marathi blog vishwa

Saturday, 16 February 2013

सुचेल तसं ..तिसरा लेख..."शिक्षण एके शिक्षण"


सुचेल तसं ही लेखमाला सुरु केली आणि पहिल्या दोन लेखांना सर्वांनी छान प्रतिसाद दिला. त्याच लेखमालेतील हा तिसरा लेख...
3. शिक्षण एके शिक्षण ..
"शिक्षणा च्या आयचा घो.." म्हटलं म्हणून काही शिक्षण बदललं नाही, आणि शिक्षण दिलं पाहिजे म्हणणारेही..! अगदी स्वानुभव सांगायचा झाला तरी हे नक्कीच आठवतं की इंजिनिअर होताना जे शिकत होतो ते एकतर खूप जुनं होतं आणि प्रत्यक्षात काम करताना काही मुलभूत गोष्टी वगळल्या तर सर्व नवीनच शिकावं लागलं..मग उगाच वाटून गेलं की ती वर्ष पठडीतील शिक्षण घेत आपण वाया घालवली की काय ?? मग आजच्या मुलानाही असंच वाटतं का??

रोजचा पेपर उघडला की शिक्षणाबद्दल एक तरी बातमी किंवा लेख असतोच. कधी शारीरिक शिक्षण, कधी लैंगिक शिक्षण, कधी लष्करी शिक्षण, कधी नवीन तंत्राचे शिक्षण, कधी प्राचीन भाषेचे शिक्षण..! शेवटी काहीच नाही मिळालं तर प्रौढ शिक्षणाची बातमी असतेच… पेपरवाल्यांना काय रोजच रतीब घालायचाच असतो मग द्या  काही ना काही छापून.. शिक्षणाच्या नावाखाली..! मला  कळत नाही एवढ्याशा शाळकरी मुलामुलींनी किती प्रकारची जबरदस्ती शिक्षणाच्या नावाखाली सहन करायची ? आणि असं थोडच असतं की एकदा त्या शाळकरी वयात शिक्षणाचा रतीब घातला म्हणजे आपण मोकळे पुढच्या सबंध आयुष्यात, मनाला येईल तसे वागायला...!



त्या लहान मुलांना विचारलं, तर तेही सांगतील खरी गरज आहे शिक्षणाची ती वेगवेगळ्या मोठ्या लोकांना..कोण बरं ही मंडळी जी अजून खऱ्या अर्थाने सुशिक्षित नाहीयेत..? आणि काय आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स...
. राजकारणी किंवा पुढारी -- ( बहुतेक मी लिहायच्या आधीच तुम्हीच मनात म्हटलं वाटतं..) संसदेत किंवा कोणत्याही मीटिंग मध्ये ते आपापसात आवेशाने भांडताना दिसतात.  माईक खुर्च्यांची फेकाफेक, गुद्दागुद्दी करतात. ह्यांना बहुदा पोटाचा काही विकार असावा म्हणून लोक यांच्याबद्दल सारखे म्हणतात कि " अमुकतमुक पैसे खातो..". त्यांना चांगले कसे वागावे, काय खावे काय खाऊ नये, कोणत्या विषयाचा अभ्यास करावा, कोणत्या "विषया"चा करू नये, नैतिकता, समाजसेवा, अहिंसा आदि गोष्टींचे शिक्षण आवश्यक आहे.
. शिक्षण संस्थांचे अधिकारी - ह्यांना शिक्षण सम्राट असे गौरवाने म्हणायचे असते. ते कदाचित अशिक्षित असतील पण समाज अति- शिक्षित व्ह्वावा याच उद्दात्त हेतूने प्रेरित होऊन ते शिक्षण संस्था, महाविद्यालये काढतात. भरपूर चांगले शिक्षण द्यायला भरपूर पैसा लागतो.  म्हणून जे भरपूर मदत करतात त्यांना कमिटीवर घेतात किंवा थेट शिक्षक बनवतात. मुलांना पालकांना दानाचे महत्व कळावे म्हणूनच देणग्या किंवा डोनेशन घेतात. विद्यार्थ्याच्याही आयुष्याचे भले व्हावे म्हणून भरपूर मार्क्स देऊन त्यालाही पास करतात. अतिभव्य दृष्टीकोन बाळगल्याने यांना बरे-वाईट कसे ओळखावे हे कळेनासे झाले आहे..त्याचे शिक्षण गरजेचे आहे. तसेच आधी त्यांनाच शिक्षण मिळावे म्हणून सर्व "शिक्षा" अभियानात त्यांचे नाव घालावे.
. काही थोर पालक शिक्षक - नव तंत्रज्ञानाने, नव्या सुखसोयीने भारावलेली ही काही मंडळी आहेत. त्यामुळे त्यांना असे ठाम वाटते की शाळेत महाविद्यालयात एसी, अक्वा गार्ड, प्रोजेक्टर . अनेक नवनव्या सुविधा नसतील तर मुलांचे आयुष्य फुकट जाईल. तिथे मातृभाषेतून शिक्षण दिले जाता कामा नये. एखादा विषय नीट खोलवर समजला नाही तरी चालेल पण तो इंग्रजीतून सांगता आला पाहिजे असे त्यांना वाटते. शिकवणाऱ्या शिक्षकांचे qualification माहिती करून घेण्यापेक्षा या मंडळीना शाळेत स्विमिंग पूल आहे का याची चौकशी करावीशी वाटते, शाळेत अभ्यासाव्यातिरिक्त basket ball, बिलिअर्द्स, स्क्वाश असे खेळ खेळावेत ज्यामुळे व्यक्तिमत्व विकास होतो असे त्यांना वाटते !!

