marathi blog vishwa

Wednesday, 8 January 2020

चैतन्यदायी उर्जा देणारं दैवी गाणं..!

आयुष्यात अनेक संकटं, कष्ट, मनस्ताप, अपमान, फसवणूक, निराशा, दु:ख आदि भावभावनांचा पावलोपावली सामना करावा लागतोच. मात्र हे सोसत जगावंच लागतं अन् त्यासाठी सतत गरज लागते कसल्यातरी उर्जेची, चैतन्याची. अगदी अशीच चैतन्यदायी उर्जा घेऊन आलेलं गाणं सादर करुन वेंकटेशकुमार यांनी कोल्हापूरच्या संगीतप्रेमींना एका दैवी गायकीची अनुभूती दिली..
शिवगंधार संस्थेने आयोजित केलेल्या  " तपस्या" या विशेष कार्यक्रमात त्यांनी तेजस्वी गाणं सादर करुन रसिकांना शब्दातीत स्वरानंद दिला.
विविध कारणांमुळे प्रत्यक्ष गायन सुरु होण्यास जवळपास दीड तासांचा वेळ लागल्यानं रसिकांमध्ये असलेली अस्वस्थता, पं. वेंकटेश कुमारांचं गाणं सुरु होताच एकदम संपुष्टात आली. 

शुध्द कल्याण रागालील " तुमबिन कौन.." या बंदिशीनं सुरुवातीपासूनच रसिकांच्या मनावर पकड घेतली. मुळात बुवांचं गाणं धारदार. प्रत्येक स्वर गोलाईयुक्त, अचूक बाणासारखा वेध घेणारा. त्यांचं गाणं कधीही ऐकायला बसलं की असं वाटतं हे जणू यापूर्वी 2,3 तास रियाज करुन गळा तापवूनच आलेत.
 प्रत्येक स्वराची शुध्दता, तालावरची भक्कम पकड, लयीचा अचूक अंदाज पहातापहाता समोरच्याला संमोहित करुन सोडतात. किराणा घराण्याच्या परंपरेला साजेशी स्वरांची भावनाप्रधान आळवणी करतानाच ग्वाल्हेरी गायकीप्रमाणे शांत, शिस्तबध्द विस्तार करत बुवा मैफलीवर अक्षरश: राज्य करत होते. 
बोलआलाप, हुंकाराची लघु तान ( मुखबंदीप्रमाणे ), प्रत्येक आवर्तनाला विविध मात्रांवरुन उठत समेवर डौलदारपणे येताना सर्व रसिक मनात एक वेगळा आनंद फुलत होता.
मुख्य बंदिशीनंतर त्यांनी " मौंदर बाजे" ही महमदशा यांची गाजलेली चीज सादर केली. बेंगळूरच्या केशव जोशीनी त्रितालाचा दमदार ठेका, तर सतीश कोळ्ळी यांनी वेंकटेश कुमारांच्या सुरांचा मागोवा घेत जाणारी सुरेख समर्पक  संवादिनी साथ केली. बोलताना, सपाट ताना आदि सर्व वैशिष्ट्यांनी रंगलेली शुध्द कल्याणची द्रुत चीज संपली तेव्हा एका वेगळ्या आनंदानं मन प्रफुल्लित झालं होतं. 

कोणत्याही उत्तम संगीताची जादू अशीच तर असते. ती नेहमी तुम्हाला तुमच्या रोजच्या जगण्यातून वेगळ्या अन् अधिक देखण्या विश्वात कुठंतरी दूर घेऊन जाते.  तिथं नसतो भेदभाव अन् द्वेष. राग, लोभ, मत्सर असलं काही काही नसतं तिथं.  असतो फक्त निरामय निरपेक्ष चिदानंद! कुठल्याही स्वरांतून मग दिसत राहतं लोभस तरीही तेजस्वी ईश्वराचं रुप... मग निराशा, दमछाक हे सारं निवळून जातं अन् पुन्हा भरभरुन जगावं असं वाटू लागतं.

