marathi blog vishwa

Saturday, 11 June 2011

मी रायगड आणि "तो" दिवस...!!

मी रायगड...अर्थातच शिवाजी महाराजांचा रायगड.. तणस, रासीवटा, नंदादीप, रायरी अशी पूर्वीची अनेक नावे माझीच..पण १६२६ मध्ये जावळीच्या चंद्रराव मोरे याचा पाठलाग करत  एक कोवळा तेजस्वी युवक माझ्याजवळ प्रथम आला आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या चक्क प्रेमातच पडलो...उन्मत्त आणि बेईमान अशा चंद्रराव ला त्याने संपवलेच पण तेंव्हाच उजाड ओसाड पण दुर्गम अशा मला..एका टेहळणी सारख्या नाक्याला त्याने "गड" बनवले..तोच ..तोच..तुमचा माझा लाडका राजा..आपला शिवाजी राजा होता तो..!! त्याची मित्रमंडळी तेंव्हा त्याला "शिवबा राजे" म्हणत तर " धाकले राजे "अशा नावाने त्याच्याबरोबरची वृद्ध मंडळी त्याला बोलावत..!

तेंव्हा पासून अनेक वर्षे मी शिवशाहीचा अविभाज्य भाग बनलो..मुळातच माझ्या आजूबाजूचा प्रदेश तसा दुर्गम..नैसर्गिक डोंगर व कड्यांनी भरलेला..तरी राजांनी आबाजी सोनदेव, मोरोपंत या त्यांच्या सहकारी मंडळीना कामाला लाऊन मला गडाचे छान रूप दिले. पुढच्या काळात तर अवघी कोंकण पट्टी राजांच्या ताब्यात आली..नवे दुर्ग, जलदुर्ग उभे राहिले..त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी मीच होतो. अनेक कारखाने माझ्याच अंगाखांद्यावर दिवसरात्र कार्यरत असायचे..कसा सगळा कामाचा गलबला असे. आळशी, कामचोर माणूस तर दिसायचाही नाही आणि प्रत्येकाला जणू नशा चढलेली..कसली तर "स्वराज्य" निर्माण करायची..!! प्रत्येक घरातला माणूस जणू मीच शिवाजी राजा आहे अशा थाटात काम करायचा..लढाईत तर असा तळपायचा की शत्रूची पळता भुई व्हायची..!! मग माझ्या अंगावर मूठभर मांस चढायचे..किती वर्ष या अशा दिवसांचीच वाट पहिली होती मी आणि या सह्याद्री ने..!!
शेकडो वर्षापासून माझ्यासारख्या पर्वतांनी आणि इथल्या मातीने स्वराज्याचा ध्यास घेतला होता..प्राचीन काळी असणारे वैभव पुन्हा पुन्हा आठवले होते..मधल्या काळात बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मोगल, सिद्दी, पोर्तुगीज अशा अनेकांचे इथल्या लोकांवर झालेले अत्याचार पाहून तर आमची झोपच उडाली होती..रोज इथल्या लेकीसुनाची अब्रू आमच्या समोर लुटली जात असताना आम्ही सगळे पर्वत हताशपणे डोळे मिटून मनातल्या मनात आक्रोश करत होतो..त्या शंभू महादेवाला हजार वेळा साकडे घालत होतो..पुन्हा एकदा अवतार तरी घेरे किंवा पुन्हा एक मोठा प्रलय घडवून आण..सगळे काही नष्ट कर. आम्हांला आता हे सगळे नाही सोसवत रोज पाहायला..!!
आणि मग याच डोंगर रांगामधून "हर हर महादेव" ची गर्जना होऊ लागली.. इथल्या इवल्याशा गवताच्या पात्यालाही समजून गेले की आला ..आला.. तो पहा..आपल्या शंभू महादेवाने घेतलेला अवतार..!! तोच तो आपला शिवबा राजा..!! प्रत्येक घर, प्रत्येक गाव प्रत्येक सुभा.. स्वातंत्र्याचा आणि सुराज्याचा पुन्हा अनुभव घेऊ लागले..राजांचे सगळे काम कसे देखणे व नेटके असे..कुणी काय करायचे कसे करायचे..याची अगदी चोख व्यवस्था राजे व त्यांच्या जिवलग यांनी केलेली..कुठेही गडबड नाही..घोटाळा नाही..आणि हलगर्जीपणा तर छे..छे.! त्याचा विचार सुद्धा करायचा नाही..कारण मग नेहमी देखण्या वाटणारया राजांचे कडवे कठोर रुपडे सगळ्यांना हादरवून जायचे..!! गैरशिस्त, अन्याय, यांना शिवराज्यात जागाच नव्हती..!!

