कृष्ण म्हटलं की आधी आमचे हात जोडले जातात..कृष्ण भगवान म्हणून नामजप सुरु होतात...अगदी सामान्य माणसे आपल्या व्यथा,संकटं त्या बिचाऱ्याला सांगतात, त्यातून सोडव म्हणून प्रार्थना करतात ...तर स्वतःला असामान्य समजणारी मंडळी त्याला "पुन्हा एकदा अवतार घेऊन सगळा गावगाडा पुन्हा नीटनेटका कर रे भगवंता" म्हणून विनवतात..आणि काही अति थोर थोर माणसे स्वतःला त्याचा अवतार म्हणून सिध्द करायच्या भानगडीत पडतात..आणि मग नीट अभ्यास न केल्यामुळे खरा कृष्ण आपणा सर्वांपेक्षा दशांगुळी वरच राहतो..आणि आपल्यापासून लांब लांब राहतो..!
कारागृहात जन्मलेला एक मुलगा, ज्याचा सख्खा मामा त्याच्या जीवावर उठलेला..राजकुलातील असूनही गोपाळांच्या संगतीत वाढलेला हा देवकीनंदन कृष्ण स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा झालाय याचा मग साऱ्यांनाच विसर पडतो..त्याची रूपे तरी किती..प्रत्येक रुपाची भुरळ वेगळीच...आणि प्रत्येक ठिकाणी लक्षात येते की कृष्ण एक पक्का बंडखोर माणूस आहे...! पण आपण फक्त अडकून पडतो त्याच्या "राधामयी " प्रेमकहाणीत..आणि उगाच वर त्याला अध्यात्मिक प्रेम, पारलौकिक प्रेमाची लेबलं चिकटवतो .! पुन्हा त्यातही विसरतो कि राधेचा कृष्णही "आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या विवाहितेवर" प्रेम करून पुन्हा समाज व्यवस्थेविरुद्ध बंडाचेच निशाण फडकावतो आहे ..!
कृष्णाचे खरे तटस्थपणे लिहिलेले चरित्र माझ्या काही वाचनात आलेले नाही. सगळी पुस्तके त्याचे देवत्व दाखवतात, काही पुस्तके राजकारणी कृष्ण मांडतात पण "कृष्ण-एक माणूस" म्हणून कुणीही त्याचे चरित्र बहुदा लिहिले नसावे..त्यामुळे मी जे काही थोडे वाचन केले किंवा ऐकीव कहाण्या ऐकल्या त्याप्रमाणे कृष्णाच्या बंडखोरीची चिन्हे त्याच्या लहानपणापासूनच दिसतात..
पहिले बंड म्हणजे गोपाळ काला - त्यावेळी गोकुळातील मुले आपापसात जरी खेळत असली तरी त्यात जातीपातीचे, आर्थिक तफावतीचे ताणेबाणे होतेच...त्यामुळे त्या गुरख्यांच्या मुलांमध्ये सुद्धा त्याचे प्रतिबिंब उमटणे साहजिक होते..कृष्ण हा असा त्यातील पहिला मुलगा ज्याने सगळ्यांचे जेवण एकत्र करून "काला" करून खायची पद्धत सुरु केली..यामुळे सगळे भेदभाव तर संपलेच पण एकजूट होण्याच्या दृष्टीने ते फार महत्वाचे पाऊल होते..
दुसरे बंड दही -लोण्याचे.. तेंव्हा मथुरेतील बाजाराची ओढ म्हणा किंवा कंस व अन्य मंडळींची दडपशाही म्हणा पण गोकुळातील सगळे दही दुध लोणी गोपी मथुरेच्या बाजारी नेउन विकत. नी मग घरात काही उरत नसे अगदी लहानग्यांना देखील काही मिळत नसे. मग चक्क आपला कृष्ण सगळ्या मित्रांना घेऊन चक्क चोऱ्या करतो...मथुरेच्या गवळणी अडवून त्यांना त्रास देतो..पुन्हा त्यातही सर्वाना समान न्याय...म्हणजे लोणी चोरले जाई ते सगळ्यांच्या घरातले..त्याचा परिणाम म्हणजे बाजाराला न्यायची quantity कमी होते..!!
तिसरे बंड रूढी विरुद्ध.. गोवर्धन पर्वताची गोष्ट आपल्याला माहीतच आहे..आपल्याला पाऊस हा पर्वत देतो..तिथे ढग अडतात आणि पाऊस पडतो..हे साधे विज्ञान कृष्ण सर्वाना समजावतो..त्यासाठी इंद्राची कशाला पूजा करता म्हणून रागावतो..गोवर्धन उचलण्यासाठी सगळ्यांना एकत्रित प्रयत्न करायला लावत रूढी मोडून काढतो..पाऊस चांगला होण्यासाठी आपल्या पर्वतांची काळजी घ्यावी तिथले जंगल वन जीवन सांभाळावे हे हजारो वर्षापूर्वी त्या युवकाला समजले होते पण आपल्याला समाजात नाही नं अजून.! याच बरोबर पुढच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टीतून कर्माचा सिद्धांत सांगत तथाकथित धार्मिक रूढी न मोडीत काढतो..!