वेंकटेश कुमारांच्या स्वरांतही हीच ताकद आहे. तुम्हाला त्या विश्वात नेण्याची. भरपूर दमसास, तिन्ही सप्तकातला सहज व तेज:पुंज वावर अनेक वर्षांच्या रियाजानं मनाबरहुकूम कधीही कुठेही अन् कसाही वळणारा गळा मग त्यांना स्वत: लाही गाताना खूप आनंद देत रहातो अन् तोच आनंद मग प्रेक्षागारातील प्रत्येक मनामनांपर्यंत पोचतो, सुरेख दरवळत रहातो.
नंतरच्या टप्प्यावर वेंकटेश कुमारांनी पुरंदरदासांचं प्रसिध्द असं भजन " सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा" सादर केलं. देवीच्या दर्शनाला मगाशी गेलो अन् आज हे सादर करावंसं वाटलं. पहिल्यांदा हे इथं सादर करतोय असं त्यांनी कोल्हापूरकरांना आवर्जून सांगितलं. 

त्यानंतर सादर केला सोहनी. मुळात हा उत्तरांगप्रधान राग. वरच्या स्वरांवर भिरभिरत रहाणारा. वेंकटेशकुमारांच्या धारदार स्वरांना साजेसा. त्यामुळे सोहनी ऐकायला मजा आली.
 त्यानंतर जनाबाईंचा " ये गं ये गं विठाबाई" हा अभंग खूप छान पेश केला. " समझ मना.. कोई नही अपना" ही  भैरवी सादर करुन त्यांनी मैफिलीचा समारोप केला तेव्हा रसिक अक्षरश: देहभान विसरले होते! परमेश्वराशिवाय कुणीच आपलं नसतं, सगळं काही त्या निर्गुण निराकाराच्या रुपात विलीन होणारं. इथली नाती, इथली कमाई, इथलं श्रेय, इथले सन्मान- अपमान हे सारं क्षणभंगूर वाटायला लावणारी ही भावना. संपूर्ण मैफील एका स्वरभक्तीनं भारलेली. दिव्यत्वाचा अनुभव देणारी. पुन्हा आपल्या रोजच्या जगण्याकडे वळूच नये असं वाटायला लावणारी! 

मात्र रोजचं जगणं कुठं चुकलंय.. ते निभावायलाच लागतं त्यासाठी
या अशा संगीतमैफलीत जाणं गरजेचं असतं. वेंकटेश कुमारांसारख्या सच्च्या संगीतसाधकाचं गाणं तना-मनात साठवत रहाणं म्हणजे जणू आपलीच बॅटरी घासूनपुसून लख्ख करुन चार्ज करुन घेण्यासारखं!

तोच अनुभव मनात साठवत देहानं घरी परतलो मात्र मन त्या सुरांमध्येच गुंतून राहिलंय...अजूनपर्यंत..!
- सुधांशु नाईक( 9833299791)
कोल्हापूर 🌿

🌼🌼🌼🌼🌼

Tuesday, 24 December 2019

#kiff चे अनुभव - भाग 3 - सुसान बेयरचा डॅनिश चित्रपट.

🎭 # Kiff - closer day and Danish Movie " Brothers" .

 किफ्फ फेस्टिव्हल ला सुसान बेअरच्या " ब्रदर्स" या सिनेमानं पुन्हा एकदा अस्वस्थ केलं.
आपण आपलं आयुष्य जगत असतो सवयीनं पण, अचानक समोर आलेलं काहीतरी कसं आपल्याला हलवून सोडतं त्याचा हा अस्वस्थ करणारा अनुभव. मी हे अस्वस्थपण विसरु शकलो नाही. 

सिनेमाचं कथानकही एकदम सुरुवातीपासून धडाक्यात सामोरं येणारं.
-------
अफगाणिस्तानमधील युध्दात जायची आॅर्डर येते अन् सिनेमाचा नायक तयार होतो. लहान दोन मुलांचा निरोप घेताना, बायकोशी हलकाफुलका रोमान्स करताना त्यालाही माहिती आहे की आपण कदाचित परत येणारही नाही. तिलाही जाणीव आहे. मुलींना नीटसं अजून कळत नाहीये.

हा मेजर आहे, जायला तर हवंच. जातो. तिकडे शेवटी नको तेच घडतं. त्यांच्या तुकडीवर राॅकेट लाॅन्चरने हल्ला होतो. 
सगळे मेले असं कळवलं जातं.

याच्या घरी ती बायको निवांत बाथरुममध्ये टबबाथ घेत असते. कुणीतरी आलंय असं मुलीनं सांगताच टाॅवेल गुंडाळून बाहेर येते. 

समोर ते लष्करी अधिकारी पाहून न बोलताच कळतं तिला. तिच्या चेहे-यावरचे बदलते हावभाव पाहून आपल्या काळजाचं पाणी होतं..!

