इतिहासाच्या पोतडीतून लेखमालेतील हा भाग दुसरा. जगावेगळं या फेसबुक पेजवर 06 जून 2020 रोजी प्रसिध्द झालेला.
नुकतंच ज्येष्ठ त्रयोदशीला, ६ जूनला शिवराजाभिषेक दिन साजरा झाला. त्यानिमित्ताने शिवकालातील इतिहासाला उजाळा मिळाला आहे. शिवरायांच्या शेवटच्या काही वर्षात कोकण आणि पश्चिम किनाऱ्यावरील त्यांच्या हालचालीने, एका विशिष्ट युद्धाने प्रत्यक्ष इंग्रजांना कसं हताश केलं याविषयी आज जाणून घेऊया...
जलदुर्ग खांदेरी आणि इंग्रजांची शरणागती....
१६६०-६५ च्या काळात एक महत्वाची घटना घडली आणि पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यात असलेलं मुंबई बेट इंग्रजांना देऊन टाकलं. बेट भारताचे आणि व्यवहार करणारे हे त्रयस्थ. अर्थात याविरुध्द कुणी फार काही प्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याचं इतिहासात दिसत नाही. मात्र संभाव्य धोके लक्षात घेऊन १६५६ मध्ये ज्याची स्थापना झाली ते मराठा आरमार आता प्रबळ झालेलं. इंग्रज, फ्रेंच आणि डच वखारीना मराठा सत्तेचे परवाने घेऊन व्यवहार करणं बंधनकारक ठरलं. शिवाजी महाराजांनी या परकीय सत्तांवर कठोर अंकुश निर्माण केला फक्त जंजिराच्या सिद्दीला पूर्ण नमवणे त्यांना अजून जमत नव्हतं. दरवेळी काहीतरी अडचण येई आणि सिद्दी तावडीतून सुटे. कधी तो मुंबईत इंग्रजांच्या आश्रयाला जाई तर कधी बादशाहाकडे मदत मागे.
जंजिरा ते मुंबई या सागरी मार्गात मग पाचर ठोकायचे राजांनी ठरवले. मुंबईच्या दक्षिणेला साधारण पंधरा सागरी मैलांवर खांदेरी आणि उंदेरी ही बेटे आहेत. थळ या गावाच्या किनाऱ्यापासून दीड मैलावर उंदेरी बेट आणि तिथून पुढे दीड मैलांवर अधिक मोठे असे खांदेरी बेट. ऐन समुद्रात... जंजिराआणि मुंबई यांच्या मधोमध...! १६७० मध्ये एकदा मराठ्यांनी येऊन या बेटांची पाहणी केलेली. तिथे गोड्या पाण्याचे झरे शोधले. बांधकाम सुरु करायचा प्रयत्न केला. पण अन्य रणधुमाळीत पुढे ते काम राहून गेले. मात्र दक्षिण दिग्विजयानंतर १६७८ च्या दरम्यान शिवाजी महाराजानी याकडे बारकाईने लक्ष दिले. आणि खांदेरी-उंदेरी बेटांकडे मोर्चा वळवला. या बेटांना इंग्रज “हेनरी – केनरी बेटे” असं म्हणत. या बेटांवर मराठ्यांनी ताबा मिळवला की मुंबईतून होणाऱ्या इंग्रजांच्या सर्व हालचालीवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होणार होते..!
ऑगस्ट १६७९ मध्ये सुमारे ४०० जणांच्या शिबंदीसह माणसे रवाना झाली. चौलच्या उत्पन्नातील १ लाख रुपये राजांनी जलदुर्गाच्या उभारणीसाठी मंजूर केले. प्रत्यक्ष बेटावर १५० माणसे आणि केवळ ४ तोफा घेऊन राजांचे विश्वासू सुभेदार मायनाक भंडारी दाखल झाले. त्यांनी योग्य जागी तोफा लावल्या आणि मोठ्या धडाक्यात थेट बांधकाम सुरु केले.
मग इंग्रजांनी आपल्या सुरत येथील प्रमुखाला लिहिले की, “ शिवाजीराजांच्या माणसानी हेनरी-केनरी बेटांवर किल्ला बांधायची सिद्धता केली आहे. या ठिकाणी अशा लोभी आणि समर्थ राजाला इतके महत्वाचे स्थळ विरोधाशिवाय हस्तगत करू देणे हे राजकीयदृष्ट्या हीनपणाचे ठरेल. त्याचे आरमार आपल्यापेक्षा निकृष्ट आहे. त्याची गलबते अगदीच क्षुल्लक असून आपले एक गलबत त्यांच्या १०० गलबतासाठी भारी ठरेल. तरी मुंबई बेटाचे दळवळण बंद करणे आदि त्याचा उद्देश असू शकतो. एकदा त्याला किल्ला बांधू दिला तर नंतर हे स्थळ त्याच्या हातून घेणे मुश्कील आहे.”
