झुंजणं, झगडणं, परिस्थितीनं पदरात
टाकलेल्या दानानं हताश न होता स्वतःचं नवं विश्व घडवून दाखवणं खूप कमी जणांना
जमतं. ज्यांना जमतं त्यांच्या अलौकिकत्वामुळे आपण स्तिमित होऊन जातो. अशा काही
लोकांपैकीच एक होत्या रजनीताई...
झुंजणं, झगडणं हा तर त्यांचा जणू स्थायीभावच बनलेला. करणार तरी काय? १५ आॅगस्टला जेव्हा
भारत स्वतंत्र होत होता तेव्हा कोकणातल्या तुरळ या एका लहानशा गावात ही चार वर्षांची चिमुरडी आजाराशी झुंजत होती. त्या पोलियोनं, त्या तापानं तिला जन्मभर पुरेल असं अधूपण दिलं अन्
त्याचबरोबर झुंजत रहायची एक अजोड ताकद.
तेव्हापासून गेली
सत्तर वर्षं ती चिमुरडी झुंजत होती..!
रजनी-करकरे देशपांडे. सत्तर वर्षांपूर्वी
महानगरातही अपंग व्यक्तींचं जिणं भीषण होतं, तिथं लहान लहान गावांतल्या
परिस्थितीबद्दल काय बोलायचं? वाढत्या वयाबरोबर या मुलीनं कायकाय अन् कसं सोसलं
असेल याची कल्पनादेखील अंगावर काटा आणते अन् डोळ्यात पाणी.
मात्र एखाद्या जिवलगाला
सहज सोबत मिरवावं तसं रजनीताईंनी हे पांगळेपण सोबत मिरवलं. कधीच
त्याचा बाऊ केला नाही व त्याचा वापर करत कुणाची दया, करुणाही मिळवली नाही.
स्नेहल स्वभावाच्या रजनीताईंना दैवानं पांगळेपण जरूर दिलं मात्र सोबत तीन महत्वाच्या गोष्टीही दिल्या. कुशाग्र बुध्दी, अतुलनीय धैर्य अन् कंठातला सुंदर कोमल मखमली सूर. केवळ अन् केवळ या तीन गोष्टींच्या जोरावर मग
त्या जग जिंकत निघाल्या.
आपल्या अपंगत्वाचा कोणताच बाऊ न करता त्यांनी शिक्षण तर पूर्ण केलंच पण गाण्याचं शास्त्रीय शिक्षणही आत्मसात केलं. पं. नामदेवराव भोईटे, पं. विश्वनाथबुवा पोतदार, पं. सुधाकरबुवा डिग्रजकर व नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे या गुरुवर्यांकडून
त्यांनी संगीत शिक्षण घेतलं. पुढे संगीतकार दिनकर पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुगम संगीताचाही
सूक्ष्म अभ्यास करून स्वतःच गाणं घडवलं.
सुधाकर बुवांचा किस्सा त्यांनी सांगितलेला
एकदा.. म्हणाल्या, “गाणं शिकवा असं सांगत मी भेटायला गेले. बुवांनी नंतर ये
सांगितलं. कित्येक दिवस मी जात होते. त्यांच्या जुन्या घरी माझ्या कुबड्या वगैरे
सांभाळत जायचे. शेवटी जवळपास सहा महिन्यानंतर बुवांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं.
ते जणू पाहत होते की ही मुलगी नुसती हौस म्हणून शिकू या म्हणते की ही चिकाटीने गाणं शिकेल..गाणं पेलू
शकेल..! मी अपंग आहे यासाठी मला खास सवलत द्या असं मीही कधी म्हटलं नाही आणि बुवांनीही
कधी तसं वागवलं नाही.”
आपण कितीही प्रगतीच्या गप्पा मारल्या तरी आजही समाजात अपंग
व्यक्तीची कुचेष्टा होतेच किंवा त्यांना उगाच केविलवाण्या दयार्द्र नजरांना सामोरं जावं लागतं. रजनीताई काखेत कुबडी घेऊन या दोन्हीविरुध्द नेहमीच कणखरपणे
उभ्या राहिल्या.