आता फ्युनरल ची तयारी. 

रात्री बाहेर तिचा दीर येतो. नव-याची गाडी वापरतो तो बरेचदा. तो पक्का दारुडा आहे. घरच्यांनी जवळजवळ त्याला बाजूलाच टाकलाय. तिलाही तो वाया गेलेला तरुण वाटतो. 
बोलताना त्याला ती म्हणते, नाऊ मायकल इज डेड... तुला फोन करत होते पण तुझा फोन लागला नाही.

तो हादरतो. त्याचं भावावर खूप प्रेम. आपल्या भावासारखं पर्टिक्युलर, नीट व फोकस्ड रहाता आलं नाही याचं दु:ख त्याला आहे.

तो मग वडिलांच्या घरी आईला भेटायला जातो. तेही त्या मध्यरात्री विमनस्क बसलेत. जुने फोटो पहात...

दुस-या दिवशी फ्युनरलला सगळे निघतात अन् पहिला धक्का बसतो प्रेक्षकांना. 
मायकल जिवंत असून त्याला दहशतवादी तळावर कैदेत ठेवायला घेऊन निघालेत. एका सेकंदात कॅमेरा यांचा तर दुस-या वेळी त्यांचा प्रवास. एकावेळी इथल्या प्रोसिजर्स तर दुस-याक्षणी तिथे त्याला कोठडीत बंद करणं... असं दाखवतो सिनेमा... अंगावरच येतात ते क्षण. 

तिथे अजून एका युध्दकैद्यासह त्याला बंदिस्त केलं जातं.

मग तिथे त्याची कैद सुरु. तर इथे भाऊ आपलं कर्तव्य समजून वहिनी व मुलींकडे येऊ लागतो. घराचं किचन दुरुस्त करणं, मुलींशी खेळणं असा मिसळत जातो. वहिनीला एकदा म्हणतोही की तू टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटीची असशील असं वाटलेलं पण तू छान समजूतदार आहेस...

मुलीही त्याच्यासोबत मोकळ्या होतात.....त्यांचे वाढदिवस साजरे होतात. मायकेल मेलाय हे स्वीकारुन सगळे जगत रहातात. मनातली वेदना विसरु पहातात. एकाक्षणी तर त्या दोघात कणभराची जवळीकही होते. एक किस घेतल्यावर दोघेही स्वत:ला सावरतात. पुढे जात नाहीत.

तिकडे आता दहशतवादी कॅम्पमध्ये दोघांमध्ये मैत्री आहे. तो दुसरा रडार टेक्निशियन आहे. त्याला मायकेल धीर देत रहातो. आपली नक्की सुटका होईल याची ग्वाही देत त्याचं मनोबल वाढवतो. आपल्या फॅमिलीज वाट पहात असतील... आपण मोडून नाही पडायचं हे बजावत रहातो स्वत:ला....
एकदिवस दहशतवादी दोघांना मैदानात उभं करतात व एकमेकाला मारा म्हणतात. त्याच्याने ते होत नाही. तू त्याला जर ठार मारलंस तर तुला जीवदान देऊ असं सांगत रहातात. शेवटचं बजावल्यावर मायकल धीर धरुन त्या सहका-यावर हल्ला करतो. मन दगड करत त्याला मारुन टाकतो. तो ताण मग त्याला असह्य होतो.... कोठडीत येऊन भडाभडा ओकतो... निपचित पडून रहातो. ..

पापणीसुध्दा मिडायचं धाडस होत नाही हा संपूर्ण प्रसंग पहाताना! 

शेवटी एकदिवस तळावर सैनिकी हल्ला होतो. दहशतवादी मरतात. मायकेलची सुटका होते.

घरी बातमी पोचते. घर आनंदानं उजळून निघतं. विमानतळावर मुली, बायको, भाऊ व आईवडिलांना भेटल्यावर मायकेलचं वागणं पहात राहण्याजोगं.
त्याच्या मनावरचा ताण मग घरच्यांवर रागाच्या रुपात निघू लागतो.

आपण आपल्या सहका-याला मारलंय हे सांगायचं धाडस त्याच्यात नाही. तो प्रयत्न करतो वरिष्ठांना सांगायचा, जमत नाही. त्या सहका-याच्या घरीही जाऊन पत्नीला भेटून येतो. त्यांचं ते लहान बाळ पाहून मनातून अधिक तुटतो....

