marathi blog vishwa

Friday 26 October 2018

“जयपुरी” स्वरांची अद्भुत अनुभूती देणारं आनंद पर्व...

आनंद पर्व. जयपूर-अत्रौली घराण्याच्या सध्याच्या बहुतांश गायक- गायकांनी घराण्याचे राग, बंदिशी, एकूण जयपूर गायकीचा आकृतिबंध याविषयी गायन आणि चर्चेच्या माध्यमातून साधलेला मैत्रीपूर्ण संवाद. एका घराण्याची गायकी समोर ठेवत त्याविषयी सर्वांनी अत्यंत जिव्हाळ्याच्या वातावरणात साधलेला असा संवाद आजवर संपूर्ण देशात बहुदा घडलाच नव्हता. त्यातही आपल्या मोठेपणाची, कीर्तीची सारी बिरुदे बाजूला ठेवत सर्व दिग्गजांनी केवळ शिष्यभावाने दिलेला मनमोकळा सहयोग हे या महोत्सवाचे वेगळेपण मानायला हवे..! जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ गायक कै. आनंद लिमयेबुवा यांच्या २५ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत त्यांचे शिष्य सुधीर पोटे यांनी या आगळ्यावेगळ्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणले. त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. या महोत्सवाविषयी एक संगीतप्रेमी म्हणून काय वाटते याचं हे शब्दचित्र...

१७ आणि १८ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील गडकरी हॉलचा परिसर शास्त्रीय संगीतप्रेमी मंडळींनी सकाळपासून भरून गेला होता. पं.दिनकर पणशीकर, श्रुती सडोलीकर, अश्विनी भिडे-देशपांडे, अरुण द्रविड, उल्हास कशाळकर, मृत्युंजय अंगडी, शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर, मधुवंती देव, अलका देव- मारुलकर, प्रतिमा टिळक, मिलिंद मालशे, सुलभा पिशवीकर आदि दिग्गजांसोबत कोल्हापुरातील अरुण कुलकर्णी, विनोद डिग्रजकर, सुखदा काणे, भारती वैशंपायन यांच्यासह स्वतः सुधीर पोटे ज्यावेळी मंडपात प्रवेश करते झाले, तेंव्हा सर्व रसिकानी- विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना मानवंदना दिली आणि इथूनच या कार्यक्रमाचे वेगळेपण सर्वांसमोर येऊ लागले.


सगळेजण आत हॉलमध्ये गेले आणि जणू जागेवर खिळूनच राहिले कारण नेपथ्य. ज्ञानेश चिरमुले यांच्या रसिकमनाने, गुजरातमधील चम्पानेरच्या वास्तूच्या फोटोंचा वापर करत सभागृहाला जणू प्राचीन काळात नेऊन ठेवले होते.

जयपूर-अत्रौली घराणेही असेच प्राचीन. गेली अनेक शतके अनेक बुद्धीवन्तानी साकारलेली, वेगळ्या आकृतीबंधात बांधलेली ही गायली. प्रथमच ऐकणाऱ्याला चमत्कृतीपूर्ण गायकीने गुंग करून सोडणारी तर जाणत्या रसिकांना नागमोडी लयीच्या रस्त्याने स्वरविश्वाची अवर्णनीय अनुभूती देणारी. घराण्याचे अध्वर्यू अल्लादियाखाँसाहेब कोल्हापुरात आले आणि राजर्षी शाहू महाराजांच्या गुणग्राहक वृत्तीमुळे इथलेच झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र भुर्जी खां, मंजीखां, नातू अझीझुद्दीनखां उर्फ बाबा, केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, लक्ष्मीबाई जाधव, धोंडूताई कुलकर्णी, निवृत्तीबुवा सरनाईक, गोविंदबुवा शाळीग्राम, गजाननबुवा जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर आणि पं. लिमयेबुवा असे अनेक शिष्य घडले. त्यांनी नवे शिष्य घडवले. या सर्वांची सध्याची शिष्यमंडळी संपूर्ण गायकी उकलून सांगणार होती, घराण्याची ख्याती असलेले कित्येक अनवट राग उलगडून दाखवणार होती,  त्यावर सर्वजण चर्चा करणार होते... अत्यंत दुर्लभ अशी ही जणू पर्वणीच.