आणि एक दिवस अचानक ती बातमी आली..!! राजे मोगलांच्या तावडीतून सुटून आल्यानंतर काही दिवस शांत होते..जणू वादळ येण्या आधीचीच शांतता..!! सगळी घडी एकदा नीट बसवल्यावर मग राजे असे काही तुटून पडले मोगलांवर..अवघ्या सहा महिन्यात पुन्हा स्वराज्य पूर्वीपेक्षा जास्त विस्तारले..पण शत्रूचे आक्रमण थेट राजगडाजवळ आलेले अनुभवल्याने राजे नवीन राजधानी शोधत होते..!! एक दिवस अचानक राजे इथे आले..अवघा गड न्याहाळला..अगदी चाहु बाजूनी हिंडून हिंडून बारकाईने न्याहाळला..दिवसा पहिला..रात्री पहिला..आणि राजांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.."तख्तास जागा हाच गड करावा..!", राजे बोलिले..आणि अंग अंगभर रोमांच फुलले माझ्या....डोळ्यात पाणी दाटले..वाटले माझ्या आयुष्याचे सार्थक झाले..!!

दूर आग्न्येयेकडे उभा तो राजगड कसा अवघा उदास उदास झाला होता..गेली कित्येक वर्ष ज्या राजाने मनसोक्त प्रेम केले तो राजा दुसरीकडे जायचे ठरवून आला  होता..! पण त्याला म्हटले..अरे नाराज नको होऊस..तुझा लाडका राजा माझाही जिवलग आहेच..मी ठेवेन त्याला सुखरूप..जपेन..फुलासारखा..मी मरेपर्यंत कुणी सुद्धा त्याला हिरावून नाही नेवू शकणार..!

राजे रायगडी जाणार समजल्यावर एकच धांदल उडाली..सिंधुदुर्गाचे बांधकाम उरकून आलेला हिरोजी इंदुलकर आणि त्याचे कुशल कारागीर यांची लगबग सुरु झाली..राजांची राजधानी..मग ती जगात सर्वोत्कृष्ट बनली पाहिजे ना..!! देखणे महाद्वार, नगरपेठ, प्रधानांची घरे, पाण्यासाठी तलाव, आवश्यक तेथे भक्कम तटबंदी..आणि राजांसाठी खासा वाडा सगळे काही बनू लागले..मध्ये मध्ये राजे स्वत देखील काम न्याहाळून गेले..सांगून गेले की माझ्या राहत्या घरावर खर्च जास्त नका करू ..पण गडाचा बंदोबस्त, जिजाऊ मासाहेबांचा पाचाडचा वाडा, आणि कारखाना विभाग मात्र नेटका व्हायलाच  हवा...!! या आमच्या राजांना नेहमीच स्वतःपेक्षा दुसऱ्याची जास्त काळजी..!!  हिरोजी व मंडळीनी देखणे काम केले..तेही लवकर..!! मग एकदिवस महाराज आणि कुटुंब कबिला दाखल झाला..गडावर एक आदरयुक्त भीतीचे वातावरण निर्माण झाले..एखादा साधा  माणूस घरासमोरचा  केर सुद्धा सतत काढत बसे..ना जाणो राजे इकडे गडफेरी ला आले तर..!! अशी भीती..अन तशीच ओढ..रोज राजे दिसावेत म्हणून. अशी मज्जा...!

