marathi blog vishwa

Tuesday, 26 February 2013

सावरकरांना आठवताना..!


२६ फेब्रुवारी --आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने "सुचेल तसं " लेखमालेतील  हा पुढचा लेख...

सावरकरांना आठवताना..!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...! ह्या चार शब्दांची जणू आपल्या सरकारला आज अलर्जी आहे. वयाच्या पंधरा - सोळाव्या वर्षापासून देशाच्या स्वातंत्र्याचा ज्याने ध्यास घेतला ते व्यक्तिमत्व आज विस्मृतीच्या गडद अंधारात जाणीवपूर्वक ढकललं जात आहे. कारण खरं तर फक्त एकच ...गांधीजींच्या विचारसरणीला त्यांनी केलेला विरोध...!

इतिहास ज्यांनी वाचलाय त्यांना हे निश्चितच माहित आहे की जेंव्हा सावरकर लंडन मध्ये त्या वाघाच्या गुहेत बसून त्यालाच मारायचे प्लान आखत होते तेंव्हा गांधीजी लंडन मधेच असूनही कोणत्याही प्रकारे देशसेवा करत नव्हते...!

सावरकर हे असे व्यक्तिमत्व होते की त्याकाळी भारतातील तमाम क्रांतीकारक मंडळी त्यांना आपला कर्णधार मनात होती. त्यांच्या एका आदेशानुसार प्रसंगी प्राणार्पण करत होती. उत्कृष्ट वक्तृत्व , जगाच्या इतिहासाचा प्रचंड अभ्यास, आगामी जागतिक राजकारणाची अचूक जाणीव, अप्रतिम निर्णयक्षमता आणि नियोजन कौशल्य अशा कित्येक गुणांच्या आधारे सावरकर त्यावेळी असे काही तेजाने तळपत होते की इंग्रजांनी "भारतातील सर्वात धोकादायक माणूस" अशी त्यांना जणू पदवीच दिली होती. त्यांच्यावर अखंड गुप्तहेर पाळत ठेऊन होते. मात्र शिवरायांच्या इतिहासाचे बाळकडू प्यालेल्या सावरकरांनी त्या जगप्रसिध्द स्कॉटलंड यार्ड च्या हेरांवर आपले प्रतीहेर नेमले आणि प्रत्येक वेळी त्यांना हरवले. संपूर्ण भारतात क्रांतीची मशाल धगधगत ठेवली...तीही शत्रुच्याच देशात नव्हे त्यांच्या बालेकिल्ल्यातूनच..!!
अत्यंत कर्तव्य कठोर असे सावरकर जाक्सन वधाच्या प्रकरणात आपल्या सहकाऱ्यांच्या होत असलेल्या अटकेने हळवे झाले..आपले सहकारी त्रास सहन करताना आपण दूर परदेशात का राहावे अशा विचाराने खंतावले...आणि फ्रान्सहून इंग्लंड ला परत येउन इंग्रजांच्या तावडीत सापडले. शिवरायांचा पावन खिंडीचा इतिहास विसरून शत्रूकडून कैद झालेल्या तेजस्वी शंभूराजांच्या प्रमाणेच इंग्रजांच्या कैदेत पडले..! ह्या दोन्ही गोष्टी जर झाल्या नसत्या तर कदाचित भारताचा इतिहासच बदलला असता..!! पण इतिहासाला जर - तर मंजूर नसतात..!!

पुढची कित्येक वर्षे मग भारताचा इतिहासच बदलून गेला. अहिंसा हि बलवानाच्या हातात शोभून दिसते आणि टिकून राहते त्यामुळे आधी बलशाली बना हे सांगणारे सावरकर कैदेत असताना भारतात गांधीजी पर्व अवतरले. अर्थात गांधीजींचे विचार हे टाकाऊ नव्हेत उलट दूरगामी परिणाम करणारे आहेत. पण त्याची वेळ चुकली असे मला वाटते. तसेच गांधीजीनी अनेक वेळा धरसोडीचे निर्णय घेतले...आणि शेवटी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते पुढील काही गोष्टीमुळेच हे कटूसत्य आहे;
१. दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांची जबर हानी झाली. भारतात राज्य चालवणे खर्चिक ठरू लागले आणि इथे लुटण्यासारखे फार काही उरलेही नव्हते.
२. नाविकांचे बंड, आझाद हिंद सेनेची पुर्वांचलावर धडक यामुळे इंग्रजांचे कमी झालेले लष्करी सामर्थ्य.
३. प्रतिसरकार सारख्या क्रांतिकारी चळवळी ज्या हिंसक मार्गानेच इंग्रजांना धडकी भरवत होत्या..!