चौथे बंड अत्याचाराविरुध्द ..हे तर कृष्ण आपल्या सगळ्या आयुष्यात करत आलाय. अत्याचार मग तो कंसाचा असो, दुर्योधनाचा असो, कालयवन चा असो, जरासंधाचा असो किंवा चक्क त्याच्या स्वतःच्या यादव कुळातील असो, कृष्ण कायमच त्याविरुध्द दंड थोपटून उभा राहतो..कधी एकटा तर कधी कित्येक अक्षौहिणी सैन्य घेऊन..!
आणि अगदी शेवटी अन्यायी झालेले, जीवनाचे बेसिक्स विसरलेले असे आपले यादवकुळ आपापसात भांडून मारत असताना शांत पणे ते घडू देतो..! शूर आणि हळव्या अर्जुनाला जसा लढायला प्रवृत्त करतो तसेच अभिमन्यु च्या वधाचा बदल घ्यायलाही भाग पडतो. कुरुक्षेत्रावर अधर्माचा नायनाट करताना कृष्ण युद्धाचे नियम तोडून / फेकून देत अर्जुन व भीम यांच्याकडून द्रौपदीच्या विटंबनेचा बदला घेतो. करोडो सैनिकांचे मृत्यू घडवून आणतो आणि तत्कालीन युद्ध नियमांना बंडखोरपणे उधळून देतो प्रसंगी त्यासाठी शाप पदरात घेऊन..!! "योद्धा कृष्ण" म्हणूनच जास्त अभ्यासला जायला हवा..!
सहावे आणि महत्वाचे बंड स्त्रीविषयी .. स्त्री हा कृष्ण चरित्राचा एक महत्वाचा घटक आहे..अनेक स्त्रियांचे संदर्भ आणि त्यावेळची कृष्णाची वर्तणूक जणू स्वतंत्र अभ्यासाचा विषय..! काहीजण म्हणतात राधेची गोष्ट काल्पनिक..असू दे..पण जरी खरी असली तरी काय दिसते,तर राधेला व अन्य गोपीना हवे असलेले प्रेम कृष्ण देतोच पण तो त्यात गुंतून राहत नाही.त्यांचे आयुष्य त्यांच्या मार्गे चालू देतो.ते विस्कटत नाही.
रुक्मिणीच्या प्रेमाला प्रतिसाद देत तिचे चक्क अपहरण करून तिच्याशी लग्न करतो...आणि प्रसंगी स्वतःच्या बहिणीचे अर्जुनाशी, दुसरे का असेना, पण लग्न झाले तरीही त्यात तिचे भले आहे हे समजून तिला अर्जुनाबरोबर पळून जायला मदत करतो.. कुब्जे सारख्या कुरूप स्त्रीचे सात्विक प्रेम लक्षात घेऊन तिच्या मनाचा मान राखतो..तिला आत्मसन्मान मिळवून देतो..
द्रौपदीचे पाच पाच नवरे षंढपणे बसलेले असताना, त्यातही ती रजस्वला ..(म्हणजे आजच्या भाषेत "बाहेर बसलेली किंवा मासिक पाळी सुरु असलेली".) आजचा आपला तथाकथित पुढारलेला समाज सुद्धा मासिकपाळी आणि धर्माचा अघोरी संबंध जोडून महिलांना कडवट अनुभव देतो तेंव्हा हजारो वर्षापूर्वी एक कृष्ण मात्र सहजपणे द्रौपदीच्या रक्षणाला धावून येतो..! याच द्रौपदीचा सूड पूर्ण होण्यासाठी महाभारत आणि लाखो लोकांचा संहार घडवून आणतो..! हाच कृष्ण नरकासुराच्या कैदेतील हजारो स्त्रियांना सोडवतो आणि त्याना "सुधारगृहात" न पाठवता त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्याशी लग्न करून त्यांना आत्मप्रतिष्ठा मिळवून देतो..आणि आपल्या आजच्या विज्ञान युगातील एखादा प्रगत बापच मुलीवर बलात्कार करतो..किंवा मुलीला, बहिणीला, बायकोला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडतो. .. मग सांगा ना आपण आधुनिक आहोत का कृष्ण?
आजच्या ह्या युगासारखी परिस्थिती अशीच यापूर्वीही येत- जात होती..म्हणून कृष्णाने अवतार घ्यावा असे म्हणण्यापेक्षा आपणच कृष्ण व्हायचा एक शतांश प्रयत्न केला तर...? कारण कृष्ण आभाळातून पडत नाहीत...ते तुमच्या आमच्यातूनच घडत असतात...!
---सुधांशु नाईक
, बहारीन. (nsudha19@gmail.com)
awsome story ahe.....ani dhakle ki mast dile ahet...mala far avadli...
ReplyDeleteउत्तम ब्लॉग आहे आपला. असेच लिखाण करत राहुन नवनवीन प्रकारची साहित्यिक
ReplyDeleteमेजवानी देत राहा.
माझ्या ब्लॉगला भेट द्या आणी आवडला तर फॉलो करायला विसरू नका..!!
InfoBulb : Knowledge Is Supreme
इन्फोबल्ब : ज्ञान हे सर्वोच्च आहे
टिपण्णीस परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद..!!