marathi blog vishwa

Thursday, 30 December 2010

नवीन वर्षात काही चांगले घडावे..

 नवीन वर्षात काही चांगले घडावे
                   गल्ली ते  दिल्ली  सगळे सुंदर व्हावे..
कचरा अवघा साफ व्हावा 
                                     भ्रष्टाचाराचा नाश व्हावा..
 
जात धर्म अवघे विसरून जाऊ 
                       भारतीय म्हणून सगळे एक होऊ..
गरिबाला पोटभर अन्न मिळावे
                        मजुराला पुरेसे काम मिळावे..
 
दहशतवादाला थारा न द्यावा..
                         देश आपला सक्षम व्हावा..
अंधार  अवघा  संपून जावो
            जीवन अपुले उजळून  येवो..
 
                              नवीन वर्ष सुखाचे जावो..
 
                                              -- सुधांशु नाईक, कल्याण. - ०९८३३२९९७९१.

Monday, 27 December 2010

शिवराय हे काय सुरु आहे तुमच्या राज्यात ..??

काल रात्री २ वाजता पुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा प्रशासनाला न शोभेल अशा तत्परतेने हलवण्यात आला..याचा एक इतिहास प्रेमी नागरिक म्हणून मी निषेध करतोय. ज्यांनी हा पुतळा काढून नेण्यासाठी पडद्यामागील भूमिका निभावली त्यांचे विविध उद्योग पहिले तर असे वाटते कि आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी या अशा नालायकांना तोफेच्या तोंडी दिले असते हे नक्की.
 
