marathi blog vishwa

Wednesday 30 October 2019

उर्मट वाटणारा हळवा बुध्दिमंत

माणसं. भेटत असतात आपल्याला सर्वत्र. भली, बुरी, विक्षिप्त, साधीभोळी अशा सगळ्या प्रकारची. चांगली, वाईट  किंवा मिश्र गुणांची. गुणांसोबत अवगुणांची जोड असलेली. कशीही असली तरी मनावर एक चित्र कायमचं उमटवून जातात. ते त्यांचं चित्र असतं. त्यातले रंग खास त्यांचं व्यक्तित्व घेऊन आलेले. आजवर भेटलेल्या काही माणसांच्या गोष्टी सांगणारी ही माझी लेखमाला... 

त्यातील पहिला लेख  एका स्नेह्यांवरचा....

उर्मट वाटणारा हळवा बुध्दिमंत

चिपळूण मधून निघणारं दै. सागर हे वृत्तपत्र कोकणात बहुतेक ठिकाणी सर्वांना माहिती असलेलं. नाना जोशी अष्टपैलू आणि अष्टावधानी असं गुणवंत व्यक्तीमत्व. १९६० च्या दशकात त्यांनी हे वृत्तपत्र सुरु केलं. तिथं दिवाडकर काम करायचे. भालचंद्र दिवाडकर हे त्यांचं नाव. माझ्यापेक्षा खूप मोठे. वयाने, ज्ञानाने, अनुभवाने, वाचनाने आणि लेखनानेही. एक दोन नव्हे तब्बल ४५ वर्षे त्यांनी एकाच दैनिकात काम केले हीही आगळीवेगळी गोष्ट. “ मला लिहायला खूप आवडते... मी सागर साठी लिहू का” असं विचारत ते ४५ वर्षांपूर्वी सागर मध्ये आले आणि तिथेच रमले. मुख्य संपादक बनले. माझ्यासारख्या अनेक नवोदितांना लिहायला संधी देऊ लागले. खरं म्हणजे सागर च्या ऑफिसात जाणारा प्रत्येक जण तिथे दिवाडकर बसलेत असं दिसताच एकदम गंभीर होत असे. कारण ते खाड्कन कधी काय बोलतील याची शाश्वती नसे. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ते समोरच्या अत्यंत तुसडेपणाने जागेवर गप्प करायचे. कुणी नवखा असेल तर “ कोण हा उर्मट, तुसडा, माणूसघाणा माणूस” असं वाटायचं त्याला.

माझी त्यांची भेट ही १९९७-९८ च्या सुमारास झालेली. चिपळूणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमात मी आपली नोकरी सांभाळून लुडबुड करायचो. त्यातूनच एकदा “दै. सागर” च्या ऑफिसात दिवाडकर भेटले. तिथल्या एका स्नेह्यानं मला लेखमाला लिहिण्याबाबत विचारलेलं. मात्र दिवाडकराना ते आवडलं पाहिजे तरच छापून येईल. त्यांनी “छापतो” असं सांगितलं तरीही ते छापून येईलच अशी आशा बाळगायची मात्र नाही... इत्यादि इत्यादि बरंच काही सांगितलेलं.  

मी गेलो. थेट त्यांना भेटलो. 
“ सर, नमस्कार. लेखमाला लिहायची इच्छा आहे...”
“ कशावर लिहिणार तुम्ही...राजकारण, कोकणच्या समस्या वगैरे दळण दळणार असाल तर नका लिहू..”
“ नाही...मी ते नाही लिहिणार. मी संगीतावर, संगीतातली, इतिहासातली आणि आसपास भेटलेली माणसे यांच्यावर लिहायचं ठरवलंय. निसर्गावर, विविध अप्रकाशित निसर्गरम्य ठिकाणांवर लिहायचं म्हणतोय..”
“ बरं.. परवा पहिला लेख आणून द्या. बरा वाटला तर छापू. तुमच्या लेखात मला वाटलं तर हवी तेवढी काट-छाट करू शकतो मी. तसंच जर आवडला नाही तर फेकून देणार. परत परत विचारायला यायचं नाही.. कधी छापणार हो म्हणत...”
“ ठीकाय सर...देतो तुम्हाला लेख.. तुम्हाला आवडलं तर छापा..”
दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी गेलो. त्या दरम्यान महमद रफीसाहेबांची पुण्यतिथी होती. मग “ तू काही आसपास है दोस्त” असा लेख त्यांच्यावर लिहिलेला. हा बहुदा आपला पहिला आणि शेवटचा लेख--- सागर मधला... असं समजून त्यांना गेलो.
“ सर लेख आणलाय.”
“ तिथं त्या फाईल मध्ये ठेवत जा. जरा वेळानं पाहतो.... जा तुम्ही...”
२ दिवसांनी आलेल्या दै. सागर च्या  “ रसिक” पुरवणीत तो लेख जसाच्या तसा छापून आला होता...! त्या लेखमालेला “प्राजक्ताची फुले” असं नाव द्यावे ही माझी विनंतीही मंजूर केलेली त्यांनी.  दर आठवड्याला ही लेखमाला छापली जाईल अशी नोंद लेखासोबत दिसत होती. 

