. एक करारी, शूर, स्वामीनिष्ठ आणि प्रेमळ व्यक्तिमत्व कायमचे काळाच्या पडद्याआड गेले.

आज सुमारे ३०० वर्षानंतर हे सारं अभ्यासताना त्यांचा मोठेपणा प्रकर्षाने जाणवतो. आणि त्याचबरोबर जाणवतं आपलं खुजेपण.
पुण्यातील चिमाजीअप्पांची समाधी कुठे आहे असं विचारलं तर ७० % पुणेकरांना देखील ते सांगता येत नाही तिथं बाकीच्यांची काय कथा? तसंच ज्या वसईच्या लढाईमुळे चिमाजी अप्पा हे नाव जगभर दुमदुमले त्या वसईच्या किल्ल्यात आज अनैतिक प्रकारांना ऊत आलेला आहे. वसई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक लहानमोठे दुर्ग हल्ली प्रेमवीरांच्या लीलांनी रंगलेले असतात. अनेक किल्ले तर अतिक्रमणात गेलेले. अनेक किल्ल्यांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साठलेले. कित्येक ठिकाणी २०-२० फूट उंचीची झुडुपे वाढलेली. कित्येक ठिकाणी जाण्याचा मार्ग कोणता हेच कळेनासे झालेलं. गडावरील पाण्याची टाकी, मंदिरे, बुरुज आदि अवशेष अस्तंगत होऊ लागलेले. तर कित्येकांनी तिथले दगड उचलून आपापली बांधकामं केलेली. सर्व काही जणू विस्मृतीत जात होते....

त्या सगळ्याला पुन्हा प्रकाशात आणले ते आमचे मित्र आणि वसईचे तरुण तडफदार अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी. “किल्ले वसई मोहीम” या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ते आणि त्यांची टीम दुर्ग संवर्धन करतात. ते त्यांच्या परीने या परिसरातील इतिहासाला उजाळा देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. दरवर्षी १७ डिसेंबरला ते वसई परिसरात चिमाजीअप्पांची स्मृती जागवण्यासाठी विविध उपक्रम करत असतात. 
त्यांचा दुर्ग अभ्यास हा थक्क करणारा तर आहेच मात्र त्याचसोबत ते परिसरातील केळवे- माहीम, अर्नाळा, तारापूर, दातिवरे, तांदूळवाडी अशेरीगड आदि विविध धारातीर्थांचा इतिहास अनेकांपुढे आणत आहेत. शेकडो पर्यटकांना उत्तम प्रकारे भटकंती कशी करावी, दुर्ग संवर्धन कसे करावे याची माहिती देत आहेत. वसईचा किल्ला हा जणू त्यांचा श्वास बनला आहे. मात्र त्यांच्या कामात वारंवार अनेक अडचणी निर्माण केल्या जातात. त्यांना एकटे पाडायचे प्रयत्न केले जातात. गडांवर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमवीरांना त्यांच्याकडून सतत प्रबोधनात्मक मार्गाने अटकाव होत असतो, मात्र हेही अनेकांना पाहवत नाही.

हे सगळं पाहिलं की एकूणच व्यवस्थेविषयी चीड दाटून येते मनात. त्यामुळे हा लेख वाचणाऱ्या सर्व वाचकांना असे नम्र आवाहन करावेसे वाटते की किमान एकदा तरी वसईचा किल्ला, अर्नाळ्याचा भक्कम जलदुर्ग जरूर पहा. 

आमचे मित्र श्रीदत्त राऊत दर रविवारी वसईच्या दुर्गात कार्यरत असतात. ते तुम्हाला सर्व माहिती मोठ्या आपुलकीने देतील. मात्र नुसती माहिती न घेता त्यांच्या कामात तुम्ही खारीचा वाटा जर उचललात तर आणि तरच चिमाजीअप्पांचं नाव गौरवाने घेण्याचा आपल्याला अधिकार असेल असे वाटते. श्रीदत्त राऊत यांचा मोबाईल क्रमांक आहे ९७६४३१६६७८.
वाचकहो, सध्याची कोरोना संकटाची परिस्थिती निवळली की ना चुकता अवश्य वसईला जा. श्रीदत्त राऊत यांच्यासोबत इथला किल्ला पहा,  चिमाजीअप्पांनी केलेल्या कार्याचे स्मरण करा, आपला दैदिप्यमान इतिहास समजून घ्या !

सुधांशु नाईक, कोल्हापूर. 
(९८३३२९९७९१)

संदर्भ ग्रंथ :
- पेशवे दफ्तर – रियासतकार सरदेसाई.
- पुण्याचे पेशवे – अ रा. कुलकर्णी
- पेशवे घराण्याचा इतिहास – प्रमोद ओक
- अजिंक्य योद्धा बाजीराव- जयराज साळगावकर 
- पेशवे – श्रीराम साठे
- पेशवाई – कौस्तुभ कस्तुरे

Saturday 25 July 2020

लेखांक ७ : शिवाजी महाराजांचे अखेरचे पत्र

' जगावेगळं' या पेजवरील " इतिहासाच्या पोतडीतून" या माझ्या लेखमालेतील हा लेखांक  ७ वा.
- सुधांशु नाईक.

शिवाजी महाराजांचे अखेरचे पत्र...

शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळापासून लिहिलेली अनेक पत्रे. पहिले पत्र साधारण १६४५ मधले. तर त्याच्या निधनापूर्वी काही दिवस लिहिलेलं एक पत्र शेवटचं ठरलं. कुणाला लिहिलेलं हे पत्र आणि त्यात काय लिहिलं होतं याविषयी जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल...
१६८०. छत्रपती शिवाजीराजांच्या आयुष्यातील शेवटचं वर्ष. मात्र या पूर्वीची जवळपास चार वर्षं ही अत्यंत धामधुमीची होती. जुलै १६७८ मध्ये महाराज दक्षिण दिग्विजयानंतर रायगडावर परत आले. जवळपास दोन-अडीच वर्षे ते पार तंजावरपर्यंत दौडत होते. स्वराज्याची ही एक फार मोठी मोहीम होती. ते रायगडावर परतले पण त्यांना विश्रांती मात्र मिळालीच नाही.... या दोन वर्षात काय घडले ते पाहूया आधी...कारण ही सगळी धावपळ प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांनीच या पत्रात लिहिली आहे... काय घडलं या दोन वर्षात...?

महाराज रायगडावर आले आणि काही महिन्यात शंभूराजे नाराज होऊन डिसेंबर १६७८ मध्ये मोगलांचा सरदार दिलेरखान याला जाऊन मिळाले. आणि त्यांनी स्वराज्यावर हल्ला केला. भूपाळगड घेतला. नंतर ते विजापूरची आदिलशाही संपवायला तिकडे निघाले.

एकेकाळी हीच आदिलशाही शिवरायांचा प्रमुख शत्रू होती. आदिलशाही प्रांत जिंकायला सुरुवात करून त्यांनी स्वराज्याची निर्मिती सुरु केली होती. मात्र आता वेगळे राजकारण घडत होते. एकेकाळी जो सिद्दी मसूद महाराजांना पकडायला पन्हाळगड ते विशाळगड धावला होता, ज्याला बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलांच्या तुकडीने प्राण पणाला लावून अडवले होते, तोच सिद्दी मसूद आता आदिलशाहीचा वजीर होता... आणि त्याने महाराजांना साकडे घातले की आदिलशाहीवर मोगल चालून येत आहेत... आदिलशाही वाचवा..!

आणि जगावेगळ राजकारण करत महाराज आदिलशाहीच्या मदतीला धावले. प्रत्यक्ष शंभूराजे दिलेरखानासोबत होते. मात्र मराठ्यांनी मोगलांना चांगला प्रतिकार केला. मराठ्यांच्या प्रतिकारामुळे मोगलांनी माघार घेतली. यामुळे आदिलशहाने महाराजांचे आभार मानले. त्यांना भरपूर नजराणा पाठवला. सिद्दी मसूद-आदिलशहा यांच्याशी महाराजांनी तह केला आणि जो दक्षिणेतील मुलुख नुकताच महाराजांनी जिंकला होता त्याला आदिलशहाने मान्यता दिली.

