marathi blog vishwa

Saturday, 15 March 2014

माझे जीवन “गाणे”..!

“मनापासून” या लेखमालेतील हा पुढचा लेख, आयुष्य व्यापून टाकणाऱ्या गाण्याविषयी..!
संगीत हा मानवी आयुष्याचा एक अविभाज्य घटक. खोल अथांग शास्त्रीय संगीतापासून ते बहारदार हलक्या फुलक्या गाण्यापर्यंत शेकडो प्रकारांनी संगीत आपल्याला रमवते. भान विसरायला लावते. खेडोपाडीच्या, देशोदेशीच्या अनेकांना एकत्र आणायची ताकद संगीतात असते. म्हणूनच ताकदीचं गाणं कसं हवं या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्यायचं तर, ते अवघ्या विश्वाला एकत्र आणणारं हवं. तेही गाण्यातूनच सांगायचं तर;

“अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे

सर्व जगाचे मंगल, मंगल माझे गाणे,

या विश्वाची एकतानता, हे माझे गाणे...माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे..!”

बालकवींच्या शब्दांत आणि लताच्या सुरातलं हे गाणं खऱ्या अर्थानं संगीताचं विश्वात्मक ऐक्य सांगून जातं असं मला वाटतं.


सुदैवाने आपल्या या भल्या मोठ्या देशाला संगीताची फार प्राचीन परंपरा लाभलीय. नुसतं प्राचीनच नव्हे, तर गेल्या २-3 हजार वर्षात परदेशातून आलेले विविध प्रकार या भारतभूमीत रुजले आणि विस्तारले. लाखो प्रकारचं काव्य, लोकगीतं हा तर खऱ्या अर्थी आमचा अमीट ठेवा. शेतकऱ्यांची, पोटासाठी भटकणाऱ्या शेकडो जमातींची, साधुसंतांची, माजघरातून कधीच पाऊल बाहेर न टाकलेल्या स्त्रियांची असंख्य गाणी लोकांनी  आपल्या मनात जपली. पिढ्यानपिढ्या हा वारसा पुढे सोपवला. अनेक प्रांतातील विविध प्रकारचं संगीत, किती गीतकार, गायक, किती वादक, किती संगीतकार...! विचार करू गेलं की हे सगळं सगळं स्तिमित करून जातं.

कधी परक्या भूमीत वावरताना, जेंव्हा एखादा शेजारचा माणूस, “कभी कभी, मेरे दिलमें खयाल आता है..” असं काही गुणगुणू लागतो, तेंव्हा देश, धर्म, प्रांत,भाषा असे सगळे भेद दूर होऊन तो क्षणात तुमचा दोस्त बनतो. त्याला कारण फक्त आणि फक्त संगीत..! हे मी अनुभवलंय.

माणसाच्या जन्मापासून त्याच्या मृत्युपर्यंत प्रत्येक टप्प्यावर संगीत आपल्या आयुष्यात असतंच. कधी ते अंगाई गीत बनून आपल्याला जोजवतं तर कधी दुःखांच्या क्षणी मोरपीस बनून मनाला सुखावतं. लहानपणासून अनेक प्रकारचं संगीत कानावर पडत गेलं आणि गाण्याचं व्यसन लागलं ते न सुटण्यासाठीच. आठवायलाच गेलं तर, अगदी लहानपणी रेडिओवर कानी पडणारी अनेक गाणी, अनेक कार्यक्रम आठवतात. मुंबई आकाशवाणीवरील संतवाणी, आपली आवड, कामगार सभा, विविध भारतीवरील जयमाला, ऑल इंडिया रेडिओ उर्दू सर्विस, रेडिओ सिलोन वरील हमेशा जवा गीत (अभी तो मै जवान हूँ.. हे लताचं १९५१ मधील “अफसाना” सिनेमातलं सदाबहार गाणं त्याची signature tune” होतं. लताने जेंव्हा ते गायलं होतं तेंव्हा माझे वडील सुद्धा ९-१० वर्षाचे असतील, तरीही ते गाणं आमच्या पिढीपर्यंत पोचलं कारण त्याचा गोडवा.), असे कितीतरी कार्यक्रम हे तेंव्हा लोकांना रिझवायचे.


प्रत्येक कार्यक्रमाची “signature tune” सुद्धा लाखो लोकांच्या लक्षात असेल अजून..! कारण ती नुसती एक धून नव्हती तर सर्वांचं  तेंव्हाच आयुष्य त्याच्याशी जुळलेलं होतं. या रेडिओने आणि त्या गाण्यांनी ते दिवस सुखद केले.