मेंदूवर ताण आलेला तो. बायको व वरिष्ठ काहीवेळा विचारतातही, की काय घडलंय नेमकं. सांगून टाका... पण त्याला जमत नाहीच.

मग संतुलन बिघडलेला तो बायको व भावाला सतत विचारत रहातो की तुमच्यात 'तसे'  संबंध आले की नाही या काळात? का नाही आले? ती सत्य सांगते. पण याची मनस्थिती ठिकाणावर नाही. त्याला पटत नाही.

तो हिंस्त्र होतो. भाऊ त्याला वाचवायचे प्रयत्न करतो. शेवटी पोलिस तुरुंगात टाकतात.

शेवट तर खूप सुंदर घेतलाय. ती भेटायला एकदा जाते. पुन:पुन्हा त्याला मन मोकळं करुन म्हणून विनवते. तो ठाम बसून रहातो.

ती शेवटी म्हणते की तू आज जर सत्य सांगितलं नाहीस तर मी कधीच भेटायला येणार नाही.... तो सांगून टाकतो. कोलमडतो... ' त्या चिमुकल्याच्या बापाला मी ठार मारलं हे आक्रोशत सांगत रहातो....' 
ती त्याला कुशीत घेऊन बसून रहाते....!

-_--------

मी शेवट सांगितला मुद्दाम. खरंतर रहस्य तुम्ही पहाच असं म्हणता आलं असतं. पण मला नक्की ठाऊक आहे की मानवी मन आणि परिस्थिती याची सांगड घालत जे अभूतपूर्व नाट्य समोर उभं राहतं ते नक्कीच लोक पहाणार. सिनेमा कुठूनही मिळवून पहाणार.

त्या तोडीचाच आहे चित्रपट. नियती म्हणा की परिस्थिती... आपल्यासमोर उद्या जे ताट वाढून ठेवणारेय त्याचा आज आपल्याला पत्ता नसतो. अन् मग गोंधळलेला, भेदरलेला मेंदू कसंतरी विचार करत चालू पहातो याचं जे चित्रण सुसान बेयरने उभं केलंय ते अंतर्बाह्य हलवून सोडणारं.

मृत घोषित केलेला सैनिक युध्दभूमीवरुन परतणं हे अाधीच नाट्यमय, त्यात तो मानसशास्त्रीय पेच....ते तुटत रहाणं...
हे असं सुचणं, धाडसानं अप्रतिमरित्या उभं करणं अन् प्रेक्षकाना सतत जागेवर खिळवून ठेवणं यासाठी खूप कौतुक करावंसं वाटतं.

असे चित्रपट दाखवल्याबद्दल आयोजकांचंही कौतुकच.

अजून मनावरचा परिणाम पुसला जात नाहीये तीन दिवसानंतरही. मानसशास्त्र हीच शाखा यापुढे कशी अधिकाधिक गरजेची ठरत जाणार या माझ्या मताला बळकटीच मिळाली या चित्रपटामुळे.
असे चित्रपट दाखवल्याबद्दल आयोजकांचंही कौतुक. 

हा एक अस्वस्थ करणारा अनुभव मी घेतला, तुम्हीही घ्या. इंटरनेटच्या महाकाय विश्वातून शोधाच हा चित्रपट...
- सुधांशु नाईक. (९८३३२९९७९१)🌿
( 2019-20 चा किफ्फ कोल्हापुरात फेब्रुवारी महिन्यात होत आहे. जरुर नावनोंदणी करा.)

Sunday, 22 December 2019

#kiff चे अनुभव भाग 2 - पिंकी ब्युटी पार्लर

एका  उत्कंठावर्धक चित्रपटाचा भन्नाट अनुभव म्हणजे  
पिंकी ब्युटी पार्लर...
#KIFF- 2017 या कोल्हापूर फिल्म फेस्टिवलमध्ये काही मोजकेच चित्रपट  पाहायला वेळ काढता आला. त्यात अचानकपणे समोर आलेला भन्नाट चित्रपट होता " पिंकी ब्युटी पार्लर". jealousy thy name is woman.. असं एक जगप्रसिद्ध वाक्य आहे. ते अगदी ठळकपणे आठवत राहते चित्रपट पाहताना..!
अक्षय सिंग हा कलावंत विविध अन्य चित्रपटातून वगैरे आपल्या समोर येतोच. हा चित्रपट फूल टू त्याचा आहे. लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून तो एका वेगळ्या विश्वात आपल्याला खिळवून ठेवतो.