आपल्या काॅलेजच्या
दिवसांविषयी सांगताना एकदा म्हणालेल्या, " तुम्हाला सांगते सुधांशु, अख्खं
काॅलेज, म्हणजे मुलं आणि शिक्षक सगळेच घाबरायचे मला. काय बिशाद कुणी वेडंवाकडं वागेल.
मी सरसावून तयारच असे. मीच नाही तर अन्य कुणाशीही कुणी वावगं वागलेलं मी कधीच सहन
केलं नाही." नेहमी कोमल सूर गाणारा त्यांचा गळा अशावेळी तीव्र
सुरांचं कडकडीत सौंदर्यही सहज दाखवून जायचा.
त्यांचा स्वभाव तर
एकदम रोखठोक. 'एक घाव दोन तुकडे'वाला. वागण्या-बोलण्यातलं व्यंग त्यांना चटकन्
समजतं, अन् मग थेट मुळावरच घाव. " उध्दटासी व्हावे उध्दट" असं आचरण असलं
तरी त्यांच्याइतकी माया करणं फारच कमी लोकांना जमतं.
गेली काही वर्षे तर
त्या अंथरुणालाच खिळून होत्या. तरीही शेकडो
परिचितांचे वाढदिवस वगैरे सगळं त्यांना मुखोद्गत. त्या त्या दिवशी त्या व्यक्तीचं
कौतुक होणारच. एकेकाळी आपल्या सुरेख अक्षरात त्यांचं पत्र वेळेवर मिळून जायचं. पत्रात प्रेम,
सुरेख अक्षरासोबत एखादं फूल, मस्त लहानशी वेलबुट्टी वगैरे काही चित्रही असायचं. विविध माणसांच्या आवडीनिवडी ही त्यांनी अचूक टिपून
ठेवलेल्या. त्यानुसार घरी तो अमकातमका पदार्थ केला की त्या माणसाच्या घरी रजनीताईकडून हमखास डबा पोचणारच.
पूर्वी स्वैपाकघरात स्वत: पदर खोचून निगुतीनं सारं करायच्या. प्रत्येक गोष्टीत खरं म्हणजे
त्या अति चिकित्सकच. या पदार्थाच्या फोडणीत हिंग हवं म्हणजे हिंगच घालणार तिथं
कधीच लसणाची फोडणी असणार नाही इतकं त्यांचं परफेक्शन. अंथरुणाला खिळल्यानंतर
ओट्याजवळ उभं राहून करता येईना. मात्र अनिता त्यांच्या सुचनेनुसार जेंव्हा स्वैपाक
करायची तेंव्हा कुठला डबा कुठे आणि कुठली गोष्ट किती प्रमाणात घालायाचीये याकडे
त्यांचं दूरवरूनही लक्ष असायचं.
**
खाणं अन् गाणं यावर
मनापासून प्रेम. मध्यंतरी एकदा अचानक त्यांच्याकडे गेलो. त्यांना आणि पीडीना
आवडतात म्हणून जाताना गरमागरम बटाटेवडे नेलेले. त्या दिवशी काहीतरी बिनसलं
होतं त्यांचं... तब्येतीची तक्रार होतीच. वडा आवडतो म्हणून पहिला घास घेतला. तिखट
नव्हतं पण त्यांना सोसेना. डोळ्यात पाणीच आलं त्यांच्या.
वैतागून म्हणाल्या, “ सगळं सगळं नकोसं
झालंय मला आज. मगाशी तर अनिताला म्हणत होते मी, चल बाहेर पड. पलीकडे रंकाळ्याजवळ
घेऊन चल. जीवच देते आता..”
गंमतीनं मी
म्हटलं," ताई, अहो, जीव द्यायचाय ना, मग रंकाळा कशाला? किती घाण झालंय तिथे पलीकडे. वास मारतोय हल्ली पाण्याला. तुम्हाला चांगल्या
निसर्गरम्य ठिकाणी नेतो आम्ही, तिथं हवंतर करा विचार मग जीव द्यायचा. इतकं झकास जगल्यावर मृत्यूही छान असू
दे ना...."