आठवायला गेलं तर लहानपणीची सगळ्यात पहिली गाण्याची आठवण आहे ती “घनु वाजे घुणघुणा..वारा वाहे रुणझुणा..” ची. सकाळचे सहा- सव्वा सहा वाजलेले. हवेत मस्त गारठा. आईचं काही काम सुरु स्वैपाकघरात. रेडिओवर भक्तीगीते लागलेली. गोधडीत स्वतःला गुंडाळून मी अर्धवट झोपेत. मात्र हे गाणं लागताच झोप खाड्कन उडते. लताचा तो स्वर्गीय आवाज, ज्ञानदेवांचे शब्द, तो वाद्यमेळ या सगळ्या वातावरणाला अश्या काही प्रफुल्लित, उल्हासित करून टाकतो की संमोहित झाल्यासारखा मी कितीतरी वेळ ते गाणं आठवत...गुणगुणत राहतो..! त्यानंतर खऱ्या अर्थाने गाण्याची गोडी लागली.

रेडिओने खूप सोबत केली कॉलेज संपेपर्यंत. शाळेत वा कॉलेजात असतानाही रात्री उशिरापर्यंत जागून कधी अभ्यास केला नाही. ऑल इंडिया रेडिओवरील उर्दू सर्विस चे कार्यक्रम तेंव्हा रात्री ११/ ११.३० ला संपायचे. तोपर्यंत काय ते जागायचं. एकीकडे गणितं सोडवताना दुसरीकडे आशा- रफीचं “अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना...” लागलेलं असायचं.

लता, रफी, मुकेश, किशोर, आशा, हेमंत कुमार, मन्नाडे, तलत मेहमूद, गीता दत्त, शमशाद बेगम, महेंद्र कपूर पासून सुमन कल्याणपूर, मुबारक बेगम, हेमलता, येसुदास, मनहर, भूपेनदा असे त्या आमच्या आधीच्या जुन्या जमान्यातले सगळे तर जवळचे बनले होतेच पण त्यांच्यापेक्षा जुन्या काळातले पंकज मलिक (पिया मिलन को जाना..), सुरैय्या (ये कैसी अजब दास्ता हो गयी है..(संगीतकार सज्जाद- सिनेमा- रुस्तुब सोहराब) हेच गाणं आधी आठवतं), नूरजहा( आवाज दे कहा है.. आणि तिची इतर अविस्मरणीय गाणी) आणि अर्थातच सैगल (बालम आये बसो मोरे मनमे, बाबुल मोरा, गम दिये मुस्तकील..अशी अमर गाणी)  हे दिग्गजही ओळखीचे बनले.


त्या शाळा-कॉलेजच्या दिवसात आम्ही नुसते रेडिओवरील गाणी ऐकत नसू तर त्या गाण्याचे शब्द, गाण्यात वाजलेल्या विविध वाद्द्यांचे तुकडे (म्युझिक पीसेस), दोन कडव्यांच्या मधलं संगीत (इंटरल्युड म्युझिक), गाण्याचे गीतकार, संगीतकार, वादक त्या संबंधीच्या विविध कथा- दंतकथा असं सगळं समव्यसनी दोस्तांच्या चर्चेचा भाग असायचं. किती कहाण्या होत्या..!

आपके हसीन रुख पे आज नया नूर है..” या रफीने गायलेल्या अप्रतिम गाण्याची धून ओ.पी. नय्यर यांनी पियानोवर तयार केली. त्या स्वरांच्या धुंदीत त्यांना वाटलं की आत्ताच्या आत्ता हे त्या “बहारे फिर भी आयेगी” सिनेमा बनवणाऱ्या गुरुदत्त ला ऐकवावं. ओपी जेंव्हा त्याच्या घरी पोचले, आणि पाहतात तो...तेंव्हा गुरुदत्त जगातून निघून गेलेला होता.. त्यानं नुकतीच आत्महत्या केलेली होती..!

असे कितीतरी किस्से आहेत. शैलेन्द्र, हसरत जयपुरी, शकील बदायुनी, साहिर लुधियानवी, मजरूह, इंदीवर, राजेंद्र कृष्ण कैफी आजमी, असे दिग्गज प्रतिभाशाली कवी, तर संगीतकारांच्या पंक्तीत  एस-जे, नौशाद, अण्णा चितळकर (सी. रामचंद्र), सज्जाद हुसेन, खेमचंद प्रकाश, गुलाम मोहम्मद, एन. दत्ता, अनिल विश्वास, हुस्नलाल-भगतराम, रोशन, एस.डी. बर्मन, सलील चौधरी, ओ.पी.नय्यर, खय्याम, रवी, जयदेव, मदनमोहन, चित्रगुप्त, दत्ताराम, उषा खन्ना, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि पंचमदा अशी बहारदार मंडळी.

 
या सगळ्यांच्या कलाकारीतून निर्माण झालेल्या त्या अद्वितीय संगीताने त्या दिवसांना नुसतं सोनेरी बनवलं नाही तर “कान” तयार केला. (तरीही इथे मी फक्त हिंदी चित्रपट गीतांचाच संदर्भ देतोय, कारण मराठी भावगीतं, चित्रपट गीतं हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे!) चांगलं संगीत म्हणजे काय याची मुलभूत समीकरणं शिकवली.