पण राजे आणि त्यांची धावपळ सततची..जरा म्हणून विश्रांती नसायची..!! आणि एक दिवस जिजाऊ साहेब आणि मंत्रीलोक यांची काही खलबते सुरु झाली..एक गोरा ब्राह्मण ही त्यांच्याबरोबर असायचा..आणि बातमी कळलीच.." राजांचा राज्याभिषेक करायचा..!". अवघ्या मावळ्यांच्या मनात आनंदाला भरते आले.."आमचा लाडका शिवबा राजा..आता खराखुरा राजा होणार..अगदी दिल्लीच्या बादशहा पेक्षा मोठा..!!" प्रत्येक जण हेच म्हणू लागला..मग काय गडावर पुन्हा गडबड सुरु..!! कुठून कुठून लोक आले..प्रत्येक जण रिकाम्या हाती कसा येणार ? मग कुणी धान्य आणले..कुणी मीठ, कुणी कापड..कुणी तर चक्क जंगलातला मध..!! ज्याला जे जे जमले ते प्रेमाने राजासाठी घेऊन आले लोक..नेहमी स्वतः खूप मोठा असल्याचा तोरा मिरवणारा..नाक वर करून चालणारा..गोरा इंग्रज देखील आला..कारण राजांनी त्याची अशी जिरवली होती कित्येकदा...समुद्रावर आपलीच सत्ता समजून राहताना त्याला राजांनी चांगली अद्दल घडवली होती..!!

आणि तो दिवस उगवला..ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी..शालिवाहन शके १५९६..आनंदनाम संवत्सर....!! माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस..!! गडावरच्या तोफांनी अवघ्या जगाला अभिमानाने सांगितले.."शिवाजी राजे..छत्रपती झाले..सिंहासनाधीश झाले..!!" काय तो सोहळा..काय ती मिरवणूक..केवढे देखणे ते सिंहासन..आणि केवढे ते प्रेम..लोकांचे राजावर..आणि राजाचे लोकांवर...!!! थरथरत्या हाताने मासाहेबानी देखील आपल्या शिवबाला मुजरा केला..आणि आम्हा सर्वांचे डोळे आनंदाश्रूनी डबडबून आले...राजांनी कडकडून आईला मिठी मारली..! ती भारावलेली आई आणि आईचे स्वप्न साकार करणारा तो शूर वीर पुत्र आम्ही याची देही याची डोळा पहिला...!! आयुष्याचे सार्थक झाले..!!

 आज इतकी वर्षे निघून गेली..खूप चढउतार पहिले नंतर..खरे सांगायचे तर त्या दिवसानंतर थोडे उतारच जास्त..मातुश्री गेल्या..मग शंभू राजांचे बंड..सोयराबाईन्चे आणि इतरांचे राजकारण...जणू काही दुःखाचे ढगच दाटून आले होते..त्यातच..तो तीव्र आघात...अचानक ओढवलेले आजारपण काय ..आणि राजे गेले सुद्धा..अजून विश्वास नाही बसत..त्या काही दिवसांवर..!! तिथून मग पुढचे किती आणि काय लिहू....??

मोगलानी , इंग्रजांनी वर्षानु वर्षे जपलेला राग..मग माझ्यावर काढला..सगळं  सगळं गेलं..आता उरलेत..फक्त काही अवशेष...!! तेही ढासळत आहेत..वेगाने..पण कुणाला आहे त्याचे सोयर सुतक ?? जिथे स्वराज्यासाठी लोकांनी घाम आणि रक्त सांडले...तिथे आता..फुटतात दारूच्या बाटल्या..!! जिथे अवघ्या राष्ट्राने मस्तक झुकवावे तिथे लोक झोकांड्या देत काय काय करतात..!! सांगायला ही लाज वाटते मला..!!

पुन्हा १९४७ ला स्वातंत्र्य तर जरूर मिळाले..पण स्वराज्याची मात्र रयाच गेली..आज तर कायदे फक्त पुस्तकात उरलेत..माणसे पुन्हा भांडू लागली आहेत..जाती जाती वरून..प्रांता प्रांता वरून...!! अरे, ज्या देशात  शिवाजी, थोरला बाजीराव, चाणक्य, आदि महान माणसांनी एकजुटीने राष्ट्र घडवले..तिथे माणसे राष्ट्रधर्म आणि माणुसकी विसरतातच कशी??