क्षणभर विनोदावर हसल्या त्या. म्हणाल्या, “ तुम्ही विनोद करून माझा मूड चेंज
करायचा प्रयत्न करताय हे उमगतंय हो. पण नकोसं झालंय खरंच सगळं. मला हिंडायला-
फिरायला खूप आवडायचं, ते देवानं बंद करून टाकलं. चमचमीत, तिखट खायला आवडायचं
त्यावर बंधनं आली. सततच्या औषधांमुळे तोंड आलेलं असतंय. गाणं म्हणजे तर जीव की
प्राण. मात्र आता गातानाही दम लागतो. हे असं आडव पडून पडून ताकदच गेली माझी. मगाशी
शिकायला आलेल्या काहीजणी. “ सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू...” ही
ओळ म्हणतानाही खूप दमले मी. शेकडो वेळा म्हटलं असेल हे गाणं. आता गाताही येईना हो
नीट. कसं जगू हो आता सुरांशिवाय.. ?”
पण मग मुक्तपणे रडत
राहिल्या काही वेळ. आम्ही शांतपणे त्यांना मोकळं होऊ देत
राहिलो.... काय करणार होतो आम्ही?
***
त्यांनी आपल्या आयुष्यात मात्र इतरांच्या
अडचणींवेळी नेहमीच धावून जात मदत केली. त्या व त्यांची मैत्रीण नसीमादीदी हुरजूक
यांनी " अपंगांच्या मदतीसाठी व स्वावलंबी बनण्यासाठी असलेल्या संस्थेचं" स्वप्न पाहिलं. एकेकाळी अपंगत्वाचा घाला बसल्यावर रजनीताईनी नसीमादीदीना
मानसिक बळ दिलं. पुढे त्या दोघींनी मिळून अनंत अडचणींवर मात करत " हेल्पर्स आॅफ दि हॅन्डिकॅप्ड"
या संस्थेची उभारणी
केली. त्या संस्थेचा आज
वटवृक्ष झालाय. संस्थेच्या माध्यमातून अनेकांना नाजूक क्षणी मदत मिळत गेली व
स्वत:चं अपंगत्व जमिनीत गाडून अनेक गुणवंत आज समाजात धीराने काम करु लागले.
संस्था उभी करण्यासाठी रजनीताई आपलं अपंगत्व सोबत घेऊन भारतभर हिंडल्या.
शब्दशः हजारो मैफिली केल्या. आपल्याला मिळालेल्या सुरेल स्वराचे बळ वापरून त्यांनी
लाखो रुपये जमवले संस्थेसाठी. त्यातही कुठे मिरवायचा हट्ट नसायचा. कुठल्याही
स्पेशल ट्रीटमेंटची त्यांनी कधीही अपेक्षा केली नाही. सगळ्या
कामात रजनीताईंना कधीही कौतुकानं मिरवताना आम्ही पाहिलं नाही. आज किरकोळ कामं करुन
पदव्या-पुरस्कार पदरात पाडून घेणारी मंडळी पाहिली की हे
मोठेपण अधिकच भव्य वाटू लागतं. गायिका रजनी करकरे-देशपांडे व
समाजसेविका रजनीताई या दोन्ही आघाड्यांवर त्या नेहमीच डौलानं
कार्यरत राहिल्या. अनेकांना स्फूर्ती देत राहिल्या.
त्यांचं सर्वात
मोलाचं काम कुठलं असेल तर अपंगाची लग्न जुळवणं. अपंगत्वाचे शेकडो प्रकार आहेत.
मात्र याचा अर्थ असा नव्हे की त्यांचं सहजीवन असूच नये. दैवजात मिळालेलं एकटेपण
भोगणं ही फार कठीण व वेदनादायी गोष्ट असते याचा प्रखर अनुभव असलेल्या रजनीताईंनी
अनेक अपंगांचे, संस्थेच्या कार्यकर्त्यांचे संसार उभे करुन दिले. त्यापूर्वी
त्यांना स्पष्ट व अत्यावश्यक सर्व समजावून देत उत्तम समुपदेशन केलं. त्याचं ऋण
विसरणं अशक्यच.