कदाचित आयुष्यभर मी फक्त जुनी हिंदी गाणी, उत्तमोत्तम मराठी भावगीतं, १९९० नंतरच्या आजवरच्या नव्या सिनेमातील उत्तमोत्तम गाणी (मैने प्यार किया, कयामत से कयामत तक, डीडीएलजे, रोजा, बॉम्बे, रंगीला इ.) ऐकत राहिलो असतो. पण १९९२ मध्ये रत्नागिरीत एका सांस्कृतिक कार्यक्रमात “सूरत पियाकी छिन बिसराये..” हे वसंतराव देशपांडे यांचं नाट्यगीत व नंतर तराणा एका गायकाने म्हटला. ते ऐकलं आणि संगीताचं नवं दालन माझ्यासाठी खुलं झालं. तोवर शास्त्रीय संगीत हा प्रकार दुरून ऐकलेला. हे काहीतरी डोक्यावरून जाणारं असं इतरांप्रमाणे माझंही मत झालेलं.

मात्र त्या दिवसानंतर रागदारी संगीत, नाट्यसंगीत जरा अधिक बारकाईने ऐकायचा प्रयत्न करू लागलो. पुलंच्या पुस्तकातील कुमारजी, वसंतराव, मन्सूर यांच्यावरचे लेख वाचून गाण्यात खरं सौंदर्य कुठं व कसं ओळखावं ते शिकत गेलो. त्यांच्या गाण्याबरोबरच भीमसेनजी, प्रभाताई अत्रे, मालिनीबाई राजूरकर, वीणाताई सहस्रबुद्धे, किशोरीताई, गजाननबुवा जोशी, उस्ताद अब्दुल हलीम जाफरखां व उस्मान खां (सतार), रामनारायण (सारंगी), अली अकबर खां (सरोद), बिस्मिल्ला खां (सनई), सुप्रसिद्ध शिव-हरी, एन् राजम व पं.दातार (व्हायलीन), उस्ताद झाकीर हुसेन या सगळ्यांचं जे जे उत्तम सापडेल ते ऐकत गेलो. शेकडो कॅसेट्स एकेकाळी जमवल्या.
 
गुणीदास संमेलन, सवाई गंधर्व महोत्सवापासून कित्येक लहान-मोठ्या मैफिलीतून स्वरांचं ते अनुपम विश्व अनुभवले. कित्येक नवोदित गायक, विविध शहरातून तिथले स्थानिक नावाजलेले कलाकार ऐकले. संगीताच्या या दुनियेने अनेक मित्र मिळवून दिले. कित्येक थोरा-मोठ्यांच्या ओळखी झाल्या.

गमतीची गोष्ट म्हणजे दोन-चारदा गाणं, हार्मोनियम शिकायचे प्रयत्न करूनही पाहिले, पण नाही जमलं. (अर्थात त्यामुळेच हिंदुस्थानातील तमाम श्रोत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला..!)

मात्र या संगीतानं जणू आयुष्याचा एक कोपरा कायमचा व्यापून टाकलाय. आशेच्या, निराशेच्या, आनंदाच्या,  उद्विग्नतेच्या अनेक क्षणी निस्वार्थी सोबत केलीय. “पोटासाठी भटकत” दूरदूर कुठेही असताना निर्व्याज सुखद अनुभूती आणि आठवणी दिल्या आहेत. आजही जेंव्हा मला रायगडाच्या त्या “भवानी टोकावरून” पाहिलेला तो अविस्मरणीय सूर्योदय आठवतो तेंव्हा त्याचवेळी तिथं ऐकलेली “रैन का सपना..” ही “ललत”ची बंदिश कशी विसरता येईल?

मध्यप्रदेशातील भटकंती करून एका संध्याकाळी भेडाघाटला नर्मदेच्या घाटावर शांत बसलो होतो. संध्याकाळची वेळ. आकाशात ढग दाटून येत होते. तेंव्हा अचानक कानी पडलेलं “ तुम्हारी जुल्फ के साये में शाम कर लुंगा..” हे रफीचं गाणं काळजावर कायमचं कोरलं गेलंय ते कसं पुसायचं? एकदा परगावी असताना एका जिवलगाच्या अपघाती मृत्यूची खबर मिळाली, नेमकं तेंव्हा रस्त्यावरच्या हॉटेलात लताचं गाणं लागलं होतं...

जाना था हमसे दूर..बहाने बना लिये.. अब तुमने कितनी दूर.. ठिकाने बना लिये..”

त्याक्षणी भरून आलेले डोळे, तो दिवस, लताचा काळीज चिरत जाणारा स्वर..कायमचाच काळजात रुतून गेलाय..! आयुष्यातल्या शेवटच्या क्षणांपर्यंत “गाण्याची” सोबत अशीच राहावी हीच एक इच्छा आहे. कारण गाणं हे आमच्यासाठी “जीवन” बनलं आहे.
 
अभिषेकीबुवांच्या “त्या” अजरामर स्वरात सांगायचं तर..

व्यथा असो आनंद असू दे.. प्रकाश किंवा तिमिर असू दे..

वाट दिसो अथवा न दिसू दे.. गात पुढे मज जाणे..माझे जीवन गाणे...!

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

    (पुढचा लेख – गंमत भाषेची...)

1 comment: