marathi blog vishwa

Friday, 19 June 2020

ब्रह्मेंद्रस्वामी !

इतिहासाच्या पोतडीतून...ही नवी लेखमाला ' जगावेगळं' या पेजसाठी मी लिहायला सुरुवात केली आहे. त्यातील 31 मे 2020 चा हा लेख.
इतिहासाच्या पोतडीत अनेक गोष्टी दडलेल्या असतात. कित्येक गोष्टी आपल्याला नीट माहिती नसतात. कित्येक गोष्टीच्या दंतकथा बनतात. तर कित्येक गोष्टी आपल्याला सदैव प्रेरणादायी ठरतात. इतिहासात विविध घटना आणि व्यक्ती यांना फार महत्व आहे. कधी त्यांच्यामुळे काही चांगलं घडलं तर कधी वाईट देखील. आपल्या इतिहासातील काही गोष्टीविषयीची ही लेखमाला.. फक्त जगावेगळं या फेसबुक पेज वर...

भाग 1  : ब्रह्मेंद्रस्वामी
 
बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर सातारा दरबारात मोठे राजकारण घडले. कोवळ्या  बाजीरावाला पेशवा करण्यासाठी सगळ्यात जास्त विरोध  हा श्रीपतराव पंतप्रतिनिधी, सुमंत आनंदराव चिमणाजी दामोदर यांचा. त्या विरोधाचे मूळ स्वरूप “देशस्थ विरुद्ध चित्पावन ब्राह्मण” हेच होते. शाहू महाराजांना या साऱ्याचा अंदाज आला. आणि त्यांनी ब्रह्मेंद्रस्वामी यांच्याशी सल्लामसलत करून “बाजीराव बल्लाळ” यांचेच नाव पुढील पेशवा म्हणून घोषित केले. अंबाजीपंत पुरंदरे, पिलाजी जाधवराव, उदाजी पवार आदि विचारशील मातबर यामुळे आनंदले.बाजीरावांचे नाव जाहीर करण्यापूर्वी शाहू महाराजांनी धावडशी येथे जाऊन ब्रह्मेंद्रस्वामी यांच्याशी विचारविमर्श केला. संपूर्ण पेशवे घराणे आणि सातारकर छत्रपती त्यांना आपला गुरु मानत होते. 

ब्रह्मेंद्रस्वामी या व्यक्तिमत्वाचे एक वेगळेच गारुड त्याकाळी सर्वांच्यावर होते. ऐतिहासिक साधनांचा अभ्यास केला की एक वेगळंच व्यक्तिमत्व समोर येतं. प्रसंगी पेशव्यांना देखील आर्थिक मदत कर्जरूपाने देऊ शकणाऱ्या त्यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊ या. सुमारे १६५० च्या सुमारास मराठवाड्यात जालन्याजवळ असलेल्या दुधड गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव विष्णू असे होते. वयाच्या १२-१३ व्या वर्षी त्यांचे आई वडील वारले. त्यानंतर त्यांनी राजूर या गावी गणेश उपासना केली. ते मग वाराणसीला गेले. तिथे श्री ज्ञानेन्द्र सरस्वती यांच्या हाताखाली विद्याभ्यास केला. त्यांनीच विष्णूला “ ब्रह्मेंद्रस्वामी” हे नवे नाव दिले. तिथून मग ते देशाटनाला निघाले. भारतभर फिरून ते कृष्णातीरी आले. इथे रामदासस्वामी यांच्याप्रमाणे आपला आश्रम असावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र तेंव्हा औरंगजेब बादशहा ससैन्य महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होता. सर्वत्र वातावरण अस्थिर भासले म्हणून स्वामींनी घनदाट रानातील चिपळूणजवळ असलेल्या परशुराम क्षेत्री राहायचे निश्चित केले. जवळच असलेल्या धामणी / धामणदेवी गावात त्यांचे वास्तव्य होते. राजाराम महाराजांच्या काळात बापुजी व संताजी भोसले यांना सिद्दीच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी स्वामींनी मदत केली. त्यामुळे महाराजांनी त्यांना धामणी हा गाव इनाम दिला.