गेले कित्येक दिवस वा महिने आजूबाजूला जे चालले आहे ते पाहून मनात खदखदत आहे ते लिहायला हे एक निमित्त मिळाले. दादोजींचा पुतळा पुण्यातील लाल महालात का बसवला होता हे या तथाकथित शिवप्रेमींना माहित आहे का??
मुळात दादोजी हे शिवरायांचे गुरु असल्याचे ह्या पुतळ्यातून कुठेही दाखवण्यात आले नव्हते. हा पुतळा उभा केला त्यामागे एक व्यापक कल्पना होती.
एकेकाळी राया राव नावाच्या सरदाराने शहाजी राजेंच्या स्वराज्याच्या स्वप्नाचा गळा घोटण्यासाठी आदिलशहाच्या आदेशाने पुण्याची राख रांगोळी केली. तिथे गाढवाचा नांगर फिरवला. आणि कवटी टांगून ठेवली. तत्कालीन समजुतीप्रमाणे असे केल्यास त्या जमिनीत पुन्हा पिके येत नाहीत. ती जमीन , जहागीर स्मशानवत होते.. मात्र शिवबा लहान असताना शहाजी राजांनी आपल्या पत्नीला लहानग्या शिवाबासोबत पुण्याचा कारभार पाहण्यास सांगितले. त्यांच्याबरोबर दादोजींच्या सारखे इतरही इमानदार अधिकारी दिले. दादोजी हे कुणी सामान्य नोकर नव्हते तर कोंढाण्याचे सुभेदार होते. कामकाजात प्रवीण व न्यायदानात कठोर होते. ( प्रत्यक्ष औरंगझेब बादशाहने देखील त्याच्या न्याय निवाड्याची तारीफ केली होती.).  त्यांनी पाहता पाहता जहागिरी वर अंमल बसवला. वाडे बांधले. आमराया निर्माण केल्या. शेतकर्यांना सुविधा दिल्या. जमिनी पुन्हा पिकावू बनव्यात म्हणून मदत केली. ओढ्यावर बंधारे बांधले. या सगळ्या प्रयत्नांना जिजाऊ साहेबांची संमती होतीच पाठबळ hotech. पण लोकांच्या मनातील अंधश्रद्धा संपवण्यासाठी त्यांनी बाल शिवबाच्या हस्ते पुण्याची जमीन सोन्याच्या नांगराने नांगरून पवित्र केली. त्याचे हे स्मारक..त्यात दादोजींची जात येतेच कुठे?? पण एक स्वतःला पावरफुल समजणाऱ्या राजकारण्याला आपली पापे झाकण्यासाठी नेहमीच अशी करणे लागतात..आणि मग समाजात विषमतेची आग भडकवायला हे आपल्या भाडोत्री गुंडांना पुढे आणतात..!! 
आजच्या तथाकथित इतिहासकारांच्या सांगण्याप्रमाणे  दादोजी जर खरेच नालायक असते, समाजावर जुलूम करणारे फक्त एक ब्राह्मण अधिकारी असते तर त्यांनी एक तर हे केले नसते किंवा स्वतःची थोरवी दाखवण्यासाठी तो नांगर स्वतः हाती धरला असता.. पण त्यांनी असे केले नाही कारण ते खरेच एक स्वामिनिष्ठ अधिकारी होते. त्यावेळेसच नव्हे तर नंतरही अनेक वेळा शिवरायांचे प्रत्यक्ष नातेवाईक देखील त्यांच्या विरोधात लढत होते.. मग आजचे हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले इतिहास संशोधक त्यांचे नाव मिटवून टाकतील का??
ब्राह्मणांना विरोध करायचा असेल तर तो तत्वाने अभ्यासाने करावा..त्यांच्यासारखे शिक्षणाचा ध्यास घेऊन करावा. पण त्यासाठी इतिहासाचे विडंबन का केले जात आहे?? आणि हे असे काही आव आणत आहेत कि जणू समाजात सर्वाधिक अत्याचार फक्त ब्राह्मणांनीच  केलेत..!!
जर इतिहास नीट वाचला तर यांना देखील कळेल कि पेशवाई चा काळात ब्राह्मणांनी अनेक चुकीच्या प्रथा सुरु केल्या हे खरे पण त्यापूर्वी व नंतर हि समाजातील दलित व दीन दुबळ्यांवर जास्त अत्याचार हे  समाजातील काही वजनदार  वर्गानेच केले आहेत. पण म्हणून सरसकट त्यांच्या  विरोधात आंदोलन करणे हे चूकच आहे.. मग हे इतिहास संशोधक कशासाठी फक्त ब्राह्मण वर्गाला लक्ष करत आहेत?? 
मध्ये असाच एका स्वताला थोर समजणाऱ्या इतिहास संशोधकाचा एक लेख वाचला. त्यात त्याने लिहिले होते कि मोरोपंत पिंगळे हा शिवरायांचा पंतप्रधान अत्यंत स्वार्थी व भ्रष्टाचारी होता म्हणून..!! जे शिवाजी महाराज आपल्या नातेवाईकाला देखील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कडक सजा देतात ते अशा   माणसाला थेट पंत प्रधान करतात याचा अर्थ काय?? मग हे इतिहास संशोधक राजांना अपराधी मानणार काय?? का या इतिहास संशोधाकाचीच बुद्धी भ्रष्ट झालीये??
या अशा इतिहास संशोधक मंडळीना एक समाजात नाहीये कि ते असे वाईट साईट लिहून थेट महाराजांचीच बदनामी करत आहेत. राजांनी आपल्या आयुष्यात नेहमीच जातीभेद नष्ट करायचे प्रयत्न केले ..  त्यांना ब्राह्मणापासून सर्व जमातीतील लोकांनी मदत केली. तसेच सर्व जमातीतील लोक विरोधातही होते. म्हणून एखाद्या माणसासाठी एखादी जात दोषी ठरू शकत नाही.. आणि ठरवयाचीच असेल तर राजांच्या काकापासून भावांपर्यंत जे काही त्यांचे विरोधक होते त्याची मराठा जात दोषी का नाही??? उद्या म्हणून संभाजी ब्रिगेड मराठ्यांची पण घरे जाळणार का? त्यांची नवे पण इतिहासातून वगळून खोटा खोटा इतिहास शिकवायला सांगणार का??
 आज विशिष्ट समाजाला मोठे करण्याच्या नादात हे असे कवडीमोलाचे इतिहास संशोधक संपूर्ण समाजालाच वेठीस धरत आहेत.. आपली पापे झाकण्यासाठी निमित्त शोधणारे राजकारणी यांना पाठबळ देत आहेत..  आणि आपल्या सारखे थोर थोर सामान्य लोक या सगळ्याकडे दुर्लक्ष करून त्यांना मोकाट रान मिळवून देत आहोत...शिवबा काय चाललाय तुमच्या स्वराज्यात??
---सुधांशु नाईक, कल्याण.