प्रत्येकानं एक खास राग निवडावा, त्यातील स्वतः शिकलेली बंदिश मांडावी, त्यानंतर त्या रागाचे स्वतः शिकलेलं, स्वतःला समजलेलं स्वरूप उलगडून दाखवावं, इतरांनी त्याच पद्धतीने हा राग आपण मांडतो की काही अन्य प्रकार आपण शिकलोय हे सांगावे. मग त्यातील सौंदर्यस्थळे गाऊन दाखवावीत अशा पद्धतीने हे सत्र सुरु झाले.

खट तोडी, बिहारी, अडाणा बहार, असे खास जयपुरी स्पेशालिटी असलेले राग सादर होऊ लागले. खूप कमी वेळा गायले जाणारे राग, त्यावरील चर्चा ऐकताना किती समृद्ध व्हायला होत होते..! चर्चा सुरु होती म्हणजे कशी त्याचा एक नमुनाच सांगतो ना तुम्हाला...

तर्ज सोहनी नावाचा एक राग ज्येष्ठ गायक अरुण कुलकर्णी यांनी सादर केला. ते म्हणाले की निवृत्तीबुवांकडून हे शिकलोय मी. शुद्ध मध्यम हा सोहनीत वर्ज्य असलेला स्वर लावून हा राग सादर करावा असं मला शिकवलं आहे. त्यांनी गायलेली बंदिश होती, “जब चढ्यो हनुमंत..”.  त्यानंतर मग पणशीकरबुवा म्हणाले, अहो हीच बंदिश आम्हाला आमच्या गुरुजींनी “ हिंडोल पंचम” रागात शिकवली आहे. हा रागही सोहनीसारखाच उत्तरांगप्रधान. पंचम राग म्हणजे पाच स्वरांचा राग.. तो हिंडोल पंचम, ललितपंचम अशा प्रकारे जोडरागात गायला जातो हे सर्वाना माहिती आहेच. तर प्रतिमा टिळक आणि श्रुती सडोलीकर म्हणाल्या की हाच राग त्यांना “दोन माध्यमांची सोहनी” या नावाने शिकवला आहे...!


त्यानंतर मृत्युंजय अंगडी यांनी मंदार आणि बिलावली नावाचे दोन अनवट राग सादर केले. तर सुखदा काणे यांनी कुन्दावती राग सादर करण्यापूर्वी त्याची माहिती दिली. हा राग लिमयेबुवानी रचलेला. सुखदाताई यांची आई कुंदा ही लिमयेबुवांची पहिली शिष्या. तिचं अकाली निधन झाल्यानंतर बुवांनी तिची आठवण म्हणून या रागाची निर्मिती केली. गौडमल्हार आणि अरवी  रागाचं मिश्रण करून हा राग निर्माण झालाय.

सध्या अमेरिकेत राहणारे विश्वास शिरगावकर यांनी नट-नारायण आणि अडम्बरी केदार हे राग सादर केले. तर विनोद डिग्रजकर यांनी विहंग हा अनवट राग सादर केला. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी गोधनी हा राग मांडला. रायसा कानडा, बसंती केदार, बसंती कानडा, संपूर्ण मालकंस, सावनी नट, पूर्वी, जयंत कानडा हे जयपूर ची खासियत असलेले राग मांडले गेले.

जरी हे राग घराण्याची खासियत असले तरी प्रत्येक गुरु परंपरेने त्यात काही न काही सूक्ष्म बदल होत गेले होते. वेगवेगळ्या शाखांतून रागाच्या चलनात कसा फरक होतो, कुठे दोन्ही निषाद लागतात का, कुठे शुद्ध धैवत ऐवजी आम्हाला गुरुनी कोमल धैवतचा अल्पसा वापर कसा करायला सांगितलं आहे... आदि चर्चा करताना सर्व दिग्गज गायकही कोणतेही पूर्वग्रह न ठेवता, कोणताही अभिनिवेष न दाखवता नोटस् काढत होते, एखादा वेगळा विचार आढळल्यास लगेच टिपून त्यावर विचार करत होते..!


शिष्यमंडळी आणि रसिक श्रोत्यांसाठी तर जणू हे जयपूर गायकीचं विश्वरूप दर्शनच होतं..! एक काळ असा होता की आपण कोणता राग सादर केलाय याविषयी प्रत्यक्ष अल्लादियाखाँ साहेब यांनीही वेगळीवेगळी नावं सांगितली होती असं कित्येकांनी तेंव्हा लिहून ठेवलेलं. तत्कालीन घराणी, त्यांची काटेकोर तटबंदी यामुळे जयपूर घराण्याचे राग ही काही गुढरम्य गोष्ट आहे असं अनेकांना वाटे. काळाच्या ओघात या तटबंद्या आता तितक्या काटेरी उरल्या नाहीत. उलट विविध घराण्याच्या  गायकीतील सौंदर्यस्थळे अनेकांना मोहवत आहेत आणि नवनवीन शिकण्यासाठी इतर घराण्यांचे गायक “जयपूर” च्या लयप्रधान गायकीकडे आकृष्ट झाले आहेत.