आणि शेवटी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले..तेही फाळणीची जबरदस्त किंमत मोजूनच..! आपण १५ ऑगस्ट १९४७ ला अखंड देश स्वतंत्र झाला म्हणून इतिहास सर्वांना सांगतो पण खरे स्वातंत्र्य मिळाले ते गोवा, हैदराबाद, सिक्कीम, दीव दमण असे अनेक प्रांत स्वतंत्र झाल्यावरच आणि भारताचा अविभाज्य घटक बनले तेंव्हाच.. हैदराबादचा लढा असो व चीन चे आक्रमण प्रत्येक वेळी सावरकर अत्यंत योग्य सूचना देत होते पण द्वेषाचा चष्मा चढवलेल्या नेहरूंनी कधीच त्यांचे ऐकले नाही आणि पदरात चीनकडून पराभव पडून घेतला. गोवा, हैदराबाद, सिक्कीम, दीव दमण असे अनेक प्रांत स्वतंत्र झाले तेही सैनिक पाठवले म्हणूनच..! नेहरूच्या नंतर आपण सैनिकीकरण आणि अत्याधुनिक शस्त्रांची सज्जता, अणु तंत्रज्ञान या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले हा एका अर्थी सावरकरी विचारांचाच विजय आहे..!

सावरकर हे भारतातले असे पहिले नेते होते की ज्यांनी जातीभेद निर्मुलनासाठी आंतरजातीय विवाहांचे जाणीवपूर्वक समर्थन केले. त्याकाळी रत्नागिरी सारख्या अत्यंत कर्मठ गावात समानतेची शिकवण रुजवली ज्याचे अभिनंदन महर्षी शिंदे, डॉक्टर आंबेडकर आणि प्रत्यक्ष गांधीजीनीही केले होते..!!
जुन्या रूढी मोडून काढणे, समाज बलवान होण्यासाठी कार्यक्रम घेणे, जास्तीत जास्त लोकांनी लष्करी सेवेत जावे यासाठीचे प्रयत्न, प्रभावशाली काव्यप्रतिभा, जबरदस्त लेखन कौशल्य , विज्ञाननिष्ठा, देशहिताचा अखंड ध्यास आणि धगधगते विचार असे अष्ट पैलू गाजवणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हेच...! मात्र असा हा स्वयंभू तेजस्वी सूर्य काँग्रेसी भ्रष्ट नीतीने पुरता ग्रासून गेल्याचे चित्र दिसत असले तरी सर्व सामान्य लोकांच्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर हा कुणालाच नष्ट करता येणारा नाही.

केंद्रातील सरकारला आधीच मराठीचे वावडे आहे, त्यामुळेच लोकमान्य टिळक ,नामदार गोखले , आगरकर अशी कॉंग्रेसचीच नेते मंडळी जिथे जाणीवपूर्वक बाजूला ढकलली जात आहेत तिथे धगधगता विरोध करणारे सावरकर कॉंग्रेसला चालतीलच कसे?? तेंव्हा आपण समस्त मराठी बांधवांनी जेथे जमेल तेथे परक्या माणसांसमोर आपल्या क्रांतिकारकांचे गोडवे गाणे आवश्यक बनले आहे...तरच पुढच्या पिढीपर्यंत खरा इतिहास पोचू शकेल..आणि तो खरा इतिहास पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचावा आणि सर्वांनी मिळून देश बलशाली बनवावा हीच सावरकरांना खरी आदरांजली ठरू शकेल..!
- सुधांशु नाईक, बहारीन (nsudha19@gmail.com)

No comments:

Post a Comment