त्यानंतर मग दिलेरखानाच्या आक्रमणाची धार कमी करायला महाराज मोगलांच्या वऱ्हाड प्रांतावर चालून गेले. जालना ही मोगलांची मोठी बाजारपेठ. औरंगाबादच्या अगदी जवळची. प्रत्यक्ष मोगल शहाजादा तिथे मुक्कामाला होता. तरीही धाडसाने महाराजांनी थेट जालन्यावर स्वारी केली. जालना लुटलं. मोगली सरदार रणमस्तखान लढायला आला. त्याचा पराभव करून त्यालाच कैद केले. मात्र अधिक मोठी फौज पाठीवर आल्यावर महाराजांनी तिकडून परतीचा रस्ता धरला. बहिर्जी नाईक यांच्या मदतीने मध्येच मोगली फौजांना चकवले आणि आडवाटेवर असलेल्या पट्टागड या ठिकाणी जरा विश्रांती घेतली. या सगळ्या धामधुमीचे त्यांना कष्ट पडत होते आणि अजूनही संभाजीराजे मोगलांच्याकडे आहेत याची चिंता मनाला पोखरत होती. 

महाराज तिकडून रायगडला परत आले. महाराजांच्या सगळ्या हालचाली बादशहा औरंगजेबाला समजत होत्या. चिडलेल्या बादशाहने मग “संभाजीराजांना कैद करून दिल्लीला पाठवा” असा हुकुम दिलेरखानाला गुप्तपणे कळवला. मात्र ही गोष्ट संभाजीराजांना समजली. या  दरम्यान त्यांचे आणि दिलेरखानाचे खटके उडत होते. शेवटी आपली चूक लक्षात येऊन शंभूराजांनी येसूबाईच्या सह मोगली छावणीतून पळ काढला. त्यांच्या मागावर मराठ्यांची तुकडी होतीच. पळालेले शंभूराजे विजापूरच्या आश्रयाला गेले. आणि मग सिद्दी मसूदने त्यांना पुन्हा मराठ्यांच्या तुकडीकडे सोपवले. मोठ्या वेगाने पाठलाग करणाऱ्या मोगलांना चकवत शंभूराजे पन्हाळगडावर पोचले ते जानेवारी १६८० ला.! महाराजांची एक मोठी चिंता मिटली. महाराज रायगडावरून निघाले आणि पन्हाळगडावर पोचले. 
महाराज पन्हाळगडी पोचले. त्यांची आणि शंभूराजांची भेट झाली. सगळ्या गोष्टीवर चर्चा काय झाली हे तसं शब्दशः इतिहासाला ठाऊक नाही. मात्र “स्वराज्याची विभागणी करावी, जुने स्वराज्य राजारामासाठी ठेऊन कर्नाटकात निर्माण होत असलेलं नवे राज्य तुला देतो, तुझ्या कर्तबगारीने तू स्वराज्य अजून वाढव. आपण देवभक्ती करत बसतो..” अशा अर्थाचं काही महाराज बोलले. मात्र स्वराज्याच्या विभागणीला शंभूराजांनी नकार दिला. आपली चूक कबूल केली. तेंव्हा महाराजांनी “रायगडावर जाऊन राजारामाची मुंज आणि लग्न करतो. मग काही काळाने पुन्हा येतो...तेंव्हा बोलू” असं सांगून पन्हाळगड सोडला. जनार्दनपंत, उमजीपंत आदि कारभारी शंभूराजांच्या सोबत ठेवले. रायगडला परत जाताना महाराज वाटेत सज्जनगडावर गेले. त्यांनी समर्थ रामदासस्वामी यांचे दर्शन घेतले आणि मग रायगडावर गेले. 

रायगड-पन्हाळगड-विजापूर-जालना-पट्टागड-रायगड-पुन्हा पन्हाळगड-मग सज्जनगड मार्गे रायगड... ही सगळी घोडदौड, त्यातील युद्धं, राजकारण हे सारं थक्क करणारं आहे.

शंभूराजे जरी मोगलांकडून स्वराज्यात परत आले असले तरी राजांनी त्यांना सोबत रायगडावर नेले नाही. मात्र त्यांचा शंभूराजांविषयीचा राग निवळला होता हे ज्या पत्रातून स्पष्ट होतं तेच आहे महाराजांचे हे शेवटचं पत्र...! हे पत्र त्यांनी फेब्रुवारी –मार्च १६८० मध्ये लिहिलं आहे आपले सावत्र बंधू आणि तंजावरचे एकोजीराजे भोसले याना... या लेखात वर उल्लेखलेली सर्व धामधूम त्यांनी स्पष्ट शब्दांत लिहिली आहे, मात्र ती लिहिताना आपण किती मोठं काम करतो आहोत हा अविर्भाव जराही दिसत नाही.. ही सहज भाषा महाराजांचं मोठेपण अधिक अधोरेखित करणारी आहे.;
या शेवटच्या पत्रात शिवाजीमहाराज जे काय लिहितात, त्यातील काही मजकूर वाचा त्यांच्याच शब्दांत...;

श्रीयासह चिरंजीव अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजेश्री महाराज व्यंकोजी राजे यासी प्रती सिवाजी राजे आशीर्वाद. येथील कुशल जाणोन स्वकुशल लेखन करणे. उपरी तुम्ही पत्र पाठवले ते पावले. तुमचे कुशल कलोन संतोष वाटला. असेच क्षण क्षण आपले कुशल लेखन करून पाठवीत जाणे. 

विशेष ए प्रांतीचे वर्तमान... दिलेरखान विजापूरची पातशाही कमकुवत देखोन जोरावरी धरून विजापूर घ्यावे या मतलबे विजापुरावरी चाल केली. भीमा नदी उतरोन शहरानाजिक येऊन भिडला. हे वर्तमान खान आलिशान मसउदखान यांनी आम्हास लिहिले की, गनीम जोरावरी बहुत धरली आहे. एऊन मदत केली पाहिजे. त्यावरून आम्ही तेच क्षणी स्वार होऊन मजली दर मजली पनाळीयास आलो. सारी कुळ जमेती जमा करून खासा लष्करानिशी विजापुरी सन्निध गेलो. विचारे पाहता गनीम कट्टा.. त्याहिमधे पठाण जाती...हट्टी, याशी हुन्नरेच करून खजील होऊन नामोहरम होय तो हुनर करावा ऐशी तजवीज केली की. त्याचे मुलखात फौजाचा पैसावा करून ओढा लावावा. त्यावरून दिलेरखानास ती गावचे अंतरे सोडून भीमा नदी उतरोन तहद जालनापूर पावेतो मुलुख तख्तताराज करीत चाललो. जालानापुरास जाऊन चार दिवस मुकाम करोन पेठ मारिली. बहुत मालमता हाती लागली. जालानापुरास म्हणजे औरंगाबादेहून चार गावे दूर, ते जागा शहाजादा असता त्याचा हिसाब न करता पेठ लुटली. सोने,रूपे,हत्ती घोडे याखेरीज बहुत मत्ता सापडली. ते घेऊन पठागड तरकीस स्वार होऊन कूच करून येता, मधे रणमस्तखान, आसफखान व जबितखान असे आणिक पाचसात उमराऊ आठ-दहा हजार स्वारानिशी आले. त्यास शह्बाजीच्या हून्नरे जैशी तंबी करून ये, तैशी तंबी करून घोडे व हत्ती पाडाव करून पटीयास आलो. मागती लष्कर मुलुकात धुंदी करावयास पाठवले. राजश्री मोरोपंत प्रधान यास बागलाण आणि खानदेश प्रांती सत्तावीस किले मोगलांचे आहेत ते व मुलुख काबीज करायला पाठवले. आम्ही पटीयास मुकाम केला. 
मोरोपंत त्याणी अहिवंत किल्ला घेतला. अहिवंत म्हणजे जैसा काही पनाळा, त्याचेबरोबरी समतुल्य आहे. दुसरा तो नाहवा गड. बागलाणच्या दरम्यान मुलुखात आहे. तो कठीण.. तोही घेतला. हे दोनी किले  पुरातन जागे कबज केले. त्या किल्ल्यावरही बहुत मालमत्ता सापडली व त्याचबरोबर जमेत होती ते मुलकात पाठवून धामधूम केली. कितेक मुलुक कबज केला. 
दिलेरखानासही ऐसे कळोन आले की, येथे राहिल्याने आपली शाही कुल बुडवतील हे जाणून विजापूर सोडून दिवसास कोस दोन कोस मजली करून चालला. खान अलिशानेही बहुतच शर्त केली. जैसा कोट राखावायासी शर्थ करून ये, तैसी करून कोट राखीला. आम्ही या प्रकारे विजापुरीचे सहाय्य द्रव्याने व सेनेने करून ज्या उपाये गनीम उखळून ये, त्या उपाये उखळून विजापुरीचे अरिष्ट दूर करून विजापूर रक्षिले. ते प्रसंगी खान आलीशानाचा सुलुख जाला. या करारबावेमध्ये  होसकट, व बंगळूर व अरणी व चंदावूर (तंजावर) आदि तुमिचे निसबती आम्ही आपणासी लाऊन घेतली. 