अशा योग्य वेळी आपल्याच घराण्याचे विविध राग एकत्रितपणे ऐकणे, त्यावर चर्चा करत, विविध प्रवाहांना सामावून घेत नवे प्रवाह घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही घटना ऐतिहासिक मानायला हवी. सुमारे चार-साडेचार हजार वर्षांपासून हिंदुस्तानी संगीत परंपरा असेच विविध प्रवाह सामावून घेत या टप्प्यावर येऊन पोचली पण अस्तंगत झाली नाही. जगभरातील सांगीतिक इतिहासात म्हणूनच हिंदुस्तानी संगीत आपले वेगळेपण राखून दशांगुळे उरली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शतकानुशतके होत गेलेल्या “आनंद पर्व” सारख्या चिंतनात्मक कृती. आपल्या जन्मात अशा एखाद्या कृतीचा आनंद घेत त्याचा साक्षीदार व्हायचा योग लाभणे ही म्हणूनच दुर्लभ आणि अविस्मरणीय गोष्ट होते. जयपूर घराण्यातील जाणत्यांना हे असं करावंसं वाटणं हेच त्यांच्या वेगळ्या विचारक्षमतेचे द्योतक मानायला हवे.

कार्यक्रमातील चर्चा, राग मांडणी सोबतच उत्तम अशी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. तसेच एकेकाळी गोविंदराव टेंबे यांनी लिहिलेल्या “अल्लादियाखाँसाहेब” यांचे चरित्राची पुनरावृत्ती प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून सांगतेपर्यंत प्रत्येक गोष्ट ही विशिष्ट दर्जा ठेऊन सादर करण्यात संयोजक नक्कीच यशस्वी झाले असं कौतुकाने म्हणावे लागेल.

याचप्रकारे आजच्या काळात घराण्यांच्या भिंती ढासळत असताना, यापुढील काळात सर्वच घराण्याच्या गायकीबाबत असं चिंतनात्मक संमेलन करता येईल. इतकंच नव्हे तर सर्व घराण्यांमधून नवी सर्वसमावेशक गायकी निर्माण होऊ शकते का, ती अधिक सखोल व्हावी यासाठी काय करता येईल यासाठीही गायन, चिंतन, नवे विचार मांडणं शक्य होऊ शकेल. माझ्यासारखा सामान्य संगीतरसिक मग नक्कीच सुखिया होऊन जाईल..!

  • सुधांशु नाईक, कोल्हापूर.(९८३३२९९७९१)
  • (काही क्षणचित्रे अनिलदा नाईक यांच्या सौजन्याने..)

 

9 comments:

  1. खुपच सुंदर लेख भाग्यवान ज्यांना ह्या मैफिलीचा लाभ मिळाला

    ReplyDelete
  2. मा.सुधांशू जी, हे अप्रतिम शब्दांकन आहे, पण, यासोबतच ऑडीओ-व्हिडिओ माध्यमात हा कार्यक्रम अनुभवता असता तर फारच लाभदायी ठरलं असतं.. !

    ReplyDelete
  3. मा.सुधांशू जी, हे अप्रतिम शब्दांकन आहे, पण, यासोबतच ऑडीओ-व्हिडिओ माध्यमात हा कार्यक्रम अनुभवता असता तर फारच लाभदायी ठरलं असतं.. !

    ReplyDelete
  4. एका अतिशय महत्वाच्या उपक्रमाचा यथायोग्य परामर्ष आपण घेतला आहे. अभिनंदन व आभारही !

    ReplyDelete
  5. चांगला कार्यक्रम मला ऐकता आला नाही याची खंत आहे. ब्लॉगपोस्ट बद्दल धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. हो सुहासजी, तुमच्यासारख्या विचक्षण वादक-श्रोत्यानं हा कार्यक्रम अनुभवायला हवाच होता...!

      Delete
  6. अतिशय सुंदर रिपोर्ताज

    ReplyDelete