तीच त-हा गाण्याची.
अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडवताना त्यांच्याकडून कठोर मेहनत करुन घेतली
त्यांनी. सर्वपरिचित कोसंबी बंधूंसारख्या अनेकांना त्यांनी केलेलं मार्गदर्शन
भविष्यातील वाटचालीसाठी बळ देणारंच होतं.
इतरांचं सहजीवन
फुलवणा-या, सुरांत रमलेल्या रजनीताईंचं भाग्य तरीही थोर म्हणायला हवं म्हणून पी.
डी. देशपांडेंसारखा पती त्यांना लाभला. वयानं १६-१७ वर्षं लहान पीडींना लग्न
करताना प्रखर विरोध सहन करावा लागला पण शेवटी प्रेम जिंकलं. संगीत, साहित्य, समाजकार्य अशा तिन्हीत रमणारा साथीदार व मित्रवर्ग यासह
त्यांच्या सहजीवनाचे
दिवस फार आनंदाचे होते ! त्यांचं सहजीवन हे
अनेकांसाठी आदर्शवत असं होतं.
म्हणतात ना, “ काव्यशास्त्र
विनोदेन कालौं गच्छति धीमताम..” तसं त्यांच्या सहजीवनात समानधर्मी
मित्रांची साथ मिळाली आणि संगीत, साहित्य, समाजकार्य यांच्या साथीनं वाटचाल होत
राहिली. म्हणूनच दिवस नव्हे
तर सहजीवनाची ३२ वर्षै कशी गेली हे कळलंच नाही.
आता दिवस सरत नाही
हे हल्ली हल्ली त्यांना जाणवू लागलं
अंथरुणाला खिळल्यावर. तरीही काहीतरी करायची उर्मी असायचीय.
**
२०१७ च्या जानेवारीतलीच
गोष्ट. माझी आई व सासरे कॅन्सरमुळे मृत्यूशय्येला खिळलेले. पहिलं कोण जाणार अशी
जणू शर्यतच होती घरात. आमची प्रचंड धावपळ सुरु होती व
अचानक संध्याकाळी पीडींना घेऊन रजनीताई दत्त म्हणून दारात उभ्या.
थक्क होऊन मी पीडींना म्हटलं,
" अहो, त्यांची तब्येत बरी नाही, कशाला त्रास देत घेऊन आला त्यांना?"
ताडकन् रजनीताई म्हणाल्या, " त्यांनी मला नव्हे, मी आणलंय
त्यांना. आज सकाळी उठल्यावर ठरवलेलं आज तुमच्याकडे जाऊन यायचंच.
इथं तुमच्यावर पहाडाएवढं संकट अन् मी घरात कशी बसून राहून
हो?"
मग सर्वांशी गप्पा मारत बसल्या.
त्यांनी काहीतरी गाऊन दाखवावं अशी इच्छा व्यक्त केली दोघांनीही. मग आईला आणि सास-यांना आवडणारं गाणं कुठलं ते विचारलं. मग ती गाणी सुरु
झाली... मृत्युशय्येवर निजलेल्या त्या दोन जीवांना सुखाचे सुरेल चार क्षण
द्यायला जीव ओतून गात राहिल्या. गळा साथ
देत नव्हता, दम लागत होता.. तरी त्या गात होत्या. हे पाहून आमच्या सर्वांचे डोळे
डबडबले. त्यानाही भरून आलं..
डोळे टिपत म्हणाल्या, “ तुम्हाला मी काय देणार हो.
तुम्ही काहीतरी मागितलं ते देऊ शकले याचा आनंद होतोय. फार बर वाटलं.”
त्यानंतर दहा
दिवसांच्या आत दोघेही गेलेच. सहा-आठ महिन्याची जीवघेणी झुंज अखेर शांत झाली. पण त्या सर्व दिवसात जवळपास
रोज रजनीताई फोनवरुन चौकशी करत होत्या. कुणाबरोबर तरी सूप,
सार असं काहीबाही करुन पाठवत होत्या..! त्यांच्या अंथरुणावर त्या तिथे दूर असूनही त्यांचं सदैव
आमच्यावर लक्ष होतं. हे असं त्यांनी बहुतेक सर्व परिचितांसाठी केलंच आहे.