या उपरी दिलेरखान कारबळ ( कोप्पळ ?) प्रांताकडे गेला. आमचीही सेना पाठीवरी गेली आणि आम्ही विजापुरास जातो. कारबळ प्रांताकडे राजश्री जनार्दनपंत ठेविले. त्यांनी पुंड पाळेगारनी फिसाहती केलेली. त्यास मारून काढिले व हुसेनखानाचा भाऊ कासीमखान दोन तीन हजार स्वारानिसी आला होता. त्यास व त्याचे कबिला  व हुसेनखानाचे दोघे लेक असे दस्त केले. याउप्पर दिलेलखान, सर्जाखान व हुसेनखान येतो हे कळोन गनिमावर गेले. जागाजागा गनिमास गोशमाला देऊन तिकडूनही मारून काढिला. सांप्रत खान भीमानदी उतरून पेडगावास गेला. गनिमास ऐसे केले जे मागती विजापूरची वाट न धरावी ऐसा खट्टा केला.

चिरंजीव राजश्री संभाजीराजे मोगलाईत गेले होते त्यास आणावयाचा उपाय बहुत प्रकारे केला. त्यासही कळो आले की ये पातशाहीत, अगर विजापूरचे अगर भागानगरचे पातशाहीत आपले मनोगतनुरूप चालणार नाही. ऐसे जाणोन त्यांनी आमचे लिहिण्यावरून स्वार होऊन आले. त्याची आमची भेट जाली. घरोब्याचे रीतीने जैसे समाधान करून ये, तैसे केले. हे सविस्तर वर्तमान तुम्हास कळावे म्हणून लिहिले.... कळले असावे...

इतिहासात रस घेणाऱ्या वाचकहो, शिवरायांच्या पराक्रमी कारकीर्दीमुळे एकेकाळी ज्या आदिलशाही विरुद्ध त्यांनी स्वातंत्र्याचा लढा पुकारला, ती आदिलशाही स्वतःला वाचवायला शिवाजी महाराजांना बोलावत होती. आणि तीच आदिलशाही वाचवायला महाराज धावून जातात..! केवढं वेगळे हे राजकारण..!

दक्षिणेत आमचं आम्ही पाहून घेऊ पण दिल्लीच्या बादशहाला दक्षिण प्रांतात हातपाय पसरून द्यायचे नाहीत यासाठी शिवाजी महाराज किती धावपळ स्वतः निभावून नेतायत, प्रसंगी शत्रूला आपला मित्र बनवून टाकतात. संपूर्ण मोगलाई संपवून टाकायला विविध मित्र जोडतात. हे सगळं राजकारण अभ्यासण्याची गरज आहे. या दीर्घ पत्रातून ते ज्या व्यंकोजीराजांना सगळा वृत्तांत कळवतात तेही एकेकाळी शत्रुत्वच निभावत होते. प्रसंगी कुडाळ प्रांतात स्वराज्यावर चालून आले होते. महाराजांच्या दक्षिण दिग्विजय स्वारीत फारसे सहकार्य करत नव्हते. तरी त्यांना सामोपचाराने आणि प्रसंगी कडक शब्दांत फटकारून महाराजांनी त्यांना आपलेसे केलं.

राजांच्या या शेवटच्या पत्रात ते ज्या आत्मविश्वासाने स्वतःच्या कार्याबद्दल साधेपणाने लिहितात ते पाहून असं वाटतं की अजून १५-२० वर्षांचे आयुष्य शिवाजी महाराजांना मिळाले असते तर इतिहास कसा घडला असता असं वाटत राहतं. मात्र इतिहासाला जर---तर मंजूर नसतात हेच खरं..!

सुधांशु नाईक, कोल्हापूर.
९८३३२९९७९१
nsudha19@gmail.com

संदर्भ :- 
शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड २

Monday 13 July 2020

मिठावरील कर आणि शिवशाही

जगावेगळं या फेसबुक पेजसाठी मी लिहित असलेल्या " इतिहासाच्या पोतडीतून" या लेखमालेतील हा लेखांक  ६ वा.
- सुधांशु नाईक

मिठावरील कर आणि शिवशाही...!

मीठ म्हटलं की आपल्याला गांधीजींचा दांडी येथील सत्याग्रह आठवतो. मिठासारख्या अगदी लहानशा गोष्टीला सगळ्यांच्या आयुष्यात फार महत्व. तरीही मिठाचे उत्पादन, त्याची विक्री याकडे आपलं फारसं लक्ष नसतंच. मात्र प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिठाचे स्वराज्यातील कोकण प्रांतात अधिक उत्पादन व्हावे यासाठी बारकाईने लक्ष दिले. मिठावरील आयात कर ( Import tax) कसा हवा याबाबत स्पष्ट आदेश दिले होते. जगभर  अशा प्रकारच्या करवसुलीची सुरुवात होण्यापूर्वी... सुमारे ३५० वर्षांपूर्वी. किती वेगळी गोष्ट ही ..! त्याविषयीचा हा लेख.
कोकणाला शिवाजी महाराजांनी नेहमीच खास महत्व दिले. कोकणाला ते “नवनिधी” असं म्हणायचे. म्हणजे नवीन निर्मिती करणारी भूमी. स्वराज्याच्या सुरुवातीच्या दिवसात महाराजांनी कल्याण-भिवंडीवर हल्ला चढवला. त्यानतंर आपला सागरी किनारा सुरक्षित करायला थेट नौका-बांधणीचे काम हाती घेतले तेही वयाच्या अवघ्या २५-२६ व्या वर्षी..! केवढी ही दूरदृष्टी. कारण त्याकाळात देशातील महत्वाचा व्यापार हा विजयदुर्ग, खारेपाटण,  राजापूर जवळील जैतापूर ( तेच ते भावी अणुप्रकल्पामुळे चर्चेत आलेलं), दाभोळ, चौल, कल्याण, वसई, गोवा आणि सुरत अशा विविध बंदरांमधून सगळा कोकण प्रांत परदेशांशी जोडला गेलेला. त्यामुळे कोकणावर ताबा हवा तर उत्तम नौदल / आरमार असायलाच हवं असं हे धोरण होतं. 
त्यामुळे राजांनी कल्याण-भिवंडी, पेण- पनवेल ताब्यात घेतलं. आणि मग पुढच्या टप्प्यात दाभोळ बंदर आणि आसपासचा मुलुख. मधला चौल चा प्रांत पोर्तुगीजांकडे होता तर मुरुड-जंजिरा सिद्दीकडे. शिवाजीराजांच्या काळापूर्वीच या परिसरात इंग्रज, फ्रेंच, डच यांची व्यापारी केंद्रे होती. त्याला तत्कालीन कागदपत्रात “वखारी” असा उल्लेख आहे. राजापूरला इंग्रजांची वखार, वेंगुर्ल्यात डच मंडळींची वखार होती.