त्यानंतर सुरतकर इंग्रजांनी फारसं लक्ष दिले नाही आणि मुंबईकर इंग्रजांनी मग नौदलाची एक तुकडी कॅ. मिचीनसोबत खांदेरीवर पाठवली. त्यांनी मायनाकला बोलवून सुनावले की हे बेट इंग्रजांचे आहे आणि मराठ्यांनी ताबडतोब सगळं समान घेऊन बेट सोडून जावे. मायनाकनेही तितक्याच ताठपणे सुनावले की महाराजांनी हुकुम दिल्याविना आम्ही बेट सोडणार नाही.
मग इंग्रजांच्या लक्षात आले की आता युद्धाला पर्याय नाही.
रिव्हेंज, हंटर या युध्दनौकांसह काही सैन्य घेऊन कॅ. ह्युजेस ४ सप्टेंबरला खान्देरीजवळ पोचला. तोवर मराठ्यांनी जवळपास ४-५ फुटांपर्यंत तटबंदीचे काम केलेलं. मोक्याच्या जागी तोफा. मुळात खांदेरी शेजारी खडकाळ जागा. इंग्रजांच्या मोठ्या युद्धनौका अगदी जवळ पोचू शकेनात. जवळच्या नागाव च्या खाडीचे पात्रही उथळ. तिथे इंग्रजी युद्धनौका, गलबते आत भरतीच्या पाण्यासह जाऊ शकत होत्या मात्र नंतर त्या गाळात रुतण्याची शक्यता... त्यामुळे तिथे ही त्यांना जाता येईना. तर मराठ्यांच्या लहान होड्या सहज सर्वत्र संचार करत होत्या. खांदेरीवर पिण्याचे गोडे पाणी होते. थळच्या किनाऱ्यावर ही होते... मात्र इंग्रजांना पिण्याचे पाणी आणायला देखील मुंबईला जावे लागे. त्यात ११ सप्टेंबरला मराठा आरमार प्रमुख दौलतखान मदतीला आला. मराठ्यांनी खान्देरीवरून आणि आपल्या गलबतातून प्रभावी मारा करत इंग्रजी नौदलाला रोखले. गोळीबारीत इंग्रजांचा एक कॅप्टन ही मारला गेला. कॅ. थोर्प चे ते गलबत मराठ्यांनी पकडून किनाऱ्यावर आणले. अन्य इंग्रज सैनिक ही मारले गेले.
नागावच्या खाडीत मराठा आरमाराचे एक प्रमुख केंद्र होते. इथे नौकाबांधणी, दुरुस्ती आदि कामे होत. या परिसरातील उथळ समुद्र किनारे, उथळ खाडी पात्रे याचा बारकाईने विचार करून सपाट तळ असलेल्या विशिष्ट प्रकारच्या नौका, गलबते, गुराबा मराठा आरमारात बांधल्या गेल्या होत्या. आणि याचाच मोठा फायदा होत होता तर असे न केल्यानं इंग्रजांची भली मोठी गलबते, युध्दनौका निरुपयोगी ठरू लागल्या.
जवळपास दीड दोन महिनेही धुमश्चक्री सुरु राहिली. मोजकी रसद, अन्न-धान्याचा अपुरा साठा, अवघ्या ४ तोफा आणि सुमारे १५०/२०० माणसे यांच्या साथीनं मायनाक भंडारी निष्ठेने झुंजत होते. एका बाजूला इंग्रजांच्या युध्दनौकांचा यशस्वी प्रतिकार करत होते आणि दुसरीकडे जलदुर्गच्या बांधकामात जराही हलगर्जी न करता वेगाने कार्यरत होते.
१८ ऑक्टोबरला सकाळी मराठ्यांचे ४०-५० गुराबांचे व गलबतांचे आरमार नागावच्या खाडीतून बाहेर पडले. त्यांचा वेग इतका होता की इंग्रजांना सज्ज व्हायला वेळच मिळाला नाही. मराठ्यांनी अर्धचंद्राकार व्यूह तयार करून डव्ह आणि रिवेंज याना घेरले. एकच गदारोळ झाला. शेवटी डव्ह ने शरणागती पत्करली. मराठ्यांनी तिला ओढून खांदेरीच्या किनारी नेली. त्यावरील तोफा आणून किल्ल्यात ठेवल्या. मग इंग्रजांनी आपल्या तुकडीला अधिक कुमक देण्यासाठी फोर्चुन ही नौका अन्य काही शिबाडे, मचवे दिले.
इंग्रजी युद्धनौका या शिडांच्या होत्या. या काळात वाऱ्याची दिशा, वेग हे काहीच त्यांना सहाय्यक ठरत नसल्याने त्या युद्धनौका बरेचदा नुसत्याच समुद्रात उभ्या राहिल्या. तर कुठूनही कुठेही कधीही जाऊ शकणाऱ्या मराठी नौकांनी इंग्रजांना त्रस्त करून सोडले. नोव्हेंबर मध्ये सिद्दी कासम काही गलबते घेऊन इंग्रजांच्या मदतीला आला. मात्र इंग्रज आणि सिद्दी यांचा मराठ्यांनी खान्देरीवरून चांगलाच समाचार घेतला. त्याच बरोबर कॅ. केज्विन आणि सिद्दी याच्यातही तोफांच्या मारागिरीवरून मतभेद झाले.