खरच पुन्हा पुन्हा वाटते..हे गडकोट स्मारके व्हावीत राष्ट्रभक्तीची..!! आणि इथल्या युवा पिढीने स्वप्न पहावीत..जग जिंकून माणुसकीचे साम्राज्य घडविण्याची..!! कारण ती ताकत फक्त याच मातीत आहे..!! म्हणून तुमचा लाडका रायगड तुम्हाला विनंती करतोय ..प्रत्येकाने आठवा  तो दिवस.माझ्यासारखाच..."शिव राज्याभिषेकाचा..!"..जो देईल तुम्हाला स्फूर्ती..मनात अभिमान आणि मनगटात शक्ती..!!
जास्त काय लिहू..??
----सुधांशू नाईक, कल्याण. (०९८३३२९९७९१)

Friday, 10 June 2011

दोन कविता पावसाच्या..

१. पाऊस माझा जिवलग..
पाऊस म्हणजे तुझ्यासाठी
                   नको नकोसा पाहुणा
पाऊस म्हणजे माझ्यासाठी
                          जिवलग सखा लोभसवाणा..
पाऊस म्हणजे तुझ्यासाठी
                 केवळ नुसता चिखल
पाऊस म्हणजे माझ्यासाठी
                हळवा हळवा गंधार कोमल...
पाऊस म्हणजे तुझ्यासाठी
            वाहणारी गटारे
पाऊस म्हणजे माझ्यासाठी
                           खळाळणारे झरे...
पाऊस म्हणजे तुझ्यासाठी
                 घर एके घर
पाऊस म्हणजे माझ्यासाठी
                       हिरवे हिरवे डोंगर...

प्रयत्न करून बघ मस्त
                    आनंदाने जगायला
चल रे एकदा माझ्याबरोबर
                      चिंब चिंब भिजायला..
--------------------------------------
२. पाऊस मस्त..
पाऊस मस्त..बेधुंद करणारा..
पाऊस वेडा....अचानक भिजवणारा..
                 पाऊस हळुवार...इंद्रधनू फुलवणारा...
                 पाऊस रासवट ...महापूर आणणारा...

पाऊस हळवा ...पानांशी हितगुज करणारा..
पाऊस बेईमान...येतो सांगून हुलकावणी देणारा...
                          पाऊस विक्षिप्त ..एकसुरी अन कंटाळवाणा..
                          पाऊस बालिश...छान घालतो धिंगाणा....
पाऊस कधी..कधी बेभान प्रियकर..काळवेळ विसरणारा..
पाऊस कधी .. कधी  समंजस नवरा ...नियमित वेळेवर येणारा...!!!
-------------------------------------------------------------------------------------------
 ----सुधांशु नाईक , कल्याण. (०९८३३२९९७९१).

Saturday, 14 May 2011

माझीच आठवण येईल तुला..

पुन्हा एकदा आभाळ भरून येईल ..
                   आणि बरसतील टपोरे थेंब..
        दरवळेल तो गंध मातीचा..
              माझीच आठवण मग येईल तुला....

गवताचा तो वेडा ओला गंध..
             बेभान वारा आणि पाउस धुंद ...
  धबधब्याखाली त्या चिंब भिजताना
                  माझीच आठवण मग येईल तुला....

बुरुजावर कुठल्या उभे राहून
           घेशील वारा हृदयात भरून
 अचानक येईल जेंव्हा धुके दाटून..
                माझीच आठवण मग येईल तुला....

 आठवतील ते अवघे देखणे क्षण 
        वेडी भटकंती आणि वेडे आपण..
घरातूनही जेंव्हा पाउस बघशील
           माझीच आठवण मग येईल तुला...
                        ---सुधांशु  नाईक, कल्याण - ०९८३३२९९७९१.
                             ( nsudha19@gmail.com)

Friday, 22 April 2011

सुट्टीचे दिवस आणि मी..