हळूहळू या सर्व भागांवर मराठा सत्तेचा वचक दिसू लागला. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग सारख्या प्राचीन जलदुर्गाना बळकट केलं गेलं. तर सिंधुदुर्ग, रत्नदुर्ग, जयगड, खांदेरी, सिद्दीच्या जंजिरा समोरचा पद्मदुर्ग, बाणकोटचा हिंमतगड आदि नवे दुर्ग तयार झाले. आरमारात अनेक नवी गलबते, गुराबा, सपाट तळाच्या लहान होड्या हे सारं निर्माण झालं. जिथं एकेकाळी पोर्तुगीज परवाने “कार्ताझ” घेऊन मालवाहतूक करावी लागे, तिथं आता मराठा आरमाराचा दरारा निर्माण झाला. मराठा परवाने असल्याविना व्यापार करता येईना. आजवर सिद्दी, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज या साऱ्यांनी स्थानिक लोकांना फार त्रास दिलेला. नारळ, पोफळी, आंबा, फणस, काजू, कोकम, भात, नाचणी, मिरी-लवंग-जायफळ असे मसाल्याचे पदार्थ आदि सर्व उत्पादनांसाठी कोकणी माणूस फार मेहनत करे. मात्र पुरेसे संरक्षण नसल्याने त्याचं फार नुकसान होई. शिवाजीराजांचा अंमल सुरु झाल्यावर अनेक प्रकारे लोकांना मदत मिळाली. प्रसंगी शेतीसाठी, बी-बियाणासाठी कर्ज, वस्तुरूपाने शेतसारा भरायची सवलत यामुळे लोकांना आश्वासक असा आधार मिळाला. इथलं उत्पादन वाढू लागलं. लोक स्वावलंबी होऊ लागले. त्यामुळे मालाच्या विक्रीतून स्वराज्यालाही धन मिळू लागलं. देशावरील बाजारपेठा या विविध घाट-वाटांनी कोकणाशी जोडल्या गेलेल्या. कोकणात उतरणारे ते सर्व घाट, बंदरे,  महत्वाची नाकी हे सारं आता मराठ्यांच्या ताब्यात आले. त्यामुळे लुटालूट कमी झाली. व्यापार वाढला.

तरीही एक महत्वाचा घटक अजूनही चाचपडत होता. तो घटक होता मीठ उत्पादकांचा. मीठ हे रत्नागिरी-रायगड परिसरातील विविध सागर किनाऱ्यांवरील विविध मिठागारांत तयार व्हायचं. ते देशातील बाजारपेठा तसेच थेट युरोप- आफ्रिका-अरबस्तानात जाई. मात्र तुलनेनं उत्पादन कमी होतं. सुरुवातीच्या काळात जेंव्हा सिद्धीचे लोक मिठाच्या या जहाजांना त्रास देत, लुटालूट करत तेंव्हा एकदा मोरोपंत पेशव्यांनी शिवरायांना सुचवले होते की, आपण इंग्रजांची जहाजे भाड्याने घेऊ. त्यांचं निशाण दिसलं की सिद्दी त्रास देणार नाही. मात्र मतलबी इंग्रजांनी मराठा व्यापाराला मदत करायचे नाकारले. तेंव्हा मग हा व्यापार जिद्दीने मराठी आरमाराने आपल्या ताब्यात घेतला. मराठा आरमार, मराठ्यांची व्यापारी जहाजे मस्कत, बसरा, एडन आदि परदेशी बंदरापर्यंत जाऊ लागली. खास मिठाच्या व्यापाऱ्यासाठी वेगळी जहाजं तयार केली गेली.

तरीही एक महत्वाची गोष्ट अजूनही त्रास देत होती मिठाच्या व्यापाराला. स्वराज्यात तयार होणाऱ्या मिठापेक्षा बारदेशात पोर्तुगीज अंमल असलेल्या प्रदेशातील मीठ हे जास्त स्वस्त होते. तिथला उद्योग ही मोठा होता. त्यामुळे सातारा, कोल्हापूर, निपाणी, हुबळी, बेळगाव, मिरज, सांगली आदि देशावरील बाजारपेठेतील व्यापारी हे स्वराज्यातून तिकडे जात आणि तिथलं मीठ घेत. या गोष्टीमुळे स्वराज्यातील तयार मिठाला जमेल त्या किंमतीला, प्रसंगी नुकसान सोसून विकावे लागे. म्हणून बरेच जण मीठ उत्पादनात पुरेसे लक्ष ही देत नव्हते. याकडे मग शिवाजीमहाराजांनी लक्ष दिले. आणि एक नवी सूचना दिली.

आपल्या देशातील उत्पादनाला संरक्षण देण्यासाठी, व्यापार वाढवण्यासाठी तशाच प्रकारच्या परदेशी उत्पन्नावर जास्त जकात किंवा आयात कर लावावा असं १९ व्या शतकात (१८२५ च्या सुमारास) जर्मन-अमेरिकन  अर्थतज्ञ फ्रेडरिश लिस्ट याने सुचवले होते. 

मात्र त्यापूर्वी १६७१ मध्ये, म्हणजेच जवळपास दीडशे वर्ष आधी शिवाजीराजांच्या स्वराज्यात हे धोरण सुचवले गेले, अंमलात आणले गेले होते ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
 १६७१ मध्ये कुडाळचा सुभेदार नरहरी आनंदराव याला लिहिलेल्या पत्रात शिवाजीमहाराज म्हणतात, “ तुम्ही घाटी जबर जकात बैसविणे. बारदेशात मीठ विकते त्याचा हिशेब प्रभावलीकडे संगमेश्वरकडे मीठ विकते त्याने कित्येक जबर पडते. ते मनास आणून त्या अजमासे जकाती जबर बैसविणे. की संगमेश्वरी मीठ विकले जाईल, घाट पावेतो जे बेरीज पडेल त्या हिशेबे बारदेशीच्या मिठास जकाती घेणे. संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महाग पडेल ऐसा जकातीचा तह देणे.

जरी जबर जकातीचा तह नेदा (म्हणजे दिला नाही तर) मुलाहिजा कराल म्हणजे मग कुल उदमी खलक बारदेशी वोहोडेल. कुल बंदरे पडतील. ये गोष्टीचा जरा उजूर न करणे. ये गोष्टीत साहेबाचा बहुत फायदा आहे. मिठाचा मामला कर्द लाख रुपये यावयाचा मामला आहे.  लिहीले प्रमाणे अंमल करणे...”

मंडळी, किती स्पष्ट शब्दांत हा आदेश आहे पहा. या महाराजांनी बारदेशच्या मार्गावरील जकात नाके जे आहेत तिथला कर वाढवायला सांगितला आहे. यामुळे दोन गोष्टी शक्य झाल्या. एक म्हणजे कर वाढल्यामुळे बारदेशमधून देशातील बाजारपेठेत येणारे मीठ महाग झाले. त्यामुळे व्यापारी आपसूकच स्वराज्यातील मिठागारांकडे वळतील. यामुळे रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मिठाची चांगली विक्री सुरु होईल. चांगली विक्री होऊ लागली की इथल्या उत्पादकांना प्रोत्साहन मिळेल. असं न झालं तर इथले सर्व व्यापारी बारदेशात जातील आणि इथली सर्व मिठागरे बंद पडतील. हे होऊ नये म्हणून त्यांनी एक साधा उपाय केला... फक्त परकीय प्रदेशातून येणाऱ्या मिठावरील कर वाढवला. मीठ ही जीवनावश्यक गोष्ट. केवळ स्वराज्यातील बाजारपेठाच नव्हे तर मोगली, आदिलशाही आणि परदेशी बाजारातही त्यामुळे आपल्या स्वराज्यातील मिठाची मागणी वाढली. उत्पादनाची विक्री होऊन करही मिळू लागला. तसेच तरीही जे व्यापारी बारदेशातूनच मीठ आणत असतील त्यावर जास्त कर लावल्याने जास्त धन त्या करातून मिळू लागले. 

आपल्याला शिवाजी महाराज म्हटलं की फक्त चौथीच्या पुस्तकातील हाती तलवार घेऊन, सोबत सहकारी घेऊन घोड्यावर बसून लढाईला निघालेले महाराज आठवतात.  प्रसंगी स्वतः जीव धोक्यात घालून महाराजांनी लढायात नेतृत्व केलंच, मात्र त्याचबरोबर रयतेच्या सुखासाठी शेती, फलोत्पादन, बंदरातील व्यवसाय, पशुधनाला सहाय्य अशा ज्या अनेक बारीक गोष्टीत लक्ष घातले, त्यातीलच ही एक महत्वाची गोष्ट होती..! अशा गोष्टीमुळेच स्वराज्यातील सर्वसामान्य माणसाला शिवाजीमहाराज हे आपला जवळचा माणूस वाटू लागले. 

मिठाचा मामला हा कर्द लाख रुपयांचा मामला आहे हे महाराजांचं वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. नुसता इतिहास म्हणून नव्हे तर सदैव आपल्या देशातील उत्पादनाला मदत करताना हा सगळाच मामला लक्षात घ्यायला हवा. परदेशी वस्तूंच्या आयातीबाबत धोरण ठरवतानाही आपल्या शासनाने याचं अनुकरण करायला हवं असं मला प्रकर्षानं वाटतं.

