marathi blog vishwa

Friday, 19 June 2020

पहाडासारखे बळवंत कान्होजी जेधे!

इतिहासाच्या पोतडीतून ही लेखमाला जगावेगळं या फेसबुक पेजवरुन प्रसिध्द होत आहे. त्यातील 13 जून 2020 रोजी प्रसिध्द झालेला हा भाग तिसरा!
प्रत्येक राजासाठी काही सहकारी हे फार मोलाचे असतात. काही प्रसंगात ते असं काही काम करून जातात की केवळ राजाच नव्हे तर आपण सारे त्यांचं ऋण आयुष्यभर विसरू शकत नाही. शिवकाळातील असं एक पहाडासारखे व्यक्तिमत्व म्हणजे कान्होजी जेधे..! जाणून घेऊया त्यांच्याबाबत...
पहाडासारखे बळवंत कान्होजी जेधे !
कान्होजी जेधे. भोर जवळील हिरडस मावळातील कारीचे. एखाद्या भक्कम दुर्गाप्रमाणे असलेला  हा बुलंद माणूस. त्यांची जन्मकथाही अद्भुत. असं सांगतात की जेधे घराण्यात मोठी भाऊबंदकी. त्यातून कान्होजी पोटात असताना जेध्यांच्या वाड्यात मोठी धुमश्चक्री उडाली. त्यात कान्होजींचे वडील वगैरे लोकांची हत्या झाली. भिवजी आणि सोनजी जेध्यांनी भावासह इतरांना कापून काढले. पोटुशी असलेली कान्होजींची आई अनुसयाबाई  त्यातून वाचली. मात्र कान्होजींच्या जन्मानंतर भिवजी आणि सोनजी पुन्हा त्यांच्या जीवावर उठले. अनुसयाबाई आणि मुलाची काळजी घेणाऱ्या देवजी महाला यानं हुषारीनं त्यांना वाड्याबाहेर काढले. त्या दोघांच्या ऐवजी एक दाई आणि तिचं मूल बळी पडलं.
देवजी मग लहानगा कान्होजी आणि त्याच्या आईला घेऊन थेट अनुसयाबाईच्या माहेरी मांढरगावात आला. तिथलं मांढरे यांचं घर हेही भिवजी/ सोनजी यांच्या दहशतीने घाबरलेले. त्यांनी आसरा द्यायला नकार दिला. मग देवजी या मायलेकरांची काळजी घेत मोसे खोऱ्यातील धनगर वाड्यात राहू लागला. तिथं मग त्याची सरदार  बाजी पासलकर यांच्याशी ओळख झाली. बाजींचं सगळ्या परिसरात एक सज्जन आणि  बलवान सरदार म्हणून नाव होतं. त्यांनी सगळी कथा ऐकून घेतली आणि या सर्वांना प्रेमाने आश्रय दिला. कान्होजीला तलवारबाजी, घोडेस्वारी आदि सगळं शिक्षण दिलं. बाजींना मुलगा नव्हता त्यामुळे आपल्या मुलावर करावं तसे प्रेम त्यांनी कान्होजीवर केले. इतकंच नव्हे तर त्यांना आपला जावई करून घेतलं. 

कान्होजी मोठे झाल्यावर मग बाजींनी कान्होजीना त्याच्या काकांच्या दहशतीचा इतिहास सांगितला. आणि बाजी पासलकर यांनी कान्होजीना घेऊन सैन्याच्या तुकडीसह कारी गावात हल्ला केला. कान्होजीनी आपल्या दुष्ट काकांना देहदंड दिला आणि पुन्हा कारीचे वतनदार बनले. १६३५ पर्यंत ते आदिलशाही सरदार रणदुल्लाखान यांच्याकडे चाकरी करत होते. 
शहाजीराजे जेंव्हा निजामशाही खांद्यावर घेऊन लढत होते तेंव्हा त्यांना जेरबंद करायला १६३६ मध्ये प्रत्यक्ष शाहजहान बादशहा आणि आदिलशाह यांनी संयुक्त मोहीम काढली. माहुलीच्या बळकट दुर्गाजवळ मोठी लढाई झाली. अखेर शहाजीराजे पराभूत झाले. तहानुसार त्यांना सह्याद्री सोडून आदिलशाही चाकरीत कर्नाटकात जावे लागले. यावेळी रणदुल्लाखान यांच्या चाकरीत असलेले कान्होजी जेधे आणि दादोजीपंत लोहोकरे हे त्यांचे कारभारी शहाजीराजांच्या पदरी दाखल झाले.

