marathi blog vishwa

Saturday, 7 December 2019

एक होती आजी...


माझ्या लहानपणाच्या आठवणीतच एक चिमुकलं खेडेगाव आहे. आजूबाजूच्या विस्तीर्ण शेताच्या मध्यावर तिथे मातीचं एक घर. बाजूला लालबुंद फुललेला गुलमोहर अन समोर चिंचेचे गर्द सावली देणारं एक भलं थोरलं झाड. झाडाच्या पायाशी एक बैलजोडी बांधलेली, कुणी एखादं गडीमाणूस काही बाही काम करत तिथेच... अन त्या घराच्या कट्ट्यावर त्या चिंचेसारखीच मायेची गर्द सावली अशी बसलेली माझी आजी ....
आम्हाला दुरून येताना पाहूनच ती आनंदाने हरखून जायची. तिच्या पायाशीच बसलेला ‘खंड्या’ शेपटी हालवत आमच्याकडे येईपर्यंत ती आत जाऊन चुलीवर चहाच आधण ठेवायची. ‘आलात, बाबानो या.. रे... या.. हात-पाय धुवून घ्या, मागनं तुम्हाला चहा देते.’
तिच्या त्या मायभरल्या शब्दांनी सगळा शीण पळून जायचा. चहाबरोबरच एखादा चुरमुऱ्याचा किंवा मुगाचा लाडू हातावर मिळायचा...
बालपण ही मोठी मौजेची गोष्ट आहे नं ! लहान असताना आपल्याला लवकर मोठ होण्याची घाई झालेली असते अन मोठेपणी मात्र बालपणातल्या अनेक आठवणी मनात पिंगा घालत असतात, अस्वस्थ करतात तर कधी हेलावून सोडतात...


