#ज्येष्ठनागरिक #भाग पहिला
नमस्कार मित्रहो. जादूची पेटी या मोफत उपक्रमातून लोकांनी मनमोकळा संवाद साधावा, आपल्या मनातील निराशा, उद्वेग झटकून पुनश्च धीरानं जगण्याला सामोरं जावं हीच आमची इच्छा. त्यासाठी 9833299791 या क्रमांकावर काॅल करा किंवा nsudha19@gmail.com यावर पत्र लिहा असे आवाहन केले त्याचा लाभ घेत खूप वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री व पुरुषांचे काॅल येतायत. कोरोनाग्रस्त किंवा भीतीनं घाबरलेल्यांचे काॅल येतायत.
यातच महत्वाचा एक घटक आहे ज्येष्ठ नागरिकांचा. एकतर कोरोनासंकटाच्या पहिल्या दिवसापासून सतत सांगितलं जातंय की ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त धोका, ब्लडप्रेशर व शुगर असलेल्यांना जास्त धोका... या ज्येष्ठांनी कुठेही बाहेर पडू नये वगैरे वगैरे.
त्यामुळे आधीच हजारो ज्येष्ठ व्यक्ती प्रचंड मानसिक ताण सहन करतायत. घरात सतत 6 महिन्याचा जणू बंदिवास... मग घरातले ताणतणाव...
ज्येष्ठ नागरिकांना सतत प्रचंड दडपणाला सामोरं जावं लागतंय. किती वेगवेगळ्या समस्या आहेत ज्येष्ठांच्या. त्यापैकी अगदी दोन परस्परविरोधी उदाहरणं, त्यांच्याशी झालेला संवाद हाच आजच्या लेखाचा विषय...
1 :- एकाकी पण चिडखोर असे देशमुख काका
देशमुख काका. सरकारी नोकरीतून उच्चपदावरुन निवृत्त झालेत 5,6 वर्षांपूर्वी. त्यांना दोन मुली व 1 मुलगा. मुलींची लग्नं झालीयत. मुलगा खाजगी नोकरीत चांगल्या पदावर. सून शिक्षिका. त्यांना 1 मुलगा. म्हटलं तर सगळं छान स्थिरस्थावर असा संसार. सोबतीला सेवाभावी अशी बायको. पण घरचे सगळे यांना वैतागलेत. कारण यांचा संतापी स्वभाव व सतत घरातली धुसफूस.
मुलगा व सून वैतागून त्यांच्याविषयी बोलत होते...
खरंतर सगळे त्यांची काळजी घेतात पण यांची सदैव हुकूमशाही वृत्ती. एकेकाळी ज्या अधिकारानं आॅफिसला तालावर नाचवलेलं तसं घरच्यांना नाचवायची वृत्ती. मुलगा तुलनेनं दुर्लक्ष करतो. कधी जास्तच घरात आरडाओरडा करु लागले तर बोलतोही. पण सुनेचा व बायकोचा कोंडमारा अधिक.
अन् यांच्यामुळे सासू व सुनेत खटके सुरु झालेत. आपल्या नव-याचं चुकतं हे कळतं पण नवरा कुणाचं ऐकत नाही तर इतरांनी माझ्यासारखं गप्प बसावं ही त्यांची वृत्ती... तर सून म्हणते रोज हगल्या मुतल्या कोणत्याही कारणावरुन हे काहीही बोलणार, माझ्या आईबाबांचाही प्रसंगी उध्दार करणार... का ऐकून घ्यायचं मी? बरं मी सगळी कामं करते, स्वैपाकातही सासूला कामाला लावत नाही फारसं... तरी रोज उठून काही कारणं काढून हा माणूस मला शिव्या देतो. कधी पदार्थांवरुन, कधी एखाद्या वस्तूवरुन, कधी टीव्हीवर अमुकच सिरीयल पाहते म्हणून.. कशाहीवरुन सतत आरडाओरडा करतात.. कोणताही पदार्थ केला की नावं ठेवायची. सतत कुठल्या तरी हाॅटेलातून काहीतरी आणून खायचे. या 6 महिन्यात हाॅटेलं बंद, बाहेर जाता येत नाही मग रोज चिकन करा, मटन करा सांगतात. ते तरी कुठं मिळतंय...