एव्हाना इंग्रजांची अधिक कोंडी करण्यासाठी महाराजांनी पनवेल जवळ सैन्य गोळा करायला सुरुवात केली. लवकरच शिवाजी मुंबईवर चाल करून येणार अशा बातम्या थेट सुरत पर्यंत गेल्या. तिथल्या इंग्रज अधिकाऱ्याने मग ३ नोव्हेंबर ला मुंबईकरांना या मोहिमेवरील खर्च खूप वाढल्याची आणि पदरी यश येत नसल्याची जाणीव करून दिली. त्यांच्या पत्रातून लिहिले की, ”शिवाजीराजांशी तहाची बोलणी चातुर्याने करावीत. चौलच्या सुभेदारामार्फत तहाची बोलणी करावी. शिवाजीचे लोक बेटाला सहज मदत करू शकतात, बेटावर किल्ल्याचे बांधकाम करू शकतात आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला दोन गलबते दिली मात्र तुम्हाला यश येत नाही. आता चिडून शिवाजी खुद्द मुंबईवर हल्ला करेल, तेंव्हा मुंबईचे चांगले रक्षण कसे करावे याचा विचार करावा.. इत्यादी..इत्यादी..
तरीही मुंबईकर इंग्रज झुंजत राहिले.
सुरतकर इंग्रजांनी मात्र सतत तिकडून मुंबईकर इंग्रजांना सुनावणे सुरु केले. ३१ डिसेंबर ला शेवटी मुंबईकर इंग्रजांनी सुरतेला कळवले की, “खांदेरी प्रकरणी कंपनीला विनाकारण खूप खर्च झाला. आम्हाला काही यश आले नाही. मराठ्यांच्या चपळ होड्या सहज कुठेही जाऊ शकतात, कुठूनही हल्ला करू शकतात मात्र आमच्या युद्धनौका अगदीच निरुपयोगी ठरल्या आहेत. सध्या शिवाजीशी तह करण्याची खटपट सारखी सुरु आहे..”
नवीन वर्ष सुरु झाले तोवर आता खान्देरीत जवळपास ८-९ फूट उंचीची तटबंदी बांधून तयार झाली. खांदेरी बेटावरील आपला अधिकार पक्का करीत इंग्रज-मराठे यांच्यातील तह झाला. चौलचा सुभेदार आणि अण्णाजी पंडित यांना महाराजांनी या तहाचे सर्वाधिकार दिले होते. तर इंग्रजांकडून नारायण शेणवी याने दुभाष्याचे काम, पत्रव्यवहार पार पाडला. शेवटी नाक मुठीत धरून इंग्रज शरण आले आणि ३० जानेवारीला आपले आरमार परत घेऊन मुंबईला निघून गेले. मुंबई आणि जंजिरा यावर वाचक ठेवणारा नवा दुर्ग तयार झाला होता. याचे श्रेय मायनाक भंडारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाला... मराठा आरमाराच्या जलद हालचालींना!
किनारपट्टीवरील या अशा जलदुर्गांमुळे शिवाजी महाराजांनी कोकण सुरक्षित केले. तसेच पुढे कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमामुळे इंग्रजांना किनाऱ्यावरील दुर्ग फारसे जिंकता आले नाहीत. मात्र नंतर त्यांनी जेंव्हा खांदेरी जिंकून घेतली तेंव्हा या दुर्गावर दीपगृहाची निर्मिती केली. मुंबईसारख्या महत्वाच्या शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना खांदेरीवर ताबा असणे आवश्यक वाटले होते.
मंडळी, मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील कित्येक दशके आपल्याला मात्र सुरक्षेचे हे धोरण समजलेच नाही. गेल्या काही वर्षात मात्र शासनाने, नौदलाने, तटरक्षक दलाने या सर्वांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. थळच्या किनाऱ्यावरून आजही खांदेरीला जाता येते. तुम्ही अवश्य जा. खांदेरी जलदुर्ग पहा, तिथली तटबंदी, बुरुज, तिथलं दीपगृह पहा...
जगात अद्वितीय मानल्या गेलेल्या इंग्रजांच्या नौदलाचा तुटपुंज्या साधनांसह वीर मायनाक भंडारी यांनी कसा यशस्वी प्रतिकार केला. लढता-लढता एक जलदुर्ग कसा निर्माण केला हे समजून घ्या. मायनाक भंडारी यांचं शौर्य आणि छत्रपती शिवाजीराजांची दूरदृष्टी याला मुजरा करताना त्या युद्धभूमीवरील माती आपल्या भाळावर अभिमानाने लावून घ्या...!
सुधांशु नाईक, कोल्हापूर (९८३३२९९७९१)
nsudha19@gmail.com
संदर्भ:
मराठ्यांचे आरमार – डॉ. गजानन मेहेंदळे
वेध महामानवाचा – डॉ. श्रीनिवास सामंत
शिवकालीन पत्र-सार संग्रह
शककर्ते शिवराय – विजयराव देशमुख
No comments:
Post a Comment