Saturday, 18 December 2010

मित्रहो, गेल्याच आठवड्यात  (११ व १२ डिसेम्बर २०१०) मी ट्रेक क्षितीज या डोंबिवलीतील संस्थेबरोबर सुधागड च्या ट्रेक ला गेलो होतो. त्याचा रिपोर्ट  मी बऱ्याच मित्रांना पाठवला होता. आज सुधागड वर अनाम वीरांच्या अनेक समाध्या उध्वस्त होत आहेत..त्यांच्या डागडुजी साठी संस्थेद्वारे प्रयत्न सुरु झालेत. तरुण इतिहास संशोधक  श्रीदत्त  राऊत  पण या मोहिमेत  मार्गदर्शनाबरोबर प्रत्यक्ष कामातही सहभागी झाला होता. पुन्हा पुन्हा मोहिमा आखल्या जातील त्या अर्थाने ही अर्थातच एक सुरुवात होती.. पण  मोहिमेतून जे काही मनाला भिडले ते मांडायला खरे तर एक पुस्तकच लिहावे असे वाटू लागलंय..  
समस्त महाराष्ट्राचे दैवत असे  आपले शिवाजी महाराज हे आज फक्त राजकारणात  आपली पोळी भाजून घेण्याचे साधन बनले आहेत हे एक कटू सत्य आहे व ते मानायलाच हवे. अन्यथा राजांच्या शेकडो दुर्गांची दुरवस्था होत असताना शासनाने दुर्लक्ष केलेच नसते त्याहून हि महत्वाचे म्हणजे समुद्रात ८०० कोटी खर्चून स्मारक उभारायचा घाट घातला नसता.  खरे तर राजांनी बांधलेले नवे गड कोट , कित्येक प्राचीन डागडुजी करून भक्कम बनवलेले डोंगरी व जल दुर्ग हीच राजांची खरी स्मारके. गेल्या तीनचारशे वर्षात निसर्गाचे व मानवाचे घाव सोसून ही स्मारके आता हळूहळू नामशेष होण्यास सुरुवात झालीये. कित्येक गड आता नावापुरतेच उरलेत. दाभोळ जवळील गोपाळगड, सध्या अत्यंत चर्चेत असलेल्या जैतापूर जवळील यशवंत गड, वाई जवळील पांडव गड, मुंबई च्या किनारयावरील काही दुर्ग हे खाजगी अतिक्रमणात आहेत. १००० वर्षपूर्वी च्या पन्हाळगडावर आताच इतका धुडगूस सुरु असतो कि स्वताचीच लाज वाटावी.. तसेच गिरीस्थान पर्यटन city  च्या नावाखाली अनेक गडानजवळील जागा काही बड्या धनावंतानी बळकावल्या आहेत. तिथे उद्या मोठमोठी रिसोर्ट्स उभी  राहतील आणि मग हाच धुडगूस राजरोज सर्वत्र सुरु होईल आणि मग  आमचा इतिहास विस्मरणात  जाईल.  हे थांबवायला हवे. आपणच थांबवायला हवे. कारण या मातीला पराक्रमाचा बलिदानाचा इतिहास आहे..लंडन मधील युद्ध स्मारकाजवळ कोणी तुम्हाला असा धुडगूस घालू देईल का? अमेरिकेतील स्वतंत्र देवीच्या पुतळ्याजवळ आजही दारू प्यायली जात नाही मग आमच्या ऐतिहासिक स्मारका जवळ आम्ही लोकांना मद्यपान का करू द्यावे?? तेही राजरोस शासकीय अधिकारात??
मित्रांनो इतिहासाचे विस्मरण हे नेहमीच एका नव्या धोक्याची नांदी असते असे अनेक थोर विचारवंतांचे सांगणे आहे. आणि इथे तर आपणच आपला इतिहास पुसायला, बदलायला व विसरून जायला उतावीळ झालो आहोत..
शिवरायांनी जे दुर्गांच्या माध्यमातून स्वराज्य उभे केले ते प्रत्यक्ष आलमगीर बादशहा लाही नष्ट करता आले नाही. कारण राजांच्या विचाराने आदर्शाने महाराष्ट्र एकवटला होता. दुर्दैवाने पहिल्या बाजीरावाचा काळ वगळता नंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा दुहीचीच बीजे पेरली गेली. प्रत्यक्ष छ्त्रपतींचेच  घराणे दुभंगले. सरदार पुन्हा राजासारखे स्वतःला स्वतंत्र समजू लागले आणि ह्याचा इंग्रजांनी व परकीय सत्तांनी सुरेख उपयोग करून घेतला.
ज्या महाराष्ट्रात शिवराय सांगून गेले  कि इंग्रज फक्त व्यापारासाठी येथे आले नाहीयेत त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. त्यांच्याशी व्यापार करताना तो आपल्या अटीप्रमाणे होईल याची दक्षता घ्या. तसेच सागरी शत्रू वर नजर ठेवणे व सागरी व्यापारावर वाचक ठेवणे या धोरणाच्या समर्थनासाठी राजांनी कोकणातील प्रत्येक खाडीकाठी लहानमोठ्या दुर्गांची साखळीच तयार केली होती.. त्याच महाराष्ट्रात इथला सरखेल आंग्रे बळजबरी करू लागला म्हणून तत्कालीन मराठी राजवट इंग्रजांना बोलावून आणते.. पुढे त्याच इंग्रजांच्या घशात इथली पेशवाई जाते त्याचे एकमेव कारण म्हणजे इतिहासाचे झालेले विस्मरण व योग्य राष्ट्रभक्ती चा अभाव. 
दुर्दैवाने आज हीच परिस्थिती पन्ह उद्भवल्यासारखी वाटते. आजच अमेरिका फ्रांस इत्यादी मंडळी पुन्हा व्यापाराच्या निमित्ताने इथे बस्तान बसवत आहेत. आमचे किनारे, आमची शस्त्र सज्जता ही सगळी त्यांच्या निरीक्षणाखाली आहे हे सिद्ध होत आहे. मात्र तरी आम्ही शहाणे व्हायला तयार नाही..  
एकेकाळी म्याझिनी  या क्रांतिकारक विचारवंताने म्हटले होते कि ज्या राष्ट्राची युवा पिढी ही मनोरंजनात  मश्गुल होते ते राष्ट्र स्वातंत्र्य उपभोगू शकायला असमर्थ ठरते..आपण आज त्याच वाटेने आपण चालत आहोत..ह्याला आपण निश्चितच थांबवू शकतो म्हणूनच म्हणतो कि दुर्ग रक्षणाचे काम आपण जोमाने हाती घेतले पाहिजे. हीच आपली चिरंतन स्मारके आहेत. इथले बुरुज ते ढासळलेले तट ही मनात स्फुल्लिंग चेतवणारीच आहेत. हेच इंग्रजांनी ओळखले होते म्हणून त्यांनी गडाकडे जाणाऱ्या वाटा नष्ट करायचे प्रयत्न केले. पण तरीही महाराष्ट्र  शिवराय व इतर वीरांना विसरू शकला  नाही..विसरू शकूच शकत नाही..