पण आम्ही वीकली 1/ 2 दा तरी त्यांना द्यायचो. मग त्याला नावं ठेवायची.. हे कमी म्हणून.वर सतत यांना खायला काही लागतं. चिवडा, लाडू, काजू-बदाम, फळं असं सगळं घरी असतं. तेही कधी आमच्या मुलांनी त्या डब्यातून घेऊन काही खाल्लं की यांचा संताप.. लगेच म्हणणार, " आपल्या पोरांना तेवढं घाला..मला उपाशी मारा..". शोभतं का हे असं बोलणं? आमच्या घरी शेजारीपाजारी देखील हल्ली फारसे येत नाहीत. सरळ म्हणतातच, ते तुमचे बाबा आमच्यासमोरच तुम्हाला काहीतरी ओरडतात..ते बरं वाटत नाही... यांच्यासोबत 1 दिवस रहाणंही नकोसं झालंय. कितीही समजून सांगितलं तरी यांचा हेकेखोर व संतापीपणा कमीच व्हायला तयार नाही.
देशमुख काकांचा हा असा प्रश्न तर यादव काकांची कथा वेगळीच.
2 :- भीतीनं गांगरलेले यादवकाका
यादवकाका. एका खाजगी बॅन्केतील निवृत्त कर्मचारी. साधा शांत स्वभाव. आपण भलं व आपलं काम बरं. पत्नीचं 4 वर्षापूर्वी निधन झालंय. यांना 2 मुलं व 1 मुलगी. सगळे आपल्या संसारात सुखी. घरात दोन नाती. एका मुलाकडे हे कोल्हापुराजवळच्या तालुक्याच्या ठिकाणी रहातात. काकांना देवाधर्माचं वेड जरा जास्त. पण गेले काही महिने देवळं बंद. जवळच्या शंकराच्या मंदिरातील पूजा, तिथले उत्सव हे सगळं काका हौसेनं मॅनेज करायचे. आता एकदम त्यांना रिकामपण आलंय. त्यात त्यांचे जे काही मित्र होते त्यापैकी दोघांचा मृत्यू त्यांना चटका लावून गेलाय. एकदम घरी गप्प गप्प बसून असतात. तोंडात " पांडुरंगहरी.." किंवा विठ्ठल विठ्ठल सदैव. मध्येच "ओम नम:शिवाय" चा जोरजोरात जप करु लागतात. एकटेच बसून रडतात. कुणी काही विचारपूस करु गेलं की काबरेबावरे होतात. काही नाही.. काही नाही म्हणत रुममध्ये गप्प बसून राहतात. जेवणातही धड लक्ष नसतंय. मन कुठेतरी कसल्यातरी विचारात.. रात्री झोपेतही अचानक ओरडत उठतात... मला भीती वाटतेय.. मी मरेन बहुदा असं म्हणतात..
त्यांच्या सर्व तपासण्या झाल्याहेत. ब्लडप्रेशर व्यतिरिक्त काही फारसा त्रास नाही त्यांना. डाॅक्टरांनीही समजावलंय की काका तुम्ही खंबीर एकदम फिट आहात...पण ते मात्र मनात मरणाची भीती घेऊन बसलेत.
त्यांची काळजी करुन मुलगा व सून अस्वस्थ. दोघेही काकुळतीने बोलत होते... वडिलांनी साधं तरी कष्टाचं जीवन जगलंय. त्यांना कसला त्रास होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतोय, जपतोय. पण आई गेल्यापासून ते एकाकीच झालेत. मित्रांबरोबर सकाळ संध्याकाळ फिरुन येत. देवळात रमायचे. पण आता तेही विस्कटल्यासारखं झाल्यानं त्यांची विक्षिप्त वागणं वाढलंय. खूप कसल्यातरी विचारात एकटेच बडबडत असतात. कधी रात्री अपरात्री उठून बसतात. खोलीतच मोठ्यानं रामरक्षा वगैरे म्हणतात. विचारलं की घाबरतातच एकदम... गप्प होतात... तुम्ही बोलाल का त्यांच्याशी?
###
मी बोललो. दोन्ही काकांशी बोललो. यादवकाकांना खरंतर मृत्यूची प्रचंड भीती वाटत होती. मुलगा व सून किंवा अन्य कुणाबद्दल त्यांना तक्रार नव्हती. आपण कोरोनानं गेलो तर कुणीही अंत्यसंस्कारही करणार नाहीत. मला शेवटच्या क्षणी मुलं, नातवंडं या कुणाचं तोंडही पहायला मिळणार नाही.. नकोय असलं मरण.. असं सांगून ते बोलता बोलता रडलेच चक्क.