२-३ दिवसानंतर पुढचा लेख घेऊन गेलो. तो एका सुंदर पण कमी गर्दीच्या पर्यटन स्थळाबाबत होता. 
“ लेख तिथं फाईल मध्ये ठेवत जा. मी माझ्या सवडीनं वाचत जाईन. मी नसलो तरी लेख तिथंच ठेवत जा. रफीवर लिहिलत परवा तुम्ही... रफीने गायलेलं बहादुरशाह जफरचं गाणं ऐकलंय का कधी..”
“ हो.. लाल किला सिनेमातलं ना.. न किसीकी आंख का नूर हू... संगीतकार एस. एन. त्रिपाठी होते.....”
“ अरे व्वा...” इतकंच म्हणताना त्यांच्या नजरेत झालेला बदल मीही टिपला.

तिथून पुढे मग मी लिहित गेलो. कित्येकदा नाना देखील आवर्जून बोलावून घ्यायचे. गप्पा मारत बसायचे. एकदा एक लघुकथा लिहिली. नेहमीप्रमाणे संध्याकाळी जाऊन फाईल मध्ये ठेऊन आलो. दुसऱ्या दिवशी घरी फोन. 
“जरा लगेच येऊन जा भेटायला..” 
मला वाटलं काहीतरी चुकलं. जरा घाबरत घाबरतच गेलो. दिवाडकर निवांत खुर्चीत रेलून बसलेले.
समोर माझी कथा पडलेली.
“ हा माणूस पाहिलाय का तुम्ही.. ज्यावर कथा लिहिलीये.” 
“ नाही हो.. असा माणूस मी पहिला नाहीये. मात्र विविध ऐकलेल्या गोष्टी, काही पाहिलेली माणसे यांचा आधार आहे त्याला. प्रसंग काही प्रमाणात खरेच आहेत.”
“ रडवलं तुम्ही आज मला. कित्येक वर्षानंतर असं भावोत्कट, तरल काही भिडलं मनाला.. लिहित राहा तुम्ही. तुमच्यामध्ये एक अत्यंत संवेदनशील माणूस दडलाय... त्याला मारू नका. जग खूप क्रूर आहे हो. तुम्ही लहान आहात खूप. खूप सोसायचंय तुम्हाला अजून... पण तरीही मनातलं हे हळवेपण जपा. चला आज तुम्हाला माझ्यातर्फे चहा..”
“ thank you सर...” मी म्हटलं.. 
लगेच खाड्कन म्हणाले.. “ ते सर वगैरे म्हणू नका हो.. नुसतं दिवाडकर म्हणा..”
त्यांच्या वयाचा मान राखत मग मी त्यांना “दिवाडकर काका” म्हणू लागलो.
आम्ही दोघं जवळच्या एका टपरीवर चहा प्यायला गेलो. पत्रकाराच्या हुषारीने ते गप्पा मारत अलगद माझ्याकडून माझी माहिती काढून घेत होते. मी काय करतो, काय वाचतो, काय ऐकतो हे सारं सारं...
तिथून मग आमच्यात एक वेगळाच दोस्ताना निर्माण झाला. 