मित्रांनो, शाळेची सुट्टी सुरु झालीये..घरोघरी सुट्टीचे प्लान तयार झालेत..कित्येक मंडळी गावाला गेलीसुद्धा..गल्लीबोळातून क्रिकेटच्या match  रंगू लागल्याहेत..हे सगळे आता दुरून पाहताना जीव कासावीस होतो..!! लहानपणी वाटायचे कधी मोठे होऊ..अन आता मोठे झाल्यावर वाटते नको हे annual  प्लान्स आणि ती कधीच न जमणारी targets ..नको ती पगारवाढ आणि नकोत ते नवे नवे खर्च..!!
छान मस्त झुक्झुक्गाडीत बसून जावे दूर गावाला..प्रत्यक्ष तर जाता येत नाही पण मन मात्र केंव्हाच बालपणात निघून गेलेलं असतं..

आमच्या सुट्टीत आम्ही खेळायचो तर खूपच..अगदी सकाळी ७ वाजल्यापासून क्रिकेट सुरु व्हायचे..तर दुपारच्या सुट्टीत सावलीत लपाछपी आणि भोज्ज्या..! संध्याकाळी पुन्हा लगोरी किंवा क्रिकेट..! कधी दुपारी आम्ही बँक बँक पण खेळायचो..पण दुपारसाठी आवडता खेळ होता गाड्यांचा.. पुत्ठ्याच्या गाड्या बनवून तोंडाने धर्र्र धार्र आवाज काढत आम्ही लोकांच्या झोप उडवायचो..तर अनेकदा कुणाच्या झाडावरचे पेरू काढायला जायचो..नंतर नंतर नदीवर पोहायला जाउ लागलो आणि संध्याकाळची धमाल अजूनच वाढली..

पण त्याबरोबर मला सुट्टीत वाचायलाही खूप मिळायचे..तेंव्हा आम्ही चाळीत राहायचो चिपळूण ला.. २-३ शेजाऱ्यांच्या घरातले पेपर वाचून काढायचे..कुणाच्या घरी चांदोबा यायचा..कुणाच्या घरी किशोर तर कुणाच्या घरी इंद्रजाल कॉमिक्स..!! त्या सगळ्या गोष्टीमध्ये, मी एवढा हरवून जायचो की जेवण देखील विसरायचो..आमच्या शेजारीच आमच्या शाळेतील परांजपे madam  राहायच्या.. त्यांच्या घरातील एका कोपऱ्यात त्या पत्र्याच्या खुर्चीत बसून मी अनेक पुस्तके वाचली..तसेच ज्यांच्याकडे वाचनालयातून मोठी मोठी चांगली पुस्तके आणली जात त्या केळकर काकांच्या घरी मी चौथीत असतानाच रशियन क्रांतीवरचे "व्होल्गा जेंव्हा लाल होते" हे पुस्तक वाचल्याचे आठवते. त्याच सुट्टीत बाबांनी घरी विकत आणून ठेवलेले मृत्युंजय व श्रीमान योगी सुद्वा वाचल्याचे आठवते..तेंव्हापासून खरच माझा "सखाराम गटणे " झाला . (thanks to पुलं ..!)  आणि त्यातून मग वाचनाची, लिखाणाची आवड निर्माण झाली असावी..


मे महिना लागताच आम्ही मग मामा, मावशी, काका आत्या यापैकी बहुतेक सगळ्यांकडे जाऊन येत असू.. माझ्या मामाचे घर कर्नाटकातील संकेश्वर जवळचे एक चिमुकले गाव. मामाच्या गावी जाताना संकेश्वर च्या बस स्थानकात खाल्लेला डोसा अजून आठवतो..आणि आठवतो तो शेजारी दिसणारा वल्लभगड  . ..जो शिवाजी महाराजांची आठवण करून देई..
एकदा गावी गेले की आजी मायेने जवळ घेई.. मग २-३ दिवस भरपूर लाड केले जात. नंतर तिकडे अजून धमाल असे..मस्त विहिरीत पोहायचे..शेतातून हुंदडायचे , सतत काही न काही खायचे,  क्रिकेट खेळायचे..आणि रात्री चांदण्यात मस्त भुताच्या गोष्टी सांगत - ऐकत झोपायचे..असा जणू नेहमीचा दिनक्रम..
.तिथे आम्ही लहान मुले विहिरीवरून पाणी आणायचो..दुपारी मामीच्या मागे लागून ओढ्यावर ती कपडे धुवायला जाई तिकडे जायचो..झाडाझुडपातून मस्त भटकायचो..आणि दंगा धुडगूस घातला की मामाचा मारही  खायचो...!! पण पुन्हा सकाळी चहा प्यायला सोबत मामाच हवा असायचा..!! किती निरागस आनंदाचे दिवस होते ते..! दुपारी येणारा गारेगार वाला आणि गुलाबी केस वाला ( जो घरातले केस घ्यायचा आणि ती गुलाबी मुंबई मिठाई द्यायचा तोंडात पटकन विरघळणारी .) कसा विसरता येईल.. ? कुणी हातावर गुळाचा खडा, एखादा लाडू दिला तरी खूप काही मिळाल्याचे समाधान व्हायचे..आणि आता..???