( हे प्रतीकात्मक क्षणचित्र इंटरनेटवर मिळालेलं) 
पूर्वी मुंबई इलाख्यात असलेलं पण नंतर कर्नाटकात गेलेल्या चिकोडीजवळचं हे चिंचणी गाव. इथे कधी काळी आमची शेतजमीन होती. काका चिकोडीत राहत असूनही आजी मात्र बहुतेक वेळा शेतात आजोबांच्या माघारीसुद्धा एकटी राहायची. किंबहुना ती तिचीच आवड होती.
मुळचा गोरापान रंग, वयानुसार पडलेलं सुरकुत्यांच जाळ अन अत्यंत प्रेमळ भाषा... आजीकडे कुणीही चटकन आकर्षित व्हायचंच.. चिपळूणला ती आली कि इथल्या सगळ्या बाळगोपाळांचा तिच्याभोवती गराडा असायचा पण इथे राहिली तरी तिचं मन कायम शेतात, गडीमाणसात, प्राण्यांच्यात गुंतलेलं असायचं. कुत्रामांजर, गाई-गुरं अशी सगळ्या प्राण्यांबद्दलची तिची आवडच बहुधा आमच्यात उतरलीय.
आजीचं संपूर्ण आयुष्यच तसं हलाखीत गेलं. खर तर तिचं माहेर श्रीमंत होतं. सगळीकडे सुबत्ता होती... पण सासरी आल्यावर सगळ दारिद्रही तिनं सोसलं. त्यात आजोबा म्हणजे जमदग्नीचा अवतार पण तिनं कुठेही कुरकुर केली नाही. त्याच्या संतापल्याच्या गोष्टीही ती नंतर आम्हा मुलांना हसत हसत सांगायची. सणासुदीलाही कित्येकवेळा घरात काही खायला नसायचं पण तिनं कधीच कुणापुढे पदर पसरला नाही... अन मुलांवरही असे संस्कार केले कि उपाशीपोटी सुद्धा ती अशी राहायची... जणू आत्ताच जेवून आली आहेत...
माझे मोठे काका नोकरीसाठी रंगून, काठमांडू, पोखरा, रांची, ग्वाल्हेर असे कुठेकुठे पोटासाठी भटकत होते तर दुसरे काका शेताकडे बघत गावात राहिले. आजोबांच्या माघारी आजीशेतातल्या घरात एकटीच राहिली. सगळं काहीमन घट्ट करून सोसत राहिली.
रिटायर्ड झाल्यावर मोठे काका देखील शेतातल्या घरात येऊन राहिले... घरात थोडीफार दुरुस्ती केली पण आजीला सुख नाहीच मिळालं. काकूकडून तर काही आरोप झाल्यावर ती खूपच दुखावली गेली. शिक्षणाला बाहेर पडलेले बाबा नंतर नोकरीसाठी सुद्धा बाहेरच राहिले त्यामुळे खरतर तिचा बाबांकडे ओढा कमीच...त्यामुळे आमच्याकडे अधेमध्ये आली तरी ती काही दिवसांपुरतीच राहत असे. 
पण १९८९-९० मध्ये मधल्या काकांच्या मृत्यूनंतर हट्टाने बाबा मग तिला चिपळूणला आमच्या घरी घेऊन आले... मग ती इथेही रुळली.
खरतर येताना ती एखाद्या निर्वासितासारखीच आली होती... गावाच्या घरच्या अनुभवांचे चटके सोसून शहाणी झाली होती... परक्यासारखीच रहायची सुरुवातीला. पण इथे मात्र तिचे आडाखे चुकले, आईने प्रेमाने तिची खूप सेवा केली अन ती पुन्हा खुशीत आली... मग घरच्या- दारच्या सर्वांवर अपार माया केली तिने.
माझ्यावर  तर तिचा जास्त जीव होता. कॉलेज संपल्यावर अवघ्या १८व्या वर्षी मी चिपळूण जवळ परशुराम लोट्यातील एका कंपनीत सर्व्हिसला लागलो... कधी दिवसाचे १६-१८ तास सुद्धा काम करावे लागे. मग आजीचा जीव कळवळायचा. ‘हिंडण्याफिरण्याचे वय हे... पोराला किती दगदग होते....’ असं सारखं म्हणायची... मी रात्री आल्यावर माझ्यासाठी गादी घालून ठेवायची... खरतर मी तिची गादी घालून द्यायची... पण मग म्हणायची, ‘ इथं घरात काय काम आहे? नुसतं बसून खातेय ना... जरा हालचाल हवी कि शरीराला.’
रात्री झोपल्यावर तिने चेहऱ्यावरून हात फिरवला नाही असं कधीच झालं नाही... सुरुवातीला आल्यावर गप्प गप्प राहणारी, विचारात हरवलेली आजी नंतर मात्र गाणी वगैरे म्हणायची. कितीतरी मराठी, कानडी गीत, अभंग तिला पाठ होते. देवाचे अभंग जरी ती म्हणायची तरी देवाचं नाव मात्र घ्यायची नाही... ‘काय माझ असं चांगलं केलंय देवाने म्हणून मी नाव घेऊ?’ असंच म्हणायची.
पण तिचा देव हा माणसांच्यात होता. स्वतः पुरेपूर दारिद्र्य भोगल्यामुळे गरीब, अडल्यानडल्या माणसांबद्दल तिला खूप कळवळा होता. स्वतःच्या ताटातली अर्धी भाकरीसुद्धा वाटून टाकण्याएवढी उदार वृत्ती होती अन कित्येकवेळा स्वतःचा घास तिने दुसऱ्याला दिलाही होता.
मला पहिला पगार मिळाल्यावर मी तिच्या हातावर त्यातले १००/- रुपये ठेवल्यावर तिचे डोळे पाणावले. ‘अरे तुझा काका एवढा म्हातारा झाला, पण कधी मला ५/- रुपये द्यावे असे त्याला वाटले नाही रे!’ असं थरथरत्या आवाजात बोलली... मला जवळ घेऊन म्हणाली, ‘हे ठेव रे तुझ्याकडे लागले तर मागून घेईन... असाच मोठा हो.’
तिला पैशाची हाव कधीच नव्हती पण कायम दारिद्र्यात राहिल्यामुळे पैशाचं आकर्षणही होतं... तिला पैसे लागायचे कशाला? तर कुणा गरिबाला देण्यासाठी... दारावर आलेल्या भिकाऱ्यालाही पटकन काहीतरी देऊन टाकायची. घरात आलेल्या कुणालाही काही देऊन टाकायची. घरात आलेल्या प्रत्येकाला  खायला घालावं असं कायम वाटायचं तिला. पण तिच्या याचं इच्छेमुळे एकदा काकूने तिला वाईट-साईट शब्दात बोलल्यामुळे तिची कुचंबणा व्हायची. एखाद्याची ओढग्रस्त अवस्था तिला कधीच बघवत नसे. ‘पैसा  काय रे आज आहे उद्या नाही, माणूस उपाशी रहायला नको’ असं म्हणायची. 

