marathi blog vishwa

Thursday 24 September 2020

जादूची पेटी किस्सा- 4 नाती संपल्यानं नैराश्य

घरबसल्या रिकामा वेळ होता, लोकांना प्रत्यक्ष भेटण्यावर जरा बंधनं आलेली मग परस्पर संवादासाठी #जादूचीपेटी या उपक्रमाची सुरुवात केली. 
ज्यांना काही ना काही मानसिक समस्या भेडसावतेय, भीती, निराशा, एकटेपण, कुणापासून त्रास वगैरे गोष्टींमुळे मानसिक तणावाचा त्रास होतोय त्यांच्याशी आम्ही बोलू लागलो. सर्वांना आवाहन केले की तुमची समस्या मनमोकळेपणाने 9833299791 या माझ्या नंबरवर काॅल करा किंवा nsudha19@gmail.com या इमेलवर कळवा. तुमची समस्या आमच्या पेटीत टाका, आम्ही योग्य समुपदेशन करु तेही मोफत. तसंच अधिक काही सहकार्य अावश्यक असेल तर विविध संस्था, यंत्रणांच्या योग्य उपयोगानं समस्येवर मात करायचे प्रयत्न करुया. 
सध्या कोरोनामुळे बाधित झालेले तसेच अन्य समस्यांनी ग्रस्त असे अनेकजण सध्या आमच्याशी बोलतायत, त्यांना धीर देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. त्यातील हा एक संवाद..गेल्या आठवड्यातला...( अर्थातच नावं बदलली आहेत.) अनेकदा एखादी गोष्ट विसरणं किती गरजेचं आहे हे सुचवणारा...

#जादूचीपेटी #04

" सुधांशु सर, नमस्कार. मी अजित पाटील. तुमच्या जादूच्या पेटी उपक्रमाविषयी व्हाटसअपवर मेसेज वाचायला मिळाला. म्हणून काॅल करतोय. मला मदत हवीये. 
" बोला अजित. तुम्ही कुठे असता, काय करता, काय समस्या जाणवतीये तुम्हाला..?"

" सर, माझं आयुष्यच संपवलं हो कोरोनानं..."

असं म्हणून तो रडायलाच लागला. 2,5 मिनिटांनी सावरला.. बोलू लागला..

" सर, मे अखेरीस माझ्या आई वडिलांना कोरोना झाला. त्यात गेले दोघंही. माझं लग्न ठरलेलं. तेही आता मोडलं. जिच्याशी लग्न ठरलेलं, साखरपुडा झालेला तिनं तिच्याच जुन्या मित्राशी पळून जाऊन जुलैमध्ये लग्न केलंय. किमान ती तरी मला साथ देईल वाटलेलं तर तिनंही पाठ फिरवली...मी आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. आता जगावंसंच वाटेना..." तो भडभडून सगळं सांगत होता..

मीही सुन्न होऊन ऐकत होतो. मलाही क्षणभर काय बोलावं सुचेना. आपल्या पोकळ शब्दांनी काय व किती धीर द्यायचा याला असंच वाटलं मलाही.... माणसं इतकं सोसतायत, हे दिवस का दाखवलेत नियतीनं असंच वाटून गेलं. मग जरासा धीर गोळा करुन मी बोलू लागलो...

" अजित, मित्रा, खरंच भयंकर आहे रे सगळं. मी व माझी बायको दोघंही कोरोनाग्रस्त आहोत.  सध्या घरीच औषधं घेतोय. रिकामा वेळ व हाती फोन म्हणून समुपदेशन वगैरे कामं करतोय. खरंच बाहेरची परिस्थिती फार अवघड आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं? प्रत्येकजण काही ना काही अडचण, संकट सोसतोय. तुझ्यासमोर जे नियतीनं दान वाढून ठेवलं ते खरंच वाईट. कुणाच्या नशिबी असे दिवस नको यायला.
मला सांग तुझी नोकरी/ व्यवसाय वगैरे काय आहे?