-----
एकदा काहीतरी निमित्ताने घरी बोलावलेलं त्यांना. जेवायला आलेले. मोजकं जेवले.
“ अहो मला गावात सगळे टाकाऊ माणूस मानतात. माझ्या नादाला कोण फारसं लागतं नाही. मलाही ते बरं वाटतं. त्यामुळे लोक आपला वेळ खात नाहीत. निवांत लिहायला, वाचायला खूप वेळ मिळतो त्यामुळे. नाहीतर लोक उगीच वेळ घालवत बसतात आपला. वेळकाढू गप्पा मारत. त्यांना फक्त टाइमपास करायचा असतो...”
खरंच होतं ते. दिवाडकर कुणासोबत भरपूर वेळ गप्पा मारत बसलेत असं दृश्य दुर्मिळच होतं. एकदा सहजच कवी ग्रेस यांचा विषय निघाला.
ताड्कन उठलेच ते. मलाही बळजबरीनं उठायला लावलं.
“ चला.. पट्कन.. गाडीवर बसा.” त्यांनी एम-एटी सुरु केली. कुठे जातोय काही कळेनाच.
गावाबाहेर दूर डोंगराच्या कुशीत बांधलेल्या एका नव्या घरी पोचलो..
“समोर पहा... काय नाव घराचं...”
मी पाहिलं... “अरे व्वा.. मितवा.. ग्रेस च्या कविता संग्रहाचं हे नाव..!”
ते आनंदले. म्हणाले.. “ या.. हे माझं घर. आता तुमचंही घर. इथं समग्र ग्रेस आहे. तुम्हाला कधीही काही वाचावं वाटलं तर हक्कानं या. बिनधास्त वाचा.”
मग त्यांनी पत्नीसोबत, लेकीसोबत ओळख करून दिली. चहा पीत आम्ही सगळे गप्पा मारत बसलो. काकू ही म्हणाल्या, कितीतरी दिवसात कुणी आलंच नव्हतं घरी. तुम्ही आलात, आपण सगळे गप्पा मारत बसलोय... छान वाटतंय...!
ज्या माणसाला माझ्या घरासकट गावातली अनेक घरं तुसडा माणूस समजत होती तो माणूस मला आपल्या घरी घेऊन आला होता..! हे घर तुमचंही असं सांगत होता..!
मी कित्येकदा त्यांना म्हटलं, काका अहो मला नावाने हाक मारा हो. अहो जाहो नका करू. पण कधीही ऐकल नाही त्यांनी.
त्या दिवशी कवी ग्रेस, कुमारजी, शिवाजी महाराज, सावरकर आदि माझ्या विविध आवडत्या विषयावर ते माझ्यासोबत मनसोक्त बोलत होते. 
तसं पाहायला गेलं तर दिवाडकर जुन्यातले कट्टर मार्क्सवादी. अनेक गोष्टीवर कठोर प्रहार करणारे. ज्या प्रकल्पात मी काम करत होतो त्या एन्रोन प्रकल्पातील विविध समस्या, त्यामुळे परिसराची झालेली हानी यावर त्यांनी पुस्तक ही लिहिलेलं. मात्र त्यांची कठोर साम्यवादी विचारसरणी आयुष्य अनुभवताना मध्ये आली नाही.
संगीत, साहित्य, निसर्ग, माणसे हे सगळं ते उत्कटतेने अनुभवत राहिले. त्यांचं व्यक्त होणं कदाचित वेगळंच होतं, कित्येकांना न भावणारं होतं मात्र त्यांच्या प्रखर बुद्धीमत्तेविषयी कुणालाच शंका नव्हती.
एका दिवाळीत घरी एक पाकीट आले. त्यात दिवाळी ग्रीटिंग होतं. मला कुमारजी आवडतात हे लक्षात ठेऊन त्यांनी लेकीकडून छान चित्र काढून घेतलं होतं. 
त्याला शीर्षक होतं कुमारजींच्या धनबसंती रागातील बंदिशीचा मुखडा..” दीप की ज्योत जर रे..” आजही ती बंदिश कधी ऐकली की दिवाडकर, त्यांची लेक आणि ते ग्रीटिंग आठवत मला..!
----
पुढे मी चिपळूण सोडून कोल्हापुरात दाखल झालो दै. तरुण भारत ला. गावी गेलो की न चुकता भेटायला जात होतो. एकदा गेलो तेंव्हा कळलंच की त्यांच्या पत्नीला जीवघेणा आजार झालाय. दिवाडकर प्रथमच हळवे झालेले जाणवले.
“ ती बायको आहे माझी. आज न उद्या मारणार हे ठाऊक आहे. मी ते स्वीकारलं आहे. मात्र तिच्या वेदना पाहवत नाहीत हो... समोर असून काही करू शकत नाही मी...” असं ते थंड आवाजात जेंव्हा सांगत होते तेंव्हा माझेच डोळे भरून आले.
काही महिन्यांनी काकू गेल्याच. मग एकुलत्या एका लेकीला जपत ते एकुटवाणे जगत राहिले. दिवसरात्र कामात स्वतःला बुडवून घेत राहिले. सकाळपासून रात्री उशिरा पर्यंत वृत्तपत्राचे काम करताना विविध पुस्तकं लिहित राहिले.
आणि पुन्हा नियतीने अजून एक आघात केला. उत्तम संस्कार लाभलेली, हुषार, कलाकार अशा त्यांच्या लेकीनं भर दिवसा घरी गळफास लाऊन आत्महत्या केली. 
घरी आल्यावर आपल्या लाडक्या लेकीला तसं पाहताना त्या बापाला काय वाटलं असेल याची कल्पनाच करवत नाही.
त्यानंतर काही महिन्यांनी मी चिपळूण ला गेलेलो. मुद्दाम त्यांना भेटायला गेलो.
“ काय सांगू आणि काय बोलू हो... माझं अवघं कुटुंबच संपलं. भुतासारखा एकाकी उरलोय..” विचित्र खरखरत्या स्वरात ते म्हणाले आणि गदगदून रडू लागले. 
मलाही सुचेना की आपण यांचं सांत्वन कसं करावं...
जरावेळानं म्हणाले, “ किती गुणी होती लेक माझी. सगळ्या चांगल्या गोष्टी तिच्यासाठी हजर केल्या होत्या. लोक मला घाबरायचे. ती आजवर कधी घाबरली नव्हती. सगळ्या विषयावर मुक्त बोलायची माझ्याशी. त्या दिवशी तिला नेमकं कसला मानसिक त्रास झाला असेल, असं कोणतं दडपण आले असेल तिच्या मनावर की काही वेळापूर्वी फोनवर बोलतानाही मला तिनं हे असं काही करणार याचा थांगपत्ता लागू दिला नाही.. हरलो मी... माझ्या लेकीच्या आयुष्यात असं काय दुःख होतं की जे तिला माझ्याशी शेयर करावं वाटलं नाही. त्या दुःखापुढे तिनं हार मानून मृत्यू जवळ केला.. काय होतं ते मला कधीच कळणार नाही...”
त्यांच्यातल्या बापाचं ते आक्रंदन पाहताना मी अक्षरशः थिजून गेलो.
तिथून पुढे ते अधिकाधिक कामात गुंतून गेले. दै. सागर ला विविध अग्रलेख आणि “पडछाया” हे त्यांचं सदर यातून त्यांनी हजारो विषय हाताळले. कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची हातोटी जबरदस्त अशीच होती. त्यांच्यातला साक्षेपी संपादक सदैव जागृत असायचा. त्यांच्यातला रसिक सदैव प्रत्येक गोष्ट टिपायला उत्सुक असायचा. अनेक गरजू लोकांना कसलाही गवगवा न करता मदत करणारा तो एक हळवा सहृदयी माणूस होता आणि त्याचबरोबर आपल्या भोवती उर्मटपणाचे काटेरी कुंपण स्वतःच निर्माण केलेला तो एक बुद्धिमंत होता..! 
एकदिवस कळाले की त्यानाही मोठ्या आजाराने गाठले आहे. आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांच्या मृत्यूचीही बातमी शेवटी आलीच. 
एकदा एका नातेवाईकाच्या मृत्युनं मी हळवा झालेलो तेंव्हा ते शांतपणे समजून घालत म्हणाले होते.. “जन्मलेला प्रत्येक जीव कधीतरी मरणार असतोच. मात्र जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात त्याचं आयुष्य कसं वळणे घेत जातं हे खरंच आपल्याला कळत नाही. आणि कळलंच तरी आपणही त्यासाठी खूप काही करू शकतो असंही नाही. आपण त्याची सेवा, सुश्रुषा वगैरे जे काही करतो ते केवळ आपल्या समाधानासाठी करतो. तुम्ही जमेल ते केलं त्यांच्यासाठी त्यातच समाधान माना... कुणाच्याही जन्मानं आनंदी होऊ नका.. कुणाच्याही मृत्यूनं खंतावू नका. रामदास म्हणतात तसा सदैव मृत्यूच आपल्या सोबत चालत असतो... आपल्याला तो दिसत नाही इतकंच.”
जिवलगांचे मृत्यू सोसताना त्यांना काय वाटलं असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही... आणि त्यांच्या मृत्यूनंतर एक अध्याय संपला यापेक्षा जास्त काही आता लिहिवत नाही..!
सुधांशु नाईक, कोल्हापूर( ९८३३२९९७९१ )

No comments:

Post a Comment