खर म्हणजे ब्युटी पार्लर या विषयावर तसं चित्रपट काढणं म्हणजेच एक आव्हान. नेमकं काय दाखवावं आणि का दाखवावं असंही.

त्यात या चित्रपटाची कथा म्हटलं तर १-२ ओळींचीच. म्हणजे " पिंकी ब्युटी पार्लर" चालवणाऱ्या बुलबुल या मुलीचा देह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळतो. आणि मग तो खून आहे की आत्महत्या यावर तपास सुरु होतो. अनेक वळणे घेत चित्रपट संपतो कधी तेच कळत नाही. 

ही दोन ओळींची कथा अक्षय सिंग अशी काही फुलवत नेतो की आपण थक्क होऊन जातो. बुलबुल आणि पिंकी या बहिणी. बुलबुल सावळी आहे तर पिंकी गोरी. 
गोरेपणाला भुललेल्या लाखो महिलांच्या मानसिकतेवर असं काही मस्त सुचवत जातो चित्रपट की जे अनेक सेमिनार्स घेऊन पण नाही सांगता येणार.

कथेच्या सुरुवातीलाच ती पार्लर ची मालकीण बुलबुल मरते. आणि तपास सुरु होतो. तो इन्स्पेक्टर आणि त्याचा सहायक एकेकाला घेऱ्यात घेतात. प्रत्येकवेळी आपल्याला वाटतं हाच खुनी असणार... पण त्यांच्या जबाबात काही दुसरं पुढे येतं. मग दुसरं व्यक्तिमत्व पुढे येतं. असं करत सिनेमा पुढे सरकत राहतो. 
बुलबुल च्या हाताखाली काम करणाऱ्या सर्व जणी तिला खूप सन्मानाने वागवतात. तिचं व्यक्तिमत्व छान आहेच. तिथे येणाऱ्या विविध बायका, त्यांची वागणूक हे सगळं हळूहळू स्टोरीतून उलगडत जातं.

एक भाई पण आहे त्यात. पार्लरची जागा त्याच्या मालकीची आहे. त्याचा कमरेखालील भाग लुळा पडलाय. पण परिसरातील त्याची जरब तशीच आहे. तो अधूनमधून बुलबुलला घरी मसाज करायला बोलावतो. त्याची पाठ,पोट आणि छाती तिच्याकडून रगडून घेतो. त्यातूनच स्वतःचं समाधान करून घेतो...
तिला हे करायला मनापासून नको असतं पण त्याची मदत तिला उपयुक्त असते. नाईलाजाने ती काम करत राहते. तिच्या खुनात त्याचा काही सहभाग आहे का हेही पोलीस तपासून पाहतात.
तिच्या मनात लहान बहिणीविषयी मत्सर आहे. केवळ ती गोरी असल्याने प्रत्येकवेळी आपल्याला दुयम्म लेखले जाते यामुळे मनात सतत ठसठसत असलेली वेदना आहे. म्हणून ती बहिणीला दिल्लीत पाठवते. पार्लर सांभाळत असतानाच तिचा जरा बुद्दू हरकाम्या मदतनीस एका अवचित क्षणी तिच्या रूपाचे कौतुक करतो आणि तिला तो आवडू लागतो.
या दरम्यान तिची बहीण पिंकी परत येते. पार्लरमध्येही तिची आता गरज असते आणि तिला दिल्लीत काम करायचं नाही. 

ती परतल्यावर घरी जाऊन जी ब्युटी सर्व्हिस महिलांना दिली जाते ते काम तिच्यावर सोपवते बुलबुल. सोबत हाच मदतनीस. त्यातून त्या दोघात नातं फुलू लागते.
ह्याच्यावर आपली बहीण देखील फिदा आहे हे कळल्यावर पिंकी नाराज होते. पण आता जर बहिणीने दिल्लीला पाठवलं तर जायचं नाही असं ठरवते आणि थेट त्याच्याशी लग्न करून येते..

त्या नंतरच बुलबुलचा मृत्यू होतो..! त्याचं रहस्य अगदी शेवटी उलगडते.