कुत्र्या मांजरावर पण तिचा खूप जीव. पूर्वी तर शेतात ‘खंड्या’ नावाचा कुत्रा होता. कायम तिच्याभोवती असायचा. जन्माचं दारिद्य्र, त्यात रूपाचं दान देवानं भरभरून दिलेलं पण एकटे राहतानासुद्धा तिला कधीच कसली भीती वाटली नाही... शहरात राहणारी माणसदेखील रात्री घराबाहेर पडायला घाबरतात पण त्या अंधारलेल्या खेडेगावात एक कंदील हाताशी घेऊन आजी बिनधास्त जगायची. कामसूपणा तर विचारायलाच नको. वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा एखादं छोट काम समोर आल्यावर ‘आता नको, नंतर करू’ असं ती कधीच म्हणाली नाही. सगळ कस झटपट! तिच्या हातालाही एक वेगळीच चव होती. शेतातल्या घरात हाताशी काही नसताना तिनं बनवलेली साध्या तिखटमिठाची आमटी-भाकरीसुद्धा तृप्त करून जात असे. 
शेवटपर्यत ती ठणठणीत राहिली. दिवाळीला पहिला बोनस मिळाल्यावर मी तिच्यासाठी एक साधी, छानसी साडी आणली होती. कितीजणांना तिने ती कौतुकाने दाखवली पण तिने ती साडी नेसावी असं नियतीच्या मनात नव्हतं. ती साडी तिच्या प्रेतालाच नेसवावी लागली शेवटी !!
सकाळी तेल लावून डोक्याला तिच्याकडून मसाज करवून घ्यायला मला आवडायचं. ती डोकं चोळत असतानाच कशी झोप येऊ लागायची. दिवाळीतही त्या दिवशी मला मस्त तेल लावून मसाज केला, आईलाही न्हायला घातलं... अन दुपारची जेवण उरकल्यावर तिला अॅटॅक आला. मेंदूतील यंत्रणा निकामी होऊन एक बाजू लुळी पडली, वाचा गेली... अन पुढचे आठ दिवस नुसती तिची तडफड होत होती. मुळात तिला दुसऱ्यांनी तिचं काही केलेलं आवडत नसे. ती नापसंती डोळ्यात दिसायची. त्या चार-पाच दिवसात आमची पण खूप धावपळ झाली... एक दिवस तिच्या बाजूला बसलो होतो.. थंडी होतीच.. अन माझा अंगावरचा टॉवेल खाली घसरला. तो परत खांद्यावर ठेवायला ती धडपडू लागली. एका हाताने स्वतः मृत्यूच्या दारात असतानाही दुसऱ्याची काळजी करणाऱ्या तिला पाहून भडभडून आलं...
पण ती गेली... खरंतर  आठच दिवसाची ती तडफड पाहताना तिने लवकर जावं असंच वाटत होतं. त्यानंतर गेल्या कित्येक वर्षात मग दिवाळीला काही अर्थच नाही उरला. घराघरातून फराळाचे पदार्थ, आकाश कंदील, फटाके, वगैरे सुरु झालं कि मला तडफडणारी आजी आठवते... मग दिवाळीतल्या सगळ्या मौजमजेकडे पाठ फिरवून मी डोंगरदऱ्यातून भटकत बसतो... पिसाटासारखा...!!!
-    सुधांशु नाईक, कोल्हापूर ९८३३२९९७९१
-    ( पूर्व प्रसिद्धी दै. सागर, चिपळूण)

1 comment: