marathi blog vishwa

Friday, 26 October 2018

राग समयचक्र-- एक अनोखी अनुभूती..!

🎼
राग समयचक्र. प्रतिज्ञा नाट्यरंग आणि नादब्रह्म समूह यांनी आयोजित केलेला एक आगळावेगळा राग महोत्सव. प्रहरानुसार रागांच्या सादरीकरणाची ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सात दिवस कोल्हापुरात चाललेली मैफल. एक महोत्सवच जणू.


नटभैरवनं सुरु झालेलं समयचक्र ललितपंचम- भैरवीनं सुफळ संपूर्ण झालं. सर्व गायक व वादक कलावंतानं ज्या आपुलकीनं अन् निष्ठेनं आपली कला सादर केली त्यांना सविनय प्रणाम.
सगळ्यांच्या उत्तम रागमांडणीची ही अनुभूती घेताना मलाच खूप समृध्द झाल्यासारखे वाटले. रागाचा स्वभाव, समयचक्रानुसार निर्माण होणारी स्पंदनं, कोणतीही दिखाऊगिरी न करता केलेली सुबक देखणी अशी स्वरांची सजावट मनभर पसरत मनात खोलवर रुजून गेली.
मी जे काही ऐकले त्यातील काही राग तर खास लक्षात राहिलेत.उदा. विद्याताईंचा गावती, ब्रिंदावनी, पूर्वी, गायत्रीताईंचा मधुवंती, पूरिया, दरबारी, सोहनी हे राग खास लक्षात राहिलेत. सौरभ देशपांडे यांनी गायलेला कोमल धैवत बिभासचा तराणा, त्याची ती शांत उदात्त मांडणी लोभस होती. निनाद देव यांनी माझ्या प्रेमळ हट्टापायी सादर केलेला खोकर आणि भारदस्त असा शांतगंभीर ललत विसरताच येणार नाही.
मधुवंतीताईंनी सादर केलेला मारवा, मुलतानी, मालकंस, बसंतबहार मनाशी खूप जपून ठेवावेत असेच! त्यांचं संयमित गायन आणि रागांना जणू लहान बाळाप्रमाणे लडिवाळ हाताळणं खूप दिवस लक्षात राहील.
हल्ली कोण शास्त्रीय संगीत सलग ऐकतं हा प्रवाद कोल्हापुरी रसिकांनी खोटा ठरवला.
अशा कार्यक्रमांना हजारो माणसांनी यावं ही अपेक्षाच नसते, जी मंडळी आली ती सतत येत राहिली, शेवटच्या दिवशी रात्रभर जागून ऐकत राहिली याचं सुखद समाधान वाटतंय. संपूर्ण कार्यक्रमात कुठंही लोकानुनय नव्हता, सेमाक्लासिकल नव्हतं, गिमिक्स नव्हती, फक्त शुध्द रागसंगीत ऐकवलं जात असताना त्यांचं असं सोबत असणं फार अानंदायी आहे!

संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व कलावंतांच्या निकट जाण्याची संधी मिळाली हा मला माझा जणू बहुमानच वाटतो. त्यांच्यापुढे माझी समझ म्हणजे जणू ऐरावतापुढं शामभट्टाची तट्टाणी... तरीही सर्वांनी माझ्या लहानसहान विनंतीचा मान राखत काही सादरीकरण केले हे त्यांचं मोठेपण.


प्रशांत जोशी नेमकं हे सगळं कसं जुळवून आणतो याबाबत माझ्या मनात संशयच आहे. बहुदा अल्लाऊद्दिनप्रमाणे त्याला एखादा जादूचा दिवा सापडला असावा. कुणी विचार मांडायचा अवकाश, हा थेट कार्यक्रमच मंचावर आणून मोकळा होतो! सगळं नियोजनही नेटकं असतं, वर स्वत: मिरवायला मात्र कुठेच पुढे येत नाही. त्याच्या प्रमाणिक धडपडीसाठी मग रमेशदादा सुतार, मंदार भणगे, रोहन, फोटोग्राफर नाना आदि सारे धावपळ करत रहातात. कार्यक्रम संपेपर्यंत कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता कष्ट करत रहातात...!
'रागसमयचक्र' च्या निमित्तानं खूप दिवसानंतर आठवडाभर रागसंगीतात डुंबून राहिलो. ऐकत राहिलो, चिंतन करत राहिलो, निवेदनाची जबाबदारी पार पाडत बोलत राहिलो. कित्येक वर्षांनंतर पुन्हा लाभलेला हा अमृतयोग मनाच्या तळाशी अलवारपणे जपून ठेवायचा अशीच माझी भावना आहे.
शरीरमनाला सुखावणा-या अशा मैफली ऐकत रहाताना सुख म्हणजे नक्की काय हे उमगू लागतं अन् जगी सर्व सुखी असा मीच आहे ही भावना मग अधिकच गहिरी होत जाते. जगण्याबद्दलची असोशी वाढवत रहाते...!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर.(9833299791) 🌿
🎼

No comments:

Post a Comment