या सिनेमाची मजा त्या पोलीस तपासात, स्क्रिप्ट मध्ये आणि वेगळ्या दिग्दर्शनात आहे. 
सगळे कलाकार नवे आहेत, अक्खा चित्रपट फक्त बनारस मध्ये शूट होतो. त्यातही सरळ साधं चित्रीकरण. जसं आहे तसं ते गल्लीवालं, गंगाघाट वाले बनारस. तरीही क्षणभर देखील चित्रपट तुम्हाला हलू देत नाही.

अध्यात्मिक आणि शिक्षणासाठी जगभर प्रसिध्द असलेल्या आपल्या देशात सर्वाधिक खप हा सौंदर्य प्रसाधनांचा आहे. आजही शेकडो मुलींना ४ किंवा ६ आठवड्यात गोरं व्हायचं असतं. कारण गोरी मुलगीच सुंदर हे आपल्यावर सर्व प्रकारच्या मीडियातून सतत ठसवलं जातं. लग्नानंतर १०-१२ वर्षांनी सुद्धा बायकोला गोरी पाहण्याचा अट्टाहास बाळगणारे थोर पुरुषही याच देशात जागोजागी सापडतात.
या अपप्रचाराला  कशा स्त्रिया बळी पडतात याचं सहजसुंदर चित्रीकरण पाहून समाजाची मानसिकता बदलेल असं मुळीच नाही. मात्र अशा विषयावर एक नितातसुंदर चित्रपट नक्कीच नवा विचार रुजवू शकतो असं वाटून अक्षय सिंग यांचं मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं..!
- सुधांशु नाईक (९८३३२९९७९१) 

( #kiff यंदा जरासा पुढे गेलाय. डिसेंबर जानेवारीत होणारा हा फेस्टिव्हल फेब्रुवारी 2020 ला कोल्हापुरात  होईल. मात्र तोपर्यंत रसिकांनी फिल्म सोसायटीचं सभासदत्व जरुर घ्यावं. दर महिना 2 चित्रपट जरुर पहावेत, सोसायटीलाही अधिकाधिक मेंबर्सची गरज आहे..!
 संपर्क दिलीप बापट कोल्हापूर -9371377077) 

Friday, 20 December 2019

अनुभव kiff च्या विविध चित्रपटांचे..! भाग १ - Sound Of Silence

डिसेंबर-जानेवारी उजाडला की चित्रपट वेड्यांना फिल्म फेस्टिवल चे वेध लागतात. गोव्यातीलइफ्फी पाठोपाठ येतो कोल्हापुरातील kiff म्हणजेच कोल्हापूर इंटर्नाशनल फिल्म फेस्टिवल चे. या महोत्सवात आजवर कित्येक चित्रपट पहिले होते. यापूर्वी पाहिलेल्या अनेक चित्रपटांपैकी काही मोजक्या स्पेशल चित्रपटांवर मी परीक्षण लिहिलेलं. त्याचं हे संकलन विविध पोस्ट्स च्या रुपात... आपल्या ब्लॉग साठी...
त्या आठवणीतील हा पहिला चित्रपट...

*****
१) शांततेचा सुमधूर नाद म्हणजेच साऊंड ऑफ  सायलेन्स.... हा चित्रपट !

#kiff कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट सुरुवातीला चुकलेला म्हणून हळहळलो होतो. अाज पाहिला मिळाला याचा आनंद फार आहे.
शांततेला आवाज असतो असं कुणाचंतरी वाक्यपण आहे म्हणे. मी शांततेचा आवाज ऐकला भटकंती करताना. एकटं, दुकटं फिरताना अनेक ठिकाणं अशी समोर येतात की आपण केवळ थक्क होऊन बसून रहातो. कसलाच आवाज नकोसा वाटतो तेव्हा.
ती अनुभूती कितीकदा घेतलेली.
पहिल्यांदा रायगड चढून गेल्यावर भवानी टोकाच्या गुहेत बसून सूर्योदय पहाताना, वाघ दरवाज्याच्या माथ्यावरुन थंडीतली उबदार दुपार भोगताना, राजगडाच्या डुब्याजवळून चांदण्या रात्री चमचमता जलाशय अनुभवताना, गरुडेश्वरला किंवा भेडाघाटला अंधा-या रात्री लुकलुकणा-या दिव्यांचं नर्मदेतील प्रतिबिंब पिताना, लीडर नदीचा खळखळाट पहेलगामला ऐकताना... अशा किती ठिकाणी हा शांततेचा रम्य आवाज उरात भरुन घेतलेला.
असं कुठे एकटं-दुकटं जाऊन बसलं की मी माझा नसतो. सभोवतालच्या निसर्गाचा होऊन जातो. प्रत्येक झाडाची वेगवेगळी सळसळ, पानगळ अन् पक्ष्यांचे विविध आवाज मनात खोलवर रुजत जातात. लहानशा झ-याचा खळखळाट मन भरुन टाकतो. पायाखालच्या पाचोळ्याचा, मोडलेल्या लहानशा काटकीचा आवाज देखील मेंदू टिपत रहातो. मग जाणवतं की आपण किती गोंगाट करत रहातो रोज. अनेक छोटे छोटे आवाज असतात हेच उमगेनासं झालंय आपल्याला रोजच्या धबडग्यात.
मग ते आवाज शांतपणे ऐकत बसून राहिलं की आपण जणू बसल्याजागी वारुळ झालोय की काय असं वाटू लागतं.
शांततेचा हाच अनुभव ' साऊंड ऑफ  सायलेन्स' हा चित्रपट देऊन जातो.

