marathi blog vishwa

Saturday, 18 December 2010

मित्रहो, गेल्याच आठवड्यात  (११ व १२ डिसेम्बर २०१०) मी ट्रेक क्षितीज या डोंबिवलीतील संस्थेबरोबर सुधागड च्या ट्रेक ला गेलो होतो. त्याचा रिपोर्ट  मी बऱ्याच मित्रांना पाठवला होता. आज सुधागड वर अनाम वीरांच्या अनेक समाध्या उध्वस्त होत आहेत..त्यांच्या डागडुजी साठी संस्थेद्वारे प्रयत्न सुरु झालेत. तरुण इतिहास संशोधक  श्रीदत्त  राऊत  पण या मोहिमेत  मार्गदर्शनाबरोबर प्रत्यक्ष कामातही सहभागी झाला होता. पुन्हा पुन्हा मोहिमा आखल्या जातील त्या अर्थाने ही अर्थातच एक सुरुवात होती.. पण  मोहिमेतून जे काही मनाला भिडले ते मांडायला खरे तर एक पुस्तकच लिहावे असे वाटू लागलंय..  
समस्त महाराष्ट्राचे दैवत असे  आपले शिवाजी महाराज हे आज फक्त राजकारणात  आपली पोळी भाजून घेण्याचे साधन बनले आहेत हे एक कटू सत्य आहे व ते मानायलाच हवे. अन्यथा राजांच्या शेकडो दुर्गांची दुरवस्था होत असताना शासनाने दुर्लक्ष केलेच नसते त्याहून हि महत्वाचे म्हणजे समुद्रात ८०० कोटी खर्चून स्मारक उभारायचा घाट घातला नसता.  खरे तर राजांनी बांधलेले नवे गड कोट , कित्येक प्राचीन डागडुजी करून भक्कम बनवलेले डोंगरी व जल दुर्ग हीच राजांची खरी स्मारके. गेल्या तीनचारशे वर्षात निसर्गाचे व मानवाचे घाव सोसून ही स्मारके आता हळूहळू नामशेष होण्यास सुरुवात झालीये. कित्येक गड आता नावापुरतेच उरलेत. दाभोळ जवळील गोपाळगड, सध्या अत्यंत चर्चेत असलेल्या जैतापूर जवळील यशवंत गड, वाई जवळील पांडव गड, मुंबई च्या किनारयावरील काही दुर्ग हे खाजगी अतिक्रमणात आहेत. १००० वर्षपूर्वी च्या पन्हाळगडावर आताच इतका धुडगूस सुरु असतो कि स्वताचीच लाज वाटावी.. तसेच गिरीस्थान पर्यटन city  च्या नावाखाली अनेक गडानजवळील जागा काही बड्या धनावंतानी बळकावल्या आहेत. तिथे उद्या मोठमोठी रिसोर्ट्स उभी  राहतील आणि मग हाच धुडगूस राजरोज सर्वत्र सुरु होईल आणि मग  आमचा इतिहास विस्मरणात  जाईल.  हे थांबवायला हवे. आपणच थांबवायला हवे. कारण या मातीला पराक्रमाचा बलिदानाचा इतिहास आहे..लंडन मधील युद्ध स्मारकाजवळ कोणी तुम्हाला असा धुडगूस घालू देईल का? अमेरिकेतील स्वतंत्र देवीच्या पुतळ्याजवळ आजही दारू प्यायली जात नाही मग आमच्या ऐतिहासिक स्मारका जवळ आम्ही लोकांना मद्यपान का करू द्यावे?? तेही राजरोस शासकीय अधिकारात??
मित्रांनो इतिहासाचे विस्मरण हे नेहमीच एका नव्या धोक्याची नांदी असते असे अनेक थोर विचारवंतांचे सांगणे आहे. आणि इथे तर आपणच आपला इतिहास पुसायला, बदलायला व विसरून जायला उतावीळ झालो आहोत..
शिवरायांनी जे दुर्गांच्या माध्यमातून स्वराज्य उभे केले ते प्रत्यक्ष आलमगीर बादशहा लाही नष्ट करता आले नाही. कारण राजांच्या विचाराने आदर्शाने महाराष्ट्र एकवटला होता. दुर्दैवाने पहिल्या बाजीरावाचा काळ वगळता नंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा दुहीचीच बीजे पेरली गेली. प्रत्यक्ष छ्त्रपतींचेच  घराणे दुभंगले. सरदार पुन्हा राजासारखे स्वतःला स्वतंत्र समजू लागले आणि ह्याचा इंग्रजांनी व परकीय सत्तांनी सुरेख उपयोग करून घेतला.
ज्या महाराष्ट्रात शिवराय सांगून गेले  कि इंग्रज फक्त व्यापारासाठी येथे आले नाहीयेत त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. त्यांच्याशी व्यापार करताना तो आपल्या अटीप्रमाणे होईल याची दक्षता घ्या. तसेच सागरी शत्रू वर नजर ठेवणे व सागरी व्यापारावर वाचक ठेवणे या धोरणाच्या समर्थनासाठी राजांनी कोकणातील प्रत्येक खाडीकाठी लहानमोठ्या दुर्गांची साखळीच तयार केली होती.. त्याच महाराष्ट्रात इथला सरखेल आंग्रे बळजबरी करू लागला म्हणून तत्कालीन मराठी राजवट इंग्रजांना बोलावून आणते.. पुढे त्याच इंग्रजांच्या घशात इथली पेशवाई जाते त्याचे एकमेव कारण म्हणजे इतिहासाचे झालेले विस्मरण व योग्य राष्ट्रभक्ती चा अभाव. 
दुर्दैवाने आज हीच परिस्थिती पन्ह उद्भवल्यासारखी वाटते. आजच अमेरिका फ्रांस इत्यादी मंडळी पुन्हा व्यापाराच्या निमित्ताने इथे बस्तान बसवत आहेत. आमचे किनारे, आमची शस्त्र सज्जता ही सगळी त्यांच्या निरीक्षणाखाली आहे हे सिद्ध होत आहे. मात्र तरी आम्ही शहाणे व्हायला तयार नाही..  
एकेकाळी म्याझिनी  या क्रांतिकारक विचारवंताने म्हटले होते कि ज्या राष्ट्राची युवा पिढी ही मनोरंजनात  मश्गुल होते ते राष्ट्र स्वातंत्र्य उपभोगू शकायला असमर्थ ठरते..आपण आज त्याच वाटेने आपण चालत आहोत..ह्याला आपण निश्चितच थांबवू शकतो म्हणूनच म्हणतो कि दुर्ग रक्षणाचे काम आपण जोमाने हाती घेतले पाहिजे. हीच आपली चिरंतन स्मारके आहेत. इथले बुरुज ते ढासळलेले तट ही मनात स्फुल्लिंग चेतवणारीच आहेत. हेच इंग्रजांनी ओळखले होते म्हणून त्यांनी गडाकडे जाणाऱ्या वाटा नष्ट करायचे प्रयत्न केले. पण तरीही महाराष्ट्र  शिवराय व इतर वीरांना विसरू शकला  नाही..विसरू शकूच शकत नाही..

 आजही आपण जे काही उरले सुरले गडकोट आहेत ते वाचवायला हवेत..श्रीदत्त सारखी मंडळी कधीच कामाला लागली आहेत.. तेंव्हा मंडळी कधी सुरु करताय तुमचे प्रयत्न..??
-- सुधांशू नाईक कल्याण..०९८३३२९९७९१,

No comments:

Post a Comment