सुट्टी संपण्याचा दिवस जवळ येऊ लागला की आजीची धावपळ सुरु व्हायची..घराच्या शेतातले दाणे, डाळ, मूग असे काही छोट्या पिशव्यातून भरून द्यायची..परतीच्या दिवशी सकाळी बैलगाडी दारात आली की मग मात्र आजी, मामा - मामी आणि शेजारच्या बायका या सगळ्यांचेच डोळे भरून यायचे..पुन्हा वर्षभर भेट नसल्याचे दुक्खं पाय जड करून जाई..आम्हाला मात्र बैलगाडीतून जायची घाई झालेली असे..!! 
सकाळ सकाळ गावाच्या वेशीतून बाहेर पडताना दिसणारा देखणा लालभडक सूर्य..आजूबाजूचे माळरान , कुठे कुठे असलेली डेरेदार हिरवी झाडे आणि बैलगाडीतून जाताना पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणाऱ्या आईचे भरून आलेले डोळे...हे माझ्या मनावर कायमचे ठसलेले चित्र आहे..!!

घरी परताना आम्हाला न्यायला आलेले बाबा दिसताच खूप आनंद व्हायचा पण इतके दिवस आपण त्यांना कसे विसरून गेलो ह्याचेही आश्चर्य वाटायचे..!! घरी आल्यानंतर लगेच १-२ दिवसात मग बाबा आम्हाला
बाजारात घेऊन जात आणि नवी पुस्तके घरी आणली जात.. त्या कोऱ्या पुस्तकांचा तो छान वास मग आम्हाला पुढच्या वर्षाच्या शाळेची आठवण करून देई आणि सुट्टी संपली कशाला असे वाटू लागे..

आज दिवस बदलेत..आजची मुले वेगवेगळ्या कॅम्प मधून जातात.. पण जे आम्हाला अनुभवायला मिळाले तेही कोणताही खर्च न करता त्याचे मोल कसे करणार..? कुणी ह्याला nostalgia म्हणोत .. पण ह्याच दिवसांनी आमचे बालपण समृद्ध केले..आणि त्याचे ऋण कसे विसरता येईल..??
-----सुधांशू नाईक , कल्याण
०९८३३२९९७९१. (email- nsudha19@gmail.com)

Wednesday, 13 April 2011

आस


दूर ची ही वाट ....लांबचा प्रवास
मनी ध्यान तुझे.... भेटायची आस..

सुकला रे घसा ...थकली पाऊले
विरहाश्रूनी झाले ...डोळे माझे ओले..

सुख आणि दुख्ख ...भोगले रे सारे..
तरीही अतृप्त हे.. मन ऊरे मागे...

अजुनी किती धाऊ ...सांग रामराया
"सुधा" म्हणे तुझ्याविना ...जन्म जाई वाया..

-- सुधांशु नाईक, कल्याण -09833299791
(रामनवमी ला सुचलेली कविता)

Saturday, 5 February 2011

छान जगणे सुरु कर..