सुमारे १६९८ नंतर ते उघडपणे परशुराम येथे राहू लागले. तिथल्या मंदिराची वाताहत झाली होती. ते स्वामींना पाहवेना. त्यांनी मंदिर जीर्णोद्धार करण्यसाठी “भार्गव फंड व पतपेढी” सुरु केली. सर्वसामान्य लोकांसोबतच कान्होजी आंग्रे, सिद्दी आदि त्यांचे भक्त बनले. याच कालखंडात बाळाजी विश्वनाथ हेही कधीतरी त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांचे भक्त बनले. इतकेच नव्हे तर सातारला राजगादी निर्माण करणे, स्वराज्याच्या विविध कामासाठी अर्थसहाय्य मिळवणे यासाठी बाळाजी विश्वनाथ यांना स्वामींनी मदत केलीच. त्यांच्या पश्चातही स्वराज्याला मदत करत राहिले. त्यामुळेच मराठ्यांची कोल्हापूरकर छत्रपती, सातारकर छत्रपती ही दोन्ही घराणी सुरुवातीला त्यांना नेहमीच आदराने वागवत असे जुन्या कागदपत्रांवरून दिसते.नंतरच्या कालखंडात ते सातारकर छत्रपतींच्या जास्त जवळचे बनले.
या सर्वांच्या मदतीच्या जोरावर स्वामींनी परशुराम क्षेत्राचा जीर्णोद्धार केला. तिथे पर्शुरामासोबतच गणपती, मारुती, दत्त, रेणुका यांची लहान मंदिरे उभी केली. लोकांच्या राहण्यासाठी विश्रामगृह उभे केले. बागा फुलवल्या. दीपमाळा बांधल्या. त्यांच्या कार्याला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. त्यातून बरेच धन गोळा झाले. ज्याचा विनियोग स्वामींनी लोक कल्याणकारी कामांसाठी केला. गावोगावी मंदिरांचे जीर्णोद्धार केले. नद्यांना घाट बांधले. इतकंच नव्हे तर खंबाटकी घाट दुरुस्त करायला, तिथे वाटसरूंना उपयोगी पडावे म्हणून पाण्याचे टाके खोदवले. पुण्याजवळील यवत येथे डोंगरावर असलेल्या भुलेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. अनेक ठिकाणी उत्तम बागांची निर्मिती केली. 

या सर्व कामांसाठी किती खर्च केला, स्वामींनी कधी कधी व कुणाला कर्जे दिली याचे हिशोबसुद्धा अभ्यासू मंडळींसाठी उपलब्ध आहेत. शाहू छत्रपतींच्या पदरी असलेल्या अनेक सरदारांची त्यांच्याकडे नेहमीच फुलझाडे, फळझाडे यांची मागणी असायची. कित्येकदा स्वामी त्यानाही विशिष्ट ठिकाणाहून ठराविक झाडे आणायला सांगत असंत. असे असले तरी ब्रह्मेंद्रस्वामी पूर्णतः संन्यासी मनोवृत्तीचे नव्हते. त्यांना राजकारणात रस होता. या देशात पुन्हा हिंदुसत्ता नांदावी अशी त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी पहिल्या बाजीरावांना त्यांनी कायम मानसिक पाठबळ दिले आणि प्रसंगी आर्थिक मदत केली. 

त्यांचे वागणे राजस होते. स्वामींच्या उत्तम आवडीनिवडी होत्या. उत्तम फळे, फुले, अत्तरं, चांगली वस्त्रं आपल्याजवळ असावीत असं त्यांना वाटायचं. जवळ जमवलेल्या धनातून ते सावकारी करायचे. प्रत्यक्ष पेशवे कुटुंबियांना देखील त्यांनी अनेकदा रोख रकमे द्वारे कर्ज दिली होती. त्याच्या परतफेडीसाठी त्यांनी तगादाही लावला होता.असे असले तरी एक समाजकल्याणकारी सत्पुरुष म्हणून सर्वजण नेहमीच त्यांना आदराने वागवत. कोकणसह घाटावरील अनेकजण त्यांचे भक्त होते. शाहू राजांनी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यासह ज्या मसलती केल्या, कान्होजी आंग्रे यांच्यासारख्या मातबर सरदारांना आपल्या बाजूला वळवले त्यात ब्रह्मेंद्रस्वामी नक्कीच सहभागी होते. त्यामुळे परशुरामाच्या उत्सवावेळी पेशवे, आंग्रे आणि जंजिरेकर सिद्दी अशा तिघांचीही उपस्थिती असायची. 
ब्रह्मेंद्रस्वामी, परशुराम क्षेत्र आणि सिद्दी यांच्याशी संबंधित असे हत्ती प्रकरण इतिहासात फार  प्रसिध्द आहे. 