काकांना म्हटलं, " मी तुमच्या मुलाच्या वयाचा. मी काही तुमची समजूत काढू शकत नाही. तुम्हाला सल्ला देण्याइतका मी मोठा नव्हे. पण काका प्रेमानं इतकं सांगू शकतो की तुम्ही देवाधर्माचं इतकं सगळं करता मग मरणाला का घाबरता? आज तुम्ही वयाच्या सत्तरीत पोचलाय. सगळं छान झालंय तुमचं. मुलं व सुनाही छान आहेत. त्यांचाही संसार नीट सुरु आहे. मग खरंतर तुम्ही तृप्त असायला हवं. आपल्याकडे पूर्वी वानप्रस्थासारखी पध्दत होती. तुम्ही खरंतर तसंच वागताय. मुलगा व सुनेच्या संसारात ढवळाढवळही करत नाही. मग फक्त मरणाची भीती कशाला? उलट उद्या मरण येणार आहे असं समजून आजचा दिवस छान आनंदात घालवावा असं म्हणतात जाणती माणसं.
तुम्ही छान नातवंडासोबत खेळा, मुलगा व सुनांसोबत गप्पा मारा, छान पूजा अर्चेत वेळ घालवा... जुनी गाणी आवडतात तुम्हाला.. दिवसभर रेडियोवर विविध भारती ऐका...मस्त जाईल तुमचा दिवस. रात्री झोपताना दिवस छान गेला म्हणून आपण देवाला हात जोडतोच... त्यातही कोरोनाची भीती नकोच. आता बरेच वेगवेगळे उपचार सुरु झालेत. 90 टक्के लोक बरे होतायत. तुम्ही नीट काळजी घ्या, समजा ताप वगैरे आलाच तर 1 दिवसही फुकट न घालवता डाॅक्टरांचा सल्ला घेतला तर काहीच होणार नाही तुम्हाला...
काका म्हणाले, " खरंय हो. माझं मलाच कळतंय सगळं पण सुधरत नाही. कितीही मनाला धीर द्यायचा प्रयत्न केला तरी रिकामं बसलं की मनात तेच विचार येतात. मग भीती वाटू लागते.
मी म्हटलं, " काका, मनाला एकटं सोडूच नका आता. घरच्या सर्वांशी छान बोलत रहा. अगदी घरी सूनबाई किचनमधे काम करत असेल तर तुम्हीही खुर्ची घेऊन बसा तिथं. गप्पा मारत. नातींसोबत खेळा. त्यांचा अभ्यास घ्या. तुमच्या दुस-या मुलाला-सुनेला- नातवाला काॅल करा... मित्रमंडळी इतके दिवस भेटू शकत नव्हती. आता हळूहळू लाॅकडाऊन संपतोय. तुम्ही भेटू शकता मित्रांना. उत्साहानं पण सगळी काळजी घेऊन भेटा. मस्त काही आवडते पदार्थ खा... असा दिवस एन्जाॅय करा की उद्याची सकाळ पहाण्यापूर्वी जरी मरण आलं तरी हसतमुखानं जावंसं वाटेल... हे फक्त तुमच्यासारख्या सिनियर्स साठी नव्हे तर प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचं आहे. आजचा दिवस आपला...तो आनंदात जावा म्हणून जे करायचं ते करुया."
काकांच्या परिसरातच राहणा-या इतर काही मित्रांनीही आता त्यांना नियमित काॅल करायचं ठरवलंय. एकमेकाला धीर देत ते यातून बाहेर पडतील असे वाटते.
देशमुख काका व त्यांचा मुलगा सून यांच्याशीही बोललो. देशमुख काका प्रचंड गर्विष्ठ तर आहेतच पण इतरांना कस्पटासमान वागवणं हे जणू रक्तात भिनलंय त्यांच्या. आज शहरात विविध ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप आहेत. त्यातही फारसे ते कुठे नसतात. विचारलं तर म्हणाले, " ही मंडळं सतत रडगाणी गातात. लोअर मिडलक्लास वाले सगळे. "
यांच्या सुपिरिएरिटी काॅम्प्लेक्सला हाताळणं अवघडच. शेवटी त्यांना सांगावं लागलं की तुम्ही घरच्याशी नीट वागणारच नसाल तर या तुमच्या स्वत:च्या घरात तुम्ही एकटेच रहा, हे सगळे नवीन घर घेऊन भाड्यानं राहतील. तुमची काळजी घेतायत ते, पण रोज उठून तुम्ही शिव्या दिलेलं कोण ऐकेल. तुमचा मुलगा व सून हेही चुकत असतीलच कधीतरी. तेच योग्य व तुम्हीच दोषी असं नसेलही प्रत्येक वेळी. पण तुम्ही सिनियर आहात. बाप आहात. तुम्हीच मन मोठं करुन त्यांना समजून नको घ्यायला? तुमची बायकोही तुमच्यावर चिडते, मुलगा, सून, मुलगी सगळे तुम्हालाच शिव्या देतायत. काय कमवलं आपण आयुष्यात याचा काका विचार करायला हवा...