सुधांशु नाईक
९८३३२९९७९१ 
nsudha19@gmail.com

संदर्भ :- 
शिवकालीन पत्रसारसंग्रह
अशी होती शिवशाही – अ. रा. कुलकर्णी
फोटोसौजन्य: गुगल

मोगली शहाजाद्याची कोकण स्वारी आणि रामघाट

जगावेगळं या फेसबुक पेजसाठी मी लिहीत असलेल्या  "इतिहासाच्या पोतडीतून" या लेखमालेतील हा  लेखांक  ५ वा. 
- सुधांशु नाईक.
मोगली शहजाद्याची कोकण स्वारी  आणि रामघाट 

१६८० मध्ये संभाजी महाराजांनी स्वराज्याची जबाबदारी पेलली. त्यानंतर काही महिन्यात औरंगजेबाचा एक पुत्र अकबर हा पित्याविरुद्ध बंड करून उठला. ते बंड अयशस्वी झालं. तो मग १६८१ मध्ये थेट संभाजीराजांच्या आश्रयाला आला. आणि त्यापाठोपाठ स्वराज्य पूर्ण बुडवायला प्रत्यक्ष आलमगीर औरंगजेब दक्ख्खन मध्ये उतरला. त्याच्यासोबत प्रचंड मोठं सैन्य, अनेक राजपूत-मोगली सरदार होते आणि सोबत शहजादे देखील. यापैकीच एक होता शहजादा शहाआलम. त्याच्या एका स्वारीची ही कहाणी...

संभाजीराजांनी स्वराज्याची जबाबदारी शिरावर घेतली. त्यानंतरच्या काळातील एकूण धामधूम ही विस्मयकारक आहे. सिद्दी, पोर्तुगीज, आदिलशाही, इंग्रज आणि प्रत्यक्ष आलमगीर औरंगजेब हे चारी बाजूने स्वराज्य संपवायला सज्ज झालेले. त्यांच्यासमोर होते अवघ्या पंचविशीतले तरुण छत्रपती शंभूराजे. मात्र या सर्व आक्रमणावर शंभूराजे असे काही तुटून पडले की शत्रू सगळीकडे पिछाडीवर गेला. १६८१ मध्ये शहजादा अकबर दुर्गादास राठोड यांच्यासह स्वराज्यात दाखल झाला. बापाविरुद्ध अयशस्वी बंड केलेला अकबर आता जीव वाचवायला धावत आलेला. खरंतर ही मोठी जोखीम. मात्र काही दूरदृष्टी ठेऊन शंभूराजांनी त्याला आश्रय दिला. पाली-सुधागड परिसरात त्याची व्यवस्था केली. एकेकाळी स्वराज्याचे सरसेनापती असलेले, आणि नंतर मोगलांकडे जाऊन पुन्हा स्वराज्यात परत आलेल्या नेताजी पालकर यांच्याकडे त्यांच्या आदरातिथ्याची जबाबदारी दिल्याचा एक उल्लेख इतिहासात सापडतो. मात्र स्वतः शंभूराजांनी लगेच भेट घेणे टाळले. एकूण सगळा अंदाज घेऊन मग त्यांनी अकबराची भेट घेतली आणि त्याला विविध स्वाऱ्यामध्ये आपल्या सोबत घ्यायला सुरुवात केली. 

एव्हाना मोगली सैन्याचे विविध तोलामोलाचे सरदार स्वराज्यावर चौफेर तुटून पडले होते. बागलाण, खानदेश, कल्याण-भिवंडी पासून कोल्हापूर प्रांतापर्यंत अनेक ठिकाणी घमासान लढाया सुरु होत्या. प्रत्यक्ष शंभूराजे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासह अनेकांनी दैदिप्यमान असा पराक्रम गाजवला. मोगलांना कोणत्याच लढाईत यश मिळाले नाही. औरंगजेबाला वाटले होते की शिवाजीराजांच्या मृत्युनंतर स्वराज्याचा चुटकीसरशी घास घेता येईल, पण... ते घडले नाही. मोगलांच्या सोबतच संभाजीराजांच्या सैन्याने चौलजवळ, वसई-डहाणू पट्ट्यांत पोर्तुगीजांना दमवले. जंजिरेकर सिद्दीची कोंडी केली. १६८२-८३ च्या सुमारास मग शंभूराजांनी थेट गोव्यावर स्वारी केली. गोवा संग्राम आणि तिथे शम्भूराजांसह मराठी सैन्यानं दाखवलेलं शौर्य हा एका स्वतंत्र पुस्तकाचाच विषय आहे. या दरम्यान शहजादा अकबर हाही प्रसंगी काहीवेळा मराठ्यांसोबत असल्याचे उल्लेख आहेत. गोव्यातील पोर्तुगीज, वेंगुर्लेकर डच यांच्याशी या दरम्यान वाटाघाटी सुरु होत्या.

उत्तर कोकण, बागलाण आदि प्रांतात आलेलं अपयश लक्षात घेऊन आलमगीर औरंगजेबानं मग दक्षिण कोकणावर स्वारी करायचं ठरवलं. विजापूरकर आदिलशहा, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आदि साऱ्यांनी अन्य प्रांतातून येणाऱ्या मराठा सैन्याला अटकाव करावा आणि शाहजादा शहा आलम याने दक्षिण कोकणवर स्वारी करून हा प्रांत जिंकावा असं हे नियोजन. स्वतः औरंगजेब यावेळी अहमदनगरच्या आसपास थांबला. 
मात्र घडले काही विपरीतच. गोव्यात मोठी धामधूम उडवून शंभूराजांनी पोर्तुगीजांना चांगलीच अद्दल घडवली. गोवा त्यांच्या हातून जाता जाता थोडक्यात वाचला. त्यामुळे शंभूराजांच्या विरोधात थेट युद्धात सहभागी होणे म्हणजे पुन्हा नव्याने प्राणसंकट ओढवून घेणं इतकं पोर्तुगीजांना आता नक्की कळले होतं. शंभूराजांनी ज्या तडफेनं मोगली सैन्याचं पहिलं मोठं आक्रमण मोडून काढलं त्यामुळे इंग्रजांचेही धाबे दणाणले. औरंगजेब आणि मोगलांनी आणलेल्या मोठ्या फौजफाट्यापुढे आता मराठे मोडून पडतील अशी पत्र पाठवणारे सुरत आणि मुंबईकर या २-३ वर्षातील शंभूराजांचा पराक्रम पाहून शांत झाले. त्यांनी वरकरणी तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारलं.
शहाआलम जवळपास ६०-७० हजारांचा फौजफाटा घेऊन सप्टेंबर १६८३ मध्ये रामघाट मार्गे गोव्याकडे निघाला. रामघाट हा पारगड –तिलारी जवळून गोव्यात उतरणारा त्या काळातील मोठा प्रसिद्ध मार्ग. हल्लीच्या कोल्हापूर जिल्ह्याचे हे दक्षिण टोक. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचे. संपूर्ण मार्ग हा दाट झाडीने, डोंगर दऱ्यानी भरलेला. आजही या प्रांतात आपण गेलो तर इथलं जंगल पाहता येतं. त्याकाळी सुमारे ३५० वर्षांपूर्वी ते कसं असेल याची कल्पना येते.

या सर्व प्रवासात मोगली सैन्याला वाटेत अनेक ठिकाणी मराठ्यांच्या तुकड्यांनी छापे घालून त्रस्त केले. मोगली सैन्य ही मराठा अंमल असलेल्या भागातून जाताना लुटालूट करत होते. जाळपोळ करत होते त्यामुळे स्थानिक लोकांची सहानुभूतीही त्यांना मिळेना. त्यात मुख्य मार्गावरील बऱ्याच लोकांचे मराठ्यांनी स्थलांतर केलेलं. त्यामुळे तशी फारशी झळ मराठ्यांना लागली नाही. त्यामुळे अधिक त्वेषाने मराठे मोगलांवर झडप घालत होते. तरीही मोठ्या नेटाने शहा आलम आणि ते सैन्य गोव्याजवळ पोचलं. मोगली सैन्यानं थेट पोर्तुगीजांच्या आरमाराची नासधूस सुरु केली. त्यामुळे पोर्तुगीज देखील बिथरले. मग वकिलांमार्फत वाटाघाटी. एकूणच सगळा अंदाज घेत पोर्तुगीजांनीही प्रत्यक्ष युद्धात उतरण्याचे टाळले. त्यांनी जमेल तसा रसद पुरवठा करायला तेवढी तयारी दाखवली. 