" सर मी एका कंपनीत एमआयडीसीत सुपरवायझर आहे. 4 महिने कंपनी बंद होती. सप्टेंबरपासून सुरु झालंय काम पण मलाच जावंसं वाटत नाहीये.

" तुझी मनस्थिती मी समजू शकतो पण घरी नुसतंच बसून तुला जास्त त्रास होतोय असं वाटत नाही का? आपण पाॅझिटिव्ह थिंकिंग वगैरे बोलतो खूप.. एकवेळ ते नुसतं बोलणं बाजूला ठेवू. कारण खूप अडचणीत माणूस असला की तत्वज्ञान नको असतं तर आधार हवा. याक्षणी तुला तुझ्या नोकरीचा आधार घ्यायला हवा.

तू म्हणतोस ना की तुझं सगळं आयुष्य संपवलं या कोरोना साथीनं. तसं नाहीये. तुझं आयुष्य संपवायचं असतं तर तुलाही मरण आलं असतं ना.. पण तू धडधाकट राहिलास ही मोठी गोष्ट आहे. आपल्या आईवडिलांचं हे असं अचानक कायमचं दुरावणं ही फार धक्कादायक गोष्ट, त्यात तुझी भावी वधू तसं वागली. तिनंही तुझ्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे प्रचंड दु:ख किंवा एकूण सर्वांविषयी तुझ्या मनात प्रचंड संताप असणं समजू शकतो. मात्र या सगळ्या गोष्टी तुला हळूहळू विसरायला हव्यात. तोच त्यावरचा एकमेक उपाय. बोलायला- ऐकायला कठोर वाटेल पण ज्या गोष्टींच्या आठवणी मनाला त्रास देतायत ते विसरायचं. ' लेट ईट गो' म्हणून त्याच त्रासदायक विचारांकडे पाठ फिरवायची. हे सोपं नाहीये पण करायला हवं. जगायचंय अजून तर हे करायला हवं.

" कसं विसरु हो सर. अंथरुणावर पडलो तरी आईबाबा आठवतात. आमच्या मावशीनं घराजवळच्या एका ठिकाणाहून दोन वेळच्या डब्याची सोय करुन दिली व ती तिच्या गावी गेली निघून. आता जे जेवण आल्यावर जेवताना आईची आठवण येते. घास उतरत नाही घशाखाली..."

" अजित, अशीच अवस्था सगळ्यांची असते. प्रत्येकाला आईवडिलांचं किंवा जिवलग व्यक्तीचं निधन असंच घायाळ करतं. यावरचा एकमेव उपाय म्हणजे आपलं मन कामात गुंतवणं. त्याला पर्याय नाही. तू जगावर राग काढतोयस पण एक लक्षात घे आज अनेकांच्या नोक-या गेल्याहेत. धंदा उद्योग बुडालाय. तुझी किमान नोकरी टिकलीये. तुला कामावर बोलवतायत. तुझ्याकडे काही गुण आहेत म्हणूनच तुला तिथे बोलवतायत की. मग तू नाकारतोस का? उलट तिथे गेलास की कामात मन रमेल. मित्र, सहकारी, बाॅस यांनाही तुझी कंडिशन माहितीये. काही चूक झाली हातून तर ते समजून घेतील. तू लवकरात लवकर कामावर जायला सुरुवात कर."

" सर, लग्न मोडलंय... तेही मनातून जाईना. मी कुणालाच नको, माझं कुणीच नाही मग कशाला जगू असं वाटलं..