आणि अशा सुविधा पुरवणारी , जास्तीत जास्त फी घेणारी शाळा यांना चांगली वाटते... किंबहुना आपल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च लाखो रुपये असणे हे गौरवशाली वाटते... समाजातील आपली प्रतिष्ठा यामुळेच वाढते यावर यांचा ठाम विश्वास असतो...!
या सर्व मंडळीना प्रथम मूल्यशिक्षण, जीवनातील शिक्षणाची गरज, मुलांचे निरीक्षण, त्यांची आवड ओळखणे त्याप्रमाणे मार्गदर्शन करण्याच्या पद्धती, याचे शिक्षण द्यावे. तसेच जागरूक नागरिक बनण्याचे शिक्षण, देशभक्तीचे शिक्षण, सामाजिक भान (civic sence) जपण्याचे दुसऱ्याला शिकवण्याचे शिक्षण देणे आवश्यक आहे..म्हणजे हे आईबाबा किमान रस्त्यावर थुंकणार नाहीत कचरा टाकणार नाहीत, सार्वजनिक ठिकाणी नीट रांगेत शिस्तीने कामे करतील.

. शाळा तपासणी अधिकारी - ही मंडळी शाळा तपासणीचे अत्यंत महत्वाचे काम करतात. शाळा तपासणी वेळी चांगली मनस्थिती असावी म्हणून त्यांची चांगली बडदास्त ठेवावी लागते असे इतर कर्मचाऱ्यांना वाटते. शाळेपर्यंत पोचण्यासाठी आरामदायी गाडी, राहण्याची उत्तमोत्तम व्यवस्था आणि चमचमीत जेवण याची यांना अपेक्षा नसतेच. मात्र शाळेचे कर्मचारी अशी व्यवस्था करतात म्हणून त्याचा मान राखण्याची औपचारिकता यांना पार पाडावी लागते. शाळा तपासणी सुरु असतानाही कामात अति लक्ष असल्याने यांचे खाण्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून अधूनमधून चहापाणी दिले जाते. शाळेतील उत्तम मुलांची तपासणी करून हे शाळा व्यवस्थित चालत असल्याचा निर्वाळा देतात आणि मुलांच्या शिक्षणाची सोय करतात. मात्र शाळेच्या वर्गाबरोबरच शाळेची शौचालये ही तपासणे, शाळेतील मुलांच्या बरोबरच शिक्षकांची तपासणी करणे, शाळेने घेतलेल्या परीक्षांचे मूल्यमापन करणे, शाळेतील ग्रंथालय, प्रयोगशाळा, विविध नकाशे, चार्ट याची चाचणी करणे, इमारतीचे परीक्षण करणे, सुरक्षा ऑडीटची मागणी करणे याचे शिक्षण देण्याची गरज आहे..!

५. इतर काही.. शाळेची पुस्तके, वह्या ह्या अमुकच एका कंपनीच्या असाव्यात, दप्तरे आणि युनिफोर्म विशिष्ट दुकानातूच घ्यावा असे मानणारी आणि तशी अट घालणारीही मंडळी आहेत. त्यानाही योग्य त्या सर्व"शिक्षा" अभियानात दाखल करून घेण्यात यावे. देशात अनेक उत्तम शिक्षण तज्ञ आहेत, त्यांना प्रत्यक्ष शिक्षण व्यवस्थेत सामील करून घेण्यासाठीशासनावर दबाव आणायला हवा” याचे शिक्षण विरोधी पक्षांना देण्यात यावे.. सर्वात महत्वाचे म्हणजे देशाची पिढी ही खऱ्या अर्थाने सुशिक्षित संस्कारीत व्हावी यासाठी आपणा सर्वानाही प्रत्यक्ष कार्य चळवळ शिकवण्याची गरज आहे.
मुलांना मनापासून शिकवणाऱ्यांची प्रथम गरज आहे. मग मुलेच सर्व गैरसुविधांवर मात करून शिकायचं ठरवतात..बऱ्याच छोट्या मुलांना असे वाटते आहे...तुम्हाला काय वाटतं ?

-सुधांशु नाईक, बहारीन (nsudha19@gmail.com)

No comments:

Post a Comment