डिचोली, कुडाळ, बांदा आदि ठिकाणांची मोगलांनी नासधूस केली. लुटालूट केली. मात्र त्यांना फार मोठे यश कुठेच मिळेना. हा दक्षिण किंवा तळकोकणातला भाग अनेक खाड्यानी भरलेला. त्यामुळे भरतीच्या काळात बरेच ठिकाणी खारे पाणी खूप आतवर येई. अनेक विहिरीपर्यंत उतरे. जी जी गोड्या पाण्याची तळी, विहिरी पाणवठे होते ते मराठ्यांनी ताब्यात घेतलेले. मोगलांच्या सैन्याला जो रसद पुरवठा होई तो देखील वाटेत मधल्यामध्ये मराठ्यांची तुकडी लुटून नेई. सुरतेहून खास सागरी मार्गाने रसद पुरवठा करायचा प्रयत्न झाला. मात्र मराठ्यांच्या आरमाराने आणि विविध जलदुर्गांवरील शिबंदीने रसद पुरवठा करणारी जहाजेही लुटली.  मराठ्यांना ज्या भागातून तात्पुरती माघार घ्यायची वेळ येई तेंव्हा जाता जाता मराठे तिथल्या पाणवठ्यात विषारी पदार्थ, मेलेली जनावरे वगैरे टाकून ठेवत. अन्न-धान्याची उपासमार त्यात पिण्याच्या पाण्याचे हाल. अवघ्या २-३ महिन्यातच मोगली फौजेत दाणादाण उडाली. 

एव्हाना ज्या अकबराला पकडायची मुख्य कामगिरी शहा आलमवर होती त्या अकबराला पकडणेही त्याला शक्य झाले नाही तोही रायगडकडे निसटून गेला. मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेश जिंकून घेणेही जमेना. त्यात रोगराई पसरली. वेगुर्ला ते गोवा हा प्रांत पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात... त्यामुळे गोव्यातूनही कसली मदत मिळेना. शेवटी त्यानं पुन्हा रामघाटमार्गे परत जायचं ठरवलं. लहानशी साधी एखादी चकमकही जिंकू न शकलेल्या या भल्या मोठ्या फौजेची मराठ्यांनी पुन्हा लांडगेतोड सुरु केली. 

धड खायला अन्न नाही, पाणी नाही आणि त्यात भर म्हणून दुषित पाण्यामुळे अनेकांचे जीव घेणारी कॉलरा सदृश साथ.. आणि या सर्वावर कडी करत सतत वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून तिखट हल्ले करणाऱ्या मराठ्यांच्या तुकड्या...मोगली सैन्याचे अगदी हालहाल झाले. जवळपास बहुतेक सारं सैन्य गारद झालं. पागेत चांगले घोडेही उरले नाहीत. घाटमाथ्यावर पोचून तो विजापूरकडे वळला. 

तिथं वाटेत एका गावात छावणी टाकली. जवळपास ६०-७० हजारांचं सैन्य गारद झालं होतं. हजारो घोडे, उंट मृत्युमुखी पडले होते. त्याने शेवटी मला आता सहज परत यायलाही जमणार नाही, मदत करा असा निरोप आपल्या बापाला औरंगजेबालाच पाठवला. एप्रिल १६८४ मध्ये शेवटी औरंगजेबाने रुहुल्लाखानाला पाठवले. सोबत २० हजार अश्रफी, १०० घोडे, ५०० उंट पाठवले. तेंव्हा कुठे हताश झालेला मोगली शहजादा अहमदनगरच्या छावणीत दाखल झाला.

कोणत्याही युद्धात शत्रूकडून आक्रमण झाल्यावर प्रतिकारासाठी आपल्याकडे किमान दुप्पट सैन्य तरी असावे असा एक साधा संकेत असतो. इथं मराठे आधीच विविध ठिकाणी सुरु असलेल्या युद्धात गुंतले होते. प्रत्यक्ष छत्रपती शंभूराजे, सरसेनापती हंबीरराव, कवी कलश, रुपाजी भोसले, म्हळोजी घोरपडे आदि सगळे अनेक ठिकाणी झुंजत होते. त्यामुळे शहा आलम च्या सैन्याला समोरासमोर तोंड द्यायला कोणतीही फारशी मोठी तुकडी नसताना मराठ्यांनी हा प्रतिकार केला होता. औरंगजेबाच्या मोठ्या मुलासाठी ही मोठी नामुष्की होती. आणि त्यामुळे औरंगजेब त्याच्यावर नाराज झाला.

मराठ्यांना आपण सहज जिंकू शकत नाही हे औरंगजेबाला आता कळून चुकलं होतं. त्यामुळे इथून पुढच्या काळात मग औरंगजेब विजापूरची आदिलशाही आणि भागानगरची कुतुबशाही बुडवायला निघाला. या दोन्ही सत्ता खूप जुन्या. मात्र अवघ्या १-२ वर्षात औरंगजेबानं त्या नेस्तनाबूत केल्या. त्या काळातही मराठे मात्र झुंजत राहिले. मोगलांना कुठेच फारसे विजय मिळू न देता..!
मंडळी, रामघाट परिसर, तिलारी, तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा याला शिवाजी महाराजांनी ज्या गडाची किल्लेदारी दिली तो याच परिसरातील महत्वाचा असा पारगड हा सगळा भाग हल्ली पर्यटनासाठी प्रसिद्ध होत आहे. इथलं जंगल, धबधबे लोकांना आकर्षित करत आहेत.  मात्र या परिसरात झालेल्या अशा पराक्रमाच्या कथा आपल्याला ठाऊक नसतात. रामघाटाच्या परिसरातील घाट चढून येणाऱ्या सैन्याला पाणी मिळावे म्हणून तयार केलेली प्राचीन विहीर आजही पाहता येते. या विहिरीच्या संवर्धनासाठी, तसेच परिसरातील पारगड, कलानिधीगड, गंधर्वगड आदि गडकोटांच्या स्वच्छतेसाठीही लोकांनी पुढे यायला हवे आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या परिसरात शत्रूला नामोहरम केले, प्रसंगी बलिदान दिले तिथला इतिहास सांगायला हवा आणि विविध अवशेषांचे जतन करायला हवं.

सुधांशु नाईक 
(९८३३२९९७९१) 
nsudha19@gmail.com

संदर्भ :- 
शिवपुत्र संभाजी – डॉ. सौ. कमल गोखले
छत्रपती संभाजीराजे – वा. सी. बेन्द्रे
( सोबतचे छायाचित्र : पारगड-रामघाट परिसरातील एका प्राचीन विहिरीचे आहे.)

एका स्वामीनिष्ठेचा सन्मान

जगावेगळं या पेजवरील माझ्या " इतिहासाच्या पोतडीतून"– या लेखमालेतील हा लेखांक 04.
- सुधांशु नाईक

एका स्वामिनिष्ठेचा सन्मान... 
शिवाजी महाराज म्हटलं की आपला ऊर अभिमानाने भरून येतो. एका लहानशा प्रदेशाने स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची ललकारी दिली आणि अवघ्या हिंदुस्तानात ते नाव दुमदुमू लागलं. हे स्वराज्य अनेकांच्या कष्टातून निर्माण झालं. अनेकांनी यासाठी बलिदान दिलं. शिवाजी महाराजांचं मोठेपण हे की त्यांनी या सर्वांच्या त्यागाची जाणीव ठेवली. 21 जून २०२० या दिवशी नुकतंच सूर्यग्रहण झालं. शिवकालातील एका सूर्यग्रहणाच्या दिवशी एक अभूतपूर्व घटना घडली, एका ज्येष्ठ व्यक्तीच्या स्वामिनिष्ठेचा राजांनी कसा सन्मान केला त्याविषयी...