कान्होजीना पाच बायका होत्या; सावित्रीबाई, येसूबाई, चंदुबाई, कृष्णाबाई आणि रखमाबाई अशा नावाच्या. त्यांच्यापासूनची पाच मुलेही होती, बाजी, चांद्जी, शिवजी, नाईकजी आणि मताजी या नावाची. बाजी जेधे हा मुलगा बाजी पासलकर यांच्यासोबत शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या दिवसात सहभागी होता. फात्तेखानासोबत महाराजांची जी पहिली लढाई झाली तेंव्हा पुरंदर जवळ खळद- बेलसर च्या लढाईत मराठ्यांचं निशाण वाचवत बाजींनी पराक्रम गाजवलेला. तेंव्हा महाराजांनी त्यांना “सर्जेराव” हा किताब बहाल केलेला. फत्तेखानाच्या पराभवानंतर त्याचा पाठलाग करत जाताना झालेल्या युद्धात बाजी पासलकर हे स्वराज्याचे पहिले सेनापती धारातीर्थी पडले. यावेळी शहाजीराजांना आदिलशहाने कपटाने कैद केले होते. वजीर मुस्तफाखान, अफझलखान आणि बाजी घोरपडे या शिवरायांच्या नातेवाईकाने शहाजीराजांना कैद करून जिंजी येथे ठेवले होते. तिथेच कान्होजी आणि दादोजीपंत लोहोकरे हे देखील कैदेत होते.

फत्तेखानाचा शिवाजीराजांनी या पहिल्याच मोठ्या लढाईत संपूर्ण पराभव केला तर त्याचवेळी त्यांचे भाऊ संभाजीराजे यांनी बंगळूरच्या लढाईत फर्राद्खान याचा पराभव केला. मग मोगली बादशहाचा मुलगा मुराद याच्यामार्फत शिवरायांनी राजकारणाचा डाव टाकला. आदिलशाहीवर दबाव टाकून वडिलांची सुखरूप सुटका करवून घेतली. यानंतर शहाजीराजांनी  कान्होजी जेधे व लोहोकरे यांना १६४९ नंतर पुण्याला पाठवले. ते आल्यामुळे शिवरायांची ताकद वाढली. जेधे यांचे मावळात खोपडे आणि बांदल यांच्याशी हाडवैर होते. मावळातील बरेचसे सरदार असेच आपापसात लढत होते. एकमेकांचे जीव घेत होते. त्या सर्वाना एकत्र करायला सुरुवात झाली ती शिवकाळात..! 