त्यांना भटकंती खूप प्रिय.
नातेवाईकांसोबत, संस्थेतील सहकार्यांसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत त्यांनी उदंड
प्रवास केला. कधी मैफिलींच्या निमित्ताने तर कधी खास टूरला जायचं म्हणून. प्रत्येक
प्रवासाची आखणी करताना त्यातही ताई आघाडीवर. कुठे जायचं, काय करायचं, काय पाहायचं,
काय खरेदी करायचं यासाठी त्यांचं सगळं नियोजन पक्कं असायचं. वेळेच्या बाबतीतही
तितकंच काटेकोर वागणं. त्यामुळेच मृत्यूची वेळ ही चुकतेय अशी आशा आम्हाला वाटत असताना त्यांनी मात्र
मृत्यूलाही फार ताटकळत ठेवलं नाही. तब्बल महिन्याभराची त्यांची तगमग आम्हालाच पाहवत नव्हती.
१५ ऑगस्ट हा दिवस त्यांच्यासाठी जणू
खलनायकच ठरलेला. एकेकाळी १५ ऑगस्ट ला त्यांना अपंगत्व आलं. ती आठवण कायमची पुसून
टाकायची या हेतूने पीडीनी मुद्दाम १५ ऑगस्टलाच लग्न केले. यापुढे लग्नाचा वाढदिवस
म्हणून तो दिवस आनंदात घालवायचा म्हणून.. १५ ऑगस्ट २०१७ या दिवसानं मात्र पुन्हा धक्का दिला...! खरंतर एक दिवस आधी, 14 ऑगस्टला त्यांना आता खूप बरं
वाटतंय म्हणून हॉस्पिटलमधून घरी सोडलेलं. संध्याकाळी मी केक घेऊन गेलो त्यांच्या
लग्नाचा वाढदिवस साजरा करायला. खूप मस्त नेहमीच्या सुरात त्या छान गप्पा मारत
बसल्या होत्या. जीवावरचं संकट टळलं याचा आम्हालाही
आनंद होता. मात्र तो आनंद क्षणभंगुर ठरला. दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांना खूप त्रास
झाला आणि त्या बेशुध्द पडल्या. पुढचे १५ दिवस मग जीवन-मृत्युच्या सीमारेषेवरच
राहिल्या. सदैव सुरेल गात-बोलत राहणाऱ्या त्या एकही शब्द बोलू शकत नाहीत हे पाहणं
आमच्यासाठीही जीवघेणं ठरलं.
शेवटी सगळं संपलंच.
एकेकाळी रेडिओ-स्टार, प्रति-आशा अशा
उपमांनी गौरवल्या गेलेल्या रजनीताई आयुष्यभर सुरेल-सुगंधी जगल्या. शेकडो लोकांना
माया लावून गेल्या. शारीरिक-मानसिक-आर्थिक किंवा अन्य कोणताही अपंगत्व तुमच्या
प्रगतीच्या आड येऊ शकत नाही याचं खणखणीत उदाहरण बनून गेल्या..! आजही अचानक
कुठूनतरी “ जीवलगा राहिले रे दूर घर माझे...” कानी ऐकू येतं, आणि पाणावल्या डोळ्यासमोर
आशाताईंच्या ऐवजी रजनीताई दिसू लागतात. त्यांचा प्रेमळ मखमली स्वर आठवतो... मग पुढचं सगळं सगळं धूसर
धूसर होऊन जातं...!!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर. (९८३३२९९७९१)
*****
रजनीताईच्या जगण्याचा पटच तू इतक्या कमी शब्दांत उभा केलास, सगळे पैलू हेरलेस नि लिहूही शकलास! थँक्स सुधान्शु....
ReplyDeleteबस काय.. तू त्यांना जास्त जवळून पाहिलंय. तुला आवडलं ना.. मग मला आनंदच आहे..!
DeleteSALAM SALAM SALAM............
ReplyDelete