 आजही आपण जे काही उरले सुरले गडकोट आहेत ते वाचवायला हवेत..श्रीदत्त सारखी मंडळी कधीच कामाला लागली आहेत.. तेंव्हा मंडळी कधी सुरु करताय तुमचे प्रयत्न..??
-- सुधांशू नाईक कल्याण..०९८३३२९९७९१,

Saturday, 4 December 2010

रयतेचा लाडका राजा शिवाजी..

आज राज्यात जेंव्हा शेतकरी हतबल झालाय..त्याला कुणी वाली उरला नाही असे चित्र दिसते आहे.. स्वार्थासाठी शेतकरी राजकारण्यांच्या दावणीला  बांधला जातोय.. नाडला जातोय अशावेळी राहून राहून शिवाजी राजांची आठवण येते..त्यांचे विकासाचे धोरण आठवते..मिळालेल्या अल्प वेळातही राजे रयतेच्या सुखासाठी धडपडताना दिसतात. इतिहासातील रयतेच्या राजाचे दिसणारे हे चित्र रमणीय आहे..
राजांच्या आधी आदिलशाही व मोगलाईत उत्पन्नाच्या १/२ सारा भरायचा नियम होता. मात्र राजांच्या काळात अण्णाजी दत्तो सुरनीस यांच्या अधिकारात संपूर्ण जमिनीची तपासणी मोजणी केली गेली. प्रत्येकाच्या शेतीची प्रतवारी ठरवण्यासाठी वस्तुनिष्ठ पदधत अंमलात आणली गेली. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना गावाजवळील पडीक जमीन लागवडीखाली आणण्यास मदत केली गेली. उत्पन्नाच्या २/५ सारा ठरवला गेला. ज्यांच्या कडे जमीन असून कसायची टाकत नाही त्यांना सरकारी खर्चाने बीबियाणे दिले जाई. बैलजोडी अवजारे दिली जात. शेत सारा वस्तुरूपाने भरण्याची सोय होती. सरकारी मदतीच्या परतफेडीसाठी  सावकारी धोरण नसे. शेतकऱ्याच्या सवडीने कर्ज फेड करता येई. एखादा खरोखरच नुकसानीत गेला तर योग्य मूल्यमापन झाल्यावर त्याचे कर्ज माफ होई. दुष्काळ, शत्रूची स्वारी यामुळे जर शेतपीकाची हानी झाली तर सारामाफी न मागता मिळत असे. तत्कालीन काही पत्रे जी उपलब्ध आहेत त्यातून असे दिसते कि राजांचे आपल्या रयतेवर जीवापाड प्रेम आहे आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून ते  आपल्या सैनिकांना  रयतेच्या भाजीच्या देठाचीही अपेक्षा न ठेवण्याचे आदेश देतात. सैनिकाने जे पाहिजे ते रास्त भावाने विकत घ्यावे रयतेला त्रास देऊ नये म्हणून सक्त बजावतात..
राजे असे वागत होते म्हणून रयत त्यांना देवासमान मानू लागली..त्यांच्या निधनानंतर २७ वर्षे स्वतःचे आयुष्य व धन धान्य बरबाद करत शत्रूशी झुंजत राहिली...
असा राजा पुन्हा कधी या मातीला मिळेल का?? पुन्हा महाराष्ट्राच्या नशिबात अशी सुखी शिवशाही येईल का??? 
-- सुधांशु नाईक, कल्याण ०४/१२/१०.