" खरंतर लग्न होण्यापूर्वी तुझ्या त्या भावी बायकोनं आधीच हा निर्णय घेतला ही चांगली गोष्ट. त्यामुळे तुमच्या भविष्यातील अडचणी वाचल्या. ती मनाविरुध्द संसारात पडली असती तर कदाचित तुमच्यात सतत भांडणं झाली असती. सुख मिळालंच नसतं. मग परत वाद विवाद, घटस्फोट, कोर्ट..वकील वगैरे.. ते जास्त त्रासदायक झालं असतं तुम्हाला. तिनं भले धाडकन् निर्णय घेतला पण तो तिच्यासाठी व तुझ्यासाठीही योग्यच होता. 
आता ते सगळं तू हळूहळू विसरणं हाच त्यावरचा उपाय. 
यापुढे काही काळात तुझ्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून एखाद्या अधिक चांगल्या मुलीचं स्थळ सुचवलं जाईलच की. तसेच तुलाही एखादी मुलगी अपेक्षेनुसार भेटू शकते. जे जे वाईट घडणार होतं ते सगळं आता घडून गेलं, यापुढे फक्त चांगले दिवसच येतील असा विचार करुन तूच नव्हे तर अशा इतरांनीही जगायला हवंय..."

" सर, तुम्ही सांगताय. प्रयत्न करतो सगळं विसरायचा. कामावर जायचाही विचार करतो.." असं म्हणून पटकन् त्यानं फोन ठेवूनच दिला. मला वाटलं कदाचित त्याला सल्ला पटला नसावा...

##
आज अचानक त्याचा परत फोन आला.
" सर नमस्कार. मी अजित पाटील. ओळखलंत का?

" हो ओळखलं की रे. बोल कसा आहेस..?

सर, त्यादिवशी तुमच्याशी बोललो अन् संध्याकाळी आॅफिसमधले सगळे सहकारी भेटायला आले. त्यांनीही तेच सांगितलं. खास मस्त जेवणाचे डबे, बिर्याणी वगैरे घेऊनच आलेले सगळे घरी. एकत्र गप्पा मारल्या खूप. जेवलो. सगळ्यांनी सांगितलं की काम सुरु कर लवकर...मग आज कामावर गेलो. मी ज्या मशिनवर काम करतो ते सगळं पाहिल्यावर बरं वाटलं. अनेकांना कोरोनानं कसा त्रास दिला हेही ऐकलं. आपणपण त्यातलेच एक. 
यापुढे घरी बसून नाही रहायचं...हे ठरवलं सर. त्या होणा-या बायकोलाही हे घडल्यानंतर पहिल्यांदा काॅल केला व सांगितलं की तू फार चुकीची वागलीयस. भरपूर राग आहेच मनात... पण बाई तुझी तू रहा आता सुखी. किमान ज्यासोबत लग्न केलंय त्याला तरी परत धोका देऊ नकोस. रोखठोक बोलल्यानं मलाही मोकळं वाटलं बघा.. तुमचे धन्यवाद. ' नकोसं सगळं विसरायचं' हा तुमचा मंत्र आता चांगला लक्षात ठेवणार बघा...! "
मंडळी, अजित हा मंत्र नक्की ठेवेल लक्षात. आपणही लक्षात ठेवायला हवंय. दु:ख, अपमान, अपयश, त्रास, जवळच्यांचे मृत्यू असा ज्या गोष्टी त्रासदायक ठरतात त्यांना विसरण्यासाठी खास प्रयत्न करुया. अनेक चांगल्या गोष्टी आयुष्यात घडलेल्या असतात त्या आठवत राहूया!

तुम्हालाही कुणाशी तरी मनमोकळं बोलायचं असेल, मनातली व्यथा कुणाला सांगता येत नसेल तर आमची #जादूचीपेटी तुमच्यासाठीच आहे. नक्की 9833299791 या नंबरवर काॅल करा किंवा nsudha19@gmail.com यावर इमेल करा. मनमोकळं बोलायला कोणतीही फी नाहीच. बोलत राहूया एकमेकांचं जगणं सुसह्य करुया. आनंदी करुया...!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर( 9833299791)🌿

No comments:

Post a Comment