टीव्ही बघणे कमी कर... छान जगणे सुरु कर..
पाहिलास का कुठल्या नदीचा काठ
             सुबक तो एखादा देखणा घाट
  चालून बघ तो हिरवा डोंगर....छान जगणे सुरु कर...
वाचलंस  का सध्या नवीन पुस्तक
             पाहिलंस  का छानसे एकतरी नाटक
अनवाणी चाल त्या ओल्या पुळणीवर.... छान जगणे सुरु कर...
घरट्यातील पक्षी जरा निरखून बघ
               ढगामध्ये हत्ती कधी शोधून बघ
अंगावर घेरे कधी पावसाची सर.... छान जगणे सुरु कर..
रानामधली करवंदे शोधून खा 
              चुलीवरती  भाकरी भाजून पहा
आयुष्य असले जरी अवघड
एकातरी गरिबाला मदत कर....छान जगणे सुरु कर...
                                           छान जगणे सुरु कर..
                         --- सुधांशु नाईक, कल्याण. (०९८३३२९९७९१)

Monday, 24 January 2011

...आणि जोगिया स्तब्ध झाला..!

पंडित भीमसेन जोशी गेले..गेले कित्येक दिवस टाळावीशी वाटणारी ती बातमी शेवटी ऐकू आलीच..!! काय करणार मृत्यू कुणाला चुकलाय?? पण तरीही ज्याक्षणी बातमी ऐकली त्यावेळी डोळे भरून आले..वर्षानु वर्षे कानात गुंजणारे ते चिरंतन स्वर पुन्हा मनात रुंजी घालू लागले..डोळ्यात अश्रू जरूर होते पण मन त्या सुरांच्या सागरात आनंदाने न्हाऊ लागले..भीमसेनजी बेभान होऊन गात होते.."अवघाची संसार सुखाचा करीन ..आनंदे भरीन तिन्ही लोक.."
खरे तर भीमसेनजींचे तारुण्यातील जोशपूर्ण गाणे माझ्या वडिलांच्या काळातील..आम्हाला जेंव्हा गाणे मनात भिडू लागले कानाला उमजू लागले तेंव्हा त्यांनी जवळ जवळ सत्तरी गाठलेली...गाण्यातील तरुणाईचा जोश जरी कायम असला तरी जीवनातील सर्व सुख दुक्ख उपभोगून   पंडितजी जणू एखाद्या खोल विशाल नदीसारखे शांत व तृप्त झाले होते. त्या सुरांना आता योग्य त्या ठेहरावाची जागा सापडली होती.. आणि असे जीवनातील सर्व भाव आपल्या गाण्यातून समर्थपणे व्यक्त करणारे भीमसेन जी माझ्या पिढीने ऐकले..ज्यांनी आमच्या आयुष्याला एक वेगळीच आस लावून दिली..निर्भय गंभीर आणि खणखणीत सुरांची..!!
 
आता आठवत  नाही निश्चित कि पहिल्यांदा कधी त्यांचे गाणे ऐकले ते.. पण आठवणीच्या कप्प्यात जपलेले पहिले गाणे म्हणजे त्यांचा "तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल " हा अभंग..त्यातील "नामा म्हणे मज विठ्ठल सापडला...." ऐकताना तो कर कटावरी ठेऊन वर्षानुवर्षे उभा असलेला पांडुरंग नजरेसमोर सगुण साकार होऊन प्रकट होत असे..अपार आनंदाने डोळे पाण्याने भरून येत..
अशा किती आठवणी..किती गाणी..किती मैफिली..
सुरुवातीला मला जेंव्हा जुने फिल्मी संगीत आवडे तेंव्हा "केतकी गुलाब जुही.." ने मनावर गरुड केले..मग जेंव्हा अधिकाधिक ऐकत गेलो संगीताच्या सागरात खोल खोल डुंबत गेलो तसे भीमसेनजींचा   पुरिया, हिंडोल बहार,मुलतानी, रामकली, कानडा, वृन्दावनी सारंग, कलावती, यमनकल्याण, आणि तो स्वर्गीय तोडी...हे सारे जिवलग बनले.. गेली अनेक दशके सवाई गंधर्व संगीत महोत्सव अनेकांनी ऐकला..मी तर केवळ १९९५ नंतरच हा महोत्सव अनुभवू लागलो..तेंव्हा कुमारजी, वसंतराव, बेगम अख्तर आणि मल्लिकार्जुन मन्सुरांसारखे माझे लाडके दिग्गज त्या आकाशस्थ स्वराधीशाला भेटायला मार्गस्थ झालेले..त्यांचे स्वर जरी रेकॉर्ड्स मधून ऐकता येत असले तरी प्रत्यक्ष भेटण्या अनुभवण्यातील मजा काही औरच..तसे फक्त भीमसेनजीनाच अनुभवता आले. सवाई च्या निमित्ताने पुण्यात तर ऐकलेच पण चिपळूण, कोल्हापूर, कराड, सांगली-मिरज अशा अनेक ठिकाणी अगदी जवळून त्यांना ऐकले..तृप्त तृप्त होईपर्यंत ऐकले..एक दोन वेळा त्यांच्याशी चार शब्द बोलता आले..तेंव्हा जणू परमेश्वरालाच भेटल्याचा आनंद झाला होता..!!
 