शिवरायांनी जेंव्हा रोहिडा, तोरणा, पुरंदर आदि बलवान दुर्ग ताब्यात घेतले, राजगड सारख्या मोक्याच्या जागेवर राजधानीची निर्मिती सुरु केली तेंव्हा दूर कर्नाटकात मुक्कामी असलेल्या आबासाहेब शहाजीराजांनी यासाठी गुप्त पाठबळ द्यायला सुरुवात केली. त्यांनी काही मातबर माणसे कर्नाटकातून इकडे पाठवली. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे जसे त्यात कान्होजी जेधे नाईक होते तसेच होते माणकोजी दहातोंडे, सोनोपंत डबीर. माणकोजी दहातोंडे हे बाजी पासलकर यांच्या माघारी स्वराज्याचे सरनौबत बनले तर सोनोपंत महाराजांचे विश्वासू मार्गदर्शक बनले. सोनोपंत हे अत्यंत बुद्धिवान. फार्सी भाषेचे ते जाणकार. निजामशाही, आदिलशाही, मोगलाई हे सगळं जवळून पाहिलेलं त्यांनी. त्यांचे अत्याचार पाहिलेले. कुणाची नियत कशी, कुणाशी कसं वागायला हवं कुणाशी राजनीतीचे कुठले डावपेच टाकायचे हे सगळं त्यांना नेमकं ठाऊक. प्रसंगी शहाजीराजांना अत्यंत अचूक आणि मार्मिक सल्ला देणारं हे निःस्वार्थी असं व्यक्तिमत्व. 

सोनोपंत स्वराज्यात दाखल झाले आणि काही काळातच मोठं राजकारण निर्माण झालं. बलवान होऊ लागलेल्या शहाजीराजांची दोन्ही मुले शिवाजी आणि संभाजी यांच्यासह शहाजीराजांना संपवून टाकायचा कुटील डाव आदिलशहाने टाकला. शिवराय आणि संभाजीराजे या दोघांनी त्याला खणखणीत प्रत्युत्तर दिले. स्वराज्यावर चालून आलेल्या फत्तेखानाच्या मोठ्या सैन्याचा शिवरायांनी संपूर्ण पराभव केला तर बंगळूरवर चालून गेलेल्या फर्रादखानाला शंभूराजांनी हरवले. आदिलशहाने तर कपटाने शहाजीराजांना कैद करून ठेवलं होतं. या परिस्थितीत सोनोपंतांच्या मदतीनं महाराजांनी मोठी व्यूहरचना केली. एकेकाळी प्रत्यक्ष शाहजहान बादशाहाशी शहाजीराजांचा परिचय होता. काहीकाळ त्यांनी मोगलांची चाकरी केलेली. नंतर निजामशाही खांद्यावर घेत प्रसंगी त्यांनी बादशहाविरुद्ध लढताना मोठं शौर्य ही दाखवलेलं. त्यामुळे शहाजहान बादशहाचा मुलगा मुराद याच्याशी मग संधान बांधले. मुत्सदी डावपेच आखून मग शिवरायांनी शहजादा मुराद याला आदिलशाहीला फर्मान धाडायला उद्युक्त केलं. प्रत्यक्ष मोगलाईसोबत पंगा घेणं आदिलशाहीला परवडलं नसतं. मग सन्मानाने शहाजीराजांची मुक्तता केली गेली. यावेळी आदिलशहाने मात्र कोंढाणा किल्ला शिवाजीने परत द्यायला हवा अशी अट घातली. 

शहाजीराजांचे तसे पत्र जेंव्हा शिवरायांना मिळाले तेंव्हा शिवराय अत्यंत चिडले. “एकेक गड जिंकून घेताना आमची माणसे कशी प्राण पणाला लावतात हे आबासाहेबांना कसं कळत नाही.. त्यांनी आम्हास ओळखले नाही. कर्नाटकात स्वतः एकतर गाफील राहिले आणि शत्रूकडून कैद भोगावी लागली...” असं काहीसं ते चिडून बोलू लागले... त्यावेळी शेजारी सोनोपंत उभे होते. त्यांचा पारा चढला. तरुण वयातील शिवरायांचे ते अविवेकी बोलणे ऐकून त्यांनी जागेवरच शिवरायांना सुनवायला सुरुवात केली.. 

स्पष्ट आणि खंबीर आवाजात सोनोपंत सांगू लागले, “राजे, तुम्ही काय बोलता आहात, एक तो कोंढाणा किल्ला काय की तुम्ही वडिलांची पुण्याई विसरलात... तुमचे वडील इतुके थोर की एकाच काय १० किल्ले देऊन टाकावेत. तुमच्या मनगटात ताकद आहे. तुम्ही सगळे किल्ले उद्या पुन्हा जिंकून घेऊ शकता.. मात्र वडिलांना गमावलेत तर ते परत मिळतील का.. याचा जरा विचार करा. अविचार करू नका. कोंढाणा द्यावा. वडिलांना मुक्त करून नंतर कर्तृत्व दाखवावे...” असं काही ते इतक्या तळमळीने बोलले की शिवरायांना आपली चूक उमगली. त्यांनी पट्कन सोनोपंतांचा हात धरला. म्हणाले, “ तुम्ही योग्य बोललात पंत. आम्ही चुकलो. अविचार करू पाहत होतो. तुम्ही रोखले हे उत्तम केलेत..” आणि महाराजांनी कोंढाणा आदिलशहाला देऊन टाकला. सोनोपंत, माणकोजी आदि मंडळींच्या सल्ल्यानं राजांनी हे राजकारण देखील जिंकून दाखवलं.

पुढे स्वराज्यविस्तार होत होता. या दरम्यान मुहम्मद आदिलशहा मरण पावला. आणि त्याच्या मुलाला अली याला गादीवर बसवून बडी बेगम सर्व कामकाज पाहू लागली. याचा महाराजांनी फायदा उठवला. जोरदार हालचाली करून बरेच किल्ले हस्तगत केले. थेट जावळीचे खोरेही स्वराज्यात आले. दाभोळ पर्यंत धडक मारून तो आदिलशाही प्रांत ही ताब्यात घेतला. या हालचालींमुळे मोगलांकडून काही कारवाई होऊ नये यासाठी सोनोपंत डबीर मोगली शहजादा औरंगजेब याच्याकडे निघाले. या काळात औरंगजेब दक्खनचा सुभेदार होता आणि आदिलशाही संपवावी यासाठी बिदरजवळ आदिलशाही सैन्यासोबत लढत होता. 

सोनोपंतानी औरंगजेबाची भेट घेतली. खलिता सादर केला. त्यात काहीसं लिहिलेलं होतं की, “कोकण प्रांत आणि तिथले आदिलशाहीतले किल्ले आम्ही घेतले आहेत. आम्ही तुमचेच प्रतिनिधी म्हणून या मोहिमा पार पाडत आहोत. ताब्यात घेतलेल्या या भागासाठी आपली मंजुरी द्यावी.”
 लढाईच्या धामधुमीत आधीच औरंगजेबाची बिकट अवस्था झालेली. आदिलशाही सरदार अफझलखानाने औरंगजेबाची चांगलीच नाकेबंदी केलेली. त्यात उत्तरेत शाहजहान बादशहाच्या आजारपणाच्या बातम्या. औरंगजेबाचे सगळे लक्ष तिकडे. त्याला आता बादशाहीचे वेध लागलेले. त्यामुळे त्याने त्वरित सोनोपंताना ही मंजुरी देऊन टाकली. हिजरी सन रजब १०६७ म्हणजेच एप्रिल १६५७ च्या या पत्रात औरंगजेबाने असं लिहिलंय की, “सांप्रत विजापुरकराकडील जे किल्ले, मुलुख, दाभोळ बंदर आणि दाभोळखालील मुलुख तुम्हाकडे आहे, त्यास आमची मंजुरी आहे. तुमच्यावर आमचा पूर्ण लोभ आहे..”

भाग आदिलशहाचा, जिंकला शिवरायांनी आणि त्यासाठी फुकटची मंजुरी मागून घेतली मोगलांची..! ही सगळी राजनीती फार अभ्यासावी अशीच. 
सोनोपंत अजून स्वराज्यात परत देखील आले असतील-नसतील... तोवर अवघ्या आठवडाभरात स्वतः शिवरायांनी खास तुकडी सोबत घेऊन थेट जुन्नरवर धाड टाकली. जुन्नर हे मोगलांचे महत्वाचे ठाणे. तिथून सोने-नाणे, जवाहीर, कापडचोपड यांसह जवळपास सातशे उत्तम अरबी घोडे मराठ्यांनी लुटले. मग पुन्हा जाऊन अहमदनगरवर हल्ला केला. तिथला मोगली सुभेदार नौसीरखान शूर होता. तिथे महाराजांना फार काही करता आले नाही. माघार घ्यावी लागली. आठ दिवसांपूर्वी या मराठ्यांचा वकील गोडगोड बोलून जातो आणि लगोलग हे मराठे आपलीच मुख्य ठाणी लुटतात. प्रचंड चिडलेल्या औरंगजेबाने कारतलबखान, रायकर्णसिह, अब्दुल मुनीम आदि सरदार पाठवले आणि शिवाजीच्या मुलुखातील गावे जमीनदोस्त करा, लोकांच्या कत्तली करा, पुणे-चाकण आदि शिवाजीची ठाणी जिंकून घ्या असे आदेश दिले.