पुन्हा एकदा 12 वर्षांच्या एका मुलाचाच हा चित्रपट. तो मुका आहे. जन्मत:च आईला गमावून बसलेला. आईला जणू यानंच खाल्लं असं समजून बाप त्याचा राग राग करतो. बायकोचं दु:ख विसरायच्या नावावर दारुत स्वत:ला विसरत रहातो.
हा बापाची जमेल ती सगळी सेवा करतो. गाई गुरं चरायला नेतो. पण आपल्यावर बापाचं प्रेम नाही ही गोष्ट सतत त्याच्या मनात ठसठसत रहाते.
जंगलात त्याला बौध्द भिख्खू भेटतो. त्याच्यासोबत त्याचं जमतं. तो याला ध्यान शिकवतो. निसर्गातील प्रत्येक लबानसहान आवाज ऐकायला शिकवतो. स्वत:चा आवाज मनात ऐकत.
गाई विकून पैसे मिळवणा-या बापाला हा रोखू शकत नाही. त्या बापाचा मित्रही रोज दारु पिताना समजावत रहातो. त्याला पटत नाही. एकदिवस तो मित्रालाच मारुन टाकतो.
मुलगा हादरतो बापाचं ते रुप पाहून. बाप त्यालाही घरातून जा म्हणून सुनावतो.
मग भिख्खू त्याला मठात आणतो. मठात खरंतर कुणी मूक, बधीर नाही. पण याला प्रवेश देतात.
तिथली मुलं त्याला वेगळं वागवत रहातात. टपल्या मारत रहातात. हा शांत रहातो. जणू शांती म्हणजे काय हे कळल्यासारखं.
एकदा जंगलातून परतताना तो आपल्या मित्राची काळजी घेतो. सगळे त्याचं कौतुक करतात. त्याचं मन तरीही खिन्न रहातं. कधीही न पाहिलेल्या आईला स्वप्नात आठवत रहातं.
शेवटी तो तुरुंगातल्या बापाला फक्त पत्राने एक प्रश्न विचारतो, तुम्ही कधीतरी एक क्षणभर तरी माझ्यावर प्रेम केलं होतं का??
ते पहाताना आपलंही अंत:करण ओलावतं. संपूर्ण सिनेमाभर कुठेही फारसे संवाद नाहीतच. शांत वाजणारी बासरी, चेलो, मेंडोलिन, संतूर आदि वाद्यांच्या पार्श्वभूमीवर कॅमेरा चित्रपटातून हिमाचल प्रदेशातलं सौंदर्य दाखवत रहातो. तिथली शांतता समोर ओतत रहातो.
चित्रपट संपताना बुध्दाच्या मूर्तीवरील अन् त्याच्या चेहे-यावरील ती अथांग शांतता आपल्यालाही चहूबाजूंनी वेढून टाकते. खोलखोल कुठेतरी सर्व काही विसरायला लावते.
चित्रपट संपतो. थिएटर बाहेरच्या कोलाहलात प्रवेश करायला मन मात्र मुळीच तयार होत नाही..!
- सुधांशु नाईक(९८३३२९९७९१)🌿

यंदा कोल्हापुरात हा फिल्म फेस्टिवल फेब्रुवारी २०२० मध्ये होत आहे. त्यासाठी रसिकांनी आवर्जून नाव नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क- दिलीप बापट - ९३७१३७७०७७.