आज राज्यात जेंव्हा शेतकरी हतबल झालाय..त्याला कुणी वाली उरला नाही असे चित्र दिसते आहे.. स्वार्थासाठी शेतकरी राजकारण्यांच्या दावणीला बांधला जातोय.. नाडला जातोय अशावेळी राहून राहून शिवाजी राजांची आठवण येते..त्यांचे विकासाचे धोरण आठवते..मिळालेल्या अल्प वेळातही राजे रयतेच्या सुखासाठी धडपडताना दिसतात. इतिहासातील रयतेच्या राजाचे दिसणारे हे चित्र रमणीय आहे..
राजांच्या आधी आदिलशाही व मोगलाईत उत्पन्नाच्या १/२ सारा भरायचा नियम होता. मात्र राजांच्या काळात अण्णाजी दत्तो सुरनीस यांच्या अधिकारात संपूर्ण जमिनीची तपासणी मोजणी केली गेली. प्रत्येकाच्या शेतीची प्रतवारी ठरवण्यासाठी वस्तुनिष्ठ पदधत अंमलात आणली गेली. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना गावाजवळील पडीक जमीन लागवडीखाली आणण्यास मदत केली गेली. उत्पन्नाच्या २/५ सारा ठरवला गेला. ज्यांच्या कडे जमीन असून कसायची टाकत नाही त्यांना सरकारी खर्चाने बीबियाणे दिले जाई. बैलजोडी अवजारे दिली जात. शेत सारा वस्तुरूपाने भरण्याची सोय होती. सरकारी मदतीच्या परतफेडीसाठी सावकारी धोरण नसे. शेतकऱ्याच्या सवडीने कर्ज फेड करता येई. एखादा खरोखरच नुकसानीत गेला तर योग्य मूल्यमापन झाल्यावर त्याचे कर्ज माफ होई. दुष्काळ, शत्रूची स्वारी यामुळे जर शेतपीकाची हानी झाली तर सारामाफी न मागता मिळत असे. तत्कालीन काही पत्रे जी उपलब्ध आहेत त्यातून असे दिसते कि राजांचे आपल्या रयतेवर जीवापाड प्रेम आहे आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून ते आपल्या सैनिकांना रयतेच्या भाजीच्या देठाचीही अपेक्षा न ठेवण्याचे आदेश देतात. सैनिकाने जे पाहिजे ते रास्त भावाने विकत घ्यावे रयतेला त्रास देऊ नये म्हणून सक्त बजावतात..
राजे असे वागत होते म्हणून रयत त्यांना देवासमान मानू लागली..त्यांच्या निधनानंतर २७ वर्षे स्वतःचे आयुष्य व धन धान्य बरबाद करत शत्रूशी झुंजत राहिली...
असा राजा पुन्हा कधी या मातीला मिळेल का?? पुन्हा महाराष्ट्राच्या नशिबात अशी सुखी शिवशाही येईल का???
-- सुधांशु नाईक, कल्याण ०४/१२/१०.
No comments:
Post a Comment