त्यापाठोपाठ लगेच पुन्हा शिवाजीराजांनी रघुनाथपंत कोरडे याना तातडीने पुन्हा औरंगजेबाकडे पाठवले आणि चुकून ही आगळीक घडल्याबद्दल क्षमा मागितली. पुनश्च असे घडणार नाही हे सांगताना लुटलेला माल परत देण्याबाबत मात्र चकार शब्द काढला नाही..!

दिल्लीकडे लक्ष लागलेल्या औरंगजेबाने मोठ्या मनाने माफी दिल्याचे पत्र दिले. त्यात म्हटले आहे की, “ तुमची अर्जदास्त रघुनाथपंत वकील यांचेबरोबर पाठवली ती आम्हास पावली. तुम्ही केलेली कृत्ये विसरण्याजोगी नाहीत. तथापि तुम्ही पश्चात्ताप व्यक्त केल्याने आम्ही माफ करत आहोत. पुन्हा ऐसी आगळीक ण घडावी.. इत्यादी..इत्यादी..

या सगळ्या घडामोडीत सोनोपंतांच्या मुत्सद्देगिरीचा महाराजांना चांगलाच उपयोग झाला. 

नंतरच्या अफझलखान प्रकरणातही महाराजांच्या जवळ जे काही खास सल्लागार होते त्यात कान्होजी जेधे नाईक, माणकोजी दहातोंडे, गोमाजी नाईक पानसंबळ, कृष्णाजी नाईक पानसंबळ, रघुनाथ अत्रे, मोरोपंत, गोपीनाथकाका बोकील, नेताजी यांच्यासोबत ज्येष्ठ असे सोनोपंत डबीर नेहमीच होते.

इतकंच नव्हे तर नंतरच्या काळात जेंव्हा शाहिस्तेखानाची स्वारी झाली, तेंव्हा फार्सी भाषेचे उत्तम जाणकार असलेले सोनोपंत थेट शाहिस्तेखानाची भेट घ्यायला आणि काही मसलत करायला गेल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो.  मात्र तहाची बोलणी बहुदा फिसकटली असावीत. शाहिस्तेखानाची नंतर महाराजांनी मोठी फजिती केली आणि गेल्या काही वर्षात स्वराज्याची झालेली हानी भरून काढण्यासाठी थेट सुरतेवर स्वारी केली. सुरत ही मोगलांची सर्व मोठी व्यापारी पेठ. महाराजांना इथे करोडोची संपत्ती मिळाली. तिथून महाराज परत आले तर शहाजीराजांना देवाज्ञा झाल्याची वाईट बातमी.!

महाराज आणि सोबतच्या सहकाऱ्यांनी मोठ्या मिनतवारीने आऊसाहेबांचे मान वळवले. आणि सती जायला तयार झालेल्या जिजाऊ थांबल्या... स्वराज्याचं काम वाढत राहिलं..!

महाराजांच्या वाढत्या पराक्रमाने जिजाऊ समाधानी होत होत्या. त्यातच आता होणाऱ्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने आपण काही दानधर्म करावा असं त्यांना वाटलं.
क्रोधीनाम संवत्सर, इ.स. १६६५, पौष महिन्यातील अमावस्या. त्यादिवशी सूर्यग्रहण होते. क्षेत्र महाबळेश्वर येथे शिवाजी महाराज आऊसाहेब जिजाबाई यांच्यासह काही खास माणसांसोबत आले होते. सूर्यग्रहणाच्या निमित्ताने काही दानधर्म करावा अशी जिजाऊसाहेबांची इच्छा पूर्ण करायला. महाराजांनी ठरवलं की आपण आईची सुवर्णतुला करायची..! महाबळेश्वरचे वेदमूर्ती गोपाळभट हे महाराजांचे विश्वासू. त्यांच्या हस्ते ही सुवर्णतुला पार पडणार होती.. वेदमूर्ती गोपाळभट यांच्यासह बाकी ब्रह्मवृंद मंत्रविधी म्हणू लागला. एका मोठ्या तराजूच्या एका पारड्यात जिजाऊ बसलेल्या. आणि दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या मोहरा टाकल्या जात होत्या... महाराज अत्यंत कृतकृत्य होऊन आऊसाहेबांची ही तुला पाहत होते. अत्यंत जीवावरच्या धामधूमीतून आज हे क्षण जिजाऊना दिसत होते. अत्यंत पराक्रमी असा पती निघून गेला, मात्र त्याच्या माघारी त्यापेक्षाही पराक्रमी अशा पुत्रानं त्यांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं होतं... हळूहळू ते स्वप्न आकार घेत होतं.! सुवर्णतुला पूर्ण झाली. त्यांच्या चेहेऱ्यावर समाधान विलसलं.

नंतर अचानक महाराज स्वतः पुढे होऊन अत्यंत ज्येष्ठ अशा एका व्यक्तीजवळ गेले.  ते होते सोनोपंत विश्वनाथ डबीर. .!  पंतांचे वय झालेले. अगदी थकलेले... महाराज कदाचित म्हणाले असतील, “ पंत, या असे पुढे या.. तुमचीही आज तुला करायची आहे. तुम्ही आजवर मला वडिलांची माया दिली. प्रसंगी योग्य सल्ला दिला. अवघड परिस्थितीत शत्रूसैन्यात जाऊन स्वतः वकिली करत मुत्सद्देगिरी केली... कोणत्याही गोष्टीचा लोभ न बाळगता स्वराज्याची निरपेक्ष सेवा केलीत. तुमचं कर्तब मोठं आहे...!” 
शिवरायांनी ही इच्छा बोलून दाखवताच पंताना भरून आलं... आता ते सदरेवर काम करत नसायचे. तर त्यांचा मुलगा त्रिंबकपंत कामकाज पाहत होता. त्यालाही फार्सी भाषेचे उत्तम ज्ञान होते. त्यामुळे निवृत्त झालेल्या पंतांची तुला करावी असा मनसुबा शिवराय सांगतील असं खुद्द पंतानीही अपेक्षिले नसावे. हा त्यांच्यासाठी बहुमानच होता. फार मोठा बहुमान. पंताना जुने दिवस आठवू लागले. मनात राजांप्रती कृतज्ञता दाटली. डोळे आनंदाश्रूनी भरले. “शिवबा...” इतकेच उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. त्यांना पुढे बोलवेना. थरथरत पंत उठले. राजांनी त्यांना तराजूच्या पारड्यात बसवले. क्षेत्र महाबळेश्वरच्या त्या पवित्र भूमीत वृध्द सोनोपंतांची सुवर्णतुला होऊ लागली..! सोनोपंताना जे समाधान लाभलं त्यापेक्षा जास्त समाधान शिवरायांना लाभलं होतं.

दोन तीन हजार वर्षांच्या इतिहासाची पाने उलटू लागलो की अशा विविध सुवर्णतुलांबाबतच्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. मात्र आपल्याच एका सहकाऱ्याची, एका स्वामिनिष्ठ सेवकाची तुला करणारे शिवबाराजे बहुदा एकमेव असावेत असं वाटतं. अशा राजांसाठी मग लोक घरादारांवर निखारे ठेवतात. प्रसंगी आपल्या घरातलं काम बाजूला ठेवून स्वराज्यासाठी रक्त-घाम गाळत राहतात. धन्य ती सर्व माणसे आणि त्यांच्या स्वराज्यसेवेचा मान राखणारे ते शिवछत्रपती..!!

सुधांशु नाईक, कोल्हापूर.
(९८३३२९९७९१)
nsudha19@gmail.com

संदर्भ :- 
शिवकालीन पत्र सार संग्रह
शककर्ते शिवराय – विजयराव देशमुख
राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे
फोटो सौजन्य: गुगल