सिद्दीच्या हत्तीचे प्रकरण व परशुराम क्षेत्राचा विध्वंस: 
त्याचे झाले असे की, जंजिरेकर सिद्दीचा एक भाऊ होता. त्याचं नाव होतं सिद्दी सात. तो चिपळूणजवळ गोवळकोट येथे असायचा. दूर कर्नाटकात सावनूर प्रांताचा नवाब त्याचा मित्र. त्याने एकदा सिद्दी सातला हत्ती भेट दिला. आता एवढ्या दूरवरून तो हत्ती कसा आणायचा? मग सिद्दी सातला स्वामी आठवले. स्वामी नेहमी देशाटनाला जायचे. तसे ते निघालेले. मग त्यांनाच सिद्दीने तो हत्ती घेऊन येण्याची विनंती केली. तसेच वाटेत त्रास होऊ नये म्हणून कोल्हापूरकर संभाजीराजे आणि विशालगड येथील प्रतिनिधी यांची दस्तके घेऊन दिली. वाटेत कान्होजी आंग्रे यांचाही प्रांत लागतो. मात्र कान्होजी हे स्वामींचे शिष्य असल्याने त्यांच्याकडून काही त्रास होणार नाही याची खात्री असल्याने आंग्रे यांची दस्तके घेतली नाहीत. स्वामी कर्नाटकातून परत येताना कोकणात पोचले. त्यांच्या प्रवासात हत्ती पुढे व त्यामागून एका मुक्कामाच्या अंतराने स्वामी येत. चिपळूणच्या अलीकडे माखजनच्या चौकीवर हत्ती येताच, आंग्रे यांच्या चौकीदारांनी त्याला पुढे जाण्यापासून अडवलं. हे सिद्दी सातला कळताच त्याने हत्ती सोडवून आणायला काही लोकं पाठवली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे सिद्दी सात प्रचंड संतापला. त्याला वाटले की स्वामींनीच मुद्दाम हे नाटक केले व हत्ती आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे त्याने चिडून जाऊन परशुराम क्षेत्रावर हल्ला केला. स्वामींचे धन लुटले. शिष्यांना मारहाण केली आणि सगळे काही उध्वस्त केले. 
दरम्यानच्या काळात हत्ती अडवल्याचे कळल्यावर स्वामींनी कान्होजीना सांगून हत्ती मुक्त केला व सिद्दी सातकडे पाठवून दिला...मात्र यापूर्वीच परशुराम क्षेत्र उध्वस्त झालेलं. हे पाहून स्वामी अतिशय संतापले. एकूणच १७२७-२८ मध्ये या झालेल्या प्रकाराने ते व्यथित झाले आणि कोकण सोडून सातारा प्रांती दाखल झाले. मात्र त्यांनी सिद्दी सातचे कायमचे पारिपत्य होईल यासाठी पुढील आयुष्यात त्यांनी पेशव्यांना, छत्रपती शाहू महाराजांना गुप्त मदत केली. त्यांचा सतत आग्रह असायचा की सिद्धीचे कोकणातील वर्चस्व छत्रपतींनी मोडून काढावे. मग शाहू महाराजांनी काढलेल्या मोठ्या मोहिमेत सिद्दी सात कायमचा संपला.