जेधे, बांदल, पासलकर, शिळीमकर, कोंढाळकर, ढमाले, कोंडे देशमुख, मालुसरे, कंक आदि अनेक घराणी स्वराज्याच्या कार्यात सहभागी झाली. तरीही जे शिवरायांशी दुष्मनी बाळगून होते त्या चंद्रराव मोरे यांच्यासारख्या वीरांना शेवटी नमवले गेले. जावळीपासून कोकणातील कल्याण-भिवंडीपर्यंतचा मुलुख स्वराज्यात आला. पुरंदर, लोहगड, तुंग, तिकोना, रायगड, राजमाची, प्रबळगड, सरसगड, सिंहगड आदि बलवान दुर्ग स्वराज्यात दाखल झाले.या सर्व धामधुमीत सरसेनापती माणकोजी दहातोंडे, नेताजी पालकर यांच्यासह शिवरायांचा मुख्य आधार होते ते कान्होजी जेधे..! पाहता पाहता नव्याने बांधलेली राजधानी राजगड आणि शेजारचा  तोरणा उर्फ प्रचंडगड हे गड स्वराच्याच्या गाभ्यातील प्रमुख आणि भक्कम ठिकाण बनले. प्रतापगड सारखा नवा दुर्ग बांधून तयार झाला. आणि आता एका मोठ्या युद्धाची नांदी दिसू लागली. शिवाजीराजांचे हे वाढते बळ आदिलशहाला दिसत होते. आता तर जावळीचे खोरे ही गेले. मग शिवरायांना नेस्तनाबूत करायला मोठ्या सरदाराची नेमणूक झाली. तो होता अफझलखान. वाईचा आणि जावळीच्या सुभ्यावर त्याचा अंमल होता. 
जून १६५९ मध्ये आदिलशहाने  कान्होजींसह मावळातील अनेक वतनदार मंडळींना खलिते पाठवले. त्यात असे लिहिले होते की;
“ शिवाजीने निजामशाही कोकणातील मुसलमानांना त्रास देऊन, लुट करून तिथले आणि आदिलशाही मुलुखातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव शिवाजीच्या पारिपत्यासाठी अफझलखान महमंदशाही यास सुभेदारी देऊन नामजद केले आहे. तरी तुम्ही खानाचे रजामंदीत व हुकुमात राहून शिवाजीचा पराभव करून निर्मूळ फडशा पाडावा. शिवाजीच्या पदरच्या लोकांस ठार मारावे आणि आदिलशाही दौलतीचे कल्याण चिंतावे. तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही...
या फर्मानापुर्वीही कान्होजीना चाकरीबाबतचे फर्मान आले होतेच. मात्र ह्या फर्मानातील भाषा जरबेची होती. असे फर्मान मिळताच मावळातील वतनदार मंडळींच्यात खळबळ उडाली. खंडोजी खोपडे, सुलतानजी जगदाळे आदि मंडळी खानच्या फौजेत दाखल झाली. कान्होजींच्या पुढे मोठा पेच निर्माण झाला. ते त्वरेने उठले, आपल्या पाचही मुलांना सोबत घेऊन थेट राजगडावर आले.

आदिलशाही फर्मान त्यांनी महाराजांना दाखवले. महाराजांना कान्होजींची परीक्षा पहायची असावी.. महाराज उद्गारले, “ नाईक, तुम्हीही आता विचार करा. अन्य वतनदारही खानाला सामील होत आहेत. तुम्ही आमच्यासोबत राहिलात तर तुमचे वतन जाणार आणि तुमच्या जिवालाही धोका.. तुम्ही देखील इतरांसारखे आदिलशाही सैन्यात जा. आम्ही तुमची मनःस्थिती समजू शकतो..”

महाराज असे बोलले आणि एखाद्या धिप्पाड पर्वतासारखे असणारे कान्होजी गदगदले. पुढे येत महाराजांना म्हणाले; “ महाराज, गेली तेवीस वर्षं शहाजीराजांशी इमान ठेवले. त्यांच्या सांगण्यावरून गेली ८-९ वर्ष तुमची सोबत केली. आता आम्ही व आमचे पुत्र स्वराज्यासाठी खस्त होऊ पण हरामखोरी करणार नाही... वतनाचा लोभ आम्हास नाही.. हे पहा आम्ही आमच्या वतनावर पाणी सोडले...” असं सांगत त्यांनी जवळचा पाण्याचा तांब्या उचलला आणि आपल्या हातावरून पाणी महाराजांच्या पावलांवर सोडले.

महाराज थक्क झाले. पट्कन बैठकीवरून उठले. कान्होजीना आलिंगन देत उद्गारले, “ नाईक, तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलात. आता आम्हाला शंभर हत्तींचे बळ आले. आपण गनिमाचे पारिपत्य करू. तुम्ही मावळच्या सर्व देशमुखांना एका जागी बैसोन सर्व मनसुबा सांगावा. त्यांना जोडून घ्यावे. तसेच पुढची धामधूम पाहता तुमचा कुटुंब कबिला कारीहून घाटाखाली तळेगाव ढमढेरेकडे हलवावा.” आणि कान्होजी निघाले. 

मावळातील समस्त देशमुखास एकत्र केले. सर्वाना मनसुबा सांगितला. ही आपली मोठी लढाई. आता अफझलखानाचे निर्दालन केले की हे आपले राज्य. आपले स्वराज्य. आता कुणा बादशहासाठी मरायचे नाही. लढायचे नाही. आपल्या राज्यासाठी लढायचे. मी माझ्या वतनावर पाणी सोडून आलो. आता जे करायचे ते मऱ्हाट राज्यासाठीच..!