तुम्ही आॅफिसमध्ये जे अधिकारपद भोगत होता त्याला धाक म्हणून लोक सलाम मारायचे. तुम्हाला आता कोण तिकडचं विचारतही नाही मग कशाला इतका ताठरपणा? आणि आपल्याच मुलाबाळांशी प्रेमानं, मन मोठं करुन वागायला तुम्हाला कमीपणा का वाटतो? उलट तुम्ही प्रेमानं 2 शब्द बोलून पहा...मग समोरचे 4 शब्द प्रेमानं बोलतील. पण याक्षणी त्यांना तुमची नव्हे तर तुम्हाला त्यांची गरज आहे हे लक्षात ठेवायला नको का?
काकांना पटत तर होतं पण त्यांचा इगो, अहंकार त्यांना स्वत:लाच कंट्रोल करता येत नाही हे दिसत होतं. मी यापुढे नीट वागायचा प्रयत्न करेन असं ते म्हणाले पण घडेल याची खात्री वाटली नाहीच. मुलगा व सुनेलाच शेवटी म्हटलं की तुम्ही एकदा ठामपणे काही दिवस जवळच वेगळं घर करुन रहा. तुमची कमतरता त्यांना जाणवू दे. यामुळे काय गैरसोयी होतात तेही त्यांना कळूदे. त्यांच्या 2 वेळच्या जेवणाचे व नाश्त्याचे डबे तुम्ही देत रहा व दिवसातून एकदा येऊन चौकशी करुन जा... पाहायचं काही दिवसानं फरक पडतो का काही...जर नरमले तर पुन्हा सगळे रहा एकत्र आनंदानं..
याव्यतिरिक्तही ज्येष्ठांच्या अनेक समस्या आहेत. काहीजणांना घरात खरंच वाईट वागणूकही मिळतेय त्याविषयी पुढच्या लेखात...त्यांनी खरंच मन घट्ट करुन वृध्दाश्रमाचा पर्याय स्वीकारायला हवाय.
शहरात अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. तिथल्या मंडळींनीही आपल्या विविध मेंबर्सशी व त्यांच्या कुटुंबियांशी सतत सध्या संपर्क ठेवायला हवा. प्रत्यक्ष भेटी जरा अवघडच पण किमान फोनवरुन बोलणं, ज्येष्ठ नागरिकांना आॅनलाईन माध्यम शिकवून त्यांना ग्रुप काॅलिंग करायला लावणं हे असं काही व्हायला हवंय.
ज्या मंडळींना वाचनाची आवड असेल त्यांच्यासाठी घरच्यांनी किंवा तरुण मुलांनी समोर बसून पुस्तकं वाचून दाखवावीत, आॅनलाईन पुस्तक वाचनाचा आनंद द्यावा असे सुचवावेसे वाटते.
सध्या कोरोनामुळे सर्वात जास्त घाबरलेला समूह ज्या ज्येष्ठांचा आहे. त्यांना आपणच धीर देऊया. गाणी, गप्पा, पुस्तकव्चन असे काही उपक्रम करुन ज्येष्ठ नागरिकांना आनंद देऊया.
ज्या ज्येष्ठ नागरिक समूहाला असं काही पुस्तक अभिवाचन ऐकायचं असेल तर मी स्वत: त्यांच्यासाठी ते करु शकतो. तसेच अन्य लोकही करु शकतात. ज्या ज्येष्ठ नागरिकांना माझ्याशी मनमोकळं बोलायचंय ते मला #जादूचीपेटी उपक्रमासाठी 9833299791 या नंबरवर कधीही काॅल करु शकतातच!
बोलत राहूया. एकमेकाला धीर देत राहूया...
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(9833299791)🌿