शाहू राजांनी दिलेल्या धावडशी या गावी त्यांचे पूर्वी अधूनमधून वास्तव्य असायचे. तिथेच ते उत्तरायुष्यात राहत होते. मात्र ते फक्त पूजाअर्चा, उपासना यातच मग्न राहिले नाहीत तर लोकांच्या कल्याणासाठी विविध कामे स्वतःहून करत राहिले. परिसरातील मंदिरे, विहिरी, नद्यांवरील पूल, घाटरस्ता, बिरमाडे, आनेवाडी, मर्ढे, धावडशी, माळशिरस, मेरुलिंग डोंगर, निर्माण केलेल्या बागा, आमराया या साऱ्या कामांसाठी ब्रह्मेंद्रस्वामी नेहमीच आघाडीवर राहिले. ते काम इतके मोठे होते की मराठा रियासतकार सरदेसाई तर त्यांना “त्या काळातले सार्वजनिक बांधकाम खाते ( पी डब्ल्यू डी) असं म्हणायचे...!

रसाळगडच्या किल्लेदाराला ,स्वामींनी व्याघ्रजीन, मृगजीन पाठवून देण्यासाठी लिहिलेली पत्रे, विविध सरदारांना, पेशव्यांना वेळोवेळी लिहिलेली पत्रे पेशवेदफ्तरात पाहायला मिळतात. घोडेस्वारीची  आवड असल्याने उतारवयात ७०-७५ व्या वर्षी सुद्धा ते घोड्यावरून कोकण, पुणे आदि प्रवास करत होते हे कागदपत्रांतून वाचल्यावर त्यांच्या बलदंड प्रकृतीबद्दल, नियमित व्यायाम व अल्पोपहार याविषयी कौतुक वाट रहाते. पहिल्या बाजीरावांच्यावर त्यांचे मनापासून प्रेम होते. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न एक प्रामाणिक पेशवा म्हणून बाजीराव पूर्ण करतील याची त्यांना आशा होती. बाजीरावांच्या प्रत्येक मोहिमेची, हालचालींची ते खबरबात ठेवत असंत. त्यामुळे १७४० मध्ये जेंव्हा बाजीरावांचा मोहिमेत अचानक आजारपणामुळे देहांत झाला त्याने ब्रह्मेंद्रस्वामी विमनस्क झाले. त्यांना शोकावेग अनावर झाला. आधीच वृध्द झालेले स्वामी उदासीन बनले. आणि शेवटी १७४५ मध्ये स्वामींचे निधन झाले. लोककल्याणकारी कामे करणारा, राजसंन्यासी स्वर्गस्थ झाला. शाहू महाराज, पेशवे, त्यांचे अनेक सरदार यांच्या उपस्थितीत धावडशी येथे अंतिम संस्कार झाले. तिथेच शाहू महाराजांनी मोठे परशुराम मंदिर व समाधी मंदिर उभे केले. 

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झालेल्या राजकारणात मराठ्यांची सत्ता पुन्हा जोमाने वाढावी, त्यांना लोकधार मिळावा यासाठी कष्टालेल्या, पुढे मोठी राजवट बनलेल्या साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळातील बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि ब्रह्मेंद्रस्वामी ही दोन महत्त्वाची व्यक्तिमत्वे होती. त्यांनी केलेल्या कार्याचा पुढे बाजीराव पेशवे यांना कायम आधार लाभला यात शंका नाही. तुम्ही जेंव्हा कधी सातारा-पुणे परिसरात प्रवास कराल तेंव्हा जरासा वेळ काढून साताऱ्याजवळच्या धावडशी ला अवश्य जा. तिथलं मोठं तळे, पाणीव्यवस्था आणि परशुराम मंदिर अवश्य पहाच.

सुधांशु नाईक
nsudha19@gmail.com

संदर्भ ग्रंथ :
पेशवे दफ्तर – रियासतकार सरदेसाई.
पुण्याचे पेशवे – अ रा. कुलकर्णी
पेशवे घराण्याचा इतिहास – प्रमोद ओक
श्री ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर – कै. प्र ल सासवडकर यांनी लिहिलेलं चरित्र.
पेशवे – श्रीराम साठे

No comments:

Post a Comment