कान्होजींची जरब मोठी.. त्यांच्याप्रती सर्वाना आदर ही तितकाच. पाहता पाहता सगळा मावळ प्रांत कान्होजीनी एक केला. अफजलखान वाईला आला. आणि मग मुत्सद्दी महाराजांनी गोपीनाथकाका बोकील यांच्यामार्फत  खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी ओढून आणले आणि शेवटी खानाचा वध केला. कोयनेच्या तीरावर जावळीच्या खोऱ्यातील पार, कुंभरोशी, मेटतळे आदि गावांजवळ भीषण युध्द झाले. मराठ्यांच्या फौजेने खानच्या फौजेची दाणादाण उडवली. हजारो हशम मरण पावले. कित्येक जखमी झाले. कित्येकांनी मराठ्यांची चाकरी पत्करली. प्रचंड लूट मिळाली. त्यापुढील १५ दिवसात कोल्हापूरपर्यंतचा आदिलशाही मुलुख स्वराज्यात आला... सहा महिन्यांपासून जावळीच्या खोऱ्यात धुमसत असलेली मोहीम फत्ते झाली..!
महाराजांनी मग सर्वांच्या कौतुकासाठी दरबार भरवला. जीवा महाले, संभाजी कावजी, शिळीमकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक आदि अनेकांचे सत्कार केले.  गोपीनाथ काका बोकील आणि कान्होजी यांचं योगदान सर्वात मोठं होतं. गोपीनाथ काकांचा सन्मान केला.त्यांनी मग कान्होजीना बोलावले. आणि तलवारीच्या मानाचे पहिले पान त्यांना दिले.
 शाहीर अज्ञानदास पोवाड्यात म्हणून सांगून गेले..

अंगद हनुमंत रघुनाथाला / तैसे जेधे बांदल शिवाजीला...

जेधे आणि बांदल खरे तर एकमेकांचे मोठे वैरी होते. स्वराज्याच्या कामात मात्र शिवाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून लढले. इतकंच नव्हे तर पावनखिंडीच्या लढाईत जेंव्हा बाजीप्रभूसह बांदलांची एक मोठी तुकडी संपूर्ण खर्ची पडली तेंव्हा कान्होजीनी मोठ्या मनाने तलवारीचा आपला पहिला मान बांदलांना देऊन टाकला. असे दिलदार शूर होते कान्होजी..! शाहिस्तेखानाची स्वारी स्वराज्यात दाखल झालेली. त्यावेळी कान्होजी थकले होते. कारी-आंबवडे येथे आपल्या वाड्यात होते. आपल्या प्रकृतीची खबर महाराजांना पाठवून कान्होजी पत्रात लिहितात, “ माझी सर्व मुले आणि देशमुखीचे वतन आपले पायांवर ठेवले आहे.आपण त्यांचा सांभाळ करावा. आणि १६६० मध्ये कान्होजींचे निधन झाले. महाराजांना वाईट वाटले त्यांच्यावर असलेले एक वडिलकीचे छत्र कायमचे हरपले..!
कान्होजीन्सारखी माणसे होती म्हणूनच  स्वराज्य उभे राहिले. साल्हेरपासून जिंजी तंजावर पर्यत ते  वाढत गेले..! कान्होजीन्सारख्या हजारो लाखो लोकांनी कोणत्याही फायद्याची अपेक्षा न करता प्रसंगी जीवावर उदार होत झुंज दिली त्यामुळेच हे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांच्या नंतरही २७ वर्षे बादशाहाशी झुंजत राहिले. या साऱ्या वीरांचे  स्मरण आपण नित्य जपलं पाहिजे. भोर परिसरातील कारी-आंबवडे येथे जाऊन कान्होजींच्या समाधीच, वाड्याचे दर्शन घेऊन तिथं अवश्य नतमस्तक होऊ या..!

सुधांशु नाईक, कोल्हापूर
९८३३२९९७९१
nsudha19@gmail.com

संदर्भ – 
शिवकालीन पत्र-सार संग्रह आणि जेधे शकावली
शककर्ते शिवराय – विजयराव देशमुख
राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे

1 comment:

  1. या लेखात जे छायाचित्र ( पुतळा) वापरले आहे ते कान्होजी आंग्रे यांचे आहे

    ReplyDelete