 
सवाई ची सांगता करताना भीमसेन जोशी कधी येतात याची सगळ्यांप्रमाणे मीही चातकासारखी वाट पहिली..त्यांच्या तोडी, भैरव च्या वर्षावात अनेकदा चिंब चिंब भिजून गेलो..कधी हि संपू नये असे ते गाणे असे..पण शेवटी मैफल ही संपवायची असतेच ना..रागदारी चा स्वर्ग उभा करून भीमसेनजी हळूच "पिया के मिलन कि आंस.." असे म्हणत ठुमरी आळवायला घेत आणि मग "जोगीयातील" ते कारुण्य मनात आत आत झिरपत जाई. ती आस केवळ प्रियाला भेटायचीच उरत नसे..तर तो प्रत्यक्ष परमेश्वरच जणू "पिया" बनून जाई..त्या परमेश्वराला भेटण्यासाठी भीमसेनजींचे प्रत्येक स्वर अधिकाधिक तरल, हळवे बनत जात..आणि तार सप्तकातील  त्या सुरावर जेंव्हा मैफिल थांबे..तेंव्हा जणू अवघा जनसमुदाय  मंत्रमुग्ध असे..स्तब्ध असे..टाळ्या वाजवायचेही भान विसरलेल्या आम्हा प्रत्येकाच्या डोळ्यात केवळ अश्रू असत..अत्यानंदाचे..अवीट समाधानाचे....
आता उरल्या केवळ आठवणी..तो घन गंभीर आवाज,ती गडगडाटी तान, ते कारुण्य मधुर स्वर..चिरंतन मागे ठेऊन अण्णा आपल्यातून निघून गेलेत.. ज्याच्या मिलनाची प्रत्येक जीवाला जन्मल्यापासून ओढ असते त्या ईश्वराला  भेटायला आमचा स्वरभास्कर निघून गेलाय..आणि..आणि आमच्या डोळ्यात आसू देऊन तो जोगिया केव्हाचा  स्तब्ध झाला आहे...!!
-- सुधांशु नाईक, कल्याण. (९८३३२९९७९१)

Tuesday, 11 January 2011

The below link is about my Article published in E-Sakal. about Sudhagad Fort conservation activity along with Trekshitiz group.

Pl read it and start giving your support to this as well as other social works happening all over.

http://72.78.249.107/esakal/20110107/4888331638224820657.htm

Regards,
Sudhanshu Naik
+91 9833299791
nsudha19@gmail.com

Friday, 7 January 2011

दुर्गपती शिवराय..


 
आकाशाच्या घुमटाखाली 
                              चंद्र आणि चांदणे
स्तब्ध अशा या सिंधुदुर्गी
                                     इतिहासातून रंगणे....
 
विजयदुर्ग तो सिंधुदुर्ग तो
                      स्मारके हि त्या शिवबाची
 उरी ज्यांच्या त्याग होता
                              अन मूठ होती तेजाची.....
 
कळीकाळाची भीती नव्हती
                            इथल्या निधड्या वीरांना
चारीमुंड्या चीत केले
                       मोगल, फिरंगी, सिद्द्यांना.....
 
          समर्पित होते जीवन त्यांचे
                               निश्चित उदात्त ध्येयाला
          करू मुजरा आपण सारे
                                           दुर्गपती शिवरायांना..
                                                                दुर्गपती शिवरायांना.....
                             
                                                                   -सुधांशु नाईक, कल्याण, ०९८३३२९९७९१.